पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ५ मारवंथे - समुद्रसपाटी

Submitted by आशुचँप on 5 April, 2015 - 13:53

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

=========================================================================

कालच्या थांबणे प्रकरणावर रात्री बरीच चर्चा झाली आणि त्यात असे ठरले की स्लो बॅच पहाटे लवकर उठून मार्गस्थ होईल आणि त्यानंतर सुमारे तासाभरानंतर सुसाट ग्रुप निघेल. वाटेत ते स्लो बॅचला गाठतील आणि तिथून पुढे एकत्र प्रवास करता येईल.
स्लो बॅच यावेळात जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा प्रयत्न करणार होती आणि त्यात होते घाटपांडे काका, आपटे काका, युडी आणि अर्थातच मी.

अॅच्क्युअली या वेळेपर्यंत मी वेगाबद्दल किंवा सुसाट ग्रुपच्या फिटनेसबद्दल फार हेवा केला नव्हता. ते त्यांच्या स्पीडनी जातायत आपण आपल्या स्पीडनी जाऊ असे म्हणत निवांत होतो. पण त्यांना एक तास जास्तीचे झोपायला मिळणार आणि मला केवळ स्पीड कमी असल्याने काका लोकांबरोबर पहाटे लवकर उठून जायला लागणार ही गोष्टी नाही म्हणली तरी चांगलीच लागली. स्पीड, फिटनेस या सगळ्याच बाबतीत कमीपणाची भावना मनात घेरून राहीली आणि हीच वेळ होती खडबडून जागे व्हायची.

तोपर्यंत मी असा जिद्दीला पेटून वगैरे काय उठलो नव्हतो पण आता मात्र मला असे जाणवले की आपण फारच शिथील झालो आहोत. बाकीचे करू शकतात तर आपण का नाही. इतकेपण आपले वय झाले नाही की शरीराची एवढी काळजी घ्यायची. ते काय नाही आजपासून सायकल जोरात दामटावयाची. काय होईल जास्तीत जास्त, रात्री अंग दुखेल, पाय दुखतील. गोळी घेऊ दुखले तर पण आता मागे पडायचे नाही. जी काही ताकद असेल तरी उरलेल्या ९ दिवसांमध्ये एकवटवायची आणि सगळ्यांच्या बरोबरीने मोहीम पूर्ण करून.

आणि मग निघालो ते अगदी काळोख्या पहाटे. तेव्हा देखील मनस्वी उकडत होते. टिपिकल कोकणातले वातावरण. अंकोला गावातून बाहेर पडून हायवेला लागलो आणि मी पॅडलला गती दिली. आज काहीतरी करून दाखवायचाच दिवस होता. आणि झामझूम करत काका मंडळींना मागे टाकत पुढे सुटलो तोच बाजूला एक कॉफीची टपरी दिसली. नुकताच वेग पकडल्याकारणाने मला लगेचच थांबणे जीवावर आले आणि पुढच्या टपरीत कॉफी घेऊ म्हणून पुढे निघालो पण तो वेडेपणा होता हे पुढे गेल्यावर लक्षात आले. पुढे गेल्या गेल्या एक छानशी चढण लागली आणि लक्षात आले की रस्ता आता अरुंद आणि काळोख्या भागातून चालला आहे. आजूबाजूला कुणी नाही. इतक्या पहाटे कुठल्याही गाड्यांची वर्दळ नव्हती. बाजूला अनेक ट्रक्स पहाटेच्या साखरझोपेत पेंगत होते. गेलेच तर एखादे अजस्त्र धुड बाजूने गरम हवा फेकत जायचे. पण ते वगळता अतिशय सुनसान रस्ता. केवळ सायकलच्या लाईटमध्ये जितका दिसेल तेवढाच रस्ता उजळून निघत होता आणि बाकी सगळे काळोखाने गिळून टाकले होते. पण त्यातही अंधुक अंधुक अशी झाडांची, डोंगरांची आऊटलाईन दिसत होती. वर पाहिले तर चांदण्या अर्धवट लुकलुकत होत्या.

