स्वतः चा व्यवसाय असलेले लोक - गप्पांसाठी

Submitted by Diet Consultant on 23 October, 2014 - 02:02

हाय
मी आरोग्य क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करीत आहे .
ज्या व्यक्तींचा स्वतःचा व्यवसाय आहे , अशा व्यक्तींकडून काही व्यवसाय विषयक मार्गदर्शन हवे आहे.
फार डिटेल असे नाही . पण कोणी स्वतःची स्ट्रगल आणि काही अनुभव सांगितल्यास शिकायला मिळेल. नव्या कल्पना सुचतील.
मार्केटिंग , पैशांची गुंतवणूक कधी कोठे किती , रीस्क कुठल्या स्टेजला किती घ्यावी , पार्टनरर्शीप इत्यादी ठळक मुद्दे.
नेट वरील आर्टिकल मी वाचत असते . पण स्वतःहून कोणी अनुभव सांगितलेले / वडीलकीच्या नात्याने डोस दिलेले मला जास्त आवडतील.

वि. पु केले तरी चालेल . संपर्क क्रमांक देता - घेता येईल .
निखळ गप्पा ही थीम राहील हा . फारच औपचारिक नको Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यप्स!, मराठी उद्योजक आपल्या धंद्याची ट्रिक दुसर्‍या मराठी उद्योजकाला सांगायला मागत नसावेत.

बाकी मी स्वत: एक उद्योजक म्हणून ना ला य क असल्याने मला अशी विधाने करायचा काही एक हक्क नाहीये!

मी साहित्य क्षेत्रात पुस्तकांचा व्यवसाय करत आहे. स्ट्रगल कुठल्या व्यवसायात नाही? तो करावा लागतोच.. थोडी चिकाटी हवी, थोडे धैर्य हवे, सतत प्रयत्न करायची तयारी हवी आणि सोबत कष्टाची जोड! सर्व साध्य होते!

व्वा ! <<< चला गप्पा मारू ह्या विषयांवर>>> चला .. Happy

जे जे स्वतंत्र व्यवसाय करताएत त्यांच्याकडून या खालील गोष्टी ऐकायला आवडतील,
१. नोकरी कि व्यवसाय.? अस प्रश्न तुमच्या आयुष्यात आला का.? तुम्ही व्यवसायाची निवड कशीकाय केली..? तो निर्णय औघड होता का.? कसा..?
२. तुमचे सुरुवातीचे अनुभव..

यादी अजून वाढवा मित्रांनो हवी तर .. Happy

मुंबई येथे पार पडलेल्या तीन दिवस मराठी उदयोजक परिषद मध्ये मराठी अब्जाधीश उदयोगपती मा. डी.एस. कुलकर्णी यांच्या भाषणाचा संपादित अंश...

बिझनेस करताना पुरून पुरून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. अंथरून पाहून पाय पसरा ही ज्या कोणी मराठी माणसाने म्हण तयार केली त्याला आपण माफ् करूया, कशाला त्याच्या नादी लागायचे. अरे व्हा ना मोठे, तुम्हाला कोणी सांगितले तुम्हाला अंथरून पांघरून मिळणार नाही म्हणून.

बाबारे मरताना डोक्यावर ५ रु सुद्धा कर्ज नको, ही दुसरी दळीद्री म्हण कोणी निर्माण केली माहित नाही. कर्ज नाही काढलं तर धंधा चालणार कुठनं. आज मुठभर जोंधळे पेरले तर पोतेभर धान्य येत. पोतेभर जोंधळे पेरले तर किती धान्य येईल हा साधा नियम आहे. आता मला सांगा स्वतःच्या घरातील जोंधळे आणून आणून तुम्ही किती आणणार, तो एक नियम आहे.

आज मी व्याख्यान द्यायला आलो आहे. आज मी इथे दमून आलो नाही, तर चिडून आलो आहे, मी आज खूप चिडलो आहे. मी स्वतः रोज माझ्या बायकोला सांगतो की जर माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण मला सुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही. मी पूर्णपणे मराठी नाही, अर्धा मारवाडी, अर्धा गुजराती व मग उरलासुरला मराठी ब्राम्हण आहे.

मी मारवाडी लोकांचा खूप मोठा भक्त आहे. हिशोबाला ते अगदी पक्के असतात. तोंडात नेहमी खडीसाखर असते. डोक्यावर त्यांच्या नेहमी बर्फ असतो. हे लोक नेहमी फ़्लेझीबल असतात, ताईसाहेब, काकासाहेब असे मधुर बोलतात. या उलट मराठी माणूस ताठ असतो व म्हणतो काय चुकले माझे बोला.

