पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ३ - योक्सीची राणी लक्ष्मीबाई

Submitted by सावली on 19 January, 2015 - 04:19

२९ डिसेंबर २०१३ - योक्सीची राणी लक्ष्मीबाई

प्रवासात असताना माझी झोप तशी पहाटे लवकरच मोडते. त्यामुळे भल्या पहाटे जाग आली, बाहेर किंचित तांबडं फुटलं असावं असं वाटलं, पण उठून पडदा उघडून कोण बघेल? . थंडीमुळे दुलईतून बाहेर यावेसे वाटत नव्हते. रात्री केव्हातरी मधेच उठुन मी ती निखारयाची शेगडी किचनमध्ये नेऊन ठेवली होती, बहुधा खोलीत कार्बन मोनोक्साईड जमेल या भितीने असावे. काही वेळाने उठले आणि माझं आवरायला घेतलं. गरम पाणी मिळण्याची शक्यता वाटत नव्हती त्यामुळे आंघोळीला बुट्टीच होती. बर्फासारख्या गार पाण्याने ब्रश केलं, हातपाय धुतले. कपडे बदलले की झाले फ्रेश! तोपर्यंत घरातले इतरही उठले होते.

बाहेर लख्ख उजाडून सोनेरी किरणं पसरली होती. आता या सकाळच्या प्रकाशात हे घर फ़ारच सुंदर दिसत होते. सफरचंदी गालांची चिमुकली काका आणि मेबानकिरीही उठून इकडे तिकडे पळत होते. बाकीचे लोक आटपे पर्यंत मी या दोघांच्या मागे फिरून त्यांचे फोटो काढत होते. त्यांना एकाच वेळी लाज वाटत होती, मज्जाही वाटत होती आणि माझ्या कॅमेरात काय दिसतंय याची उत्सुकताही होती. थोड्याच वेळा वाफ़ाळता लाल चहा प्यायलो, राईस केक्स खाल्ले. आणि या कुटुंबाचे, त्यांच्या सुंदर घरासमोर एक ग्रुप फोटो सेशन केले. आता इथून पुढे सगळे टप्पे कामाचे असणार होते. या घराला आणि कुटुंबाला टाटा करून आम्ही निघालो योक्सी या खेड्याकडे. 'हमकल्ला' आज आमच्याबरोबर असणार होता.


डावीकडची 'काका' आणि उजवीकडचा 'मेबानकिरी'. मधल्याच नाव सांगितलच नाही


या तिघांबरोबर त्यांची मोठी बहिण। ही चक्क एक दुकान सांभाळते म्हणे!


सुंदर घर आणि कुटुंब

योक्सी हे गाव मुठलाँग च्या पुढे काही किमी अंतरावर, फार तर अर्धा तास लागला असेल पोहोचायला. पण जातानाचा रस्ता फार सुरेख वळण वळणांचा होता. बाजूच्या झाडाच्या फांद्यातून दिसणारी सकाळची तिरपी सोनेरी किरणं, अतिशय स्वच्छ हवा आणि गारवा. अगदी फ्रेश होऊन गेलो. योक्सी गावात रस्त्याच्या दुतर्फा थोडीफार घरं दिसत होती. एक छोटेसे दुकानही दिसले. पोचल्या पोचल्या तिथल्या बायका आमच्याशी बोलायला आल्या. म्हणजे भाषेचा अडसर तसा होताच पण आशिष मदतीला होते. शिवाय काही जणींना मोडकं तोडकं हिन्दीही येत होतं. त्यातल्याच एक होत्या जेसिमा सुचियाङ. यांना भेटायला आम्ही इथवर आलो होतो. बुटक्याशा, गोल हसर्या चेहर्याच्या जेसिमाकडे पाहिल्यावर ही स्त्री किती समाजसेवा करत असेल याचा अंदाज येणं कठीण आहे.

जेसीमा सुचियाङ


किचन मधली तयारी

गेल्या गेल्या आधी आम्हाला जेसिमाच्या घरचा पाहूणचार झाला. लाल चहा आणि एक काबुली चणे वगैरे घातलेली भाजी. ती छोट्या वाट्यतुन दिली गेली. इथे आम्ही बिनधास्त त्यांच्या किचनमध्ये शिरून किचन मध्ये काम करणाऱ्या बायकांचे फोटो काढले. मग चहा पिता पिता जेसिमाशी गप्पा मारल्या आणि त्यातून त्यांच्याबद्दल बरंच काही जाणून घेता आलं.

