अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस पहिला)

Submitted by मुक्ता०७ on 30 December, 2014 - 00:15

अरुणाचल – एक अनुभूती…
ईशान्य भारत म्हणलं की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे तिथला निसर्ग, संस्कृती, माणसं! सुट्टीत ट्रेकिंग आणि सहलींना आपण नेहमीच जातो. पण यावेळेस पर्यटनाची एक आगळी वेगळी संधी चालून आली. ज्ञान प्रबोधिनी आणि ग्यानसेतू या संस्थांतर्फे, ईशान्य भागातील खेड्यांमध्ये जाऊन तिथल्या साधारण पाचवी ते दहावी या वयोगटातील मुलांना विज्ञानाचे प्रयोग शिकवून, एकंदर शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे असा उपक्रम चालवला जातो.(अधिक माहितीसाठी gyansetu-earc.in/) १८ ते ६० या वयातील कोणतीही व्यक्ती स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकते. उत्तर-पूर्व भारतातल्या कुठल्या भागात जायचे हा निर्णयही आपलाच! तर अश्या ह्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली.
पुण्यात ज्ञान प्रबोधिनी मध्ये आमचा ६ जणांचा सहभाग निश्चित झाला. आम्हाला विज्ञानाचे प्रयोग, अरुणाचल मधील परिस्थिती याविषयी तोंडओळख करून देण्यात आली. २ शाळांमध्ये practice वर्कशॉप सुद्धा झाले. आमच्या ६ जणांचे २ गट करण्यात आले. त्यातला १ गट तिराप जिल्ह्यातील खोन्सा गावात जाणार होता. तर मी, प्रथमेश आणि अंजली चांगलांग जिल्ह्यातील दियून गावात जाणार होतो. आता सगळे वाट बघत होते ती म्हणजे कधी एकदा २८ ऑक्टोबरचा दिवस उजाडतो याची!
२८ ऑक्टोबरला आम्ही सगळेजण गीतांजली एक्सप्रेस मध्ये बसलो. कुठल्याही ठिकाणापर्यंत पोचण्याचा प्रवास मला अतिशय आवडतो. कारण उत्साह, आशा, आनंद, दिवास्वप्ने, अस्वस्थता, काळजी, पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे वाटणारी हुरहूर, भीती, चेष्टामस्करी या सगळ्याच एक अजबच मिश्रण या प्रवासात अनुभवता येतं. आमच्यातील ५ जणांचे आरक्षण एका ठिकाणी तर एकीचे आरक्षण १० डबे लांब असे होते. त्यामुळे तिला पोचवताना आणि आणताना गाडीतल्या गाडीतच आमची छोटीशी सहल निघायची. अरुणाचलपर्यंत पोचण्याचा प्रवास खूप तासांचा होता. पण भारतीय रेल्वेतले आम्ही ‘भारतीय प्रवासी’ असल्यामुळे आमच्याकडे वेळ घालवण्यासाठी असंख्य गोष्टी होत्या! उदाहरणार्थ; सामान उपसणे, खाऊच्या भल्या मोठ्ठ्या पिशवीतून हवा तो खाऊ शोधणे, एखादा पदार्थ तयार करणे, पिशवी आवरणे, उगाचच स्वच्छता करणे, सतत काहीतरी चरत राहणे, सहप्रवाश्यांसोबत गप्पा मारणे, गाणी म्हणणे, झोपणे, मध्येच एखादी चक्कर मारणे, शॉपिंग करणे (होय! रेल्वेतही सेफ्टी पिन्स पासून साड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी विकायला येतात!), charging points शोधून mobile charging चे दुकान उघडणे, विविध केशरचना करणे, सूर्योदय आणि सूर्यास्त बघणे, फोटो काढणे, जुन्या मराठी मालिकांची आणि जाहिरातींची ची गाणी म्हणणे, नक्कल करणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अविरत बडबड करणे!
तर हे सगळं करत करत आम्ही कोलकत्त्याला पोचलो. हावडा ब्रिज बघितला. आमच्या नशिबाने त्याच दिवशी छटपूजा होती. बायका-मुले नटून थटून सूर्यनारायणाच्या दर्शनाला घाईघाईने जात होती. उत्सव कुठल्याही देशात, राज्यात, गावात असला मग धर्म, भाषा, प्रांत कुठलाही असो... प्रसन्न वाटते हे खरे! त्या प्रसन्न वातावरणातच दुसरी ट्रेन पकडली. तो प्रवास सुद्धा छान पार पडला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री आम्ही सर्वजण मरीयानी स्टेशनवर उतरलो. तिथून passenger गाडीने जोरहाट स्टेशनला पोचलो. प्रवासाला लागणारा वेळ आणि अंतर कितीही असले तरी स्वतंत्रपणे जाण्याचे थ्रिल आणि त्यामुळे दुणावलेला आत्मविश्वास यामुळे एक वेगळीच positivity प्रत्येकात आली होती. जोरहाट नंतर माजुली येथे जाण्याचा plan, आसाम बंद असल्यामुळे रद्द झाला. त्यामुळे विवेकानंद केंद्र येथे आमची राहण्याची सोय करण्यात आली. एका आश्रमवजा घरात आम्ही राहायला गेलो. एक दार बंद झाले की आणखी बरीच दारे उघडतात तसे काहीसे आमच्यासोबत झाले. कारण दुपारी तिथल्या IAS अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली. श्री सोळंकी हे तिकडचे मराठमोळे अधिकारी उत्तम आसामीज भाषेत बोलत होते. त्यांना भेटून आसाम विषयीचे त्यांचे मत, आपुलकी आणि एक नवी दिशा सापडली. आमची आस्थेने चौकशी करून पुढील प्रवासासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या.