नाही म्हणले तरी थोडी भिती दाटून आली मनात. आणि मागून येणाऱ्या काकांबरोबर जावे म्हणून थांबलो. पण लांबवरूनही त्यांच्या सायकलचा लाईट दिसून येत नव्हता. आपण खरेच वेगात आलो का ते लोक्स पहिल्यांदा दिसलेल्या टपरीवर थांबले हेही कळत नव्हते. फोन काढला तर त्याला रेंज अजिबात नव्हती. आता अशा सुनसान रस्त्यावर एकट्याने अंधारात थांबणेही सुरक्षीत वाटेना. भिती प्राण्यांची नाही तर माणूसप्राण्याची होती. नाही म्हणले तरी सायकलसकट मोबाईल, कॅमेरा वगैरे धरून ६०-७० हजाराचा ऐवज होता. म्हणले मरूंदे पुढे धाबा दिसेल तिथे थांबू म्हणत पुन्हा एकला चालो रे सुरु केले.

वाटेत एक गंगावली का अशाच नावाची नदी दिसली. हीच बहुदा गोकर्णाजवळ समुद्राला मिळते असे नकाशात पाहिल्याचे आठवले. आता थोडीफार वर्दळ वाढली होती. पण ती केवळ वाहतूक करणाऱ्या ट्रक्सची. त्यामुळे आपला टेललाईट व्यवस्थित आहे ना हे मधून मधून तपासून पाहत होतो. हो त्याच्याच आधारावर त्याना माझ्या अस्तित्वाची जाणिव होणार होती. मध्ये मध्ये लांबून बल्बचा उजेड दिसला की हायसे वाटत होते पण ते बल्ब बहुदा ट्रकवाल्यांच्या मुक्कामाची खूण म्हणून असावेत कारण तिथे फक्त ट्रक्सच थांबलेले दिसत आणि टपरीवजा काहीही नसे.

अखेरीस एक धाबा दिसला आणि तो रस्त्याच्या काहीसा आत असल्यामुळे मी खुणेसाठी रस्त्याच्या क़डेलाच सायकल लाऊन त्याचा रेड ब्लिंकर चालू ठेवला व ती नजरेच्या टप्प्यात राहील अशा बेतात आत जाऊन बसलो. सुमारे २० एक मिनिटानंतर काका मंडळी आली. तिघेही एकत्रच होते. मला वाटले की आता पहिल्या धाब्यापाशी न थांबल्याबद्दल कातावतील पण घाटपांडे काकांनी आल्याआल्याच अरे मस्त स्पीड मिळाला आपल्याला. बरे झाले पहिल्या टपरीपाशी नाही थांबलास ते फुकट वेळ गेला असता अशी शाबासकी दिली. म्हणलं लई भारी ग्रुप निवडलाय आपण.

आता मस्त झुंजुमुंजु झाले होते आणि हवेत किंचितसा गारवा होता. पुढे गेलो तर चक्क धुके वगैरै पण दिसले. म्हणलं यासाठी एक जोरदार फोटो झाला पाहिजे.



लई भारी काका मंडळी

वाटेत मदनगेरी, बेटकुळी अशा नावांची गावे पार करत आठच्या सुमारास कुमठा गाव गाठले देखील. इथेच सुसाट ग्रुप येऊन भेटणार होता. अंकोलापासून हे गाव सुमारे ३५ किमी अंतरावर आहे. रस्त्याला चढ उतारही बरेच होते. अगदी कोकणात असतात तसेच पण हायवे असल्यामुळे फार तीव्र नव्हते हीच त्यातल्या त्यात सुखद बाब.

कुमठ्याच्या बसस्टॅडजवळच अन्नपूर्णा म्हणून एक मस्त हॉटेल मिळाले. तिथे बनाना बम्स नावाचा एक वेगळाच प्रकार खाल्ला. अगदी पुूरीभाजी सारखी पुरी पण त्यात केळ्याचे सारण भरलेले. बराच पौष्टिक आणि चवीलाही चांगला लागणारा प्रकार मला फारच आवडला आणि नंतरही जिथे जिथे मिळाला तिथे तिथे मागवलाच.

त्यावर मस्त उत्तम कॉफी पिऊन निघणार तोवर सुसाट ग्रुप येऊन थडकलाच.

त्यांनी एक बातमी अशी आणली की मामांना अंकोल्याहून पुण्याला जायला (सायकलसकट) सोयिस्कर काही मिळत नसल्याने ते मँगलोरपर्यंत आमच्याबरोबर येतील आणि तिथून ते व आपटे काका (यांनाही कामाच्या निमित्ताने जाणे भाग होते) परततील. म्हणलं चला अजून दोन दिवस तर आहेत आपल्याबरोबर.

