मी तुझी कल्पना झालो ..

Submitted by सुशांत खुरसाले on 27 January, 2015 - 22:56

ना भूमिका इथे काही, का तरी हालता झालो
हा रंगमंच कोणाचा ज्याचा मी पडदा झालो

तू माझे वास्तव होणे, हे शक्य कधी नसल्याने
मी तुझ्या कल्पना केल्या,मी तुझी कल्पना झालो

जे दुखणे कोणालाही दुनियेत जाहले नव्हते
त्या एका दुखण्यावरचा मी सुन्न उतारा झालो

फुटणारच नव्हत्या केव्हा या एकांताला वाटा
मी केली गर्दी माझी , माझाच घोळका झालो

मी अजूनही फडफडतो तू विस्मरल्या वार्यांनी
मी तुझे शब्द लिहिलेला काळाचा तुकडा झालो

तितक्याला तितके उरले जगण्याचे प्रश्न निरंतर
ती तितकी अवघड झाली,जितका मी सोपा झालो

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू माझे वास्तव होणे, हे शक्य कधी नसल्याने
मी तुझ्या कल्पना केल्या,मी तुझी कल्पना झालो ......वा वा

फुटणारच नव्हत्या केव्हा या एकांताला वाटा
मी केली गर्दी माझी , माझाच घोळका झालो....... क्या बात !!

तितक्याला तितके उरले जगण्याचे प्रश्न निरंतर
ती तितकी अवघड झाली,जितका मी सोपा झालो....... बहोत बढिया !!

व्वा व्वा. गझल सुंदर झाली आहे.
फार आवडली.

ना भूमिका इथे काही, का तरी हालता झालो
हा रंगमंच कोणाचा ज्याचा मी पडदा झालो

फुटणारच नव्हत्या केव्हा या एकांताला वाटा
मी केली गर्दी माझी , माझाच घोळका झालो

तितक्याला तितके उरले जगण्याचे प्रश्न निरंतर
ती तितकी अवघड झाली,जितका मी सोपा झालो <<<

वा वा वा! सुंदर शेर!

(अवांतर - गेल्या काही दिवसांपासून काहीकाहींच्या गझलेत क्लिष्ट प्रतिमा घेतल्या जात आहेत असे दिसत आहे. हा नवीन प्रकार समजायला जरा अवघड जाते आहे. हे फक्त तुमच्या ह्या गझलेवरून म्हणत नाही आहे. तसे अजून कोणतेच मत बनवलेले नाही) Happy

गेल्या काही दिवसांपासून काहीकाहींच्या गझलेत क्लिष्ट प्रतिमा घेतल्या जात आहेत असे दिसत आहे. हा नवीन प्रकार समजायला जरा अवघड जाते आहे.

ह्यात घेतले जाणे स्वाभाविकपणे होत असेल तर उत्तम. स्वतःला एक कवी म्हणून शोधण्याच्या प्रयत्नात तथाकथित क्लिष्टपणा अपरिहार्यपणे येतो. (काही वर्षांपूर्वी आपण काय लिहीत होतो आणि आता काय हे पाहिले की समजून येते.) खरेतर हे आवश्यक आहे. गेल्यापिढीने काय आणि कसे लिहिले हे उगाळण्यापेक्षा (मी मला आणि भूषणला गेल्या पिढीत सामील करीत आहे) आपण काय आणि कसे लिहू शकतो हा विचार अधिकाधिक नव्या पिढीने करायला हवा. दुष्यन्त कुमारचे आपल्या कवितेविषयीचे एक लक्षात ठेवण्याजोगे विधान आहे: मला जाणिव आहे की मी गालिब होऊ शकत नाही पण मला विश्वास आहे की जे गालिबने अनुभवले त्याच तीव्रतेने मीही अनुभवले आहे. दुष्यंत कुमार दुष्यंत कुमार नसता जर त्याने गालिब व्हायचा प्रयत्न केला असता. तसे पाहता दुष्यंत कुमारने त्याच्या ४२ वर्षांच्या आयुष्यात जे केले ते मोठमोठ्या (तेव्हाच्या) उर्दू गझलकारांना साधले नाही. असो, अवांतर फार झाले.

ब-याच दिवसांनी एक सुंदर, उत्तम वैचारिक बैठक असलेली गझल वाचनात आली.
धन्यवाद.

समीर

छान

मी चर्चेत भाग घेणे कुणास रुचले नाही तर क्षमस्व पण मला प्रश्न पडले आहेत .