दुपारी महाराष्ट्रीयन पद्धतीने खिचडी केली. भास्कर आणि अरविंद या कार्यकर्त्यांसोबत अंगत पंगत करून जेवण केले. त्यांच्याशी गप्पा मारताना तिथल्या तरुणांचे प्रश्न समजले. बेकारी, रिकामपण, दिशाहीनता, भरकटलेले आयुष्य आणि त्यामुळे येणारी व्यसनाधीनता हेच तिथल्या तरुणांचे आयुष्य! पण विवेकानंद केंद्रात आल्यावर संघटन, विचार, कौशल्य, युवाशक्ती, आरोग्य आणि व्यायाम याचे महत्त्व समजून आयुष्याला एक दिशा प्राप्त होते. साधारण माझ्याच वयाच्या मुलांचे आयुष्य इतके वेगळे आणि कठीण असू शकते हे सत्य पचवणे अवघड जात होते. भास्करदा आणि अरविंददा यांनी कोणताही आव न आणता मोकळेपणानी गप्पा मारल्या. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी तिथून निरोप घेताना खूप जड गेले!
जोरहाट मधल्या विवेकानंद केंद्रातून आमची रवानगी झाली दिब्रुगढच्या विवेकानंद केंद्रीय विद्यालय मध्ये! दिब्रूगढचा बाजार फिरून आल्यानंतर दिब्रूगढ मधील खास चहाची खरेदी सगळ्यांनी केली. संध्याकाळी ब्रम्हपुत्रा नदीवर गेलो. नदी कसली... नदच तो! भारतातल्या इतर नद्यांप्रमाणेच असणारी अस्वच्छता तिथेही होती. पण अजिबात गर्दी नव्हती. पाण्याच्या कोणत्याही नैसर्गिक स्रोताकडे पाहिले की शांतच वाटते. त्यातून इतका लांबचा प्रवास करून आल्यामुळे मनही काहीसे शिणले होते. पण त्या ब्रम्हपुत्रेच्या नदावरचा तो सूर्य पाहून मन अंतर्मुख झाले. दुसऱ्या दिवशी सूर्योदय पाहायला यायचेच असा निश्चय करूनच घरी परतलो.
दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ५ वाजता न सांगताच सगळे उठले. त्या दिवशीचा सूर्योदय कोणीही चुकवला नसता. कारण आम्हा ६ लोकांचे आता ३-३ चे २ गट होणार होते. एक गट खोन्साला तर एक दियून ला जाणार होता. त्यामुळे परत असा निवांत वेळ मिळणे कठीणच होते. पाच दिवस सतत एकत्र घालवल्यानंतर निरोप घेणे अवघड गेले नसते तरच नवल! सगळ्यांचा निरोप घेऊन आमचा दियूनचा गट म्हणजेच प्रथमेश, अंजली आणि मी तिनसुकियाला निघालो. तिथे आम्ही रा.स्व.सं. चे अरुणाचल मधील संचालक श्री. रामचंद्रन सर यांना भेटलो. त्यांच्यासोबतच तिनसुकिया ते दियून असा प्रवास सुरु केला. दिब्रूगढ ते तिनसुकिया आणि तिनसुकिया ते दियून हे प्रवास प्रत्येकी ३ तासांचे होते. पण रस्ते सुस्थितीत असल्यामुळे दोन्ही प्रवास खूपच चांगले झाले. महाराष्ट्रात फिरताना नेहमीचेच डोंगरदऱ्या बघायची सवय असते. पण इथे मात्र नजर जाईल तिथपर्यंत चहाचे मळे, भाताची शेती, छोटी छोटी टूमदार घरे आणि बाजूने सुरेख सुबक कुंपणे असा नजारा दिसत होता. भा.रा.तांबे यांच्या कवितेतल्या ओळींचा प्रत्यय आम्हाला तेथे आला...
हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालिचे
असे निसर्गाचे रूप डोळ्यात साठवत आम्ही अरुणाचलच्या दिराक या सीमेपाशी पोचलो. तेथे सर्वांचे ILP (Inner line permit) तपासण्यात आले. अरुणाचल प्रदेशातील जैवबहुविविधता आणि सुरक्षा टिकवण्यासाठी ठेवण्यात आलेली ILP ही एक व्यवस्था आहे. त्यामुळे आपण भारतातल्याच एका राज्यात जात असलो तरी ह्या व्यवस्थेमुळे उगाचच दडपण जाणवते. दिराकपासून तासाभरातच आम्ही दियून या गावातील दुम्पानी या खेड्यात पोचलो. तिथे आमची अरुणाचलमधील सेवाभारतीचे मुख्य श्री.ज्योतिष गोगोई यांच्याशी ओळख झाली. ज्योतिषदादा आणि त्यांची पत्नी दोघेही शिक्षक आहेत. अरुणाचल मध्ये ग्यानसेतूच्या स्वयंसेवकांची व्यवस्था सेवाभारती ही संस्था बघते. दुपारचे जेवण त्यांच्याकडेच करण्याचे ठरले. ज्योतिषदांचा लहान मुलगा शिवम् आणि त्याचा सवंगडी राहुल यांनी आम्हाला त्यांच्या घरालगतच्याच छोट्याश्या बागेत फिरवून आणले. इथले लोक घरालगतच्या बागेतच केळी, tomato, मिरच्या, पालेभाज्या पिकवतात. त्यामुळे जेवणात काय असेल याची उत्सुकता होतीच. जेवणाच्या ताटात पूर्ण ताट भरून भातच होता. ते पाहूनच आमचे अर्धे पोट भरले. प्रत्येक वेळी भाताने भरलेले ताट बघूनच आम्ही गार पडायचो. भातासोबत डाळ, पालेभाजीचे सूप (पालेभाजीचे नाव विचारले असता "वो तो पत्ती है" असे उत्तर मिळाले!) आणि शिजवलेली भेंडी होती. जेवण खूपच चविष्ट होते.
भात हे अरुणाचलमधील मुख्य अन्न. भातासोबत चिकन/मटण/मासे/पोर्क आणि पालेभाजीचे सूप, डाळ खाल्ले जाते. आपल्याकडे जशी मेथी, पालक, चुका अश्या पालेभाज्यांची भाजी करतात तशी घरातल्याच बागेत पिकणाऱ्या पाल्यांची मिळून भाजी केली जाते. मसाले एकंदर कमीच. स्वयंपाकात तेल, तूप, मैदा, साखर या गोष्टी फारच कमी वापरल्या जातात. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचा आहार आरोग्यदायी असतो. स्वच्छ हवा आणि आरोग्यपूर्ण आहार यामुळे लोक कायम उत्साही असतात.

