'मला (न) कळलेले बाबा' - श्री. विलास मनोहर

Submitted by चिनूक्स on 21 December, 2014 - 11:46

'श्रम ही है श्रीराम हमारा' असं कायम म्हणणारे मुरलीधर देविदास आमटे, म्हणजे बाबा आमटे अनेकांना माहीत आहेत ते 'महारोगी सेवा समिती'चे संस्थापक म्हणून. कुष्ठरोगी-अंध-अपंग-आदिवासी यांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभं करणारी ही संस्था गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. बाबांचं कुष्ठरोग-निर्मूलनाचं, अंध-अपंग-आदिवासी यांच्या पुनर्वसनाचं, त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचं काम खूप मोठं असलं, तरी बाबांची तत्त्वं, त्यांची मतं ही त्यांच्या संस्थेच्या परिघात अडकून राहिली नाहीत. समाजाचा, देशाचा विचार त्यांनी कायम केला आणि म्हणूनच भारतातला एकोपा, बंधुभाव धोक्यात आल्याचं लक्षात आल्यावर बाबा १९८५ साली कन्याकुमारी ते जम्मू अशा 'भारत जोडो यात्रे'वर निघाले. भाषिक-प्रांतिक-धार्मिक कट्टरतेला दूर सारून देशाच्या एकतेला महत्त्व देणं हितकर आहे, असा संदेश बाबांना या यात्रेद्वारे द्यायचा होता. पंजाबात दहशतवाद थैमान घालत असताना बाबा तिथे ही शांतियात्रा घेऊन गेले आणि नंतर आयुष्याच्या खूप पुढच्या टप्प्यावर ते नर्मदेच्या तीरी जाऊन राहिले, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी.

या संपूर्ण काळात बाबांना सावलीसारखी सोबत केली ती श्री, विलास मनोहर यांनी. विलास मनोहर मूळचे पुण्याचे. १९७५ सालच्या सुमारास ते बाबांच्या संपर्कात आले, आणि मग हेमलकशालाच राहिले. बाबांबरोबर ते वावरले ते बाबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत. बाबांबरोबर घालवलेल्या दिवसांच्या आठवणी, आणि त्या आठवणींतून बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'मला (न) कळलेले बाबा' हे श्री. विलास मनोहर यांनी लिहिलेलं पुस्तक.

या पुस्तकातला बहुतांश भाग हा बाबांच्या यात्रा आणि नंतर कसरावदचं नर्मदा आंदोलन यांच्याशी निगडित आहे. बाबांच्या यात्रेबद्दल किंवा नर्मदा बचाओ आंदोलनातल्या त्यांच्या सहभागाबद्दल बरंच उलटसुलट लिहिलं-बोललं गेलं आहे. पण या पुस्तकातून बाबांच्या या यात्रेमागच्या आणि आंदोलनात सहभागी होण्याबाबतच्या मूलभूत विचाराबद्दल जाणून घेता येतं. बाबा अतिशय निर्भय होते. यात्रेदरम्यान ते पंजाबातल्या अतिरेक्यांना भेटले. पंतप्रधानांनी दिलेली सुरक्षा नाकारली. हे निर्भयपण कुठून येतं, याचा काहीसा अंदाज या पुस्तकातून भेटणार्‍या बाबांच्या व्यक्तिमत्त्वावरून बांधता येतो.

आजवर बाबांबद्दल, त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे. पण हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं कारण तब्बल तीस वर्षं बाबांचा अतिशय निकट सहवास लाभलेल्या श्री. विलास मनोहर यांनी ते लिहिलं आहे. मात्र हे पुस्तक वाचून बाबा आमटे नामक व्यक्ती होती कशी, हे पूर्णपणे कळणं शक्य नाही, कारण बाबांचं व्यक्तिमत्त्वच तसं अचाट होतं. बाबा नेमके कसे होते, हे शोधणं आणि सांगणं महाकठीण. गांधी आणि येशू ख्रिस्त यांच्याबद्दल त्यांना विशेष ममत्व होतं. करुणा, सहिष्णुता यांचा आधार घेत बाबांचं काम सुरू होतं. कार्यकर्तेपण त्यांच्या अंगात भिनलं होतं. बाबा मनस्वी होते, पण सार्वजनिक जीवनातली त्यांची प्रत्येक कृती अतिशय विचारपूर्वक केलेली असे. ते सौंदर्याचे भोक्ते होते. कवी होते. पण बाबांनी केवळ विचार दिले नाहीत. कृती केली. प्रचंड मोठं काम उभं केलं. काम करायला जगभरातल्या अनेकांना प्रेरित केलं.

बाबांनी 'करुणेचा कलाम'मध्ये लिहिलं होतं -

'ज्यांच्यासोबत हसलो त्यांना विसरता आलं
ज्यांच्यासोबत अश्रू गाळले
त्यांच्यासोबत चालत आलो आहे.'