१)....हे समजले नाही की ...दुश्यंत कुमारांचा किस्सा चांगला आहे पण तो इथे कसा समर्पक ठरतो
२) आणि अजून एक की हा क्लिष्टपणा अपरिहार्य असतो का . क्लिष्टपणाच नसलाच तर काय होते
३) खुरसालेंच्या ह्या रचनेत जी क्लिष्टता जाणवत असावी ती कसल्या प्रकारची आहे म्हणजे प्रतिमांची /प्रतीकांची की भाषेची शब्दांची अर्थांची फिरकी आहे ती

विस्ताराने समजले तर शिकायला मिळेल असे वाटून विचारण्याची हिम्मत करत आहे कृगैन Happy

१)....हे समजले नाही की ...दुश्यंत कुमारांचा किस्सा चांगला आहे पण तो इथे कसा समर्पक ठरतो
२) आणि अजून एक की हा क्लिष्टपणा अपरिहार्य असतोच का . क्लिष्टपणाच नसलाच तर काय होते
३) खुरसालेंच्या ह्या रचनेत जी क्लिष्टता जाणवत असावी ती कसल्या प्रकारची आहे म्हणजे प्रतिमांची /प्रतीकांची की भाषेची शब्दांची अर्थांची फिरकी आहे ती

१. मूळ मुद्दा क्लिष्टपणाचा होता. गप्पांच्या ओघात दुष्यंतकुमारचा किस्सा आला. त्याचे मूळ गेल्या काही दिवसांच्यापासून मध्ये आहे.
२. क्लिष्टपणा अपरिहार्य असतो हे समजून घेण्याआधी वरील संदर्भात किष्टपणा म्हणजे नेमके काय हे समजून घेणे आवश्यक आहे. गुंतागुंतीच्या गोष्टी सुलभरित्या मांडता येणे ह्या अगोदरची एखादी पायरी म्हणता येईल फार तर (हे वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर नाहीय पण जगात अनेक बरोबर गोष्टी ढोबळपणेच सांगाव्या लागतात) . सुलभरित्या मांडता येणे म्हणजे अर्थाचे एकेक पदर उलगडून, ट्रिव्हियल करून नव्हे. (उदा. पाहायचे असेल तर ओशो ने कबीरावर केलेले भाष्य पहाल). हा क्लिष्टपणा सुध्दा कवितेचे गुणविशेष होऊ शकतो. तथाकथित सोपेपणा, ज्याच्याकडे बहुतेकांचा कल असतो, येता-येता येतो. त्यामागे सराव, वाचन, विचार, अनुभव असे बरेच घटक ठरू शकतात. अपवाद हे जगातल्या कुठल्याही गोष्टीला असतात.
३. मला स्वतःला सुशांतची रचना गुंतागुंतीची पण अतिशय स्वाभाविक वाटत आहे.
अर्थात मी माझ्या चष्म्यातून पाहत आहे.

तूर्तास इतकेच. मी सांगतो तेच बरोबर असे काही नसते. तेव्हा प्रतिसाद अर्धवट वाचून, घाईघाईने, कुठल्याही निष्कर्षाला येऊ नये. आणि ह्याला अक्कल नाही असे शेरे देऊ नये. वैभव, तुमचे अगोदर प्रतिसाद लक्षात ठेवता नाइलाजाने मला हे सांगावे लागत आहे. मी सर्वज्ञ नाही ना तुम्ही. तेव्हा झाकली मूठ सव्वालाखाची.

समीर चव्हाण

बघा मी सांगूनही तुम्ही गैरसमज करून घेतलातच माझा कुणाच्याही कोणत्याही वाक्यावर रोख /आक्षेप नव्हताच मुळी ! मला खरोखरच ते प्रश्न पडलेले मला नेमकी गुंतागुंत कुठे आहे हे समजले नाही आणि अपरिहार्यता आणि दुश्यंत कुमारांचा संदर्भ ह्या गोष्टीतून चर्चा नेमकी कोणत्या अंगाने पुढे जातेय तेही समजेना म्हणून मी विचारण्याचे धाडस केले
तसे मी माझ्या प्रतिसादात सुरवातीलाच म्हणालेलोही ....मी चर्चेत भाग घेणे कुणास रुचले नाही तर क्षमस्व
Sad

वैवकु,

मी थोड्या वेळाने तुमच्या प्रश्नांचे यथाशक्ती उत्तर देईन. आत्ता जरा कामात!

वैवकु,

समीरच्या प्रतिसादावर तुम्ही जे विचारले आहेत त्यावर माझी मते:

============================================

>>>१)....हे समजले नाही की ...दुश्यंत कुमारांचा किस्सा चांगला आहे पण तो इथे कसा समर्पक ठरतो<<<

ते जनरल भाष्य आहे. कोणा एकाला उद्देशून नव्हे. गालिब व दुष्यंतकुमार ह्यांच्या गुणवत्तेतील कल्पित तफावतीबद्दलही ते भाष्य नव्हे. त्यात इतकेच म्हणायचे आहे की प्रत्येकजण वेगळे लिहितो व स्वतःतील वेगळेपण काय ह्याची जाण ठेवून त्याबरहुकुम लिहिले की ते आपोआप नैसर्गीक व चांगले होते. इतरांच्या गुणवत्तेचा, वैशिष्ट्यांचा विचार करून लिहिले की ते नीट पूर्णपणे आपले होत नाही आणि नीट इतरांसारखे!

