"पीके" च्या निमित्ताने - पब्लिक सब जाणती है!. पर समझती नही है!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2015 - 05:30

पीके धरतीवर अवतरून एव्हाना युगे उलटली. अर्ध्याअधिक पृथ्वीवासीयांना त्याने दर्शन देऊन झाले. कित्येकांनी त्यावर वृत्तांत लिहिले. तर आता हा रुनम्या काय नवीन घेऊन आला आहे असा जो प्रश्न शिर्षक वाचून पडला असेल त्याचे उत्तर लेख वाचल्यावर मिळेलच. पण यातील मते माझी एकट्याचीच अशी नसून ती पब्लिकची मते आहेत. कारण चित्रपट संपल्यानंतर मी सहप्रेक्षकांशी गप्पा मारून हा चित्रपट पाहिल्यापाहिल्या त्यांच्या मनात काय तरंग उठले हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच हे एकाअर्थी परीक्षण नसून पीकेच्या निमित्ताने माझ्या चित्रपटज्ञानाचा आणि भारतीय चित्रपट रसिकांच्या वैचारीक आवडीनिवडींचा घेतलेला आढावा आहे. म्हणून यात पीके हा चित्रपट बघायला जावाच किंवा जावू नकाच असे काहीही सुचवायचा अट्टाहास नाही.

म्हणतात ना, स्त्रीहट्टापुढे कोणाचे काही चालत नाही. तर जणू नवीन वर्षाचा संकल्प केल्याप्रमाणे माझ्या ग’फ्रेंडने या शाहरूखप्रेमीला २०१५ सालात पैलाच चित्रपट आमीरचा बघायला लावला..

बस्स., शाहरूखचा आणि माझ्या ग’फ्रेंडचा उल्लेख झाला, आता हळूच पीके’कडे वळूया. सोशलसाईटवरची परीक्षणे आणि प्रतिसाद वाचून माझ्या डोक्यात या चित्रपटाबद्दल काही रॉंग नंबर भरले होते, जे काल पीके बघून राइट झाले. या लेखात त्यांचाही समाचार घेऊया.

----------------------------------------------------------------------------

चित्रपट सुरू होतोच ते थेट स्पेसशिप पृथ्वीतलावर अवतरून. सहसा अमेरीका खंडात उतरणारे यान जेव्हा भारतभूमीवर उतरते तेव्हा नक्कीच अभिमान वाटतो, पण हे ‘कोई मिल गया’ मध्ये वाटून झाल्याने यंदा विशेष काही वाटले नाही. पण त्यातून उतरणारा नंगापुंगा आमीरखॉं मात्र लक्ष वेधून घेतो.

pk amir.png
(आंतरजालावरून साभार)

तर आमीरला त्याच अवस्थेत सोडून आपल्याला चित्रपट थेट बेल्जियम देशात घेऊन जातो. तिथे आपली ओळख सुशांत सिंग राजपूत (पाकिस्तानी) आणि अनुष्का शर्मा (हिंदुस्तानी)शी होते. त्यांच्या त्या छोट्याश्या पारंपारीक लव्हस्टोरीमध्ये जाणवलेली उल्लेखनीय बाब म्हणजे सुशांत काय अफलातून क्यूट दिसलाय त्यात. याआधी तो मला कधीच फारसा आवडला नव्हता. पण इथे त्या सुरुवातीच्या द्रुष्यांत त्याच्यात डीडीएलजेच्या राजची झलक दिसून तो आवडला गेला. (अवांतर - २०१५ मध्ये महेंद्रसिंगच्या आयुष्यावर चित्रपट बनतोय ज्यात महेंद्रसिंगची भुमिका सुशांतसिंग करतोय, तो बघण्याची आता उत्सुकता लागली आहे.)

असो, तर त्याच वेळी दुसरीकडे माझ्या डोक्यातील एक रॉंग नंबर क्लीअर होत होता. अनुष्का शर्माने आपल्या ओठांचे वेटोळे केल्याने ती विचित्र दिसते वगैरे.. त्यामुळे माझी पहिलीच नजर तिच्या ओठांकडे गेली होती तेवढीच, पण त्यानंतर पुर्ण चित्रपटात ते कधी जाणवले नाही, किंबहुना चित्रपट संपल्यावर तिच्या कॅरेक्टरला फ्लो देणारा तिचा तो लूक खास स्मरणात राहतो. येस्स, पीके एवढाच!..

