अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस तिसरा)

Submitted by मुक्ता०७ on 5 January, 2015 - 11:36

अरुणाचल - एक अनुभूती...
अरुणाचलमध्ये पोचल्यानंतर मी लिहिलेल्या रोजनिशीतील काही पाने
दिवस पहिला
अरुणाचल - एक अनुभूती...(दिवस पहिला) http://www.maayboli.com/node/52091

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस दुसरा) http://www.maayboli.com/node/52129

दिवस तिसरा
रात्रीचे ९ वाजले आहेत. आजचा दिवस शारीरिक, बौध्दिक, आणि भावनिक अश्या सर्वच दृष्टींनी जाम धावपळीत गेला. त्यामुळे आता जरा निवांत बसले आहे. राजीवदादा समोर कुमकुम भाग्य नावाची सिरीयल बघतायत. रिनाही मन लावून टीव्ही बघत्ये. सगळ्या कामांमध्ये हिला स्वतःचा असा वेळच मिळत नाही. तिला जेव्हा बघावं तेव्हा ती स्वयंपाक करताना, पाणी भरताना, भांडी आणि कपडे धुताना, मुलांना भरवतानाच दिसते. पहिल्या दिवशी सगळं नवीन असल्यामुळे ती कुठे झोपते हे मला कळलंच नव्हतं. काल रात्री मला गरम पाणी देऊन ती स्वयंपाकघराशेजारी असलेल्या एका लहानश्या खोलीत गेली. अक्षरशः उंदीर बिळात जावा तशी ती गायब झाली. पण आज ती माझ्याशी आपणहून बोलायला आली...

आज आहे kathin-poi! kathin-poi हा बौद्ध धर्माचा सण आहे. वर्षातून एकदाच हा सण साजरा करतात. नोव्हेंबर/डिसेंबर मधील एका विशिष्ट पौर्णिमेला गावातल्या स्त्रिया गौतम बुद्धांसाठी आणि बौद्ध भिक्खूंसाठीचे पवित्र वस्त्र विणून आणि रंगवून त्यांना अर्पण करतात. हे काम एका रात्रीत पूर्ण करायचे असते. हा सण साजरा करण्यासाठी राजीवदादा आणि लो दरवर्षी पियोंग गावात जातात. आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत जायचे ठरले. आम्ही तिघेही jeans-Tshirt मध्येच जाणार होतो. पण सणाला जावं तर पारंपारिक वेशात जावं असं असा एक विचार दादांनी मांडला. मी आणि अंजली लगेच लोचा wardrobe बघायला धावलो. इकडे बायका-मुली जास्त करून wrap skirts, पंजाबी ड्रेस आणि साडी वापरतात. jeans फारश्या वापरत नसल्या तरी पारंपारिक skirts वर western style चे tops वापरतात. अगदी पाचवीत असलेल्या मुलीही व्यवस्थित मेकअप आणि सुंदर केशरचना करून येतात. प्रत्येक मुलीची वेगळी केशरचना! लो आम्हाला निरनिराळे skirts दाखवत होती. skirts च्या मागे मला एक हिरव्या रंगाचे कापड दिसले. त्यावर नाजूक नक्षीकाम होते. ते कापड बघून लो चक्क लाजली. “वो तो मेरा शादी का जोडा है, मैने खुद् बनाया है!” असं म्हणाली. अच्छा... तर ते तिचे वधूवस्त्र होते तर! काळ्या skirt वर ते सुरेख नक्षीकाम केलेले वस्त्र नेसले जाते. फक्त विवाहित मुलीच ते नेसतात. पण ते नेसून बघण्याचा मोह मला आणि अंजलीला आवरला आला नाही. मी आणि अंजली छान तयार होऊन फोटो काढत होतो. लो सुद्धा ‘शादी का जोडा’ नेसून बाहेर आली. राजीवदादा मला आणि अंजलीला ‘लग्नाची इतकी घाई झाली का’ म्हणून चिडवायला लागले. प्रथमेशला ‘फक्त लग्न झालेल्या मुलीच हे वस्त्र नेसतात’ हे माहीत नव्हते. पण दादांनीच चिडवायला सुरुवात केल्यावर मग काय! त्याला कोलीतच मिळालं. भरपूर चेष्टामस्करी आणि फोटो काढण्यात मजा येत होती. आश्चर्य म्हणजे रिनाने आपणहून मला आणि अंजलीला कपडे निवडायला आणि आवरायला मदत केली. आम्ही छान दिसतोय हे तिने आवर्जून सांगितले. शेवटी आम्ही ते ‘शादीके जोडे’ उतरवून आधी निवडलेले कपडे घातले आणि तयार झालो. प्रथमेश सुद्धा लुंगी नेसून तयार होता. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी मुलांना कपड्यांमध्ये फारसा काही choice नसतो हेच खरं!
आम्ही आत्ता दुम्पानी मध्ये आहोत. इथून piyong एक-दीड तासाच्या अंतरावर आहे. संध्याकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान आम्ही piyong ला पोचलो.

