नाण्याची दुसरी बाजू अर्थात Behind Every Crime There Is An Injustice

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 12 December, 2014 - 06:34

काही काळापूर्वी मी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होतो तेव्हाची गोष्ट. माझ्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये सातवीत शिकणारा वरद नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता. तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू असल्याचे माझे निरीक्षण होते. एकदा मात्र इतिहासाचा विषय निघाला असता तो अचानक काही कारणाने उत्तेजित झाला. इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे. इंग्लंडमध्ये जाळपोळ करून तो देशच नष्ट केला पाहिजे वगैरे, वगैरे. त्याला आधी मी शांत होण्यास सांगितले. नंतर थोड्या वेळाने मी त्याला त्याचे विचार ऐकून मला कुठलाही धक्का बसला नसल्याचे सांगितले. बर्‍याच वर्षांपूर्वी माझेही असेच काहीसे विचार होते परंतू ते कालांतराने पूर्णत: बदलले असल्याचेही सांगितले. माझ्या विचारांमध्ये असे परिवर्तन नेमके कशामुळे घडून आले हे जाणण्यास वरद उत्सुक होता. त्याला मी हा सारा घटनाक्रम थोडक्यात समजावून सांगितला तो अशा प्रकारे -
मी तिसरीला असताना आम्हाला शालेय अभ्यासक्रमात थोरांची ओळख हे पुस्तक इतिहास या विषयाकरिता होते. या पुस्तकात दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, ज्योतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, चित्तरंजन बोस इत्यादी स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांची सचित्र माहिती नमूद केलेली होती. बहुतेक पाठांमध्ये इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या जुलूम, अत्याचारांचे अंगावर शहारे आणणारे वर्णन होते. विशेषत: लाला लजपतराय यांनी सायमन कमिशनचा काळे ध्वज दाखवून आणि सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन निषेध केला होता तेव्हा त्यांना इंग्रजांनी छातीवर दंडुक्यांनी मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला वगैरे वाचून तर मी फारच अस्वस्थ झालो. तेव्हा रात्र रात्र मला झोप येत नसे. इंग्लंड अतिशय क्रूर, दुष्ट लोकांचा देश आहे. कुठल्याही प्रकारे त्या देशात घुसून तेथील वीजवाहक तारांना आगी लावून तो देश नष्ट केला पाहिजे (वीजवाहक तारांना आग लागल्यास ती आग जिथे जिथे तारा पोचल्या आहेत अशा सर्व ठिकाणी फार वेगाने पसरते इतपत सामान्य ज्ञान मला त्या वयात होते) वगैरे विचारांनी मी अतिशय तळमळत असे. एकतर असे काही करणे मला तेव्हा (आणि आजदेखील) अजिबात शक्य नव्हते. शिवाय हे असे स्फोटक (?) विचार कुणाला बोलून दाखवायची देखील सोय नव्हती. त्यामुळे दिवसेंदिवस माझी बेचैनी वाढतच होती.
तशातच माझ्या एका मित्राची बहीण जी जळगावाला राहत होती, काही कारणास्तव पुण्याला राहायला आली. तीदेखील जळगावात तिसर्‍या इयत्तेतच शिकत होती. अर्धे शैक्षणिक वर्ष जळगावच्या शाळेत व्यतीत केल्यावर तिने पुण्यातल्या शाळेत जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा आमच्या वर्गशिक्षिकेने (तेव्हा आम्हाला सर्व विषय शिकवायला एकच शिक्षिका होत्या) तिची इतर सर्व विषयांची पुस्तके बरोबर आहेत परंतू भूगोलाचे पुस्तक मात्र नव्याने विकत घ्यावे लागेल असे तिला सांगितले. तिच्याजवळ असलेले भूगोलाचे पुस्तक न चालण्याचे नेमके कारण काय असावे या कुतूहलापोटी मी ते पुस्तक पाहू लागलो आणि आपल्याच जगात वावरणार्‍या त्या वयातल्या मला धक्काच बसला. तिच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहिले होते आपला जळगाव जिल्हा. आम्हा सर्वांच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहिले होते आपला पुणे जिल्हा.
विचारांचा धक्का विजेच्या धक्क्यापेक्षाही तीव्र असतो असे म्हणतात. मलादेखील ह्या वैचारिक धक्क्याचा मोठा परिणाम जाणवला. यानंतर माझी विचार करण्याची दिशाच बदलून गेली. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला. म्हणजे कसे ते पाहा - जळगाव पुण्यापासून साधारण चारशे किमी लांब आहे. पुण्यातले विद्यार्थी तिसरीच्या भूगोलात पुणे जिल्ह्याचा अभ्यास करतात तर जळगावचे विद्यार्थी जळगावचा. चौथीत दोघांचा भूगोल समान असणार कदाचित कारण चौथीत महाराष्ट्राचा अभ्यास आहे पण तेव्हा दुसर्‍या राज्यात पुन्हा वेगळाच भूगोल असणार. पाचवीत तोदेखील समान असेल कारण संपूर्ण भारताचा तेव्हा भूगोलाच्या अभ्यासात समावेश आहे पण दुसर्‍या देशाचे विद्यार्थी त्यांच्याच देशाचा अभ्यास करतील. पुढे जेव्हा वरच्या इयत्तेत जगाचा भूगोल शिकविला जाईल तेव्हा कदाचित सर्व जगातल्या विद्यार्थ्यांचा भूगोल समान असूही शकेल पण मग इतिहासाचे काय?