सुशांत-अनुष्का प्रकरणाचा पहिला अध्याय आटोपल्यानंतर सुरू होतो द ग्रेट आमीरखॉं शो!.. ज्या भुमिकेत ओवरअ‍ॅक्टींग करायचा फुल्ल स्कोप होता, तिथे आमीरने कमालीचा संयत अभिनय केला आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला कोणा एलियनबद्दल सहानुभुती वाटू लागली, जेव्हा देव या काल्पनिक संकल्पनेचा शोध घेण्यात आलेल्या अपयशाने पीकेची परतीची आशा मावळू लागते. मात्र चित्रपटाच्या उत्तरार्धात आमीरचे एलियन असणे आपण विसरू लागतो आणि तो एक जगावेगळा विचार करणारा माणूस आहे एवढेच त्याकडे बघू लागतो, याला दिग्दर्शकाचे अपयश म्हणावे का कथेची गरज याबाबत मी साशंक आहे.

असो, तर एव्हाना चित्रपटात जसा मी गुंतत होतो तसा मलाही ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट आठवू लागला होता. कदाचित आधीच वाचलेल्या परीक्षणांचा प्रभाव असेल. पण मी त्या दोन चित्रपटांची तुलना करणे लवकरच टाळले. कारण ओह माय गॉड या चित्रपटाचा हेतू तेवढाच होता, त्याचा फोकस तेवढाच होता. पीके चित्रपट मात्र निव्वळ देवाधर्मावर भाष्य करण्यासाठी नव्हता. पृथ्वीबाहेरून आलेली एखादी व्यक्ती आपल्या तटस्थ नजरेने पृथ्वीवासीयांबद्दल काय विचार करेल हे त्यात प्रामुख्याने मांडले होते. पण आपल्याच दुर्दैवाने आपण धर्म-प्रांत-जात-पात यातच सर्वार्थाने गुरफटलेलो आहोत, त्यामुळे साहजिकच एखाद्या एलियनच्या मनाला गोंधळात टाकणारा प्रश्न प्रामुख्याने हाच असणार.

हे सर्व घडत असताना या चित्रपटात देवाधर्मावर टिका केली गेली आहे हा अजून एक रॉंग नंबर क्लीअर होत होता. मुळात टिका देवाधर्मावर नसून त्यांचा जो चुकीचा अर्थ काढला गेला आहे त्यावर आहे. त्यामुळे निर्माण होणार्‍या मनुष्यमनुष्यातील भेदांमुळे आणि दोन भिन्न समूहांतील तेढेमुळे मनुष्य कसे आपलेच नुकसान करतोय हे दाखवले गेले आहे. याउपर, आमच्या धर्मावरच टिका का? आणि ईतर धर्मात यापेक्षा गैर प्रकार चालतात ते दिसत नाहीत का? वगैरे मुद्दे मला नेहमीच फोल वाटत आले आहेत. कारण कुठलाही धर्म असो वा समाज, तो दुसर्‍याची रेष छोटी करून आपली मोठी बनवू शकत नाही. तरीही जेव्हा अश्या चित्रपटांवर टिका होते तेव्हा त्या चित्रपटाचे नुकसान न होता उलट त्यांच्या बॉक्स ऑफिस व्यवसायात वाढच होते. हि एक गोड दुखापत आहे!.

धर्मातील भेद हे ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत म्हणताना क्रांतीवीरचा नाना पाटेकर मला आठवला. "ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून. बनानेवाले ने इसमे भेद नही किया तो हम कौन होते है इस्माईल.." यात तोच मुद्दा मांडताना पीके आपल्या एलियनबुद्धीने प्रश्न करतो, की देवाने कुठे आपल्या शरीरावर एखाद्या विशिष्ट धर्माचा शिक्का मारून आपल्याला या धरतीवर पाठवले आहे. जन्मत:च आपल्याला चिकटणारा हा शिक्का देखील मानवनिर्मितच तर आहे.

राजकुमार हिरानी हा गांधीजीचा भलामोठा चाहता आहे याचा या चित्रपटात पुन्हा प्रत्यय आला. मुन्नाभाई मध्ये त्याने गांधीजींच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले होते तर यात त्यांच्या प्रतिमेचे. पण त्याचबरोबर गांधीजींची प्रतिमा एखाद्या विशिष्ट कागदावर म्हणजे नोटेवर असेल तरच त्याला महत्व असते म्हणत त्याने माणूस आज तत्वांपेक्षा पैश्याला कसे जास्त महत्व देत आहे हे दाखवले आहे.

