३०० किमी बीआरएम - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी २

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भारतातील सर्वात कठिण अशी २०० ची बीआरएम पूर्ण केल्यावर १४ दिवसांनीच ३०० बीआरएम पण होती.

ह्या वेळचा मार्ग होता. विद्यापीठ - सातारा - उंब्रज - सातारा - बाणेर

एक मन म्हणत होते की भाग घ्यावा. आणि दुसरे नाही. कारण मी ह्या दोन आठवड्यामध्ये आणखी एक सायकल घेतली होती आणि त्या सायकलवरच करावी असे मला वाटत होते. पण त्या सायकलवर माझी लाँगेस्ट राईड होती केवळ ६२ किमीची ! आणि पोझिशन चेंज व रिलेटिव्हली अननोन बाईकवर एकदम ३०० किमी करणे म्हणजे जरा रिस्कीच होते. अर्थात बाईकला रिस्क नाही तर मला, कारण बाईक पोझिशन चेंज झाल्यावर काही आठवडे खांदे, मान वगैरे दुखू शकतात.

ग्रूप मध्ये मेसेज टाकला करू का? कारण चेंज पोझिशन मुळे मी कन्फ्यूज्ड होतो. अमित म्हणाला की परत विचार कर, चेंज पोझिशन वगैरे बद्दल आणि करायची तर माझ्या जुन्या बाईक वर कर, त्यावर तू आरामात पूर्ण करशील. अमितने लिहिलेल्या मुद्द्यांवर मी विचार केला आणि माझे + आणि - पाँईटस शोधले. तर सुधाकर म्हणाला, तू अगदी आरामात मारशील. त्याने अगदी गणितच मांडले २५ * १४ ब्रेक्ससहीत! सर्वांनीच आपापले मत नोंदवले.

बेव्हेच्या आठवडाभर आधी ही चर्चा रंगली, अजूनही मी नाव नोंदवले नव्हते. मग दोन दिवस बाकी असताना गुरूवारी अचानक नोंदवले. फार तर काय चेंज पोझिशन मुळे जर त्रास झाला तर रिटायर होऊ पण निदान आपल्याला आपली नवी बाईक पूर्ण कळेल.

रात्री हायवेवर खूप वेळ चालवावी लागते त्यामुळे ब्रेव्हे मध्ये शक्तीवान लाईट लागतो. तो लाईट (तेवढा पावरफुल) माझ्याकडे नव्हता, तो आणला. माझ्याकडे अगदी १५०, २०० ल्युमिन्सचा आहे. पण मग हा १२०० ल्युमिन्सवाला आणला. बॅटरी चार्जही केली. आणि सर्व साहित्याच्यी जमवाजमव करून शुक्रवारी संध्याकाळी तयार झालो.

स्पर्धेचा दिवस उजाडला. शनिवार ! सकाळी ५ ला घरातून विद्यापीठ सर्कल कडे जायला निघालो. ६-७ किमी गेल्यावर माझा तो नवा लाईट बंद पडला ! सर्व कनेक्शन पाहिले. तरी लाईट चालू झाला नाही. म्हणजे ती चायनिज बॅटरी चार्ज झालीच नाही! सुरू होण्याआधीच माघार घ्यावी लागणार होती. पण तरीही तिथपर्यंत गेलो.

तिथे आयोजक फरहाद आणि दिव्या होते. त्यांना कहाणी सांगीतली, तर फरहाद म्हणाले की माझ्याकडे स्पेअर आहे, मी देतो तुला काळजी नको. ये ! फरहादांनी त्यांची बॅटरी दिली आणि माझा दिवा लागला ! थँक्यु फरहाद!

ब्रेव्हे कार्ड घेताना तिथे विवेक आला, त्याची कार्बन बाईक मी मागे चालवली होती त्यामुळे त्याची माझी ओळख होती. त्याने अचानक स्पॉट रजिष्ट्रेशन केले. मागच्या वेळचे अर्जून, तिसरा केदार आणि होले अण्णा व त्यांचे मित्र ही होते. तिसरा केदार आणि होले अण्णा व त्यांचे मित्र हे ६०० करणार होते, तर अर्जून माझ्यासोबत ३०० ला होता.

