तू एक कलती दुपार किंवा कलती संध्याकाळ

Submitted by बेफ़िकीर on 12 January, 2015 - 12:57

काही गोष्टींवर, मित्रांनो, कविता नाही लिहावीशी वाटत. असे वाटते की अगदी अक्षर अक्षर लिहावे. समोरच्याला अगदी अक्षर अक्षर वाचता यावे. अगदी कीस पाडता यावा. अगदी वधू व्हावे शब्दांनी आणि वर व्हावे वाचकांनी! प्रत्येकवेळी कविता नाही लिहिता येत!

माझेच कॉलेज! मीच होतो तेथे तीन वर्षे! पदविका घेतली. मग पदवी घ्यायला इतरत्र गेलो. पण ती तीन वर्षे? ती तीन वर्षे ती तीन वर्षे होती जेव्हा एक शाळेतून बाहेर पडलेला अजाण बालक कॉलेजच्या एका अनिर्बंध वातावरणात स्वतःचे संस्कार, मूल्ये आणि भय घेऊन आला होता.

त्याच्या विचारांचा चक्काचूर होताना त्याला जो अनिर्बंधतेचा ताजातवाना आनंद होत होता त्याची तुलना एखाद्या प्रियकराच्या स्पर्शाने प्रेयसीने आजवर जपलेल्या लज्जेतील निरर्थकता जाणवताना त्या प्रेयसीला जो आनंद व्हावा त्याच्याशीच होऊ शकते.

त्या तीन वर्षात मिळालेले मित्र आजतागायत माझ्या विचारांवर प्रभाव टाकतात, इतका की जणू मी केव्हाचाच तसाच आहे. इतका, की जणू त्यांच्यावरही आजही माझाच प्रभाव आहे हे मला समजावे.

त्या तीन वर्षांना तीस वर्षे लोटली आणि कॉलेजच्या स्थापनेला पंचाहत्तर!

एक फोन आला.

"भूषण, आपले कॉलेज! पंचाहत्तर वर्षे! तुझ्यासारखा दुसरा कोण कवी? कॉलेजसाठी काहीतरी लिही! मी संगीत देणार आहे. अख्खा म्युझिशियनचा संच माझाच आहे. चालही मी लावेन. मीच गाईन! भूषण, अरे कॉलेज वाट पाहात आहे."

"दिली"

मी आश्वासन दिले की कविता दिली! पुणे-कोल्हापूर निमआराम विनावाहक विनाथांबा गाडीत सातार्‍याला सुचलेल्या ओळींना कर्‍हाड येईपर्यंत चालही लागलेली आणि कोल्हापूर येईपर्यंत चार कडवीही पूर्ण झालेली. मीच कशीबशी वहीत लिहिलेली. वाचली, तर मलाच रडू आले.

असे होते ना! आपण लिहिलेले वाचून आपण हे लिहू शकलो असे वाटून रडू येते ना!

व्हॉट्स अ‍ॅप वर अख्खी कविता, कविता कसली, गाणेच ते, 'सेन्ड' केली. पाठोपाठ चाल कळावी म्हणून ऑडिओही 'सेन्ड' केला. संगीतकाराचे जवळपास सगळेच काम मी केले. आता फक्त म्युझिक पिसेस राहिलेले होते, जे जुळवणे त्याच्या डाव्या हातचा मळ!

नाही लिहिता येत! प्रत्येक भावनेवर कविता नाही लिहिता येत!

ते वाचून तो म्हणाला, अरे हे तर तू असे लिहिले आहेस येड्या, ज्याच्याकडे डोळेझाक करताच येणार नाही.

पण मित्रा, आपल्याला ना?

संपला विषय!

आपण केले त्यापेक्षा काहीतरी वेगळेच हवे होते हे ऐकून उत्साह संपला होता, पण ऐकून घेतले.

आपल्याला ना, जिंगल ट्यून हवी आहे. जिचा रिंगटोन होऊ शकेल.