बाबा समाजसखा होते. म्हणूनच त्यांच्यानंतरही त्यांचं कार्य प्रवाही राहिलं. त्यांच्या कार्याचं स्मारक का झालं नाही, हे 'मला (न) कळलेले बाबा' वाचून लख्खं कळतं. आणि म्हणून तेवढ्यासाठीतरी प्रत्येकानं हे पुस्तक आवर्जून वाचावं.

'मला (न) कळलेले बाबा' या श्री. विलास मनोहर यांनी लिहिलेल्या आणि मनोविकास प्रकाशनाने प्रकाशन केलेल्या पुस्तकातल्या काही पानांचा हा संपादित भाग -

978-93-83850-19-8.jpg

***

'नेगल' भाग १ व भाग २, 'एका नक्षलवाद्याचा जन्म' या माझ्या पुस्तकांचं कौतुक झालं. लोक मला लेखक समजू लागले. पुढे कधी तरी पुण्यात गेल्यावर पुस्तक-भिशी, गप्पागोष्टी अशा कार्यक्रमांना बोलावू लागले. एकदातर चक्क भाषण देण्यासाठी बोलावणं आल्यावर मी हादरलो. म्हटलं, हे काही खरं नाही. चार लोकांत मिसळावं, नवीन कोणाशी ओळख करून घ्यावी हे मला आवडत नाही. मी तोंडाने फटकळ आहे. संसारी असून त्यात गुंतायचं नाही, असा माझा प्रयत्न असतो. खरंतर, माझं माझ्या स्वत:वरच प्रेम आहे. कदाचित त्यामुळे तरुणपणी पुणे, घरदार, मित्रमंडळी सोडून गडचिरोलीच्या जंगलात येऊन राहणं पसंत केलं असेल. घनदाट जंगलात, आदिवाशांमध्ये येऊन राहण्यात कोणताही त्याग वगैरे नाही, तर स्वार्थ होता. 'नेगल' या पुस्तकाला, मा. गो. नी. दांडेकरांनी 'मृण्मयी' पुरस्कार दिला. तो घेण्यास मी पुण्यास जाऊ शकलो नाही. माझ्या आईनं तो स्वीकारला, त्यावेळी माझी आई म्हणाली होती, "माझा मुलगा जंगली प्राण्यांच्या सहवासात माणसाळला."

मुलाबद्दल आईनं असं जाहीरपणे बोलणं ह्यावरून माझ्या स्वभावाची कल्पना यावी.

खरंतर सुरुवातीला लेखक म्हटलेलं मला बरं वाटत होतं. त्या वेळी सावध झालो नाही, त्याची फळं आता भोगत आहे. कुणाशी ओळख करून देताना, "ह्यांना भेटा, हे 'नेगल'कार विलास मनोहर, लेखक आहेत," अशी करून देतात. नवीन माणूस 'नेगल' वाचलेला असला तरी काहीशा संशयानं माझ्याकडं पाहतो. मग त्याची नजर पिंजर्‍यातल्या माकडाकडं पाहिल्यासारखी होते. ही वेळ माझ्यासाठी खूप अवघड असते. माझा डाव्या हाताचा पंजा छाती खाजवण्यासाठी वर येऊ लागतो, दात विचकावे असं वाटू लागतं. कसाबसा स्वत:ला सावरत मी हसतो. इतके दिवस पिंजर्‍यातले सिंह, बिबटे पाहत आलो आहे, पण अशी चमक कुणाच्या डोळ्यांत पाहिली नाही. दोन-तीन पुस्तकं लिहिण्याचा मूर्खपणा मी का केला, हा प्रश्न मला नेहमी सतावत असतो. भेटणारा 'आता काय नवीन लिहीत आहात?' असं विचारतो. मागे एका प्रकाशकानं, 'तुम्ही ह्याच्यावर लिहा, काहीही लिहा, कसंही लिहा, मी छापतो,' असं म्हटलं. थोडक्यात, सुपारी दिली. मी सुपारीलेखक नाही. काही लिहिलं नाही तरी दोन वेळा पोटभर खाऊ शकेन अशी माझी परिस्थिती आहे. मी बाबा आमटे ह्यांच्या संस्थेत राहतो. इथं कुणी, कधीच उपाशी राहणं शक्य नाही.