>>>२) आणि अजून एक की हा क्लिष्टपणा अपरिहार्य असतोच का . क्लिष्टपणाच नसलाच तर काय होते<<<

क्लिष्टपणा अपरिहार्य नसतो. मुळात समीरने 'तथाकथित क्लिष्टपणा' असा शब्दप्रयोग केलेला आहे. गझलेत किंवा कोणत्याही शाब्दिक कलाकृतीत क्लिष्टपणा असणे / नसणे हे सापेक्ष आहे. माझ्या प्रतिसादात मी क्लिष्ट प्रतिमा असा शब्दप्रयोग केलेला आहे व ते एक वेगळेच मत आहे. त्यावर समीरने भाष्य केलेले दिसत नाही. क्लिष्टपणा अपरिहार्य तर नसतोच पण तो आल्यासारखे आपले आपल्याला वाटले तर खरे तर ते टाळायला बघायला हवे.

>>>३) खुरसालेंच्या ह्या रचनेत जी क्लिष्टता जाणवत असावी ती कसल्या प्रकारची आहे म्हणजे प्रतिमांची /प्रतीकांची की भाषेची शब्दांची अर्थांची फिरकी आहे ती<<<

खुरसालेंच्या ह्या गझलेत काही ठिकाणी अर्थ स्वच्छपणे आल्यासारखा मला जाणवला नाही. म्हणून मी तसे म्हणालो. हे फक्त ही गझल वाचून बनवलेले मत नाही. परवाच फेसबूकवरही एक गझल वाचनात आली. ती बहुधा सतीश दराडेंची गझल होती. त्यातही काही प्रतिमा, काही उल्लेख असे होते की तेथे मी गुंगण्यापेक्षा अडखळलो अधिक! हे कदाचित माझे लिमिटेशनही असेल. पण आजकाल असे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत व ते माझ्यासाठी नवे आहे. नवे काही घडूच नये असे मुळीच नाही. फक्त ते मला समजायला अजून थोडा वेळ लागेल असे वाटते.

सुशांत खुरसालेंच्या ह्या गझलेत मला काय जाणवले ते पुढील प्रतिसादात लिहितो.

समीर, वैवकुची शंका निव्वळ कुतुहलजन्य शंका असून कृपया चर्चेत व्यक्तीगत रोख तूही आणू नकोस अशी विनंती करतो. Happy

सुशांत,

ह्या गझलेवरील एकुण चर्चा रंगात येत आहे हे पाहून माझी मते अधिक विस्तृतपणे लिहिण्याचे धाडस करतो. आपण राग आला तरी तसे दाखवायचा नाहीत हा विश्वास असल्यामुळेच ही आगळीक! Happy

ना भूमिका इथे काही, का तरी हालता झालो
हा रंगमंच कोणाचा ज्याचा मी पडदा झालो<<<

ह्या शेरात भूमिका हा शब्द नाटकातील पात्राला उद्देशून असणार असे वाटले. जर तसे असेल तर पुढच्या ओळीत कवी स्वतःला पात्राऐवजी पडदा का म्हणत आहे ते समजले नाही. ह्याउलट पहिल्या ओळीत 'हालता झालो' हे पडद्यासाठी समर्पक आहे हे समजले पण मग रंगमंच 'कोणाचा' ह्यातील 'कोणाचा' ह्या शब्दाचा अर्थ बोध झाला नाही. म्हणजे असे, की रंगमंच कोणाचाही असला तरी काय बिघडणार आहे? बेसिकली हा शेर मला स्पष्ट वाटला नाही. येथे कवीने स्वतःकडे कोणती भूमिका घेऊन अज्ञाताला नेमके काय विचारले आहे ते लक्षात आले नाही. 'आ'कारान्त स्वरकाफियासारखी मोठी तडजोड घेऊनही असे का व्हावे?

तू माझे वास्तव होणे, हे शक्य कधी नसल्याने
मी तुझ्या कल्पना केल्या,मी तुझी कल्पना झालो

ह्या शेरातील बेसिक खयाल मस्तच आहे. परवाच फेसबूकवर वाचला होता हा शेर! बहुधा लाईकही केला होता. पण ह्या शेरातील शेवटचा पंचवीस टक्के भाग 'मी तुझी कल्पना झालो' पटला नाही. तो काव्यमय आहे हे मान्य आहे. 'मै तुम्हारा तसव्वुर हूं' प्रमाणे ते वाटत आहे हे खरे आहे. पण पहिल्या ७५% भागात एका विशिष्ट परिस्थितीवर कवीने 'स्वतःहून' एक तोडगा काढलेला आहे तर ह्या शेवटच्या २५% भागात तो असे गृहीत धरत आहे की (ती जी कोण आहे) तिने त्याला स्वतःची कल्पना बनवलेले आहे किंवा कवी स्वतःहून तिची कल्पना बनलेला आहे. असे आपण कोणाचीतरी कल्पना कसे बनू शकू?

टीप - शेरातील शब्दरचना अशी असावी की दुसरी ओळ ही पहिल्या ओळीचे एक्स्टेंशन वाटू नये. ह्या शेराच्या शेवटी 'नसल्याने' असा शब्द असल्यामुळे पुढील ओळ वाचल्यावर 'आपण एक संपूर्ण विधान वाचल्यासारखे' वाटत आहे. उदाहरणार्थ, त्या ऐवजी 'हे शक्य कदापी नव्हते / हे शक्य कधीही नव्हते' असे काहीतरी घेतल्यास तेथे ती ओळ परीपूर्ण होऊन संपल्यासारखे वाटेल व दुसर्‍या ओळीबद्दलची उत्सुकता वाढेल.

