लाभेवीण प्रीती, निर्व्याज प्रेम

Submitted by अपराजिता on 18 March, 2015 - 06:36

आश्चर्य वाटले असेल ना? शीर्षक वाचून , अगदी बुचकाळ्यात देखील पडला असाल ना? आज-कालच्या कलीयुगात जो तो आपला आपला मतलब , आपला स्वार्थच पहाण्यात मशगूल असतो, जेथे माणसूकीची चाड देखील राहिलेली नाही अशाही काही किळसवाण्या घटनांनाही आपण सामोरे जातो तर मग ह्या जगात असे स्वत:च्या लाभाशिवाय कोणी तरी प्रेम करू शकेल का? साहजिकच उत्तर वाटते नाही , नाही , छे , छे हे तर केवळ अशक्यच आहे. मी ही ह्याच मताची होते खरे तर , पण जेव्हा भगवंताच्या आपल्या वरील अपार मायेची, प्रेमाची जाणीव होऊ लागली आणि भगवत्स्वरूप असणार्‍या सदगुरुंचा जीवनाला परीस स्पर्श झाला तेव्हा मात्र ह्याची पुरती अनुभूती आली आणि मग मात्र स्वत:च्या मताला बदलावेच लागले.

आकाशाचा कागद, पृथ्वीची लेखणी,आणि सागराची शाई केली तरी सदगुरुंच्या प्रेमाचे वर्णन केवळ अशक्य आहे असे म्हटले जाते ते काय उगीच .. ज्ञानियांचा राजा- ज्ञानेश्वर माऊली सुध्दा आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये त्यांचे गुरु निवृत्तीनाथ ह्यांच्या प्रेमाचे गोडवे गाताना थकत नाही.

हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येरव्हीं काय भानुतेजीं खद्योत्ता । शोभा आथी ।। ६७ ।।
कीं टिटिभू चांचूवरी । माप सूये सागरीं । मी नणतु त्यापरी । प्रवर्तें एथ ।। ६८ ।।
आयका आकाश गिंवसावे । तरी आणिक त्याहूनि थोर होआवें । म्हणऊनि अपाड हें आघवें । निर्धारितां ।। ६९ ।।
- ( ज्ञानेश्वरी - अध्याय १)

साक्षात ज्ञानेश्वरांचेच उदाहरण पाहायचे झाले तर त्यांच्या लहान वयातही विसोबा खेचरांनी त्यांना व त्यांच्या भावडांना अतोनात त्रास दिला होता, छळ ही केला होता. परंतु हेच विसोबा खेचर जेव्हा ज्ञानेश्वरांची महती पटल्यावर शरण जातात तेव्हा ज्ञानेश्वर माऊली त्यांना फक्त उदार मनाने , मोठ्या अंत:करणाने शरणच देत नाही तर विसोबांच्या आयुष्यातील पाप कर्माने भरलेली ३५ वर्षे भिक्षा रुपात स्वत: त्यांच्या दारी जाऊन मागून घेते आणि त्यांना ही गुरुस्थानी स्थापण्याचे अचिंत्य दान पदरी बांधते. पुढे हेच विसोबा खेचर संत नामदेवांचे गुरु झालेले आपण पाहतोच. हा असतो तो परीस स्पर्श - अख्खे आयुष्यच पालटून जाते -अवघा कायापालट ही सदगुरुमायच करू शकते. विसोबांना स्वपनातही वाटले नसेल असे अचिंत्य दान ज्ञानेश्वरांनी दिले होते. मला वाटते हीच ते लाभेवीण प्रेम. आपण सामान्य माणसे विचारही करू शकत नाही , ज्याने मला आयुष्यात भरपूर त्रास दिला, मला अतोनात दु:खच दिले त्याला मी माफ करू शकतो का , त्याला सर्व काही विसरून जवळ करू शकतो का?

आपण महाभारतात तर केवळ धृतराष्ट्र-कौरव विरूध्द पांडव, द्रौपदी विरूध्द कर्ण- दुर्योधन, द्रोणाचार्य विरुध्द राजा द्रुपद , अश्वत्थामा विरुध्द पांडव असा सर्वत्र सूडाचाच प्रवास भरलेला पहातो.

