पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस १ कराड

Submitted by आशुचँप on 22 March, 2015 - 14:54

जशी जशी २१ फेब्रुवारीची तारीख जवळजवळ येऊ लागली तसा उत्सुकतेबरोबर थोडासा ताणही आला होता. सगळ्यानी भरभरून शुभेच्छा दिल्याच होत्या पण आपल्याला नक्की झेपेल का अशी थोडी भिती भेडसावत होती.
त्याचबरोबर सामान काय आणि किती भरायचे याबद्दलही थोडा वैतागच होता. ट्रेक्स अनेकदा केल्यामुळे आता सॅक भरताना जास्त विचार करावा लागत नाही. सगळे काही डोक्यात फिट बसलेले असते. पण सायकल ट्रीप ही ना धड ट्रेक होता ना धड पिकनिक. त्यातून सगळे सामान पुढचे १५ दिवस बरोबर वागवायचे होते. त्यामुळे काय भरावे आणि काय नको या विचारांनी डोक्याचा गुंता झाला होता.
शेवटी नेटवर माहीती घेऊन आणि थोडा स्वताचा अनुभव (आधीच्या दोन राईडचा) लक्षात घेऊन पॅनिअर्स भरले.

ही माहीती पण शेवटच्या भागात देण्याऐवजी आत्ताच देऊन टाकतो. भावी सायकल ट्रीपसाठी ज्याना कुणाला उपयोगी पडेल अशांसाठी.

खाणे-पिणे बरोबर काही न्यायची गरज नव्हती कारण रस्ता हा बहुतांशी वस्तीमधूनच होता. त्यामुळे टपरीवजा हॉेेटेलापासून काहीही उदरभरणाला आम्हाला चालणार होते.

सायकलवर सामान भरण्यासाठी दोन पॅनिअर्स म्हणजे चक्क कॅनव्हास बॅग्स होत्या. त्या एकात एक जोडून कॅरीअरवर बसवायच्या म्हणजे एकाच बाजूला सायकल कलत नाही. याखेरीज पटकन लागणार्या गोष्टींसाठी हँडलला अजून एक छोटी बॅग होती. आणि सीटच्या खाली किंवा फ्रेममध्ये एक छोटी अजून.

पॅनिअर्समधले सामान -
सायकलिंग जर्सी २ (अंगातली एक धरून), सायकलिंग पॅडेड शॉर्ट २, साधे टी शर्ट आणि हाफ पँट २, पंचा, स्लिपर्स, आतले कपडे, टूथब्रश, पेस्ट, साबण, पावडर इ.इ. औषधे
याखेरीज सायकलचे सामान जसे की स्पेअर टायर ट्युब, हवा भरायचा पंप, येताना सायकल डिसेंबल करायची होती म्हणून स्क्रुड्रायव्हर पासून स्पॅनर इ.इ.
शिवाय माझ्या एसएलआरनेही बरीच जागा आणि वजन व्यापले होते. तो न नेण्याचा विचारही करवत नव्हता. इतक्या लांब आणि भारी ट्रीपला कॅमेरा बरोबर नसणे अगदीच अशक्य होते.
सगळे सामान वेगवेगळ्या प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये भरून एका क्रमाने लावले होते.

पॅनिअर्स भरण्याचाही एक पद्धत आहे. रात्री झोपताना लागणारे कपडे, पंचा इ.इ. सगळ्यात तळात. त्यानंतर औषधे, टूथब्रश, पेस्ट इ. इ. सगळ्यात वर कॅमेरा
दुसऱ्या पॅनिअरमध्ये सायकलिंगचे कपडे, त्यावर हवेचा पंप, आणि स्पेअर सामान. हवेचा पंप आणि बाकी पंक्चर किट असे ठेवले पाहिजे की रस्त्यात पंक्चर झाली तर सहजी वरच्यावर ते हाताला लागले पाहिजे नाहीतर रस्त्यातच तुमचा सगळा संसार मांडावा लागतो.