आता प्रवासाची साधारण रूपरेखा अशी ठरली होती की किमान २० किमी अंतर पार करून मगच ब्रेक घ्यायचा. किंवा अगदीच काही गरज पडली तर. त्यानुसार आता पुढचा टप्पा होता होन्नावर. रस्ता चांगला होता. मध्ये मध्ये खड्डे होते पण फारच चढ उतार नसल्याने सुसाट जाता येत होते आणि आज पहिल्यांदाच मी सुसाट ग्रुपबरोबर होतो त्यामुळे खूपच आत्मविश्वास वाढल्यासारखे वाटत होते. आणि लक्षात आले की केवळ फिजिकल नव्हे तर मानसिक फिटनेसही अशा मोहीमेसाठी किती महत्वाचा असतो ते. एक क्षण असा येतो की तुम्ही आधीच आखून घेतलेल्या मर्यादा तोडण्याची मानसिक तयारी करावी लागते.

तर असो. तासाभरातच होन्नावर गाठले.
होन्नावरविषयी थोडे - जैन रामायणात हुनुर्था म्हणून ज्या बेटाचा उल्लेख येतो हेच ते गाव. त्यानंतर चंदावरच्या कडंब राजांच्या कार्यकालात एक महत्वाचे बंदर म्हणून होन्नावर उदयास आले. प्रसिद्ध प्रवासी इब्न-ब-टूता यानेही या बंदराचा उल्लेख केला आहे. विजयनगर साम्राज्यात हे एक प्रमुख व्यापारी ठिकाण होते आणि पोर्तुगालवरून आयात केलेले जातिवंत घोडे इथे विक्रीला आणले जात. कृष्णदेवरायाने पोर्तुगिजांना त्यासाठी होन्नावर आणि भटकळ येथे किल्ले बांधण्याचीही परवानगी दिली होती. नंतर हैदर अली व टिपू सुलतानच्या काळातही हे एक प्रमुख ठिकाण राहीले व नंतर मद्रास प्रांतात विलीन झाले. (संदर्भ विकिपिडीया).

होन्नावर नंतर माविनकुर्वेची खाडी पार करून कासारगोड गाठले. इथला बीच बराच फेमस आहे असे ऐकले होते पण इतक्या टळटळीत उन्हात अर्थातच जाणे शक्य नव्हते. त्यामुळे च्याउम्याऊ पोटात ढकलून पुढे निघालो. आता पुन्हा एकदा उंचसखल भाग सुरु झाला आणि त्याचबरोबर कमालीचा उष्माही. घाटावरच्या उन्हाच्या तडाख्याच्या मानाने चटका नसला तर झळा आणि कमालीचा दमटपणा यामुळे जो काही घाम निघालाय त्याला तोड नव्हती.

हुबेहुब कोकण

पुढचे गाव लागले मंकी (का मान्की, मानकी) आणि त्यानंतर होते ते कर्नाटकातले प्रसिद्ध मुरुडेश्वर मंदिर. हे टाळून जाणे शक्यच नव्हते त्यामुळे सायकली आत वळवल्या. जाताना जो उतार लागला ते पाहून पोटात गोळाच आला. म्हणलं येताना हा सगळा चढ चढून यायचा आहे रे देवा. असो, तर मंदिराचे भव्य गोपूर आणि त्यापाठून दिसणारी शंकराची मूर्ती पाहतच आत प्रवेश केला.

असेही इतक्या दिवसात पहिल्यांदाच मला कॅमेराचा खऱ्या अर्थाने उपयोग करता येत होता त्यामुळे कसलाही संकोच न बाळगता मनमुराद फोटोग्राफी केली. सगळेच फोटो काय इथे देत नाही. मोजकेच दिले आहेत.

आपल्या लोकांबरोबर बरेचसे फॉरेनरही आलेले दिसत होते. आणि देवळात शॉर्टस चालणार नाहीत म्हणून काय वाट्टेल ते गुंळाडून फिरत होते. एकीने तर चक्क बाथ टॉवेल गुंडाळला होता. त्यामुळे ही देवळात फिरताना बघून ही आता बहुदा थोड्याच वेळात आंघोळीला जाणार का काय असेच वाटत होते.