पीकेला निरोधाचे पाकीट सापडण्याच्या प्रसंगातूनही छान सामाजिक संदेश देण्यात आला आहे. त्या पाकीटाची जबाबदारी घेणे सारे टाळतात. हे चित्रपटातच नाही तर खर्‍या आयुष्यातही होते. एवढेच नव्हे तर मी वाचलेल्या काही परीक्षणात वा प्रतिसादातही त्या प्रसंगाचे वर्णन करताना निरोध या शब्दाच्या जागी दुसरा सांकेतिक शब्द वापरल्याचे पाहिले आहे. एकीकडे लैंगिक हिंसाचार आणि त्यासंबंधित गुन्हे वाढत असताना दुसरीकडे सभ्यता आणि संस्कृतीच्या नावाखाली जपलेला हा मेंटल ब्लॉक आपल्याला लवकरच दूर सारणे गरजेचे आहे.

आणखी एक रॉंग नंबर काही परीक्षणांतून माझ्या डोक्यात घोळत होता तो पाकिस्तानचे उदात्तीकरण आणि क्लायमॅक्सला पाकिस्तान एम्बेसीमधील द्रुष्यात दाखवलेला मेलोड्रामा. पण माझ्यापुरते सांगायचे झाल्यास पाणी काढले डोळ्यातून त्या सीनने. कदाचित शाहरूखपटांचा फॅन असल्याचा परीणाम असावा. पण बहुतेक लोकांना पाकिस्तान हे नाव पचनी पडले नसावे, किंवा त्यात पाकीस्तान फॅक्टर नसता तर तो सीन नक्कीच अश्यांना पटणेबल झाला असता. पण माझा असा मेंटल ब्लॉक नसल्याने मला तरी तो सीन भावला. "गदर एक प्रेमकथा" आणि "वीरझारा" अश्या पारंपारीक प्रेमकथांमधील हिरो हिंदुस्तानी आणि हिरोईन पाकिस्तानची म्हणून स्विकारणार्‍या प्रेक्षकांनी, याउलट पाकिस्तानचा हिरो आणि हिरोईन हिंदुस्तानी असाही अ‍ॅंगल तितक्याच उत्स्फुर्तपणे स्विकारायची गरज आहे. अन्यथा यातही स्त्री-पुरुष असमानताच प्रकर्षाने जाणवते. या दोन्ही देशांतील जनता आपापल्या देशात जशी या पारंपारीक शत्रूत्वाची कट्टरता पाळते, तशी ती परदेशात जेव्हा कोणी भारतीय आणि पाकिस्तानी एकत्र भेटतात तेव्हा त्यांच्यात ती तितकीशी नसते हे समजून घ्यायला हवे.

असो,
चित्रपटांतील विनोदनिर्मितीचे प्रसंग काही ठिकाणी हलकेफुलके वाटले, तर काही ठिकाणी ओढूनताणून वाटले. पण एकंदरीत त्यांची रिपीट वॅल्यू (पुन्हा पुन्हा बघावेसे वाटणे) कमी आहे. आमीर खानने न्हाव्याच्या विजारीशी छेडछाड करणे हा एक व्हॉटसपसारख्या साईटवर फिरणारा पांचट विनोद होता, सुदैवाने अश्या विनोदांची फार पेरणी न होता एखादाच होता.

भोजपुरी भाषा इरिटेट करणार अशी माझी जी आधी समजूत होती ती चित्रपट संपेपर्यंत फोल ठरली होती.

संजय दत्तला या सिनेमासाठी खास जेलमधून बाहेर काढले खरे, पण फुकट घालवलेय. त्याच्या जागी कोणीही चालला असता. उगाच बिचार्‍याला सुट्टी मिळालेली तर कामाला लावायची गरज नव्हती.

बोमन इराणीच्या अभिनयाबद्दल शंका घेणे अपराध ठरावा, मात्र चित्रपटातील त्याचे कॅरेक्टर मुन्नाभाई सिरीज वा थ्री इडियट्ससारखे दमदार नव्हते. मनात एक विचार असाही आला की तपस्वीच्या भुमिकेत त्याला कदाचित जास्त बॅटींग करता आली असती.