प्रत्येक देश / प्रांत / राज्य विद्यार्थ्यांना स्वत:चा इतिहास शिकवतील पण आंतरराष्ट्रीय इतिहास शिकवायची वेळ येईल तेव्हा ते सार्‍या गोष्टी स्पष्टपणे मांडू शकतील काय? शंकाच आहे. इंग्लंडच्या विद्यार्थ्यांना इतिहासात असे शिकविले जाईल का की आपण भारतावर राज्य केले, त्या देशाला गुलामगिरीत जखडले, तेथील जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम जोर जबरदस्ती केली वगैरे, वगैरे. अर्थातच अशी कोणतीही शक्यता नाही. उलट तिथल्या विद्यार्थ्यांना अशी माहिती पुरविली जात असणार की भारत हा एक अती मागासलेला देश होता. त्यास इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान, लोकशाही वगैरे बाबी शिकवून एक विकसनशील देश म्हणून उभे केले व त्या बदल्यात भारताच्या जनतेने कृतघ्नपणे इंग्रज अधिकार्‍यांना हाकलून लावले इत्यादी, इत्यादी. म्हणजेच आपण म्हणणार की ते चुकीचा इतिहास शिकवीत आहेत. मग कशावरून आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना जो इतिहास शिकवीत आहोत तो खरा आहे? शंभर टक्के प्रामाणिक आहे?
त्यानंतर मी कुठल्याही गोष्टीकडे फारसे उत्तेजित न होता पाहायचे ठरविले. ह्याचे कारण आपणांस जी माहिती प्रथम पुरविली जाते, कालांतराने त्याच्या अगदी उलट माहिती तितक्याच ठामपणे आपल्या समोर येते. उदाहरणार्थ, मोहनदास करमचंद गांधींविषयी शालेय जीवनात अगदी पाचवीपर्यंत मला अतिशय छान, आदर वाटावा अशी माहिती अभ्यासातून, इतर व्याख्यानातून मिळत होती पण पाचवीत मी गोपाळ गोडशांचे पंचावन्न कोटींचे बळी हे पुस्तक वाचले. ह्या पुस्तकात गांधींविषयी माझ्या पूर्वीच्या माहितीला छेद देणारी अतिशय वेगळीच माहिती वाचनात आली. यानंतर पुढे अनेक ठिकाणी गांधींविषयी उलट सुलट लिहिलेले आढळले. नेमका कशावर विश्वास ठेवायचा?
पुढे मी सातवीत असताना बाळासाहेब भारदे यांचे व्याख्यान ऐकले. ते म्हणाले, "तुम्ही भारताचे नागरिक आहात काय? भारताचा नागरिक असणे म्हणजे पाकिस्तानचा द्वेष करणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर माझे तुम्हाला कळकळीचे सांगणे आहे की तुम्ही भारताचे नागरिक होऊ नका. विश्वाचे नागरिक व्हा. तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी शिकविलेला सर्वच इतिहास खरा असेलच असे नाही. शेजारी राहणार्‍या दोन कुटुंबांमध्ये भांडणे असतील तर प्रत्येक कुटुंबातले आईवडील त्यांच्या मुलांना आपण कसे बरोबर आहोत आणि आपल्या शेजारचे कसे चूक आहेत हेच शिकवीत राहणार. आता यात खरे काय आणि खोटे काय? वस्तुस्थिती माहीत नसणारी त्या कुटुंबातली मुले तेच वैर पुढे वाढवीत राहणार. शेजारी असणार्‍या दोन राष्ट्रांबाबतही अशीच परिस्थिती आहे. तुम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात. पूर्वग्रहदूषित विचारसरणी बाळगून शत्रुभाव जपण्यापेक्षा खुल्या मनाने विचार करा. भूतकाळात कोणाची चूक होती हे शोधण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित खरे काय ते तुम्हाला कधीच कळणार नाही. दोन्ही बाजूचे आपापल्या परीने आपण सांगतोय तेच सत्य असे भासवायचा प्रयत्न करतील. तेव्हा भूतकाळात कदाचित आपल्याही पूर्वजांकडून काही चुका झाल्या असण्याची शक्यता आहे हे समजून घ्या. नव्याने संबंध प्रस्थापित करा तरच भविष्यात शांततेने जगणे शक्य होईल." भारदेंच्या भाषणाने माझा ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकच व्यापक झाला.
याच दरम्यान हिंदू व मुस्लिम यांच्यात वैर कसे सुरू झाले ह्याविषयीची एक कथा माझ्या वाचनात आली ज्यामुळे आक्रमक धार्मिक युद्धांच्या मागची कारणे काय असू शकतील हे मला उमजले. ती कथा थोडक्यात अशी -
तर ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा हिंदू व मुस्लिम धर्मात वैर नव्हते. हिंदूंच्या राज्यात मुस्लिम व मुस्लिमांच्या राज्यात हिंदू राहत होते. असाच एक हिंदू मनुष्य मुस्लिम राजवटीच्या प्रदेशात राहत होता. कष्ट करून पोट भरणारा तो एक अतिसामान्य तरुण होता.
तो त्याच्या कामानिमित्त राजवाड्यासमोरील रस्त्यावरून जात असताना राजकन्या त्याला सज्जातून पाहत असे. असे पाहणे अनेकदा झाल्यावर तिला असे जाणवले की तिला तो आवडू लागला आहे. तिने आपल्या वडिलांना म्हणजेच त्या प्रदेशाच्या राजाला आपण त्या तरुणाशी विवाह करण्याची इच्छा बाळगून असल्याचे सांगितले.
राजाने अर्थातच या गोष्टीला संमती दिली नाही कारण हा तरुण एक सामान्य नागरिक होता. (धर्माचा मुद्दा राजाने मांडला नाही कारण राजाला त्याचा धर्मच माहीत नव्हता. परंतू रस्त्यावरून पायी चालत जाणारा म्हणजे सामान्य व आपल्या तोलामोलाचा नक्कीच नाही हे त्याला सहज कळले)

