पुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा

Submitted by वरदा on 11 February, 2012 - 10:10

एवढ्यातल्या एवढ्यात दोन-तीन प्रचिंच्या बाफवर मंदिरांच्या, मूर्तींच्या अवशेषांबद्दल मला मत विचारण्यात आलं. प्रत्येक वेळा अशा शंका त्या बाफवरून माझ्यापर्यंत किंवा इतर तज्ज्ञांपर्यंत पोचतीलच असं नाही, म्हणून हा नवा बाफ.

ज्याला/ जिला एखाद्या प्राचीन/मध्ययुगीन अवशेषांबद्दल माहिती हवी असेल, त्यांनी इथे छोटं प्रचि किंवा त्याचा दुवा डकवावा (यात देऊळ, मूर्ती, शिल्प, नाणी, वीरगळ, शस्त्रास्त्रं, खापरं, लेख, स्थापत्याचे अवशेष असं काहीही येऊ शकतं).

मी सर्वज्ञ नक्कीच नाही. मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी देईनच, आणि जे मला येत नाही त्याची ओळख पटवणारी इतर लोकं इथे निश्चितच असतील. तेव्हा आपल्या सर्वांच्या (माझ्यासकट) ज्ञानात काहीनाकाही भर पडेलच! त्या निमित्ताने आपण आपल्या आसपास काय सांस्कृतिक वारसा आहे हे थोडंसं सजगपणे पाहू लागलो तरी वारसा संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल पडेल..... शिवाय एका अत्यंत प्राथमिक पातळीवर, थोडंसं विस्कळित का होईना, पण अज्ञात अवशेषांचं एक डॉक्युमेंटेशन सुरू होईल अशी आशा आहे.

काही मराठीतून उपलब्ध असलेली बेसिक पुस्तके -
१. प्राचीन भारतीय मूर्तीशास्त्र (नी. पु. जोशी)
२. प्राचीन भारतीय कला (म. श्री. माटे)
३. पुराभिलेखविद्या (शोभना गोखल)
४. प्राचीन भारतीय नाणकशास्त्र (म. के. ढवळीकर)
५. महाराष्ट्र: इतिहास - प्राचीन काळ - स्थापत्य व कला (अ.प्र. जामखेडकर)
६. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार (कल्पना रायरीकर व मंजिरी भालेराव)

यातील शेवटची दोन पुस्तके अलिकडची आहेत व सहजी उपलब्ध आहेत. पहिली चार ही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने काढली होती. त्यातील नाणकशास्त्र व पुराभिलेखविद्या ही कॉन्टिनेन्टलने पुनर्प्रकाशित केली आहेत. बाकीची मिळणं जरा दुरापास्तच आहे.
आणखी लक्षात येतील तशी इथे यादी टाकेन. उद्देश असा की ज्यांना रस आहे त्यांना ती पुस्तके वाचून स्वतःच अनेक गोष्टी उलगडतील. Happy

त.टी.
१. खूप प्रचि आल्याने सर्व्हरवरील ताण वाढेल हे खरं आहे, पण जर वाहतं पान झालं तर डॉक्युमेन्टेशनच्या दृष्टीने अडचण येईल. यावर उपाय सुचवल्यास आभारी राहीन.

२. कृपया इथे हिंदू संस्कृती वि. मुस्लिम आक्रमक, जातीय व इतर सामाजिक भेदाभेद, स्वघोषित संस्कृतिरक्षक वि. स्वघोषित बुप्रावादी असे वाद घालू नयेत अशी नम्र विनंती. त्यासाठी इतर बाफांची रणांगणं झाली आहेतच. या बाफाची समिधा त्यात टाकू नये. त्यापेक्षा या उपक्रमात सहभागी झालात तर सांस्कृतिक वारसा संवर्धनाला थोडाफार का होईना हातभार लागेल.
तसेच मला इथे ताजमहाल आणी अशाच वास्तू हिंदू आहेत का आणखी काही यावर चर्चा नको आहे. ज्यांना अशा वादांत रस आहे त्यांनी कृपया नवा धागा उघडावा. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्चिग, वाचू आनंदेवर या पुस्तकाचा उल्लेख वाचला, लगेच डाउनलोड करुन घेतलं. वाचेन सावकाश. ईन्टरनेटचे उपकार.

