चूक होती

Submitted by संतोष वाटपाडे on 16 January, 2015 - 03:02

मानले डबक्यास सृष्टी हीच ज्यांची चूक होती
भेटली हरपावली ती माणसे बेडूक होती....

व्यर्थ सांभाळू कशाला अंगठी पत्रे तिची मी
ती पुन्हा परतायची जर शक्यता अंधूक होती...

यायची डोळ्यात माझे दुःख जाणायास वेडी
वेदना माझ्या मनाची केवढी भावूक होती...

लेकरे फ़ुटपाथवर का गोठली थंडीत देवा
आज त्यांनी पांघराया घेतली जर भूक होती....

ती उडाली उंच आभाळात... कारण पंख होते?
की गुलामीची पुरातन साखळी नाजूक होती...

प्रेम होते पण तिला मी दाखवू शकलोच नाही
वादळे डोळ्यातली सारीच तेव्हा मूक होती...

मी विकाया बैसलो ताजी सुखे स्वस्तात जेव्हा
का बरे दुःखास येथे मागणी घावूक होती....

जीवना....प्रश्नास उत्तर मी तुझ्या देणार नव्हतो
प्राक्तनाने पण शिरावर ठेवली बंदूक होती...
....................................
ती छतावर एकटी असताच खाली यायचा तो
ही सवय मज चंद्रम्याची चांगली ठावूक होती....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीवना....प्रश्नास उत्तर मी तुझ्या देणार नव्हतो
प्राक्तनाने पण शिरावर ठेवली बंदूक होती.

छान.

मानले डबक्यास सृष्टी हीच ज्यांची चूक होती
भेटली हरपावली ती माणसे बेडूक होती

काय म्हणायचे ते कळले (डबक्याला सृष्टी मानणारी बेडूकसमान माणसे हरपावली भेटली).
हरपावली खटकले कारण जगात असे कधीच होत नाही. चार अशी माणसे तर एकादा बरा माणूसही भेटतोच.
शेरापेक्षा हे विधान वाटते. मला वाटतं आपण अगोदर गझल समजून घेण्याची आवश्यता आहे.
शुभेच्छा.

छान गझल संतोष,अनेक द्विपदी आवडल्या. हर-पावली असं लिहिल्यास जास्त स्पष्ट होईल. येथे ''चार अशी माणसे तर एकादा बरा माणूसही भेटतोच'' -समीरजींशी सहमत .

जीवना....प्रश्नास उत्तर मी तुझ्या देणार नव्हतो
प्राक्तनाने पण शिरावर ठेवली बंदूक होती.

छान.