पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस २ निप्पाणी

Submitted by आशुचँप on 24 March, 2015 - 17:10

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

==========================================================================

भल्या पहाटे मामांनी उठवले आणि बघतो तर ते सगळे कपडे वगैरे करून तयार. पॅनिअर्स पण पॅक. अरे च्यायला आपण फारच मागे राहीलो करत उठून भराभरा आवरायला घेतले. सुुदैवाने पहिलाच मुक्काम असल्याने असाही फार पसारा काही केलाच नव्हता. फक्त सायकलींगचे कपडे काढून झोपतानाचे घातले होते.
तेवढे पटापटा बदलून पुन्हा कालचेच वाळत घातलेले कपडे अंगावर चढवले आणि पॅनिअर्स पॅक करून बाहेर निघालो.
सुरुवातीला मी सायकलवर असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे दोन्ही पॅनिअर्स, हँडलबारबॅग, फ्रेमबॅग, सायक्लोकॉप्युटर, लाईट, बॅकलाईट काढून रूममध्ये आणायचो आणि पुन्हा दुसरे दिवशी नेऊन लावायचो. यात जाम माझा लळालोंबा व्हायचा. दोन्ही हातात सगळ्या वस्तु मावायच्या नाहीत. कारण पाण्याची बाटली, हेल्मेट, मोबाईल, ग्लोव्हज, कानाला बांधायचा रुमाल पण बरोबर.
या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घेऊन जायचे असल्याचा पण केल्यामुळे जी काय त्रेधातिरपीट उडायची त्याला तोड नव्हती. आणि या सगळ्या गोष्टी सायकलवर बसवल्यानंतर मग मोबाईल काढून जीपीस सुरु करून, स्ट्राव्हा अॅप चालू करायला किती वेळ जात असेल याची कल्पना करा. आणि त्यातून मी सगळ्यात उशीरा उठायचो. त्यामुळे सकाळच्या वेळची माझी धांदल प्रेक्षणीय असे.

नंतर नंतर मग काही गोष्टी सायकलवर सोडून द्यायला लागलो. तसेच ग्लोव्हज, हेल्मेट सगळे घालून मगच रूमबाहेर पडायला लागलो आणि जरा सुसुत्रता आली. असो.

फेब्रुवारी संपत आलेला असला तरी कराडमध्ये तसा बऱ्यापैकी गारवा होता. त्यामुळे बाहेर आलो तेव्हा एकदम शिरशिरी आली. पहाटेचे साडेचार वाजले होते. बाहेर किर्र अंधार होता. समस्त कराडवासीय गाढ झोपले होते आणि आम्ही आमच्या दुसऱ्या टप्प्याकडे निघालो होतो.

आजचा मुक्काम निप्पाणीलाच असल्याने आज फक्त ११० किमीचाच प्रवास होता. पण आज नेमकी भारत - दक्षिण अफ्रिका मॅच असल्याने लवकर निप्पाणीला पोचलो तर शेवटची काही षटके बघायला मिळतील अशा अंदाजाने लवकर निघालो. अर्थात पुढे झालेल्या काही घटनांमुळे तो फारच उत्तम निर्णय ठरला.

अंगातली सुस्ती आणि झोप पुरेशी गेली नसल्यामुळे बाकींच्याचे आवराआवरी होत असतानाच मी थोडे सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. मग बाकीच्यांनी पण आळोखे पिळोखे देत, स्ट्रेचिंग करत अंगात उब आणण्याचा प्रयत्न केला.

गणपतीबाप्पा मोरया आणि पुंडलिक वरदे हारी विठ्ठलचा गजर करत हॉटेलच्या आवारातून बाहेर पडलो आणि खडाक करून माझी चेन पडली. रात्री कुणीतरी गियर्सची छेडछाड केली होती आणि अंधारात मला ते कळलेच नव्हते.
हॉटेलच्या बाहेरच हायवे लागत असल्याने मिट्ट अंधार होता. सुदैवाने सुह्द माझ्या मागेच होता म्हणून बरे. त्याने बिचाऱ्याने मला फटाफट चेन लाऊन दिली आणि तो पुढे सटकला.