दुपारी ४.३० च्या सुमारास राजीवदादा आणि त्यांची पत्नी आम्हाला घ्यायला आले. राजीवदादा हे अरुणाचलमधील सेवाभारतीचे उपप्रमुख. आमचा अरुणाचलमधील मुक्काम त्यांच्याकडेच होता. संध्याकाळी ५.३० वाजता त्यांच्या घरी पोचलो. अंधार लवकर पडत असल्यामुळे रात्रीचे ९ वाजल्यासारखे वाटत होते. त्यांच्या घरी ते, त्यांची पत्नी सई म्हणजेच आमची लो (वहिनी), आई, २ लहान मुले आणि रिना नावाची त्यांची मदतनीस असे राहतात. घरातील स्वयंपाकघर आणि जेवणघर थेट कोकणातल्या घरांसारखीच बांबूने बांधलेली आणि जमिनीपासून वर होती. बाकी आतल्या खोल्यांचे बांधकाम पक्के होते.

From January 4, 2015

गेल्यागेल्याच आमची chang(५) आणि सिंत्रिया(७) या त्यांच्या मुलांशी छान गट्टी जमली. आमच्याकडचे कार्यशाळेचे साहित्य बघून दोघं मुलं जाम खूष झाली. मी, अंजली आणि प्रथमेश सगळे साहित्य मांडून बसलो. मुलांना फुगे आणि चेंडू दिल्यावर ती खेळायला बाहेर गेली. सगळ्या प्रवासाच्या गडबडीत आमच्या आणि खोन्सा ग्रुपच्या सामानाची थोडी अदलाबदल झाली. त्यामुळे आमच्याकडे काही प्रयोगांसाठी लागणाऱ्या कात्र्या, चिकटपट्ट्या कमी होत्या. आणखीनही काही सामान गायब होते. पण आम्ही तिघांनीही शांतपणे विचार करून कार्यशाळेतील प्रयोगांची पुन्हा नव्याने आखणी केली. मोजकेच प्रयोग आकर्षक आणि सोप्प्या पद्धतीने कसे दाखवता येतील याचा विचार केला. आश्चर्य म्हणजे आम्ही तिघांनीही एकमेकांवर न चिडता, शांत चित्ताने चर्चा केली आणि कार्यशाळेचे सगळे सामान आवरून ठेवले. नवीन जागी आल्यामुळे आम्ही आपोआपच शहाण्यासारखे वागायला लागलो.
रात्री जेवायला अर्थातच भात होता. सोबत दुधीभोपळ्याची भाजी आणि पालेभाजीचे सूप होते. रामचंद्रन सरांसोबत उत्तम इंगळे नावाचे गृहस्थ आले होते. ते रा.स्व.सं आणि सेवाभारतीचे कार्यकर्ते आहेत. ते मूळचे नागपूरचे. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन समाजकार्याला वाहून घेतले आहे. रात्री मी आणि प्रथमेशने त्यांना बऱ्याच गोष्टी विचारल्या. एकटे राहून, घरच्यांच्या विरोधात जाऊन असे कार्य करणे किती अवघड असू शकते असे प्रथमेशने विचारले. ह्या निर्णयापर्यंत ते कसे पोचले याविषयी मला खूप उत्सुकता होती. पण हा मार्ग स्वीकारणे हा निर्णय नसून एक प्रवास होता असे त्यांनी सांगितले. एखाद्या गोष्टीसाठी सर्वस्व पणाला लावणे, तन-मन-धन सर्वार्थाने वाहून घेणे ह्यात एक वेगळाच आनंद आहे, सुकून आहे. माझ्या मुल्यांचा आणि बलस्थानांचा वापर करून प्रचार करणे मला आवडते असे त्यांनी सांगितले. राजीवदादांबद्दलही बरीच माहिती जेवताना मिळाली. डॉ. राजीव होपक हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी भूगोल विषयात PHD केली आहे. ते दुम्पानीमधील एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांची पत्नी सुद्धा पेशाने शिक्षक आहे. राजीवदादांना आम्ही 'दादा' म्हणत असल्याने त्यांच्या पत्नीला वहिनी म्हणले पाहिजे असे आमच्या लक्षात आले. त्यांच्या 'कामठी' भाषेत वहिनीला 'लो' असे म्हणतात. त्यामुळे लगेचच त्यांच्या पत्नीचे नामकरण लो असे झाले.
झोपायची तयारी करून मोकळी हवा खायला म्हणून मी बाहेरच्या अंगणात पाऊल टाकले आणि थक्क करून टाकणारे दृश्य दिसले. भला मोठ्ठा चंद्र आणि असंख्य चांदण्या आकाशात झगमगत होत्या. चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात आजूबाजूचा परिसर न्हाऊन निघत होता. त्या सुंदर प्रकाशात रस्ते, झाडेझुडुपे आणि आजूबाजूची घरं स्वच्छ लखलखीत दिसत होती. निसर्गापासून आणि स्वतःपासून आपण किती पळून जातो हा विचार मनात येत होता. एरवीच्या घाईगर्दीतून इतक्या शांत, तरल आणि रम्य वातावरणात आल्यावर मन अंतर्मुख झाले नाही तरच नवल! आत्मशोधाच्या पुढच्या प्रवासाची नांदी देणाऱ्या आणि भारावून टाकणाऱ्या त्या वातावरणाची साक्ष काढत आम्ही झोपी गेलो.

