पुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा

Submitted by वरदा on 11 February, 2012 - 10:10

एवढ्यातल्या एवढ्यात दोन-तीन प्रचिंच्या बाफवर मंदिरांच्या, मूर्तींच्या अवशेषांबद्दल मला मत विचारण्यात आलं. प्रत्येक वेळा अशा शंका त्या बाफवरून माझ्यापर्यंत किंवा इतर तज्ज्ञांपर्यंत पोचतीलच असं नाही, म्हणून हा नवा बाफ.

ज्याला/ जिला एखाद्या प्राचीन/मध्ययुगीन अवशेषांबद्दल माहिती हवी असेल, त्यांनी इथे छोटं प्रचि किंवा त्याचा दुवा डकवावा (यात देऊळ, मूर्ती, शिल्प, नाणी, वीरगळ, शस्त्रास्त्रं, खापरं, लेख, स्थापत्याचे अवशेष असं काहीही येऊ शकतं).

मी सर्वज्ञ नक्कीच नाही. मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी देईनच, आणि जे मला येत नाही त्याची ओळख पटवणारी इतर लोकं इथे निश्चितच असतील. तेव्हा आपल्या सर्वांच्या (माझ्यासकट) ज्ञानात काहीनाकाही भर पडेलच! त्या निमित्ताने आपण आपल्या आसपास काय सांस्कृतिक वारसा आहे हे थोडंसं सजगपणे पाहू लागलो तरी वारसा संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल पडेल..... शिवाय एका अत्यंत प्राथमिक पातळीवर, थोडंसं विस्कळित का होईना, पण अज्ञात अवशेषांचं एक डॉक्युमेंटेशन सुरू होईल अशी आशा आहे.

काही मराठीतून उपलब्ध असलेली बेसिक पुस्तके -
१. प्राचीन भारतीय मूर्तीशास्त्र (नी. पु. जोशी)
२. प्राचीन भारतीय कला (म. श्री. माटे)
३. पुराभिलेखविद्या (शोभना गोखल)
४. प्राचीन भारतीय नाणकशास्त्र (म. के. ढवळीकर)
५. महाराष्ट्र: इतिहास - प्राचीन काळ - स्थापत्य व कला (अ.प्र. जामखेडकर)
६. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार (कल्पना रायरीकर व मंजिरी भालेराव)

यातील शेवटची दोन पुस्तके अलिकडची आहेत व सहजी उपलब्ध आहेत. पहिली चार ही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने काढली होती. त्यातील नाणकशास्त्र व पुराभिलेखविद्या ही कॉन्टिनेन्टलने पुनर्प्रकाशित केली आहेत. बाकीची मिळणं जरा दुरापास्तच आहे.
आणखी लक्षात येतील तशी इथे यादी टाकेन. उद्देश असा की ज्यांना रस आहे त्यांना ती पुस्तके वाचून स्वतःच अनेक गोष्टी उलगडतील. Happy

त.टी.
१. खूप प्रचि आल्याने सर्व्हरवरील ताण वाढेल हे खरं आहे, पण जर वाहतं पान झालं तर डॉक्युमेन्टेशनच्या दृष्टीने अडचण येईल. यावर उपाय सुचवल्यास आभारी राहीन.

२. कृपया इथे हिंदू संस्कृती वि. मुस्लिम आक्रमक, जातीय व इतर सामाजिक भेदाभेद, स्वघोषित संस्कृतिरक्षक वि. स्वघोषित बुप्रावादी असे वाद घालू नयेत अशी नम्र विनंती. त्यासाठी इतर बाफांची रणांगणं झाली आहेतच. या बाफाची समिधा त्यात टाकू नये. त्यापेक्षा या उपक्रमात सहभागी झालात तर सांस्कृतिक वारसा संवर्धनाला थोडाफार का होईना हातभार लागेल.
तसेच मला इथे ताजमहाल आणी अशाच वास्तू हिंदू आहेत का आणखी काही यावर चर्चा नको आहे. ज्यांना अशा वादांत रस आहे त्यांनी कृपया नवा धागा उघडावा. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला असं दिसतंय :

श्रीसदाशिव_ _
श्रीदिवानवीरसा
हिस किलेदार अलं
ग प्रौ_ _ राजमाच
सि _ _ दो _ आता
कि(?) अर्धांगी श्रीदेव
कवरिस_ (गौतम?)
_तिन जडि(?)गा

वरदाजी,

मस्तच धागा... खरचं अश्या धाग्याची गरज होती.. निवडक दहांत नोंदवलेय..

सह्याद्रीत फिरताना हे असे का? ह्याचा अर्थ काय ? असे अनेक प्रश्ण सतत उभे राहतात. त्या पैकी काही प्रश्णावर येथे प्रकाश पडेल हे नक्की...

अनेक प्रश्ण डोक्यात आहेत.. पण संगतवार मांडायला थोडा वेळ लागेल...

वरदा, माझी एक खूप दिवसापासूनची शंका. माझा या विषयात काहीच अभ्यास नाही त्यामुळे हे कदाचित चूक देखील असू शकते.

रा.चिं ढेरे यांचे लज्जागौरी हे पुस्तक मी खूप दिवसापूर्वी वाचलं होतं. नुकतंच पुन्हा एकदा वाचलं तेव्हा डोक्यात आलेला किडा. कोल्हापूरच्या जोतिबाबद्दल त्यानी जी माहिती दिली आहे, त्यामधे एक महत्त्वाचा उल्लेख अथवा आख्यायिका नाही आहे. वाडी रत्नागिरीचे नाव कसे पडले हे सांगताना त्यानी सिंधमधून आलेल्या लोकांची वगैरे माहिती दिली आहे. त्यामधे हे लोक रत्नागिरीच्या बंदरावरून आल्यामुळे डोंगराला वाडी रत्नागिरी असे नाव आहे असे म्हटले गेले आहे.

खरी गोष्ट अशी आहे की, भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी एक छोटेसे घुमटीसारखे देऊळ आहे. हे देखील जोतिबाचेच देऊळ आहे. आख्यायिका अशी आहे की, हे जोतिबाचे मूळ स्थान. अंबाबाई जेव्हा कोलासुराबरोबर लढत होती तेव्हा जोतिबा तिच्या मदतीला गेला. आणि नंतर तिथेच एका डोंगरावर राहिला. म्हणून त्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे नाव पडले.

याच जोतिबाचाच एक भाऊ विरोबा म्हणून आहे. (तो अजून रत्नागिरीतच आहे.) लढण्यच्या भितीने तो गेला नाही आणि जमिनीत तोंड खुपसून बसला आहे.

ही आख्यायिका इथे फक्त शेअर करावीशी वाटली म्हणून सांगितली. पुढच्या वेळेला रत्नागिरीला गेले की या जोतिबा-विरोबाचे फोटो जरूर काढेन.

DAM3.JPG

हा फोटो दिवेआगर येथील एका मंदिरातील मुर्तीचा आहे. इथे एक शिलालेख पण आहे पण त्याचा स्पष्ट फोटो माझ्याजवळ नाही. यावर काही संशोधन झाले आहे का ?

वरदा, मस्त धागा. तुझ्याकरता (किंवा कोणाही माहितगाराकरता) काही प्रश्नः

१. नरसिंहाच्या संदर्भात 'योगपट्टा' म्हाजे काय?
२. शंकराच्या देवळाचा गाभारा सहसा जमिनीच्या पातळीच्या खाली का असतो?

>>> १७) इथे अगदी ठळकपणे दिसत आहे की कृष्णानी कंसाचा शेवटी वध केला.. <<<
तो जरासंधाचा भीमाने केलेला वध तर नाही ना?
पण असो.
चान्गलाय धागा.

शिलालेख वाचताना त्याचा पीओपी मधे साचा करुन वाचायची पद्धत आपल्याकडे वापरतात का ? तसे वाचणे जास्त सोपे जाईल ना ?

छोट्या आकाराच्या पृष्ठभागांवरचा मजकूर अथवा चित्र असेल तर पेन्सिलीच्या सहाय्याने कागदावर ट्रेस करून घेताना बघितलंय काही जणांना. ती रेग्युलर प्रॅक्टीस आहे की नाही माहित नाही पण.

छान धागा, वरदा.
गेल्या पंधरा वर्षांत मेंदूवर चढलेली धूळ - गंज इत्यादी त्या निमित्ताने झटकला जाईल!! Proud

विराट सितेचे हरण करतो आहे.. तिला पळवून नेतो आहे हा प्रसंग ह्या शिल्पकामात चितारलेला आहे. बाजूला विष्णुचे वाहन गरुड दाखवले आहेत. (पण माझ्यामते विष्णुचे वाहन शेषनाग ना? मला तिथे जी माहिती मिळाली ती गरुड विष्णुचे वाहन अशी होती.)>>>>>>

बी विष्णुचे वाहन गरुडच आहे. शेषनाग हे त्याचे आसन आहे Happy
400_F_4743031_Z1kfY46qcL4YQI2DyXj1CfujD8TLqiOF.jpg740851.jpg

वरदा उत्तरे देणारच आहे म्हणून २ शंका विचारायच्या आहेत (बालिश आहेत तरिही.)

१) आपल्याकडे जी पूजेतली मुख्य मूर्ती असते ती नेहमी सुबक आणि तुळतुळीत पॉलिश केल्यासारखी दिसते. पण खांबावरच्या, बाहेरच्या बाजूच्या, भिंतीवरच्या ज्या मूर्ती असतात त्या सुबक असल्या तरी त्यावर पॉलिश केल्यासारखे दिसत नाही. माझी शंका अशी कि त्या मूळातच तशा असत कि त्यावर हवामानाचा परिणाम झाल्याने त्या तशा दिसतात. त्याकाळी त्यावर लेप वगैरे लावला होता आणि नंतर तो नष्ट झाला, असे झाले असेल का ?

२) अभिनेत्री / नर्तिका मिनाक्षी शेषाद्री हिने एका मुलाखतीत मजेशीर माहिती सांगितली होती. ती म्हणाली सध्या आम्ही सादर करतो ती ओडीसी नृत्यशैली शिल्पांवरुन बेतलेली आहे. या शैलीत हातांच्या हालचाली या प्रामुख्याने शरीराच्या वर किंवा बाजूला असतात. शरीराच्या समोर असल्या तर हात अंगापासून फार लांब नेले जात नाहीत. याचे कारण कि दगडातून मूर्ती कोरताना असे हात दाखवणे थोडे कठीण होते. त्यांना वेगळा आधार द्यावा लागला असता.
आता माझी शंका अशी, कि आधी हि शैली विकसित झाली असेल कि शिल्पकला ?

अभिनेत्री / नर्तिका मिनाक्षी शेषाद्री हिने एका मुलाखतीत मजेशीर माहिती सांगितली होती. ती म्हणाली सध्या आम्ही सादर करतो ती ओडीसी नृत्यशैली शिल्पांवरुन बेतलेली आहे. या शैलीत हातांच्या हालचाली या प्रामुख्याने शरीराच्या वर किंवा बाजूला असतात. शरीराच्या समोर असल्या तर हात अंगापासून फार लांब नेले जात नाहीत. याचे कारण कि दगडातून मूर्ती कोरताना असे हात दाखवणे थोडे कठीण होते. त्यांना वेगळा आधार द्यावा लागला असता.
आता माझी शंका अशी, कि आधी हि शैली विकसित झाली असेल कि शिल्पकला ?

>>>> दिनेशदा, मला वाटतं आधी शिल्पकला आली असणार. ओडिसी, भरतनाट्यम इ नृत्यप्रकार सर्वप्रथम मंदिरात सादर केले जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावर शिल्पकलेचा प्रभाव असणे शक्य आहे.

मामी, तरीही गोंधळ आहेच माझ्या मनात. शिल्पकारांनी केवळ स्वतःच्या कल्पनेतून, प्रत्यक्षात अशी अल़ंकार आणि वस्त्राने सजलेली नर्तिका बघितलेली नसताना, अशी शिल्पं घडवली ?
तसे असेल तर त्यांच्या प्रतिभेला करावेत तेवढे सलाम कमीच आहेत.

असं एक आधी आलं मग दुसरं नंतर आलं असं नसतं.
दृश्य कला आणि ललित कला दोन्हींची प्रगती एकत्रच होत असते. दोन्ही एकमेकांवर परिणाम करत असतात.

नी ते पटतय. पण ते हात जास्त समोर न न्यायचं काय कारण ? ती मर्यादा असलीच तर फक्त शिल्पांनाच होती.

प्रत्येक अभिजात नृत्यशैलीमधील ग्रामर हे शक्यतो भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारीत असतं. पण त्यांना स्वतःचं एक एस्थेटिक पण असतं. शिल्पकला हा एक मुद्दा आहेच. तसंच संपूर्ण डिझाइन पण आहे.
ओडीसीचं त्रिभंग हे पोश्चर असं आहे ज्यात शरीरापासून अंतरावर असलेले हात असल्यास संपूर्ण डिझाइनचा तोल (दृश्यकलेसंदर्भातील तोल. प्रिन्सिपल्स ऑफ डिझाइन्स या संदर्भाने!) जावू शकतो.

आभार नी, खरंच तशा मुद्रा असत्या तर ओडीसीचा तोल गेल्यासारखा वाटला असता.
वरदाने, भारताची मर्यादा घातलीय, पण तरीही

बालीमधल्या नृत्यात मात्र तशा मुद्रा असतात. राजश्रीने, गीत गाया पत्थरोने मधे त्याचा एक नमुना पेश केलाय. त्या शैलीचा आणि त्या देशातील शिल्पकलेचा काही संबंध असेल का ?

१. ललिता आणि लिंबूटिंबू, तुमच्या फोटोंवरून लेख वाचणं अवघडच आहे जरासं. आणि लोहगडावरच्या लेखाचं वाचन झालंय माझ्यामते (मी वाचलेलं नाही)
२. नितिनचंद्र, तुम्ही टाकलेल्या फोटोतली विष्णुमूर्ती ११-१२व्या शतकातली असावी. दिवेआगरच्या लेखाचं वाचन झालेलं आहे.
३. दिनेशदा, बरेच वेळा मूर्तींना पॉलिश नसतंदेखील. पॉलिशची वेगवेगळी कारणं असू शकतात. एक तर मंदिराच्या दगडापेक्षा मूर्तीला वापरेलेला दगड वेगळा असू शकतो. किंवा पूजेतली मूर्ती असेल तर रोज धू-पूस होते, गंध, तेल वगैरे लावलं जातं त्यामुळे फिनिशिंग बाहेरच्या मूर्तींपेक्षा वेगळं वाटू शकतं.
४. दिनेशदा, लेखाचे ठसे पीओपी ने घेत नसत. त्याची पद्धत मी तुम्हाला उद्या परत एकदा खात्री करून घेऊन सांगेन. आता डिजिटल कॅमेर्‍यामुळे खूप सोपं झालंय लेखाची 'प्रत' काढणं.
५. दगडात मूर्ती कोरताना कठीण काहीच नसतं. उलट एरवी जे शक्य नाही त्या पोजेसही तिथे दाखवता येतात. नाचातलं मला काहीच कळत नाही. पण त्याबाबतीत नी चे मुद्दे पटतात.

६. महाराष्ट्रातल्या लेण्यांमधील सर्व महत्वाच्या लेखांचं वाचन तुम्हाला 'महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार' - कल्पना रायरीकर आणि मंजिरी भालेराव या गेल्या वर्षी डायमंड प्रकाशनाने काढलेल्या पुस्तकात मिळतील.
(@महानगरी, पुराभिलेखविद्या या पुस्तकात भारतातील महत्वाचे अभिलेख दिले आहेत.)

उरलेल्या प्रश्नांची उत्तरं नंतर देईन Happy

महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार' - कल्पना रायरीकर आणि मंजिरी भालेराव.

काय सांगताय.. मला ठावूकच नव्हते मंजिरी यांनी पुस्तक काढलंय... तसा गेल्यावर्षात १-२ वेळच संपर्क झाला पण उल्लेख आला नाही कधी.. आता हे पुस्तक बघतोच.. Happy

Pages