१९७५ साली मी बाबा आमटे ह्यांच्याकडे आलो. सुरुवातीपासून हेमलकसा इथं लोकबिरादरी प्रकल्पात राहू लागलो. त्यावेळी हेमलकसा वर्षातील सहा-आठ महिने इतर जगापासून तुटलेलं राहत असे. डिसेंबरनंतर रस्ते वाहतुकीस योग्य होत. मग जूनच्या मध्यापर्यंत हेमलकसा इथं वाहनं येत. खरंतर त्यावेळी बाबांना हेमलकशाला राहावं असं वाटे. आनंदवन, इतर प्रकल्प व प्रकृती यांमुळे ते सहा महिने हेमलकसा इथं राहू शकत नव्हते. अर्थात, मनानं ते इथंच असत. त्या वेळी हेमलकसा इथं वीस ते तीस वयोगटातील आम्ही सर्व कार्यकर्ते होतो. वयस्कर कुणी नव्हतं म्हणूनही बाबांना काळजी वाटत असावी. पत्र पोहोचण्यास वीस-पंचवीस दिवस लागत. काही अडचणीच्या वेळी कुणी पायी आल्यास पत्रं / चिठ्ठ्या येत. त्यावेळी मोबाईल काय, पण साध्या फोनचा विचार कुणाच्या मनात आला नव्हता. प्रकाश व इतर कार्यकर्ते बाबांना आठवणीनं पत्रं / चिठ्ठ्या पाठवत. मी पुण्याला घरी कधी पत्र पाठवत नव्हतो, तर बाबांना चिठ्ठी कुठून पाठवणार? मधूनमधून बाबा स्वत: सर्वांना एकत्र चिठ्ठी पाठवत, त्यातून काळजी व्यक्त होत असे. काही महत्त्वाच्या सूचना असत. बाहेरील जगाबद्दल, घडामोडींबद्दल, राजकारणाबद्दल सूचक बातम्या असत. काहीशा अलंकारिक मराठी भाषेत चिठ्ठी असे. एकदा सामूहिक वाचन झाल्यावर पुढे काही दिवस ती चिठ्ठी फिरत राही. वाचन होत राही. चर्चाही. काही कार्यकर्ते बाबांनी त्यांचा वेगळा उल्लेख केला आहे की नाही हे पाहत. तसा असेल तर ते चार-पाच दिवस छाती काढून चालत असत. बाबा आठवणीने सर्वांना आशीर्वाद देत. कोणत्याही रुग्णाचं नाव कधी विसरत नसत. तसं प्रत्येकाकडे कोणतं ना कोणतं काम दिलेलं होतं. मी प्रकाशबरोबर पडेल ते काम करत असल्यानं, प्रकाशची चिठ्ठी ती माझी, अशी माझी समजूत होती. अशाच एका पत्रात बाबांनी पत्राच्या शेवटी लिहिलं होतं, "विलासच्या मौनाला लेखणीचा अंकुर केव्हा फुटणार?" पण मी त्यानंतरही कधी बाबांना चिठ्ठी पाठवली नाही. चार-पाच वर्षांनंतर प्रथम मी बाबांना हेमलकशाजवळील पाच उपकेंद्रांवरील परिस्थितीबाबत तपशील लिहून कळवला. कारण त्यावेळी उपकेंद्रं नव्याने सुरू केली होती. उपकेंद्रांवरील रेशन, इतर वस्तू, औषधं पाठवण्याचं काम मी करत होतो. चार-पाच वर्षांत बाबा नेहमी कशाबद्दल जागरूक असतात, ते निरीक्षणानं समजलं होतं आणि त्याप्रमाणे मी चिठ्ठी लिहिली. त्यात मलातरी काही विशेष केल्यासारखं वाटलं नाही. माझं कर्तव्य मी केलं. बाबा नेहमी साध्यासाध्या गोष्टीचं कौतुक करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असत. त्यातूनच बाबांनी ती चिठ्ठी यदुनाथजींना दिली. यदुनाथजींनी ती चिठ्ठी 'साधना' मासिकात 'हेमलकशातील घटना' म्हणून छापून प्रसिद्धी दिली. तर हा असा मौनाला लेखणीचा अंकुर फुटला तो एकदम समाजवादी! त्यावेळीही मी सावध झालो नाही. अंकुर खुडला नाही, रोपटंही उपटून फेकलं नाही. आता नाहक लेखक म्हणून त्रास भोगतो आहे.

सध्या हातात काम नसल्यानं विरक्ती येत आहे. माझी स्थिती काहीशी संदीप खरेच्या कवितेसारखी झाली आहे -

'ताप नको मज कुठलाही अन् व्याप नको आहे
उत्तर कुठले? मुळात मजला प्रश्न नको आहे!'

प्रकल्पावरील सर्व जबाबदारी डॉ. दिगंत, डॉ. सौ. अनघा व अनिकेत, सौ. समीक्षा ह्यांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळे

'आताशा मी फक्त रकाने दिवसाचे भरतो...
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवितो!'

अशा स्थितीत काही दिवस काढल्यावर मी काहीसा अंतर्मुख झालो -

'राखण करीत बसतो सदैव कंटाळा
कंटाळ्याचादेखील आता कंटाळा येतो!'