अरुणाचल मध्ये पोचल्यानंतर मी लिहिलेल्या रोजनिशीतील काही पाने

दिवस पहिला
आज माझा इकडचा पहिला दिवस. पहाटे ४ वाजताच कर्कश आवाजाने जाग आली. तो कर्कश आवाज गावातल्या देवळात जोरजोरात लावलेल्या गाण्यांचा होता अशी माहिती नंतर मिळाली. खरं म्हणजे तेव्हापासूनच मी जागी होते. पण बाहेरच्या थंडीमुळे आणि प्रवासाच्या शिणवठ्यामुळे उगाचच झोपून राहिले. ६ वाजता गजर झाल्यावर आवरायला घेतलं. प्रथमेशलाही ४ वाजताच जाग आली होती असे त्याने मला सांगितले. माझ्याआधी घरातील लहान मुलांसकट सगळेजण आवरून आपापली कामे करत होते. हे बघून जरा लाजच वाटली. उद्यापासून लवकर उठायचं असं मी स्वतःशीच ठरवून टाकलंय. इथेही कोकणातल्या घरासारखं बाथरूम वगैरे सगळं बाहेरच आहे. त्या थंडीत ब्रश करणे खरं तर जीवावर आलं होतं. पण ते गरजेचं होतं. अंजलीला बरं नव्हतं. त्यामुळे राजीवदादांनी तिला सक्त विश्रांती घ्यायला सांगितली. आवरून झाल्यावर ब्रेकफास्टला बघते तर काय... चक्क पोहे होते! मी आणि प्रथमेशनी लोला अगदी पोह्याची रेसीपी वगैरे समजावून दिली. आमच्या इथे पण हाच ब्रेकफास्ट करतात यावर बोलणं झालं. पहिला घास तोंडात टाकला आणि सॉलिड पचका झाला. कारण ते पोहे नसून तो भात होता! दिसण्यात थोडे साम्य होते इतकेच! खरं म्हणजे सकाळी ७ ही काय आपल्याकडची ब्रेकफास्ट करण्याची वेळ नाही. पण त्यानंतर आम्ही थेट २ वाजता जेवणार होतो. त्यामुळे जात नसतानाही उगाचच पोटात अन्न ढकलत होते. ७.१५ ला मी आणि प्रथमेश तयार झालो. आजीचा आर्शीवाद घेतला आणि गाडीत बसलो. पुण्यात आमचा practice वर्कशॉप झाला होता. पण अरुणाचलमधील पहिलीच कार्यशाळा असल्यामुळे माझ्या छातीत प्रचंड धडधडत होतं. प्रथमेश तसा शांतच दिसत होता. मी माझं मलाच समजावत होते की सगळं नीट होईल. थोडा पाऊसही पडत होता. पण एखाद्दुसरीच सर! इकडचे रस्ते खूपच सुंदर आहेत. इथल्या कुठल्याही जागेचा डोळे मिटून फोटो काढला तरी तो चित्रासारखा अप्रतिम दिसतो. जाताना दादांनी मस्त गाणी लावली होती. वाटेत ज्योतीषदादांच्या घरी थांबलो. त्यांच्याशी आणि त्यांच्या बायकोशी गप्पा-गोष्टी केल्या आणि निरोप घेऊन निघालो. लवकरच आम्ही बलुपठार मधील सरकारी शाळेत पोचलो. छान टुमदार शाळा होती.

From January 4, 2015

मी, प्रथमेश आणि दादा ऑफिसमध्ये गेलो. तिथल्या मुख्याध्यापकांना राजीवदादांनी आधीच थोडीफार कल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे आमचे काम सोपे झाले. आमची जुजबी चौकशी करून त्यांनी आमची विज्ञान शिक्षकाशी ओळख करून दिली. मैदानावरच बाक टाकून प्रयोग घ्यायचे ठरले. सगळ्या मुलांना आपापल्या वर्गातले बाक आणायला सांगितले. टेबलावर फळा मांडून ग्यानसेतू असे