त्यांच्या या छोट्याशा खेड्यात अतिशय गरीब परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव होता, शाळेसारख्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या . असे असतानाही जेसिमा यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. त्यांनी स्वत:चे शालेय शिक्षण दुसऱ्या गावात राहून इतरांच्या घरातली कामे करून पूर्ण केले. त्यानंतर स्वत:च्या भावंडांनाही शिकवले. त्यांची एक बहिण आता महाराष्ट्रात शालेय शिक्षण घेत आहे. तेवढ्यावरच न थांबता आपल्या गावातली शाळेची गरज ओळखुन तिथे जेसिमा यांनी शाळा आणि रात्रशाळा सुरु केली आहे. आताच्या जुन्या शाळेची इमारत पुरेशी पडत नाही हे जाणवल्यावर नवीन इमारत उभारण्याचे काम सुरु केले आहे. त्या स्वत: आणि शाळेतल्या इतर शिक्षिका अतिशय आत्मियतेने मुलांना शिकवतात.

आम्ही गेलो त्या काळात खरतर शाळेला सुट्टी असते. पण खास आम्ही येणार म्हणुन जेसिमाने गावातल्या मुलांना युनिफोर्म घालून शाळेत बोलावले होते. या घरांपासून गाडीने थोडं पुढे गेल्यावर तीन चार मिनीटात शाळा आली. शाळा म्हणजे काय तर छोट्या छोट्या दोन चार खोल्या असलेली एक बैठी इमारत आणि त्याच्या बाजूलाच लाकडाच्या फळ्यांनी उभारलेली लॉग हाऊस सारखी एक खोली. आमचा आजचा वर्ग या खोलीतच भरणार होता. लाकडाची खोली असली तरी फळ्यांमध्ये फटी होत्या. बाहेरच्या गोठवणार्या थंडीत किंवा मेघालयातल्या कोसळनाऱ्या पावसात मुले कशी बसत असतील असे वाटुन गेले. आज मात्र मुलांसाठी मजेचाच दिवस होता. शाळेत इतके आमच्यासारखे चित्रविचित्र पाहुणे आले आहेत म्हटल्यावर त्यांना मजा येणारच. मुलांनी गाणी म्हणून दाखवली, इतर थोडा अभ्यास केला आणि आम्ही या वर्गाचे फोटो काढले. बाहेर येऊन पाहिलं तर ही गर्दी जमली होती. सगळ्या बचत गटातल्या बायका, मुलांच्या आया बाहेर बसून मजा बघत होते. बहुधा खूप दिवसांनी गावात काहीतरी वेगळं घडत असावं.

मेघालयातल्या सगळ्या गावात मातृसत्ताक पद्धती असली तरिही मुली शिक्षण न घेता लवकर लग्न करतात आणी लहान वयातच घर, संसार, मुलेबाळे या चक्रात अडकतात. त्यातुनच दारिद्र्यही वाढत रहातं. याला आळा घालायचा असेल तर शिक्षणाबरोबरच या स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या रहायला हव्या होत्या. त्यामुळे गावातल्या स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जेसिमा यांनी बचतगट स्थापन केले. या बचतगटामार्फत हळदीची शेती आणि व्यवसाय, कापड दुकान इत्यादी व्यवसाय सुरु करून यशस्वीपणे चालवत आहेत. मघाशी बघितलेलं ते कापड दुकान या बचत गटाचेच होते. आम्ही पुन्हा एकदा त्या दुकानात गेलो, तिथले फोटो घेतले. मग हळदीची शेती बघायला गेलो. हळदीच शेत खरतर जरा दूर आहे आणि तिथली हळद आधीच काढली होती. आम्हाला दाखवायला म्हणुन घरामागच्या तुकड्यावरची हळद तेवढी ठेवली होती. आम्ही तिथे पोचलो तर बायका भराभरा कुदळी वगैरे मारून जमिनीतून हळद वर काढण्यात गुंतल्या होत्या.


बचत गटाचे कापड दुकान


हळदीची शेती

इथल्या हळदीत कुराकोमीन नावाच्या द्रव्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. त्यामुळे इथल्या हळदीला मागणीही भरपूर आहे. हे कुरकोमीन औषधे आणि कॉस्मेटीक्स बनवण्यासाठी उपयोगी येते. पण इथून कमी भावात हळद विकत घेऊन त्यातून उत्तम प्रकारचे कुरकोमीन काढुन कंपन्या स्वत: फायदा मिळवतात हे आता इथल्या लोकांच्या लक्षात यायला लागले आहे त्यामुळे इथेच कुरकोमीन काढायची किंवा त्याचे प्रमाण मोजायची प्रोसेस सुरू करण्याबद्दल ते जागरूक होत आहेत.