असं तर माझं होणार नाही ना? बरेच दिवसांत काही लिहिलं नाही. लिहावं का? काय लिहावं, कशावर लिहावं हे ठरत नव्हतं. काल्पनिक लिहावं तर मनाला पटेना. आजपर्यंत फक्त स्वत:वर प्रेम करणारा मी, प्रेमकथा लिहू शकणार नाही. 'नेगल' व 'एका नक्षलवाद्याचा जन्म' ह्या दोन्ही पुस्तकातील घटनांशी माझा स्वत:चा संबंध होता. ती दोन्ही पुस्तकं वाचकांना आवडली, त्यांचं कौतुक झालं. लेखक म्हणून ठपकाही लागला. 'लोकबिरादरी'वर लिहावं का? पण आपण स्वत:चं कौतुक केल्यासारखं होईल. त्यात नवीन पिढी. जुनं काही सांगण्यास जावं तर 'हं! हं!! माहीत आहे' असा काहीसा चेहरा करतात. 'अरे, आता म्हातारा तीच जुनी झालेली रेकॉर्ड लावणार रे! पळा रे पळा,' असं त्याच्या मनात आहे हे ओळखू येतं. जीवनातील बारीकसारीक गोष्टी हेरून बाबा त्याचं कवितेत वर्णन करतात -

'मरत नाही ही लाचारी आणि आत्महत्या हे पाप
वाढत्या गर्दीने त्याला बाजूला सारलेले असते
आणि तावडीत सापडलेल्या कोपर्यात गाठून तो
उपदेशाचे मचूळ पाणी
चमच्याने पाजू पाहातो'
- ज्वाला आणि फुले

नकोच, 'लोकबिरादरी'वर लिहिणं नको. मग 'भारत जोडो' यात्रेवर लिहावं का? पण 'भारत जोडो' यात्रेत मी नक्की कोण होतो? बाबांचा वैयक्तिक सेवक. मी कधी यात्रेतल्या तरुणांसारखी सायकल चालवली नाही, की कुठं कधी भाषण केलं नाही. बाबांच्या वैयक्तिक सेवेशिवाय 'भारत जोडो' यात्रेत मी केलं काय? फक्त डोळे उघडे ठेवून पाहत होतो सामान्य माणसाचं मोठेपण आणि मोठमोठ्या व्यक्तींतील खुजेपण. असो.

बाबा आमटे ह्या व्यक्तीवर अनेकांनी अनेक भाषांत पुस्तकं लिहिली आहेत. काही परदेशी व्यक्तींनी परदेशी भाषांत पुस्तकं लिहिली आहेत. एकादोघांनी पीएच.डी. केली आहे. स्वत: बाबांची पाच-सहा पुस्तकं आहेत. बाबांसारख्या महान व्यक्तीवर लिहिणारी व्यक्ती स्वत: कर्तबगार, उच्चशिक्षित असावी, नाही का? मोठ्या व्यक्तीबद्दल छापल्या जाणार्‍या मजकुराबद्दल समाजमन, समाजातील गट जागरूक असतात. पण मग माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यानं, त्याला बाबा कसे दिसले ते लिहूच नये का? बाबांवर लिहिणारे सर्व चार-पाच वेळा संस्थेत येऊन गेले आहेत. मी अनेक वर्षांपासून संस्थेत आहे. मी पाहत आलो आहे, सर्वसाधारण सर्वांची पद्धत एकच असते. बाबांची संस्था, आनंदवन, इतर प्रकल्प चार दिवस राहून पाहायचे - प्रकल्पातील कार्यकर्ते, रुग्णांशी बोलत, बाबांची पुस्तकं अभ्यासत, बाबांच्या सहवासात काही तास घालवत, माझ्यासारख्या जुन्या खोडांना बाबांबद्दल अनुभव विचारत. जुन्या कार्यकर्त्यांसाठी 'जुनं खोड' हा शब्दप्रयोग का बरं वापरतात? काहीतरी खोड असते म्हणून, की आता पालवी झडली - नुसतं खोड आहे म्हणून? मनाला येणार्‍या अशा विचित्र शंकांना उत्तरं देण्यास बाबाही नाहीत. असो. अशी ही जुनी खोडं, कार्यकर्ते संस्थेत होते त्यावेळी त्यांना वाटत असे की, मी बाबांचा खास विश्वासातला आहे, माझ्यावर बाबांनी महत्त्वाची जबाबदारी टाकलेली आहे, मी होतो म्हणून हा प्रकल्प मोठा झाला. खरंतर प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटणं ह्यात बाबांचा मोठेपणा आहे. चलाखी आहे. 'सामाजिक संस्थेचं संचालन' ह्या स्वत:च्या पुस्तकात मात्र ह्या युक्तीचा उल्लेख टाळला आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवानं बाबांनी कित्येक व्यक्तींच्या मनाचा वेध घेतला असेल. तरुणांना नक्की काय हवं हे त्यांच्याइतकं समजणारा कुणी नव्हता हे खरं!