मुरुडेश्वराबद्दल बरेच जणांनी लिहून झाले आहे त्यामुळे त्यात वेळ घालवत नाही. जेवताना काय धमाल आली ते सांगतो. देऊळ पाहून झाल्यावर महाप्रसादासाठी आत गेलो. भराभरा रांगेने सगळे बसले तसा मी देखील जाऊन बसलो. थोड्यावेळानी एक लुंगीधारी आला आणि मला कानडीत काहीतरी सांगायला लागला. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव पाहून त्याने इशारे करायला सुरुवात केले. त्यात त्याने माझ्याकडे हात करून खाली त्याच्या पायापर्यंत असा नेला.

च्यामारी हे काय कळेना पण म्हणलं बहुदा नमस्कार करायाला सांगत असावा. हे काय भलतेच आणि मलाच का सांगतोय असे मनात आले पण म्हणलं असेल इथली प्रथा...म्हणतात ना व्हेन ईन रोम....तसे....आणि मी बसल्याजागी साष्टांग नमस्कार घातला त्याला आणि तो एकदम गोरामोरा होऊन मागे सरकला आणि आजूबाजूचे सगळेजण हास्यस्फोट झाल्यासारखे हसायला लागले.

आता मला काय ठावकी तो माणूस पुजारी नसून वाढपी होता आणि मला पुढे सरकून बसायला सांगत होता. बर हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. तिथली पद्धत अशी एका गाडीत ताटे वाट्या ठेवलेली असतात ती एकजण सरकवत जातो आपण पटापटा उचलत जायची. मी यावेळी एकदम हुशार होतो आणि पटकन ताट उचलले पण शेजारी बसलेल्या सुह्दला तेवढ्यात मोबाईलवर क्रिकेट स्कोर बघायचे सुचले आणि त्याने मान खाली घालेपर्यंत गाडी गेलीदेखील. त्याच्या लक्षात आल्यानंतर तो गाडीच्या मागे पळत पळत गेला आणि ताट आणि भांडे घेऊन आला. त्यात एका ऐवजी दोन भांडी आणली आणि आता या जाद्या भांड्याचे काय करायचे हे त्याला कळेना.

समोर बसलेली मंडळी तर आमची गडबड बघून मनसोक्त हसत होती. इथे काय भाषेचा अडसर नव्हताच. पुढचा प्रकार केला बाबुभाईंनी. ताट धुवायला गरम पाणी देतात. देतात नव्हे टाकतातच. आणि ते टाकत असताना बाबुभाई मागे वळून वेदांगशी बोलत होता आणि त्याला एकदम गरम पाणी पडल्याचे जाणवताच दचकला. ते पाहून समोरचे अजून खुष झाले आणि हसायला लागले. त्यांना म्हणजे आम्ही कुठूनतरी परग्रहावरून आलेले प्राणी वाटत होतो की काय देव जाणे. त्यानंतर जेवण संपेपर्यंत आम्ही काहीतरी धमाल करू या आशेने आमच्याकडे चोरून चोरून बघत होते. पण आम्ही अजून काही दंगा केला असता तर देवळातून बाहेर काढले असते.

महाप्रसाद झाल्यावर बाहेर पडलो तेव्हा उन्हाने तापायची सीमा गाठली होती. फरशीचा तर तवा झाला होता आणि तसेच पाय पोळवत बाहेर पडलो. एक फोटोसेशन केले.

आणि बाहेर निघणार तोवर सुह्दची सायकल पंक्चर झाली. मग त्या वेळेचा सदुपयोग पोट्रेटसाठी केला.

दुपारचे तीन वाजत अाले तरी आम्ही मुरुडेश्वरातच होतो आणि अजून तब्बल ७० किमी अंतर बाकी होते. आणि भरपूर भात खाल्यामुळे सुस्ती आली होती आणि त्यात इतक्या तळपत्या उन्हात सायकल चालवायचे प्रचंड जीवावर आले. पण आज सगळे एकत्र होते त्यामुळे वाटेत जागोजागी कलींगड खा, शहाळे पी असे करत करत शरीरातले पाण्याचे संतुलन राखत भटकळ गाठले.

यती नामक काहीसे गोल्डस्पॉटसदृश पेय चाखताना बाबुभाई.

एके ठिकाणी कलिंगड खरवडून खायला मी माझा स्वीस नाईफ काढला. पण इतका शोअॉफ लान्सदादांना फारसा आवडलेला दिसत नाही बहुदा. Happy Proud Proud

इथून पुढे जो काही खराब रस्ता लागला त्याने आधीच नकोसा झालेला जीव आणखी त्रासवला. अतिशय हेवी ट्रॅफिक आणि त्यामुळे जागोजागी खड्डे, भेगा पडलेल्या, त्यात चढउतार होतेच. सकाळपासून मस्त झालेल्या प्रवासाची कसर हा आता दिवसातला शेवटचा टप्पा भरून काढत होता.