स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या असतात, दुसऱ्यांच्या लढायांचे वर्णन ऐकताना त्याचे काय चुकले तो का पराभूत झाला, तो विजयी कसा झाला हे शोधण्यापेक्षा तो पराभूत झाला तर का पराभूत झाला, त्याच्या चुका कोणत्या हे शोधा आणि त्यातनं त्या इतिहासातून आपण आपल्या लढाया लढायच्या असतात.

आज आपण भारतासारख्या देशात आहोत, एका बाजूने आतिशय भ्रष्ट आचरणाने देश रसातळाला चालला आहे असे असताना त्याच वेळेला आपल्याकडे दुसरी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही जगात कोठेही नाही ती भारतात आहे. जगातले सर्वात जास्त तरुण आज भारतात आहेत. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे आपल्या देशात आहेत ह्या काही आपल्या भक्कम बाजू आहेत, त्यामुळे बिझनेस करणाऱ्याला काही मरण नाही.

बिझनेस मध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे, तुम्हाला तुमचे आयुष्य ओळखता यायला पाहिजे आणि त्याला अनुसरून बिझनेस करता यायला पाहिजे. नेहमी आपल्या कस्टमरचा अभ्यास करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा कोणताही बिझनेस असू द्या जर तुमचे ऑफिस असेल तर ते नेहमी स्वच्छ क्लीन नीट नेटके ठेवा यावर सुद्धा तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असत.

धंद्यामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचे. धंद्यामधे विकणारा सर्वात महत्वाचा भाग असतो. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तर काहीना काही तरी विकायची पहिल्यापासून सवय ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्हाला टकलू माणसाला सुद्धा कंगवा विकता आला पाहिजे. काहीना काही विकण्याचा आत्मविश्वास निर्माण करा मग तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.

व्यवसायात प्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचे. सुरवातीच्या काळात मला किर्लोसकरांनी १०० रु दिले होते, चांगले कपडे, बूट व टाय घेण्यासाठी. तेव्हापासून मित्रांनो ही टाय जी माझ्या गळाल्या लागली आहे ती अजूनही आहे. मी नेहमी कुठेही जाताना व्यवस्तिथ नीटनेटके कपडे घालून जातो. तुमचा पेहरावा असा असला पाहिजे की तुम्ही समोरच्याला आपलेसे वाटले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व इतके स्वच्छ पाहिजे की तुमच्या वागण्या बोलण्यातून लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे.

मित्रांनो विहिरीत, ओढ्यात, स्विमिंग पूल / डबक्यात किती दिवस पोहायचे? नदीकडे आपण जायला हवे व पुढे समुद्राचे ध्येय ठेवले पाहिजे. रोज तुम्हाला बिझनेसला पैसे कमी पडत असतील तर समजा तुम्ही प्रगती करत आहात, आणि जर तुमचे पैसे उरत असतील लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या दिशेने जात आहात. दरवर्षी तुमचा १० टक्केने बिझनेस वाढलाच पाहिजे, तुमची ग्रोथ झालीच पाहिजे.

१. हार्डवर्क.

  • किमान सेटल होईपर्यंत दिवसरात्र काम करायची तयारी हवी. धंदा म्हणजे २४ तासाची नोकरी, हे लक्षात ठेवावे. अजूनही कुठे बाहेरगावी गेलो, तरच सकाळ अन संध्याकाळ रस्त्यावर कशी दिसते ते पहायला मिळते.
  • दुकान सुरु केले अन चालू लागले असे होत नाही. सुरुवातीला रिकामे बसून माश्या माराव्या लागतातच. ते जोरात चालवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, पण त्यासाठी आडमार्ग वापरू नयेत. त्याने सूज येते. ग्रोथ होत नाही.
  • किमान १००० दिवसांचा वेटिंग पिरियड आहे. मात्र, इतक्या मुदतीत धंदा "चालू" लागला नाही, तो बेटा, दुसरा धंदा ढूँढ लेना.

२. सेवाक्षेत्रातील चार्जेस.