डाउनलोड लिंक

http://dc194.2shared.com/download/L1-YITvy/Erich_Von_Daniken_-_Chariots_...

चर्चा छान चालली आहे.

aschig आणि बागुलबुवा

मी हे पुस्तक वाचले आहे

मराठी आनुवाद पहिजे असल्यास खालिल पुस्तक वाचणे

देव छे ..... परग्रहा वरिल आंतराळविर
बाळ भागवत

http://www.bookganga.com/eBooks/Book/5556151802168856908.htm?Book=Dev-Ch...

माझा सल्ला

असली पुस्तके वाचुन डोक फिरवुन घेवु नका

आजुन allian सापडले नाहियेत आणि सापडणार पण नाही

वरदा, इथे परत एकदा विचारते माझे प्रश्न.
१ एखाद्या साइटवर खोदकाम करताना जर खाली काही अवशेष सापडले तर काय करावे ? ASI ला अशा ठिकाणचे काम थांबवायचे अधिकार असतात का?
२ जमिनीचे सर्व्हे करताना अशा अवशेषांबद्दल काही कळू शकते का?
३ काही महत्वाच्या हेरिटेज टिकाणांपासुन काही अंतर नविन बांधकामावर निर्बंध घालता येतात का?

नमस्कार खरच खूप चागला धागा आहे ..
रोहन भाऊ ...आपण दिलेल्या
रतनवाडी येथील विखुरलेले अवशेषात चित्र क्र ४शी मिळते जुळते शिल्प आम्हाला मानगड च्या पाय्थाशी स्वच्छता करताना आढळली आहे पण त्या मिळालेल्या शिल्पाचा गडाशी संबध कसा लावावा ....आणि गडावर अश्या प्रकारतील किवा कोणतीही शिल्प नाही .......नेमका ह्या प्रकारातील शिल्प कला कोणत्या काळात केली असावी ......
कृपया आमच्या ज्ञानात भर करावी

बरं झालं हा धागा अनायसे वर आला! आज एक बातमी वाचली : विदर्भात १२००० वर्षे जुनी संस्कृती सापडली आहे.

वरील बातमीनुसार खडकांवरची चित्रशैली १२००० वर्षांपूर्वीच्या उच्चपुरापाषाण (=?) युगातील आहे. तर मग खडक आजून जुने असावेत नाहीका? जाणकारांनी कृपया अधिक प्रकाश टाकावा.

-गा.पै.

लोकहो,

सिंधू संस्कृतीतले सर्वात जुने अवशेष मेहेरगड (पाकिस्तान) येथे मिळाले आहेत. ते सुमारे ७५०० वर्षे जुने आहेत. तर मग विदर्भातल्या १२००० वर्षे जुन्या अवशेषांची संगती कशी लावावी?

तत्ज्ञ लोकांनी कृपया प्रकाश टाकावा.

आ.न.,
-गा.पै.

http://www.thehindu.com/news/cities/chennai/ancient-idols-unearthed/arti...

हे अवशेष जिथे सापडले आहेत तिथे नुकत्याच एका बंदराच्या विकासाचे काम चालू झाले आहे. पुरातनकाळी हे एक विकसित बंदर असावे का?

कोकणात रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर, राजापूर, लांजा परिसर व उपळे गावी अशी प्राचीन गूढ कातळ-शिल्पे आहेत.त्यांचा अभ्यास सुरू आहे .निश्चित काल माहीत नाही .

kokanshilp.jpg

मंदार कात्रे,

१२००० वर्षे जुन्या वैदर्भीय संस्कृतीची ८००० वर्षे जुन्या कोकणी संस्कृतीशी ७५०० वर्षे जुन्या सिंधू संस्कृतीच्या संदर्भात सांगड घालणे आवश्यक आहे.