हे असं आहे. बाबांचा विषय असेल तर वाहत जाणं आलं. वयाच्या ९४व्या वर्षी बाबा आपल्याला देहानं सोडून गेले. शेवटची दोन-तीन वर्षंतर ते अंथरुणावर होते, तरी नवीन व्यक्ती त्यांना भेटल्यावर अक्षरश: त्यांच्या प्रवाहात खेचली जात असे. कुणी व्यक्ती ह्या महान अनाकलनीय व्यक्तिमत्त्वाच्या खळखळत्या प्रवाहातून बाहेर न पडता जर भोवर्‍यात सापडली, तर त्याचे जे काय हाल होत, ते मी पाहिले व अनुभवले आहेत. सर्व जगच काही क्षण मिथ्या वाटून सर्व सोडून इथंच राहावं असं अनेकांना वाटे. अर्थात, अशा वेळी बाबाच त्यांना समजावून, तुम्ही करता ते कसं योग्य आहे किंवा त्याशिवाय हेसुद्धा करा, असा सल्ला देत. पुस्तक-लेखक कार्यकर्त्यांशी, रुग्णांशी बोलत. विचारणारे भारावलेले असत. बाकीच्यांचं माहीत नाही, पण मला हसू येत असे. लिहिणारा भक्तीनं, प्रेमानं आंधळा झालेला, बाबांच्या व्यक्तिमत्त्वानं डोळे दिपलेला. पाच आंधळे हत्ती पाहण्यास जातात, अशी जी गोष्ट, तसा काहीसा प्रकार. मला माहीत आहे, मी लहान तोंडी मोठा घास घेत असेनही. मला कुणाला दुखवायचं नाही. हे माझं सामान्याचं मत आहे. बाबांच्या संस्थेत येऊन मला पस्तीस वर्षं झाली. तेहतीस वर्षं बाबा हयात होते. मी व बाबा चोवीस तास सहवासात होतो. निदान हजार दिवस तरी असतील. दोन्ही 'भारत जोडो' यात्रा, कसरावदचे दोन महिन्यांचे दोन-तीन मुक्काम, दिल्ली-बेळगाव-कलकत्त्याचा प्रवास, मुंबई इथली बाबांची शस्त्रक्रिया व शेवटी बाबा रक्ताच्या कर्करोगानं आजारी असतानाचे सहा महिने, मी बाबांचा निकट सहवास अनुभवला, तरीही मला बाबा दोन टक्केही समजले नाहीत. बाबा कसे होते, याचा प्रत्येक वेळी वेगळा भास होत असे.

पहाटेच्या उगवत्या सूर्यासारखे,
कन्याकुमारीच्या समुद्राच्या भव्यतेसारखे,
कोजागिरी पौर्णिमेला पडलेल्या चांदण्यासारखे,
आषाढातील धुंवाधार पावसासारखे,
संधिप्रकाशातील घनदाट अरण्यासारखे,
दुथडी भरून घोंघावत वाहणार्या इंद्रावतीसारखे,
वासराच्या ओढीनं हंबरत येणार्या गाईसारखे...

नक्की कसे ते ठरवता येत नाही. कदाचित माझ्या सामान्य बुद्धी-क्षमतेनं असेल, बाबांच्या जवळपास राहण्यासाठी येणारे पाहुणे, भक्तगण आम्हांला बाबांची माणसं म्हणून ओळखत. त्यात त्यांचा मोठेपणा होता. तरी बाबांच्या सोबतच्या शेकडो आठवणी आहेत, त्या लिहाव्या का? त्या लोक वाचतील का? माझ्या आयुष्यातली बत्तीस वर्षं मी ह्या मोठ्या, खर्‍या माणसासोबत घालवली आहेत. मी बाबांना प्रथम भेटलो तेव्हा एकतीस वर्षांचा होतो. भारावून जाण्याचं वय नव्हतं. मी बाबांकडे कसा आलो? का आलो? ह्याला अनेक कारणं आहेत. ती पुढे कुठंतरी येतील. पण इतक्या वर्षांनंतर नक्की कोणतं कारण हे सांगता येणार नाही. माझ्यासमोर गेल्या तीस वर्षांत अनेक कार्यकर्ते परत गेले. मी का राहिलो, हेही सांगता येणार नाही, कारण बाबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रचंड भोवर्‍यात मी अनेकांसारखा गरगर फिरत राहिलो आहे.

