पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ४ -अंकोला - थंडगार जंगलशोभा

Submitted by आशुचँप on 31 March, 2015 - 16:16

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

=========================================================================

कालच्या अत्यंत कष्टदायक आणि खच्ची करणाऱ्या प्रवासानंतर पुढे न जाण्याची उमेद राहीली नसती तरच नवल. पण हे नवल घडले खरे. रात्री एक मसल्स रिलॅसेक्शनची गोळी घेतली, व्हॉलीनी लाऊन गुढगे चोळून काढले आणि गपगार झोपलो.
ती विश्रांती आणि सगळ्यांची पॉझीटीव्ह साथ यामुळे सकाळी पुन्हा एकवार त्याच उमेदीने तयार झालो. आजचाही पल्ला मोठा होता. पुन्हा एकदा १४५ किमी.

इथे एक गोष्ट स्पष्ट करायची राहीली की एकापाठोपाठ इतके हेक्टीक स्केड्युल एवढे नसते. सेल्फ सपोर्ट राईडला तर नाहीच. पण आमचा प्लॅन असा होता की किनारपट्टी लागेपर्यंत जितक्या वेगाने अंतर कापता येईल तितक्या वेगाने कापायचे म्हणजे मग कोस्टल कर्नाटक, केरळमधील निसर्गसौंदर्य वगैरे अनुभवायाला वेळ मिळाला असता. त्यामुळे पहिल्या चार दिवसातच आमचा ५६५ अंतर पार करण्याचा बेत होता. यामुळे पुढचे हजार किमी अंतर पार करायाला तब्बल ९ दिवस मिळणार होते आणि पुरेसा वेळही.

फक्त आज दोन गोष्टी अतिशय चांगल्या होत्या त्या म्हणजे एकदाचा त्या रखरखीत हायवे पासून बाहेर पडणार होतो, रस्ता दांडेली अभयारण्याच्या बाजून जात असल्याने झाडी असणार होती आणि स्पेशल म्हणजे येल्लापूरनंतर जवळपास २५ किमी चा घाट उतरयाचा होता.

कालच्या प्रमाणेच आजही एनर्जी बार खाल्ला आणि धारवाडमध्येच एका ठिकाणी कॉफीपान करून बाहेर पडलो. अंकोल्याला जायला हुबळीवरून एक रस्ता जातो पण त्याला बायपास करून जाणारा एक रस्ता कलघटगीला जाऊन मिळतो. पण त्या रस्त्याची स्थितीबद्दल मतमतांतरे होती. शेवटी बरेच अंतर वाचवणारा होता म्हणून त्याचीच निवड झाली आणि पुंडलीक वरदे हारी विठ्ठलाच्या जयघोषात निघालो.

नेहमीप्रमाणेच सुसाट ग्रुप त्यांच्या वेगाने दिसेनासा झाला पण आज बदल म्हणजे चक्क आपटेकाका आमच्याबरोबर होते. कालच्या मुलांनी दिलेल्या त्रासामुळे असेल किंवा अजून काही माहीती नाही पण त्यांनी ठरवले की स्लो ग्रुपबरोबरच पुढची मोहीम करायची. त्यांचा वेग माहीती असल्यामुळे मला वाटले होते की थोडा वेळ चालवतील आणि आमच्या कूर्मगतीला कंटाळून जातील पुढे. पण तसे काही झाले नाही. शेवटपर्यंत ते आमच्याबरोबरच राहीले.

आजचा रस्ता खरेच सुरेख होता. चारपदरी हायवेवरून एकदम अरुंद रस्त्यावर आल्यामुळे थोडे वेगळे वाटत होते पण दुतर्फा सुंदर झाडी आणि पक्ष्यांची किलबिल, भटकंतीदरम्यान येणारा तो जंगलाचा उत्तेजित करणारा वास यामुळे सगळेच रिचार्ज झाले. अॅक्चुयली आता खरी आमची राईड सुरु झाली होती. गेले तीन दिवस नुसताच रगडापट्टी झाली होती. मुक्कामाचे ठिकाण गाठणे या पलिकडे काहीही उद्दीष्ट नव्हते. पण आता आम्ही प्रवास एन्जॉय करायाला सुरुवात केली होती.