त्यानंतर जेसिमा यांनी बचत गटाची नेहेमीची सभा घेतली. हे सगळे आटपेपर्यंत दुपार होऊन गेली होती. मग जेसिमाच्याच घरी बसून तिथल्या इतर लोकांबरोबर जेवलो. वाफाळता भात , वरण, मिक्स भाज्या आणि बटाट्याचे काप. साधारण कालसारखाच मेन्यु पण प्रत्येक घराची चव मात्र न्यारीच.

जेवण आटपून निघताना जेसिमा बोलता बोलता म्हणाल्या की त्यांना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारीत एक सिरियल चालू आहे ती फार आवडते. झाशीच्या राणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना काम करायचे आहे . त्यांचा 'तरुणांच्या हाती भविष्य ' असण्यावर खूप विश्वास आहे. जर आजच्या तरुण पिढीला योग्य प्रकारे शिकवलं, चांगले संस्कार केले तर ही पिढी आपल्या समाजाचा नक्की उद्धार करेल असे त्यांना वाटते आणि त्यासाठी त्या स्वत:ही प्रयत्न करत आहेतच.

या योक्सीच्या राणी लक्ष्मीबाईला वंदन करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या मुक्कामाच्या दिशेने, म्हणजे जोवाईच्या दिशेने. जाताना पुन्हा ज्या रस्त्याने आलो होतो तिथूनच परत जायचे होते. काल येताना एका कुटुंबाने आम्हाला भेटायचे आणि चहाचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडे थोडावेळ थांबलो. त्या बाईंच्या कोळशाच्या खाणी आहेत ! बाजारात दुकानंही आहेत. बाई स्वत: या सगळ्यावर देखरेख करतात आणि गावात त्यांची जरब आहे असे कळले. त्यांना इंग्रजी हिन्दी फारसे येत नाही मात्र परदेशात फिरायचे असे ठरवून मस्तपैकी फिरून आल्या आहेत, त्या फिरतीचे फोटोही आम्हाला दाखवले गेले.


कोळश्याच्या खाणीच्या मालकिणबाई

पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरु झाला. आम्ही त्या वळणावळणांच्या रस्त्याने जोवाईत पोचायला पाच वाजून गेले , आणि अंधार होत आला. हे गाव खूप सुंदर आहे असे ऐकले होते पण संध्याकाळी फारसे काही दिसत नव्हते. गावातले रस्ते मात्र चढ उताराचे आणि अतिशय अरुंद आहेत. गोविंदजीनी एका अवघड अशा अरुंद वळणावर पहिल्याच फटक्यात गाडी बाहेर काढली आणि संजयने त्यांना लगेच एक कौतुकाची थाप दिली!

इथे आम्हाला आमंत्रण होते इथल्या एका श्रीमंत आणि प्रतिष्ठीत घरातून. रिभालांग आणि हर्क्युलस यांचे घर बाहेरून पहाताक्षणीच हरखून जावे इतके सुंदर होते. आतही अगदी विचारपूर्वक केलेली लाकडाची उंची सजावट लक्ष वेधून घेत होती. हे उमदे आणि हसरे कुटुंब आमच्या स्वागताला हजर होते. स्वागत अर्थातच लाल चहा घेऊन झाले. एव्हाना संघमित्रा कोरा चहा पिउन कंटाळली होती पण करते काय? चहा शिवाय तर राहू शकत नाही! देखण्या रिभा ने आम्हाला सगळे घर फिरून दाखवले. आणि मग किचन मध्ये गेलो. नीटनेटक्या स्वच्छ किचन मध्ये मदतनीसांबरोबर काम करत ती आमच्याशी गप्पा मारत होती. त्यांची आणखी एक नातेवाईक, जी मुंबईत रहायला असायची ती ही आली होती त्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या. वेदिकाचे लक्ष घराच्या इंटेरियरकडे तर संघमित्राची आवड किचन मध्ये. मधेच आम्हाला त्यांच्या लग्नाचे अल्बम आणि इतर अनेक फोटो दाखवले. खरतर हा फोटो बघायचा कार्यक्रम जरा कंटाळवाणाच होतो. यजमानांना त्याच्या फोटोबद्दल कमालीचे कौतुक असते , त्याबद्दल अनेक गोष्टी सांगायच्या असतात पण आपण बघताना आपली त्याच्याशी नाळ जुळत नाही. हे फोटो वगैरे बघून झाल्यावर बर्याच वेळाने जेवण तयार झाले. आज रीभाने त्यांच्या बगिच्यामधून ताज्या ताज्या खुडून आणलेल्या भाज्यांचे रंगीबेरंगी आणि सुंदर सलाड केले होते. आणखी ही एक दोन असे वेगळे पदार्थ होते. बाकी वरण भात आणि इतर भाज्या हा मेनू तसा सारखा असला तरी पुन्हा इथली चव मात्र वेगळी होती. शिवाय सजावट इतकी सुरेख की त्यामुळेच जेवावेसे वाटेल. सलाडची चव अप्रतिम होती! इथे कुणाकडेही जेवणात किंवा इतरही प्रसंगी सहसा गोड पदार्थ नसतोच. चहातच काही साखर असेल ती. जेवून पुन्हा एक गप्पांचा फड जमला पण थोड्या वेळाने आम्हाला उठावेच लागले कारण दुसर्या दिवशीचे कार्यक्रम आणि प्रवास समोर होता.