कार्ड स्टॅम्प करून आम्ही सर्व ३०० आणि ६०० वाले सकाळी ६ ला निघालो. ह्या नंतर १-२ जण सोडले मला बाकीचे लोकं कधीही दिसले नाही. मी पुढे निघालो होतो, माझ्या पाठीमागे मिहिर होता. मिहिर आणि मी "रोड बाईक" बद्दल गप्पा मारत निघालो. तो आणि मी "स्टरावा अ‍ॅपवर" एकमेकांचे मित्र आहोत आणि एकमेकांच्या राईडस फॉलो करतो. सिंहगड फ्लायओव्हरपाशी विवेक देखील सोबत आला.

कात्रज चढ आला तसे मी पुढे निघालो. मिहिरची सोबत इथे सुटली. माझ्या पाठीमागे विवेक होता. आता ह्या राईडचा मी "लिडर" होतो. कात्रज उतरून शिरवळ केंव्हा आले ते कळले नाही. कात्रज सोडल्या आम्ही दोघे (मी अन विवेक) ४० च्या स्पिडने पुढे जात होतो. विवेकला पाणी रिफिल करायचे होते म्हणून मग आम्ही शिरवळ सोडल्यावर ( तेथील श्रीराम वडापावचा मोह टाळून! ) ६-७ किमी नंतर एक ब्रेक घेतला. तिथे १५-२० मिनिटे होतो. तितक्यात मिहिर दिसला. मिहिर सोबत थोडावेळ सायकल चालवून आम्ही दोघे परत पुढे निघालो.

खंबाटकी आला आणि आम्ही दोघांनी चढायला सुरूवात केली. टॉप यायच्या आधी एक हेअर पिन आहे. मी त्या हेअर पिनला ओलांडायच्या प्रयत्नात असताना माझ्या पाठीमागचा ट्रक माझ्या समोर येऊन अचानक थांबला. आमच्यात हार्डली ५-७ फुट अंतर होते. मी माझे शू पेडल मधून अनक्लिट केले. डावा निघाला कारण तो पाय खाली होता. पेडल मधून अनक्लिट करताना पायाची पोझिशन ६ वाजल्याची असली तर पटकन अनक्लिट होते. पण उजवा पाय वर असल्यामुळे अन क्लिट करता आला नाही. आणि मी थोडा लवंडलो. पडलो असे म्हणता येणार नाही, पण उजव्या हातावर अन पायावर लॅन्ड झालो अन उजवा पाय अनक्लिट झाला नाही. मग त्या अवस्थेत सायकल वाकडी वगैरे करुन पाय (शू) अनक्लिट करून मी परत उभा राहीलो. तितक्यात माझ्या बाजूच्या कारवाल्याने कार थांबवून ट्रकवाल्याला असे अचानक का थांबवले असे बोलायला देखील सुरूवात केली होती. त्या फॅमिलीला थँक्यू म्हणून मी परत पोझिशन घेणार तर चेन पडल्याचे दिसले. मग चेन नीट लावून परत सुरूवात केली.

ह्या गडबडीत २० एक मिनिटे गेली. आणि मी परत स्वार होऊन टॉप कडे निघालो. तिथून उतारावर मस्त पैकी ५५-६० किमीने खाली आलो आणि सातार्‍याच्या मार्गावर लागलो. सातारा जसे जसे जवळ आले तसेतसे माझ्या उजव्या पायात कळा येऊ लागल्या. सातारा गेले तेंव्हा मी जी पी एस चेक केला. मी ऑलरेडी २७.५ किमी प्रतीतासाच्या स्पिड ने हे ११०-१५ किमी पार केले होते. १०:१५ वाजले होते.

अशातच मी एका खड्यातून सायकल नेली आणि माझा मागचा लाईट पडला. तो मी परत आणतोय तितक्यात एक ट्रॅक्टर त्यावरून गेला. एकंदरीत आज लाईटस आणि मी ह्यांचे काही जुळत नव्हते.

उंब्रजचा चेक पाँईट यायला केवळ ३० किमी राहिले होते. ( १५० किमीवर तो होता म्हणजे. अर्धा रस्ता संपणार होता.) पण मी आता खूपच त्रासात होतो. आता माझी स्पिड कमी होऊन ही १२ ते १५ किमी प्रतितास झाली होती. सातार्‍यानंतर दोन तासानंतर मी पोचलो तेंव्हा १२:३५ झाले होते इथे येई पर्यंत मी ऑलमोस्ट गिव्ह अप करणार होतो.