युडींची सायकल वेळेत तयार न झाल्यामुळे त्यांना बेळगाववरून थेट टेंपो करून धारवाड गाठावे लागले होते. पण वाटेतला छळ चुकला असल्यामुळ तेही फ्रेश होते आणि मी, घाटपांडे काका, युडी, आपटे काका आणि सुहुद असे मस्त धमाल करत निघालो.

अर्थात, रस्ता चांगला असला तरी चढउतार काय सुटले नव्हते. पण आज ते कालच्या इतके भिववत नव्हते. उन्हाळ्याची सुरुवात झाल्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या झाडांनी आपला पर्णसंभार झटकून टाकला होता पण सावली देण्याईतपत झाडे बाजूला होत. मला आपले वाटत होते अभयारण्य आहेच बाजूला तर गवा, अस्वल असे काहीतरी, नाय तर गेला बाजार चुकला माकला हत्ती तरी दिसावा रस्त्यात. फुल टु धमाल. पण इतक्या दिवसाउजेडी अर्थातच कुणी प्राणी दिसला नाही. माकडे मात्र भरपुर. जागोजागी त्यांच्या टोळ्या रस्त्याच्या बाजूला तोबरे भरत बसल्या होत्या. आणि हे काय विचित्र प्राणी म्हणून आमच्या कडे टकामका बघत होती.

आधी वाटले की कदाचित अंगावर येतील म्हणून बिचकतच होतो पण ती तशी शांत होती. पण त्यांचे फोटो काढावे म्हणून एका जागी सायकल थांबवून कॅमेरा काढायला लागलो तसा त्यांच्या कुटुंबप्रमुखाने एकदम दात दाखवून घशातून भितीदायक आावाज काढला. म्हणलं मरुं देत. अंगावर आला तर सायकल जोरात मारता पण यायची नाही. त्याला बहुदा प्रसिद्धीचे वावडे असावे त्यामुळे मी कॅमेरा परत आत ठेवताच शांत झाला.

या सगळ्या भानगडीत बाकीचे पुढे निघून गेले आणि पुन्हा एकदा एकूटवाणा प्रवास करू लागलो.

त्यात एक जोरदार चढ लागला आणि मी आपला फासफुस करून त्यावर सायकल चढवत होतो तर बाजूला एक स्कूटरवाला आला आणि कायतरी कन्नडमध्ये विचारायला लागला. मी आपला कन्नड इल्ले म्हणून मोकळा झालो तर इंग्लिशमध्ये कुठुन आला, कुठे चालला अशी सरबत्ती सुरु केली. माझा इथे श्वास फुललाय आणि याला प्रश्न सुचतायत. तसा त्याला म्हणलं मला आता हा चढ चढवून दे मग सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. आणि कहर म्हणजे धर म्हणला मागे. आणि तेवढा चढ चढून आल्यावर मग त्याला सांगितले तर लईच खुश झाला. म्हणे चल तुला अजून पुढे नेतो. म्हणलं एवढंच करायचे होते तर सायकलवरून कशाला आलो असतो. हे काय त्याला बोललो नाही पण थँक्स म्हणून निरोप दिला.

सव्वा आठच्या सुमारास कलघटगी गाठले. सकाळपासून ३४ किमी आलो होतो आणि अॅव्हरेज स्पीड १६ चा मिळला होता जो हायवेच्या मानाने काहीच नव्हता. पण आता त्याचे काही वाटत नव्हते. सुसाट ग्रुप आधीच पार करून पुढे गेला असल्याने त्यांच्या मागे न जाता नाष्ट्यासाठी थांबलो. बाजूलाच एक गजानन म्हणून हॉटेल दिसले. एकंदरीत कळा काय फार चांगली नव्हती पण इथे अप्रतिम चवीची इडली-वडा, आणि सुरेख शिरा मिळाला. त्यावर गरमागरम कॉफी. एकदमच दिल खुश झाला.