अरेच्च्या! इतकेच ना?

पंधरा दिवस होते. मी तेरा दिवस मजा केली. चौदाव्या दिवशी टेन्शन घेतले आणि साडे चौदाव्या दिवशी शब्द व्हॉट्स अ‍ॅप केले. पाठोपाठ त्यालाही लावलेली चाल चक्क फोनवर ऐकवली. मी वृत्ताबाहेर लिहीत नाही. वृत्त सोडून लिहिणार्‍यांबद्दल माझ्या भावन अतीव्र आहेत. मी शुद्ध वृत्तात लिहिले होते. गाऊन दाखवले होते. पण मीटर त्याच्या डोक्यात घुसेना. त्याने वेगळी चाल लावली. इगो आड येऊ दिला नाही म्हणजे नाहीच. तू म्युझिशियन, चाल तुझी, सगळे तुझे! फक्त शब्द माझे.

बरं! त्याने माझ्यावर प्रेम तर इतके केले की काय सांगू! वेडा झाला शब्द ऐकून! पुन्हा पुन्हा मला ट्यून ऐकवू लागला. मी हरखून गेलो.

पंचाहत्तरावा वाढदिवस उजाडला कॉलेजचा! एक हजार मुले प्रांगणात! मनोरंजनाचा कार्यक्रम कोण करणार आहे ह्यात माझे नाव नव्हते. त्याच बिचार्‍याला वाईट वाटले. मला काहीच वाटले नाही प्रामाणिकपणाने.

सांगितले ना? प्रत्येक गोष्टीची कविता करता येत नसते.

भाषणे झाली. मध्यंतर झाले. मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू झाला. रिंगटोन म्हणून ते छोटे गीत ऐकवण्यात आले. त्याला रिसपॉन्स मिळाला नाही. मग मी स्टेजवर गेलो आणि संबंधितांना म्हणालो, कार्यक्रम सुरू करा, गर्दी जमल्यावर पुन्हा ती ट्यून ऐकवा. मीच कवी असल्यामुळे माझे आदराने ऐकले गेले. दोन गाणी झाली. 'जाने जां' आणि आणखीन कुठलेतरी! त्याला तुफान रिसपॉन्स मिळाला.

मग ती ट्यून पुन्हा ऐकवण्यात आली. तिला टाळ्या, शिट्ट्या मिळाल्या. पण शब्दांना नाही, ट्यूनला!

तेच तर म्हणतोय, प्रत्येक गोष्टीची कविता नाही करता येत.

मग पुन्हा गाणी झाली. मग मला आवाहन करण्यात आले. भल्याभल्यांच्या डोळ्यांतून पाणी काढेल असे तुझे ते चार कडव्यांचे गीत तू सादर कर! माझा घसा खराब! गाणे शक्य नव्हते. गद्य स्वरुपात सादर केले. मी ते कॉलेज जॉईन करून तीस वर्षे झालेली. माझ्या लक्षात आले नाही. जे माझ्या पुढेमागे दोन चार वर्षे होते, त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.

पण एक पिढी, एक खूप मोठी पिढी, निराश झालेली होती. माझी कविता बंद व्हावी ह्यासाठी प्रयत्नशील होती. त्या पिढीला असे काहीतरी हवे होते ज्यावर पाय थिरकतील! त्या पिढीला असे काहीतरी हवे होते ज्यावर मुले आणि मुली दोघेही बेभान होऊ शकतील.

माझ्या...... मित्रांनो...... माझ्या कवितेत तसे काहीही नव्हते.

मी एक कलती दुपार होतो. किंवा कलती संध्याकाळ! काय होतो माहीत नाही. माझी कविता सादर करून संपली तेव्हा कविता समजलेल्यांनी भावुक होऊन टाळ्या वाजवल्या आणि न समजलेल्यांनी कविता संपल्याच्या आनंदात कर्णकर्कश्श आरोळ्या दिल्या.