विवेक तिथे ऑलरेडी होता. त्याला येऊन २० एक मिनिटे झाली होती. आणि मी विचार केला की माझ्या पायात प्रॉब्लेम असूनही मी केवळ २० मिनिटे उशीरा पोचू शकतो. तर मग अजून १५० करायलाच हवेत. केवळ १२:३५ वाजले होते आणि अजून रात्री २ पर्यंत वेळच वेळ होता. गिव्ह अप चा विचार जो पायामुळे आला तो सोडला. विवेक म्हणाला की आपण सातार्‍यात जाऊन लंच करू. मग आम्ही दोघे निघणार तितक्यात ६०० करणारे डॉ बबन देखील तिथे येऊन पोचले. आम्ही बेस्ट लक वगैरे म्हणून निघालो.

माझ्याकडे अ‍ॅन्टी पेन स्प्रे होता. जो मी कदाचित पोझिशन चेंज मुळे खांदे दुखले तर म्हणून ठेवला होता, तो काढून ऑलमोस्ट अर्धा उजव्या पायावर ओतला आणि सातारा गाठले. पण इथेही मी मागे पडत होतो. विवेकला समोर जायला सांगून मी आरामात घ्यायचे ठरवले. प्रत्येक ५ किमी नंतर थांबत होतो. पाय अजूनही दुखत होताच. ते ३५ किमी कसे काढले कुणास ठावूक ! सातारा आले आणि मी चांगले रेस्तराँ शोधू लागलो. एक बरासा ढाबा पाहून तिथे वळलो, तर तिथे विवेकची सायकल दिसली ! आणि त्यामुळे परत माझा कॉन्फिडन्स वाढला. मग आम्ही दोघांनी जेवण वगैरे उरकून परत पुण्याकडे जाण्यास सुरूवात केली. मी परत एकदा स्पे मारून घेतला.

अनिल कुंबळेने मला त्या ६० -७० किमीच्या काळात खूप मदत केली. मी सारखी त्याची ती बॉलिंग आठवत होतो आणि त्याला त्या ओव्हर्स मध्ये व्हिज्वलाईज करत होतो. प्रत्येक वेळी जेंव्हा उजवा पाय पेडलवरून खाली येत होता तेंव्हा मला त्रास होत होता.

सातार्‍यावरून निघून सुरूर येईपर्यंत आम्ही दोघे बर्‍यापैकी सोबत होतो. पाय अजूनही दुखत होताच. पण मी तिकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरवले. विवेक पुढे गेला कारण मला स्पिड मध्ये जाता येत नव्हते. पण गुड न्यूज अशी होती की गेले ३० एक किमी मी थांबलो नव्हतो. ! त्या नादात आता मला परत २५ किमीचा स्पिड मिळत होता हे लक्षात आले. मी खंबाटकी उतरला आणि शिरवळ क्रॉस केले. इथे मला परत विवेक दिसला. त्याने ही थंब्स अप केले आणि ऑल वेल असे मी त्याला कळवले.

शिरवळ क्रॉस करून पुढे कुठेतरी कामतच्या रेस्तराँ मध्ये थांबलो तेंव्हा फक्त ५:४० झाले होते. आता पुणे केवळ ४५ किमी होते. एव्हाना १२ तासाच्या आत २५५ किमी झाले होते.

मी मस्त पैकी दोसा अन चहा घेतला आणि माझ्या ग्रूप मेंबर्सना कळवले की मी सेफ आहे आणि केवळ ४५ उरले. ते सर्व माझ्या अपडेटची बहुदा वाटच पाहत होते. कारण एकाच मिनिटात सगळ्यांनी रिप्लाय दिला. हर्षद, किरण, भावे, आशू, अमित, सुधाकर, मनोज, भारत, केडी, ओंकार सर्वांनी जबरी, मस्त, आता तू पहिलाच येऊ शकशील असे रिप्लाय दिले. त्यांच्या त्या रिप्लाय मुळे मला खूपच आधार मिळाला.

कामत मधून निघताना बॅटरी लाईटला जोडायची होती म्हणून मी टॉप ट्युबवर पाहिले तर बॅटरीच गायब! खंबाटकीच्या उतारावर मला एक थड असा आवाज आला होता. तो बॅटरीचा होता हे आत्ता २५-३० किमी नंतर कळाले. थोडक्यात फ्रंट लाईटला परत एकदा बॅटरी नाही आणि बॅक लाईट फुटलेला ! मी काळजी करू लागलो. वेळ खूप होता. अजून ८ तास होते आणि ४५ किमीच गाठायचे होते. फारतर घरून जुना लाईट देखील मागवता आला असता.