परंतू काही दिवसातच राजाच्या लक्षात आले की राजकन्येने त्या तरुणाचा ध्यास घेतला आहे व तिचे सदर तरुणाशी लग्न लावले नाही तर ती सदैव दु:ख करीत राहील. शेवटी राजा एकदाचा तयार झाला. नाहीतरी त्याला ती एकुलती एक कन्या होती. तिच्या सुखाकरिता एवढी तडजोड करायला तो तयार झाला. त्याने सेवकांना सांगून त्या तरुणास बोलावून घेतले.
त्या तरुणाला राजाने राजकन्येची इच्छा बोलून दाखविली व तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी विवाह करण्यास सांगितले.
त्या तरुणाला एवढे ठाऊक होते की या राजाचा आणि आपला धर्म एक नाही. त्याने या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला. राजाला हा सरळ सरळ स्वत:चा अपमान वाटला. त्याचप्रमाणे राजकन्या कष्टी होईल याचीही कल्पना आली.
राजाने त्या तरुणाला ’राजकन्येशी विवाह कर’ असा हुकूम दिला अन्यथा सेवकांकरवी त्याचे प्राण घेण्याची धमकी दिली.
ही धमकी ऐकताच इतका वेळ आतल्या दालनात असलेली राजकन्या धावत दरबारात आली व तिने राजाला सांगितले की या तरुणावर कोणतीही जबरदस्ती करू नये तो स्वेच्छेने तयार असेल तरच हा विवाह आयोजित करावा.

राजकन्येने दरबारात प्रवेश केला तसे एकदम चित्रच पालटले. मुख्य म्हणजे त्या तरुणाने तोपर्यंत कधी राजकन्येला पाहिलेच नव्हते. त्यामुळे राजकन्येचे प्रेम तसे पाहता एकतर्फीच होते. परंतु राजकन्येला त्याने दरबारात त्यावेळी पाहिले आणि तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून तो ही तिच्या प्रेमातच पडला. आता काहीही करून हिच्याशी आपले लग्न झालेच पाहिजे असे त्यालाही वाटून गेले.
मग त्याने आपला लग्नासाठी आधी व्यक्त केलेला ठाम नकार रद्द करीत ’राजकन्या जर हिंदू धर्मात यायला तयार असेल तर मी लग्न करीन’ असा सशर्त होकार दिला.
राजाने ह्या अटीला संमती दिली. मग तो तरुण त्या राजकन्येला घेऊन स्थानिक हिंदू पंडिताकडे गेला. त्या पंडिताने राजकन्या म्लेंच्छ असल्याने तिला शुद्ध करून घ्यावे लागेल असे सांगितले. सदर शुद्धीकरण करण्यासाठी यज्ञाचे आयोजन व त्याकरिता आहुती / दक्षिणा आदींची मोठी मागणी केली. ती अर्थातच पुरविण्यात आली. त्यानंतर अनेक धार्मिक विधी / पुजा अर्चा करण्यात आल्या. या सगळ्या नंतर ही पुन्हा मोठे ग्रंथ / पोथ्या चाळून संदर्भ शोधण्यात आले आणि स्थानिक पातळीवर त्या राजकन्येचे शुद्धीकरण शक्य नसून तिला यापेक्षा मोठ्या धर्मपीठा समोर जाण्यास सांगण्यात आले.

पुन्हा एक पातळी वर च्या धर्मपीठात ही याच गोष्टींची पुनरावृत्ती घडली. फक्त यावेळी आहुती / दक्षिणा यांच्या मागणीत वाढ झाली. शिवाय धर्मग्रंथ / पोथ्या यांच्या वाचनाकरिता पंडितांची संख्या जास्त होती त्यामुळे अर्थातच वेळही जास्त खर्च झाला. पण निष्कर्ष शेवटी तोच. राजकन्या शुद्ध होऊ शकत नाही
(जरा आठवून पाहिल्यास आपल्या असे लक्षात येईल - ज्ञानेश्वरादी भावंडे - संन्याशाची मुले म्हणून अशुद्ध घोषित करण्यात आली व पुढे त्यांना शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत अशाच काही गोष्टी घडल्या होत्या. असो.)
असे करता करता शेवटी सर्वोच्च अशा काशीक्षेत्री तो तरुण त्या राजकन्येला घेऊन पोचला. सदर वाटचाली दरम्यान ती राजकन्या त्या तरुणाची मनोभावे सेवा करीत होती या सर्व काळात त्याला तिच्यातील सौंदर्याशिवाय असण्यार्‍या इतर गुणांमुळेही ती अतिशय आवडू लागली. तिच्या शिवाय आपण जगू शकणार नाही याची ही त्याला खात्री झालीच. काशीक्षेत्री काय फैसला होणार याचा अंदाज त्या तरुणाला आलाच होता. अर्थात अपेक्षेप्रमाणे तिथे देखील नकार घंटाच वाजली.
त्यानंतर ती राजकन्या व तो तरुण पुन्हा राज्यात आले व राजाला सर्व वृत्तांत कथन केला. राजा व राजकन्या या दोघांनी ही परिस्थिती पुढे नमते घेत विवाहाचा नाद सोडून दिला व त्या तरुणास निरोप देण्याची तयारी केली.