मी इतका मूर्ख, की मला दोन्ही आवाज दादच वाटले.

आपण मूर्ख आहोत ह्या भावनेवर कविता करणे शक्य आहे, त्यावर कविता करणे शक्य आहे हे समजण्यावर कविता करणेही शक्य आहे पण त्या कविता करणे शक्य असण्यावर कविता करणे मला तेव्हा तरी शक्य नव्हते.

पुन्हा गाणी सुरू झाली.

देखा ना हाय रे सोचा ना

ये लडका हाये अल्ला

सुन रहा है ना तू

गुम है किसीके प्यारमे

वगैरे वगैरे!

पहिल्यांदा सगळे डोलत होते. मुलेही आणि मुलीही! आमच्यावेळी असे काही करण्याची हिम्मतच नव्हती. पण ते एक असो! मग मुले बेभान होऊ लागली. मुली मुलांकडे अ‍ॅप्रिसिएशनने, लाजेने पाहू लागल्या. मग मुले आणखीन बेभान झाली. मग मुले खुर्चीवर चढली. मग मुली बसल्या जागेवर डोलू लागल्या. मग मुले शर्ट काढून हवेत भिरकावू लागली. मग मुली उठल्या आणि आपापसात नाचू लागल्या. मग कर्कश्श्य आरोळ्यांनी परिसर दुमदुमला. कित्येक सर येऊन गेले, पण कोणी थांबेना! ते सर स्टेजवर आले की मी आणि माझे समवयीन मित्र त्यांचे पाय धरत होतो. एक सर तर मला मिठी मारून माझ्या कवितेची प्रशंसा त्याही परिस्थितीत करून गेले. पण समोरचा जमाव आमचा नव्हता. तो त्यांच्या आईवडिलांचाही नव्हता. तो कोणाचाच नव्हता. तो जमाव फक्त एक जमाव होता. घशातून निदान मला तरी काढता येणार नाहीत असे आवाज काढत तो जमाव बीभत्स नाचत होता. मुलगा कोण, मुलगी कोण काही समजत नव्हते. गाणी आयात केलेल्या ऑर्केस्ट्रा मंडळींमार्फत चालूच होती. ती बंद करण्याचे आमच्याकडून आणि टीचिंग स्टाफकडून केले गेलेले यच्चयावत प्रयत्न जमावाने फेल ठरवले. शेवटी 'हे आता बंद करावेच लागत आहे' असे दटावून सांगितले तेव्हा आरोळ्या देऊन निषेध नोंदवून एक जमाव पांगला!

त्यावेळी मी मागे बघितले. मी आणलेल्या कवितेच्या प्रिंट्स स्टेजवर चढून नाचणार्‍या जमावाच्या पायदळी तुडवल्या गेलेल्या होत्या. आयात केलेले ऑर्केस्ट्रावाले त्यांचे मानधन घेण्यात गर्क होते. सगळे छान झाले हे सांगण्यात टीचिंग स्टाफ गर्क होता. मजा आली 'भ्येंचोद' म्हणत पोरे कुंपणाबाहेर चालली होती. लाजायचा यशस्वी अभिनय करत मुली एकमेकींशी जवळीक साधत स्टँडकडे चालल्या होत्या.

मी कवितेचे चुरगाळलेले कादग गोळा करत होतो. आठ कॉपीज आणल्या होत्या. मला वाटले होते की एकेक जुने प्रोफेसर ती कविता वाचून डोळ्यांत पाणी आणतील. पाणी माझ्या डोळ्यांत आलेले होते.

सगळ्या गोष्टींवर कविता करणे शक्य नसते. मला ह्या प्रसंगावर कविता रचायची इच्छाच झाली नाही. तशी तर मी तीही रचलीच असती. पण......

.......अधलेमधले अश्रूच फक्त कवितेत नोंदवू शकलो असतो, प्रसंग कसे नोंदवू शकलो असतो? नाही का?

