मृत्युंजय

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ही कादंबरी मी महाविद्यालयीन दिवसांत पहिल्यांदा वाचली होती.
त्या आधी या पुस्तकाबद्दल खूप म्हणजे खूप ऐकलं होतं. खूप जणांकडून वाचायलाच पाहिजे, किंवा अजून वाचलं नाहीस म्हणजे काय.. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आणि कधी एकदा ते वाचतोय असं वाटायचं. तिच्या लेखकाबद्दल आदर वाटायचा. अखेर ते पुस्तक मिळवून मी वाचलं. एवढं सारं या पुस्तकाबद्दल ऐकल्यामुळे असेल पण वाचताना मला ते पुस्तक इतकं भावलं नाही. याचं मलाही खूप दुःख वाटतं. बाकीचे सगळे इतकं बोलतात या पुस्तकाबद्दल, तर आपल्याला नक्कीच ते पुस्तक कळलं नाही, आणि कळायला पाहिजे असं वाटतं. नंतर मी ते पुस्तक दुसर्‍यांदा वाचलं पण मला 'श्रीमान योगी', 'स्वामी' किंवा कर्णावरचंच त्यापूर्वी वाचलेलं 'कर्णायन' ही जेवढी आवडली, तेवढं मृत्युंजय नाही आवडलं. पण एवढं असूनही शिवाजी सावंत यांच्याबद्दल अजून तितकाच आदर वाटतो. मृत्युंजय मधली वर्णनं कुठे कुठे खूप लांबल्यासारखी वाटली. आणि महाभारतातले बहुतेक प्रसंग आधीपासून परिचीत असल्यामुळे यात काही नाविन्य वाटले नसेल. कदाचित मी आणखी एकदा वाचायला घेईन तेव्हा त्यातला सूर सापडेल.

तुम्हाला या पुस्तकातलं जे आवडलं ते लिहावसं वाटलं तर जरूर लिहा.

विषय: 
प्रकार: 

हाय गजानन,

मृत्युंजय आवडलं नाही ????:( माझ्या खुप आवडत्या पुस्तकातलं एक आहे ते त्यामुळे आश्चर्य वाटल. पण मी अजुन कर्णायन वाचल नाहीये. वाचाव लागेल मगच तुम्हाला का आवडल नाही ते कळेल.

-प्रिन्सेस...

गजानन
मला स्वतःला ही कादंबरी खूप आवडली. आपणाला आवडली नाही, याची कारणे अनेक असू शकतात.
पूर्वग्रह असल्यामूळे असू शकत पण आपणाला कादंबरी पहील्या वाचनात आवडली नाही याच आश्चर्य वाटत.
आपण ऊल्लेख केलेली इतर पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचे लेखक वेगळे आहेत. प्रत्येक लेखकाची शैली वेगळी असते. त्यामुळे एकाच विषयावरची वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वेगली असतात.
महाभारत जरी अधीपासून माहीत असलं तरीही हे सर्व प्रसंग एक वेगळ्या द्रुष्टीने लिहिलेले आहेत. यात कर्ण हा कर्ता असल्याने सर्व प्रसंग त्याच्या द्रुष्टीने तो पाहतो अगर सांगतो आहे.
असो. मी कदंबरी विषयी बोलायचं सोडून तुमच्या विषयीच बोलत बसलो.

मला ही कादंबरी खूप आवडली कारण या कादंबरीने मला एक नवी द्रुष्टी दिली. एक नवा कर्ण समजला. सूर्यपुत्र असूनही सूतपुत्र म्हणुन जगलेला, सगळ असुनही काही न मिळालेला. सत्य समजल्यानंतरही वचन म्हणून कौरवांसोबत राहीलेला कर्ण.
लेखनशैली ही खूपच प्रभावी आहे. कित्येक प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभे राहतात. एक व्यक्ती म्हणून कर्णाची नवीन ओळख झाली.

प्रिन्सेस, अनिकेत धन्यवाद. Happy

त्या पुस्तकाच्या विषयाबद्दल किंवा लिखाणाच्या दर्जाबद्दल मला काही म्हणायचं नाही.
पण मला अजून त्यातली म्हणावी अशी लय सापडली नाही. आणि तुम्हाला सापडली तशी मलाही सापडावी असं मला वाटतं.

माझ्या आठवणीत मी वाचलेलं हे सर्वात पहिलं 'मोठं' पुस्तक. चौथीत असताना दिवाळीच्या सुटीत वाचलं होतं. त्या आधी रामायण, महाभारत तोंडी गोष्टी ऐकल्या होत्या किंवा छोटी छोटी पुस्तकं वाचली असतील. ( मी चौथीत असताना अमर चित्रकथा नव्हतंच , किंवा लोकप्रिय तरी नव्हतं). अशा तर्‍हेने पुस्तक लिहिता येते ( प्रत्येक व्यक्तीरेखेच्या दृष्टीकोनातून कथानक पुढे सरकत जातं) याचं अमाप नवल वाटलं होतं तेंव्हा. कृष्ण अन कुंतीचे संवाद, कर्ण अन कृष्णाचे संवाद, गांधारी ची व्यक्तिरेखा, द्रौपदी, भीम यांचं कॅरॅक्टरायझेशन हे सगळं बेहद्द आवडलं होतं. त्यानंतर शाळेत, कॉलेजात असताना अनेक पारायणं केली अन दर वेळेला काही तरी नवीन सापडायचं. आता जवळ जवळ वीस वर्षं झाली वाचलं नाहीये. पण अजून दर वेळी भारतात गेले की मी हे पुस्तक शोधत असते. (घरची प्रत माझ्या वाट्याला येणार नाहीये त्यामुळे आता विकत घेऊनच वाचायला लागेल. ) पण जर मिळालं तर ते आता परत एकदा नक्की वाचेन अन जास्त तपशीलात काय काय आवडलं ते लिहीन.

जय नावाचा इतिहास अन युगांत ही दोन्ही पुस्तकसुद्धा मृत्युंजय शी तुलना करत वाचली होती तेंव्हा.

मला ही कादंबरी पहिल्या वाचनात आवडली होती. पण नंतरच्या २ ३ वाचनात नाही आवडली.

मी मृत्युंजय जरा उशीरा म्हणजे सातवीमधे वाचली. तेव्हापासून मी ईंजिनिअरींग संपेपर्यंत प्रत्येक सुट्टीमधे परत परत वाचली. किती पारायणं झाली माहीत नाही.. प्रचंड आवडली.. पण आता ती परत वाचावीशी नाही वाटत हे ही खरे.. भाषा, शैली खूपच छान आहे, त्यामुळे वाचायला लागले की पुर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववणार नाही याची खात्री आहे !.. पण, ईंटरेस्ट थोडा कमी झाला आहे.. मेबी अशी ऐतिहासिक पुस्तकं वाचून भारावून जायला होत नाही आजकाल.. म्हणजे जसं लहानपणी व्हायचे..