From Day3

तिथे गेल्या गेल्या चार ते पाच भव्य मंडप दिसले. दादा आणि लोने kathin-poi विषयी प्राथमिक माहिती दिली असली तरी नक्की काय आहे ते समजत नव्हते. पण आता थोडा थोडा अंदाज येत होता. एका मंडपात बायका हातमागावर लाल वस्त्र विणताना दिसल्या.

From Day3
From Day3

विणण्याच्या जागेलगतच कुंपण होते आणि बाहेर रखवालदारही होता. कुंपणाच्या आत स्त्रियांनाच पंचशील शपथ घेतली असेल तरच प्रवेश करता येतो अशी माहिती मिळाली. शील म्हणजे सदाचार. सदाचाराचे ५ नियम बौद्ध धर्मात मूलभूत आणि आवश्यक मानले जातात. गौतम बुद्धांनी ५ व्रते सांगितली आहेत. महत्त्वाच्या सर्व बौद्ध धर्मग्रंथांतही शीलाचे महत्त्व सर्वोच्च मानले आहे. ती ५ व्रते १) प्राण्यांची हत्या करणार नाही. २) न दिलेली वस्तू घेणार नाही. ३) वैषयिक मिथ्याचार करणार नाही. ४) मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. ५) खोटे बोलणार नाही. पंचशील शपथ घेतल्यानंतरच मला आणि अंजलीला आत प्रवेश मिळाला.
From Day3
प्रथमेशला मात्र नियमांना अनुसरून बाहेरच थांबावे लागले. पवित्र काम असल्यामुळे सर्वांनाच ह्यात आपला थोडातरी वाटा असावा असे वाटते. परंतू या अतिउत्साहामुळे विणण्याचा वेग कमी होऊन चालणार नसते. त्यामुळे काम आणि वेळेशी भलतीच स्पर्धा असते. मी आणि अंजलीने वस्त्र विणण्याची हौस रीळ तयार करून भागवली.
From Day3
मंडपाच्या बाहेर ढोल, झांजा यांचे वादन चालू होते. एका शांत लयीत वाजवणे चालू होते. त्यांच्या वाजवण्यात कुठेही सादरीकरणाची प्रौढी नव्हती, लक्ष वेधून घेण्याची धडपड नव्हती. ते खरोखरच स्वतःसाठी वाजवत आहेत असे वाटत होते. आहे त्या वातावरणातच मिसळून जाण्याकडे त्यांचा कल दिसला. साध्या ठेक्यांवरूनही इथल्या लोकांचे अंतःकरण समजून येते. आम्ही तिघांनीही ती वाद्ये वाजवून त्या वातावरणाचा फील घेण्याचा प्रयत्न केला!
From Day3
एक मंडप तर फक्त दानधर्म करण्यासाठी राखीव होता. तिथे तुम्ही अगदी यथाशक्ती दान करू शकता. प्रियजनांच्या नावाने दानधर्म करताना नोटा चक्क सुई-दोऱ्याने एका stand वर शिवायचे होते.
From Day3
From Day3