स्त्रीच्या प्रेमात मूलत:च एक त्यागाची भावना असते. त्यामुळे आपणाला आपले प्रेम मिळत नसल्यास त्या ते वास्तव चटकन स्वीकारतात. याउलट पुरुषांची लालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांचे प्रेम हे ’हक्कप्रधान’ असते. ते मागणी करीत राहते.
इथे ही असेच घडले. तो तरुण च आता राजकन्येच्या प्रेमात पडला होता. रिकाम्या हातांनी परतणे त्याला शक्यच नव्हते. त्याने सरळ राजाला विचारले, " ही हिंदू होऊ शकत नसली तरी काय झाले? मी मुसलमान व्हायला तयार आहे. तुम्ही मला तुमच्या धर्मात घेऊ शकाल काय?"
राजाने ह्या गोष्टीला अत्यंत आनंदाने होकार दिला. मुस्लिम धर्मात प्रवेश करणे अतिशय सुलभ असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मग तो तरुण मुस्लिम बनला आणि त्याने राजकन्येशी विवाह केला. त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला.
कालांतराने राजाने त्याचे राज्य आपल्या जावयाच्या सुपूर्त केले. आता हा नवीन राजा म्हणजे आपला कथानायक पूर्वाश्रमीचा हिंदू तरुण.. आणि याच्या प्रेमकहाणीतील त्यावेळचे खलनायक कोण तर हिंदूंच्या धर्मपीठातील धर्म मार्तंड व तथाकथित अधिकारी व्यक्ती ... ज्यांनी आहुती / दक्षिणा वसूल करण्याखेरीज कुठलीही सश्रद्ध क्रिया न करता आपल्या अधिकारात एका परधर्मीय निष्पाप तरुणीला हिंदू धर्मात येण्यास विनाकारण रोखून धरले होते.
तेव्हा या नवीन राजाने राज्यावर येताच आपल्या सैनिकांना हुकूम सोडला ....
"हिंदूंची देवळे तोडा.. लुटा... तेथील धर्मरक्षकांची कत्तल करा..."
त्यांनंतर त्याने त्याच्या वारसांनाही हीच शिकवण दिली. आणि यानंतरच हिंद आणि मुसलमान या दोन धर्मात वैर सुरू झाले.
बाटगा जास्त कडवा असतो ही म्हण ही या घटनेनंतरच उदयास आली.
(कथा समाप्त)

सदर कथा मी रचलेली / लिहिलेली नाही. कोणाच्या भावना यामुळे दुखावल्यास मी जबाबदार नाही. त्याचप्रमाणे ही कथा कुठल्याही मुसलमान अथवा अन्य धर्मीय व्यक्तीने सांगितली नसून स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनीच त्यांच्या एका भाषणात सांगितली होती.
सदर भाषणाचा वृत्तांत व ही कथा ’शतपैलू सावरकर’ (लेखक - ह. त्र्यं. देसाई) या पुस्तकात वाचण्यास मिळेल. ही कथा ज्या काळात घडली त्या काळात मी जन्मलो नसल्याने तिच्या सत्य / असत्यते विषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही परंतू ती कथा त्या पुस्तकात असल्याचे व मी शाळेत असताना ती वाचल्याचे मला आठवते.
हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यावर वरदच्या विचारांमध्ये बराच फरक पडला.

https://picasaweb.google.com/102676953318994666706/BEHINDEVERYFORTUNETHE...

https://picasaweb.google.com/102676953318994666706/BEHINDEVERYFORTUNETHE...

https://picasaweb.google.com/102676953318994666706/BEHINDEVERYFORTUNETHE...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक वर्ष पारतंत्र्यात राहिल्यामुळे धर्म खुला न रहाता बंदिस्त होतो हेच कारण आहे. हिंदु धर्मात पुन्हा येणे ही गोष्ट सोपी असताना धर्ममार्तंडांनी अवघड केली आणि म्हणुन पारतंत्र्य आलेच नाही तर अनेक वर्ष राहिले. जे स्वातंत्र्य मिळाले ते समधर्मसमभावाच्या बेड्यात अडकलेले.

या देशात बहुजनांच्या देवाचा अनादर होतो. परदेशात असे होत नाही. अगदी नजीकच्या घटनेत पाकिस्थानात एका नटीला तिच्या लग्नात काही धार्मिक मंत्र चुकिच्या पध्दतीने म्हणले गेले म्हणुन ३६ वर्षांची शिक्षा झाली.

इतके टोकाचे नको आहे पण अनेकांच्या श्रध्देच्या विषयाचा अनादर मात्र सहन होत नाही.

नाण्याला दुसरी बाजु असते हे पटले. विन्सटन चर्चिल ह्यांनी म्हटले आहे की "History is written by the victors". इतिहास हा बर्‍याच अंशी विजेत्यांच्या दृष्टीकोनातून लिहिलेला असतो त्यामुळे शक्यता अशी आहे की त्यात नाण्याची दुसरी बाजू मांडलेली नसेल.

नितीनचन्द्र +१
थोडक्यात, हिंदू धर्मात प्रवेश किंवा पुनर्प्रवेश सोपा व्हायला हवा असेच सावरकरांना सांगायचे होते.

नक्की काय म्हणायचे आहे कळाले नाही. सहसा तुमचे लेख पटले ना पटले तरी मुद्दा स्पष्ट असतो. येथे तसे वाटले नाही. कदाचित मला नीट समजले नसेल.

दुसरे म्हणजे शीर्षकाचाही संबंध कळाला नाही. लेखातील उदाहरणे त्या शीर्षकाची वाटत नाहीत. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे शीर्षकाशी अजिबात सहमत नाही. प्रत्येक गुन्ह्याच्या मागे अन्याय नसतो. काही गुन्ह्यांच्या बाबतीत ते खरे असेल - पन अनेक गुन्हे केवळ ते करणारे लोक वाईट असतात म्हणून केलेले असतात. तेथे सहानुभूती अनाठायी आहे.

गुगळेंशी सहमत.