आता बाबा नाहीत, तरी पण आपण अशा आठवणी लिहिलेल्या बाबांना आवडल्या असत्या का, असा विचार मनात आला. हसू आलं. बाबांना भेटण्यास अनेक जण येत असत. मोठे नाववाले साहित्यिक, संपादक, पत्रकार, कवी, न्यायाधीश, उद्योगपती, मंत्री, खासदार, आमदार, फक्त महाराष्ट्राचेच नाही तर इतर राज्यातील; विद्यार्थी, निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवर, तर काही सामान्य संसारी आपल्या घरगुती अडचणी घेऊन फक्त दर्शनासाठी येत. बाबा सर्वांना भेटत, त्याच आपुलकीनं बोलत. तरीपण त्यातल्या उच्चशिक्षित तरुणांचं बाबांना विशेष कौतुक असे. दुपारी जेवणानंतर बाबांची विश्रांतीची वेळ असे. सकाळी-संध्याकाळी बाबा कुणालाही कधीही भेटत असत. 'अतिथी देवो भव' हा मंत्र खरा जपला तो ताई-बाबांनी. दुपारी येणार्‍यांना मात्र थोडा वेळ थांबावं लागे. त्यावेळी बाबांच्या खोलीबाहेरील 'नंदी'शी गाठ पडे. 'बाबा आजारी आहेत, ते फारसे कुणाला भेटत नाहीत, थांबा तुम्ही, मी बघतो, बाबांना विचारतो', अशी उत्तरं मिळत. अर्थात, अनेक वेळा मी 'नंदी' म्हणून काम केलं आहे. त्यावेळी आम्हा 'नंदी' लोकांना भाव असे. ह्या खोलीबाहेरील व्यक्तींना 'नंदी' अशासाठी म्हणतोय, कारण अनेकजण बाबांना देवच मानत होते. बाबांचं काम चंद्रपूर - गडचिरोलीच्या जंगलात वाढलं. प्रत्येक नवीन प्रकल्प समाजापासून लांब जंगलात, मसणवटीत सुरू केला. पुढे नर्मदा किनारीही ते गावापासून लांबच होते. म्हणून बाबा हे शंकराचा अवतार. शंकराला भेटण्याआधी भेटणारे आम्ही 'नंदी'. कधीमधी भेटणार्‍याला शंकराकडून गंगाजल मिळत असे. आम्हा जवळपास वावरणार्‍यांना कोप व तांडव नृत्यही अनुभवायला मिळालं आहे.

अरे हो, विचारवंतांबाबत सांगत होतो, नाही का? सहा-सात वर्षांपूर्वी एकदा दुपारी मी 'नंदी' बनून बाहेर बसलो होतो. आठ-दहाजण होते. मी चौकशी केली. ते जेवून आले होते म्हणून चहापाण्याचं पाहू लागलो. तीन-चारजण बरेच वेळा येणारे असल्यानं ओळखीचे होते, बाकी त्यांच्यासोबत होते. राहणीमानावरून नामवंत मंडळी होती. पत्रकार, लेखक असावेत. कधी एकदा बाबा भेटतील असे भाव चेहर्‍यावर होते. त्यांचं आपसात काहीतरी बोलणं चाललं असावं. कसला तरी वाद असावा. अर्थात, खेळीमेळीचं बोलणं असावं. मी पाण्याचे ग्लास भरलेला ट्रे त्यांच्यासमोर घेऊन आलो. त्यातील पूर्वपरिचयातील गृहस्थ माझ्याकडे पाहून म्हणाले,
"वाद कशाला, आपण विलासला विचारू."
मी बाबांसोबत असतो म्हणून ते मला हुशार, शहाणा समजत होते, की बाबांच्या धो धो वाहणार्‍या ज्ञानगंगेत राहूनही हा गोटा राहिला आहे का, हे पाहत होते? मी चेहर्‍यावर शक्यतो कोणतेही भाव दिसणार नाहीत अशा तर्‍हेने त्यांच्याकडे पाहत उभा असताना त्यांनी विचारलं,
"अरे विलास, विचारवंत कसा ओळखावा?"
मी नजर टाळत म्हणालो, "काका, विनोद झाल्यावर जो पटकन हसत नाही तो विचारवंत."
क्षणभर शांतता झाली. काही विचार करू लागले.
"अरे, म्हणजे कसं?"
आता सर्वांकडे पाहत मी म्हणालो,
"सामान्य माणूस विनोदाला चटकन हसून दाद देतो; पण विचारवंत विचार करतो, की हा विनोद कुणी केला आहे? आपण हसावं की नाही? कुणाच्या भावना तर दुखावणार नाहीत ना? अशात इतका वेळ जातो, की तोपर्यंत दुसरा विनोद होऊन गेलेला असतो."
नशिबानं समोर दोन विचारवंत होते.
"चहाचं बघतो..." म्हणत मी तिथून निसटलो.
"पाहिलंत, बाबांची माणसं..." कुणीतरी म्हणालं.
मी चपापलो. असं अनेक वेळा होत असे. बाबांची माणसं म्हणून मी सुटत असेन, पण काहीजण बाबांबद्दल काय समज करून घेत असतील? की हे असे माझ्यासारखे अनेक साप गळ्यात अडकवून बाबा राहिल्यामुळं बाबांना लोक शंकर समजत असावेत?