त्या मंडपातच जरा निवांत बसलो. माझ्या शेजारी आजीच्या वयाच्या बऱ्याच बायका बसल्या होत्या. त्यातल्याच पाठमोऱ्या बसलेल्या एका आजींची शाल मी बघितली आणि शेजारीच बसलेल्या प्रथमेशला आणि अंजलीला म्हणाले “या शालीवरचे नाजूक कशिदाकाम बघा! कसली खानदानी शाल आहे ही!” आणि दुसऱ्या क्षणी लोने सांगितले की त्या ‘सांगपो’ जमातीच्या महाराणी आहेत. दादांनी आमची सांगपो जमातीच्या राजाशीही ओळख करून दिली. एरवी जर मी त्यांना कुठे पहिले असते तर माझा विश्वासही बसला नसता की हे एका जमातीचे राजा वगैरे आहेत म्हणून! त्यांनी आमची आस्थेने चौकशी केली. आमच्या उपक्रमाचे कौतुकही केले.
एका मंडपात विणण्याचे काम चालू होते. तर दुसऱ्या मंडपात मोठया मोठया चुलींवर अन्न शिजवले जात होते. आणखी एका मंडपात एखाद्या कॉलेजचे gathering चालावे तसे विविध गुणदर्शन कार्यक्रम चालू होते. आम्ही तिघांनीही तिथे गाणं गायले. आमचं गाणं झाल्यावर स्टेजच्या मागे एक मुलगी आम्हाला भेटली. तिने आम्हाला चक्क ओळखलं! ती बलुपठार शाळेतली एक मुलगी होती. आणखीनही काही मुलं आवर्जून भेटायला आली. मुलांनी शाळेबाहेर असतानाही आम्हाला आवर्जून ओळख दिली, आपणहून बोलायला आली! त्यांनीही आम्ही घेतलेल्या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. त्या मुलांशी बोलताना आम्हाला तिघांनाही इतकं भरून येत होतं!
आज तीन शाळांमध्ये कार्यशाळा झाल्या. आजची पहिली शाळा आत्तापर्यंतची सगळ्यात मस्त शाळा होती. तब्बल ६०० मुले होती! सगळी मुले उत्साहाने उत्तरं देत होती. मुले आणि शिक्षकच नाहीत तर आजूबाजूची लोकं सुद्धा आम्ही घेतलेल्या खेळांमध्ये सहभागी होत होती. projectile motion आणि sprinker चे प्रयोग आम्ही तिघांनी वेगवेगळ्या वर्गात जाऊन जाऊन घेतले. आज माझा घसा पूर्णपणे बसला आहे. पण तिथल्या विज्ञान शिक्षकांनी मला खूप मदत केली. काही मुलांसोबत आम्ही फोटोजही काढून घेतले. आमच्याकडे एक शिट्टी आहे. प्रत्येक वेळेस ग्रुप फोटो काढताना तीनदा शिट्टी वाजवून तिसऱ्या शिट्टीनंतर मुलांना हात वर करून ओरडा असे सांगतो! त्यामुळे फोटोत मुले उत्साही दिसतातच आणि तेवढीच जरा मज्जा!
From Day3
आजच्या दुसऱ्या शाळेत दहावीतल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होत्या. त्यामुळे आम्हाला icebreakers घेता आले नाहीत. पहिली-दुसरीतली लहान मुलेही होती. त्यामुळे जरा जास्तच गर्दी झाली. आमच्या भोवती गोल करून सगळी मुलं बसली होती. थोड्या वेळाने गर्दीमुळे तो गोल आपोआप छोटा व्हायला लागला; इतका की आम्हाला मोजून तीन पावलंही चालता येईना! पण लहान मुलांना ‘बाजूला व्हा’ असे कसे सांगणार! कारण ती छोटी मुले तर इतक्या उत्साहात प्रयोग बघत होती, मन लावून आमचे बोलणे ऐकत होती! आम्हाला खरोखरच space(!) हवी होती... कार्यशाळा संपल्यावर मी शब्दशः मोकळा श्वास घेतला! आत्तापर्यंत सगळ्या शाळांमध्ये कोरा चहा आणि शेव-फरसाण snacks म्हणून होता. पण या शाळेत मात्र त्यांनी चक्क उकडलेलं अंड दिलं! ही कल्पनाच किती छान आहे. एकदम सोप्पं, सुटसुटीत आणि आरोग्यपूर्ण!
तिसरी शाळा म्हणजे या गावातील एकमेव खाजगी शाळा आहे. आमच्या दादांची मुले या शाळेत जातात. एकदम टापटीप शाळा होती.
From Day3
या शाळेत पोहोचेपर्यंत तर माझा आवाज कामातूनच गेला. त्यामुळे अंजलीने आणि प्रथमेशने मिळून कार्यशाळा घेतली. मी साहित्य मांडणे, वाटणे, आवराआवर करणे, फोटो काढणे अश्या गोष्टी केल्या. तिथे ध्वनिप्रक्षेपक होता. त्यामुळे ह्या दोघांच्या आवाजालाही जरा विश्रांती मिळाली. या शाळेत एक मजेदार किस्सा घडला. आम्ही तिघांनीही आमची नावं सांगितली. माझं नाव सांगितल्यावर मागे बसलेल्या मुलांमधून आवाज आला, ”मुक्ता बीडी!” नंतर दादांनी सांगितले की मुक्ता बीडी नावाची बीडी आमच्याइथे विकली जाते! अगदी शाळेतल्या मुलांना सुद्धा बिडीचे brands माहीत आहेत हे पाहून काळजीच वाटली. या शाळेत विज्ञानाचे जे शिक्षक होते त्यांचा खरं तर विज्ञान हा विषयच नाही. त्यांचा विषय आहे भूगोल. पण ते शिकवतायत विज्ञान! म्हणजे शाळा खाजगी असली तरी परिस्थितीत फारसा काही फरक नाही.