इतिहास जेते लिहितात.. भारताच्या इतिहासात मुस्लिमाना अकारणच खलनायक म्हणुन रंगवले आहे.

लहान पणी मला ही. इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे वगैरे असेच विचार मनात यायचे पण विलियम बैन्टिक ने सती प्रथे ला गैर कानूनी घोषित केले हे वाचन्यात आले तेव्हा इंग्रज एवढे ही काही वाईट नसावेत असे ही वाटायचे... ..

सर्वच प्रतिसादकांचे आभार.

फारएण्ड व त्यांच्याशी सहमत असणारे बेफिकीर यांच्याकरिता..

काउ यांच्या प्रतिसादात तुमच्या शंकांचे उत्तर मिळेल अशी आशा आहे.

<< काही गुन्ह्यांच्या बाबतीत ते खरे असेल - पन अनेक गुन्हे केवळ ते करणारे लोक वाईट असतात म्हणून केलेले असतात. तेथे सहानुभूती अनाठायी आहे. >>

हा तर अतिशय सरधोपट विचार झाला. गुन्हे करणारे वाईट म्हणून त्यांना शिक्षा, कठोर शिक्षा, अजून कठोर शिक्षा हे बर्‍याच काळापासून चालत आलेले आहेच. तरीही गुन्हेगारी थांबलेली नाहीच. गुन्हेगारी खरोखरच थांबवायची असेल तर गुन्हेगारांच्या गुन्हे करण्यामागच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची गरज आहे. तुरुंगातील कैद्यांची भेट घेवून क्रिमिनल सायकॉलॉजीवर रिसर्च करणारे अनेक जण आहेत. अशा अजून अभ्यासकांची गरज आहे आणि त्यांनी केलेले संशोधन पुढे येण्याची देखील. मला सवड मिळाल्यास या विषयावर अजून लेखन करेन.

तूर्तास तुम्ही प्रवीण महाजन लिखित 'माझा अल्बम' पुस्तकाचे वाचन करावे असे सुचवितो.

तो अभ्यास होणे गरजेचे आहे याबद्दल वाद नाहीच. पण म्हणून "सगळ्या" गुन्ह्यांमागे काही अन्याय असतो हे गृहीतक आधीच कशाला?

<< पण म्हणून "सगळ्या" गुन्ह्यांमागे काही अन्याय असतो हे गृहीतक आधीच कशाला?>>

सगळ्या म्हणजे जे गुन्हे नोंदले जातात, न्यायालयात येतात त्यावर आरोपींना शिक्षा होते त्या गुन्ह्यांविषयी मी हे विधान करतोय.

तर मग त्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात देता येणार नाही. काही काळ प्रतिक्षा करावी लागेल. स्वतंत्र लेख लिहून स्पष्टीकरण दिले जाईल.

<<हा तर अतिशय सरधोपट विचार झाला. गुन्हे करणारे वाईट म्हणून त्यांना शिक्षा, कठोर शिक्षा, अजून कठोर शिक्षा हे बर्‍याच काळापासून चालत आलेले आहेच. तरीही गुन्हेगारी थांबलेली नाहीच. गुन्हेगारी खरोखरच थांबवायची असेल तर गुन्हेगारांच्या गुन्हे करण्यामागच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची गरज आहे. तुरुंगातील कैद्यांची भेट घेवून क्रिमिनल सायकॉलॉजीवर रिसर्च करणारे अनेक जण आहेत. अशा अजून अभ्यासकांची गरज आहे आणि त्यांनी केलेले संशोधन पुढे येण्याची देखील>>.

किरन बेदी यांनी कैद्यांवर असे संशोधन केले आहे तिहाड जेल मधे त्यावर त्यांनी बरिच पुस्तकेही लिहली आहेत.

Behind Every Crime There Is An Injustice > असहमत. लेख वाचला. एक गुंतासुटतोय न सुटतोय तोच दुसर्या गुंत्यात हात घातलेला वाटतोय. क्षमा असावी पण एकही उदाहरण अथवा संदर्भ पटला नाही.
तुम्हाला जो इतिहास भुगोल इ. शिकवला तो चुकिचाच आहे असे म्हणायचे आहे का? असल्यास बोलणे थांबवतो.

@ दिवाकर देशमुख

<< तुम्हाला जो इतिहास भुगोल इ. शिकवला तो चुकिचाच आहे असे म्हणायचे आहे का? असल्यास बोलणे थांबवतो. >>

मी भारताचा नागरिक म्हणून मला विद्यार्थी दशेत भारतीय पुस्तकांतून जो इतिहास शिकायला मिळाला असेल - जसे की काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, पाकिस्तान तिथे कुरापती काढत असतो - १९४८, १९६५, १९९९ ते आजतागायत. अगदी तसाच इतिहास पाकिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या विद्यार्थी दशेत पाकिस्तानी पुस्तकातून शिकायला मिळाला असेल असे आपणांस वाटते का? फरक असणारच ना? कुणाला तरी नक्कीच चुकीचा इतिहास शिकविला गेला असणार. आपल्या मते त्यांना आणि त्यांच्या मते आपल्याला. ही दरी वाढतच जाणार. केव्हातरी त्रयस्थ दृष्टिकोनातून वस्तुस्थिती समजून घ्यावी लागणारच आहे - त्यांना आणि आपल्याला देखील.

याउप्परही आपणांस लेख, उदाहरणे व संदर्भ पटत नसल्यास आपल्या मताचाही आदर आहेच. धन्यवाद.

