नायजेरियन विचित्र कथा - ५ - चोरी झाली, चोरी झाली

Submitted by दिनेश. on 9 February, 2015 - 15:30

चोरी ही आपण समजतो तितकी वाईट, नायजेरियन मानत नाहीत. म्हणजे माझ्याकडे नव्हतं, तूझ्याकडे होतं, म्हणून मी घेतलं. माझ्याकडे असतं तर तूला दिलं असतं... हे लॉजिक. आता सांगा यात वाईट ते काय ?

आणि तिथे राहणारे भारतीय देखील फारसे मनाला लावून घेत नाही. लेगॉसमधे तूम्ही नव्याने रहायला आलात,
आणि ६ महिन्याच्या आत, जर तूमच्या घरी चोरी झाली नाही.. तर तो लेगॉसमधल्या भारतीयांसाठी चर्चेचा विषय होतो. कदाचित चोरी घडवून आणण्यासाठी काय करायला हवे, याचे सल्लेही दिले जात असतील.

शिवाय नायजेरियातले चोर तसे जंटलमन असतात बरं. चोर्‍या साधारण डिसेंबरच्या आधीच करतात. घरी बायका मूलांना सण साजरा करायचा असतो. काही जुने तर काही नवे घरोबे ( एकाच चोराचे बरं ) असतात. ती मागण्या
करत असतात. आजकाल महागाई केवढी, एकाच्या पगारात कसं भागवायचं... हे सगळे चोर तूम्हाला चोरी
करता करता सांगतातही. अर्थात तूम्ही त्यांच्या कामात ढवळाढवळ केली नाहीत तर. केलीच तर नाईलाजाने त्यांना तूम्हाला चापट मारावी लागते, त्याने तूमच्या दोन चार दाढा हलू, पडू शकतात. तर त्यांना त्यांचे काम
करू देणे हेच शहाणपणाचे. काही चोर तर खायलाही मागतात, तेही द्यावेच.

हे मी लिहितोय त्यात अतिशयोक्ती नाही, बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना हाच सल्ला देतात. कारण घरातील सामानाचा विमा उतरवलेला असतो, आणि त्याची भरपाई मिळतेच. अर्थात हा दावा करताना,
थोडीफार चोरी आपल्याकडूनही होते.. पण ती वाईटच नाही असे एकदा ठरल्यावर..

लेगॉसचे दिवस या पुस्तकातही असे धमाल किस्से आहेत. एकात तर घरातल्या मुलांनीच गाद्या वगैरे फाडायला मदत केली तर दुसर्‍या एका घटनेत, नवर्‍याला हार्ट अटॅक आला, तर डॉक्टरांशी संपर्क होईपर्यंत चोराने त्याची
देखभाल करत बायकोला धीरच दिला..

मी एका चोरीची कथा लिहितोय, पण त्या पुर्वी नायजेरियन लोकांच्या आणखी एका क्षमतेबद्दल लिहायला हवे.
आयत्या वेळच्या कहाण्या रचण्यात त्यांचा हात सॉरी तोंड कुणी धरू शकणार नाही.

एक उदाहरणच देतो. आमच्या ऑफिसने नव्याने बॅजेस दिले होते. कामावर येताना तो लावून यावा, असा साधा नियम. लावला नाही तर दंड पण करायचा होता. माझ्याच खातातल्या एकाने सोमवारी येताना बॅज लावला
नव्हता. अर्थातच मी हटकले..

तर त्याची सुरवात, ओह बॅज ? ( मी काय भलतंच विचारलं असा चेहरा ) ओह व्हॉट टू टेल यू ओगा ( हे त्यांचे
अत्यंत आवडते वाक्य. या वेळी ते उजवा हात डोक्यावर नेऊन चुटकी वाजवतात. मग आपण समजायचे कि आता एक सुरस कथा ऐकायला मिळणार. )

तर त्याची कथा ( बहुतेक आयत्यावेळी रचलेली.. ) तूला माहितीय मी शनिवारी घरी जातो. तर तसाच गेलो.
मला वेळेवर ओकाडा ( मोटारसायकल टॅक्सी ) नाही मिळाली. मग माझी बस चुकली. दुसरी पकडली ती
माझ्या गावाला जात नाही. मग मला ३ तास चालत जावे लागले. आमच्या गावी लाईट नाही ना रे.

अरे बॅजचे सांगत होतास ना, माझा एक क्षीण प्रयत्न.

तेच तर सांगतोय ना ओगा ( त्याचे चालू ) आणि घरी गेलो तर काय, माझी आई वारली होती ना रे.

