अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस दुसरा)

Submitted by मुक्ता०७ on 2 January, 2015 - 03:54

अरुणाचल - एक अनुभूती...
अरुणाचलमध्ये पोचल्यानंतर मी लिहिलेल्या रोजनिशीतील काही पाने
दिवस पहिला
अरुणाचल - एक अनुभूती...(दिवस पहिला) http://www.maayboli.com/node/52091

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस दुसरा)

दिवस दुसरा
आजचं जेवण जरा जास्तच झालं. सकाळीच आमचं आणि दादांचं असं ठरलं की आज रात्री आम्ही तिघांनी स्वयंपाक करायचा. ठरल्या ठरल्या आम्ही तिघांनीही आपापल्या मातोश्रींना फोन करून वेगवेगळ्या रेसिपींचा काथ्याकूट केला. शक्यतो इकडे सहज मिळणारे साहित्य वापरून पदार्थ करायचे असे ठरले. थोडे टेन्शन होतेच. कारण आम्हा तिघांचे पाककौशल्य असून असून कितपत असणार! त्यामुळे सोबत भात असू देत असं आम्ही लोला सांगितलं. तिलाही बहुदा आमच्या पाककौशल्यावर थोडा नाही तर चांगलाच संदेह असणार! त्यामुळे तिनेही हसून भात नक्की लावीन असे सांगितले. मी आधी शिरा करणार होते. इकडे मी अरुणाचलमध्ये घरापासून ३५०० किमी. दूर स्वयंपाक करणार तर माझ्याहून जास्त माझ्या आईला आणि मावशीलाच गंमत वाटत होती. फोनवरून दोघीही मला काय काय सुचवत होत्या. शिरा करण्याची माझी कल्पना दोघींनीही हाणून पाडली. कारण मला शिरा नीट जमेल याबद्दल आई साशंक होती. शेवटी दुधी हलवा कर असे मावशीने सुचवले. कारण दुधी हलवा करायला सोप्पा आणि बिघडण्याची शक्यता एकदम कमी. शिवाय इथे दुधी मुबलक प्रमाणात वापरला जातो. मी घरून मिल्क पावडर आणली आहेच. गंमत म्हणजे आर्थिकदृष्ट्या सधन कुटुंब असूनही साखर हा काही त्यांचा रोजच्या वापरातला पदार्थ नाही. त्यामुळे मला साखर आणावी लागली. अंजलीने भेंडीची भाजी तर प्रथमेशने मेथी मंचुरियन करण्याचे ठरवले.
कार्यशाळा झाल्यानंतर आम्ही तिघे खास बाजाराला गेलो. आम्ही दुपारी गेल्यामुळे बरीच दुकानं बंदच होती. बंद दुकानांपुढे पत्ते-जुगाराचे डाव मांडलेले दिसत होते. मला आणि अंजलीला आम्हाला हवे ते साहित्य मिळाले. पण मेथी मात्र कुठे मिळेना. मेथीच नाही तर दुसरी कुठलीच पालेभाजी दिसली नाही. पालेभाज्या फक्त सकाळीच मिळतात असे एका दुकानदाराने सांगितले. घरी असलेल्या पालेभाजीपासूनच काहीतरी बनवूयात असे प्रथमेशला सुचले. संध्याकाळी ६ च्या सुमारास स्वयंपाकाला सुरुवात केली. मुलांना अभ्यासाला बसवून लो आणि राजीवदादा आम्ही काय आणि कसं करतोय बघायला आणि गप्पा मारायला स्वयंपाकघरातच येऊन बसले. राजीवदादांनी त्यांच्या २ मित्रांना जेवायला बोलावले होते. आज राजीवदादा आणि लो छान मूड मध्ये होते. त्यामुळे किचनमध्येच आमची गप्पांची मैफिल जमली.
त्यांचा प्रेमविवाह असल्याचे राजीवदादांच्या बोलण्यात काल आले होते. त्यामुळे आम्हाला त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्यात रस होता. लग्नाआधी ७ वर्ष त्याचं अफेअर चालू होतं. दोघांचीही जमात वेगळी. लो खूप श्रीमंत घरातली. तर दादा खूप गरिबीतून वर आलेले. लग्नाचा विषय घरात काढल्यावर दोघांच्याही घरातून कडाडून विरोध झाला. दोघांनाही मारून टाकण्याची शिक्षा देण्यात आली होती. पण राजीवदादा आणि लोने संयम राखून घरच्यांच्या परवानगीनेच लग्न केले. गमतीची गोष्ट म्हणजे दोघही एकमेकांना सर आणि madam नावाने हाक मारतात. दोघांच्या भाषा वेगळ्या. त्यामुळे ते हिंदीतच बोलतात. पण हिंदीत मातृभाषा मिसळलेली! त्यामुळे त्यांच्या मुलांची हिंदीही वेगळीच! chang आणि सिंत्रियाच्या भाषेवर तर चक्क कार्टून नेटवर्कचा प्रभाव जाणवतो.
राजीवदादांना मुलांची फार काळजी वाटते. इकडे मुले ड्रग्सच्या आहारी जाऊन बिघडतात. अरुणाचल मध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे आलेल्या रिकामपणामुळे आणि जीवनशैलीमुळे प्रचंड व्यसनाधीनता दिसते. दारू, तंबाखू, Drugs याचा सर्रास वापर केला जातो, असं दादा सांगत होते. दोन्ही मुलांना शिकण्यासाठी बाहेरच पाठवणार असे ते म्हणाले. गप्पा मारता मारता माझा दुधी भोपळा किसून झाला, अंजलीची भेंडी चिरून झाली. पण प्रथमेश कितीतरी वेळ मसालाच बनवत होता. घरातली पालेभाजी वापरून काही केल्या चव येईना. मग चव येण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून त्यात चक्क आलं-लसूण घातलं! दादांचे मित्र साडेसातलाच आले आणि आमची एकच धांदल उडाली! कार्यशाळा घेतानाही आम्हाला एवढं टेन्शन येत नाही खरं! एकट्या अंजलीने केलेली भाजी नीट शिजत होती. मी केलेल्या दुधी हलव्यात चुकून जास्त दूध पडलं होतं. त्या मंचुरियन मध्ये मी आणि प्रथमेशने तर इतके काय काय प्रयोग केले होते! मग आम्ही तिघं एकमेकांनाच छान होईल असं समजावत होतो. शेवटी एकदाचा तो हलवा आटला आणि मंचुरियनही हव्या त्या स्वरुपात दिसायला लागलं! अंजलीने लगेच पापड भाजून घेतले. लोने खास पाहुणे येणार म्हणून फिश बार्बेक्यू केले होते. आम्ही तिघांनी केलेले पदार्थ छानपैकी सजवून जेवणासाठी पानं घेतली. आमच्यापेक्षा आज आमचे दादाच उत्साही होते. आलेले पाहुणे दादांचे खास मित्र होते. ते दोघेही शिक्षक. इकडे जो बघतो तो शिक्षकच आहे! पदार्थांची चव घेण्याआधीच दादा आमचं कौतुक करत होते. घरी आई-बाबा पाहुण्यांसमोर जसं कौतुक करतात अगदी तस्संच!