जे दुखणे कोणालाही दुनियेत जाहले नव्हते
त्या एका दुखण्यावरचा मी सुन्न उतारा झालो<<<

मी माझा पहिला प्रतिसाद देण्याचे कारण खरे तर हा शेर आहे. 'सुन्न उतारा' म्हणजे काय ते लक्षात आले नाही. उतारा ह्या शब्दाला 'सुन्न' हे विशेषण का आले आहे? तसेच दुसर्‍या ओळीत आलेला 'एका' हा शब्द रिप्लेसेबल आहे का? 'एका' ह्या शब्दामुळे काही खास अर्थ निघत आहे की वरच्या ओळीत 'जे दुखणे' म्हंटले आहे त्याच्याशी फक्त लिंक लागावी म्हणून तो शब्द घेतला गेला आहे? अर्थात, 'सुन्न उतारा झालो' हे म्हणायला मस्त वाटत आहे.

फुटणारच नव्हत्या केव्हा या एकांताला वाटा
मी केली गर्दी माझी , माझाच घोळका झालो

दुसरी ओळ मस्त आहे. गर्दी आणि घोळका ह्यात थोडे रिपिटेशन आले आहे, गर्दीऐवजी काही वेगळे सुचले असते का असे वाटून गेले. हा शेर मला आवडला. पण ह्या शेरातही 'एकांताला वाटा फुटणे' म्हणजे काय ते क्लीअर झाले नाही (मला). पैश्याला वाटा फुटतात असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. तसेच एकांताबाबत म्हणायचे असेल (म्हणजे त्या वाटांनी एकांत पसार व्हावा असे म्हणायचे असेल ) असे समजून माझ्यापुरता मी अर्थ लावला. ह्या शेरात 'केव्हा' हा शब्द 'कधीही' ह्या अर्थी वापरला गेला आहे. असे का? ह्या वृत्तात 'कधीही . कधीच' हे शब्द सहज बसतील की? एका ठिकाणी एकदम गुंगवणारी प्रतिमा आणि दुसर्‍या ठिकाणी असे भगदाड हे पटत नाही. कृपया राग मानू नयेत. (हे असले फक्त दुसर्‍याच्या गझलेची चीरफाड करतानाच आम्हाला सुचते, स्वतःच्या गझलेबाबत बोंबच असते).

मी अजूनही फडफडतो तू विस्मरल्या वार्यांनी
मी तुझे शब्द लिहिलेला काळाचा तुकडा झालो<<<

पहिल्या ओळीतील प्रतिमा काही केल्या भिडत नाही आहे. 'तू विस्मरल्या वार्‍यांनी मी अजूनही फडफडतो' हे समजायला जरा जड जात आहे. 'विस्मरल्या वार्‍यांनी' ह्यात 'वारे विसरणे' आहे की 'विस्मृतीचे वारे' असे म्हणायचे आहे? पुन्हा दुसरी ओळ पार वेगळीच वाटली. पण दुसरी ओळ स्वतंत्ररीत्या उत्तम आहे. त्यात 'तुझे शब्द' म्हणजे काय हे लक्षात आले नाही मात्र! म्हणजे तिने लिहिलेले की तिच्याबाबत लिहिलेले? 'तुझे नांव' असेही चालून गेले असते का, की शब्द रिप्लेसेबल नाही आहे?

तितक्याला तितके उरले जगण्याचे प्रश्न निरंतर
ती तितकी अवघड झाली,जितका मी सोपा झालो <<< पुन्हा दुसरी ओळ मस्तच! स्वतंत्ररीत्या ही ओळ फारच उत्तम! पहिली ओळ समजली नाही पण फील छान आला. 'तितक्याला तितके' म्हणजे काय?

आशा आहे की आपण ह्या त्रस्त करणार्‍या प्रतिसादावर निखळ चर्चेच्या उद्देशाने उत्तर द्याल. राग आल्यास आधीच क्षमा मागतो.

सर्वप्रथम सर्वांचे मनःपूर्वक आभार . Happy

चर्चेबद्दलही आभार. तिच्यातून मलाही शिकायला मिळत आहे .

मुळात या गझलेचे मिसरे असेच सुचल्याने ते तसेच्या तसे मांडण्याचा मोह झाला.
तरीपण फक्त विरोधाभास मांडून किंवा केवळ शब्दांच्या फिरक्या घेऊन मी ह्या गझलेत काही मांडण्याचा प्रयत्न करतोय की काय, असं काहीसं मलाही वाटू लागलेलं.
तरीही मी माझ्या परीनं आणि मला जे सुसह्य वाटेल अशा पद्धतीनं सहजता आणण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढे जरूर करीन .

