कारणे शोधून

Submitted by संतोष वाटपाडे on 8 March, 2015 - 05:59

कारणे शोधून अश्रू मी कधी ना ढाळले
वेदना पाहून माझ्या दुःखही ओशाळले..

जन्मभर मी भाकरी संपुर्ण नाही पाहिली
मज भुकेने त्यामुळे आयुष्यभर हेटाळले..

प्रेम करणे हा गुन्हा मी एकदा केला जरी
आठवांनी रोज का सरणापरी मज जाळले..

कोरडा होता खडक छातीत जेव्हा ठेवला
लेकरू पायात तेव्हा नेमके घोटाळले..

टोचले डोळ्यास माघारी तिचे जाणे असे
पण वचन ना वाहण्याचे आसवांनी पाळले..

स्वप्न सरल्यावर तुझे मज झोप नाही लागली
आजवर मी त्यामुळे तर स्वप्न बघणे टाळले..

बांध केसांना नको अडवूस सुर्याला प्रिये
बिंब क्षितिजावर तुझ्या केसांमुळे रेंगाळले..

अंगठी पत्रे तुझी काहीच नाही फ़ेकले
तू दिल्या जखमेसही हृदयात मी सांभाळले..
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोरडा होता खडक छातीत जेव्हा ठेवला
लेकरू पायात तेव्हा नेमके घोटाळले

व्वा. बहुतेक शेर रिवायती वाटले.
सध्यातरी (किमान मायबोलीवर) जदीदची चलती आहे, असे वाटते.

समीर

रिवायती म्हणजे काय कृपया सविस्तर कळेल काय

रिवायती हा शब्द माझा नसून माझा मित्र अनंत ह्याचा आहे.
रिवायतीचा अर्थ पारंपारिक असा आहे. इथे पारंपारिक असा घेणे चुकीचे ठरेल.
मला अभिप्रेत अर्थ नेमका सांगता येणार नाही.
थोडक्यात गझलेत येणारी अतिशोयक्ती (ह्युमर म्हणून नव्हे) (माझी वेदना पाहून दु:ख ओशाळले, जन्मभर मी संपूर्ण भाकरी नाही पाहिली इ.), बनावटी विव्हळता (आठवणींनी रोज सरणापरी जाळले), वर्षानुवर्षे वापरली गेलेले संदर्भ तसेच्या तसे वापरणे (अंगठी पत्रे चा शेर काही हिंदी चित्रपटातील गाण्यांची आठवण करून देतात) अशी रिवायतीची लक्षणे घेता येतील. किमान अभिव्यक्ती वेगळी असणे अपेक्षित होते. खडक हा एक शेर सोडला तर मला संपूर्ण गझलेत त्याचत्या गोष्टी साधारण पध्दतीने सांगितल्याप्रमाणे वाटले.

समीर

इथे पारंपारिक असा घेणे चुकीचे ठरेल.<<हे जाणूनच प्रश्न केला होता
वर्षानुवर्षे वापरली गेलेले संदर्भ तसेच्या तसे वापरणे << सहमत
किमान अभिव्यक्ती वेगळी असणे अपेक्षित होते. << पुन्हा सहमत

प्रश्न मी माझ्यासाठी विचारला नव्हता तर ज्यांच्या गझलेवर हा अभिप्राय आला त्याना मुद्दा कळावा म्हणून विचारला होता
तसेही रिवायती आहेत म्हणून शेर आवडून न घेणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत मामला असतो त्यामुळे मी काही बोलणे व्यर्थ ठरावे
असो

सविस्तर मत दिल्याबद्दल धन्यवाद