मी राहतो भारतात नागरीक आहे भारताचा मग पाकिस्तानात काय शिकवले जाते याचे मला काय घेणेदेणे? Uhoh असेल आणि असावे? विश्वव्यापक जर दृष्टीकोन असेल तर जर्मन मुलांना नाझी हत्याकांड शिकवत असतील? दोन्ही युध्द केवळ जर्मनीमुळे लढली गेलीत असे शिकवले जात असेल ? इटलीचे मुल काय शिकत असतील पहिले महायुध्दाचे कारण इटलीच्या मुसोलिनीने दिले होते. ? त्याच्याच धोरणांमुळे हे युध्द झाले आणि नंतर त्यांच्यावर आणि इतरदेशांवर अपमानास्पद अटी लादल्या गेल्या ज्यातुन पुढचे दुसरे महायुध्द झाले.? अमेरिका व्हिएटनाम मधे हारली हे अमेरिकन शिकतील का? कोणता देश आपल्या सरकारने केलेल्या / चालवलेल्या चुकिंचे आणि घटनांचे अभ्यासक्रमात समाविष्ट करेल? आपल्या पाठ्यपुस्तकात काश्मिरांवर झालेले अत्याचार वाचले आहेत? काश्मिरपंडींतांवर काय परिस्थिती ओढावली आहे हे समाविष्ठ केले आहेत? ७ सिस्टर्स म्हणुन ज्याराज्यांना संबोधले जाते तिथे काय परिस्थिती राजकारणी आणि लष्करांने केली आहे. हे शिकले आहेत? बलुचिस्थान मधे भारताची काय कार्यवाही आहे? हे शिकवण्यात आले आहे ?
नाही हे सगळे येणार नाही त्यात्या देशांच्या अभ्यासक्रमात. त्यामुळे ती आशा ठेवणे चुकिची आहे. प्रत्येक जण आपापल्या कोषाच्या जगात राहतो आणि त्याला तसे ठेवले जाते.

----
हा भाग आणि नंतरचा जो हिंदु धर्मांतराचा भाग यात तुमच्याकडुन सरमिसळ झाली / केली असे वाटु लागले आहे

<< हा भाग आणि नंतरचा जो हिंदु धर्मांतराचा भाग यात तुमच्याकडुन सरमिसळ झाली / केली असे वाटु लागले आहे >>

सरमिसळ नसून ती तशी सांगड घातली आहे.

<< प्रत्येक जण आपापल्या कोषाच्या जगात राहतो आणि त्याला तसे ठेवले जाते. >>

याच कोषातून बाहेर निघून आपल्या नेहमीच्या दृष्टिकोनातून न पाहता त्रयस्थ नजरेने इतिहासातील घटनांकडे पाहिले की कदाचित आपल्या देशातील पूर्वसुरींच्या देखील काही चूका असु शकतात आणि परकीय देशातील ज्या व्यक्तिंना आपण चूक ठरवत होतो त्यादेखील कदाचित बरोबर असू शकतात हाच मुद्दा मला मांडायचा होता.

इतिहासाकडे तटस्थ नजरेने वा विचाराने पाहावे याची शिकवण शालेय अभ्यासक्रमाच्या वर्षात विद्यार्थ्याला दिली पाहिजे, हा दृष्टिकोण (स्वातंत्र्यपूर्व काळ असो वा त्यानंतरचा असो) शालेय शिक्षण खात्याने कधीही ठेवलेला नाही. शिक्षण घेणे म्हणजे केवळ इतिहास शिकविणे होय, असे कुणीच मानणार नाही....ते अयोग्यही होईल. चारित्र्यसंपन्न नागरिक तयार करणे, मूल्यांची जोपासना करणे, आंतर पातळीवर सामंजस्य निर्माण करणे...अशा काही मूलभूत बाबींचा शिक्षणाच्या उद्दीष्टांमध्ये समावेश करावा लागतो....त्यानुसार अभ्यासक्रम तयार करताना मग इतिहास विभागाला "आपल्या राज्यामध्ये चांगले काय झाले व ते कुणी केले...?" यावरच भर देताना उजवी बाजू समोर आणावी लागते. साहजिकच जी काही डावी स्थिती होती ती तशीच खरोखरी होती का, किंवा ते दुश्मन म्हणून त्यांच्या कथा रंगविताना केवळ काळा रंगच घ्यावा का ? याचे तारतम्य शिक्षकांकडे नसते. शासनाने जे धडे अभ्यासक्रमात घेतलेले आहेत ते तसे का ? हा प्रश्न शिकविणार्‍यासमोर येत नाही...आणूही दिला जात नाही खात्याकडून. म्हटल्या तर या तटस्थपणाच्या बाबी नव्हेत, मात्र मुलांना इतिहास शिकविलाच पाहिजे ही बाब अटळ असल्याने शासनाला नेहमीच विश्वव्यापक दृष्टिकोण ठेवणे शक्य होत नाही. एक जबरदस्त क्षमतेचा नायक आपल्या राज्याच्या इतिहासात होऊन गेला आणि त्याने केलेल्या कार्यावर देवाचा वरदहस्त होता असे वर्गात शिकविले जाते....इतिहासाची पाने मग त्याच अनुषंगाने लिहिली जातील. पुढे त्या महानायकाच्या नावाचा वापर जिल्हा परिषदेपासून ते थेट लोकसभेच्या निवडणुकीसाठी अत्यंत चतुराईने केला गेला तरी त्यात वावगे मानले जात नाही...जणू काय इतिहास त्यासाठीच शिकायचा.

