उर्दू ग़ज़ल- काही शतकांचा प्रवास- २

Submitted by समीर चव्हाण on 14 January, 2015 - 14:22

ह्या भागात म्हटल्याप्रमाणे मिर्जा़ मोहम्मद रफी सौदा ह्याचा परिचय करून घेऊ. (दर्द वर लिहायला आज शक्य होईल असे वाटत नाहीए). सौदाचा काळ १७१३-१७८०. तो प्रसिध्द शायर मीर तकी मीरचा समकालीन. समीक्षक रामनाथ सुमन ह्यांच्या कथनानुसार मीरच्या समकालीन कवींमध्ये मीर व्यतिरिक सर्वात प्रसिध्द कुणी असेल तर तो सौदा. हे समजून घेतले पाहिजे की सौदाच्या कवितेत निश्चित काही गुण असणार ज्यामुळे हे घडले. मीर गझलेसाठी तर सौदा हा कसीदा (प्रशंसात्मक कविता) साठी मोठे मानले जातात. सौदाला ही बोच असावी म्हणून तो म्हणतो:

लोग कहते है कि सौदाका क़सीदा है खू़ब
उनकी खिदमतमें लिये मैं यह ग़ज़ल जाऊंगा

गझल असो वा कसीदा, तब्येतीचे काम आहे. कसीदा लिहायला शब्द-निवड, विषय-निवड, शब्द-योजना, अलंकारिता जसे आवश्यक आहे तसेच चंचलता, जोश, नाट्यमयता स्वभावत: हवी. ह्याउलट मीरची भाषा सरळ, आणि प्रकृती गंभीर होती.
दोघांच्या लिखाणातला फरक काही प्रमाणात पुढील शेरांतून कळून येतो:

मीरचा शेर आहे:


हमारे आगे तेरा जब किसीने नाम लिया
तो दिल सितमज़दहको हमने थाम-थाम लिया

इथे कहन थेट आहे. मात्र भावनांची तीव्रता, वेदना पाहण्याजोगी आहे. तुझे कुणी माझ्यासमोर नाव घेतले की अशी अवस्था येते की स्वतः स्वत:ला सावरावे लागते (दिल थामना मराठीत कसे सांगावे हा पेच पडला).
ह्या उलट कमी-अधिक फरकाने हाच खयाल सौदा असा मांडतो:


चमनमें सुबह जो उस जंगजूका नाम लिया
सबाने तेग़का मौजे़-रवांसे काम लिया

विचारांची गुंतागुंत पाहाल, नाट्यमयतासुध्दा. अर्थ असा आहे की पहाटे बागेत कुणी जर त्या हत्यारीचे नाव घेतले तर
पहाटवा-याच्या वाहणा-या लहरीसुध्दा तलवारीसम भासू लागतील. ह्या शेरात स्वाभाविकता नाही.
दोघांच्या विचारांतला, शैलींतला फरक, अनेक उदाहरणे घेऊन, रामनाथ सुमन ह्यांनी समजावून सांगितला आहे.
अजून एक उदाहरण पाहूया:


गिला मैं जिससे करूं तेरी बेवफा़ईका
जहा मैं नाम न ले फिर वह आशनाईका

-मीर


गिला लिखूं मैं अगर तेरी बेवफा़ईका
लहूमें ग़र्क सफीना हो आशनाईका

- सौदा

अर्थात गझलेच्या प्रातांत सुध्दा सौदाचे काही मास्टरपिस आहेत. एक पाहूया:

दिल मत टपक नज़र से कि पाया न जाएगा
जूँ अश्क फिर ज़मीं से उठाया न जाएगा

जूँ अश्क = आसूं के तरह


रुख़सत हैं बाग़बा कि टुक इक देख लें चमन
जाते है वां, जहां से फिर आया न जाएगा

बाग़बा = माली
(हा शेर पुन्हा-पुन्हा वाचण्यासारखा आहे, विशेषतः रिलेट करता आला तर).


काबा अगर्चे टूटा तो क्या जा-ए-ग़म है शेख़
कुछ कस्त्रे-दिल नही कि बनाया न जाएगा

जा-ए-ग़म = दुख का कारण, कस्त्रे-दिल = दिलरूपी महल
विचार पारंपारिक असला तरी निर्दशनास येते की शेख-मुल्ला ह्यांची चेष्टा त्या काळात चेष्टेत घेतली जात असावी.
सौदाचे काही शेर देत आहे. ह्या शेराने मला बरेच घुमवले:


पीरी जो तू जावे तो जवानी से ये कहना
खुश रहियो मरी जान तू जिधर है जहां है

पीरी=बुढापा (संतत्व).
कवी त्याच्या वार्धक्याला म्हणत आहे की तारुण्याला निरोप देशिल जिथे असशील तिथे सुखी रहा.
इथे मरी मेरी ह्या अर्थाने आले आहे.