'बेफिकीर', तू नावाचाच 'बेफिकीर'!

अरे तुझा जमाना संपला यड्या! शब्दांनी रडू आणण्याचा जमाना केव्हाच संपला!

शब्दांवर हासण्याचा जमाना आहे हा! नाचण्यासाठी इथे कारण नको असते मित्रा! इथे न नाचण्यासाठी कारण हवे असते. इथे कोणालाही रडायचे नसते वेड्या, इथे प्रत्येकाला तकलादू हसायचे असते.

'बेफिकीर', असे नाही की तुझ्या कवितेत दम नाही रे!

फक्त!

'कवितेतही दम असतो हे माहीत असणारे आता उरलेले नाहीत'!

म्हणून तुला मगाचपासून सांगतोय राव, प्रत्येक गोष्टीची कविता होत नसते.

तू एक कलती दुपार किंवा कलती संध्याकाळ आहेस.

ह्यापुढे तू फक्त पुढच्या पिढीचा जल्लोष बघ! तुला तर नाचताही येत नाही. तुला तर तश्या आरोळ्याही ठोकता येत नाहीत. इतकेच काय, त्यांना खुष करू शकशील अश्या ओळी सहज रचू शकत असूनही तू त्या कधीच रचणार नाहीस हेही तुला माहीत आहे.

गुड बाय 'बेफिकीर', यूअर इरा हॅज एन्डेड लाँग बॅक!

===================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ऋन्मेष!

ह्या ललितावर कोणाला कही म्हणावेसे वाटत आहे का असे वाटण्यासाठी पुन्हा रिफ्रेश करून पाहिले तेव्हा शून्य प्रतिसाद होते. मीच वाचत वाचत खाली आलो तेव्हा तुमचा प्रतिसाद आलेला दिसला. तो वाचून माझ्याच डोळ्यांत पुन्हा पाणी आले.

आभारी आहे. Happy

भाव पोचले... व्यथाही काळजात भिडली.
पण - माझं युग हे माझ्यासाठीच आहे. आणि युग नाही तर आपणच संपत असतो...

जबरी लिहीले आहे बेफि!

ती कविता जमले तर येथे टाका. तेथे जमलेले पब्लिक दंगा करायला जमले होते. मी स्वतः जेव्हा कॉलेज मधे होतो तेव्हा तेथील आठवणींबद्दलची कविता व ऑर्केस्ट्रा गाणी यात गाणीच निवडली असते असे वाटते. त्या आठवणी त्यांना यायला अजून बराच अवकाश आहे. पण त्यातीलच काही लोक पुढे या व इतर मराठी सोशल नेटवर्क्सवर जातील. तेथे जेव्हा वाचतील तेव्हा नक्कीच ते रिलेट होतील. एवढेच नव्हे तर माझ्यासारखे आता कॉलेज सोडून अनेक वर्षे झालेले लोक त्या कॉलेजचे असले नसले तरी त्यांना ती प्रातिनिधिक वाटेल व नॉस्टॅल्जिक करेल यात शंका नाही.

तेव्हा जमाना संपला वगैरे नाही Happy

बाय द वे एक लेखन म्हणून पाहता वपुंचे काही मधे "नॅरेशन" असलेले लेख आहेत तसे वाटले. ते फारसे आवडले नव्हते पण हे आवडले.

तुमच्या इतर लिखाणा पेक्षा हे लिखाण फारच वेगळे होते बेफी..... Happy
जास्त उत्कट आणि किंबहुना जास्त प्रामाणिक !
खुप खुप भावले...एक च सांगावेसे वाटते आहे, जरि लेखाच्या अनुषंगाने तुम्ही लिहिले असले की
>>गुड बाय 'बेफिकीर', यूअर इरा हॅज एन्डेड लाँग बॅक!<< We will say CERTAINLY NOT BEFI.....Certainly Not !!