आज जोवाईतला मुक्काम इन्स्पेक्शन बंगलो मध्ये होता. तिथे पोचलो तर इमारत बाहेरून छान दिसत होती. मात्र आत गेल्यावर खोल्यांची अवस्था यथातथाच होती. शिवाय खोल्या जमिनीपेक्षा थोड्या खालच्या लेवलला असल्याने खोलीत अधिक गार होते. काल समाधानाने भरलेल्या उबदार घरात राहिल्यावर आजची ही थंड पडलेली खोली कठीण जाणार हे आत्ताच आमच्या लक्षात आले. पांघरुणंही तशी मोजकीच होती. पण गरम पाण्यासाठी बादलीत ठेवायचा हिटर असणे ही एक मोठीच सोय होती. आमच्या रूम मधला हिटर चालला नाही , मग तो बदलून आणणे वगैरे प्रकार झाले आणि शेवटी एकदाचे प्रत्येकीला बादलीभर गरम पाणी मिळाले. आंघोळी आटपून आम्ही आमच्या रोजच्या फोटो डाउनलोड कामाला सुरुवात केली. फोटो डाऊनलोड होईपर्यंत मी वाहित्त वहीत आजच्या महत्वाच्या नोंदी केल्या. सकाळी जेसिमाशी बोलताना केलेल्या नोंदी एकदा नजरे खालून घातल्या. या सगळ्या स्त्रियांबद्दल मिळालेली महिती व्यवस्थित लिहून काढायची असं मी आधीच ठरवलं होत त्यामुळे सगळी नावं, नोंदी करून घेतल्या. योक्सीहून निघताना फोटो आणि या नोंदी तेवढ्या घेउन यायच्या होत्या पण तिथल्या दिलदार लोकांनी पिशव्या भरून हळदही आमच्या हातात ठेवली होती आणि तीचे पैसे द्यायला गेलो तर घेतलेही नव्हते. ते आठवून मला अगदी कसेनुसे वाटले.

थोड्या वेळाने, अपुरी पांघरूणे असल्याने आणलेले जाकिट, स्वेटर इत्यादी घालून आम्ही कुडकुडत निद्रादेवीची आराधना करू लागलो. रात्री या थंडीमुळे कुडकुडत, विविध अ‍ॅनालिसीस करत मी एक अगदी सॉलिड अनुभव घेणार आहे हे तेव्हा मला कसे माहीत असणार?

प्रवासाचा मार्ग

पुढचा भाग
पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ४ - धाडसी महिलांच्या गावात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच भाग छान. वाचतेय Happy
काका कसली गोड आहे. जेसिमा सुचियाङ आणि ती कोळशाच्या खाणीची मालकीण सुद्धा
मस्तच वर्णन . शाळेतली मुल Happy

छान आहे हा ही भाग. फोटो पण मस्त.
शेवटच्या वाक्यामुळे आता पुढील भाग वाचायची खूपच उत्सुकता वाटतेय Happy

हाही भाग आवडला . कोळशाच्या खाणीच्या मालकीणबाईची पोज आवडली.
रिभालांग , हर्क्युलसच्या घराचे फोटो नाही टाकले ?