फ्रंट लाईट - माझ्याकडे आधी साधा लाईट होता आणि तो शहरातल्या शहरात चालवायला पुरेसा होता. पण हायवेला रात्री, पहाटे चालवण्यासाठी अजिबात नाही. दुचाकीवरून रात्री जाताना समोरून लाईट आला तर आंधळ्यासारखे चाचपडायला होते. त्यामुळे एक खास सायकलिंग लाईट विकत घेतला. ओंकारने याकामी बरीच मदत केली. त्याच्या संयोजन कौशल्याने ते लाईट चांगल्या डीलमध्ये मिळाले.

पाणी - पाण्याबद्दल नंतरही लिहीणार आहे, पण सुरुवातीला तरी पुढे एक लिटरची बाटली आणि मागे पॅनिअर्सच्या बाहेरच्या खिशात अर्धा अर्धा लिटरच्या दोन असे पाणी बरोबर ठेवले होते. सायकल चालवताना नुसते पाणी पिण्यापेक्षा इलेक्ट्रॉल, ओराएस किंवा ग्लुकॉनडी इ. घालून प्याले तर डिहायड्रेशन होत नाही, आणि क्रँपपण येत नाहीत. त्यामुळे एक बाटली साध्या पाण्याची आणि एक मिश्रीत द्रावणाची.
पुढे ठेवलेल्या बाटलीचा फायदा असा की त्यातले पाणी पिण्यासाठी थांबावे लागत नाही. चालवता चालवता घोट घोट पाणी पित राहीले की त्रास होत नाही.

हॉर्न, घंटी - बहुतांश जणांच्या सायकलला होती. माझ्या सायकलला आधीच तो लाईट, सायक्लोकॉप्युटर, लावल्यानी घंटा लावायला जागाच उरली नाही. त्यामुळे मी शुक शुक करतच काम भागवले.

हँडलबारचव्या बॅगवर बरेच अत्याचार होते.
त्यात गॉगल, छोटा नॅपकीन, सुट्टे पैसे, मोबाईल, एमपीथ्री प्लेअर, पॉवर बँक, चार्जर
व्हॅसलीनची छोटी डबी, सनस्क्रीम लोशन, थोडे फर्स्ट एडचे सामान, काही होमेपथीच्या गोळ्या, पेपर सोप, ओआरएसची सॅशे, एनर्जी बार, नोटबुक, पेन आणि चघळायला काही गोळ्या असे बरेच काय काय भरले होते.

हँडलबार बॅग ही सायकल वळवताना अडथळा येणार नाही अशी कशीही लावावी. अर्थात त्यावर जास्त वजन टाकले तर पटकन वळताना किंवा थांबताना अडचण येऊ शकते.

फ्रेमबॅगमध्ये पंक्चरचे कीट आणि सायकल लॉकची चावी एवढेच होते. पण नंतर मोबाईलही त्यातच ठेवायला लागलो.

सूचना

जाण्याच्या दोन दिवस आधी मामांनी पुन्हा एक बैठक बोलावली आणि त्यात अनेक बारीक सारिक सूचना दिल्या. सगळ्या काही देत नाही, काही अगदी महत्वाच्या होत्या त्या.
१. हायवेवर शेजारी शेजारी सायकल चालवत, गप्पा मारत जायचे नाही.
२. कानात हेडफोन कोंबून गाणी ऐकत जायचे नाही
३. एकमेकांच्या मागे अगदी खेटून जायचे नाही.
४. थांबतानाही रस्त्यावर न थांबता रस्त्याखाली येऊन मगच ब्रेक लावायचे. अर्थात ही सूचना केरळमध्ये अगदी विरुद्ध होती. तिथे त्यांनी सांगितले की अजिबात रस्त्याच्या खाली उतरायचे नाही. कारण म्हणजे तिथे रस्त्याच्या कडेला रेतीच असते आणि त्यात चाक रुतुन जागच्या जागी थांबते आणि तोल जाऊ शकतो.
५. एकमेकांकडे लक्ष द्यायचे, अनाठायी साहस करायचे नाही, कुणाशी रेस लावायची नाही आणि सर्वांना एकत्र घेऊन जायचे.
६. सगळ्यांचा वेग हा सारखा नसल्याने एकत्र फार वेळ जाणे शक्य नव्हते. पण मोठ्या ब्रेकच्या वेळीतरी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता.