क्लिष्टपणाबाबत म्हणाल तर
>>ह्यात घेतले जाणे स्वाभाविकपणे होत असेल तर
उत्तम. स्वतःला एक कवी म्हणून
शोधण्याच्या प्रयत्नात तथाकथित
क्लिष्टपणा अपरिहार्यपणे येतो.<< या समीरजींच्या मताशी सहमत आहे.
अजून विचार आणि परिपक्वतेची मलाही आवश्यकता आहेच . Happy

त्रस्त करणारा प्रतिसाद वगैरे नाही हो बेफिजी.
किंबहुना या प्रतिसादामुळे मला माझ्या गझलेविषयी काही नवे प्रश्न पडलेत आणि म्हणूनच लिहितांना मला अजून खोल आणि सुसंगत विचार करण्याची गरज आहे,हे जाणवू लागले आहे.
असो, जमेल तितके स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो .

ना भूमिका इथे काही का तरी हालता झालो
हा रंगमंच कोणाचा ज्याचा मी पडदा झालो

नाटकात पात्रांच्या मानाने पडद्याची भूमिका नगण्य म्हणावी अशीच. म्हणजे फक्त सुरूवात आणि शेवट .तरीही त्याची दखल घेतली जाईलच असे नाही. हा असा कोणाचा (दुनियेचा,देवाचा) रंगमंच आहे की जिथे मला पडद्यासारखी नगण्य भूमिका भेटूनही मी आपलं काम (हलण्याचं) आनंदानं करतोय ?
[थोडक्यात नगण्यता वाट्याला येऊनही त्याबाबत मन तक्रार का करत नाही,असा सूर आहे. किंवा यापेक्षाही आपण काही बरं घडवू शकतो का ,अशी शोधाशोधही. ]
हा शेर इतरही खूप वेगळ्या अर्थाने (मला अभिप्रेत नसलेल्या) कदाचित व्यक्तिपरत्वे उलगडू शकतो, असंही वाटतंय.

तू माझे वास्तव होणे,हे शक्य कधी नसल्याने
मी तुझ्या कल्पना केल्या,मी तुझी कल्पना झालो

मी तुझी कल्पना झालो यात 'शेवटी मी तुझ्या कल्पनेतला कुणी xyz होऊन गेलो' असंच म्हणायचं होतं.
तू माझ्या वास्तवात येणं हे शक्य नसल्याचं समजल्यावर मी तुझ्या कल्पना करत बसलो आणि
तू मला 'मी अस्तित्वात आहे' हे विसरून गेल्याप्रमाणे एखाद्या कल्पनेसारखा दर्जा देऊन बसलीस.
(नसल्याने बाबत वर म्हटल्याप्रमाणे प्रश्न पडलाय आणि काही तोडगा सुचल्यास बघतो.)

जे दुखणे कोणालाही दुनियेत जाहले नव्हते
त्या एका दुखण्यावरचा मी सुन्न उतारा झालो

'सुन्न उतारा' असं लिहिण्यामागचं प्रयोजन म्हणजे मुळात हा रोगच दुनियेत कोणाला झालेला नाही. त्यामुळे त्यावरचा उतारा कुणी का शोधेल? (आपल्याकडे कोणी रोगी फिरकतच नाही, हे पाहून उताराच सुन्न झालेला आहे. Wink )
[कधीकधी वाटतं की एखादा प्रश्न फक्त आपल्यालाच पडलाय की काय आणि शोधून त्याचं उत्तर सापडल्यासारखं वाटलं तरी ते केवळ आपल्यापुरतंच. ते जाणून घेण्याची इच्छाच कोणी दाखवत नाही कारण कोणाला तो प्रश्नच पडलेला नाही. या सगळ्या प्रकारानं सुन्न झालेलं मन..असा काहीसा वेगळा अर्थ]
'एका' हे एकमेव रोग अशा अर्थानं.

फुटणारच नव्हत्या केव्हा या एकांताला वाटा
मी गर्दी केली माझी माझाच घोळका झालो

कुठल्यातरी मार्गाने या एकांताला वाट फुटावी. त्याच्या extremeness मधून जरातरी बाहेर पडता यावं.
आणि मग असं बाहेर पडताना मला माझीच निरनिराळी रूपं दिसू लागतात. त्यांची गर्दी भोवताली होऊ लागते.
(गर्दी आणि घोळका या रिपिटेशनबाबत-
मी माझ्याभवती जमलो,माझाच घोळका झालो
असं काही होऊ शकेल बहुधा.)

मी अजूनही फडफडतो तू विस्मरल्या वार्यांनी
मी तुझे शब्द लिहिलेला काळाचा तुकडा झालो

मी मुळातच तुझे शब्द (तुझ्याविषयीचे शब्द) लिहिलेला काळाचा तुकडा झालोय. जो तुकडा आता तू कधीच विसरून गेलेल्या (प्रेमाच्या) वार्याने फडफडतो आहे .