तेव्हा पटते की असे स्वत:च्या लाभा शिवाय नि:खळ , निर्व्याज प्रेम करणे किती अवघड आहे !!!
आता साधे हेच बघा ना, बहुतांशी असे चित्रच पहायला मिळते की आपण देवळात गेलो आणि देवाला दक्षिणा म्हणून दान पेटीत चार आणे असो की सव्वा रुपया असो की अकरा रुपये असो ते देतानाही आपण बर्‍याच वेळा ते देवावरून ओवाळून मगच टाकतो. ज्या देवाने आपल्याला सर्व काही दिले त्याला "त्या"चेच परत देताना सुध्दा आपण " मी तुला देतो" हा भाव सोडायला तयार नसतो असे मला तरी वाटते. मग जर हेच दान हजार , हजारांच्या पटीत वा लाखाच्या घरात असले तर आम्हांला आपले नाव फलकावर कोरून हवे असते, वा देतानाच्या फोटोची गरज वाटते. परंतु तोच परमात्मा, भगवंत आपल्याला सारे काही फुकटच देतो ना? "तो" कधी म्हणतो का हा "भगवंतछाप पाऊस, भगवंतछाप प्रकाश , भगवंतछाप तांदूळ, भगवंतछाप गहू, भगवंतछाप कापूस " नाही ना , कारण हे सारे "तो" त्याच्या लेकरां वरच्या असीम प्रेमाने करतो, म्हणून त्याला कधीच स्वत:च्या नावाची , स्वत:च्या मान-सन्मानाची पर्वा पडलेली नसते.

आपल्याला चिंतीता येणार नाही, कल्पिता येणार नाही असे अमोघ दान केवळ आणि केवळ "तो"च देऊ शकतो. मग आम्ही स्वत:ला त्याची लेकरे म्हणवितो तर आमच्या "मायबापा"चा हा चांगला गुण काही अंशाने का होईना पण आम्हांला शिकता यावा असे वाटते .

सदगुरु हा "त्या" अनंत करुणामयी परमेश्वराचेच स्वरूप असतो असे आपली प्राचीन भारतीय संस्कृती सांगते आणि सदगुरूच्या प्रेमाला दुजी उपमा देता येत नाही असा गोडवा सारी संत मंडळी गातात. ह्याच संताकडून , सदगुरुंकडून "देणार्‍याने देत जावे , घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे " अशी शिकवण मिळते.

अरे अरे- असे घाबरून जाऊ नका हो, देणार्‍याचे हात नाही कापून घ्यायचे , नाही तर शोले पिक्चर मधला संवाद आणि दृश्य़ आठवाय़चे आणि छातीत धडकीच भरायची "मुझे तुम्हारे हाथ दे दो"
देणार्‍याचे हात म्हणजे देणार्‍याची दुसर्‍याला देण्याची निस्वार्थी, त्यागमयी वृत्ती मला स्विकारता आली पाहिजे.

जसा परमेश्वर हा सर्व चराचराला व्यापून उरला असतो तसेच हे संत महात्मे, सदगुरु ह्यांची अखिल ब्रम्हांडावर सत्ता असते, उगाच नाही ललकारी दिली जात " अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय " वा " अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सदगुरु श्रीसाईनाथ महाराज की जय ".
सदगुरु स्वामी समर्थ असो वा सदगुरु साईनाथ असो म्हणूनच ग्वाही देऊ शकतात ह्याच अनन्यप्रेमापोटी त्यांच्या भक्तांना, श्रध्दावानांना की

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे " वा " शरण मज आला आणि वाया गेला , दाखवा दाखवा ऐसा कोणी "
होय , ही त्या अपार, अथांग वात्सल्यमूर्ती सदगुरुंचे अनन्यप्रेमच हे ठामपणे ग्वाही , वचन देऊ शकते. अनन्य म्हणजे त्याच्या सारखे दुसरे असे काहीच नाही, असूच शकत नाही. अनन्यप्रेम हे फक्त आणि फक्त सदगुरुच करू शकतो कारण सदगुरुला आपल्या भक्ताकडून अगदी कशा कशाचीच अपेक्षा नसते. "त्या" एकाचे भगवंताचे अनन्य प्रेम सदगुरुला आपल्या भक्तांना वाटायचे असते. खर्‍या प्रेमात कधी मला काय , किती आणि कसे मिळते ह्याची कधीच गणना केली जात नाही. फक्त प्रेम देणे हेच माहीत असते.