आता मीच सगळ्यात शेवटचा होतो. त्या चांदण्या पहाटे खरेतर सायकल चालवायला मस्त वाटायला पाहिजे होते. पण का कोण जाणे मला असे वाटत होते की अजून आपले शरीर आणि मेंदू स्लीपींग मोडच्या बाहेरच आलेले नाहीत. यांत्रिकपणे सायकल चालवत होतो खरा पण कितीही प्रयत्न केला तरी जोरात दामटून चालवताच येत नव्हती. थंड हवेनी, अपुऱ्या झोपेनी डोळे चुरचुरत होते. इतक्या पहाटे अर्थातच हायवेला फार गर्दी नव्हती. आणि पुढे थोड्या अंतरावर दिसणारा सुह्दच्या टेललाईटचा लाल लुकलुकता दिवा काही वेळानंतर दिसेनासा झाला. आता मीच एकटा आणि त्या एकटेपणात बाजूने रोरावत जाणाऱ्या ट्रक्सनी त्यात आणखी भर घातली.

गाणी ऐकायला बंदी, बरोबर बोलायला कुणी नाही, झोप अनावर होत चाललेली, घरच्या उबदार पांघरूणाची आठवण गडद होत होती आणि कालच्या सायकलींगने थकलेले शरीर काही केल्या उभारी घ्यायला तयार नाही. अशा अवस्थेत एखाद्याने पाय ओढत चालत रहावे तसा मी पॅडल अक्षरश ओढत सायकल पुढे ढकलत राहीलो.

गेल्या निप्पाणी राईडच्यावेळी कराडपासून १०-१५ किमी अंतरावर एका पेट्रोलपंपाजवळ चहा मिळाला होता. आत्ताही तिथे चहा असेल आणि सगळेजण आपली तिथे वाट पाहत असतील हीच एक त्यातल्या त्यात आशेची बाब होती. आणि तसे झालेही. लांबूनच तो पंप दिसला आणि तिथे बाजूला उभ्या असलेल्या सायकलीही.

तिथे जाऊन पोहचलो आणि कसाबसा तिथल्या खुर्चीवर जाऊन टेकलो. सगळ्यांनाच माझी अवस्था पाहून चिंता वाटली. कात्रजलाही मला पहिल्या टप्प्याला त्रास झाला होता. आताही तसाच प्रकार होता.

शेवटी मामांनीच अनुमान काढले की बहुदा सकाळच्या वेळी माझ्या अंगातली ग्लुकोज लेव्हल कमी होत असणार आणि त्यामुळे शरीर गळून जाणे, थकवा वाटणे असे होत असणार. आणि मग तातडीने उपचारही करण्यात आला. घसघशीत साखर घातलेला गरमागरम चहा समोर आला आणि त्याबरोबर खायला क्रीमच्या बिस्कीटांचा पुडा. मी बास म्हणले तरी आग्रह कर करून सगळ्यांनी मला तो आख्खा पुडा संपवायला लावला.

मनात म्हणलं, या वेगाने माझा ग्लुकोजवरचा उपचार होईल खरा पण त्याबदल्यात डायबेटीस नक्कीच होईल. या सगळ्यात किती वेळ गेला माहीती नाही पण माझे लक्ष गेले तोच पूर्वेकडे फटफटायला लागले होते. हळूहळू अंधाराचा पडदा सरत सरत झाडे, माणसे, घरे त्यांचे विशिष्ट आकार धारण करू लागली होती.

मी पटापटा कॅमेरा बाहेर काढला आणि फोटो काढायचे काही निष्फळ प्रयत्न केले. मी फोटो काढायला लागलो म्हणजे नॉर्मल झालो याची सगळ्यांची खात्री झाली आणि जास्त वेळ थांबले तर पाय जास्त दुखतात म्हणून सगळे एकेक करत पुढे सटकले. मी पुन्हा एक चहा घशाखाली ओतला आणि नव्या उमेदीनी पुढे निघालो.

मामांचा उपचार चांगलाच परिणामकारक ठरला. कारण आता मस्त उत्तेजित वाटत होते. थोड्या वेळापूर्वीचा भिववणारा अंधार जाऊन, छान सोनेरी कोवळ्या सूर्यकिरणांनी आसमंत भरून गेला होता. थंडीचा बोचरेपणा जाऊन प्रसन्न गारवा जाणवत होता. आणि मग झपाझपा अंतर कापत किणी टोल नाका गाठला.

रंगीत तालिम आधीच झालेली असल्यामुळे कुठे थांबायचे याचे सगळे प्लॅन नक्की होते. त्यामुळे कुणीही मागेपुढे झाले तरी बरोबर त्या जागी एकत्र आलो. इतक्या पहाटेही टोल नाक्यावर बरीच मोठी रांग होती. त्यामुळे उगाचच आपण किती पेट्रोल वाचावतोय असे काहीसे वाटून उगाचच फार भारी वगैरे वाटायला लागले.