तुमच्या अश्याच ''खर्या" लिखाणाचा चाहता
प्रसन्न

सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला! तुम्ही त्यावेळेच्या तुमच्या भावना खूप अचूक (acutely) मांडल्या आहेत!
हे असं होतं कधीकधी, गर्दीचा आणि आपला मूड/भावना/विचार जुळत नाहीत पण हे कायम राहात नाही Happy

अगदी डोळ्यासमोर आलं हे चित्र.. मी कॉलेज सोडुन फक्त ६ वर्ष झाले पण परत गेल्यावर गर्दी , वागायची पद्धत बदलली हे लगेच लक्षात आलं होतं..

या लिखाणातून तुमचा एक वेगळाच पैलू दिसला. तुमच्या भावना पोहोचल्या नक्किच. चेंज इस द ओन्ली कॉन्स्टंट थिंग म्हणतात ते खूपच ठळकपणे दिसलं लेखातून.
या जगात सतत कुणी ना कुणी, कुणाला ना कुणाला रिप्लेस करत असतं. पण म्हणून कधी काळी या गोष्टी होत्या त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही.

इतकंच सांगू इच्छिते की तुम्ही संपला नाहीत, तुम्ही लिखाण थांबवलंत तर संपाल.

खुप शुभेच्छा.

<< मग मुले बेभान होऊ लागली. मुली मुलांकडे अ‍ॅप्रिसिएशनने, लाजेने पाहू लागल्या. मग मुले आणखीन बेभान झाली. मग मुले खुर्चीवर चढली. मग मुली बसल्या जागेवर डोलू लागल्या. मग मुले शर्ट काढून हवेत भिरकावू लागली. मग मुली उठल्या आणि आपापसात नाचू लागल्या. मग कर्कश्श्य आरोळ्यांनी परिसर दुमदुमला. >>

कुस्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये हे असले प्रकार? मी तिथे शिकत असताना श्री. मुकुंद नरसिंह कोंढवेकर हे उपप्राचार्य होते. त्यावेळी हे असलं काही करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. त्यावेळी इतर महाविद्यालयांमध्ये रात्री नऊ, साडेनऊच्या पुढे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू होई आणि रात्री उशिरा दोन, तीनच्या पुढे कधीतरी संपत असे पण आमच्या महाविद्यालयात सायंकाळी ०७:३० ला स्नेहसंमेलन संपत असे, अशी कोंढवेकर सरांची शिस्त.

<< 'बेफिकीर', तू नावाचाच 'बेफिकीर'!

अरे तुझा जमाना संपला यड्या! शब्दांनी रडू आणण्याचा जमाना केव्हाच संपला! >>

हा एक क्षणिक झटका अनेकांना आयुष्यात एखाद वेळी बसतो, पण ते पुन्हा त्यातून सावरतात.

साहिर देखील कभी कभी मध्ये सुरुवातीला म्हणतो -

मै पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है|

चित्रपट संपताना पुन्हा नव्या जोशात तो म्हणतो -

हर एक पल मेरी हस्ती, हर एक पल मेरी जवानी है||

तुम्ही देखील ही निराशा संपवून चार दिवसात नव्या कविता सादर कराल असा विश्वास वाटतो.

तुम्ही आला नव्हतात का ७५ व्या अल्युम्नायला?

आमच्यावेळी कोंढवेकर वर्कशॉप सुपरिंटेडंट होते. आता कोथरुडमध्येच राहतात, दिसतात अधूनमधून! त्यांच्या त्या वर्कशॉपमधील केबीनमध्ये कायम एक पान मसाल्याचा सुगंध येत असे.