ठळक अक्षरात लिहिले. आमचे सगळे साहित्य आकर्षक पद्धतीने मांडून ठेवले. राजीवदादांच्या मदतीने सेवाभारती आणि ग्यानसेतूचे banners लावले. मुलंच काय पण सगळे शिक्षकही उत्सुक नजरेने आमच्याकडे पाहत होते. प्रथमेशनी खूप सहज आणि सोप्प्या पद्धतीने icebreakers घेतले. त्यानंतर एका मागून एक आम्ही wave model, centrifugal force, projectile motion चे प्रयोग घेतले. mass occupies space हे सांगायला आम्ही मुलांमध्येच स्पर्धा लावली. मुलांसोबतच शिक्षकही माना डोलावत आमचं बोलणं ऐकत होते. आमच्या सोबत सेवाभारतीचे आणि रा.स्व.सं चे कार्यकर्ते श्री. उत्तम इंगळे सर सुद्धा आले होते.
साधारण २ तासांनंतर आमची कार्यशाळा झाली. मग आम्ही ऑफिसमध्ये गेलो. कोरा चहा, बिस्किटं आणि फरसाण आमची वाट पाहत होते. २ तासांतच मला कडकडून भूक लागली होती. प्रथमेश चहा पीत नाही. त्यामुळे कदाचित त्याने compensation म्हणून भरपूर बिस्किटे खाल्ली. आम्ही अक्षरशः त्या बिस्किटांवर ताव मारला. मग लक्षात आले की कार्यशाळेचा पूर्ण वेळ म्हणजे २ तास आम्ही उभे होतो, भरपूर बोलत होतो, मुलांसोबत खेळत होतो आणि हे सगळं उन्हात चालू होत! इथे ९ वाजताच १२.३० वाजल्यासारखे वाटत होते. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे भूक लागणारच! तिथल्या विज्ञान शिक्षकांनी आमचे email address, फोन नंबर लिहून घेतले. मी आणि प्रथमेश वयाने लहान असूनही आम्हाला सगळे सन्मानाने वागवत होते. त्यावरून सेवाभारतीचे वलय आणि राजीवदादांची प्रतिष्ठा लक्षात आली. आम्हाला त्यांनी आमचा feedback form भरून दिला. चांगला feedback पाहून ‘सुरुवात तरी चांगली झाली’ अशी स्वतःलाच शाबासकी देऊन पुढच्या शाळेत आम्ही निघालो. ह्या शाळेत ३०० मुले आहेत अशी माहिती राजीवदादांनी दिली. ३०० आकडा ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. आमची पहिली कार्यशाळा फारच चांगली पार पडली होती अशीच पुढचीही छान होईल असे प्रथमेशने ठामपणे मला सांगितले.
शाळेत पोचल्यावर परत एकदा मुख्याध्यापकांशी चर्चा झाली. ह्या शाळेतले विज्ञान शिक्षक वयाने तसे मोठे होते. त्यांच्याकडून चांगला feedback मिळणे खूप आवश्यक होते. त्यांच्या शाळेतल्या सगळ्यात मोठ्या हॉलमध्ये मुलांना बसवले होते. इतक्या लांब येऊन या मुलांचे हसरे चेहरे पाहिल्यावर खरंच बरं वाटलं! centrifugal force समजावून देण्यासाठी आम्ही sprinker चे model बनवून दाखवले. हा प्रयोग मुलांनीही करून बघणे अपेक्षित आहे. पण एवढ्या मुलांना सामान वाटायचे कसे असा प्रश्न पडला. पण अक्षरशः क्षणाचाही विलंब न लावता राजीवदादा, उत्तमसर आणि तिथल्या सर्व शिक्षकांनी साहित्य वाटायला आम्हाला मदत केली.