शेवटच्या पीके विरुद्ध तपस्वी टिव्ही शोला बघून चिल्लर पार्टी सिनेमातील ‘भिडे विरुद्ध भिडू’ सीन आठवला, मला ती जुगलबंदी जास्त भावली होती. इथे तशी ती झालीच नाही.

चित्रपट आणखी रंगवता आला असता, पटकथा आणखी कल्पक करता आली असती, छोटेछोटे प्रसंग चुरचुरीत संवादांची फोडणी देत आणखी उठावदार करता आले असते. पण आपल्याहाती भन्नाट कथाकल्पना आहे, तर थोडे इकडे तिकडे झालेले चालून जावे असा विचार दिग्दर्शकाने केल्यासारखे वाटले. अर्थात हे राजकुमार हिरानीच्या स्टॅंडर्डला अनुसरून आलेले विधान आहे.

संगीताबद्दल चित्रपटाच्या परीक्षणात खरे तर काही बोलूच नये, पण चित्रपटातील "ठर्की छोकरो" हे गाणे आवडले नाही आणि तेच नेमके आपल्या अजय-अतुलचे असल्याने वाईट वाटले ईतकेच.
ईतर गाणी सोनू, शान, श्रेया घोषाल या माझ्या फेव्हरेट्सनी गायलेली असल्याने श्रवणीय कॅटेगरीतली होती. तसेच बॅकग्राऊंड म्युजिक बद्दल बोलायचे झाल्यास ते अपेक्षेप्रमाणे छान जमलेय.

शेवटच्या द्रुष्यात घरी परतताना आमीर फार म्हातारा वाटला, बहुतेक पृथ्वीवरचे वातावरण मानवले नसावे त्याला.
वा कदाचित प्रेमभंगाने पीकेचा देवदास झाला असावा.

एका वर्षाने परत आला तेव्हा त्या सोबत असलेला रणबीर क्यूट बछडा वाटला, सहजच नार्निया चित्रपट आठवला.

बस्स तुर्तास इतकेच!

स्टार ***** देणे गुर्जींचे काम, आपण बोले तो बस्स पब्लिक. पिक्चर वन अ‍ॅण्ड हाल्फ टाईम मस्ट वॉच है भिडू.!
ईति ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

है शाब्बास !
हे परीक्षण आवडलं.
पाकिस्तानवाला भाग सोडून कारण ते खरंच अ आणि अ आहे.
अनुष्काचे ओठ मला चक्कं बरे वाटले.
तिला यापूर्वी एकाच चित्रपटात (खरे तर शाखा बरोबरच्या चित्रपटाच्या प्रोमोत) पाहिले असल्याने ती पूर्वी नक्की कशी दिसत होती हे ठसलेच नाही.

बरं मला एक सांगा हरिवंशराय बच्चनच्या शायरीवर अत्यंत प्रेम करणारे, परदेशातही हिंदी गाणी गात उंडारणारे दोघं पार्टींग नोट इंग्रजीत लिहितील आणि त्यात एकही शायरी लिहिणार नाहीत हे पटत नाही.
एका चॅनेलच्या एका प्रसिद्ध अँकरचा ठावठिकाणा सोशल नेटवर्कमधून काढून फोन करणे खरंच अवघड आहे का? की एकदिन तिला जाणीव होईल आणि ती मला शोधत येईल या विचारावर एंबसीत दरदिवशी फोन करत बसणे सोप्पं आहे.

<<बोमन इराणीच्या अभिनयाबद्दल शंका घेणे अपराध ठरावा, मात्र चित्रपटातील त्याचे कॅरेक्टर मुन्नाभाई सिरीज वा थ्री इडियट्ससारखे दमदार नव्हते. मनात एक विचार असाही आला की तपस्वीच्या भुमिकेत त्याला कदाचित जास्त बॅटींग करता आली असती.>>
ह्याच्याशी १०० टक्के सहमत.

<< चित्रपट सुरू होतोच ते थेट स्पेसशिप पृथ्वीतलावर अवतरून. सहसा अमेरीका खंडात उतरणारे यान जेव्हा भारतभूमीवर उतरते तेव्हा नक्कीच अभिमान वाटतो, पण हे ‘कोई मिल गया’ मध्ये वाटून झाल्याने यंदा विशेष काही वाटले नाही. पण त्यातून उतरणारा नंगापुंगा आमीरखॉं मात्र लक्ष वेधून घेतो.>>

हे मस्तं लिहिलंय.