टोल नाका संपताच टपरीवजा दुकानांची मोठी रांग आहे. त्यातल्याच एकात गरमागरम पोहे आणि चहा रिचवला.

आता मात्र सकाळची थंडीही गेली होती आणि सूर्यमहाराज प्रखर व्हायला लागले होते. त्यामुळे कानपट्टी, जॅकेट सगळे आत गेले आणि गॉगल, सनस्क्रीम वगैरे बाहेर आले.

आता पुढचा ब्रेक होता डायरेक्ट कोल्हापूर. माझे काका-काकू, भाऊ बहिणी हे सगळे मला भेटायला होणार होते. त्यामुळे फार न रेंगाळता लवकरच निघालो. पण तत्पूर्वी मोहिमेतले पहिले विघ्न उभे राहीले.

घाटपांडे काकांच्या टायरला अडचण आली. कशामुळे माहीती नाही पण त्यांच्या टायरला असा हवेचा फुगा आला. त्यामुळे त्यांची सायकल टुणुक टुणुक अशी उडत होती. शेवटी अगदीच असह्य झाले तेव्हा ते थांबले आणि सगळ्यांनी मिळून त्यावर उपचार करायला सुरुवात केली.

सुदर्शन चक्र

हवा भरताना बाबुभाई

बऱ्याच चर्चेनंतर असे निष्पन्न झाले की यावर आता काही करणे अशक्य आहे. टायर अगदीच बाद झाला होता. त्यामुळे कोल्हापूरला जाऊन नविन टायर टाकणे हा एकच पर्याय शिल्लक होतो.

असेही आम्ही कोल्हापूर गावात शिरणार नव्हतोच. त्यामुळे माझ्या नातेवाईकांना मी हायवे लगतच्या मॅकडोनाल्डमध्येच बोलावले होते आणि ते बराच वेळ येऊन माझी वाट बघत बसले होते. या सगळ्या टायर प्रकरणात मी ते विसरूनच गेलो. आणि मग लक्षात येताच सगळ्यांना सांगून माझी सायकल पुढे काढली. ते २०-२२ किमी अंतर ज्या काही स्पीडनी पार केले त्यानी खूप भारी वाटले.

मॅक-डी ला पोचलो तेव्हा काका काकू वाटच पाहत होते. याच काकूंची सायकल घेऊन बाबांनी कन्याकुमारी मोहीम केली होती. त्यामुळे त्यांना तर अगदीच गहीवरून आले होते. काकांनी तर येईल जाईल त्याला
हा माझा पुतण्या. याचा बाबा ४४ वर्षांपूर्वी कन्याकुमारीला गेला होता सायकलनी आता हा पण चाललाय
असे सांगत सुटले होते. माझ्या ताया, दुसऱ्या काकांचा मुलगा हे पण आले होते. आमचा भेटीचा सोहळा उरकतोय तोपर्यंतच आमची गँग पण येऊन ठेपली.

ते आल्याआल्याच सुवार्ता कळली की पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूरात आज कडकडीत बंद पाळला गेलाय. एक दुकानही उघडे नाही. आता घाटपांडे काकांच्या सायकलचे करायचे काय हा गहन प्रश्न पुढे ठाकला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांचेही एक नातेवाईक कोल्हापूरात राहत होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी एक सायकल डीलर गाठला होता.
पारमळे त्यांचे नाव. वयस्कर गृहस्थ होते. आमची अडचण लक्षात घेऊन त्यांनी अगदी आउट अॉफ द वे जाऊन मदत केली. शहरातली सगळी दुकाने बंद असल्यामुळे त्यांनी कुठे कुठे फोन लाऊन नविन टायर मिळवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या मुलाने का पुतण्याने बहुदा कुठे या फंदात पडता अशी कुरकुर केली असावी, कारण ते एकदम त्याच्यावर उखडले.
हे लोक पाहुणे आहेत. त्यांना सायकलवरून पुढे कन्याकुमारीला जायचे आहे. आपण जर नाही मदत केली तर त्यांचा सगळा पुढचा प्लॅन वाया जाईल. तुम्हाला जायचे नसेल तर मी जाऊन टायर घेऊन येतो, अशा शब्दात त्यांनी खडसावल्यावर मुकाट तो टायर आणायला गेला.