पहिल्यांदाच सुसाट ग्रुप बरोबर राहण्याचा आनंद

शेवटी एकदाची उन्हे उतरायला लागली तेव्हा मावळत्या सूर्याला सलाम ठोकून मारवंथेमध्ये प्रवेश केला.

आमचे हॉटेल अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच होते. मध्ये फक्त रस्ता. पण समुद्रस्नान करण्याचा उत्साह कुणालाच नव्हता. हॉटेल होते मोक्याच्या जागी पण बऱ्याच काळात इथे कुणी आल्यासारखे वाटत नव्हते. त्यामुळे स्टाफला काहीही सांगितले की ते थोड्या वेळाने विसरून जात. मग पाय आपटत पुन्हा एकदा मागणी केल्यावर कॉफी किंवा खायला मिळे. खोल्या तर टॉलस्टॉयच्या माणसाला जागा लागते किती या वचनाचे स्मरण करूनच बांधल्या होत्या.

कपडे घामाने इतके चिंबले होते की रोजच्या रोज धुण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. त्यामुळे सगळा धोबीघाट काढला आणि बाहेर अंगणातच वाळत घातला.

आजच्या दिवसाचा अनुभव म्हणजे मनोशक्तीने तनशक्तीवर केलेली मात. आज सॅडल सोअरनी पण फार सतावले नाही. बहुदा घासून घासून आमचे पार्श्वभाग आता सरावले होते. अधुन मधुन झोंबायचे पण ते सहन करण्याइतपत होते.

आजचा प्रवास १३५.७ किमी. समुद्रसपाटी असली तरी चढ उतारांनी आणि घामाने चांगलाच कस काढला.
पाच दिवसांत ६९७ म्हणजे जवळपास ७०० किमी अंतर पार केले होते. आमच्याबरोबरचे वजन गृहीत धरता चांगलाच वेग होता हा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. फोटो पण छान आलेत.
हा भाग बराच फिरुन झालाय. अर्थात कारने. गर्मीमध्ये सायकल कशी चालविली असेल याच आश्चर्य वाटत रहात.

छान! या वेळचा निर्धार आवडला आशुचॅम्प!
मुरुडेश्वर मंदिर छान आहे.
अंकोला इथे आमची कुलदेवी आर्यादुर्गेचं मूळ मंदिर आहे. तिथे एकदा जायचंय.तुम्ही पाहिलं का ते?
एरवी आम्ही कशेळीजवळचं(रत्नागिरी) जे आर्यादुर्गा देवी हसोळ आहे तिथे दर्शन घेतो. गावाचं नाव देवी हसोळ.
मनोशक्तीने तनशक्तीवर केलेली मात. >>>>>>>>>> हे पटलं.

आशुचॅम्प् अगदी मनापासुन स्पष्ट लिहीते की मला तुमचा खरोखर हेवा वाटला. तुमचे आणी इतरान्चे साहस खरच बेजोड आहे, पण असे साहस करायला मिळणे, आपल्या सभोवतालचे जग अनुभवणे, निसर्गात रमणे हे अतीशय विलक्षण आहे. क्षणभर खरच वाटुन गेले की मला पण पुरुषाचा जन्म मिळाला असता, तर कदाचीत मी पण तुमच्या बरोबर या यात्रेत सहभागी झाले असते.

मालिका वाचतेय, आगे बढो. तब्येतीची पण काळजी घ्या.

आशु सुंदर लेखन

एक गोष्ट तो मंदिराचा फोटो कढला आहेस म्हणजे वरुन आठवा फोटो.. तो.... तो जर आपण फास्ट खाली वर स्क्रोल केला ना तर भारी इफेक्ट येतोय चेक कर Happy

बाकी वर्णन छानच Happy

मस्त रे !! तुम्ही अगदी समुद्राजवळून गेलात का ह्या टप्प्यात ?

हो अगदी किनाऱ्याकिनाऱ्यानेच...भारी वाटत होते पण एन्जॉय करायची मनस्थिती नव्हती तेव्हा....

गर्मीमध्ये सायकल कशी चालविली असेल याच आश्चर्य वाटत रहात.