From January 4, 2015
जेवायला सुरुवात करण्याआधी आम्ही 'वदनी कवळ घेता' हा श्लोक म्हणला आणि आपल्या पद्धतीची ओळख करून देण्याचा छोटासा प्रयत्न केला. सगळ्यांना आम्ही केलेले पदार्थ खूप आवडले. तोंडदेखल कौतुक सगळेच करतात. पण सगळ्यांनी आम्ही केलेले पदार्थ आवर्जून परत परत घेतले! कोणालाही आग्रह करावा लागला नाही. लोला मधुमेह असल्यामुळे मी केलेला हलवा ती थोडाच खाऊ शकली. तसं बघितलं तर लो नात्याने माझी कोणीही नाही. पण आपल्या जवळच्या माणसाने आपण केलेला पदार्थ खाल्ला नाही की जसं वाईट वाटत तसं वाईट मला वाटतंय! दादांचे मित्र खुश दिसत होते. थोड्याफार गप्पा झाल्यावर त्यांनी निरोप घेतला. आम्ही तिघांनीही आवराआवर केली. माझा घसा जाम बसला आहे. माझ्यासाठी रिनाने चुलीवर पाणी गरम करायला ठेवले आहे. ही मुलगी दिवसभर कामच करत असते. वयाने लहानच असावी. तिच्याशी मगाशी बोलायला गेले तर ती नुसतीच लाजली. उद्या-परवा हिच्याशीही गप्पा मारायला हव्यात.
आजच्यासारखीच मी उद्याही लवकर उठणार आहे. आज सकाळी ५.३० वाजताच जाग आली. सहाच्या मानाने साडेपाच ही प्रगती आहे. आज उठल्या उठल्या जे दृश्य बघितलं ते अस्वस्थ करणारं होतं. Chang आणि सिंत्रिया दोघेही टीव्ही लावून बसले होते. कार्टून नेटवर्कवर pokemon बघत होते. लो आतल्या खोलीत योगसाधना करत होती. तर दादा आपल्याच कामात गुंग होते. लो आणि राजीवदादादा दोघांनाही आपली मुले सक्काळी-सक्काळी टीव्ही बघतायत याचे काहीही वाटत नव्हते.
लवकर जाग आल्याने माझ्याकडे वेळच वेळ होता. स्वच्छ हवेत फेरफटका मारून यावा असा विचार मनात आला. अंजली पूर्ण बरी झाली नसल्याने तिला विश्रांतीची गरज होती. पण प्रथमेश जागाच होता. आम्ही दोघांनीही पटपट आवरून घेतले. दादांना विचारून शूज घालायला घेतले. टीव्ही बघणारी छोटी gang कुतूहलाने आमच्याकडे पाहत होती. यांनाही सोबत नेऊ का असे दादांना प्रथमेशने विचारले. दादा लगेचच हो म्हणले. हो म्हणल्यावर मुले जी काही खुश झाली. लगेचच स्वेटर आणि टोपी चढवून दोन्ही मुले तयार! मुले येणार म्हणल्यावर आम्हीही खूष! कारण रस्ता चुकण्याची भीती नाही.