तीन कार्यशाळा असल्यामुळे आज आमच्या तिघांच्या सहनशक्तीचा आणि चिकाटीचा अगदी कस लागला. आज माझ्या आवाजाने साथ दिली नाही... पण आम्ही तिघेही एकमेकांना सांभाळून घेतोय, एकमेकांची काळजी घेतोय. कारण इथे आम्हीच एकमेकांना आधार आहोत हे आमच्या नीट लक्षात आले आहे. आमच्या तिघांची ग्यानसेतूच्या मिटींग्समध्ये एक-दोनदा भेट झाली होती, तीही औपचारिक! मात्र आता आमच्या तिघांमधेही छान मैत्रीचे बंध निर्माण झाले आहेत... पुलंनी म्हटलेच आहे... ”पंधरा पंधरा वीस वीस वर्षांच्या परिचयाची माणसं असतात, पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे संबंध जात नाहीत; पण काही माणसे क्षणभरातच जन्मजन्मांतरीचे नाते असल्यासारखी दुवा साधून जातात.”
रात्री जेवताना आम्ही लग्न, relationships, dating या विषयांवर चर्चा करत होतो. दुम्पानी खेड्यातील एका तरुणाने महाराष्ट्रीयन मुलीशी विवाह केला आहे. ते दोघेही इथेच राहतात. सुरुवातीला तिला इथल्या पद्धती नवीन होत्या. त्यामुळे तिची थोडी चेष्टाही होत असे. पण तिने इथल्या पद्धती लवकरच आत्मसात केल्या. त्यामुळे आता आम्हाला ती आमच्यातलीच एक वाटते असं दादा सांगत होते. मी मनातल्या मनातच त्या मुलीचे आभार मानले. तिच्यामुळेच कदाचित त्यांचे महाराष्ट्राबद्दलचे आणि तिथल्या लोकांबद्दलचे मत चांगले असावे. धर्म, जात, जमात याबद्दलच्या कट्टर मतांमुळे इथे आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह होणे सोपे नाही. पण जर मुलामुलीचे शिक्षण आणि नोकरीव्यवसाय व्यवस्थित असेल तर फारशी अडचण येत नाही.
जेवण झालं, आवराआवर झाली आणि अचानक रिनाने मला तिच्यासोबत बोलावले. तिच्या खोलीत जाऊन एक ड्रेस आणला आणि म्हणाली, “ये मैने खुद बनाया है. मेरी शादी के वक्त मै ये पेहेननेवाली हू.” तिने आपणहून स्वतःची कहाणी सांगितली. ती खूप गरीब घरातून आली आहे. तिला तिच्या वस्तीतल्याच एका मुलाने मागणी घातली होती. घरची परिस्थिती गरीब असल्याने आई-वडीलही लग्नासाठी जबरदस्ती करायला लागले. पण रिनाने ठामपणे सांगितले की मी या मुलाशी लग्न करणार नाही. घरच्यांवर लग्नासंबंधी दबावही टाकण्यात आला. त्याच काळात दादा आणि लो ती जिथे राहायची त्या भागात सेवाभारतीचे काम करत होते. तिच्या मनाविरुद्ध लग्न होणार आहे हे त्यांना कळले आणि तिला आधार द्यायचा असे त्यांनी ठरवले. त्यांनी तिला आपल्या घरी आसरा दिला. तिचे वय लहान, गरीब परिस्थितीमुळे शिक्षणही यथातथाच आणि परत घरच्यांच्याच विरोधात गेल्यामुळे समाजाची बदललेली नजर यामुळे राजीवदादा आणि लोने तिला घरीच ठेवून उदरनिर्वाहासाठी मानाने काम दिले. आता ती राजीवदादा आणि लोचे घर व्यवस्थित सांभाळते. लग्नाची अजून इच्छा नसली तरी स्वतःचे घर असावे असे तिला वाटते. आत्ता तिला पुढचा रस्ता दिसत नसला तरी इच्छाशक्ती, आशा आणि चिकाटीच्या बळावर दादा आणि लोच्या साथीने खंबीरपणे आयुष्यात मार्गक्रमण करते आहे.
एका मुलीला तिचा आत्मसन्मान, व्यक्तीस्वातंत्र्य जपण्यासाठी समाजाच्या विरोधात जाऊन तिच्या निर्णयाला पाठींबा देऊन तिच्यामागे खंबीरपणे उभे राहणे किती अवघड आहे! अतिसुरक्षित वातावरणात वाढलेल्या आम्ही तथाकथित सुशिक्षित मुली व्यक्तिस्वातंत्र्य, आत्मसन्मानाच्या नुसत्याच गप्पा मारतो. पण खरोखरच अशी परिस्थिती आमच्यावर आली तर? या संकल्पनांची पुसटशी जाणीवही नसणाऱ्या रीनाचे धैर्य आमच्यात येईल? आयुष्य जगण्याबद्दलची ती आसक्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सगळ्या गोष्टी निभावून नेण्यासाठी लागणारी चिकाटी अनुभवातूनच येणार... नुसत्या चर्चा करून नाही! वाटते आणि दिसते तितके कोणाचेच आयुष्य सोपे नाही... हेच खरे!
अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस चौथा) http://www.maayboli.com/node/52233