तितक्यात मला तो कामतचा वेटर म्हणाला की आपके पिछेके जॅकेट मे एक लाईट बहुत देरसे जल रहा है! आता हा कोणता लाईट म्हणून मी पाहिले तर तो, मी सेल फोन चार्ज करण्यासाठी जे पावर बुस्टर घेतले होते त्यात देखील एक LED होता तो जळत होता. तो देखील मी सुरू न करता. त्याबद्दल मी टोटली विसरलो होतो. म्हणजे बॅक लाइटचा प्रॉब्लेम सुटला.

ती सारी कायनाथ की काय ती आपल्या पाठीमागे असते ह्याचा अनुभव आला !

मग किराणा दुकानातून एक टॉर्च घेतला आणि सेलो टेपने तो स्टेम वर गुंडाळला. आता देअर वॉ़ नो स्टॉपिंग. पण ह्यात ४५ मिनिटे गेली. आणि मी परत स्टार्ट घेऊन निघालो.

कात्रज घाटातून उतरताना मी माझा आजपर्यंतचा मॅक्स स्पिड ६०.१ (सायकलवर !! ) गाठला आणि बावधनला येऊन ट्रॅफिक मध्ये अडकलो. हळू हळू करत मी बरोबर ९ वाजता कॅफे नुकच्या कंट्रोल पाँईंटला पोचलो आणि साईन ऑफ केले ! विवेक माझ्या २० मिनिटे आधी येऊन पोचला होता. ३०० पूर्ण करणारा तो पहिला आणि मी दुसरा. दुसरे दिवशी मिहिरने सांगीतले की त्याने ९:४५ ला पूर्ण केली. फेसबुक वर एक फोटो आला त्यात पाच लोकांनी रात्री १:३० पूर्ण केल्याचे कळवले. एकुण १३ पैकी ११ जनांनी पूर्ण केली.

ह्यावेळी एक इटालियन देखील ह्या ब्रेव्हे मध्ये होता. माझी सायकल पाहून तो अगदी OMG झाला होता कारण त्याला ती सायकल खूप आवडते.

300_BRM_1.jpg

जीपीएस ने कुठेतरी सिग्नल सोडले कारण पूर्ण राईड ही ३११-१२ किमीची झाली.

300_BRM_2.png

माझे स्पिड प्रोफाईल. किमी १४० ते २२० मध्ये स्पिड अगदीच कमी दिसेल कारण तेंव्हाच तो त्रास जास्त होता.

सुधाकरने प्रिडिक्ट केले होते की मी १४ तासात पार करेन. माझे स्वतःचे प्रिडिक्शन हे १६ तासांचे होते. पण मी १५ तासात पूर्ण केली. आणि ह्या ६ ते रात्री ९ च्या १५ तासात मध्ये मी काय काय पाहिले. गुड स्पिड -नो स्पिड, प्रचंड त्रास आणि परत वेग आणि नंतर समाधान !

आम्हाला (सायकल आणि मला) घ्यायला कॅफे नुकला प्रज्ञा आली. सॅडल ते एकदम कार सीट ट्रान्झिशन इतके सुखद वाटले की बास!

प्रज्ञा म्हणाली की मी अजूनही फ्रेश वाटतोय. मी म्हणालो, हो अजून १०० टाकेन असं वाटतंय खरं !

विषय: 
शब्दखुणा: 

मस्तच रे मित्रा, तोडलंस
बारीक सारीक तपशील आत्ताच कळताहेत,
तुझ्या सायकलींचे इंजीनच इतके पॉवर फूल आहे की कितीही बदलूदेत बाईक पोझिशन....
तू यशस्वी होणारच...

रच्याकने - कायनाथ हे अगदी कुठल्या तरी नवनाथांपैकी वाटतंय Wink

कायनाथ हे अगदी कुठल्या तरी नवनाथांपैकी वाटतंय >. लोल अरे तो डायलॉग आठवला मला काल की सारी कायनाथ आपके साथ रहती है वगैरे. Happy आणि तो योगायोगच तसा होता.

धन्यवाद ससा, हर्षद, किरण आणि दिनेश.

केदार अभिनंदनच !!!!

वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज एकदम जोरात चालल्यात तुझ्या.

मस्त रे...!!!!

अभिनंदन.

नवीन बाईकबद्द्ल जी शोधाशोध केलीस आणि "हायब्रीड ते रोडबाईक अपग्रेड" याबद्दलही लिही.