अजूनही काही होते. त्यातले सगळेच आम्ही पाळले असे नाही पण बहुतांश वेळेला त्याचा आदर केला आणि त्याचा उपयोगही झाला.

दिवस पहिला
पुणे ते कराड

तर अशा प्रकारे हा हा म्हणता २० फेब्रुवारीची रात्र झाली आणि काही केल्या झोप येईना. उद्या पहाटे लवकर उठून आवरून ४.३० वाजता सारसबाग गणपतीपाशी भेटून मगच पुढे जाण्याचे ठरले होते पण निद्रादेवी काय प्रसन्न होईना.
झोप अपुरी झाली तर उद्या सायकल चालवताना त्रास होणार या विचाराने तर अजूनच झोप येईना. शेवटी कसाबसा डोळा लागला आणि जेमतेम झोप लागली असावी नसावी तेवढ्यात गजराने कंठशोष करायला सुरुवात केली.
चरफडत उठलो, सगळे आटपले आणि सारसबागेकडे निघालो. माझा मामेभाऊ अमेयही बरोबर आला. सारसबागेला पोहचलो तोपर्यंत सगळेच जमा झाले होते आणि सगळ्यांचे नातेवाईक पण आल्यामुळे भरपूर गर्दी झाली होती.

त्या गर्दीतच अचानक पाठीवर थाप पडली. वळून बघतो तर आपला माबोकर पवन. तो खास शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या पहाटे उठून आला होता. खरं सांगतो त्याला बघून इतके बरे वाटले ना.
मग गणपती दर्शन करून गणपती बाप्पांच्या गजरात कूच केले. वाटेत अमेयने माझ्या घरच्यांना फोन करून सगळे नातेवाईक आले असल्याची वार्ता दिली आणि मग त्यांनाही राहवेना आणि ते सिंहगड रोडवर येऊन आम्हाला भेटले.
त्यांचे आशिर्वाद घेऊन पुढे निघालो आणि नेहमीप्रमाणेच कात्रज बायपासने जीव काढला. या बायपासबद्दल माझा काहीतरी मेंटल ब्लॉक आहे नक्कीच. प्रॅक्टीस राईड साठी अनेकदा जाऊनही तिथे माझी वाट लागतेच. त्यापेक्षा अवघड असलेला खंबाटकी विनासायास पार करू शकतो पण कात्रज संपता संपत नाही. त्यातच मला थोडा क्रँपपण आला.
एकदाचा टनेल पार केल्यानंतर मग पुन्हा फॉर्मात आलो आणि शिवापूर टोल नाक्याला गरमागरम चहा, क्रीमरोल ढोसल्यावर मग अगदीच.
वाटेत श्रीराम वड्याला ब्रेक घ्यायचा होता. तिकडे जात असताना माबोकर केदार भेटला. ते बिआरएम ला चालले होते. त्याचा वेग पाहून क्षणभर जाम हेवा वाटला. या वेगाने आपल्याला जाता आले तर काय बहार येईल. पण तो आता प्रो झालाय आणि आपल्याला ती स्टेज गाठायला अजून अवकाश आहे असे मनाचे समाधान करत आगेकूच चालूच ठेवली.

