गुटेन आबेन्ड!

Submitted by kulu on 17 March, 2015 - 07:46

गुटेन आबेन्ड!

मस्त वीकेंड, वसंतातील सुंदर ऊन, करण्यासारखे काही काम नाही……………आणि या सगळ्यावर मात करणारी सर्दी यासारखी हतबल करणारी गोष्ट नाही! म्हणजे बाहेर सुंदर वातावरण असताना देखील सर्दी सारख्या फालतू कारणामुळे घरात बसायचं. त्यामुळे वीकांत कंटाळवाणा जाणार हे आधीच मनात बांधल होत. पण घर-मालकीण मार्था म्हणाली की ती संध्याकाळी “योडेलिंग” ला जाणार आहे, आणि मी पण ते पाहावं अशी तिची इच्छा होती. असाही घरातच बसणार होतो त्यापेक्षा हे योडेलिंग प्रकरण काय आहे हे तरी पाहावं म्हटलं!

संध्याकाळी ६ च्या सुमाराला मी, मार्था आणि आमचा मित्र हंस-रुवेदी असे तिघे मार्थाच्या गाडीतून निघालो. मावळतीचं ऊन सुद्धा लख्ख होत. इव्हेंट लांब एका खेड्यात होता. पण तिथेपर्यंतचा प्रवास भलताच मोहक. कुरणातून जाणारा बारका रस्ता जयजयवंतीच्या सुरावटी सारखा मुरक्या घेत जाणारा! पु.लं. नी अपुर्वाई मध्ये केलेलं ईंग्लंडचं वर्णन आठवलं! उतरत्या टेकड्यांवर चरणाऱ्या गायी, त्यांच्या गळ्यातील किणकिणणाऱ्या घंटा, त्यांच्यावर राखण करणारे गुराखी आणि त्यांची छोटी गुटगुटीत पोर. मधूनच डोंगराच्या कुशीतून बाहेर येणारी छोटी छोटी स्विस खेडी आणि चर्चचे उठून दिसणारे कळस. चर्चच्या अंगणात नातवंडाबरोबर पोर होऊन खेळणारे आजी-आजोबा. ओढ्यासारख्या दिसणाऱ्या छोट्या नद्या मधूनच खिदळत रस्ता कापत होत्या. आणि या सगळ्याला पार्श्वभूमी म्हणून आल्प्स ची साद देणारी हिमशिखरे आणि वसंताची झालर पांघरलेला निसर्ग! कातरवेळेला झालेलं ते स्वित्झर्लंडच रम्य दर्शन मी कधीही विसरणार नाही! प्रत्यक्ष ध्येयापेक्षा प्रवासातच जास्त सुख हेच खर!

जिथे योडेलिंग होत त्या खेड्याची वस्ती अवघी ५०० . त्यामुळे छोटेखानी कंसर्ट असेल असं वाटलं होत, पण हॉलमध्ये गेलो आणि अवाक झालो! केवढा मोठा मल्टीपर्पज हॉल, आपल्यासारख नव्हे….आपल्याकडे मल्टीपर्पज हॉल म्हणजे जिथे बारश्यापासून सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यापर्यंत कुठलेही कार्यक्रम करता येतील तो चौकोनी ठोकळा! इकडचा हॉल खरच मल्टीपर्पज होता…..एकाच हॉल अनेक प्रकारे वापरता येत होता- सभागृह, नाट्यगृह, जिम, शाळा,…! आणि जर तुम्ही नाट्यगृह म्हणून हॉल वापरत असाल तर तुम्हाला कल्पना पण येणार नाही कि इथे जिम सुद्धा असू शकते. ट्युलिप्स आणि डॅफोडिल्सने सगळा हॉल सजला होता. बाहेर एक वसंत आणि आत एक!

लवकर गेल्यामुळे आम्हाला पुढची जागा मिळाली. बरोब्बर ८ च्या ठोक्याला पडदा वर गेला आणि ३० जणांच्या संचाने योडेलिंग सुरु केले. ५ वर्षाच्या मुलापासून ८० वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्व वयोगटातले देखणे स्त्री-पुरुष! योडेलिंग हा प्रकार आपल्याकडे नाही. किशोर कुमार ने “जिंदगी एक सफर है सुहाना” मध्ये “यीड्लीयी यीड्लीयी यु वू” वगैरे म्हटलंय त्या प्रकारच असतं योडेलिंग! याचा उगम फार पूर्वी आल्प्सच्या छोट्या छोट्या खेड्यामध्ये झाला. चरायला गेलेल्या गाईंना परत बोलाविण्यासाठी योडेल करायचे. आल्प्सच्या दर्याखोर्यात तो भरीव तार-स्वरातला आवाज घुमू लागला की गाईंचे कळप आपापल्या गोठ्यांकडे परतू लागतं. पण यातली खरी मजा मला नंतर मार्थाने सांगितली. योडेलिंग चा उपयोग प्रेमी युगुले संकेत म्हणून करत. म्हणजे विरहाने आतुर झालेला प्रियकर योडेल करू लागला की त्याची प्रेयसी बरोब्बर त्याचा आवाज ओळखून ठरलेल्या जागी संध्याकाळी त्याला भेटायला जात असे! (ज्यांना योडेलिंग येत नव्हते त्यांची गोची!)