पुरातत्त्व तत्ज्ञ मंडळींचं भाष्य ऐकायला आवडेल. मात्र कोणी पुढे येत नाहीये. Sad

आ.न.,
-गा.पै.

अनेको दिवसांचा बॅकलॉग क्लीअर करायचा प्रयत्न Happy
@रोहन - रतनवाडी अवशेष प्रचिंविषयी -
१ व २ मध्ययुगीन स्मृतिशिला
३ - मंदिराच्या स्तंभशीर्षाचा भाग (साधारण १२वं १३वं शतक)
४ - वरील मंदिराला साधारणपणे समकालीन असलेले वीरगळ

@स्वच्छंदी - वीरगळ सर्वसाधारणपणे तीन भागांत कोरलेले असतात. सर्वात खालच्या दृश्यात तो वीर कुठल्या कारणाने मृत्यू पावला त्याचं अंकन असतं, मधल्या भागात त्याला दोन अप्सरा स्वर्गात/ कैलासात घेऊन जाताना दाखवलेल्या असतात (रतनवाडी प्रचि ४ मधे हे अंकन नाही. दोन्ही ठिकाणी युद्ध इ. च आहे). आणि सर्वात वरच्या भागात ती मृत व्यक्ती शिवाची पूजा करताना दाखवतात. म्हणजे ती आता शब्दशः कैलासवासी झाली आहे असा अर्थ.
बर्‍याच ठिकाणी वीरगळांची मूळ जागा माहित नसते/ बदललेली असते. तेव्हा वसाहतीबाहेरचे वीरगळ कदाचित युद्धस्थळाशी निगडित असू शकतील तर गावातले त्या वीराचं ते मूळ गाव असंही असू शकेल. ठामपणे सांगता येणं अवघड आहे

@नील - एकूण अवशेष नेहेमीप्रमाणेच खूप खंडित आहेत. साधारणपणे १३व्या शतकाच्या आसपासचे असावेत. ढोबळमानाने शिलाहार काळ.
१ एका मनुष्याकृतीचा वरचा भाग (torso)
२. ७ मंदिराच्या गाभार्‍याच्या द्वारशाखेचा भाग
३ मंदिरातील चंद्रशिला किंवा पायरीसारखा भाग
४ शिवलिंगाचं योनीपीठ
५, ६ स्थापत्याचा (मंदिराचा?) खंडित भाग
८ खूप झिजल्यामुळे नक्की कळत नाहीये
शेवटचा दगड गद्धेगाळसारखाच दिसतोय पण मध्ययुगीन आहे. वरील अवशेषांच्या नंतरच्या काळातला.

@नंदिनी - पल्लव काळातल्या मूर्तींवरून एवढंच म्हणता येईल की तिथे पल्लवकालीन वसाहत होती. बंदर होतं की नाही हे पडताळून बघण्यासाठी पुराभिलेख शिवाय बंदराशी संबंधित पुरावशेष मिळाले पाहिजेत. कल्पनेच्या भरार्‍या मारण्यात अर्थ नाही.

@गा.पै, मंदार कात्रे -
मेहेरगढ ही सिंधूपूर्व काळातील वायव्य भारतीय उपखंडातील माहित असलेली सर्वात जुनी नवाश्मयुगीन वसाहत आहे. त्याच्याशी संबंधित अगदी बेसिक असे दुवे
http://www.harappa.com/indus/indus4.html
http://whc.unesco.org/en/tentativelists/1876/
http://en.wikipedia.org/wiki/Mehrgarh