माझ्या तोंडातून नकळत, सॉरी बाहेर पडले. तर त्याची कथा पुढे चालू.. मग माझ्या बाबाला बोलवायला नको का ?
तर तो गेला होता, दुसर्‍या गावाला. तर मी तसाच चालत निघालो. दोन तासानी बाबाला घेऊन आलो.
तोवर एक बोकड कापून, माझ्या बहिणीने शिजवला होता. मग गावातले सगळे जेवायला आले ( गावजेवण
घातल्याशिवाय मयत उचलता येत नाही. ) मग खुप उशीर झाला ना रे. तर रात्रीच आम्ही तिला नेले.
अंधारात खड्डा खणला. आम्ही तिला खड्ड्यात ठेवली, प्रेयर्स झाल्या. आमच्या गावातल्या सगळ्यांनी छान भाषण केले..

अरे बॅज रे ( मी परत प्रयत्न करून बघितला )

तर मी हा असा खड्ड्यात उतरलो. माझ्या भावाने अशी माझी आई माझ्या हातात दिली. ( हे सगळे साभिनय )
मग मी असाच वर आलो. मग आम्ही सगळ्यांनी माती लोटली. मग आम्ही तसेच परत घरी यायला निघालो.
आणि माझ्या लक्षात आले की बॅज नाही. बहुतेक खड्ड्यात पडला असणार, तेव्हाच माझ्या मनात विचार आला,
कि आता सोमवारी गेल्या गेल्या माझा ओगा मला विचारणार.

आता माझा पुरता मामा झाला होता.. पण तेवढ्यात मला आठवले, मी म्हणालो अरे मागच्याच महिन्यात आई वारली, म्हणून लवकर गेला होतास ना ? क्षणभर अगदी क्षणभरच तो गडबडला... ओगा, ती काय माझी रियल आई नाही, ती माझ्या बहिणीची आई.. परवा गेली ती माझी खरी आई. द ओन्ली मदर आय हॅड, होम अँड अब्रॉड ( म्हणजे काय ? ) तर अश्या या कहाण्या. नो वंडर, नायजेरिआत टेलिफिल्म्सचे अमाप उत्पादन होते. आमच्याकडच्या चॅनेल्सवर पण त्या दाखवतात. ( माय मदर्स हेड, ओह माय सिस्टर.. अश्या नावाच्या असतात त्या. )

तर आता एका खास चोरीबद्दल..

आमच्या कंपनीत सोडीयम सिलिकेट चे उत्पादन होत असे. ( हे शाम्पू, डीटर्जंट मधे वापरतात. ) याचा मुख्य कच्चा माल म्हणजे रेती. ती नायजेरियात भरपूर. आणि दुय्यम कच्चा माल सोडा अ‍ॅश. तो मात्र आयात करावा
लागत असे. तो चीनमधून येत असे. आणि त्याला अनेक उद्योगात मागणी असे.

असा माल आयात करणे सोपे होते पण लेगॉसच्या पोर्टमधून तो सोडवून आणणे महाकठीण असे. आधी ती बोट किनार्‍याला लागून, सर्व सोपस्कार करून, काय ते जोडतोड / चायपानी नव्हे माय क्रिसमस करून माल बाहेर काढायचा म्हणजे काय खायची गोष्ट नसे. त्यामूळे असा माल जर आयता मिळत असेल तर तिथल्या कंपन्या
त्यासाठी जास्त पैसे मोजायला तयार असत.

तर हा माल येत असे, एक टन वजनाच्या बॅगांमधून. एका ट्रेलरवर दोन्ही बाजूला ५ अशा दहा बॅगा असत.
पोर्टमधून हा माल आमच्याकडे एक वाहतूक कंत्राटदार आणत असे. या बेंगावर काही नंबर वगैरे नसे त्यामूळे
आम्ही तारीख व ट्रेलरचा नंबर यावरून कंट्रोल ठेवत असू.

असा एखादा ट्रक आला, कि आमच्या सिक्यूरिटी चा त्याकडच्या डिलिव्हरी नोटवर स्टँप लागत असे. मग तो ट्रेलर आमच्याच वे ब्रिजवर जाऊन वजन करत असे आणि स्टोअरकिपर तो ताब्यात घेत असे. त्याची त्या कागदावर सही असे. ( तो भारतीय होता आणि हिंदीत सही करत असे. ) वेब्रिजची जाता येताची स्लीप त्यावर जोडली जात असे. आणि त्याची एक प्रत ट्रेलरला परत दिली जात असे. हा माल उतरवून घ्यायला वेळ लागत असे. त्यामूळे आमच्या गेटबाहेर ट्रेलर्सची रांग लागलेली असे. पण एका ठराविक वेळेनंतर आम्ही ट्रेलर्स आत घेत नसू कारण सर्वांना वेळेवर घरी जाणे पण आवश्यक असे. त्यामूळे ते ट्रेलर्स रात्रभर तिथेच थांबत. ( या धंद्यातला कुणीही याची ग्वाही देईल. असा एका जागी उभा राहिलेला ट्रेलर म्हणजे पांढरा हत्ती. ट्रेलर कसा चालता, बरा. )