From January 4, 2015
मुलांसोबत चालत असताना लक्षात आले की या मुलांना इथे काही मनोरंजनच नाहीये. वस्ती विरळ असल्याने खेळायला शेजारीपाजारी त्यांच्या वयाची मुले नाहीत. लोकसंख्या कमी असल्याने बाग-बगीचे किंवा मुलांना खेळण्यासाठी काही बांधकामही नाही. मुलांचे आई-वडील आपापल्या कामात व्यस्त! मग ही मुले करणार तरी काय? इतक्या लहान वयात अभ्यास असून असून किती असणार! आमच्याबरोबर येताना ही मुले इतक्या आनंदात होती. जणू काही आम्ही एकत्र ट्रीपलाच चाललो आहोत असं त्यांना वाटत होतं! शहराप्रमाणेच गावातही घरात सर्व काही असूनही मुलांना येणारा एकटेपणा काही चुकलेला नाही.

From January 4, 2015
भरपूर सारे फोटो घेत आम्ही चालत होतो. तेवढ्यात पाऊस सुरु झाला. पण या पावसात काही दम नव्हता. कालही आम्ही शाळेत जाताना थोडा पाऊस होताच. इतक्या थंडीत पावसात भिजण्याची मला अजिबात हौस नव्हती. त्यामुळे मी आणि प्रथमेश पळायला लागलो. पण मुलांना घरी परत यायचेच नव्हते. शेवटी त्यांना कडेवर घेऊन घरी आणावे लागले.
आजही दोन शाळांमध्ये कार्यशाळा होत्या. दोन्ही शाळांमध्ये ४०० ते ५०० मुले होती. कालच्या अनुभवामुळे आज माझा आत्मविश्वास वाढला होता. बारीक पाऊस असल्याने आम्ही लवकरच निघालो. मुलांच्या आजीने, आयटाने आम्हा तिघांशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला; पण भाषेच्या अडचणीमुळे आम्हाला तिघांना काही कळलेच नाही. तिला नमस्कार करून तसेच निघालो. अंजलीचा आज पहिला दिवस होता. त्यामुळे तिला थोडे टेन्शन आले होते. वाटेत उत्तमसरांना गाडीत घेतले. मध्येच दादांनी गाडी थांबवली. रस्त्यामध्ये वाटेत पाणी साचल्यामुळे पुढे कसे जायचे हा प्रश्न होता. पण पाण्याची पातळी बघून त्या पाण्यातूनच गाडी पुढे न्यायचे ठरले. दुसरा काही पर्यायही दिसत नव्हता. त्यामुळे सगळ्यांना गाडीतून उतरायला सांगून दादांनी गाडी पुढे आणली. पावसाची सर अधूनमधून येतच होती. मुलं-मुली सायकलवर बसून छत्री हातात घेऊन शाळेत जाताना दिसली. इथल्या मुली तर भलत्याच सुंदर आहेत. त्यातून अश्या पावसात एका हातात छत्री धरून सायकल चालवताना त्या अजूनच छान दिसत होत्या.