रुनम्या तू रुन्मया नाहीसच याबद्दल परत एकदा खात्री करून दिलीस! वर्जिनल अवतारात लिही. हा एक महत्वाचा उल्लेख केला. आता हळूच पुढे सरकु यात..
मला हे परिक्षण(?) आवडले आणि मलाही हां सिनेमा 'काहीच्या काही' लहान मुलांसाठी वगैरे बनवलेला वाटला! अतिशय सुमार चित्रपट!

साती, वत्सला धन्यवाद

साती, पाकिस्तान एम्बेसीच्या क्लायमॆक्सबद्दल बोलायचे झाल्यास मी फारसे तर्काच्या कसोट्या लावून चित्रपट नाही बघत, व्यावसायिक चित्रपट म्हटले की फिल्मी स्टाईल हवीच. मी देखील त्याच मोडमध्ये जाऊन चित्रपट बघत असल्याने तो सीन मला भावला. (अर्थात तिथे पीके आणि तपस्वीची जुगलबंदी एक्स्पेक्ट केली असल्याने त्या आघाडीवर थोडा हिरमोडही झालेला) पण पाकिस्तानचे उदात्तीकरण केलेय, वा कोणीतरी कुठे लव्हजिहादलाही अप्रत्यक्ष समर्थन आहे असे काही जणांनी म्हटलेले तसे कुठे फारसे वाटले नाही. म्हणजे तसे संवाद पेरून पब्लिकच्या डोक्यावर ते ठसवायचा वा ब्रेनवॉशचा प्रयत्न दिसला नाही. निदान मला तरी जाणवले नाही, बहुतेक मी जरा अमन की आशा टाईप बंदा असल्याने असेल. असो, ते पुन्हा कधीतरी.. दुसरीकडे कुठेतरी..

पाकिस्तानचे उदात्तीकरण केलेय, वा कोणीतरी कुठे लव्हजिहादलाही अप्रत्यक्ष समर्थन आहे असे काही जणांनी म्हटलेले तसे कुठे फारसे वाटले नाही >> +१.
बृघ (Brugge)बेल्जियम मधले शूटींग मस्त आहे. तिथली यादे ताजा झाली. चित्रपट चांगला आहे पण ग्रेट वगैरे नाही. एकदा बघून बास.

शिवाय काहीही वादग्रस्त नाहिये. एकाच धर्माला किंवा त्यांच्या देवांना टारगेट वगैरे केलेले नाहिये.

बृघ (Brugge)बेल्जियम मधले शूटींग मस्त आहे. तिथली यादे ताजा झाली. >>>> हो त्या शहर मोहल्ल्याचे शूटींग मस्त आहे. सुशांत-अनुष्का जोडी त्या वातावरणामुळेही फ्रेश वाटली. आपण तिथे होतात, लकी आहात, हनीमून ट्रिपसाठीही चांगली जागा ठरेल ती Happy

ऋन्मेऽऽष,

भारी परिक्षण रे....पिक्चर वन अ‍ॅण्ड हाल्फ टाईम मस्ट वॉच है भिडू.!
हे खास ऋन्मेऽऽष इश्टाईल बरं का Wink

धर्मातील भेद हे ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत म्हणताना क्रांतीवीरचा नाना पाटेकर मला आठवला. "ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून. बनानेवाले ने इसमे भेद नही किया तो हम कौन होते है इस्माईल.." यात तोच मुद्दा मांडताना पीके आपल्या एलियनबुद्धीने प्रश्न करतो, की देवाने कुठे आपल्या शरीरावर एखाद्या विशिष्ट धर्माचा शिक्का मारून आपल्याला या धरतीवर पाठवले आहे. जन्मत:च आपल्याला चिकटणारा हा शिक्का देखील मानवनिर्मितच तर आहे. >>>>>>>>>>>>>>हे आपल्याला मान्य आहे परंतु हि एक news वाचा आणि यांच्या अकलेचे काय करावे हे ठरवा. http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5322850432918570567&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20150105&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=इस्लामचा स्वीकार हीच खरी 'घर वापसी' : ओवैसी

प्रसन्न, धन्यवाद

नवीन वाचक, या विचारांची माणसे सर्वच धर्मात आहेत, कुठे कमी तर कुठे जास्त आहेत, कुठे मवाळ तर कुठे कट्टर आहेत.. आपला विचार हा समोरचा काय विचार करतो यावरून ठरू नये एवढेच मला वाटते.