सगळ्यात पाहिलं योडेलिंग सुरु केल ते लहान मुलींनी. गालात छोटी सफरचंदे असल्यासारख्या गोबऱ्या लाल गालाच्या सुंदर पऱ्याच त्या! “I don’t want a farmer’s boy”असं गाण होत. मग मला शेतकऱ्याशी लग्न करायला लागलं तर किती कामे करावी लागतील हे हावभाव आणि योडेलिंग सांगत होत्या, मध्येच उड्या मारत होत्या! पण या सगळ्यात अप्रूप म्हणजे ६० वर्षांची त्याची शिक्षिका देखील त्यांच्याहून लहान होऊन उड्या मारत होती. पहिल्याच पराफोर्मंसला दोनदा वन्समोअर!

नंतर एका लहान मुलाचा सोलो होता. तो स्विस अकोर्डीअन वाजवत होता. त्याला धरता येईल असा लहान अकोर्डीअन आणि त्याला साथ द्यायला एक बुजुर्ग कलाकार बासगिटार वाजवत होता. एवढसं पोर डोळे झाकून शांतपणे अकोर्डीअन वाजवत होत. सगळ्या प्रेक्षकांनी त्याला उभे राहून अभिवादन दिलं. पण त्याहून मला कुठली गोष्ट जास्त भावली असेल तर ती म्हणजे गिटारवाल्या कलाकाराने आपल्या हाताने हलकेच त्या पोराच्या डोक्यावर टपली मारली! आपल्या गाण्याला समर्थ वारस मिळाला याचा समाधान त्याच्या डोळ्यात असावं! हे बास गिटार प्रकरण आपल्याकडे नाही. वाजवणाऱ्याएवढीच उंच असणारी ही गिटार खर्जात गाते. हिची लहान बहीण म्हणजे चेलो. आपल्याकडे शुभेंद्र रावांच्या पत्नी सास्किया राव यांनी चेलो शास्त्रीय संगीतात आणला. या जोडगोळीची सितार-चेलो जुगलबंदी प्रसिध्द आहेच!

त्यानंतर तरुण-तरुणीच्या ग्रुपने अनेक पर्फोर्मान्सेस दिले. मंडईतील संभाषणे, आई-वडिलांची मजेदार भांडणे, वसंतातली नृत्ये अशा विविध संकल्पनावर आधारीत योडेलिंग झाले. दोन योडेल्स च्या मध्ये त्यांच्यातलाच एक, निवेदक म्हणून स्टेजवर येऊन मजेदार चुटकुले सांगायचा, चित्रविचित्र हावभाव करून प्रेक्षकांना बसल्या जागी खिळवून ठेवायचा! प्रत्येक पर्फोर्मंस नंतर “नॉखमाल्स” (वन्समोअर) चा गजर! पण मला खरा पर्फोर्मंस आवडला तो दोन बुजुर्ग कलाकारांचा!

एक ७० आणि दुसरा ८० वर्षांचा. एक योडेल करणार होता आणि दुसरा अकोर्डीअनवर साथ करणार होता! मला टेन्शन- कारण त्यांचे सुरकुतलेले गळे लोंबत होते…मधूनच आवाज तुटला तर, आवाज नाहीच लागला तर…पण म्हातार्याने पहिल्याच “यो” मध्ये नाट्यगृहावर कब्जा केला! आपले पंडित भीमसेन जसे पहिल्या “सा” ने सगळा श्रोतृवृंद काबीज करायचे तसच अगदी! पहिल्या योडेल मधून त्याने पहिल्या आणि तिसर्या पिढीताली तफावत अशी काही सांगितली की योडेल संपताना प्रत्येकाच्या डोळ्याला रुमाल लागलेले. टाळ्यांच्या कडकडाटाने नाट्यगृह दणाणून उठले. नंतर याच जोडगोळीने वातावरण हलकफुलक करण्यासाठी प्रेमकहाणीच योडेल सुरु केल. त्यात तरुण तरुणीला भेटण्यासाठी कोणकोणती कारणे शोधतो, तिला कस प्रपोज करतो, मग ती त्याला नाही म्हणते, मग हा बिचारा “टूटा दिल आशिक”, मग बर्याच प्रयत्नांनी ती युवती त्याला होकार देते, मग त्यांचा हनीमून….शेवट बाळाच्या रडण्याच्या सुरातल्या योडेलिंग ने झाला! अप्रतिमच! भावनांच्या एवढ्या छटा फक्त योडेलिंग मधून. म्हातार्याने सगळ्यांना हसवलं, रडवलं, विचार करायला लावलं.