बाहेर येऊन बघतो तर ही गर्दी. आमच्या सायकली, त्यावरचे सामान, आमचे गियर्स यामुळे आम्ही एखाद्या एलीयनसारखे वाटत होतो त्यामुळे प्रत्येकाच्या मनी अपार उत्सुकता दाटली होती. काहीजण चोरून हात लाऊन (सायकलला....आम्हाला नव्हे) बघत होते तर काहीजण मोडक्या तोडक्या इंग्लिश, हिंदीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते.

इथपासून जे काही पब्लिक अटेन्शन मिळायला सुरुवात झाली होती त्याला काही तोड नाही. काही विचित्र लोक पण भेटले पण बहुतांश लोकांना जाम कौतुक वाटत होते. त्यात पुण्यावरून सायकल चालवत आलो म्हणल्यावर तर त्यांच्या आश्चर्याला पारावार उरत नसे.

शेवटी त्यांचे कडे भेदून कशाबशा सायकली बाहेर काढल्या आणि पुढचा रस्ता धरला. दरम्यान वेदांगचा फोन आला आणि त्याने ते येल्लापूरच्या अलिकडे थांबणार असल्याचे सांगितले. म्हणजे अजून ४० किमी. आम्ही आपल्याच वेगात जायला सुरुवात केली. आणि साधारणपणे १२ च्या सुमारास येल्लापूर गाठले. तोपर्यंत सुसाट ग्रुप पुढे सटकला असेल अशी अपेक्षा होती पण ते सगळेच्या सगळेच थांबले असल्याचे पाहून धक्काच बसला.

विचारांती कळले की आमची कालची अवस्था पाहून मामांनीच जरा सगळ्यांना थोपवून धरले होते. आपण सगळे एकत्र मोहीमेवर आलो आहोत तर एकत्रच जायला हवे. थोड्याफार अंतराने मागेपुढे असणे समजण्यासारखे होते पण सुसाट ग्रुप आणि आमच्यात बरेच अंतर पडत होते. त्यामुळे दोन वेगवेगळ्या ग्रुपनी राईड केल्यासारखे वाटत होते. रात्रीचा मुक्काम एकत्र होता एवढेच काय ते. पण ते मामांना खटकले आणि कौतुक म्हणजे बाकीच्यांनाही ते मनापासून पटले. त्यामुळे ते तब्बल दीड तास आमची वाट पाहत बसले होते. पण त्यामुळे त्यांचा सगळा टेंपोच गेला होता आणि थोडे वैतागलेही होते.

अॅक्चुअली मी तिथे बोललो नाही पण मला थोडी ती गोष्ट मनाला लागलीच. स्वताचाच प्रचंड राग आला. कसले आपले दुबळे शरिर आणि कसला पुचाट स्पीड. मोठ्या तोंडाने सगळ्यांचे कौतुक स्वीकारत आपण या मोहीमेला आलो खरे पण इथे आपली काय तयारी आहे ते दिसून येते आहे. ही काही शर्यत नव्हती पण माझ्यासाठी बाकीच्यांना तब्बल दीड तास थांबावे लागले यामुळे मी मनोमन जाम दुखावलो गेलो. वरवर काही दाखवले नाही पण मनाशी निर्धार केला, काय वाट्टेल झाले तरी चालेल, पण आता कुणाला संधीच द्यायची नाही.