संत तुलसीदासविरचिते "सुंदरकांडात " ह्या भगवंताच्या प्रेमाची ग्वाही साक्षात हनुमंत महाप्रभू सीतामाईला देतात " तुम ते प्रेमु रामू के दुना" सीतामाई तू जेवढे प्रेम रामावर करतेस ना त्याच्या दुप्पट प्रेम श्रीराम प्रभू तुझ्यावर करतात. हाच प्रेमाचा सिध्दांत सर्व त्याच्या लेकरांसाठी समानपणे लागू असतो.
वर्षानुवर्षे श्रीरामांची वाट पहाणार्‍या शबरीला भेट देण्यासाठी आपल्या पत्नीच्या सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेले असून देखील वाट सोडून श्रीराम जातातच आणि तिच्या हातची उष्टी बोरे खाऊन तिला तृप्ती , समाधान देतातच. हेच ते " लाभेवीण प्रेम - अनन्यप्रेमस्वरुपाचे"

रावणाने सीतेला पळवून नेले ही बातमी श्रीरामांना देण्यासाठी, रावणाने निष्ठूरपणे पंख कापल्याने , रक्तबंभाळ अशा घायाळ, मरणासन्न अवस्थेत जटायू पक्षी असताना श्रीराम भेट झाल्यावर बातमी ऐकून तसेच पुढे निघून जात नाहीत. तर आपल्या भक्तांवर पुत्रवत प्रेम करणारे श्रीराम जटायूचे उत्तरकार्य स्वत:च्या हाताने पार पाडतात आधी... हीच ती लाभेवीण प्रीती जी केवळ "तो " आणि "तो"च करू शकतो कारण "तो" च असतो " अनन्यप्रेमस्वरूप"

महाभारताच्या युध्दात "मी हाती शस्त्र धरणार नाही " अशी प्रतिज्ञा करूनही, स्वत: मात्र भीष्म-प्रतिज्ञा करणार्‍या व आयुष्यभर जपणार्‍या भीष्म पितामहांची इच्छा मात्र मला भगवान श्रीकॄष्णाच्याच हातून मरण यावे ह्या साठी साक्षात भगवान श्रीकृष्ण आपली प्रतिज्ञा मोडून हाती सुदर्शन धारण करून धाव घेतात , आपल्या भक्ताची इच्छा पुरविण्यासाठी ... कुठेही स्वत:ची प्रतिज्ञा मोडेल , लोक काय म्हणतील ह्याची तमा न बाळगता .... हेच तर असते " लाभेवीण प्रेम"

साईनाथांचा भक्त मेघा हा मृत्यु पावतो , तेव्हा शिरडीवासीय म्हणू लागतात "ह्याचे तर कुणी नातेवाईक नाही" , तेव्हा हा प्रेमळा सदगुरु स्वत: मेघासाठी धाव घेतो , त्याच्या साठी शोक करतो, आसवे ढाळतो एवढेच नव्हे तर स्मशानातही जातो आणि त्याच्या मेघावर फुले ही उधळतो.... आपल्या भक्तासाठी कोठेही धाव घेणारा हा सदगुरु साईनाथ - लाभेवीण प्रेमच नाही करत का बरे? मेघा तर मरण पावला मग आता तर तो भक्तीही नाही करणार आणि सेवाही नाही करणार - मग मी का जाऊ त्याच्यासाठी असा कोता विचार सदगुरु करीत नाही.
मेघा जेव्हां पावला पंचत्त्व । पहा तैं उत्तरविधानमहत्त्व ।
आणिक बाबांचे भक्त सख्यत्त्व । मेघा तो कृतकृत्य आधींच ।। १२० ।।
सवें घेऊन भक्त समस्त । स्मशानयात्रेस गेले ग्रामस्थ ।
बाबाहे गेले स्मशानाप्रत । पुष्पें वर्षत मेघावर ।। १२१ ।।
होतां मेघाचें उत्तरविधान । बाबाही झालें साश्रुलोचन ।
मायानुवर्ती मानवासम । शोकनिर्विण्ण मानस ।। १२२ ।।
प्रेमें बाबांनी निजकरें। प्रेत आच्छादिलें सुमननिकरें ।
शोकही करूनि करूणस्वरें । मग तें माघारा परतलें ।। १२३ ।।
- ( श्रीसाईसच्चरित अध्याय ३१ )