तितक्याला तितके उरले जगण्याचे प्रश्न निरंतर
ती तितकी अवघड झाली, जितका मी सोपा झालो

जेव्हा तिला समजणं सोपं होतं तेव्हा मी स्वतःसाठी अवघड होऊन बसलो होतो आणि जेव्हा मी स्वतःला सोपं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेमकी ती अवघड होऊन बसली. म्हणजे एकंदर दोघांच्या जगण्यातले प्रश्न तितक्याला तितकेच उरले तर !
असं काहीसं.

चर्चेबद्दल खरोखरच आभारी आहे कारण मला काय म्हणायचं होतं, हे मला हे सगळं लिहितांना पुन्हा नव्याने उलगडत गेलं.
काही मुद्दे कदाचित राहिलेत त्यांच्यावर जसं सुचेल तसं लिहिण्याचा प्रयत्न करीनच.

======================
बायदवे, ह्या माझ्या प्रतिसादातली कंसांची संख्या पाहून मला माझा एक जुना शेर सहज आठवला. --

सगळे मला सांगायचे ते सांगुनी झाले तरी
कंसातल्या वाक्यांमुळे माझी कहाणी गोठली.. Wink
======================

पुनश्च आभार सर्वांचे.
धन्यवाद . Happy

ना भूमिका इथे काही, का तरी हालता झालो
हा रंगमंच कोणाचा ज्याचा मी पडदा झालो

मला हा शेर का आवडला, मला काय अर्थ लागला हे सांगायचा प्रयत्न करतो.
शेर एका पात्राबद्दलचा आहे, ज्याला धड भूमिका नसताना ते ह्या दुनियेच्या निर्मात्यामुळे ओढले गेले.
त्याला स्वतःला खबर नाही की त्याला धक्का देणारे आहे तरी कोण. त्याला माहित तेवढे रंगमंच.
पडद्याचे अस्तित्व नाट्याच्या सुरुवातीला आणि शेवटाला असते. तसेच त्याचे जन्म-मृत्यूपुरते असावे (भूमिका नसणे म्हणजे रंगमंचावर निरुद्देश्य असणेच नव्हे का). हालता आणि पडदा ह्यामुळे दोन्ही ओळी लिंक होत असल्यातरी दोन्हीचा संदर्भ वेगळा आहे. शेर गुंतागुंतीचा आहे पण विचारांती अर्थ स्पष्ट आहे.

आत्तातरी इतकेच.
धन्यवाद.

>>>कंसातल्या वाक्यांमुळे माझी कहाणी गोठली<<<

अत्युत्तम मिसरा!

पण सर्वत्र तो लागू होतो की नाही हे मी उद्या बघेन!

Happy

धन्यवाद समीरजी , तुम्हाला लागलेला अर्थही छान वाटला.
धन्यवाद बेफिजी.
पण सर्वत्र तो लागू होतो की नाही हे
मी उद्या बघेन! << हो नक्की. Happy

कंसातल्या वाक्यांमुळे माझी कहाणी गोठली<<<< वा
उतार्‍याच्या शेरातल्या खयालाचं चौकटी कंसातलं स्पष्टीकरण मस्तच
पडद्याच्या शेरावरचा पडदा जेमतेम उठला आहे असे वाटले
कल्पनेच्या शेरातून मला अपेक्षा होती तसा अर्थ नाही आहे हे लक्षात आले
वाटा चा शेर त्या खालच्या आपल्याच पहिल्या वाक्यातून नवीन प्रकारे मिसरा सुचला अर्थात हा माझ्या सरावाचा भाग म्हणून मी तो करून पाहिला बरका > कुठल्याश्या मार्गे फुटल्या ह्या एकांताला वाटा <<<

बाकी बेफीजींचा प्रतिसाद खूप काही शिकवणारा समीरजींनी लावलेला अर्थही मस्तच तोही आवडला
माझे काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्यासारखे वाटत आहेत मीच त्यांच्यावर विचार केला आहे थोडा ..जमेल तसा... काही सांगावेसे वाटते पण ....नको
मला पद्धतशीरपणे बोलता येत नाही म्हणून मला कमीपणा सोसावा लागतो नेहमी .

असो

'हे कसे काय' ह्या प्रश्नाचे उत्तर थोडेसे 'हे म्हणजे काय' ह्या प्रश्नाच्या उत्तरासारखे मिळत आहे. परवाही जयदीप ह्यांच्या गझलेवरील चर्चेत असेच झाल्याचे स्मरते.

असो!

समर्पक आणि चपखल शब्दांच्या योजनेत सर्वांना गुरूस्थानी असणार्‍या भटसाहेबांना वंदन करून चर्चा संपवू. Happy

'हे कसे काय' ह्या प्रश्नाचे उत्तर थोडेसे 'हे म्हणजे काय' ह्या प्रश्नाच्या उत्तरासारखे मिळत आहे. परवाही जयदीप ह्यांच्या गझलेवरील चर्चेत असेच झाल्याचे स्मरते.

खालील प्रतिसादावरून हे कसे काय असा प्रश्न वाटला नाही भूषण.
हे कसे काय आपण विचारतो जेव्हा शेर समजलेला असतो.
तुझ्या प्रतिसादावरून तसे वाटले नाही (उदा. रंगमंच 'कोणाचा' ह्यातील 'कोणाचा' ह्या शब्दाचा अर्थ बोध झाला नाही)
शेर स्पष्ट झाला नाही म्हणजे हे म्हणजे काय, असेच नव्हे का ?