अ‍ॅक्शन....थ्रिलर...स्पीड....आदी गटातील ५ तारे दर्जाचा एक हॉलीवूडपट मी पाहात आहे असेच वाचताना जाणवत होते. १२७ अवर्समधील जेम्स फ्रॅन्को आणि त्याची ती रोमहर्षक सायकल ट्रीप नजरेसमोर आली. सायकलच्या वेगापेक्षाही वेगवान असे ३०० किमी बीआरएम वार्तांकन. फारच सुरेख उतरले आहे हे सारे.

काही (अगदी किरकोळ अशा) शंका आहेत....त्याबाबत माहिती दिल्यास लेख पुन्हा वाचताना त्याची मदत होईल.

१. ब्रेव्हे कार्ड घेताना ~ म्हणजे नेमकी काय प्रक्रिया असते ? कार्ड देणारे जे कुणी स्वयंसेवक असतील त्यांच्याकडून ते काम पूर्ण होईतो, तुम्ही विश्रांती घेतल्यास चालते का ?
२. चेक पॉईन्ट ~ इथे नेमके कोणते काम चालते ? सायकल बिघडल्यास दुरुस्त केली जाते चेक पॉईन्टवर ?
३. या प्रकाराबद्दल अन्यत्र वाचले होते (नियमावलीत) की सायकलस्वाराने वाटेत ट्रकचा वा ट्रॅक्टरचा आधार घेतल्यास त्याला बाद समजले जाते.....असे कुणी करत नसेलच, तरीही अशाप्रकारावर लक्ष कोण ठेवते ? वेगळी यंत्रणा तयारीत असते ?

धन्यवाद सर्वांना Happy

हो रोडबाईक वर एक वेगळा लेख लिहितो. ते वॉट्सअ‍ॅप वर लिहायला कठिणच जात आहे.

वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज एकदम जोरात चालल्यात तुझ्या. >> Happy

तुझे रिपोर्ट्स वाचताना जाम थ्रिलिंग वाटतं केदार! >> Happy

१. ब्रेव्हे कार्ड घेताना ~ म्हणजे नेमकी काय प्रक्रिया असते ? >>

आपण http://www.audaxindia.org/events.php ह्या साईट वर जाऊन हव्या त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. रजिस्ट्रेशन केल्यावर आपल्याला नंबर मिळतो. ( जर वार्षिक मेंबरशीप असेल तर नंबर आधीच असतो. माझा ७७७ आहे. मग आयोजक त्या नंबरचा व नावाचा एक कागद प्रिंट करतो. तो कागद आपल्याला जवळ बाळगावा लागतो. प्रत्येक कंट्रोल पाँइटवर आपली सही घेतली जाते व त्या कागदावर स्टॅम्प मारला जातो. (वेळेचा) कंट्रोल पाँईट सुरू असण्याच्या व बंद होण्याच्या वेळा असतात. त्यात पोचालायच लागते.

हा पहा तो कागद. त्यावर माझ्या वेळा पण दिसतील. १२:३८ उंब्रज आणि ९ वाजता पुणे.

Card.jpg

ह्यावेळी खरा एकच कंट्रोल पाँईट (एन राऊट) होता. तो म्हणजे उंब्रजला. गेल्यावेळी तीन होते. भोर - वाई अन मांढारदेवी टॉप (परत येताना) आणि सुरूवात व शेवटचा असतोच.

त्यांच्याकडून ते काम पूर्ण होईतो, तुम्ही विश्रांती घेतल्यास चालते का ? >> हो तुम्ही कितीही वेळ विश्रांती घेऊ शकता.

२०० किमी १३.५ तासात, ३०० २० तासात, ४०० २७ तासात आणि ६०० ४० तासात पूर्ण करायची असते.

२. चेक पॉईन्ट ~ इथे नेमके कोणते काम चालते ? सायकल बिघडल्यास दुरुस्त केली जाते चेक पॉईन्टवर ?

इथे फक्त तुम्ही आलात ह्याची नोंद घेतली जाते. सायकल बिघडली तर ती तुम्हीच दुरूस्त करायची. आयोजक काहीही मदत करणार नाहीत. कारण ही सेल्फ सपोर्ट एन्ड्युरंस रेस असते.

३. या प्रकाराबद्दल अन्यत्र वाचले होते (नियमावलीत) की सायकलस्वाराने वाटेत ट्रकचा वा ट्रॅक्टरचा आधार घेतल्यास त्याला बाद समजले जाते.....असे कुणी करत नसेलच, तरीही अशा प्रकारावर लक्ष कोण ठेवते ? वेगळी यंत्रणा तयारीत असते ?
>>

यंत्रणा अशी नसते. जे लोक स्वयंसेवक असतात ते पुण्याहून येतात. त्यामुळे त्यांना आपण दिसू शकतो. काही लोक आधार घेत असतीलही किंवा नसतीलही. हे जाणून घेता येणे अवघड आहे. मला निदान दोन वेळा बाईकवरील मुलांनी चला हात धरा, जोरात जाऊ अशी ऑफर दिली होती. पण मी नाकारली. शक्यतो सर्व रायडर्स प्रामाणिक असतात असा अनुभव आहे.