असो, तर तिथेही मस्त स्पंज डोसा हाणला आणि पहिल्यांदाच राईडदरम्यान सगळेजण एकत्र आल्यामुळे ग्रुप फोटो काढायचा ठरला. सगळ्यांना पोझ देऊन उभे केले तेव्हढ्यात सुहुदला त्याच्या मित्राचा फोन आला आणि तो बोलत बोलत बाजूला गेला. त्याला परत फ्रेममध्ये आणले ट्रायल फोटो काढल्या काढल्या साहेब परत बाहेर गेले. परत आत घेतले आणि तिथल्या वेटरला कॅमेरा दिला तर हा परत बाहेर. असली चिडचिड झाली आणि त्याला अक्षरश हाताला धरून उभे केले आणि आता हलू नको म्हणून दम दिला. तरी ऐकेना. हे म्हणजे सचिन आणि लक्ष्याच्या त्या एकापेक्षा एक चित्रपटासारखे झाले. तुुरुंगात फोटो काढत असताना लक्ष्या सारखा सचिनकडे वळत असतो आणि शेवटी तो फोटोग्राफर थयाथया नाचतो. शेवटी त्याच्या बाबांनीच व्हेटो वापरला. म्हणाले अरे मैत्रिणाचा फोन असता तरी ठीक होते, मित्राचाच आहे ना, ठेव आता तो. म्हणलं, लई भारी असे बाबा पाहिजेत.

फ्रेमबाहेर गेलेला सुहुद आणि त्याचे अद्भुत बाबा त्याच्याकडे बघताना Happy

शेवटी आला एकदाचा फोटो... Happy

आता इथून सुरु होत होता तो येल्लापूरचा घाट. सलग २५ किमी चा उतार. आहाहा काय सुख होते ते. पॅडल न मारता सायकल इतका वेळ चालवू शकतो यावर विश्वासच बसत नव्हता. पण वेगावर नियंत्रण ठेऊन कंट्रोल करणेही सोप्पे नव्हते. गेल्याच वर्षी पुण्याचाच सनत जोगळेकर, अनिकेत सुतार यांनी ही मोहीम केली होती आणि त्यात त्यांचा साथीदार इथे जोरदार पडल्यामुळे त्याला मोहीम गुंडाळून परत जावे लागले होते, असे त्यांच्या ब्लॉगमध्ये वाचले होते. त्यामुळे पुरेशी खबरदारी बाळगतच घाट पार केला. वाटेत छोटी छोटी खेडी लागत होती पण एकही थांबण्यासारखे ठिकाण नव्हते. त्यामुळे विक्रमी वेळात घाटमाथा उतरून किनारपट्टीच्या प्रदेशात दाखल झालो.

कॅननडेल क्विक ५ वर स्वार घाटपांडे काका

पाठोपाठ चिरंजिव स्कॉट सब ४० वर

माझी लाडकी स्कॉट स्पीडस्टर ७०

चिअरफुल युडी काका...एकमेव पांढऱ्या स्कॉट सब ४० वर

सुसाट ग्रुपचा शिलेदार वेदांग...याचीही स्कॉट सब ४०

बाबुभाई अर्थात ओंकार ब्रम्हे..श्वीन स्पोर्टेरावर स्वार

अस्मादिक...घाट उतरल्यानंतरचा श्रम परिहार

लान्सदादांचा फोटो काढतानाचा एक दुर्मिळ फोटो

आणि अक्षरश एसी रुममधून बाहेर यावे तसा वातावरणात प्रचंड फरक पडला. टिपिकल कोकणातले वातावरण आणि भयानक दमट हवा आणि भसाभस घाम. आणि नुकतेच थंडगार जंगलभागातून बाहेर पडल्यामुळे ते फारच जाणवले. आता याच वातावरणात आम्हाला पुढचे १२-१३ दिवस काढायचे होते. नुसते काढायचे नाही तर दिवसभर सायकल चालवत.

अंकोला अजून ५२ किमी लांब होते आणि थोडी विश्रांती आणि शहाळे पिऊन पुढे निघालो. अंकोलाच्या जस्ट अलिकडे एक घाट लागतो आणि तो फार धोकादायक असल्याची वार्ता होती. ती का होती ते शेवटपर्यंत कळले नाही. एकतर मी धोकादायक घाट म्हणून नी कॅप चढवली आणि मनाची तयारी करून चढावर पॅडल मारत सुटलो. पण अगदीच फुसका बार निघाला. घाट होता तसा पण आदले दिवशीच्या छळापुढे तो अगदीच बारका निघाला आणि फारसे कष्ट न घेता अंकोला गाठले देखील.