ह्या शेरात भूमिका हा शब्द नाटकातील पात्राला उद्देशून असणार असे वाटले. जर तसे असेल तर पुढच्या ओळीत कवी स्वतःला पात्राऐवजी पडदा का म्हणत आहे ते समजले नाही. ह्याउलट पहिल्या ओळीत 'हालता झालो' हे पडद्यासाठी समर्पक आहे हे समजले पण मग रंगमंच 'कोणाचा' ह्यातील 'कोणाचा' ह्या शब्दाचा अर्थ बोध झाला नाही. म्हणजे असे, की रंगमंच कोणाचाही असला तरी काय बिघडणार आहे? बेसिकली हा शेर मला स्पष्ट वाटला नाही. येथे कवीने स्वतःकडे कोणती भूमिका घेऊन अज्ञाताला नेमके काय विचारले आहे ते लक्षात आले नाही. 'आ'कारान्त स्वरकाफियासारखी मोठी तडजोड घेऊनही असे का व्हावे?

असो, शेर आकलनसुलभ म्हणजे चांगला हे खरे नव्हे. चांगले शेर पुन्हापुन्हा वाचावे लागतात, थांबून कधीकधी रेंगाळून. ज्या शेरात वाचकाला विचार करायला वाव राहत नाही ते बहुधा रिकामे घडे असतात.

शेर आकलनसुलभ म्हणजे चांगला हे खरे नव्हे <<< विचारात पाडणारी ओळ
ह्यातून... "शेर आकलनसुलभ म्हणजे वाईट शेर हे खरे आहे " असाही अर्थ निघू पाहतो
"शेर अकलनसुलभ असणे हेच केवळ चांगल्या शेराचे आणि तेही एकमात्र लक्षण ठरू शकत नाही" असे विस्तृत वाक्य हवे Happy

'हे कसे काय' ह्या प्रश्नाचे उत्तर थोडेसे 'हे म्हणजे काय' ह्या प्रश्नाच्या उत्तरासारखे मिळत आहे.<<< ह्या बेफीजींच्या वाक्यावरून मलाही जरासे आश्चर्यचकित व्हायला झाले खरे पण मी विचार केल्यावर मला उमजले की....

हे असे का आहे असा प्रश्न विचारू पाहिला असता हे असे असे आहे असे स्पष्टीकरण दिले जात आहे (उत्तर नव्हेच !!) असे त्याना म्हणायचे आहे अर्थात......

'जे आहे ते कसे आहे' ह्याचे आकलन झालेनंतर प्रश्नकर्त्याने 'हे असे आहे ते ठीक आहे पण हे असे का आहे' असे विचारले असावे

मी माझी झाकली मूठ उघडायचा प्रयत्न केला कृपया गैरसमज नसावा
पुन्हा एकदा चर्चेत भाग घेण्याची गुस्ताखी केल्याबद्दल माफी असावी

ज्या शेरात वाचकाला विचार करायला वाव राहत नाही ते बहुधा रिकामे घडे असतात.<<<हास्यास्पद विधान !

बहुधा ह्या पीएच्डी होल्डर प्राध्यापक महाशयाना आपल्या बुद्धीमत्तेचा गर्व झाला आहे ह्यांच्यात दडलेल्या कवीने ह्यांना सांगायला हवे की शायरी दिलका मामला है साहब दिमाग का नही (( जारा रागात लिहिले गेले अहे समजून घेतले जाईल अशी अपेक्षा आहे ))

आणि एक बाब की शेर वाचल्यावर ऐकल्यावर त्यांच्यावर विचार करावासा वाटला पाहिजे निदान तितकेतरी ते रसिकमनोप्रवेशसुलभ असायला हवेत किमान काव्यशास्त्रीय आभूशणांनी सजवलेले तरी गेलाबाजार शब्दातून आकृष्ट करणारे तरी

कही शेरांवर जरा थांबूया असेही लोकाना वाटत नाही इतके ते शेर सप्पक असतात बेचव व निरस पद्धतीने उकडलेले आणि आणि तितक्याच अकलात्मक पद्धतीने ताटात वाढलेले असतात ....जरी त्यांचे आशय विषय अत्युच्य प्रतीचे काहीतरी चांगले शिकवणारे विचारात पाडणारे आणि गझलियभरेही असतात मग तेही वायाच गेल्यासारख्च बनतात असे मला वाटते

कस्धीकधी शेरातून एकाच प्रकारचा अर्थ जास्त ठळकपणेनिच्घत असतो दुसर्‍याप्रकारचा अर्थ लावत बसावे लागणार असते अश्यावेळी अनेक दा वाचक जे हाती लागेल ते घेत घेत पुढे जात राहतात त्याच्यावरच तात्पुरतेतरी समाधानी असतात त्याना पुढे जाण्याची घाई असते कदाचित पुढचा शेर / गझल वाचायची त्यातून मिळाअरी नशा अनुभवायची घाई हेही कारण असेल काही प्रापंचीक स्वरूपाची घाईही असेल पण असो ..असे होते मात्र

