पालकाची डाळभाजी

Submitted by हर्ट on 15 December, 2014 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक
तुरीची डाळ
चण्याची डाळ
हिरवी किंवा लाल मिरची
छोटे पिल्लू कांदे अथवा मोठे कांदे (पण छोटे बरे)
मोहरी
जिरे
हळद
आमचुर पावडर
गोडा मसाला
गुळ
शेंगदाणे
टोमॅटो
कढीपत्ता
लसून
मीठ
तेल

टिपः ही सर्व व्यंजने प्रमाणबद्ध असे काही नाही. आपापल्या अंदाजानुसार ती घ्यायची.

क्रमवार पाककृती: 

१) एका मोठ्या पातेल्यात मुठभर तुरीची डाळ, मुठभर चण्याची डाळ, मुठभर शेंगदाणे, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता हे सर्व एकत्रित करुन २० मिनिटे आच अगदी मंद करुन आणि फक्त एकच शिटी होईल ह्याची दक्षता बाळगून हे पातेले कुकरच्या आत ठेवून गॅस वर ठेवावे. २० मिनिटे झाली की आच वाढवून पटकन शिटी काढून गॅस बंद करावा. खालची दोन चित्रं बघा:

पातेले कुकर मधे ठेवण्यापुर्वी

पातेले कुकरमधून बाहेर काढल्यानंतरः

२) आता दुसर्‍या पातेल्यामधे तेल घालून त्यात जिरे मोहरी हळद लसून ह्याची एक फोडणी तयार करावी. बाजूला पालकाची भाजी हवी तशी चिरून घ्यावी.

चिरलेली पालकः

फोडणी:

३) फोडणी जमून आली की त्यात चिरलेली पालक टाकावी. ती गोळाभाजी इतपत शिजली की त्यात आमचुर पावडर, जिरे पावडर, गोडा मसाला, मीठ घालून पळीने सगळे साहित्य एकजीव करावे.

४) ह्या भाजीमधे पहिल्या पातेल्यातील शिजलेली डाळ घालावी. डाळ आणि भाजी एकजीव होईपर्यंत ती ढवळत रहावी. एक दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करुन टाकावा. भाजी तयार!

वाढणी/प्रमाण: 
तीन चार जनांना पुरेल इतकी भाजी.
अधिक टिपा: 

अशा पद्धतीने भाजी केली की भाजीचा हिरवा रंग कायम तसाच राहतो. भाजी जास्त शिजत नाही की कमीही नाही. जर एकाच पातेल्यात भाजी आणि डाळ एकत्र करुन शिजवली की भाजी खूप शिजून त्यातील ए‍न्झाईम नष्ट होतात.

ह्यात भाजीत : ताक सुद्धा घालता येते. पण खूप चवी एकत्रित करु नये.

घरात जर आमचुर नसेल तर चिंचगुळ चालतो.

गोडा मसाला नसेल तर आलेलसूनाची पेष्ट चालेल. किंवा गरम मसाला चालेल.

माहितीचा स्रोत: 
आरतीच्या विनंतीवरुन.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे अशीच करतात पालकाची भाजी. पण त्यात इतक्या गोष्टी नाही घालत. लसणाच्या फोडणीवर पालक घालून तो शिजला की त्यात वरून शिजवून घेतलेली थोडी तूरडाळ, उकडून घेतलेले शेंगदाणे, मीठ, तिखट आणि आमसूल घालतात. ४-५ मिनीटांत एकजीव झाली की तयार!

छान आहे रेसिपी .. शेवटच्या फोटोतली भाजी बघून लगेच गरम पोळी किंवा भाताबरोबर खावीशी वाटत आहे ..:)

मीही शॉर्टकट म्हणून नेहेमीच्या आमटीत फोडणीत पालक परतून त्यावर डाळ घालते आमटीचे पुढचे सोपस्कार करून ..

यात टू मेनी फ्लेवर्स वाटले मला . कढिपत्ता, टोमॅटो, आमचूर, कांदे, लसूण, मसाला ....
मी दाणे अन तुरीची डाळ घालते , लसणीची फोडणी देते आणि आमचूर /चिंच किंवा टोमॅटो यातईल एक काहीतरी .
मसाला पण घालते.

खूप छान वाटले मला तुम्हा सर्वांचे भरभरुन अभिप्राय वाचताना आणिक काही नवीन टिपा सुद्धा मिळाल्यात. धन्यवाद तुम्हा सर्वांचे.

- बी Happy

धन्यवाद बी. करुन बघीतली या पद्धतीने 'पिंक पालकाची' भाजी. तुरी ऐवजी मुगाची डाळ वापरली आणि आमचुर वगळले. टोमॅटोचा आंबट्पणा पुरेसा वाटला. कडिपत्ता कुकरमधे पहिल्यांदाच ठेवला, शिट्टी झाल्यावर इतका मस्त वास पसरला Happy

पुढच्यावेळी अकुसारखी वरुन फोडणी घालुन करुन बघेन.

आज केली होती ही भाजी. मस्त झाली. मी पण हरभरा डाळ न वापरता मूग व तूर डाळ वापरली. कांदा फोडणीत परतून घेतला. फार आवडली. धन्यवाद बी.

बी, ह्या रेसिपीने पालकाची भाजी करुन पाहिली, अतिशय आवडली.. मी बर्याच वेगवेगळ्या पद्धतीने पालकाची भाजी करत असते, पण ह्या पद्धतीने केल्यावर जी चव आली, त्याला तोड नाही... मग त्यानंतर ६-७ वेळा - जेंव्हा जेंव्हा पालक आणला, तेंव्हा तेंव्हा ह्याच पद्धतीने बनवलाय.. खुप दिवसांपासून हे लिहायचं होतं.. पण राहूनच गेलं होतं.. ही रेसिपी बहिणीलाही कळवली आहे. मला खात्री आहे, तिलाही नक्की आवडेल. इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy

Pages