आजचा मुक्काम मामांच्या ओळखीने आर्यादुर्गा देवस्थानाच्या भक्तनिवासामध्ये होता. अर्थातच रुम्स एसी नव्हत्या आणि त्या उकाड्यात रहायचे अगदी जीवावर आले. पण व्यवस्था खूपच चांगली होती आणि कालचा आणि आजचा सगळा घामटपणा मस्त थंडगार पाण्याने धुवून काढला.

दरम्यान, वाईट बातमी अशी कळली की मामांच्या वडीलांची तब्येत खालावली होती आणि त्यांना तातडीने पुणे गाठणे भाग होते. सगळ्यांच्याच उत्साहावर त्यामुळे विरजण पडले. मामा हे संपूर्ण मोहिमेचे आधारस्तंभ होते आणि त्यांना जावे लागल्यामुळे विरस होणार होता. पण परिस्थितीच अशी होती की काही करणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्याच अस्वथेत एका अतिशय सुमार दर्जाच्या हॉटेलमध्ये त्याला साजेश्या अशा सुमार दर्जाचे जेवण पोटात ढकलून निद्राधीन झालो.

आजचा प्रवासही १४५ किमी असला तरी कालच्या आणि आजच्या दिवसात जमिन अस्मानाचा फरक होता. सॅडल सोअर अजून छळत होतेच आणि दिवसेंदिवस तिव्रता वाढतच चालली होती. प्रत्येकजण सोफ्रामायीन, व्हॅसलीन, खोबरेल तेल असे काय सुचेल ते प्रयोग करून त्यातल्या त्यात सुसह्य व्हावे यासाठी प्रयत्नशील होते, पण ते बेणं काय दाद देत नव्हतं. असो.

८० किमी नंतर कसला सॉलिड ड्रॉप मिळालाय. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लै भारी रे. sadal सोअर्स साठी ख़ास जेल मिळतात ना. ती नव्हती का बरोबर.

मी आत्ता the man who cycled the world हे पुस्तक वाचतोय. तू मिळवून नक्की वाच

टण्या - धन्यवाद....नाही हो असे काही जेल माहीती नव्हतेच. सोफ्रामायसिन त्यातल्या त्यात बरेच इफेक्टीव्ह होते.

अरे, मस्त वाटतेय हे पुस्तक...वाचलेच पाहिजे आता

अमित, धनि - धन्यवाद

मस्त मजा येतेय. खास करून तुम्ही आमच्याच भागात फिरत असलेलं बघून तर अजून जास्त.

धारवाड माझं आजोळ. मंगलोरला मीच दोन तीन वर्षं होते त्यामुळे हा कोस्टल कर्नाटकाचा भाग अगदी पायाखालचा बनला होता.. पुढचे लेख पटापट लिहा Happy

खूप उत्सुकतेने वाचतोय. या सर्व भागात मनसोक्त ड्रायव्हिंग केले आहे पण सायकलीवरुन जाण्याची कल्पनाही करू शकत नाही.
Hats off!

वाह, खूपच मस्त वर्णन ....

मामा हे संपूर्ण मोहिमेचे आधारस्तंभ - त्यांनाच मोहिम अर्धवट सोडावी लागली हे वाचून खूपच वाईट वाटले ...