हो आम्हालाही आता पुण्यात बाईकवरून फिरताना आश्चर्य वाटत राहते की आपण कसे काय असल्या उन्हात सायकल चालवू शकलो. मला वाटतं ती एक झिंग असते. त्यावेळी त्या बेधुंदीत होऊन जाते. आणि नंतर मग खरे वाटत नाही की आपण हे असलेही करू शकतो.

अंकोला इथे आमची कुलदेवी आर्यादुर्गेचं मूळ मंदिर आहे. तिथे एकदा जायचंय.तुम्ही पाहिलं का ते?

अहो आम्ही रात्री मुक्कामालाच मंदिरात होतो. अतिशय सुंदर आणि निवांत ठिकाण आहे.

लिंबुदा आज एवढाच त्रोटक प्रतिसाद?? Happy

धन्यवाद शशांक, मित, गिरीकंद, सुगंध,

आशुचॅम्प् अगदी मनापासुन स्पष्ट लिहीते की मला तुमचा खरोखर हेवा वाटला. तुमचे आणी इतरान्चे साहस खरच बेजोड आहे, पण असे साहस करायला मिळणे, आपल्या सभोवतालचे जग अनुभवणे, निसर्गात रमणे हे अतीशय विलक्षण आहे. क्षणभर खरच वाटुन गेले की मला पण पुरुषाचा जन्म मिळाला असता, तर कदाचीत मी पण तुमच्या बरोबर या यात्रेत सहभागी झाले असते.

अहो त्यासाठी पुरुषाचा जन्म कशाला पाहिजे. आजच्याच पेपरमध्ये एका आज्जींची बातमी आहे. त्यांनी ८७ व्या वर्षी पोहणे शिकले आणि शंभरी गाठल्यावर १५०० मी शर्यत जिंकली. मी म्हणजे केवळ आडवाच पडलो ती बातमी वाचून. अरे काय जिद्द आहे का चेष्टा.

अगदी आमच्याएवढी मोठी मोहीम शक्य नसेल कदाचित घरगुती अडचणींमुळे पण लहान सहान ट्रीपला नक्की जाता येईल. सुरुवात तर करा.

एक गोष्ट तो मंदिराचा फोटो कढला आहेस म्हणजे वरुन आठवा फोटो.. तो.... तो जर आपण फास्ट खाली वर स्क्रोल केला ना तर भारी इफेक्ट येतोय चेक कर स्मित

हो रे भारी इफेक्ट येतोय. मी पण आत्ता नोटीस केला.

>>>> लिंबुदा आज एवढाच त्रोटक प्रतिसाद?? <<<<
Sad आज सोमवार रे... कामाचा खूप ताणतणाव असतो.
त्यातुन वेदाभ्यास-संथा पठणाच्या धाग्यावर डोके उठले... आय मीन पेटले ! Proud
इथे नंतर लिहितो.
तू स्ट्रावा वर आहेस ना? काय नावाने? केदारला फॉलो करतो आहेस का? शोधतो तुला... म्हणजे तुला फॉलो करीन म्हणतो.

अहो आम्ही रात्री मुक्कामालाच मंदिरात होतो. अतिशय सुंदर आणि निवांत ठिकाण आहे.>>>>>>>>
वॉव ...काय सांगता! ग्रेट!
त्या मंदिराचे फोटो नाहीयेत ना?

नाही ना...आम्ही पोचलो तेव्हा खूप उशीर झाला होता आणि दमलोही होतो. आणि दुसरे दिवशी पहाटे अंधारातच निघालो. त्यामुळे फो़टो काढायला वेळच मिळाला नाही.

तू स्ट्रावा वर आहेस ना? काय नावाने? केदारला फॉलो करतो आहेस का? शोधतो तुला... म्हणजे तुला फॉलो करीन म्हणतो.

हो मी आहे स़्ट्राव्हावर...आशिष फडणीस नावाने

जेवणाची गंमत वाचून मजा वाटली.. सविस्तर लेखनामु़ळे प्रवासाचा आनंद मिळतोय... मस्तच!