  • दुकान, हे दुकान आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे. मैत्री, नातीगोती घरी ठेवावीत. नम्रपणे आपली फी वसूल करावी. कुणी कन्सेशन मागितले अन द्यावेसे वाटलेच, तर १०%पेक्षा जास्त देणे परवडत नाही हे ध्यानी ठेवणे गरजेचे. म्हणजेच, १०० रुपये तपासणी फी आहे, तर १०० रुपये परत देणे परवडत नाही. १०-२० रुपये द्यावेत, वर मोठ्या तोंडाने सांगावे, की हे १०- २०% कन्सेशन आहे.
  • आपला धंदा डायरेक्ट कस्टमरने केलेल्या जाहिरातीतून जास्त वाढतो. त्यामुळे बोलघेवड्या गिर्‍हाईकास, त्यातल्या त्यात नव्या गावातून आलेल्या माणसास, जरा जास्त घोळात घ्यावे. चार्जेस कमी करायची गरज नाही, एक्स्ट्रा कर्टसी, थोडे चहापाणी विचारणेही पुरते. ओळख ठेवणे गरजेचे. म्हणजे, त्याने दुसर्‍या कुणाला आणलं तर त्या नव्या माणसासमोर या पहिल्याला थोडा मान द्यावा. Wink

३. कीप अपडेटिंग.

  • तुमचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठीचे प्रयत्न. मी नियमीत वाचन, कॉन्फरन्सेस अटेंड करणे करतो.
  • पेपर प्रेझेंटेशनमुळे तुमची ओळख तुमच्याच क्षेत्रातल्या ज्युनिअर्ससमोर तयार होते. आपल्याच क्षेत्रात एक निशे शोधून त्यात मास्टरी असली, की कलिग्जही आपल्याकडे रेफरल्स देतात.
    रेकॉर्ड कीपींग हा यासाठी कळीचा मुद्दा आहे. त्यातून तुम्ही कुठे होता, कुठे आलात हेही कळते, अन रिसर्चसाठी डेटा मिळतो.
  • दुकान अपडेट करत रहावे. दर वर्षी किमान एक नवे यंत्र आणणे. आपल्याच कामाच्या जागेचे इंटेरियर नवे करणे, काँप्युटर्स इ. नवे तंत्रज्ञान वापरात आणणे. अगदी नुसती रंगरंगोटी देखिल पुरते.
  • येणार्‍या लोकांसाठी सुखसोयी पुरवणे. उदा, वेटिंग एरियात एसी नसेल परवडत तर किमान कुलर, पिण्याच्या थंड पाण्याची सोय, सभ्य व गोड बोलणारा स्टाफ. इ. बाबींकडे लक्ष द्यावे.

अजूनही अनेक बाबी आहेत. आठवतील तशा एकेक लिहीन. स्टाफ मॅनेजमेंट अन पैसा मॅनेजमेंट या दोन कठीण गोष्टी आहेत. दुकानाच्ए रिसोर्सेस उदा. लाईट, इंटरनेट इ. वाया घालवणारा / त्याचा दुरुपयोग करणारा, उद्धट स्टाफ हा चोरी करणार्‍या स्टाफ इतकाच वाईट.

इब्लिसान्चा प्रतीसाद खरच परखड पण योग्य आहे. मागे स्व. श्री जयन्त साळगावकरानी सान्गीतले होते ( मुलाखतीत) मारवाडी किन्वा गुजराथी माणुस धन्द्यात १ रुपया गुन्तवतो, नफा झाला की मिळालेल्या आणखीन २ रुपयातुन १० पैसे घरात वापरुन उरलेले पैसे परत धन्द्यात गुन्तवतो, तर मराठी माणुस बायको व मुलाबाळान्साठी ९० पैसे खर्च करुन १० पैसे धन्द्यात घालतो, यातुन काय ते समजा.

माझ्या घराशेजारी २ किराणा दुकाने आहेत. एक मराठी माणसाचे व दुसरे मारवाडी माणसाचे. मारवाडी दुकानदार सकाळी ६ वाजता दुकान उघडुन, दिवसभर उघडे ठेऊन, रात्री १० वाजता बन्द करतो. मराठी माणुस सकाळी ९ ते १० च्या दरम्यान कधीही येऊन दुकान उघडतो व कधीही बन्द करतो.

बाकी वेळ मिळेल तेव्हा लिहीन. पण मी नोकरी केलीय, बिजीनेसचा अनूभव नाही.

इब्लिस >>>>>>मस्त !! +११११
संग्रहणीय मुद्दे आहेत अगदी ....