विज्ञान प्रयोगांसोबतच स्त्रीदाक्षिण्य, पुढाकार घेणे, एकता याविषयांवरही मुलांशी गप्पा मारल्या. काही मुलांनी खूपच छान उत्तरे दिली. अश्या मुलामुलींना आम्ही स्केचपेन्स, चॉकलेट्स आणि पुस्तके भेट म्हणून दिली. कार्यशाळेच्या शेवटी, मनापासून लक्ष देणाऱ्या आणि पुढाकार घेणाऱ्या मुलाला किंवा मुलीला अशी छोटी-छोटी गिफ्ट्स आठवण म्हणून देण्याची आमची कल्पना आहे. ह्या शाळेतूनही फारच छान feedback मिळाला.
दुपारी घरी आल्यावर लगेचच जेवायला बसलो. लोने आज रोटी केली होती. बऱ्याच दिवसांनी पोळीसदृश काहीतरी बघूनच बरे वाटले. रोटी, भाजी आणि डाळ असे जेवण होते. हे सगळे प्रकरण पुरेसे थकवणारे आहे हे लागणाऱ्या भूकेवरून चांगलेच लक्षात आले. जेवणानंतर झोप घेण्याचा फार मोह झाला. पण झोपून चालणार नव्हते. उगाचच वेळ वाया गेला असता. लोने अंजलीला डॉक्टरकडे नेऊन आणले. त्यामुळे तिलाही बरं वाटत होत. आम्ही तिघांनी थोडीफार आवराआवर केली आणि गप्पा मारत बसलो.
राजीवदादांसोबत दिहिंग नदीवर जायचे ठरले. आमच्या घरापासून १५ मिनिटावर नदी आहे असे दादांनी सांगितले.

From January 4, 2015

दर २ पावलांवर आमच्यापैकी कोणीतरी थांबून फोटो काढत होतो. त्यात काहीकाही मजेशीर फोटोही निघाले. त्यावर हसतहसत दिहिंग पर्यंत कसे पोचलो कळलेच नाही. एरवी आपण तथाकथित ‘sunset point’ वर जाऊन जो सूर्यास्त बघतो त्यापेक्षा आजचा सूर्यास्त खूपच वेगळा होता! प्रचंड गर्दी, गोंधळ, खाण्याच्या गाड्या, त्यामुळे होणारा कचरा, दिखाव्यासाठीचे बांधकाम आणि चकचकीतपणाचा आणलेला आव असा कोणताही प्रकार तिथे नव्हता. फक्त नदी, सूर्य आणि स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारे ते तरल वातावरण! आजूबाजूला घरं-शेती होती. लोकं आपापल्या कामात व्यस्त होती. हे सगळंकाही सुरळीतपणे चालू असताना तो सोन्याचा लालबुंद गोळा शांतपणे त्या सुंदर नदीत विलीन झाला! आपण निसर्ग-निसर्ग म्हणतो तो हाच असावा कदाचित! निसर्गाच्या इतक्या साध्या आणि सच्च्या रुपाची एक वेगळीच अनुभूती तो सूर्यास्त बघून मिळाली.