आता शेवटचा पर्फोर्मंस. हे शेवटच गाणे म्हणजे आपल्या “सांग सांग भोलानाथ” सारख सगळ्यांना माहित असणार गाणे असावं. कारण कलाकारानी आवाहन केलं की “प्रेक्षकातील ज्याना ज्याना हे योडेलिंग येत त्यानी रंगमंचावर याव” आणि मंच गच्च भरला. आणि एका सुरात योडेलिंग सुरु झालं. सगळेच भारावून गेले होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटचा पर्फोर्मंस म्हणून कोणी सभागृह सोडून जातेय किवा आवराआवरी करतय असा नाही. सगळे शेवट पर्यंत थांबले. मला आपला सवाई-गंधर्व महोत्सव आठवला. तिकडे बेगम परवीन सुलतानांची “दयानी भवानी” भैरवी सुरु झाली आणि इकडे श्रोत्यांना जायची घाई!

स्वित्झर्लंडच्या त्या कुठल्याशा खेड्यात घालवलेली ती सुंदर संध्याकाळ आयुष्याच्या संध्याकाळी देखील मला आठवेल हे नक्की! आम्ही घरातून निघताना शेजारच्या म्हातारीने आम्हाला “गुटेन आबेन्ड” (शुभ संध्याकाळ) असं विश केल होत. आता त्या म्हातारीने किती मनापासून विश केल ते माहीत नाही पण माझी “आबेन्ड” मात्र “गुटेन” झाली हे खरं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्हो.. किती सुंदर वर्णन केलंयस.. फोटो नसले तरी नजरेसमोर आणून ठेवलीस ती माणसं

वॉव.. योडेलिंग चा उगमाबद्दल वाचून आश्चर्य् मिश्रीत आनंद झाला..

सही Happy

सुंदर.

गालात छोटी सफरचंदे असल्यासारख्या गोबऱ्या लाल गालाच्या सुंदर पऱ्याच त्या! “I don’t want a farmer’s boy”असं गाण होत. मग मला शेतकऱ्याशी लग्न करायला लागलं तर किती कामे करावी लागतील हे हावभाव आणि योडेलिंग सांगत होत्या, मध्येच उड्या मारत होत्या! पण या सगळ्यात अप्रूप म्हणजे ६० वर्षांची त्याची शिक्षिका देखील त्यांच्याहून लहान होऊन उड्या मारत होती. पहिल्याच पराफोर्मंसला दोनदा वन्समोअर!>>>>>>>>>>सो क्युट.

किती सुंदर लिहिलेस.. अगदी प्रत्यक्ष ऐकतोय असे वाटलेय. ( आता भेटलास कि गायला लावणार आहेच तूला ते )

किशोरने, झुमरु मधे पण केलेय. आणि लताने तसेच काहिसे, पडोसन मधे केलेय.

मस्त लिहिलंय.
साऊंड ऑफ म्युझिक मध्ये मुलं लोनली गोठर्ड... वर योडलिंग करतात ते आठवलं.
किशोरदांच्या योडेलिंगची नक्कल करण्याचे खूप प्रयत्न केलेत कॉलेजात, पण त्यांचे स्वरयंत्रच निराळे!

मस्त लिहिलं आहेस. योडेलिंग केवळ किशोरमुळे माहित होतं पण त्याचे असे कार्यक्रम वगैरे असतील असं वाटलं नाही. (आता युट्युब धुंडाळणं आलं)

मनोरंजनाच्या कार्यक्रमावर कुलुचे तितकेच मनोरंजक लिखाण. वृत्तांताचा असा बाज समोर आला म्हणजे वाटू लागते किती नशीबवान आहे आमचा कुलु....ज्याला अभ्यासासमवेत असेही खेड्यातील कार्यक्रम पाहाण्याची संधी मिळते आणि ती तो स्वत: अनुभवतो शिवाय त्याना तितक्याच क्षमतेने शब्दबद्ध करून आमच्यासमोर ठेवतो. लेख संपूच नये असे वाटत राहते.

अमेय यानी केलेला "साऊंड ऑफ म्युझिक" चा उल्लेख अगदी योग्य...मलाही कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग अशाच धर्तीचे वाटतात. शेवटी प्रेक्षकांना आवाहन करून त्यानाही स्टेजवर बोलावून योडलिंग करायला लावून वातावरणाचा आनंद आणखीन वाढविण्याची ती शक्कल मस्तच.

वाह! फार सुरेख! खरंच सुंदर संध्याकाळ! Sound of music मधलं गाणं सोडता yodeling फार ऐकलं नाहीये पण आता ऐकावसं वाटतंय.
एक भा.प्र.! ही गाणी इंग्रजीतून सादर झाली की तुम्हाला स्विस/जर्मन भाषा येते? की yodeling समजून घ्यायला भाषेचं बंधन नाही?

कुलु कित्ती गोड आणि ओघवतं लिहितोस रे. तुझं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत माझ्याकडे. मला काय म्हणायचंय ते नीट नाही सांगता येत.

पण तुझ्याबरोबर मीही ते सर्व अनुभवलं. ग्रेट. ___/\___.

Pages