गेल्यावेळच्या गुढगेदुखीमुळे मी यावेळी अतिसावध होतो. शक्यतो खालच्या गियर्सवर चालवून जास्त केडन्स ठेवायचा प्रयत्न होता. त्यामुळे स्पीड फारसा मिळत नसला तरी बर्यापैकी कंफर्टेबल होतो. खंबाटकीही न थांबता पार केला तरी एरवीपेक्षा थोड्या खालच्या गियरवरच चालवला आणि त्यामुळे १०.१५ च्या सुमारास सुरुर फाटा पार करून सुसाट पुढे निघालो.
त्यानंतर साताऱ्याच्या अलिकडच्या खिंडींनी आणि उन्हाच्या तडाख्यामुळे जरा वेग कमी केला पण २.४५ ला सातारा पाठीमागे टाकले. कराड अजून ४०-५० किमी अंतरावर होते पण हे अंतर संपता संपेना. आणि आधी लिहील्याप्रमाणे मी कमी वेगानेच जात असल्याने एकदम मागे राहीलो होतो. लान्स, ओंकार, वेदांग अदी सुसाट गेले होते आणि अजून २० किमी राहीले असतानाच त्यांचा हॉटेलवर पोचल्याचा मेसेज आला.
श्या म्हणलं, आपण अगदीच हळुबाई झालोय म्हणत जरा जोरात सायकल दामटली आणि पाऊणएक तासात हॉटेल संगम गाठले.
बाजूलाच एक मोठ्या धेंडाचे लग्न लागले होते आणि अॉर्केस्ट्रा वगैरे अगदी जोरात होता. म्हणलं आता आपल्या झोपेचे खोबरे करणार. पण जेवणवगैरे उरकून येईपर्यंत शांतता झाली.
दरम्यान, माझी कराडला राहणारी मावशी, काका भेटून गेले. आणि त्यांच्याकडे न उतरता हॉटेलला राहण्याबद्दल कानउघडणीही केली. मग शेवटी त्यांना आम्हाला पहाटे लवकर ऊठून जायचे आहे आणि सगळ्यांना आंघोळी-टॉयलेट वगैरे उरकून निघायला वेळ लागले अशी प्रॅक्टीकल अडचणी सांगितल्यांनतर कुठे सुटका झाली.
पहिला दिवस विनाव्यत्यय पार पडला म्हणून जेवणानंतर मस्त आईस्क्रीम आणि त्यावर पान असा झकास बेत झाला. भरलेल्या पोटाने लवंडलो.
थोडेसे पाय दुखले पण तेवढे सोडले तर लोअर गियरवर चालवण्यामुळे एकदम फीट होतो. तरीही आठवणीने गुढग्याला तेल चोळून लावले. हा नेम मी शेवटपर्यंत ठेवला.

असेही पुणे कराड रस्त्यावर फोटोसेशन करण्यासारखे काही नव्हते आणि काही आठवडे आधीच हा रस्ता पार केल्यामुळे क्वचितच कॅमेरा बाहेर काढला. त्यामुळे हा भाग नुसताच मजकूराने भरला आहे. याची भरपाई नंतर केली जाईल.

आजचा प्रवास झाला १६५.४ किमी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लै भारी रे .... हे सारे वाचताना अग्दी तुमच्याबरोबरच प्रवास करीत आहोत असे वाटत होते .... Happy

व्वा.... ये हुई ना बात... असा पाहिजे वृत्तान्त !
खालच्या ग्राफमधले दोन डोन्गर काय भारी दिसताहेत. पहिला कात्रज नंतरचा खंबाटकी दिस्तोय, अन नंतरच्या टेकड्या म्हणजे सातार्‍या अलिकडील व पलिकडील खिंडी असाव्यात
लोअर गिअर म्हणजे मागिल बाजुचे मोठे व्हिल ना? त्यामुळे पेडल जास्त मारावी लागतात, पण ताकद व दम वाचतो, बरोबर ना? तुझा हा मुद्दा नीट लक्षात ठेवला पाहिजे.

बाप रे, सॉलिड उत्कंठावर्धक आहे तुझा प्रवास. प्लिज लवकर लवकर लिही.
आणि एक पुस्तक पण होईल इतकं सुंदर लिहितोयस.

वा !

लोअर गिअर म्हणजे मागिल बाजुचे मोठे व्हिल ना? त्यामुळे पेडल जास्त मारावी लागतात, पण ताकद व दम वाचतो, बरोबर ना?