पाचवा दिवस आला वर्णनाचा....आणि आता मी या संभ्रमात पडलो आहे की वाचन आनंद जास्त आहे की त्यासोबत दिलेली प्रकाशचित्रे पाहाणे ? दोन्ही एकत्र केल्यास आगेमागे, पुन्हापुन्हा त्याकडे वळणे म्हणजे ही लेखमालिका केवळ शब्दांचीच राहिलेली नसून त्यामध्ये आपणही प्रत्यक्ष सहभागी झालो असून या सुसाट ग्रुपचे आपणही एक सदस्य झालो आहे....आणि त्यात किती आनंद आहे हे माझ्यासारखा सायकलप्रेमी (अर्थात आता तो इतिहास झाला...हर्क्युलसही कायमची नाहीशी झाली आहे...) जाणू शकतो.

कर्नाटकातील हरिहर दावणगेरी ह्या भागाचा मी प्रवास केला असल्यामुळे तुमचा हा समुद्रकिनार्‍यालगतच्या भागाचे वर्णन वाचणे फार आनंददायी वाटले. मंदिराचे फोटो पाहूनच त्यांची भव्यता लक्षात आली. शंकराची (त्यातही गळ्यातील नागाची) मूर्ती पाहून संबंधितांचे कौतुक करणे आवश्यक आहे. सारेच काही सुंदर आहे या भागात.

एके ठिकाणी तुम्ही लिहिले आहे..."..बाहेर निघणार तोवर सुह्दची सायकल पंक्चर झाली..." ~ अशावेळी हे पंक्चर दुरुस्तीचे काम कोण करते ? तुमच्यापैकीच कुणीतरी वा मग गाव येण्याची वाट पाहात प्रवास तसाच चालू ठेवून सायकल दुरुस्ती केंद्रातल्या कर्मचार्‍याकडून करवून घेता ? गावात असतानाच सायकल बिघडली तर फारसे काही अडत नाही, पण मध्येच वाटेत, निर्मनुष्य भागातून जाताना असे पंक्चरचे चटके बसल्यास त्या सायकलस्वाराची काय हालत होते याचा अनुभव मी घेतला असल्यानेच ही विचारणा करीत आहे.

अशोकमामा - सुंदर प्रतिसाद.

आमच्याकडे प्रत्येकाकडे एक स्वतंत्र पंक्चर किट होते. त्यात हवा भरायचा पंप, पंक्चर पॅचेस, सोल्युशन आणि टायर उचकटण्यासाठी हत्यार असे सगळे होते. त्यामुळे जरी एखादा मागे राहीला तरी त्याला पंक्चर काढणे शक्य व्हावे. हे सगळे बाळगण्याचे कारण म्हणजे आजकाल सायकलची दुकानेच नामशेष होत चालली आहेत. पूर्वी गल्लोगल्ली असणारी दुकाने आता विरळाच झाली आहेत. त्यामुळे जर जवळपास दिसले तरच त्यांच्याकडून काढून घेत होतो अन्यथा आमचे आम्हीच. आमच्यातले घाटपांडे काका हे पंक्चर एक्पर्ट होते.

>>>> हो मी आहे स़्ट्राव्हावर...आशिष फडणीस नावाने <<<<< सापडत नाहीयेस... Sad स्पेलिन्ग दे इथे.
>>>> अर्थात आता तो इतिहास झाला...हर्क्युलसही कायमची नाहीशी झाली आहे... <<<<<
काका, नाही, मागच्याच आठवड्यात मित्राने हर्क्युलस घेतली साडेतीन हजारात... पण तेव्हड्या करता पुणे ते लोणावळा दरम्यान जवळपास सर्व सायकल डिलर्सकडे जाउन आला, एकमेव ठिकाणी म्हणजे चिंचवडच्या नॅशनल च्या दुकानात मिळाली. (आमच्याकडे फिलिप्सच्या २/३ सायकली असायच्या, हर्क्युलस जड, फिलिप्स वजनाला हलकी म्हणून वडिलांचि पसंती फिलिप्सला)

Limbutimbu....

~ सॉरी सॉरी...माझ्या म्हणण्याचा अर्थ काहीसा वेगळा आहे. म्हणजे "हर्क्युलसही कायमची नाहीशी झाली आहे"... हे जे वाक्य मी वापरले आहे त्याचा अर्थ असा की "माझ्याकडील हर्क्युलस नाहीशी झाली आहे..." ~ वयोमानानुसार तसेच न वापरल्यामुळे ती खंगत गेली...मोडकळीला आली आणि मग दारावर आलेल्या भंगारगाडीवाल्याला देवून टाकली..... बाजारातून हर्क्युलस नाहीशी झाली असा जो अर्थ माझ्या वाक्यातून निघाला आहे त्याबद्दल क्षमस्व.

Pages