रश्मी >>> खरय ..
मारवाडी दुकानदार सकाळी ६ वाजता दुकान उघडुन, दिवसभर उघडे ठेऊन, रात्री १० वाजता बन्द करतो. मराठी माणुस सकाळी ९ ते १० च्या दरम्यान कधीही येऊन दुकान उघडतो व कधीही बन्द करतो. >>>> अगदी

526187_456960267659326_1278101248_n.jpg

खरे तर व्यवसायात यश वगैरे ह्या म्हणायच्या गोष्टी आहेत. आपण ठराविक उंची गाठली कि त्याहीपेक्षा उंच काहीतरी असल्याचे समजते आणि आपल्या खस्ता, प्रयत्न तसेच चालू राहतात. हा खेळ समाधानाचा आहे.
मी ३ वर्षापुर्वी पुण्यात बांधकाम क्षेत्रात उतरलो, या क्षेत्रातील खूपच बरे वाईट अनुभव आलेत.
सीओईपीतून बाहेर पडल्यानंतर मी कुठेतरी कायमची चांगली नोकरी करावी अशी पालकांची अपेक्षा होती त्यामुळे माझ्या व्यवसायाला विरोध माझ्या घरापासून सुरु झाला होता, विद्यार्थीदशेतून नुकताच बाहेर पडलो होतो त्यामुळे बँक अकाउंट वर कधी चार आकडी संख्या आली नव्हती त्यामुळे बँकानीही या क्षेत्रात भांडवल पुरवायला सपशेल नकार दिला, शेवटी दिड वर्षे नोकरी करुन तुटपूंजी रक्कम गोळा केली आणि महानगरपालिकेची टेंडर भरायला सुरवात केली....... ती आजतागायत चालूच आहेत (वक्त ओ चीज है जो सब बदल देती है.).

हा खेळ समाधानाचा आहे.
<<
+१०००

बँकांबद्दलचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे किकु तुमचं.

गरीब व होतकरू माणसाला बँका कर्ज का देत नाहीत ते परमेश्वराला ठाऊक.

अगदी सगळ्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करणार्‍याला पीएमआरवाय सारख्या योजानांमधेही कर्ज द्यायला प्रचण्ड त्रास देतात हे बँक मॅनेजर लोक. कुणाला कर्ज द्यायचं याची रिस्क असेसमेंट अन डिस्क्रिजन खरं तर यांच्या हातात असतं. मोठ्या गुंडांनी करोडो बुडवलेले चालतात यांना. धडपड्या तरुणांकडून पैसे बुडतील अशी रिस्कही नको असते..

१८.५% ने फक्त ६०-७० हजार रुपयांचे कर्ज मागितलेले होते. माझा लेक्चरर असण्याचा पगार त्यावेळी ४-४॥ हजार रुपये होता. तरीही बँका दवाखाना उघडायला कर्जे देईनात. नशीबाने तारण ठेवायला घर होते, म्हणून ते पर्सनल लोन तरी मिळाले.. आज दुकानात येऊन लोन डॉक्युमेंट्सवर सह्या घेऊन जातात. तारण म्हणून डिग्री सर्टीफिकेट्सच्या झेरॉक्स मागतात Happy

वक्त वक्त की बात होती है हेच खरं. थोड्या वेळाने दुकान सुरू करतानाचे पुढचे अनुभव लिहितो.

इब्लिसा, लिहा वेगळ्या धाग्यावर...
आम्हाला अनुभवाने माहिती आहे की सर्रास सर्व प्रकारचे दवाखाने/क्लिनिक्स/हॉस्पिटल्स वगैरे बाबी या दुकानेच बनली आहेत (मी तर म्हणेन की "पेशंटचे खिसे कापायचे खत्तलखाने झालेत") Proud
पण इब्लिसराव, किमान तुम्ही तरी तुमच्या दवाखान्याला "दुकान" म्हणू नका ओऽऽ .... लईच झोम्बत.. Sad

विकु, त्याच लेखात त्यांनी व्हिजन स्टेटमेंट वगैरवर नंतर लिहिन असे म्हटले होते. नंतर काही लिहिले असल्यास वाचनात आलेले नाही.

ईब्लिस छान मूद्देसूद उपयुक्त पोस्ट.
अजूनही लिहिण्यासारखे बरेच आहे आपल्याकडे, सोबत वैयक्तिक अनुभवही टाकू शकता, स्वताचा धागाही काढू शकता. जेणेकरून सारे हेडरमध्ये अन सलग राहील.