आशूचॅम्प.................खूप छान चाललय!
खर्‍याखुर्‍या सॅडल सोअर चा अनुभव आला होता...(थोडं विषयांतरच आहे तरीही....)
काही वर्षांपूर्वी वैष्णोदेवी चढून गेलो. रात्री ११ला सुरू केलं. पहाटे ५ ला वगैरे वर पोचलो.मस्त फ्रेश वाटलं! दर्शनही झालं
आणि काय अवदसा आठवली, उतरताना घोड्यावरून उतरलो. म्हटलं बघू ना घोड्यावरून उतरण्याचाही अनुभव घेऊ.
अरे देवा...............चुकलंच. एक तर घोड्यांना फिट रहाण्यासाठी(म्हणे!) पाणीच देत नाहीत. मग काय रस्त्याकडेला पाणपोया होत्या .त्याच दिशेने हे घोडे तिरके तिरके जायचे. घोडेस्वाराला डायरेक्ट खालची खोल दरी दिसून पोटात गोळा, तोंडात देवाचं नाव. हा एक भाग.
आणि सॅडल सोअर बद्दल ऐकले अस्ल्याने व्यवस्थित तयारीनिशी घोड्यावर बसलो होतो. ओढण्यांच्या, टॉवेलांच्या घड्या.............इ.इ. Proud
खाली पोचेपर्यन्त जीव वर पोचलेला. आणि ज्या ठिकाणी सर्व घोडेस्वार उतरतात तिथे पोचलो. समोरून येणारी व्यक्ति एका विशिष्ठ चमत्कारिक फेंगड्या चालीत चालत येताना दिसली की बरोब्बर ओळखू यायचं की यांनी येताना घोड्यावरून येऊन महापातक केलय.
नंतर एक आठवडाभर हे सॅडल सोअर वस्तीला होते. आणि वैष्णोदेवीचं आपोआपच स्मरण होत होतं.
नंतर अनुभवींकडून कळलं की एक वेळ चढताना घोडा घ्यावा पण उतरताना? नो अ‍ॅन्ड नेव्हर!
इति सॅडल सोअर कथा समाप्त!

चँप, मस्तच वाटतंय वाचायला, पण अ‍ॅक्च्युली सायकल प्रवास करताना काय त्रास झाला असेल त्याची कल्पना करवत नाहीये पण तुझ्या जिद्दीला सलाम. Happy

आशुचँप.. मस्तच वाटतय तुमचा हा ब्लॉग् वाचताना..

अशी सायकलवरुन कठिण मजल दरमजल करत असुनसुद्धा व दिवसाच्या शेवटी थकल्या भागल्या अवस्थेत असुनही तुम्ही हे लिहुन आम्हाला तुमच्या बरोबर असल्याचा जो अनुभव तुम्ही देत आहात त्याबद्दल खरच तुमचे आभार..

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत व पुढच्या सुखरुप प्रवासासाठी मनापासुन शुभेच्छा!

अप्रतिम, फोटो बघून हेवा वाटला. शहराबाहेर पाय पडले की अशी रम्य ठिकाणे बघायला जॅम आवडतं.

सायकलच्या गतीसारखीच तसेच निसर्गाच्या सान्निध्याची जोड असलेल्या वर्णनवाचनाचा आनंद आगळाच. असे वाटू लागले की आशुचॅंप प्रत्येक दहा किलोमीटरनंतर गर्द झाडाच्या सावलीत बसून वहीत प्रवासाचा अनुभव लिहून काढतात आणि मग परत नव्या उत्साहाने "चलो दिल्ली" च्या जोषात पुढील प्रवासासाठी पॅडल मारतात. सोबतीला दिलेली प्रकाशचित्रे वाचनाचा आनंद द्विगुणित करतात हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. रस्त्यांची स्थिती अगदी देखणी आहे हे मान्य करायलाच हवे....निदान याबाबतीत तर सरकारच्या त्या खात्याचे अभिनंदन करावे असे आहे. कारण अनेक वर्षापूर्वी (माझ्या कॉलेजच्या दिवसात) मी धारवाड, उनकल, हुबळी, सावनूर, हवेरी असा टू व्हीलरवरून प्रवास केला आहे...अनेकदा...त्यावेळी पाहिलेली रस्त्यांची दयनीय अवस्था आजही नजरेसमोर आली आणि साहजिकच लेखातील रस्त्यांची तुलना होऊ लागली. आजचे हे रस्ते पाहून निदान अजून कित्येक सायकलस्वारांना आपणही असाच प्रवास आयोजित करावा असे वाटू लागेल....हे तुमच्या लेखाचे एक वैशिष्ट्यच आहे.