काही रायडर्सना खूप विचित्र अनुभव देखील आले. ह्या सायकली नेहमीच्या नसतात. खूप जण प्रो स्पोर्ट सायकल चालवतात. काही लाख किंमत असते. एकाला नगरहून येताना दोन बाईकवाल्यांनी सायकल चालवू दे म्हणून सतावले व त्याने दिली नाही तर मारले. मुख्य म्हणजे चालवू दे म्हणून काही फायदा नसतो कारण हे क्लिट पेडल असतात, त्याला वेगळे शू असतात. जे त्या पेडल मध्ये अडकतात पण हे लोकांना कोण समजावणार? आणि गिअरशी खेळ करताना काही झाले तर? धन्य आपले लोकं !!

वा. अश्या स्पर्धा आता आपल्याकडे होत आहेत हे बघून आनंद झाला. Happy सविस्तर आणि मुद्देसुद लिखाण. वाचताना मजा आणलीस.

मला आपले उगाचच माझे सायकलवरुन मुंबई- पोलादपुर - वाई (महाबळेश्वर) - पुणे - मुंबई अशी जुनी ट्रीप आठवली. ३ दिवस घेतले होते. Proud खंडाळा घाट १७ मिनिटात उतरलेलो अजून आठवतोय. खोपोलीला खाली आल्यावर
नवे ब्रेक टाकले होते.

केदार....

उत्तमरित्या शंकांचे निरसन केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. वास्तविक तुमचे उत्तर म्हणजे एकप्रकारे उपलेखच झाला आहे, इतकी सविस्तर माहिती तुम्ही दिली आहे....तीही फोटोसह.

आज मी साठीला आलो असलो तरी माझ्याही हायस्कूल आणि कॉलेजच्या दिवसात सायकलींग करत मी कैक गावांची सफर (अगदी मजेखातर) केली आहेत, त्याचीही तुमचा लेख वाचताना आठवण झाली. अर्थात आमच्या सायकली म्हणजे हर्क्युलिस आणि रॅले या दोनच...त्यातल्यात्यात मातब्बर...कंपन्यांच्या असत.

कोल्हापूरहून सांगलीला चित्रपट पाहायला जात असू आम्ही.....सायकलवरून....आणि रात्री १० च्या सुमारास सांगलीहून कोल्हापूरला परत....त्यावेळी रहदारी जवळपास शून्याची असल्याने मजेत गाणी गुणगुणत परतताना सायकल दामटण्याचा कसलाही त्रास होत नसे....सवयही झाली होतीच म्हणा....पण तुमचे आणि तुमच्या मित्रांचे ३००+ सायकलिंग पूर्ण करायचे म्हणजे विशेषच....त्यातही तुम्ही अजूनी १०० किमि. टाकायला तयार होता याचा अर्थ तुमच्या क्षमतेचे कौतुक करणे क्रमप्राप्त आहेच आहे.

कोल्हापूरहून सांगलीला चित्रपट पाहायला जात असू >> मस्तच ! साठी मध्येही लोकं उत्स्फुर्ततेने हा क्रिडाप्रकार अंगीकारतात. सायकल घ्या अजून एक. Happy

अच्छा ते कायनात आहे होय !

हो. ६०० कार्डवर आहे.

परत एकदा सर्वांना धन्यवाद. Happy

मोबाईल मधून फोटो काढलेत. रेग्युलर कॅमेर्‍यातले नंतर टाकतो.

Synapse_1.jpgSynapse_2.jpgSynapse_3.jpgSynapse_4.jpg

खूप सुंदर आहे सायकल!
लिहिलंसही छानच! अभिनंदन केदार!

केदार,

तुमचे (त्रि) शतश: अभिनंदन! लवकरच षड्शतशऽभिनंदनाचा योग येवो! Happy

एक शंका आहे. सायकलीवर बसलं की पाठकणा ताठ राहतो का हो? मला पुढे वाकून सायकल चालवायला अजिबात जमत नाही. त्यामुळे तशी सायकल चालवणाऱ्यांबद्दल कमालीचं औत्सुक्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages