कार्टून्स आणि कॉमिक्स

Submitted by बावरा मन on 9 January, 2015 - 00:29

… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला . कॉमिक्स शी असणारा संबंध पण संपला . नंतर काही वर्षांनी सुट्टी घेऊन घरी आलो होतो . मी घरी पेपर वाचत बसलो होतो . आई भाजी निवडत बसली होती . बोलता बोलता माझ्या मित्रांचा विषय निघाला . आईने नितीन बद्दल सांगितलं ,"अरे तो नितीन आहे ना कुलकर्णी बाईचा . त्याला काहीतरी रोग झाला रे . पायातली ताकत च गेली . व्हील चेयर वर खुरडत फिराव लागत बिचार्याला . किती हुशार मुलगा होता आणि काय झाल बिचार्याच ." मला एकदम कसतरीच झाल . न राहवून कपडे चढवले . बाजूच्या कॉलनी मधल्या त्याच्या घरी घरी त्याला भेटायला गेलो . त्याची आई बाहेर देवासमोर दिवा लावून बसली होती .

"काकू नितीन आहे ?"

"हो आहे कि . उदगीरकर न रे तू ? बर्याच वर्षांनी आलास . नितीन मधल्या खोलीत आहे . भेटून घे . चांगल वाटेल त्याला . आताशा फारस कोणी येत नाही . "

मी खोलीत गेलो . नित्या पलंगावर आडवा पडून वाचत होता . जवळ गेल्यावर कळल . त्याच्या हातात पण सुपर कमांडो ध्रुव च पुस्तक होत . आजुबाजू ला पण कॉमिक्स पडली होती .
"आता नीट वाचल्यावर आणि या वयात कळतंय . सुपर कमांडो ध्रुव च भारी होता ." नित्या हसत हसत बोलला . मला काही बोलवेच ना . गळ्यात काहीतरी अडकल्यासारख झाल होत .

……… मी आणि बाबा दोघेही Tom & Jerry चे चाहते . आम्ही दोघेही एकत्रच ते कार्टून बघायचो . आणि मग सगळ घर हसण्या ने भरून जायचं . बाबा Tom च्या बाजूने तर मी jerry च्या बाजूचा . नेहमी शेवटी jerry च जिंकायचा . मग बाबा माझ्या पाठीवर बुक्का मारून म्हणायचे , " अगली बार ." पण ती अगली बारी कधीच नाही आली . एकदा मी उसासून बाबाना म्हणालो , " का तुम्ही नेहमी हारणाऱ्या Tom ची बाजू घेता ?" एकदम हसणार्या बाबांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आल , "ते तुला अजून काही वर्षांनी कळेल ." आता मी तिशीत आहे . अजून पण वेळ मिळेल तस टोम &जेरी बघतो . बाबा त्यावेळेस काय म्हणाले होते ते आता कळत आहे . हा साला जेरीच खोड काढतो टोम ची . आणि आकाराने मोठा असून पण भाबडा Tom नेहमी जेरी कडून मार खातो . साला जेरी च दुष्ट आहे . गेल्या काही वर्षात मार खाणार्या सगळ्यांबद्दल सहानुभूती वाटत आहे . स्वतःसकट .

…… ज्यादिवशी नांदेड वरून काका आणि आजोबा येणार असत त्यादिवशी मी एकदम खुश असे . येताना ते माझ्यासाठी खूप कॉमिक्स घेऊन येत . एकदा असेच ते आले तेंव्हा त्यांच्या हातात कॉमिक्स नव्हते . माझा चेहरा उतरला . "अरे पुढच्या वर्षी दहावी न तुझी . आता तु मोठा झालास . आता कसले कॉमिक्स वाचतोस . " मामा ने बहुतेक माझ्या मनातले भाव वाचले असावेत .
मी मोठा झाल्याच माझ्या अगोदर इतराना कळल होत . मोठ झाल्यावर कॉमिक्स वाचता येत नसतील तर काय करायचं मोठ होऊन . मी कमवायला लागल्यावर घर भरून कॉमिक्स घेईल असा बेत मी आखला होता . मी बघितलेलं भविष्य काळासाठीच ते पाहिलं स्वप्न होत . स्वतःच अस काहीतरी . त्यादिवशी ते तुटल . आणि हि तर फ़क़्त सुरुवातच होती .