Values are caught, they are not taught... असे शैक्षणिक मूल्यांबाबत म्हटले जाते. हे खरे व्हायचे असल्यास विद्यार्थी शालेय शिक्षणानंतर जेव्हा महाविद्यालयीने क्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याच्यात जर इतिहासाबाबत अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली तरच तो तटस्थपणे इतिहासाचे मूल्यमापन करायला सक्षम होईल. तरीही झाले आहे असे 'मी शिकतो आहे ते नोकरीसाठी आवश्यक ती शैक्षणिक पात्रता मिळविण्यासाठी....' हीच वृत्ती बहुतांशी विद्यार्थीवर्गात आहे. इतिहासाच्या अभ्यासाकडे ना विद्यार्थी ना शिक्षक ना पालक गंभीरपणे पाहत असतात....(पालक इंग्रजीचे महत्त्व पटवून देण्यात मग्न असतात....पण किती पालक पुढे येऊन सांगतील की आम्ही आमच्या मुलांना इतिहासही शिकवित असतो ? याचे उत्तर निराशादायक असेल.)

श्री.चेतन सुभाष गुगळे आणि श्री. दिवाकर देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण संवादाचे वाचन केल्यावर नाईलाजास्तव म्हणावे लागते की शासनाचे संबंधित खाते तयार करून समोर देत असलेल्या अभ्यासक्रमावरच सध्याची पिढी इतिहास शिकत राहील, त्रयस्थ नजरेने शिक्षकही नाही शिकवू शकत इतिहास....या स्थितीला ठोस पर्याय समाजापुढे असलाच तर विद्यार्थ्याने इतिहास अभ्यासाचा रस्ता स्वयंप्रेरणेने शोधला पाहिजे.

...........हे कठीण वाटते.

अशोक साहेब आपली पोस्ट पटली
परंतु त्रयस्थ नजरेने ज्यांनी इतिहास मांडतील त्यांचे काय होईल याचे थोडीफार चुणुक पुण्यातच काहीवर्षांपुर्वी बघितली गेली आहे. त्यामुळे तटस्थ दृष्टीकोन हा अभ्यासापुरताच मर्यादीत असतो.

याच कोषातून बाहेर निघून आपल्या नेहमीच्या दृष्टिकोनातून न पाहता त्रयस्थ नजरेने इतिहासातील घटनांकडे पाहिले की कदाचित आपल्या देशातील पूर्वसुरींच्या देखील काही चूका असु शकतात आणि परकीय देशातील ज्या व्यक्तिंना आपण चूक ठरवत होतो त्यादेखील कदाचित बरोबर असू शकतात हाच मुद्दा मला मांडायचा होता. >>>

एक साधी घटना उदा. घेउ. काल पुंछ सेक्टरवर पाकिस्तान ने गोळीबार केला. (भारतीय मिडीया) / काल पुंछ सेक्टरवर भारता तर्फे जोरदार गोळीबार झाला (पाकिस्तान मिडीया)

तुम्ही भारतीय नागरिक आहात. कुणावर जास्त विश्वास ठेवाल ? ( पाकिस्तान आणि भारत दोघांविषयी पुर्वग्रह दुर ठेवुन उत्तर द्यावे )
जर तुमचे उत्तर भारत असेल तर तुम्हाला त्रयस्थ इतिहास शिकवुन देखील काय फायदा होणार आहे. आणि जर पाकिस्तान असेल तर भारतातले लोक तुम्हाला सोडणार आहे का? मग तुम्ही तो त्रयस्थ इतिहास कुठे आणि कुणाला सांगणार आहे Happy

स्वतःच्या देशाचे सोडुन इतर दोन देशांच्या इतिहासाची त्रयस्थ पणे परीक्षण नक्कीच करता येतील. तेव्हा भावनिक बंध आपले सामाजिक शिक्षण आडवे येत नाही. दोन्ही बाजुंचा व्यवस्थित अभ्यास करता येतो. आणि नक्कीच करावा.

श्री. अशोक पाटील यांचा संपूर्ण प्रतिसाद अतिशय पटला आणि आवडला.

<< Values are caught, they are not taught... असे शैक्षणिक मूल्यांबाबत म्हटले जाते. हे खरे व्हायचे असल्यास विद्यार्थी शालेय शिक्षणानंतर जेव्हा महाविद्यालयीने क्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याच्यात जर इतिहासाबाबत अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली तरच तो तटस्थपणे इतिहासाचे मूल्यमापन करायला सक्षम होईल. >>

इतिहासाचे अवांतर वाचन विद्यार्थ्यांकडून व्हावे या उदात्त (?) हेतुनेच बहुदा क्रमिक पाठ्यपुस्तके सुमार दर्जाची व पक्षपाती पद्धतीची छापीत असावेत.

दिवाकर जी....

पुण्यातील ती घटना जनमानसिकतेचे दर्शक आहे, आणि तिला चेतावणी कशी देता येते, कोणत्या कारणास्तव, कोण देते...? याचा लोकमानसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करायचा म्हटले तरी एक गोष्ट पक्की इतिहासाच्या नावाने बहुजन समाजाला चटदिशी हाती धरता येते. तुम्ही जे म्हणता, "तटस्थ दृष्टीकोन हा अभ्यासापुरताच मर्यादीत असतो..." हेच सार वैयक्तिक पातळीवर स्वीकारावे लागते. शिवाय आपल्याकडील प्रत्येक पेठेचा नायक वेगळा....म्हणजे बुधवार पेठेतील लोक इतिहासातील ज्या महापुरुषाला मानतील त्याला गुरुवार पेठेत टिकलीपुरतेही स्थान नाही. कसले आणि कोणते इतिहासाचे पुस्तक अशा ठिकाणी अभ्यासक्रमासाठी दिले जाईल ? दिले तरी त्यातील मजकूर कुठपर्यंत त्या मुलांच्या मनी बिंबणार ? असे हे सारे अवघड होऊन बसले आहे पाठ्यपुस्तक मंडळासाठी. त्यापेक्षा भाषा, विज्ञान, गणित, समाजशास्त्र आणि भूगोल आदी विषय निरूपद्रवी वाटू लागतात शिक्षकांना. मतभिन्नतेच्या वावटळी उठतात त्या इतिहास विषयापुरत्याच.....नाजूक झाला आहे हा विषय.