दरम्यानच्या काळात आम्ही, आम्हाला भेटायला आलेल्या लोकांनी मिळून मॅकडी मध्ये तुफान दंगा केला. माझ्या काका काकूंनी बरेच काय काय खायला आणले होते. त्यात घाटपांडेच्या नातेवाईकांनी चीज पराठे, युडींच्या एका मित्रानेही अजून काय अशी फुल चंगळ झाली होती. आणि मॅकडीवाल्यांनी बाहेर काढू नये म्हणून अधून मधून त्यांच्याकडूनही काही काही मागवत होतो.

हे चालू असतानाच बाहेर गडगडाटी आवाज करत ५०-६० हार्ले डेव्हिडसन येऊन थांबल्या. हे लोकपण कुठल्यातरी मोहीमेवर होते. जिथे एरवी एखाद दुसरी हार्ले दिसते तिथे एकदम इतक्या हार्ले, त्यावरचे चित्रविचित्र डिझाईनचे कपडे घाललेले रायडर्स (त्यात एक दोन प्रेक्षणीय महिला रायडर्सही होत्या) आल्यानंतर एकदम आमच्यावरचे अटेशन्स त्यांच्यावर गेले.

फोटो - ओंकार ब्रम्हे

सुरुवातीला त्यांचा थोडा हेवा वाटला पण नंतर लक्षात आले की खरेतर त्यांनी आपला हेवा करायला पाहिजे. त्यांच्या दिमतीला राक्षसी इंजिनाची ताकद होती. सगळे काही शाही काम होते. उलट आम्ही केवळ शारिरीक फिटनेस आणि मानसिक बळाच्या जोरावर इथवर आलो होतो आणि असेच पुढेही जाणार होतो. चढावर अॅक्सिलेटर पिळून झुम करून जाण्यापेक्षा एक एक पॅडल घाम गाळत वरती पोहचल्याचा आनंद जास्त होता.

ये बाबुभाई का स्टाईल है Happy

आपटे काका

घाटपांडे काकांना अजून बराच वेळ लागणार होता. त्यामुळे त्यांच्या मदतीला सुऱ्हुदला ठेऊन आम्ही पुढे निघालो. बाहेर निघालो आणि लक्षात आले की सगळ्या धबडग्यात माझ्या सायक्लोकॉप्युटरचा सेलच कुठेतरी पडलाय. अरेच्या असे कसे काय झाले म्हणत पुन्हा आत गेलो आणि शोधाशोध सुरु केली. तिथल्या कर्मचाऱ्यांनाही कामाला लावले. पार अगदी त्यांना कचऱ्याचा डबा पण बाहेर काढून बघायला लावला. कहर म्हणजे त्यात सेल सापडला. पण त्याच्या खाली असलेले फिरकीसारखे झाकण मात्र गेलेच.

ते नसल्यामुळे सेल आत राहतच नव्हता. आता एवढा महागातला कॉम्प वाया गेल्याच्या मी दुखात असताना वेदांगने जुगाड करून कसातरी त्याच्या सॉकेटमध्ये तो बसवला. आता पुन्हा जेव्हा तो काढीन तेव्हा सेल बाहेर पडून सगळा डाटा जाणारच होता पण किमान दिवसभर तरी तो वापरात राहणार होता.

कोल्हापूरात नाही म्हणत म्हणत तब्बल दोन तासांचा ब्रेक झाला होता. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला होता. त्यातून कोल्हापूर हे बशीसारख्या खोलगट भागात वसले आहे. त्यामुळे येताना उतार होता पण आता चांगलाच दम काढणारा चढ लागणार होता. त्यातही कागलनंतर लागणारे राक्षसी चढ उतार होतेच. गेल्यावेळीच त्यांनी चांगला हात दाखवला होता. आता भरपूर खादाडी केल्यावर आणि दोन तास एसी मध्ये बसल्यानंतर टळटळीत उन्हात बाहेर पडून सायकलींग करण्यातला वैताग पूरेपूर येत होता.

कर्नाटक राज्यात प्रवेश

दुपारी एकच्या सुमारास कागल टोल नाका पार केला. आता म्हणजे उन्ह असह्य होत चालले होते. त्यात भरीस म्हणजे हेडविंड्स. समोरून वाहणारा वारा सगळी एनर्जी खच्ची करत होता. पण थांबणे मंजूर नव्हते आणि डीहायड्रेशन टाळण्यासाठी ओआरएसची पाकिटे पाण्यात ओतून ती पित पित पुढे जात राहीलो.