महारोगी सेवा समिती, वरोरा ही बाबांनी महारोग्यांसाठी सुरू केलेली संस्था सर्वांसाठी आहे. आता तर अंध-अपंग-मूक-बधिर व आदिवाशांसाठीही संस्था काम करते. अगदी सुरुवातीला एकंदर महारोग्यांविषयी भीती व घृणा ह्यामुळे इतर फारसे कुणी आलं नसावं. पण बाबांनी संस्थेत गरीब-श्रीमंत, धर्म, जात, वंश, पक्ष असा भेदभाव कधीच केला नाही. कुणी येण्याबाबत अगर जाण्याबाबत बाबांनी कधी हस्तक्षेप केल्याचं माझ्या पाहण्यात-ऐकण्यात नाही. त्यांनी सर्वांना आपलं मानलं. ते आवड-निवड करत असते, तर मला कसं ठेवून घेतलं असतं, सहन केलं असतं?
पुण्याला एका मध्यमवर्गीय कुटुंबात मी मोठा झालो. अकरावी पास होतो. अनेक उपद्व्याप करून शेवटी स्वत: स्वतंत्र व्यवसाय करत होतो. मी बाबांकडे आलो. श्रमिक संघटनेच्या कामामुळे माझा धाकटा भाऊ कॉम्रेड अशोक मनोहर आधीपासून बाबांच्या माहितीचा, संबंधातला होता. त्यामुळे संस्थेत माझी ओळख अशोक मनोहरचा भाऊ अशी झाली. एक धार्मिक, मध्यमवर्गीय कुटुंब ते सामाजिक संस्थेतलं प्रचंड मोठं कुटुंब, अशी माझी वाटचाल झाली. अनेक अनुभवांतून, बाबांच्या आणि प्रकाशच्या वागण्यातून, संस्थेचे नियम समजत-उमजत गेलो. संस्थेत मी १९७५ साली आलो, त्यावेळी अनेक तरुण बाबांकडे काम करण्यासाठी येत असत. काहीजण एक-दोन वर्षं राहून परतही जात असत. तो काळ समाजसेवेने भारावलेला होता. बाबांचे विचार, व्यक्तिमत्त्व व त्यांचे काम तरुणांना आकर्षित करत असे. दरवर्षी होणार्‍या श्रमसंस्कार शिबिरातील अनेक तरुण काम करण्यास येत होते. काही तरुण इतके भारावून गेलेले असत, की त्यांना प्रत्यक्ष कामापेक्षा बाबांच्या जवळपास राहण्यात, त्यांचं बोलणं ऐकण्यात, चर्चा करण्यात जास्त रस असे. रात्री, पहाटे बाबांसोबत चर्चा करण्यात ते धन्यता मानत. हे तरुण बाबांच्या बोलण्याच्या नोट्स काढत व त्यावर त्यांच्याच चर्चा झडत. काही उच्चशिक्षित, बहुतेकजण पदवीधर होते. मी फक्त एस.एस.सी. होतो. कदाचित तो न्यूनगंडही असेल; पण चर्चांमध्ये मी कधीच नसे. प्रकाशबरोबर पडेल ते काम व कुवतीप्रमाणे मदत करत असे. सुरुवातीपासून ह्या भारावलेल्या तरुणांबद्दल मला गंमत वाटत आली आहे. तो काळ होता आणीबाणीचा. बाबा आणीबाणीचे कट्टर विरोधक. सतत त्यावर चर्चा होई. विनोबा भावे, जयप्रकाश नारायण अशी नावं कानांवर पडत. तरुण पेटलेले होते... फक्त बोलण्यात, असं आता वाटतं. अनेक तरुण देशासाठी, समाजसेवेसाठी जीवनदान देण्यासाठी बाबांकडे आले होते. जन्मठेपेची शिक्षा जशी कधी आठ-दहा वर्षांनी संपू शकते, तसं त्यांच जीवनदान होतं. साधी काठी हातात धरण्याची हिंमत नसलेले डाव्या विचारांचे तरुणही होते.