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका मुलीला तिचा आत्मसन्मान, व्यक्तीस्वातंत्र्य जपण्यासाठी समाजाच्या विरोधात जाऊन तिच्या निर्णयाला पाठींबा देऊन तिच्यामागे खंबीरपणे उभे राहणे किती अवघड आहे! अतिसुरक्षित वातावरणात वाढलेल्या आम्ही तथाकथित सुशिक्षित मुली व्यक्तिस्वातंत्र्य, आत्मसन्मानाच्या नुसत्याच गप्पा मारतो. पण खरोखरच अशी परिस्थिती आमच्यावर आली तर? या संकल्पनांची पुसटशी जाणीवही नसणाऱ्या रीनाचे धैर्य आमच्यात येईल? आयुष्य जगण्याबद्दलची ती आसक्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सगळ्या गोष्टी निभावून नेण्यासाठी लागणारी चिकाटी अनुभवातूनच येणार... नुसत्या चर्चा करून नाही! वाटते आणि दिसते तितके कोणाचेच आयुष्य सोपे नाही... हेच खरे! >>>>>>>> रीनाला सलाम आणि तिला पाठींबा देणार्‍या दादा आणि लो यांनाही ....
_____/\_____

मुक्ता -अतिशय सुर्रेख शब्दांकन ..... Happy

मुक्ता,
लेख बेहद्द आवडला.