शेर आकलनसुलभ म्हणजे चांगला हे खरे नव्हे. चांगले शेर पुन्हापुन्हा वाचावे लागतात, , इति समीरजी ! >>>>>>>
समीरजींच्या या वाक्याला मी विनाशर्त पाठींबा देतो.
ज्या शेरात वाचकाला विचार करायला वाव राहत नाही ते बहुधा रिकामे घडे असतात.इति समीरजी >>>>>>>
समीरजींच्या या वाक्यात मी थोडा बदल करतो
"'ज्या शेरात वाचकाला विचार करायला वाव राहत नाही ते रिकामे घडे नसले तरी त्यातील पाण्याने.खर्‍या रसिक मनाची तहान भागेलच असे नाही".'
टीप* या चर्चेतून खरेच काही चांगले निष्पन्न होत असेल , दिशा मिळत असेल तर माझ्या प्रतिक्रियेविषयी कोणी गैरसमज करून घेतला तरी चालेल मला

पटील साहेब घाई करताय मते देण्याची आधी चांगले शेर करा काही मग अवलोकन करा स्वतःचे मग बोला !

तुमचा बिनशर्त पाठिंबा म्हणजे कोल्ह्याला आंबट झालेली द्राक्षे नाहीत ना हे तपासून पहाल काय पाटील साहेब

वैभवः

पहिले शांत व्हा. आकाश डोक्यावर पडल्याप्रमाणे बिथरून नका जाऊ.
मला वाटतं मी काय बोलत आहे आपण ते किमान समजून घेतलं तरी खूप आहे आपल्यासाठी.
राहिले आपल्या मतांचे मूल्यमापन तर काही लिहीत आहे.

शेर आकलनसुलभ म्हणजे चांगला हे खरे नव्हे <<< विचारात पाडणारी ओळ
ह्यातून... "शेर आकलनसुलभ म्हणजे वाईट शेर हे खरे आहे " असा अर्थ निघू पाहतो

आपले logic गंडलेले आहे: the statement [(a) implies (b)] is false does not mean that (a) implies not (b).It means that (a) may or may not imply (b). तेव्हा असाही अर्थ निघू पाहतो, असे लिहावे.

चांगले शेर पुन्हापुन्हा वाचावे लागतात, थांबून कधीकधी रेंगाळून. ज्या शेरात वाचकाला विचार करायला वाव राहत नाही ते बहुधा रिकामे घडे असतात.<<<हास्यास्पद विधान !

आपण प्रतिसाद नीट वाचत नाही. वर केलेले विधान नाही तर माझे मत आहे. कुणाचे मत कुणाला विनोद वाटू शकते. हे सांगायची आवश्यकता वाटणे निश्चितच हास्यास्पद आहे.

बहुधा ह्या पीएच्डी होल्डर प्राध्यापक महाशयाना आपल्या बुद्धीमत्तेचा गर्व झाला आहे ह्यांच्यात दडलेल्या कवीने ह्यांना सांगायला हवे की शायरी दिलका मामला है साहब दिमाग का नही

वैयक्तिक गोष्टी मधे कश्याला आणाव्यात मला हे समजत नाही. मी प्रोफेसर आहे का शिपाई, इथे मी जे मत देतो त्यात फरक काय पडतो. माझी पात्रता आणि माझे मत ह्याच्यांत कोरिलेशन काय ?
समजा मी सुमार गझलकार आहे. ह्याचा अर्थ मी माझे मत देऊ शकत नाही. कमाल आहे तुमची.
चांगले शेर लिहा आणि मग बोला, ही बदमाशी नाही तर काय आहे. रामनाथ सुमन हा काय महान गझलकार आहे ? त्याला जितका गालिब समजलाय तितका माझ्यापाहण्यात तरी कुणालाही नाही.
मुद्देसूद आणि विचारपूर्वक बोलावे.
घडीघडीला प्रतिसाद बदलणे, अस्थिर होणे, बिथरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण नाही तर काय.
जीभ दिली म्हणून रेटू नये माणसाने.
तसेही माझा प्रतिसाद भूषणला आहे. मी आणि भूषण एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतोय.
आमच्यात अनेक वादविवाद झालेत. त्याला वाईट वाटलं तर तो लिहीलच.
आपण मधे लुडबुड करायची गरज काय ?

समीर चव्हाण

does not mean that <<<येस सर Happy मी तरी कुठ म्हटले मी इट मीन्स दॅट ओन्ली म्हणून मी केवळ म्हटले की असा अर्थ निघू पाहतो म्हणून पण असाही अर्थ निघू पाहतो हे जास्त योग्य आहे
धन्यवाद
बाकी आपला हा प्रतिसाद लिहिणे चालू होते तेव्हा त्याच वेळी मी माझ्या प्रतिसादात एडिशन्स करत होतो आता आपण माझा तो प्रतिसाद पुन्हा वाचला असेल अशी अपेक्षा

Pages