मस्त लिहित आहेस....
खुप छान झाले आहेत आत्ता पर्यत चे भाग...
पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत Happy

अतरंगी , मंजू, सुजा , आडो, सुरेख , मित, अगो , बाजिंदा , माधुरी१०१, मुक्ता धन्यवाद Happy

जरा मोठे >> एका दिवसाचा एक असे टाकतेय. ते मला आठवणी आणि नोंदी बघुन लिहायला सोपे पडते. काही भाग मोठे होतील काही भाग छोटे. ( नाहीतर नंतर म्हणाल उगीच हिला मोठे भाग टाकायला सांगितले Wink )

भाग वाचायची खूपच उत्सुकता >> Happy किस्सा मजेशीर आहे इतकंच

रिभालांग , हर्क्युलसच्या घराचे फोटो >> नाही काढलेत मी.

लाल चहाचा मला कंटाळा नाही आला पण दिवसातुन चार पाच चहा नको व्हायचे. सकाळी एक , दुपारी एक पुरेसा होतो खरंतर.

एक दिवसाचा एक भाग हे परफेक्ट फिट्ट आहे. लिंक लागतेय. Happy

इथल्या हळदीत कुराकोमीन नावाच्या द्रव्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे
>>> कॉर्क्यूमिन (Courcumin) चा अपभ्रश असणार हा. Happy हळदीमधला कँसरवर उपयूक्त असा घटक.

मस्त भाग..फोटो सुरेख आले आहेत. कोळश्याच्या खाणीच्या मालकीणबाईंनी भारी पोझ दिली आहे Happy

मस्तच! हा भागही आवडला. Happy फोटोपण.

तू फोटोग्राफीबरोबरच लेखनाचंही मनावर घेच.

मला काही प्रदेशाचे उच्चार करायला जमत नाहीये. बर्मीज आहेत ही नावे?

फक्त चित्र पाहिले ऑफीसमधे असल्यामुळे घरी जाऊन निवांत वाचेन. संपर्कातून तुझा फोन नंबर पाठवतेस का प्लीज. खूप काही विचारायचे होते. लिहायला वेळ नाही त्यापेक्षा पटकन गप्पातून विचारुन घेईन.

ललिता, Happy हो या लेखांचे तरी मनावर घेतलेच आहे. लवकरात लवकर पूर्ण करणार.

बी, ही नावे अस्सल भारतीय आहेत. जशी दक्षिण भारतातली नावे आपल्याला सहज वाचता येत नाहीत तशी ही ईशान्य भारतातली नावे आपल्याला सहज वाचता येत नाहीत. पण म्हणुन ती भारतीय असण्याबद्दल शंका घ्यायची गरज नाही. माझ्या पहिल्या लेखात मी लिहीलं आहे की मनानेही हा भूभाग आपण आपलासा मानला पाहिजेच. असे मानले जात नाही हे इथले फार मोठे दु:ख आहे. तुमच्या कमेंटमधला हा उल्लेख चुकून असला तरिही अतिशय संवेदनशील वाटतो. तिथली मुलं इथे किंवा इतर राज्यात जेव्हा जातात तेव्हा त्यांना नेपाळी, चिनी असे उल्लेखले जाते. त्यांना फक्त उर्वरित राज्यांनी 'आपले/ भारतीय' असे मनापासुन म्हटले तरी तिथले काही प्रॉब्लेम्स उद्भवले नसते किंवा त्यांचे प्र्माण कमी झाले असते. प्लिज तो बर्मी चा उल्लेख काढणार का? तो काढल्यावर मी ही पोस्ट बदलेन.
तुम्हाला मी मुद्दाम काही सांगतेय असे वाटून घेऊ नका पण आमच्या या अनुभवामधुन, फोटोज मधुन या संवेदनशील विषयाबद्दल आपल्यातच जागरुकता निर्माण व्हावी असाही आमचा उद्देश होताच/ राहील.

तशीही लेखातली नावे मी मराठीत लिहीली आहे. 'याङ' वगैरे सारखी नावे वाचता येत नसतील तर इथे लिहीते.
बाराखडीत क ख ग घ ङ अशी अक्षरे आहेत. 'याङ' मधे त्यातले शेवटेचे अक्षर आहे, 'क ख ग घ' यापैकी कशावरही अनुस्वार देऊन जो उच्चार होतो तो 'ङ' वापरुन दाखवतात. न ने होणार्‍या अनुस्वारापेक्षा उच्चर थोडा वेगळा असतो. तो साधारण ' यांग' असा उच्चर होतो.