मेमरी क्विल्ट अर्थात स्मृती-चौघडी

Submitted by _प्राची_ on 22 February, 2015 - 10:59

मी अमि यांच्या 'जुन्या कपड्यांचे काय करावे' या धाग्यावर मी आधी याबद्दल लिहिले आहे. तिथे खुप जणांना हि कल्पना आवडली म्हणून नवीन धागा काढून ती परत इथे डकवते आहे. अधिक अधिक लोकांपर्यंत हि कल्पना पोचावी म्हणून.

मुळात हि कल्पना माझी नाही. मी नेट वर पाहून हि उचलली आहे.

लेकाचे टि शर्ट नेहमी कामवाल्या बाईंना देते पण नेट वर मेमरी क्विल्ट पाहिल्यावर थोडे टी शर्ट वापरून हे बनवले. मुलगा मोठा होतोय, असे रंगीबेरंगी कपडे कदाचित पुढे वापरणार नाही. हि आठवण रंगीत दिवसांची.
हे मीच बनवलं आहे. मला शिलाई मशीन चालवता येत नाही. म्हणून हाताने शिवले आहे. मी अंदाजाने एक आकार ठरवून पुठ्ठा कापून घेतला आणि त्याच्या मदतीने टि शर्ट चे एका आकाराचे तुकडे कापून घेतले आणि एकमेकांना जोडले. मागे एक जाड चादर लावली आहे. त्याच्या पहिल्या शाळेचा बॅच/खिसा पण लावलाय. फार सुबक असं नाही झालंय काम पण, आठवणी महत्वाच्या.

IMG_0896.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर दिसते आहे. कल्पना चांगली आहे.होजियरी शिवताना त्रास नाही झाला का? कापड ताणले जाते आणी शिवण वेडीवाकडी येते.

तुमच्या सर्वांचे प्रतिसाद वाचून प्रचंड आनंद झालाय. खरच सांगते मी शिवणकाम फारसे करत नाही. भरतकाम, क्रोशा वगैरे पूर्वी आवडीने करायचे आताशा तेही बंदच आहे.
माझी आजी वयाच्या ८० वर्षापर्यन्त हाताने कपडे शिवायची. मशीनची शिवण उसवेल पण माझी नाही असे ठासून सांगायची. आम्ही तिने शिवलेली अंगडी-टोपडी घालूनच लहानचे मोठे झालो. माझ्या लेकाला मात्र ते सुख नाही मिळालं.
तुकडे-तुकडे जोडून केलेली दुपटी तर तिची खासियत होती. त्यात ती भिरभिरे, पोपट, बदक असे काय काय बनवायची. हे शिवताना मनात तिचाच विचार हटकून यायचा. ती असती तर तिने निगुतिने हे शिवून दिलं असतं. कदाचित ती वरून बघत असेल माझ्याकडे म्हणून हे नीट झालं असेल माझ्याकडून.
सगळ्यांचे मनापासुन आभार.