अशाच वातावरणात सुमारे तीन वाजता निप्पाणी गाठले. गेल्या वेळी एका फ्रुटप्लेट वाल्याकडे कलिंगड, पपई प्लेट खाल्ली होती. ती खूपच आवडली होती. त्यामुळे यावेळीही त्याला शोधून प्लेटी हादडायला सुरुवात केली. त्याची मेमरीही भारी होती. त्याने गेल्या वेळी कोण कोण होते आणि नविन मेंबर कोण आहेत हे बरोबर सांगितले.

एक, अजून एक करत आम्ही जवळपास २०-२२ प्लेटी फस्त केल्यानंतर त्याच्याकडची फळेच संपली. थांबा आलोच करत तो पळत पळत दुसऱ्या फळवाल्याकडे जाऊन अजून एक कलिंगड घेऊन आला. त्याला निराश केले नाही आणि तब्बल २९ प्लेट खाऊन झाल्यावर मग उठलो. (प्रत्येकी नव्हे..एकूण मिळून). नंतर संत्रीही घेतली आणि या सगळ्याचे मिळून बिल झाले ३४५ रु.

लगोलग गेल्याच वेळी जिथे राहीलो होतो त्या हॉटेल प्रितीमध्ये डेरेदाखल झालो. कालच्या मानाने आज थकवा फार जाणवला नाही आणि बराच वेळ हातात असल्यानी बऱ्याच जणांनी धोबीघाट काढला. दोन दिवसांचे घामट कपडे, रुमाल, पँट सगळे धुऊन वाळत घातल्यावर खोलीची कळा बघणेबल होती. दरम्यान आमच्यासारख्या काहींनी मॅचचा आनंद घेतला आणि शेवटी आपण जिंकल्यावर जल्लोषही करण्यात आला.

प्रितीलाच उत्तच जेवण्याची सोय आहे. त्यामुळे तिथे हादडून झाल्यावर, भारत जिंकल्याचा आनदाप्रित्यर्थ आईस्क्रीम झालेच.

आमच्या खोलीतून दिसणारा सूर्यास्त

आजचा प्रवास १०५ किमी.
कागलनंतरच्या कॅमल बंप्सनी बरीच वाट लावली. पण ते येणार याची मानसिक तयारी आधीच झाली होती त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा खूपच बरी अवस्था होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वर्णन, प्रसंग अगदी नजरेसमोर उभे रहाताहेत.
आठ गिअर चे व्हील... भारीच.
फोटो मस्त आलेत.
टायरला फुगा आलेला तर हवा काढून त्यावर कापडी/रबरी पट्टी गुंडाळुन बांधुन काही झाले असते का? ही अडचण लक्षात ठेवली पाहिजे.... स्पेअर गेटर ठेवला पाहिजे जवळ. नै? अर्थात किती किती काय काय ठेवायचे म्हणा? असे केले तर आख्खी एक सायकलच स्वतंत्र स्पेअर ठेवायला लागेल.... Proud

उलट आम्ही केवळ शारिरीक फिटनेस आणि मानसिक बळाच्या जोरावर इथवर आलो होतो आणि असेच पुढेही जाणार होतो. चढावर अॅक्सिलेटर पिळून झुम करून जाण्यापेक्षा एक एक पॅडल घाम गाळत वरती पोहचल्याचा आनंद जास्त होता.+१००
मस्त ....चालू दे!

उलट आम्ही केवळ शारिरीक फिटनेस आणि मानसिक बळाच्या जोरावर इथवर आलो होतो आणि असेच पुढेही जाणार होतो. चढावर अॅक्सिलेटर पिळून झुम करून जाण्यापेक्षा एक एक पॅडल घाम गाळत वरती पोहचल्याचा आनंद जास्त होता. >> +१००

सही चाल्लय

धन्यवाद सर्वांना

असे केले तर आख्खी एक सायकलच स्वतंत्र स्पेअर ठेवायला लागेल..
हो ना खरंय :प Happy

सायकलवर बसून लांब कुठेतरी जायची सुरुसुरी येते आहे.
चला मग पुढच्या वेळी आमच्याबरोबर

मस्त रे. वाचायला मजा येतेय आणी एक्दम सोप असल्यासारख वाटतय पण ईतक अंतर सायकल चालवण कठीण काम आहे.

champ ,

तुझ्या दिवसाची सुरवातीच जे वर्णन केलंस , ते मस्तच.
वाचायला मजा येते.
लवकरच पुढचा भाग टाक

मस्स्स्स्स्स्स्स्स्त!
६वि ७वित असताना, नविपेठ ते सिंहगड .. ही अनेकदा केलेली सायलिंग वारि आठवली.

Pages