असे काही आठवडे चालत असे. सर्व माल आल्यावर ट्रान्सपोर्टरचे बिल आमच्याकडे तपासायला येत असे.
तर असे बिल आल्यावर गोंधळाला सुरवात झाली. आमच्या स्टोअर किपरने जो आकडा सांगितला होता त्यापेक्षा
दहा टनाने ते बिल जास्त होते. मी म्हणत होतो कि सर्व माल आला नाही, तर मला तो ट्रान्स्पोर्टर सांगू लागला
कि बिल ऑफ लॅडींगमधे जेवढा माल लिहिलाय, तेवढा मी पोहोचवलाय.

आता सर्व नीट चेक करणे भाग होते. त्याला ७६ डिलिव्हरी चलान्स जोडलेली होती. ती सेकंड कॉपी असल्याने
तेवढी क्लीयर नव्हती. शिवाय तेच तेच ट्रेलर्स परत परत आले होते. सर्वांचे वजन सारखेच म्हणजे दहा टन होते.
मी एका मदतनीसाला त्या कामाला लावले. सिक्यूरिटी रजिस्टर, स्टॉअर रेकॉर्ड असे घेऊन त्याला बसवले.
त्याने एक डीलिव्हरी चलान शोधून काढले, जे आमच्याकडे आलेच नव्हते.

मी ते चलान बघितले तर त्यावर आमच्या कंपनीचा स्टँप होता, पण स्टोअर किपरची सही नव्हती कि वेब्रिज स्लीप नव्हती. तारीख शनिवारची होती. ( त्या स्टँपवर तारीख असे. )

मी सिक्यूरिटी ऑफिसरला बोलावले. त्याला विचारले कि या ट्रेलरची एंट्री तूझ्या रजिस्टरमधे का नाही ? तर त्याने सरळ सांगितले, एंट्री नाही म्हणजे माल आलाच नाही. शिवाय स्टोअर किपरची सही नाही..
मी त्या ट्रान्स्पपोर्ट वाल्याला तसे सांगितले कि मी हे एक चलान तर कमी करणार, शिवाय त्या १० टन मालाची किम्मतही. पण तो खमका निघाला, तो म्हणाला ट्रेलरच्या ड्रायव्हरला घेऊन येतो.. पण तो दुसर्‍या गावी गेला होता. ४ दिवसा आधी येणे शक्य नव्हते.

मला थोडा संशय आला, मी सिक्यूरिटीचा स्टँप घेऊन आलो. त्या चलनावरचा स्टँप तर खरा वाटत होता.
सिक्यूरिटी वाला अजून आपल्या शब्दावर ठाम होता. एवढेही म्हणाला कि हा स्टँपच बनावट असणार.

मी तो स्टँप एका कागदावर मारला. असे स्टँप असणारे तीन कागद स्कॅन केले. पिकासामधे ब्लो अप करून त्याच्या प्रिंट्स काढल्या. आणि माझ्या ऑफिसमधल्या ४ जणांनी ते बारीक डोळ्यांनी कंपेअर करून बघितले.
वापरलेल्या स्टँपवर कालांतराने काही खुणा पडतात. नवा असेल तर त्या नसतात. आम्हाला अशा किमान ३ खुणा सापडल्या. तरीही तो सिक्यूरिटी ऑफिसर काही कबूल करत नव्हता. आता तर गेटमधून कुणीतरी हात
घालून, स्टँप घेतला असेल असेही बोलू लागला.

शेवटी त्या ट्रेलरचा ड्रायव्हर माझ्या ऑफिसमधे आला.. आणि त्याने सांगितलेले हे असे.

तो जरा रात्री उशीराच गेटवर पोहोचला होता. त्याने आत घ्या, आत घ्या असा धोसरा लावला. पण आत घेणे शक्यच नव्हते ( मुख्य गेटची चावीच माझ्याकडे असे. ) तर सिक्यूरिटीने त्याला सांगितले ( तो मुक्कामाला तिथेच असे ) कि आता कंपनीत जागा नाही तर दुसर्‍या गोडाऊनमधे माल न्यायचा आहे. आता ट्रेलरवाला जरा
टरकला, कारण त्याला पैसे आमच्या कंपनीपर्यतचेच मिळणार होते. त्याने तसे सांगितल्यावर सिक्यूरिटीवाल्याने त्याला दुसर्‍या गोडाऊनपर्यंतचे पैसे रोख देऊ केले ( अर्थात तिथे माल नेला तरच )
तो तयार झाला. ( कारण वरचे पैसे त्याला मिळाले असते. नायजेरियात डिझेल अगदी स्वस्त, त्यामूळे जादा डिझेलचा खर्च किरकोळ.. ) ते निघणार तेवढ्यात ट्रेलरवाल्याला आठवले कि स्टँप आवश्यक आहे. त्यामूळे
तोही मारण्यात आला.