From January 4, 2015

शांत मनाने आम्ही घरी आलो. लो खाऊपोक नावाचा पदार्थ बनवत होती. एका विशिष्ट प्रकारच्या तांदळात काळे तीळ घालून त्याचे मिश्रण केले जाते. त्याचे पापड करून ते तळून खाल्ले जाते. खाऊपोक चविष्ट होते. पण आपल्याकडे पुरणपोळी ज्या किचकट आणि वेळखाऊ प्रकारात मोडते त्याच प्रकारात खाऊपोक येतो. कंटाळा येईस्तोवर आणि हात, मान मोडेपर्यंत ते मिश्रण मळावे लागले. आम्ही तिघं मिळून अर्धा तासही टिकलो नाही.
इथे जेवायच्या आधी हात धुवायची निराळीच पद्धत आहे. एका प्लास्टिकच्या भांड्यात जेवणाआधी दादांनी हात धुतले. आम्हीही तसेच हात धुतलेले पाहून त्यांना आमचे फारच कौतुक वाटले. बेसिन ही संकल्पनाच नसल्यामुळे ही सोय असावी असा अंदाज मी बांधला. सकाळपासून मी बघत्ये तर दादा आणि लो फ्रीजमधलं थंडगार पाणी पितायत. असं का हे दादांना विचारलं तर ह्याच तापमानाच्या पाण्याची त्यांना सवय असल्याचे त्यांनी सांगितले.
इथे आत्ता पुरेशी थंडी वाजत्ये. रात्रीचे फक्त ९.३० झालेत. दादा आणि प्रथमेश बाहेर जेवणघरात तर लो आणि मुले त्यांच्या बेडरूममध्ये झोपली आहेत. मी, अंजली आणि आज्जी (म्हणजेच आयटा) हॉलमध्ये झोपतोय. डास खूप असल्यामुळे मच्छरदाणी लावली आहे. मला आणि अंजलीला किती वेळ ती लावणे जमेच ना! आम्ही नुसता गुंता करून ठेवला. मग शेवटी रिनाने (ह्या घरातील मदतनीस) आम्हाला मच्छरदाणी लावून दिली. अंजली औषध घेऊन झोपली आहे. उद्या लवकर उठण्यासाठी आत्ता लवकर झोपणे गरजेचे आहे. पण इतक्या सगळ्या नवीन गोष्टी बघून आणि इतक्या नव्या लोकांना भेटून आल्यानंतर झोप येणं फारच कठीण आहे. रोज नवीन शाळा, नवी मुले, नवे चेहरे, नव्या आशा! आम्हाला त्यांच्या जगाशी जोडणारे धागे म्हणजे त्यांची प्रचंड उर्जा, उत्सुकता आणि निरागसता! नवीन भाषा, जागा, अन्न, माणसं, विचार, दृष्टिकोन, भावना आणि स्वतःचे अंतरंग जाणून घेण्याची ही तर फक्त सुरुवात आहे!

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस दुसरा) http://www.maayboli.com/node/52129

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अनुभव आणि अप्रतिम लेख !

तुमच्या सेवाभावी कार्याचे कौतूक करावे की दूरदराजच्या जागी जाण्याच्या धीराचे असा प्रश्न पडतोय ! फार स्पृहणिय कार्य करत आहात. असेच कार्य भविष्यात करण्यासाठी अनेक शुभेच्छा !!

अरुणाचलाबद्दल एक सुप्त आकर्षण आहे. केव्हा जायचा योग येईल ते माहित नाही.

फोटो टाकले असतेत तर अजून मजा आली असती... शक्य असले तर टाका.

मुक्ता, किती सुंदर लिहिलं आहे!
पुढच्या भागात फोटो हवे मात्र. पुढचे वर्णन वाचण्याची उत्सुकता लागली आहे. लेखनासाठी आणि भविष्यातल्या उपक्रमांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

ज्ञान प्रबोधिनी आणि ग्यानसेतू या संस्थांतर्फे, उत्तर-पूर्व भागातील खेड्यांमध्ये जाऊन तिथल्या साधारण पाचवी ते दहावी या वयोगटातील मुलांना विज्ञानाचे प्रयोग शिकवून, एकंदर शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे असा उपक्रम चालवला जातो. >>>>> अतिशय कौतुकास्पद उपक्रम.

तुम्हा युवा मंडळींना यात सहभागी व्हावेसे वाटले - हे तर खूपच विशेष कौतुकास्पद .. मनापासून अभिनंदन आणि पुढील उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.