पाऊस पूर्ण थांबला आणि लख्ख उजाडलं. लवकरच आम्ही शाळेत पोचलो. सकाळची कार्यशाळा शक्यतो मोकळ्या मैदानावर घ्यायची असे आमच्या तिघांचे ठरले होते. दादांचेही तेच म्हणणे होते. पण मैदानावरील गवत पावसामुळे भिजले होते. सुदैवाने शाळेचे मुख्याध्यापक उदार मनाचे निघाले. त्यांनी लगेच मुलांना बाक आणि फळा मैदानावर आणायची सूचना दिली. ४०० मुलांचे बाक आणणे सोपी गोष्ट नव्हती. पण इथले सगळेच लोकं समजूतदार आहेत. आमच्याकडे सर्व मुले ‘हे कोणत्या जगातले प्राणी आहेत’ अश्या नजरेने बघत होती. पण काही खेळ, गप्पागोष्टी केल्यानंतर मात्र लगेच खुलली. इंग्रजी आणि हिंदी वापरूनही भाषेचा अडसर आलाच. तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी लगेचच पुढे येऊन स्थानिक भाषेत समजावले. मुले जेवढी जास्त तेवढी मजाही जास्त आणि होणारी दमणूकही जास्त असा प्रत्यय येत होता. सर्व मुलांच्या डोळ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता, कुतूहल, शिकण्याची इच्छा दिसली. पण स्वभावाने मात्र इथली मुलें अतिशय लाजाळू आहेत! आज दोघांऐवजी आम्ही तिघं होतो. त्यामुळे काही गोष्टी सोप्प्या होत होत्या. २ तास कसे गेले आम्हाला कळलेही नाही.

From January 4, 2015

कार्यशाळा संपल्यावर आमच्याकडे एकच तास होता. नंतर लगेच पुढची कार्यशाळेसाठी निघायचे होते. त्यामुळे feedback form भरून घेऊन चहा पिऊन लगेचच आम्ही निघालो. दुसऱ्या शाळेत पोचल्यावर नेहमीचे सोपस्कार पार पाडले. ११ ते १ वेळ अशी कार्यशाळेची वेळ असल्यामुळे हॉलमध्ये मुलांना बसायला सांगितले. कार्यशाळा सुरु केल्यावर नेहमीसारखा प्रतिसाद मिळेना. तेव्हा कळले की बरीच मुले अजून बाहेर आहेत. खिडकीतून लहान मुले डोकावत होती. मग शेवटी बाहेरच झाडाच्या सावलीत मुलांना बसवायचे ठरले. आम्हाला परत आमचे सामान बाहेर हलवावे लागले. आम्ही तिघेही दमलो होतो. त्यातून या हलवाहलवी प्रकरणामुळे जरा वैतागच आला. मुलांना बसवेपर्यंत बराच वेळ वाया गेला. तरीही आम्ही नव्या दमाने परत सुरुवात केली. तरीही प्रतिसाद येईना. पहिल्या ३ शाळांमध्येही मुले लाजाळूच होती. आत्तापर्यंत सगळ्या शिक्षकांनी आम्हाला मदत केली होती. पण या शाळेत मुलांचे शिक्षक मदतीला पुढेच येईचनात! आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करून कार्यशाळा पार पडली.
त्यांनी भरलेला feedback form बघून तर माझी जाम चिडचिड झाली. Feedback form मधला विशिष्ट भागच शाळेने भरून देणे अपेक्षित आहे. तसे feedback form वर नमूदही केलेले आहे. पण इथल्या शिक्षकांनी संपूर्ण form भरून दिला. आमच्या तिघांच्या शाळेबद्दलच्या प्रतिक्रिया जिथे लिहायच्या आहेत तिथे सगळीकडे त्यांनी उत्तम असे शेरे देऊन ठेवले आहेत. काहीशी नाखूष होऊनच मी गाडीत बसले. दादांनाही आमच्या मूडचा अंदाज आलाच. त्यांनी आमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. या शाळेचे ट्रस्टी एक सरकारी अधिकारी आहेत. असं त्यांनी सांगितलं. मग एकंदर सगळी परिस्थिती लक्षात आली.
सगळ्याच गोष्टी काही माझ्या मनासारख्या नाही होणार. काही वेळेस परिस्थितीची अपरिहार्यता असते. मन शांत ठेवणे महत्त्वाचे! अंजली आता मला लाईट बंद करायला सांगत्ये. इथे लाईट्स इन्व्हर्टर वर चालू आहेत. त्यामुळे आता झोपायला पाहिजे. नेहमीपेक्षा जास्त तास काम करूनही इथे खूप दमायला होत नाहीये. शुद्ध वातावरणाचा परिणाम असावा कदाचित! उद्या तीन शाळांमध्ये कार्यशाळा आहेत. डोकं आणि मन शांत ठेवायला हे वातावरण साथ देऊ देत म्हणजे झालं!