मित्रानो .....
या ग्रुप वर खुप प्रतिसाद आहेत खर तर मला लिखानाची सवय नाही शुध्दलेखना मधे काय चुकले तर ..माफ करा , पण मला काय म्हणायचे आहे त्याचा आर्थ समजावुन घ्यावा ही विनंती ..
असो मी स्वत: कॅम्पुटर क्षेत्रा मधे गेली 14 वर्षे व्यवसाय करत आहे ..इथे करत आहे म्हणने पेक्षा करत होतो आसेच योग्य...आता हा व्यवसाय करायची इच्छाच संपली आहे.. कारण गेल्या दोआहे पुर्वी ज्या माणसा वर विश्वास ठेवुन लाखो रुपायाचा माल दिला तो आता पळुन गेलाय त्यामुळे 12 वर्षामधे जे काही कमवले ते सर्व गेले आणि आजुनही कर्ज डोक्यावर आहे ..कर्जाला घाबरत नाही, पण जो पर्यंत चलती चालु aaheतो पर्यंत भिती नाही जर का चलती बंद झाली तर नक्कीच आडचण निर्माण होणार बॅंक कोणालाही माफ करत नाही हे लक्षात आसावे .
मित्रानो आज इथे हे सर्व लिखान करण्याचे कारण फक्त अनुभव शेअर करणे एवढेच नाही तर काही व्यवसाया मधिल चुकिचे मुद्दे कळायला हावेत त्या साठी हा आटापिटा ..काही मुद्दे आहेत कि ज्या मुळे माझे नुकसान झाले.

* व्यवसाय करत आसता सर्वांना कर्ज घ्यावेच लागते परंतु ते अश्या प्रकारे नसावे कि तुमचे सर्व पणाल लावायला लागेल.
*तुमच्या फायद्या मधे सर्वजण भागीदार होतील पण नुकसाण झाले तर कोणच होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.
*कोणताही कस्टमर जर का जास्त व्यवसाय देत आसेल तर फक्त त्याच्या वरच विसंबुन राहु नये ..सतत नविन लोक शोधावेत.
*आपल्या कंपनीचे नियम हे आपल्या फायद्या साठीच आसावेत या मधे एखाद कस्टमर हा चांगला किंवा वाइट आहे आसे ठरवुन नियमात बदल करु नयेत.
*कस्टमर ने जर पेमेंट बाबत दिलेली कबुली पाळली नाही वेळेत पैसे दिले नाही तर त्याच्या बरोबर व्यवसाय करु नये किंवा त्या पासुन सावध राहावे.
*ओव्हर ट्रेड टाळावा प्रत्येक कस्टमर ला क्रेडिट लिमिट उधारीच्या मर्यादा ठरवा त्या नेहमी पाळाव्यात.
*तुमचा व्यवसाय चांगला चालला आसेल तर सर्व नातेवाइक मित्र मंडळी म्हणेल ती मदत करतात पण जर का काही प्रॅब्लेम झाला तर आई वडिल सुध्दा विचार करतात मदत करायची का नाही ते ..
*क्रेडिट पेक्षा डेबिट रक्कम जास्त होता कामा नये.
*कोणाल पण उधार देताना शंभर वेळा विचार करा कारण एक चुकाचा उधारदार तुमचा व्यवसाय नुकसानीत न्यायला कारणीभुत राहु शकतो.
*व्यवसाय करताना आपल्यला आनंद होतो मनाला पटत नसेल तर ते डिल करु नका कारण उद्या काय आहे ते तुम्हाल माहित नसते.
*कर्जाचा डोंगर वाढत तर नाही नाही ना ? आसे प्रत्येक महिन्या मधे तपासुन पहा कर्जाची काळजी नको पण परत फेड वेळीच्या वेळी व्ह्यावी याची काळजी नक्की करा.
सगळ्यात महत्वाचे कितीही आडचण आसली तरी बॅंकेच्या व्यतरीक्त इतर प्रकारे कर्ज उपलब्ध करु नये आश्या कर्ज प्रकरणा मधे व्याजाचा डोंगर संपतो पण मुद्द्ल वर्षोन वर्षे बाकी राहु शकते.

तुमच्या व्यवसायाचे नियम तुम्हीच ठरवा दुसर्याच्या नियमा वर व्यवसाय करु नये.

आसो भरपुर बोललो कदाचीतहे सर्व वाचल्या वर तुम्ही म्हणताल काय निगेटिव्ह आहे हे लिखान परंतु खरच सांगतो मित्रानो हे नियम मी पाळले नाहीत त्या मुळे आज माझा व्यवसाय बंद करावा लागला आहे .

काही चुकले आसेल तर माफ करावे ..

कळावे ...काळजी आसावी .
अपला मित्र
सचिन ......

सचिन , अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेत आपण .. मनापासून धन्यवाद ..
कारण काय कराव ते खूप ठिकाणी वाचायला मिळत.. काय करू नये हे सांगू शकणारे लोक विरळाच ..

Pages