भगवंत , सदगुरु हेच अनन्यप्रेमस्वरूप असतात ,त्यांच्या प्रेमाला आपण सदैव पित राहायचे , अनुभवत राहायचे असते... ते असते त्रिकालाबाधित , अव्याहतपणे , सदैव अखंडपणे वहात असते , मला ते पाहण्याची केवळ दृष्टी असायला हवी , आणि त्यासाठी तरी मला "त्या"च्या दारी क्षणभर जायला हवेच ना ....
वारकरी संप्रदायात गायिल्या जाणार्‍या हरीपाठाची ही ओवी तेच मर्म सांगत आहे कदाचित -

देवाचिये दारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या .....
चला तर मग आपण ही आपल्या जीवलगांवर, आप्तांवर असेच निर्व्याज, नि:स्वार्थी प्रेम करण्यासाठी पहिले पाऊल उचलू या, राग-रुसवे, हेवेदावे, मत्सर हयाच्या वर उठून आपल्याच पती-पत्नी, मुलगा-मुलगी, आजी-आजोबा, काका-काकू, आत्या, मावशी , मित्र अशा नाते संबंधाची प्रेमाची वीण अधिक मजबूत करू या, दृढ बांधू या -
"अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीन ही लोक" ह्या समर्थांच्या (रामदास-स्वामीं) च्या बीदाचे पालन करू या - प्रेमाने !!!!

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. मर्त्य गुरुंची उदाहरणे पुरेशी होती. राम वगैरे देवांची पटली नाहीत.
विंदांच्या कवितेतल्या ओळी आहेत, तर त्यांच्या नावाचा उल्लेख करावा हि विनंति.

अपराजिता, मस्त लिहिलंय.

दिनेश, राम वगैरेंनीही देह धारण करुनच कार्य केलं होतं आणि देहाचे सर्व नियम पालन केले होते. राम (परमात्मा) आणि सद्गुरु हे एकच आहेत.

अपराजिता, हा लेख 'मायबोलीवर स्वागत' ह्या विभागातून हलवून 'धार्मिक' विभागात हलवायला हवा. अ‍ॅडमिनना विनंती कराल का तशी?

अपराजिता - अप्रतिम लेख ! अक्षर न अक्षर प्रेमाने ओतप्रोत भरलेलं उतरलंय तुझ्या लेखणीतून.

मायबोलीवर तुझं स्वागत !

दिनेश , आपल्या सूचने बद्दल धन्यवाद!. नक्कीच तसा बदल स्वागतार्ह आहे.
माझ्या साठी तरी किमान भगवंत आणि सदगुरु हे दोन्ही अनन्यप्रेमस्वरूपच आहेत म्हणून साहजिकच
श्रीरामांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटला.

आशिका आणि अश्विनी के धन्यवाद.
अश्विनी के. मी अ‍ॅडमिनना विनंती करते तशी.

अपराजिता, अ‍ॅडमिनना ई-मेल टाकली नसेल तर http://www.maayboli.com/user/3/guestbook इथे पण त्यांना मेसेज लिहून विनंती करु शकता हा लेख 'धार्मिक' विभागात हलवण्यासाठी.

अजून लिहित राहा Happy