……… नौकरी ला लागल्यावर पहिले भाड्याने flat घेतला . आता कुणासोबत आपली स्पेस शेयर करायची गरज नव्हती . एक टीवी पण घेतला . डिश टीवी वाल्याच्या दुकानात गेलो . तो मला वेगवेगळे packages समजावून द्यायला लागला . पण कामाच तो काही बोलेना . शेवटी न राहवून मीच बोललो , "मुझे कार्टून चानाल्स भी चाहिये . मुझे कार्टून देखना अच्छा लगता है ." त्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेले सहानुभूतीचे भाव अजून पण डोळ्यासमोरून जात नाहीत .

कार्टून्स आणि कॉमिक्स ने प्रचंड आनंदाचे क्षण दिले आहेत त्या सर्व क्षणांसाठी हा लेखन प्रपंच . आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्टुन्स ची दुनियाच लै भारी हे, मी अजुनही चाहता आहे त्यांचा पण ते जुनेच छान आहेत, नविन चिनी कार्टुने बघवत नाहीत.. Uhoh
टेलस्पिन, डकटेल्स, गुफी, टॉम जेरी, अलादिन ह्यांनी आम्हाला घडवण्यात बराच सहभाग दिलाय.

मस्त लेख! मला पण चाचा चौधरी खूप आवडतात.:स्मित: लहानपणचे कार्टुन्स, चान्दोबा, चम्पक वाचण्याचे दिवस अतीशय निरागस आणी आनन्ददायी होते. आता मी मुलीसोबत कार्टुन्स बघत रहाते.

टॉम, जेरी, स्कूबी-डु, गायब आया, मोलु आणी आता ओगी. खूप मजा येते पहाताना.

आणि ह्या गोष्टी वाचणे आणि पाहणे हा 'पोरवडा ' आहे अश्या समाजाबद्दल प्रचंड सहानुभूती . ते काय मिस करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये .
>>>>>>>>>

कॉमिक्सची रंगीबेरंगी पुस्तके त्या वयात आकर्षित तर करायची पण ती लांबूनच महाग वाटायची. मग आमचे बालपण `जादूचा दिवा आणि हसणारा पोपट' वा `पिवळ्या दाढीचा राजकुमार' अशी पिवळी पुस्तके वाचण्यातच गेले. टिव्हीवरचे कार्टून तसे उपलब्ध होते, पण घरचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टिव्ही आणि केबल टीव्हीचे जेमतेम चॅनेल असणे, त्यातच लोकांच्या घरी जाऊन बघायची सवय नसणे यातच सारी कार्टूनची आवड संपली.

नंतर जेव्हा हे साध्य होईल अशी परिस्थिती आली तेव्हा जे लहानपणी नाही केले ते आता का करा या भावनेतून, वा मुळातच आवड मरून गेल्याने नंतरही नाही कार्टूनच्या विश्वात रमणे झाले नाही.

पण या सर्वांची भरपाई म्हणून स्वताच्या लाईफमध्ये आणि इमॅजिनेशनमध्ये पुरेपूर फॅण्टसी येईल याची काळजी मात्र घेतली, जे आजही तसाच वागतो.

वरचे आपले वाक्य एवढ्यासाठीच कोट केलेय की कार्टून बघायची जराही आवड नसून आपण वर उल्लेखलेल्या समाजात मी येत नाही Happy

असो, लेख मात्र आवडला !
आणि एका अर्थाने रिलेटही झाला.

व्वा !!

भूतकाळाचा पडदा अचानक दूर झाला.....खरंच रे किती वेड लावलं होतं त्या त्या वयात ह्या कार्टुन्स नी. खुप गोष्टींशी रीलेट करता आलं.

क्या बात है, मी आणि माझी मुले आम्ही आवडीने पहातो टॉम आणि जेरी.
पुर्वी एक दोन सिरिअल्स होत्या त्या कोणी पाहिल्या आहेत का ?
एक होती अ‍ॅलिस इन वण्डरलॅण्ड,
आणि दुसरीचे नाव नाही आठवत पण ती एका जपानी सिरिअलचे डबिन्ग होते.
त्याचे शिर्षक गीत होते,
हवा मिठी तू आजा पुरब से, चले आओ झटपट आसमान में,
पवन के लडके, ड्रॅगन के बेटे तारो झिंदाबाद. Happy

एकदम जिव्हाळ्याचा विषय... शाळेत मधल्या सुट्टीत बर्‍याच वेळा आणि ऑफ तासाला वाचायची पुस्तके म्हणजे, नागराज, ध्रुव, चाचा चौधरी... आणि बघायला म्हणाल तर टॉम अँड जेरी.. मिकी, डोनाल्ड, अंकल क्रुज, डक टेल्स, टेलस्पिन.. सगळीच.. आजही मुलांबरोबर छोटा भीम बघायल अमस्त मजा येते.. एकदम रिफ्रेशिंग वाटतं..

टेलस्पिन, डकटेल्स, गुफी, टॉम जेरी, अलादिन ह्यांनी आम्हाला घडवण्यात बराच सहभाग दिलाय.>>>>>>>१००% अनुमोदन.
मी मुलीसोबत कार्टुन्स बघते. ओग्गी खूप आवडतो त्याची स्माईल, त्याच्या आवाजासाठी वापरलेला शाहरुखचा आवाज छानच. मलाही त्याच्यासारखं बोलायला आवडत. भय्या $$$$ अशी हाक तो ज्याकं साठी वापरतो तेव्हा तर खूप मजा येते :). मी माझ्या मुलींसोबत आणि भावाच्या मुलासोबत (ज्याला आम्ही लाडाने ओग्गी म्हणतो त्याची स्माईल Happy सेम वाटते)ओग्गी आणि ज्याकं खेळायला आवडते.

मस्त लेख!
टॉम अँड जेरी ला पर्याय नाही !>> +१
मिकी नि मिनी, डोनाल्ड , अंकल क्रुझ नि बच्ची पण माझ्या फेवरिटमधे..

दिनेश....

"...टॉम अँड जेरी ला पर्याय नाही !...." ~ अगदी अगदी १००% सहमत. माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी मनी जी उत्सुकता होती टाम्या आणि जेर्‍याला बघायची तितकीच उत्सुकता आज साठीला आलो तरीही तितकीच ताजी आहे....नात आणि मी या दोघांच्या प्रेमातील हे दोघे मोठा दुवा आहेत. पुण्याला तिच्या घरी गेलो म्हणजे अगोदर ती मला टीव्हीसमोर बसवून या दोघांना बोलावते. यातच यांच्या जादूची माया दिसत्ये. डोन्या डक्या आणि नंतरचा सुप्परम्यानही अगदी गळ्यातील ताईत झाले होते.

सारी ही दुनिया रंगरंगिली बाबा असेच होऊन गेले बावरा मन यांचा हा देखणा लेख वाचताना.

छान लेख!! लहानपणाची आठवण करून दिलीत. टॉम आणि जेरी, अ‍ॅलिस इन वण्डरलॅण्ड, जंगल बुक ही अगदी आवडीची कार्टून्स होती माझी. आणि कॉमिक्स मध्ये मॅड्रेक द मॅजिशियन!! चांदोबा नावाचं लहान मुलांसाठी एक मासिक यायचं ते पण खूप आवडायचं.

अजून एक म्हणजे चाचा चौधरी कॉमिक्स मध्ये वापरले जाणारे तकिया कलाम . उदा . चाचा चौधरी का दिमाग कम्प्युटर से भी तेज चलता है . जब साबु को गुस्सा आता है तब ज्युपिटर ग्रह पे कोई ज्वालामुखी फ़टत है . तो ज्युपिटर ग्रहावरून आलेला साबु पण भारी होता . पीके आणि कोई मिल गया च्या अगोदर एलिएन इथे अवतरला होता

सुपर कमांडो ध्रुव..
प्रतिशोध की ज्वाला ते सामरी की ज्वाला वाया
खुनी खिलोने,आवाझ की तबाही, ग्रँड मास्टर रोबो...
ध्रुवच भारी...
मस्त लेख.

मस्त लेख!
सुपर कमांडो ध्रुव माझापण आवडता हीरो आणि लहानपणी नागराजच्या कंपूशी साधारण याच प्रकारची भांडणे केली असल्याने विशेष भावला. काही महिन्यांपूर्वी बंगळूरच्या कॉमिककॉनला जाणे झाले तेव्हा अनुपम सिन्हा (ध्रुवचे लेखक) यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली व या लेखाने त्या भेटीची आठवणही परत ताजी झाली.

थोडेसे अवांतर(?) - आता राज कॉमिक्स व इतर अनेक भारतीय कॉमिक्स त्यांच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन खरेदी करता येतात व ध्रुव, नागराज, डोगा इ. हीरोज अजूनही जोमात चालू आहेत. आपली आवड बघता एकदा भेट अवश्य द्यावी.