शब्दांकन फारच सुरेख, तुम्हाला जी सारी सेवाव्रती मंडळी भेटली त्यांचेही हार्दिक अभिनंदन व त्यांना सलामच ...

माझ्या नात्यातील एक व्यक्ति काही वर्षांपूर्वी तिथे (आसाम, अरुणाचल ) सेवाव्रती म्हणून सुमारे दीड-दोन वर्षे राहिली होती - त्याची आठवण झाली. इथे मा बो वर श्री. चिक्षे म्हणून एकजण आहेत त्यांचेही तिथले अनुभव खूप वाचनीय आहेत.

अरे वा, मुक्ता, किती छान लिहिलं आहेस! तुझा व तुमच्या ग्रुपचा उत्साह लिखाणातून जाणवतोय. खाऊपोकचा तुझा फोटो आठवतोय! Proud
वृत्तांत मस्त झाला आहे. पुढे काय काय झाले, काय पाहिलेत, काय अनुभव मिळाले हे जाणून घ्यायचीही उत्सुकता आहे.

लेखमालेत ग्यानसेतूचा पत्ता, संपर्क वगैरे देणे शक्य असेल तर देशील का?

खूप सुरेख लेखन. मला असे स्वयंसेवक व्हायला आवडेल. ह्याची प्रक्रिया काय आहे? ते ही लिहा.
तो गाडीतील वेळ घालवायच्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा परिच्छेद मस्त आहे.

इथल्या कुठल्याही जागेचा डोळे मिटून फोटो काढला तरी तो चित्रासारखा अप्रतिम दिसतो. >>>>>

अशा अविश्वसनीय, अतर्क्य आणि अनुपम भारताची ओळख करून घेण्याची सुवर्णसंधी तुम्हाला योग्य त्या वयातच मिळालेली दिसते आहे. तुम्ही केवळ भाग्यवान आहात असेच नाही, तर त्या भाग्याचे अनमोल संधीत रूपांतर करण्यातही तुम्ही यशस्वी झालेल्या आहात. तुमचा उत्साह आणि धाडस ह्यांचे कौतुक करावे तितके थोडेच ठरेल. तुमच्या अशा सर्व साहसी सहलींना माझ्या हार्दिक शुभेच्छा!

ह्यासारखीच असंख्य कामे ईशान्य भारतात सुरू आहेत.
http://www.maayboli.com/node/42247
ह्या दुव्यावर एका कामाबाबत वाचता येईल.

ishanyavikas.org ह्या संकेतस्थळावरही भरपूर साहित्य अधोभारणास सादर केलेले आहे.

मुक्ता, खूपच छान उपक्रम आणि लेखन. शुभेच्छा. पुढच्या भागांची वाट बघत आहोत. तिथली एकंदर परिस्थिती याबद्दल तुमचे निरीक्षण व झालेल्या चर्चा याबद्दलही नक्की लिहा. आणि फोटोही.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद!

@ पुरंदरे शशांक मा बो वरचा श्री.चिक्षे यांचा लेख वाचला. खूपच अभ्यासपूर्ण लेखमाला आहे.

@ अरुंधती कुलकर्णी ग्यानसेतूची website https://gyansetu-earc.in/

@ नरेंद्र गोळे मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. खूपच चांगली माणसं आम्हाला तेथे भेटली. पुरेपूर अनुभव घेण्याचा माझा यत्न होता!

आम्ही तिकडे कधीतरी जाऊ. परंतू तुमच्यासारखी मजा नाही मिळणार आणि ती गाडीतली मज्जा किती छान लिहिली आहे. हेच वर्णन आम्ही गुगल विकीछाप कंटाळवाणी माहिती देऊन भरून टाकलं असतं आणि सर्वांना सांगत सुटलो असतो माझा 'लेख टाकलाय'.

सुंदर उपक्रम आणि लेख. पुढचं वाचायची उत्सुकता लागली.
फार चांगलं काम करायची संधी मिळाली तुम्हाला आणि तुम्हीही ते तितक्याच तिडकीनं करताय याचं कौतुक वाटलं.

मस्त लेख. आसाममध्ये राहून हा लेख वाचतेय. तेव्हा प्रत्येक गोष्टीला 'अगदी अगदी' होतंय. Happy
पण तरीही माझी प्रतिक्रिया <<'हेच वर्णन आम्ही गुगल विकीछाप कंटाळवाणी माहिती देऊन भरून टाकलं असतं '>>>> हीच आहे. Wink

अत्यंत स्तुत्य उपक्रम, आणि खुप सुंदर लेख.

पुढील भाग आता वाचणार आहेत आणि त्यात भरपुर फोटो असतील अशी अपेक्षा आहे.

Pages