नाही मी सहसा कुठल्या गर्दीच्या स्थळी जायचे टाळतोच. कोंढवेकर सर पान मसाला चघळत असतील असं कधी जाणवलं नाही. अर्थात मी विद्युत अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला आणि ते यंत्र अभियांत्रिकीच्या अध्यापनाला त्यामुळे त्यांना दुरूनच पाहिलेले आणि ऐकलेले. प्रथम वर्षाला कार्यशाळा सरावाचा एक विषय सर्व अभ्यासक्रमांना होता, तो शिकवायला आमच्या वेळी कार्यशाळा पर्यवेक्षक श्री. मुजुमदार नावाचे एक तरूण प्राध्यापक होते. ते एकदा रजेवर होते म्हणून कोंढवेकर सरांचे दर्शन घडले. तेव्हा त्यांनी आमची चांगलीच हजेरी घेतली. पुर्ण बाह्यांचे शर्ट घालु नका, शक्यतो अर्ध्या बाह्यांचे शर्ट घालुनच कार्यशाळेत प्रवेश करा. जर पुर्ण बाह्यांचे शर्ट घातले तर ते कोपराच्या वरपर्यंत दुमडा. लुझर प्रकारचे सैलसर टीशर्ट घालु नका. अपघात टाळा. या आणि इतर अनेक शिस्तीच्या मुद्यांवर त्यांनी आम्हाला बर्‍याच सूचना केल्या. तीन वर्षे आम्हाला महाविद्यालयात आल्यासारखे कधीच वाटले नाही. एका शाळेतुन पुन्हा दुसर्‍या शाळेतच आलो आहोत असे वाटायचे.

बेफिकीर,

तुमच्या भावना पोहोचल्या. माझ्या शाळूसोबत्यांच्या पुनर्भेटीचा कार्यक्रम झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत नव्हतो. इथे इंग्लंडमध्येच होतो, पण गूगलग्रुपवरून बरेच लोकं एकमेकांच्या संपर्कात होते. तुम्हाला जे सांगायचंय त्याचं सार पोहोचलं. आमचा ग्रुप अगदी किरकोळ होता. पोरंपोरी मिळून जेमतेम १५०. शिवाय एकाच वर्षीचा होता. याउलट तुमच्या वेळेस वेगवेगळ्या वर्षींचे हजारेक जण होते. इतक्या मोठ्या गटात ओळख टिकणं खूप अवघड असतं.

म्हणूनच की काय, मला तुम्ही वा तुमचा जमाना संपला किंवा कलती दुपार वगैरे असं काही वाटलं नाही. Happy ठराविक वयोगटाच्या ठराविक प्रतिक्रिया आणि ठराविक प्राधान्ये इतकंच.

आ.न.,
-गा.पै.

बेफी ती कविता इकडे टाकणार का?

मला पण नव्हते जमले समारंभाला यायला

तुम्ही देखील ही निराशा संपवून चार दिवसात नव्या कविता सादर कराल असा विश्वास वाटतो...>>+१

बेफिकीर जी
तुम्हि छान च लिहिता ..
गुड बाय 'बेफिकीर', यूअर इरा हॅज एन्डेड लाँग बॅक >>
Your era will never end.. it will continue through your writting and through minds of reader Happy
Please dont feel bad.

छान लिहलय..
'कवितेतही दम असतो हे माहीत असणारे आता उरलेले नाहीत'!
सगळेच तसे नाहीत....आम्हीही कवितेवर प्रेम करतो.

छान लिहिलंय ..
टिनू ला अनुमोदन ..
पण बेफि म्हणतात ते हि खरेच, त्यांच्या काळात होते तेवढे तसे लोक नाहीत आता ..
असे एखाद्या कवितेवर, पुस्तकावर वगेरे गप्पा मारायला मित्रच मिळत नाहीत तेव्हा अगदी हताश व्हायला होतं
मी खूप वेळा हा अनुभव घेतलाय .. Sad

भयंकर लिहिता राव तुम्ही..... आसूड ओढले गेले अंगावर जसे..... फ्लेशबेक मधे जाऊन तुम्हाला बघावं वाटतंय त्या निर्मनुष्य गर्दीत......