नविन वाचक ,तुम्ही दिलेली बातमी मी वाचली अतिशय विनोदी आहे आणि जर सिरीयसली कुणी घेत असेल तर त्यांना हे विचारायचं -"ऐसा हे का? तु पहिले ठप्पा दिखाव!" Lol Proud

मस्तच .सगळा लेख पटला .पण अ आणि अ वाला भागपण आवडला. बहुतेक मी 'अमनकी आशा' टाईप बंदी असल्यामुळे असेल. लोकांना चित्रपटातरी अश्या प्रेमकथा पचनी पडायला हरकत नव्हती.आताच नवीन मराठित आलेला अशाच हिंदु मुसलमान या विषयावरचा चित्रपट ही बहुतेक त्यामुळेच तीतकासा चालला नसावा .तुम्ही पाहीलाच असेल म्हणा. Happy

मलाही पीके मधे काही वादग्रस्त नाही वाटलं उलट सगळया धर्मांतील बाजारु वृत्तीची चांगल्या भाषेत म्हणायचं झालं तर नेमकी पिसे काढली आहेत आणि लोकं काही प्रसंगांना जाम हसतही होती आणि जो संदेश हिरानी यांना द्यायचा होता चित्रपटातुन तो पोचलाय अर्थात समजुन घ्यायचा असेल तर ."भगवान " हे सोनुचं गाणं सुंदर चित्रीत केले आहे .पहीला भाग धमाल आहे. दिसण्याच्या बाबतीत मात्र फक्त सुशांत सिंग मस्त दिसतो जरी त्याचा रोल लहान असला तरी .आणि ज्यांना सिरीयलीतला "मानव" आवडतो त्यांना तर आवडणारच.:स्मित:आता धोनी च्या बायोपीक ची वाट पाहावी लागणार.

चित्रपट ग्रेट वगैरे नाही पण जो विषय हलक्याफुलक्या पद्ध्तीने मांड्लाय तो पोचवण्यात यशस्वी झालाय.
नार्निया आणि रणबीरला अनुमोदन.

"...कदाचित प्रेमभंगाने पीकेचा देवदास झाला असावा...."

ऋन्मेष यांच्या सुंदर अशा परीक्षणवजा लेखातील ह्या एका वाक्याने राजकुमार हिराणीसारखा एक समर्थ दिग्दर्शक हिंदी चित्रपटाच्या ठोकळेबाज कथानकापासून दूर जाऊ शकत नाही याची प्रचिती आली. "एलियन" ह्या पात्राला मुख्य भूमिका द्यायचे ठरल्यावर त्याला पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सुखदुखाचा नसा देण्याची काहीएक गरज नव्हती. पीकेला जे जाणवत राहते ते येथील माणूसप्राण्यामध्ये वसलेली देवभक्ती नामक एक भावना...जी प्राथमिक पातळीवर सर्वांमध्ये आहेच....काहीत कमी तर काही जास्त....ते मान्य केले गेल्यावर त्या विविध धर्मसमजूतीद्वारे येणारी अवडंबरावस्था पाहून पीके गोंधळला आहे....आणि आपल्याला आलेली अवस्था तो (रीमोट कंट्रोल मिळेपर्यंत) कशी घालविण्याचा यत्न करीत आहे ? त्यात त्याला यश मिळेल की नाही ? याच आसाभोवती तो बैल फिरायला हवा ही आपली धारणा. आता भारतीय प्रेक्षकाकडून चार पैसे मिळवायला हवेत तर मग हे सारे कोरडेपणाने न दाखविता एक गुलबकावली अनारकली चित्रपटात आणली पाहिजे आणि तिच्या संगतीत पीयू देवदासही झाला पाहिजे अशी पटकथा पसरट करणे म्हणजे दिग्दर्शकाने केवळ धंद्यासाठी केलेली ती तडजोडच मानावी लागेल.