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस तिसरा) http://www.maayboli.com/node/52157

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखच लिहिलंय मुक्ता ....

अरुणाचल मध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे आलेल्या रिकामपणामुळे आणि जीवनशैलीमुळे प्रचंड व्यसनाधीनता दिसते. दारू, तंबाखू, Drugs याचा सर्रास वापर केला जातो, असं दादा सांगत होते. >>>>> हे वाचून खूप वाईट वाटले ....

सगळ्या बाजूंचा शक्य तितका विचार करणे, समजून घेऊन काम करणे चालू आहे तुमचे. त्यामुळे वाचताना छान वाटतंय Happy कार्यशाळेसोबतच रोजच्या दिनक्रमात नवे नवे काहीतरी करणेही.

होमसिक वाटलं नाही का तुम्हा सगळ्यांना? की वेळच नव्हता होमसिक व्हायला? Happy

धन्यवाद
@पुरंदरे शशांक व्यसने ही तिथल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत हे दाहक सत्य तिथे समजले.
@सई होमसिक वह्ययला वेळच नव्हता! Happy भात खाऊन मात्र कंटाळा यायचा. आईच्या हातच्या पोळ्यांची आठवण यायची.

फार चांगली रोजनिशी लिहिली आहे. त्या दिवशी रात्री पूर्ण लिहिता का टिपण करून नंतर पुन्हा लिहून काढता ?परदेशातले काहीजण बाजूला प्रिंटस लावतात आणि त्यांच्या चाळीस पन्नास वर्षाँपूर्वीच्या रोजनिश्यांचे फारच अप्रुप वाटतं.

मुक्ता, किती सुंदर आणि प्रवाही वर्णन केल आहे. फारच छान. दुधी हलव्याचा प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला!

सहज,सुलभ आणि सुंदर लिखाण. फोटो टाकण्याचे तंत्र लवकर शिकुन घ्या. लिखाणाबरोबर फोटोची साथ असेल बहार येईल.

आगळावेगळा अनुभव असलेली ही रोजनिशी वाचताना मजा येत आहे.

अरुणाचल मध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे आलेल्या रिकामपणामुळे आणि जीवनशैलीमुळे प्रचंड व्यसनाधीनता दिसते. दारू, तंबाखू, Drugs याचा सर्रास वापर केला जातो, असं दादा सांगत होते. >>>>> हे वाचून खूप वाईट वाटले .... >>> पुरंदरे शशांक + १

सुन्दर अनुभव Happy

अरुणाचल मध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे आलेल्या रिकामपणामुळे आणि जीवनशैलीमुळे प्रचंड व्यसनाधीनता दिसते. दारू, तंबाखू, Drugs याचा सर्रास वापर केला जातो, असं दादा सांगत होते. >>>>> हे वाचून खूप वाईट वाटले ... >> ++ याबद्दल एक पॉझिटीव पोस्ट काही दिवसात लिहीन इथे ( एक वर्ष पेंडींग आहे ते लिखाण )