हो अगदी बरोबर...पुढच्या बाजूचे सगळ्यात लहान आणि मागच्या बाजूचे सगळ्यात मोठे. ही सगळ्यात लोएस़्ट कॉंबो आहे.(तीव्र चढासाठी). आणि पुढचे सगळ्यात मोठे आणि मागचे सगळ्यात लहान व्हील हे उतारासाठी.

वैनिल - हो बरोबर...मी आधी बरेच अॅप वापरून पाहिले. एडुमोंडो पण चांगले आहे पण स्ट्राव्हा बाकी अॅपच्या तुलनेत खूप कमी बॅटरी खातो. आणि त्याचे फिचर्सपण चांगले आहेत.

पण त्यांचा ऑटोस्टॉप मोड जरा गंडला आहे. जरादेखील हालचाल झाली तरी त्याचे रिडींग सुरु होते आणि खरेतर यापेक्षा कमी वेळेत आम्ही हे अंतर पार केले आहे. पण दाखवताना तो जास्त वेळ देतो.

त्यामुळे त्याने दिलेल्या वेळेच्या किमान एक अर्धा तास तरी कमी वेळ प्रत्यक्षात लागला आहे.

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद

सायकलच्या तयारीचा फोटो हवा होता . नवोदीतांना उपयुक्त ठरला असता

तयारीचा म्हणजे नक्की कसा हवाय. माझ्याकडे बरेच काय काय फोटो आहेत. कसा ते तपशीलात सांगितलेत तर मी नक्कीच प्रयत्न करीन

@आशुचँप : सायकलमध्ये सामानाच्या बॅग्स कशा लावल्या होत्या .
पाणी किती सोबत घेतला होत .
फ्रंट लाइट- टेल लाइट कसे अ‍ॅडजस्ट केले होते
बादवे हॉर्न किंवा घंटी होती का ( सीरीयस प्रश्न आहे)
पंक्चर किट सोबत होत का ?

बॅग्स हँदलसमोर लावणे योग्य की मागे ?
ई.ई.

शाहीर - प्रतिसादांमध्ये देण्यापेक्षा मूळ लेखातच या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो.
माहीती दिलेली आहे. कृपया पहावीत.

>>> त्यामुळे मी शुक शुक करतच काम भागवले<<< Lol Lol Lol
गिअरचे कळले.
अजुन एक प्रश्न, पंक्चर झाल्यास तो काढताना, टयुबमधे हवा भरुन पाण्याच्या टबात बुडवुन भोक कुठे पडले आहे ते तपासतात. तुम्ही पंक्चर काढताना हा पाण्याचा टब कसा मॅनेज करता? का कोणती वेगळी आयडिया वापरता, जसे की धूळ टाकणे, पाण्याने ओला हात फिरवुन बघणे इत्यादी?

अजुन एक प्रश्न, पंक्चर झाल्यास तो काढताना, टयुबमधे हवा भरुन पाण्याच्या टबात बुडवुन भोक कुठे पडले आहे ते तपासतात. तुम्ही पंक्चर काढताना हा पाण्याचा टब कसा मॅनेज करता? का कोणती वेगळी आयडिया वापरता, जसे की धूळ टाकणे, पाण्याने ओला हात फिरवुन बघणे इत्यादी?

त्यासाठीची युक्ती अशी आहे की रस्त्यावरच्या धुळीला अगदी जवळ पण स्पर्श न करता ट्युब फिरवायची. पंक्चर असलेल्या ठिकाणी बरोबर ती धुळ उडते, अगदी बारीक पंक्चर असेल तर मग हा प्रयोग उपयोगी पडत नाही. अशा वेळी आमच्याकडे कपडे धुण्याच्या पावडरचा वापर करायचो. त्यात थोडे पाणी मिसळून जिथे शक्यता वाटतीये तिथे लावयाचे.
सुदैवाने आख्ख्या प्रवासात सगळ्यांची मिळून फक्त तीन पंक्चर झाली. त्यामुळे फार यातायात करावी लागली नाही.

सगळ्यांना धन्यवाद.

Pages