निरवानिरव

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

रोजची दुपारची.. रात्रीची
निरवानिरव करता करता
एक दिवस डळमळतं
आयुष्य काठावर येतं

आणि सुरु होते
शेवटची निरवानिरव
जड वाटतात तेंव्हा
मोठ्या जिकरीने
साठवलेल्या ..
संग्रह केलेल्या
गाठोड्यात बांधून ठेवलेल्या
ठेवणीतल्या
वस्तू..
गजबजलेल्या संसाराचं
रिक्त..रिकामं चित्रं!

निर्जीव वाटायला लागतात
त्यावेळेसचे ते सर्व क्षण अन क्षण
काहीच उरलेलं नसतं
उरलं असतं
एक न पेलणार ओझं
प्रत्येक आग्रहातला अट्टाहास
हास्यास्पद होऊन जातो!

जिवाला जड झालेल्या वस्तू
आणि जड झालेला जिव
दोन्हीच्या त्यागातंच
आयुष्याची निरवानिरव होऊन जाते!

- बी

प्रकार: 

बी.
सुंदर कविता.

प्रत्येक आग्रहातला अट्टाहास
हास्यास्पद होऊन जातो!>>>

हे छान लिहिलंत.

मला तर अश्या सुंदर कविता लिहिणारे बी आणि तसले धागे काढणारे बी एकच की वेगवेगळे असा प्रश्नं पडतो.

मस्त !

Aavadali.

आवडली Happy

मला तर अश्या सुंदर कविता लिहिणारे बी आणि तसले धागे काढणारे बी एकच की वेगवेगळे असा प्रश्नं पडतो.>> +१

बी, छान कविता.. पण या शब्दासोबतच एक उदासी आहे, बिलासखानी सारखी. ती नाही आवडत मला.

बी या कवितेतून जी हुरहुर लागते त्याने फार कासावीस व्हायला होतं. प्रत्येकाचा हातून असं लिखाण नेहमीच होणार असतं असं नाही. पण जेव्हा केव्हा ते होईल तोवर धीर धरायला काय हरकत आहे?

वेका धन्यवाद पण शेवटच्या वाक्यातील अर्थ नाही कळला. मी अधीर होऊन कविता करतो असे म्हणायचे आहे का तुला Happy

धन्यवाद सुष्टी. मी तसा बर्‍यापैकी आनंदीच असतो Happy

बी मला खूप आवडली कविता.
आयुष्य जसं जसं पुढे जातं तसं तसं त्याचा एक वेगळाच पैलू दिसायला लागतो आणि कळतं की हे जे काही आहे मिळवणं आणि गमवणं ते सगळं क्षणभंगूर आहे.
ही समज मनात घोळत असते पण शब्दबद्ध करता येत नाही. तुला छान जमलंय ते करायला. मी फार रिलेट केली. Happy

Pages