नवीन गोडाऊन दाखवायला सिक्यूरिटी वाल्याने एक गार्ड दिला. बर्‍याच आडवाटी गेल्यावर पुढे ट्रेलरला
जायला रस्ताच नव्हता. पण तिथे ४ छोटे ट्रक्स आधीच उभे होते. एक क्रेनही होती. माल झपाट्याने छोट्या
ट्रकमधे भरला गेला. ट्रेलरवाला मोकळा.. आणि १० टन माल "दुसर्‍या" गोडाऊनमधे..

सिक्यूरिटी ऑफिसर सध्या कारागृहात आहे....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ एम जी.. !!! टू मच

द ओन्ली मदर आय हॅड, होम अँड अब्रॉड... Rofl

खूप्पच इंटरेस्टिंग गोष्टीयेत.. प्रत्येक गोष्टीला एक प्रकारच्या थराराची किनार आहे Happy

Lol

छान.

भन्नाट किस्स्से आहेत!... Happy
'काय वाट्टेल ते' ह्या सदरात मोडणारी लोकं आहेत... त्या सगळ्या प्रसंगांमधे तुम्हाला हसावं का रडावं कळलं नसेल नै!... मती गुंग होणे, अवाक होणे हे अनुभव नियमित येत असतील तुम्हाला!!

आईशप्पथ! अगदी धीराने चोरी करतायत राव!
चोरी ही आपण समजतो तितकी वाईट, नायजेरियन मानत नाहीत. म्हणजे माझ्याकडे नव्हतं, तूझ्याकडे होतं, म्हणून मी घेतलं. माझ्याकडे असतं तर तूला दिलं असतं>>>>
आणि तिथे राहणारे भारतीय देखील फारसे मनाला लावून घेत नाही. लेगॉसमधे तूम्ही नव्याने रहायला आलात,
आणि ६ महिन्याच्या आत, जर तूमच्या घरी चोरी झाली नाही.. तर तो लेगॉसमधल्या भारतीयांसाठी चर्चेचा विषय होतो. कदाचित चोरी घडवून आणण्यासाठी काय करायला हवे, याचे सल्लेही दिले जात असतील.>>>
Rofl Rofl Rofl मजाच आहे.

दिनेश दा,
तुमच्या कथा, तुमचे लिखाण , अनुभव ,प्रवास वर्णन आणि हो .....तुमच्या रेसिपी
कसली कसली म्हणून तारीफ करावी......!

यावरून लक्षात येते की चांगल्या संस्कारांचे भारतात पहिल्यापासुन केवढे तरी थोर प्रयत्न झाले होते.
समाज सुव्यवस्थित रहावा यासाठी नियम, कायदे हे आवश्यक आहेतच, पण त्याहुन आवश्यक आहे ती म्हणजे गैरकृत्ये न करण्याची सुसंस्कारित मानसिकता.
दुर्दैव असे की दृकश्राव्य माध्यमातुन झालेला / होत असलेले कुसंस्कार आणि बाह्य संस्कृतींच्या आक्रमणाचा परिणाम एवढा जबरदस्त होत आहे की चोरी बीरी तर सोडाच अन्य कित्त्येक गैरप्रकार (पक्षी गलिच्छ) इ. ना प्रतिष्ठा मिळावी म्हणुन तथाकथित सुधारणावादी लोक जो काही आटापिटा करत आहेत, ते पाहून हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. Sad

मस्त अनुभव आहेत.

चोरी म्हणजे तिकडे फारसा सिरियस बिझनेस नाही तर मग त्या सेक्यूरिटी अधिकार्‍याला तुरुंगवास व्हायला नको होते ना. आणि तुरुंगवास होत असेल तर मग चोरी इतकी लाईटली कशी काय घेतली जाते?

दिनेशदा,

काहितरी मिसींग आहे.

हतोडावाला.. चोर सापडला तर शिक्षा करणार ना !
बहुतेक केसेस मधे पोलिसांना चोर सापडतच नाही. इथे ती व्यक्ती आमच्याच ताब्यात होती. तोही पळून गेला असता तर ?

कायदा चोरीला सिरियसलीच घेतो... फक्त चोर समोर आणला तरच !