भारतीय उपखंडात साधारणपणे दहापंधरा लाख वर्षांपूर्वीपासूनच अश्मयुगीन मानवाचा वावर होता. शिवालिक पर्वतात साधारणपणे वीस लाख वर्षांपूर्वीपासून. संपूर्ण भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी/ प्रदेशात पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग-ताम्रपाषाणयुग अशी बर्‍यापैकी स्वतंत्र प्रगती झालेली दिसते. त्याचा वेग मात्र कमीजास्त होता. म्हणजे वायव्येत सिंधू नागरी संस्कृती उदयाला आली तरी इतर भारतात शहरीकरण पोचलं नाही.
विदर्भात सातवाहन काळाआधीसुद्धा अनेक प्रागैतिहासिक आणी इतिहासपूर्व काळातले अवशेष आहेत हे सर्वज्ञात आहे (मटा सोडून बहुदा). मध्यभारतात अनेको ठिकाणी असे शिलाश्रय आणि भित्तीचित्रं आढळली आहेत. तशीच विदर्भात आढळली. त्याने विदर्भाच्या इतिहासकालरेषेत काहीही फरक पडत नाही
विदर्भ आणि कोकण इथे सापडलेल्या चित्रांची/ शिल्पांची कुठलीही अ‍ॅब्सोल्यूट डेट - शास्त्रीय कालमापन - उपलब्ध नाही. विदर्भात या चित्रांबरोबर जे पुरातत्वीय अवशेष सापडले त्यावरून एक अंदाजे कालखंड ठरवला गेला. पण कोकणातील शिल्पांबरोबर असे कुठलेही पुरावे सापडले नाहीत. नुसत्या भिंतीची अशी तारीख नक्की करणंही शक्य नाही. संशोधकांनी त्यासाठी बदलत्या समुद्रपातळीचा हवाला दिलेला आहे पण ६००० इ.स.पू. नंतर समुद्रपातळीत असे मोठे बदल झालेच नाहीत असं नाहीये तेव्हा या एका कारणावर भिंतीचा काळ ग्राह्य ठरत नाही. शिल्पांच्या बाबतीतही तेच आहे. त्यांना पूरक असे कुठलेही पुरावशेष तिथे आसपास सापडले नाहीत. कोकण किनार्‍यावरचे पक्कं कालमापन असलेले अवशेष साधारणपणे साडेतीन ते तीन हजार वर्षांपूर्वीपासून नंतरचे आहेत. कुठेही सातवाहनकाळाच्या आधीच्या नागरी संस्कृतीचे अवशेष सापडलेले नाहीत.
या अवशेषांचा संबंध कुठेही सिंधू संस्कृतीशी येत नाही. मेहेरगढशी तर नाहीचनाही. सिंधूसंस्कृतीच्या नागरीकरणाबरोबरच मेहेरगढची वसाहत उजाड झाली. सिंधूसंस्कृतीचा प्रभाव खर्‍या अर्थाने गुजरातपर्यंत आणि उत्तरसिंधू काळाच्या सांस्कृतिक प्रभावाचे तरंग खानदेशपर्यंत आणी प्रवरेच्या खोर्‍यातल्या दायमाबादपर्यंत पोचले. एवढंच.

वरदा,

महाराष्ट्रात अश्या कोणत्या साईटस आहेत ज्या र्वल्ड हेरिटेज साईट च्या खाली येतात ?

एलोरा येथील कैलास मंदिर हे वर दिलेल्या प्रमाणे हेरिटेज साईट खाली येत का ? कैलास मंदिर कोणी, केंव्हा,व कस घडवल या बद्द्ल जर आपण प्रकाश टाकू शकाल का ?

अजिंठा - एलोरा, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि सह्याद्रीचा काही भाग हे ३ उनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये येतात. Happy

जवळ जवळ दोन वर्षांनी या धाग्याला जाग आलेली दिसतेय Happy

वरती लिहिल्याप्रमाणे अजंठा, वेरूळ, घारापुरी/एलेफंटा हे लेणीसमूह, छत्रपती शिवाजी टर्मिनस व सह्याद्री हे वर्ल्ड हेरिटेज साईट्समधे मोडतात. भारतातील एकूण युनेस्कोने मान्यता दिलेल्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सची यादी तुम्ही इथे बघू शकता.

वेरूळमधील लेणे क्र.१६ उर्फ कैलास हे अखंड एका पाषाणातून कोरून काढलेले मंदिर आहे. त्याची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला (इ.स. ७५७-७८३) याच्या काळात झाली.