अरे कसले मस्त हिरव्यागार प्रदेशाचे फोटो आहेत..... आज हेवा वाटतोय तुमचा.
घाटाचा ड्रॉप भारिच.... मस्त वर्णन. फोटो इथे दिसतील असे दिल्याबद्दल धन्यवाद.

मस्त सुरु आहे रे. Happy

मध्यंतरी मिपा वर बाइक (टु व्हीलर) रायडीन्गच्या धाग्यावर एकाने सुचवलेलं पुसटस आठवतय.
तो उपाय सॅडल सोअरसाठी प्रिव्हेन्टिव्ह म्हणुन काम करेल का?
"सीट वर सायकलची ट्युब गुन्डाळायची. आणि त्यात नॉमिनल हवा भरायची. थोडं कुशनिन्ग होइल."

काय वाटतय? हा उपाय कामाला येइल का?

झकोबा, ट्यूबची /रबरी पिशवीची आयडीया करून बघितली पाहिजे. सीटवर ग्रीप रहाणार असेल, (न घसरणे वगैरे) असे झाले, तर बहुधा उपयोगी पडेल असे वाटते. आता लक्षात ठेवतो अन करुन बघतो. Happy

खाली पोचेपर्यन्त जीव वर पोचलेला. आणि ज्या ठिकाणी सर्व घोडेस्वार उतरतात तिथे पोचलो. समोरून येणारी व्यक्ति एका विशिष्ठ चमत्कारिक फेंगड्या चालीत चालत येताना दिसली की बरोब्बर ओळखू यायचं की यांनी येताना घोड्यावरून येऊन महापातक केलय.
नंतर एक आठवडाभर हे सॅडल सोअर वस्तीला होते. आणि वैष्णोदेवीचं आपोआपच स्मरण होत होतं.

आरारारा, मी पूर्णपणे समजू शकतो तुमच्या भावना... Proud Proud


असे वाटू लागले की आशुचॅंप प्रत्येक दहा किलोमीटरनंतर गर्द झाडाच्या सावलीत बसून वहीत प्रवासाचा अनुभव लिहून काढतात आणि मग परत नव्या उत्साहाने "चलो दिल्ली" च्या जोषात पुढील प्रवासासाठी पॅडल मारतात.

वाहवा अशोकजी काय सुरेख वर्णन केले आहे. आणि खरेच मला असे करावेसे वाटत होते. तो भागच इतका अप्रतिम होता तिथून निघावेसेच वाटत नव्हते Happy

आजचे हे रस्ते पाहून निदान अजून कित्येक सायकलस्वारांना आपणही असाच प्रवास आयोजित करावा असे वाटू लागेल..

हो निदान हा रस्ता तरी बरा होता. नंतर कर्नाटक सरकारने पूरेपूर भरपाई केलीच. Proud

"सीट वर सायकलची ट्युब गुन्डाळायची. आणि त्यात नॉमिनल हवा भरायची. थोडं कुशनिन्ग होइल."

उपाय भन्नाट आहे. पण लिंबूटिंबू यांनी म्हणल्याप्रमाणे प्रॅक्टिकल वाटत नाहीये. नुसते त्यावर बसून जाणे एक वेगळी गोष्ट आहे आणि बसून पॅडल मारणे ही वेगळी. पॅडल मारताना तुमची मांड सॅडलवर घट्ट असणेच आवश्यक आहे नाहीतर बॅलन्सिंग हाताने करायला लागून थोड्याच वेळात हात भरून येतील.

सर्वांना खूप खूप धन्यवाद Happy Happy

Pages