असा एक तरुण, जो माझ्या आधी सहा महिने बाबांकडे आला होता, प्रत्यक्ष कामापेक्षा तो बाबांसोबत राहून चर्चा करण्यात धन्यता मानत असे. तो पदवीधर होता. घरी भांडून समाजसेवा करण्यासाठी बाबांकडे आला होता. मी सर्वांबरोबर जेवत असे. दवाखान्यात काम करत असे. कामाच्या ठिकाणी व जेवताना बाबांशी जे काय बोलणं व्हायचं ते कमीच. बाबा काय बोलत तेच ऐकत असे. बाबांचं साधं, रोजच्या व्यवहारातलं बोलणं इतर सामान्यांसारखं असे. कधी गंभीर, बोजड नसे. उलट गमतीशीर, हलकी चेष्टामस्करी असे. तेव्हा इतर तरुणांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन महारोगी रुग्णांपेक्षा जरा वरचा - हेल्पर, कंपाऊंडर - असा असावा. माझ्या पुणेरी बोलण्यानं ते जवळपास येतही नसत. एका रात्री बाबांशी त्यांचं काय बोलणं झालं माहीत नाही. सकाळची वेळ होती. प्रकाश पेशंट पाहत होता. मी केसपेपरवरून औषधं देत होतो. त्यावेळी हेमलकशाचा दवाखाना एका झोपडीत होता. मी औषधं काढत होतो त्याच्या उजव्या बाजूला एक खिडकी होती. तिथं एकदम घोडा येऊन उभा राहिला. प्रकल्पावर त्यावेळी एक घोडा होता. घोड्यावर तो तरुण बसला होता. त्या तरुणानं खिडकीतून मला हाकारलं,
"विलास, काल रात्री बाबांना मी जीवनदान कबूल केलं. तुझं काय? म्हणजे मला बाबांना सांगता येईल."
"बाबा विचारत होते का?" मी विचारलं.
"हा निर्णय तरुणांनी स्वत: घेतला पाहिजे. तू काहीच विचार केला नाहीस का?"
त्या विचारण्यात काळजी होती.
"लगेच ठरवावं लागेल का?"
तो तरुण घोड्यावरून माझ्याकडे, माझी कीव आल्यासारखा बघत होता. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. 'कसे हे बाबांकडे येतात? हा तर अगदी सामान्य आहे,' असा भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसू लागला. माझं सामान्यपण माझं बळ आहे, असं मला वाटत होतं. मग मीही चेहर्‍यावर भोळेपणा आणत विचारलं,
"अरे! पण बाबाच म्हणतात, दान माणसाला नादान करतं. मग जीवनदान कसं द्यावं?"
मी चटकन तिथून वळलो आणि औषधाचं बघू लागलो. पुढे काय होईल हे माहीत होतं. हे उत्तर बाबांकडे पोहोचणार नक्की. रात्री सगळे एकत्र जेवत असताना मी कंदिलाच्या उजेडात बाबांकडे पाहिलं. ज्यावेळी बाबांशी माझी नजरानजर झाली तेव्हा बाबा माझ्याकडे पाहून हसत होते. त्या हसण्यात मिश्कीलपणा जास्त होता. त्या हसण्याचा पूर्ण अर्थ समजण्यास अनेक वर्षं लागली. पुढे अनेक दिवस बाबांजवळ राहण्याचा योग आला. चेहर्‍यावरील भाव, हातांच्या-बोटांच्या हालचाली व डोळ्यांची भाषा समजल्यावर त्या हसण्यात कौतुक होतं हे समजलं.

बाबा होते तोपर्यंत कधी बाबांची पुस्तकं, कविता वाचण्याची जरुरी वाटली नाही, कारण बाबांच्या सहवासात त्या कविता अनुभवत होतो. नंतर आता बाबांचा प्रत्यक्ष सहवास नाही तर वाचून पाहू, म्हणून सर्व पुस्तकं, कवितासंग्रह मिळवले. बाबांची कविता फार कठीण आहे असं अनेकांकडून ऐकलं होतं. पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, वि. स. खांडेकर अशा महान व्यक्तींनी त्या कवितांचं रसग्रहण केलेलं आहे. तरी पण बघू मला काय समजतं, निदान मी बाबांची पुस्तकं वाचली आहेत, अशी शेखी तरी मिरवता येईल, असा मी विचार केला. जसा जसा मी कविता वाचू लागलो तसतसे बाबांच्या सहवासातील अनेक प्रसंग आठवू लागले. कविता आणि ते प्रसंग यांच्यात मला साधर्म्य वाटू लागलं. मग एक चाळा सुरू झाला, सहवासातील एखादा प्रसंग कवितेशी कुठं जुळतो का हे पाहण्याचा. मला असं वाटतं, बाबांनी स्वत:ला पडलेले प्रश्न, त्याची सापडलेली उत्तरं, समाजाचं बदलतं स्वरूप ह्यावरच लिहिलं आहे. त्यांनी त्यांचं आत्मचरित्रच ह्या कवितांतून लिहिलं आहे असं वाटावं.

***

मला (न) कळलेले बाबा

लेखक - श्री. विलास मनोहर

मनोविकास प्रकाशन
किंमत रु. १६०
पृष्ठसंख्या - १७२

***

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह

वाह

वा ...मस्त लिहिलयस चिनुक्स...
आता लवकरच वाचलं पाहिजे हे पुस्तक...

मी हेमलकसाला असताना त्यांच्याशी आणि रेणुकाताईंशी मनसोक्त गप्पा मारल्यात..त्यामुळे जवळचं कोणीतरी असा फील आहे..

घेणार!

मस्तच.

<<<फक्त डोळे उघडे ठेवून पाहत होतो सामान्य माणसाचं मोठेपण आणि मोठमोठ्या व्यक्तींतील खुजेपण. >>>>किती सुक्ष्म निरीक्षण आहे....
खूप खूप छान परिक्षण आहे...
नक्की वाचणार.....काही ठिकाणी डोळ्यात पाणी आल्यशिवाय राहात नाही....

मस्त!! पुस्तक वाचणार नक्की!

(लिंकमधलं पुस्तकाचं इंग्रजी नाव दुरुस्त करणार का?)