धागा जागा झालेला आहे. Happy

मला काही फोटो टाकायचे आहेत. आज उद्या अपलोड करेन.

वरदा, मी पहिल्या धाग्यावर जोतिबाविषयी एक शंका विचारली होती. त्यावर काही अधिक माहिती मिळू शकेल का?

वेरूळमधील लेणे क्र.१६ उर्फ कैलास हे अखंड एका पाषाणातून कोरून काढलेले मंदिर आहे. त्याची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला (इ.स. ७५७-७८३) याच्या काळात झाली.

१४०० वर्षा अगोदर अखंड पाषाणातुन कैलास मंदिरासारख मोठ मंदिर कोरुन काढण ह्या वर भारताच्या
पुरातत्व विभागाने का ही संशोधन केल आहे काय ? म्हणजे अश्या कोरुन काढण्यासाठी कुठली हत्यार वापरली, किती काळ लागला , किती कामगार लागले वैगेरे, त्या कामगारांना कोण वेतन देत होत ? काही दुसरी मोटीव्हेशनस होती का ?

एका अंदाजा नुसार कैलास मंदिर कोरुन आढण्यासाठी ४००,००० टन पाषाण कोरुन काढावा लागला असला पाहीजे,
जर विस वर्षांचा काळ धरला तरीही दर दिवसाला ५० टन पाषाण कोरुन काढाव लागेल आणि त्या साठी किती लोक लागतील, जर संपुर्ण भारतातुन आणले तरीही त्या जातीचे (पाषाणावर काम करणारे ) लोक मिळण कस शक्य झाल ?

माझा झब्बू

ह्याला Trilobite म्हणतात. हा एक खूप खूप खूप जुना (याचं कार्बन डेटिंग केलेलं पण आता आकडा लक्षात नाहीये Sad ) किडा आहे. http://www.trilobites.info/trilobite.htm इथे याची अजून माहिती मिळेल. मुंबई विद्यापीठाच्या प्रदर्शनात मी हा विकत घेतला. मला नीटशी माहिती लक्षात नाहीये आता. वरदाताई आहेच! Happy

महाराष्ट्रात अश्या कोणत्या साईटस आहेत ज्या र्वल्ड हेरिटेज साईट च्या खाली येतात ?

http://whc.unesco.org/en/statesparties/in इथे संपूर्ण यादी आहे. शिवाय सह्याद्री (संपूर्ण पश्चिम घाट) hottest hotspots of biological diversity मध्ये पण येतो. म्हणजे असा भाग ज्याला माणसांपासून प्रचंड धोका आहे Sad Sad

>>>>> एका अंदाजा नुसार कैलास मंदिर कोरुन आढण्यासाठी ४००,००० टन पाषाण कोरुन काढावा लागला असला पाहीजे, जर विस वर्षांचा काळ धरला तरीही दर दिवसाला ५० टन पाषाण कोरुन काढाव लागेल आणि त्या साठी किती लोक लागतील, जर संपुर्ण भारतातुन आणले तरीही त्या जातीचे (पाषाणावर काम करणारे ) लोक मिळण कस शक्य झाल ?>>>>>>

ह्याला जोडून आणखी एक प्रश्न परवा एपिक वाहिनीवर कैलाश मंदिरची माहिती संरचना कार्यक्रम बघताना पडलेला. दिवसाला ५० टन पाषाण कोरल्यावर त्याची विल्हेवाट कशी लावली गेलेली? त्या परिसरामध्ये ह्या ४००००० टन पाषाणाचे काही अवशेष मिळतात का?

+++++++दिवसाला ५० टन पाषाण कोरल्यावर त्याची विल्हेवाट कशी लावली गेलेली +++++

कोरुन निघालेला पाषाण तुकडा, खडक अजिंठ्याच्या जवळ कुठेच सापडत नाही. ह्या साईटवर चाललेल्या
रिस्टोरेशन कामासाठी लागणारा खड्क ६० किमी दुरवरुन आणावा लागला.
ईतका पाषाण खडक कुठे नेउन टाकला असावा हा एक मोठा प्रश्न आहेच.

छान

Pages