जो एलियन इथे निसर्गावस्थेत अवतरतो...काही दिवस राहतो...आणि देवदास अवस्थेपर्यंत येतो हे पचणे कठीण आहे. "टर्मिनेटर" चित्रपटातही असाच निसर्गावस्थेत पृथ्वीवर येणारा एलियन दाखविला गेला आहे...त्याच्याही जीवनात (वा मुक्कामात) स्त्रिया येतात....पण तो मशिनावस्थेतील असल्याने त्याच्या भावनाही मूळ व्यक्तिरेखेसारख्याच दाखविल्या आहेत. एका मुलाला वाचवायचे असते त्याला...ते काम तो ईमानेइतबारे करतो, मुलाला वाचवतो, जपतो आणि मुलाचा निरोप घ्यायचा समय येताच स्वतःचा अंतही करून घेतो....हे सारे तर्कसंगत असो वा नसो, पण तसल्या धगीतही टर्मिनेटरच्या अखेरीचे ते प्रसंग प्रेक्षकाला भावनिक बनवितात.....पीके बाबत हे घडत नाही. एक वर्षानंतर पुन्हा रणबीर ह्या नव्या फाकड्याला जेव्हा पीके घेऊन येतो त्यावेळी तर ते दृश्य गंभीर न वाटता विनोदी वाटते....म्हणजे आता रणबीरही देवदास भाग-२ होणार केव्हातरी....त्याचीच ती झलक.

सहमत आहे अशोकमामा,

खरे तर चित्रपटाचा व्यावसायिक पैलू जपण्यात काही गैर नाही किंबहुना तरच एखादा विचारप्रवर्तक सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो. आणि याबाबत दोन्ही मुन्नाभाई आणि थ्री ईडियट्स हे मास्टरपीस आहेत. या सर्वांमध्ये लव्हस्टोरी आहे, पण ती चित्रपटाची चव वाढवायला येते. ते चित्रपट आठवताना कुठेही ती लव्हस्टोरी सर्वप्रथम स्ट्राईक होत नाही. या चित्रपटाची जातकुळही तशीच होती, पण इथल्या लव्हस्टोरीचे गणित चुकल्यासारखे वाटले, आणि शेवटाला त्या नादात चित्रपटाचा फोकसही चुकल्यासारखा वाटला.

क्लायमॅक्स खूप महत्वाचा असतो, प्रेक्षक डोक्यातून तोच घेऊन बाहेर पडतो.

मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये शेवटचा प्रश्नोत्तरांचा राऊंड आणि पेशंट व्हीलचेअरवरून उठणे हा क्लायमॅक्स होता.

लगे रहो मध्ये गांधीगिरी करून मंगळ असलेल्या मुलीला अत्महत्येपासून परावृत्त करत लग्न लावणे हा होता.

थ्री इडियटसमध्ये ती ईंजिनीअर्सनी केलेली अफलातून डिलीव्हरी होती, चतुरसारख्या रट्टाबहाद्दरला आमीरच्या मागे धावावे लागणे हा क्लायमॅक्स होता.

इथे मात्र आधी सुशांत-अनुष्का आणि मग आमीर अनुष्का यांच्या लव्हस्टोरीत तो अडकला, आणि लेखात म्हटल्याप्रमाणे पीके-तपस्वी जुगलबंदी बॅकला गेली..

परीक्षण छान लिहीलं आहे... वाक्य न वाक्य पटलं!!

पाकिस्तान एम्बेसीच्या क्लायमॆक्सबद्दल बोलायचे झाल्यास मी फारसे तर्काच्या कसोट्या लावून चित्रपट नाही बघत, व्यावसायिक चित्रपट म्हटले की फिल्मी स्टाईल हवीच. मी देखील त्याच मोडमध्ये जाऊन चित्रपट बघत असल्याने तो सीन मला भावला. (अर्थात तिथे पीके आणि तपस्वीची जुगलबंदी एक्स्पेक्ट केली असल्याने त्या आघाडीवर थोडा हिरमोडही झालेला) पण पाकिस्तानचे उदात्तीकरण केलेय, वा कोणीतरी कुठे लव्हजिहादलाही अप्रत्यक्ष समर्थन आहे असे काही जणांनी म्हटलेले तसे कुठे फारसे वाटले नाही. म्हणजे तसे संवाद पेरून पब्लिकच्या डोक्यावर ते ठसवायचा वा ब्रेनवॉशचा प्रयत्न दिसला नाही. निदान मला तरी जाणवले नाही, बहुतेक मी जरा अमन की आशा टाईप बंदा असल्याने असेल. >> हे खूप रिलेट केलं