तुमच्या डोळ्यांनी आम्हीच ईशान्य भारत पाहत आहोत असे वाटले.

स्थानिक सणासमारंभांत, त्यांच्या भाव-भावनांत समरस होऊन जाण्याची तुमची भूमिका आवडली.
अशा वर्तनानेच रेशमांचे बंध गुंफले जातात.

कवियित्री शांता शेळके म्हणतात:

हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा
धागा अतूट हाचि प्राणांत गुंतवावा
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमांचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमांचे

ह्या लेखाद्वारे आमच्याकरता हे रेशमांचे बंध गुंफल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.
अशाच साहसी उपक्रमांना अनेकानेक शुभेच्छा!

खुप सुंदर लिहिले आहे, शेवटचा परिच्छेद खुप आवडला. रिनाला तिच्या भावी आयुष्यात एक योग्य जोडीदार मिळो आणि तिने पाहिलेले आयुष्याचे सोनेरी स्वप्न साकार होवो असे मला मनापासुन वाटत आहे.

खुप सुरेख लिहिलंयस मुक्ता. हा भाग खुप परिणामकारक लिहिला गेलाय. तिथल्या दैनंदीन जीवन, समाज, चालीरितींबद्दल वाचणं इंटरेस्टिंग आहे.

रीनाबद्दल तू लिहिलेलं खुप पटलं. कोणतीही विशेष जाणीव न ठेवता असं बाणेदार वागणं, आणि तिला सक्रिय पाठिंबा देणारे राजीव आणि लो, सगळंच कौतुकास्पद आहे.

मुक्ता, किती छान लिहील आहेस, मनापासून आवडल. तू ज्या कामासाठी गेली होतीस, त्या कामात झोकुन दिलस आणि शिवाय तिथल्या माणसांमध्ये, समाजातही मिसळलीस. शाब्बास.

आज सकाळीच वाचला हा भाग, प्रतिक्रियाही लिहिली आणि पोस्ट सेव्ह करण्याऐवजी चुकून प्रतिसादाची खिडकी बंदच करून टाकली.
हा भागही मस्त जमलाय. चिंतन आवडले.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद!
आपणा सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून लिहायला आणखीनच उत्साह येतो आहे! Happy
@नरेंद्र गोळे.... काय सुंदर कविता आहे! आभार!
@अरुंधती कुलकर्णी Lol

मुलगी असण्याचा फायदा हा की घरातले जीवन नीट पाहता येते. तसे पुरुषांचे होत नाही.वरवर चारदोन फोटो काढून आणण्यापलीकडे ते जाऊ शकत नाहीत. मला ही लेखमाला वाचून डिस्कवरीच्या इट हैपन्स इन इंडिआ मालिकेत सुगंधा गर्गचे सादरीकरण आठवत राहातंय. तिने माजुली वगैरे दाखवलंय इतकं चांगलं अरुणाचल तुम्ही अनुभवलंय आणि लिहून फोटोंसह आमच्यापर्यँत आणलंय. धन्यवाद!

अप्रतिम !

भारताचा हा अनवट भाग तुम्ही डोळ्यांनीच नाही तर मनानेही बघितला आहे... आणि ते शब्दाशब्दातून जाणवत आहे !! हा अनुभव जपून ठेवा... आयुष्यभर पुरेल !!!

फोटोंमुळे वाचनाची रंगत अजूनच वाढली आहे !

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मुक्ता, खुप सुंदर अनुभव.
तुम्हाला संपर्कातुन इमेल केलं आहे. प्लिज रिप्लाय कराल का?
इमेल मिळालं नसल्यास मला माझ्या वेबसाईट वरच्या कॉन्टॅक्ट मधुन इमेल कराल का?