त्याच जमीनीतला अजून एक शेरः


तुझसे तो किसू तरह मेरा कुछ नही चलता
जु़ज खून कि आखोंसे शबोरोज़ रवां है

जु़ज खून =खून के सिवा

काही सोपे आणि अवघड शेर:


इश्क़ से तो नही हूं मैं वाकिफ़
दिल को शोला सा कुछ लिपटता हैं


क्या जिद है मिरे साथ खुदा जाने वगरना
काफी है तसल्ली को मिरी एक नज़र भी


मत पूछ ये कि रात कटी क्यूंके तुझ बगैर
इस गुफ्तगू से फायदा, प्यारे गुज़र गयी

मीरप्रमाणे सौदाच्या गझलेत टुक, मिया, होवे असे अनेक शब्द येतात. काळाचा महिमा.
हा एक सुंदर शेरः


समझे थे हम जो दोस्त तुझे ए मियां ग़लत
तेरा नही है जुर्म, हमारा गुमां ग़लत

सौदा आणि गा़लिबचा स्वभाव मिळताजुळता असावा. गा़लिब मात्र अनेक बाबतीत फार पुढे होता हे आपण पुढे पाहूच.
अजूनही सांगण्यासारखे बरेच काही आहे. शेवट सौदाच्या दोन अप्रतिम मक्त्यांनी करूयात:


सौदा खु़दाके वास्ते कर किस्सा मुख्त़सर
अपनी तो नींद उड गई तेरे फ़साने से

सौदा जो तिरा हाल है इतना तो नही वो
क्या जानिए तू ने उसे किस आन में देखा

धन्यवाद.

भाग १ http://www.maayboli.com/node/52230

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती छानच
शेरांबरोबर शायरांच्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही पैलूंचीही ओळख झाली कही खुमासदार किस्से माहीत झाले तर तर मजा वाढेल नक्कीच Happy

पीरी चा शेर मला आपण म्हणता तसा विलासीपणाचा नाही वाटला

असो
धन्यवाद सर

पीरी चा शेर मला आपण म्हणता तसा विलासीपणाचा नाही वाटला

मलाही वाटते की मला हा शेर कळला नाही.
तू जिधर है जहां है ह्यावरून मी अर्थ लावला.
मला वाटतं चर्चेतून समजून घ्यायचा प्रयत्न व्हायला हवा.

मला वाटतं इथे एक कल्पना केली आहे की की पीरी जवानीला कुठेतरी वाटेत भेटेल कधीतरी
तर शायर म्हणतो ऐ पीरी (माझ्या निर्मोहीपणा ...कदाचित तहान संपल्यावर आलेला ! ) तू जेव्हा कधी बाहेर फिरायला जाशील (समजा आठवंणींच्या बागेत वगैरे )तेव्हा तुला माझी जवानी दिसली तर (नव्हे तिला गाठच तू !!) तिला सांग ..बाईगं तू जिथे आहेस तिथे रहा मजेत रहा (तिथेच रहा जशी आहेस तशी रहा सुखात आहेस ) ...नाहीतर ए माझी पीरी तू माझ्यात नाही आहेस हा मौका साधून ती जवानी माझ्या कडे पुन्हा येइल आणि आता तुला माहीत आहेच की मी तिला काही सुख देवू शकणार नाहीयेय !!!
ह्या शेरात कवीने आध्यात्मिकतेची लाभलेली एक उच्च पातळी तशीच पुढे कायम स्थीर राखणे कसे अवघड जाते आणि ती राखली गेली नाही /पुन्हा येत नाही तोवर काय काय त्रास होत असतील ह्याची कल्पकतेने माडणी केली असावी हा शेर विलासी नाही विलासीपणाला सभ्यपणे "पुन्हा नको" म्हणणारा शेर आहे

अर्थात मत माझे वैयक्तिक आहे Happy
धन्स समीरजी

___________________________

माझा अश्या विषयावरचा पण विरोधी आशयाचा एक सुटा शेर आठवला

विठ्याचा नाद म्हातार्‍या जिवांना ..ठीक आहे
नको वैराग्य वैभ्या ऐन तारुण्यात मिरवू !!

आपण चांगला अर्थ लावला. शेरात निश्चितच कल्पनाविलास आहे. विशेषतः

आध्यात्मिकतेची लाभलेली एक उच्च पातळी तशीच पुढे कायम स्थीर राखणे कसे अवघड जाते आणि ती राखली गेली नाही /पुन्हा येत नाही तोवर काय काय त्रास होत असतील ह्याची कल्पकतेने माडणी केली असावी

हा विचार मला आवडला. माझ्या लेखात त्याप्रमाणे बदल करीत आहे (ढोबळ अर्थ काढून टाकत आहे, शेर पार्टमधे वाचल्यामुळे असे घोळ होतात). धन्यवाद.
इतरांचेही मत ऐकायला आवडेल.

पीरी जो तू जावे तो जवानी से ये कहना
खुश रहियो मरी जान तू जिधर है जहां है

ह्या शेरावर अनंतशी चर्चा झाली. मरी इथे मेरी ह्याच अर्थाने आलेय असे त्याने कन्फर्म केले.
त्याने एका ओळीत सांगितलेला अर्थ असा आहे:
कवी त्याच्या वार्धक्याला म्हणत आहे की तारुण्याला निरोप देशिल जिथे असशील तिथे सुखी रहा.

धन्यवाद.