चेतन सुभाष गुगळे....

तुम्ही लिहिले आहे..."इतिहासाचे अवांतर वाचन विद्यार्थ्यांकडून व्हावे या उदात्त (?) हेतुनेच बहुदा क्रमिक पाठ्यपुस्तके सुमार दर्जाची व पक्षपाती पद्धतीची छापीत असावेत...." ~ मी नोकरीनिमित्ताने चार जिल्ह्यातील अनेक तालुके (शहरे नव्हेत) फिरलो आहे.... तेथील मुक्काम आणि प्रत्यक्ष बोलाचालीच्या अनुभवावरून मी ठामपणे सांगू इच्छितो की एकाही ठिकाणी (हायस्कूल पातळीवरील शाळेत म्हणतो मी...) इतिहासाचे अवांतर वाचन आपल्या विद्यार्थ्यांकडून होईल अशी कसलीही स्थिती वा शिकवण मला दिसलेली नाही. निरिच्छेनेच सारे चालल्याचे आढळते.

दहापैकी दोन विद्यार्थ्यांनी (आठ गप्प बसले) "स्वामी मी वाचली आहे....हो, हो, मृत्युंजय देखील वाचले आहे...." हे जे उत्तर दिले ते पाहता विद्यार्थ्याच्या या उत्तरांना जर इतिहासाचे अवांतर वाचन आपण म्हणायचे असेल तर तसे झाले आहे असे म्हणू या. पण कादंबरी म्हणजे इतिहास शिकणे अशीच धारणा मुलांची होत असेल तर ती किती दुर्दैवी गोष्ट असू शकेल हे तुम्ही जाणू शकालच. अत्यंत उदासवाणे असे चित्र आहे सद्यस्थितीत....इतिहास शिकण्याबाबत.

मतभिन्नतेच्या वावटळी उठतात त्या इतिहास विषयापुरत्याच.....नाजूक झाला आहे हा विषय.>>

क्षमा असावी बदल करत आहे "नाजुक केला आहे हा विषय" हे मला तरी योग्य वाटत आहे. कारण इतिहासपुरुषांच्या विरुध्द देखील खोटेनाटे बरेच काही उडवले आहे. अश्यावेळी तज्ञलोकांनी मेहनत घेउन संशोधन करुन खरे काही लोकांसमोर आणले आणि ते विरुध्द असले तर लोक त्याला मान्यता देत नाहीत. त्या संशोधकास देखील समाजातील इतर खोट्या लोकांच्या पंक्तीत बसवतात. त्याची मेहनत त्याची मते. त्याने केलेले कार्य याचे मोल शुन्य करतात. हा दोष त्या खोट्या लोकांवर जातो ज्यांनी आधी निव्वळ द्वेषापोटी इतिहास पुरुषांवर चिखलफेक केली आहे.

केला गेला आहे तसा विषय....वा झाला आहे....कोणतीही संज्ञा घेतली तरी मूळ दुखणे तेच राहिले आहे की इतिहास स्वीकृतीसाठी सत्य आणि पूर्ण सत्य हे कोणत्या स्वरुपात मांडले गेले तर ते सर्वसामान्यांनाही मान्य होईल ? राजकारणी लोक तसे करू देणार नाहीत कारण शेवटी त्याना ज्या रितीभातीचा इतिहास पुस्तकांतून आला पाहिजे हे मान्य आहे ते तसल्याच क्रमिक पुस्तकांवर मंजुरीची मोहोर उमटविणार हे तर उघडेच आहे.

तज्ज्ञ लोकांनी मेहनत घेऊन संशोधन पुढे आणलेच तर त्यांच्या म्हणण्यालाही जर त्याच क्षेत्रातील मुख्याध्यापक पातळीवरील पंडिताने विरोध केला तर लोक तसले संशोधन स्वीकारायला धजत नाही. सरदेसायांनी संपूर्ण महाराष्ट्रेतिहास एका हाताने लिहून दाखविला. त्यांच्या "मराठी रियासती" चा पूर्वार्ध प्रसिद्ध होताच राजवाडे यानी तीवर टीका केला....ती वास्तव कि अवास्तव हा भाग दुय्यम....पण ती करताना सरदेसायांच्या लिखाणाला त्यानी "ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी" असे शब्द वापरले होते....(असे ते का म्हणाले होते त्याबाबत चर्चा करायला हा धागा योग्य नाही) तरीही त्या टीकेमुळे द्वितीयावृत्तीत सरदेसाई यानी त्या टीकेची योग्य चिकित्सा न करण्याचे धोरण अवलंबिले. इतिहासकारांपुढे समस्या असतात त्या सर्वसामान्यांच्या नव्हेत तर पंडितांच्याही. लोकधारणेकडे त्यामुळेच ते झुकतात असे चित्र तयार होत गेले.

शालेय विद्यार्थ्यांना ईतिहास एकाच हेतूने शिकवला जातो जे त्यांना आपल्या ईतिहासाबदल, देशाबद्दल, संस्कृतीबद्दल अभिमान वाटावा आणि अस्मिता कायम राहावी. त्यामुळे इथे तटस्थ वगैरे मुद्दे लागू होत नाहीत. वा तसा ईतिहास लिहिण्याच्या नादात वरच्या मूळ हेतूला धक्का पोहोचवणे देशाच्या / समाजाच्या हिताचे नाही. त्यामुळे प्रत्येकाने ईतिहास आपल्या सोयीनेच शिकवावा या विचारांशी, आणि त्यामागील भावनांशी मी सहमत आहे.

Pages