साती + १

''पीके' चित्रपटातील काही दृश्यांना मी आक्षेप घेतला होता'

सेन्सॉर बोर्डातील सदस्याचा गौफ्यस्फोट

चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने सोमवारी 'पीके' चित्रपटातील काही दृश्यांवर प्रदर्शनापूर्वीच आक्षेप नोंदविला असल्याचा गौफ्यस्फोट केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आमिर खान आणि राजू हिराणींचा 'पीके' नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चित्रपटातील काही दृश्ये आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केल्याचे सेन्सॉर बोर्डचे सदस्य सतिश कल्याणकर यांनी सांगितले. मात्र, नंतरच्या काळात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. सेन्सॉर बोर्डाच्या काही सदस्यांनी सोमवारी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या आश्रमाला भेट दिली. शंकराचार्यांनी 'पीके' हा चित्रपट हिंदू समाजाच्या भावना दुखावत असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना कल्याणकर यांनी आपण 'पीके'तील काही दृश्यांविषयी असलेले आक्षेप लिखित स्वरूपात बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठेवल्याचे सांगितले. मात्र, चित्रपटातून ही दृश्ये न वगळताच चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्याचे कल्याणकर यांनी सांगितले. चित्रपट स्क्रिनिंग समितीचे सदस्य असलेल्या कल्याणकर यांच्या मते चित्रपटाने काही नियमांचे उल्लंघन केल्याचेही म्हटले. आता 'पीके'च्या सेन्सॉरशिपविषयीच नवीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, चित्रपटाने याअगोदरच बॉक्स ऑफिसवर अपेक्षित नफा मिळवला आहे.

यापूर्वी 'पीके' या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना हटविण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी सेन्सॉर बोर्डाने धूडकावून लावली होती. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी 'पीके'मध्ये कोणतेही दृश्य आक्षेपार्ह नसून हा चित्रपट आता प्रदर्शित झाल्याचे म्हटले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे सुशांत काय अफलातून क्यूट दिसलाय त्यात. >>>>>>> हे वाचुन मनात अनुमोदन देतच होते की,
<<<याआधी तो मला कधीच फारसा आवडला नव्हता. पण इथे त्या सुरुवातीच्या द्रुष्यांत त्याच्यात डीडीएलजेच्या राजची झलक दिसून तो आवडला गेला.>>> पुढे हे वाचले. :कहामाघेबा:

:कहामाघेबा: ??? याचा फुल्ल्लफॉर्रम सांगा ना. प्लीज.
पण अ‍ॅक्चुअली, झलक म्हणजे स्टाईलकॉपी नाही तर लेव्हल सांगायला मी ते उदाहरण दिले होते. बाकी त्याची आपलीच एक फ्रेश स्टाईल होती ती आवडली. तुम्ही यातून शाहरूख वगळून अनुमोदन देऊ शकता. याआधी हृतिकच्या कहो ना प्यार है या पहिल्या चित्रपटातदेखील त्याचा असाच एक फ्रेश लूक दिसला होता. पुढे हळूहळू तो हरवला. असो!

कोकणस्थ,
फसू नका या बातमीला, हि सुद्धा पीकेला सतत चर्चेत ठेवून त्याचा बिजनेस वाढवायची चाल आहे. Happy

नावात साम्य असल्यामुळे उडत असेल गोंधळ ,पण पुर्ण लेख ,परिक्षण वाचले तर लक्षात येतं ऋग्वेद यांचं वेगळं आणि अभ्यासपुर्ण लेखन यासाठी "अग्ली" चं उदाहरण देउ शकतो. त्यामुळे माझातरी नाही गोंधळ उडत. आणि ऋन्मेऽऽष यांचं लिखाण चांगलच असतं हे वरच्या प्रतीसादांवरुन कळलचं असेल. Happy

सस्मित +१ ,सुशांत काय अफलातून क्यूट दिसलाय.हे मात्र खरं आहे.

ऋन्मेष >> Happy

छान लिहिलय. बरंचसं पटलं.

कशाला हाणतोय्स माझ्याकडुन घेतलेल्या बाळ्याला>>> हे भयंकर.