जपानी तापाचा ताप

Submitted by डॉ अशोक on 10 December, 2014 - 08:32

जपानी तापाचा ताप

लातूर जिल्ह्यातल्या एका गावात जपानी तापानं चार मृत्यू झाल्याची बातमी कळली. मृत्यूमुखी पडलेले चारही लहान मुलं होती. मामला गंभीर होता. अपेक्षेनुसार मदतीसाठी विनंती आली. नांदेडच्या मेडीकल कॉलेजातल्या डॉक्टरांचं पथक घेवून आम्ही त्या गावी पोहोचलो. बरोबर पिडीऍट्रीशीअन डॉ. नागलागावकर (आता कै.) पण होते. गावात एक प्राथमिक आरोग्यकेंद्र होतं. आम्ही तिथल्या वैद्यकिय अधिका-याला भेटलो. तो तर ह्या केसेस जपानी तापाच्या होत्या हे मानायलाच तयार नव्हता. त्याच्याशी चर्चा केली. त्याचं म्हणणं थोडक्यात असं की चारही मुलांना आधी या प्राथमिक आरोग्य केंद्रातच आणलं होतं. त्यांना ताप नव्हता. दोघं गुंगीत होते. पण जपानी तापात असतात तशी मेंदू दाह झाल्याची काहीच लक्षणे दिसली नाहीत. मुख्य म्हणजे चौघांपैकी एकालाही ताप नव्ह्ता. पण त्यांची तब्बेत गंभीर होती म्हणून त्यांना तालुक्याच्या ग्रामीण रूग्णालयात पाठवलं होतं. अशा साथीत गावात तापाच्या रुग्णात वाढ झालेली दिसते. पण तसं काही झालेलं नव्हतं. पुरावा म्हणून त्यानं बाह्यरुग्ण विभागाचं रजिष्टर दाखवलं. हिंवताप निर्मूलन कार्यक्रमांतर्गत तापाच्या प्रत्येक पेशंटचा रक्ताचा नमुना तपासणीसाठी घेणं बंधनकारक आहे. मी ते सगळं रेकॉर्ड काळजीपूर्वक पाहिलं. तो वैद्यकिय अधिकारी म्हणत होता त्यात तथ्य होतं. मग ही जपानी तापाची भानगड कुठून आली ते कळत नव्हतं. बहूदा त्याच्या वरिष्ठांपैकी कुणीतरी हा उद्योग केला असावा, पण भितीमुळे तो ते सांगत नव्हता.
.
आम्ही गावात फेरफटका मारला. जपानी तापाच्या साथीत मोकाट फिरणारी डुकरं महत्वाची भूमिका बजावतात. पण गावात कुठंही ही मंडळी दिसली नाहीत. "बहूदा ती मेली असावीत !" आमच्यापैकी कुणीतरी म्हटलं. पण त्यात काही तथ्य नव्हतं. गावात डुकरं नव्हतीच. रस्त्यात आम्हाला दिल्लीहून आलेले कीटकतद्न्य भेटले. त्यांच्यासोबत जिल्ह्याचा हिवताप अधिकारी पण होता. हा माझा विद्यार्थी. त्यानं त्या कीटक तद्न्याची ओळख करून दिली. जपानी ताप डुकरांपासून मनुष्यांपर्यंत पोहोचवतात ते क्यूलेक्स ट्रायटीनोर्हिंकस जातीचे डांस. पण ह्या कीटक्तद्न्याला हे डांस किंवा त्याची उत्पत्तीस्थानं काही कुठं सांपडली नाहीत. त्यासाठी त्यानं गावात सकाळ पासून मोहिम राबवली होती तरी पदरी निराशा पडली होती. आम्हाला त्या गावात आता काही फारसं बघायचं राह्यलं नव्हतं. आम्ही तालुक्याच्या गावीपोहोचलो.
चारही मुलांना त्या गावातून इथं तालुक्याला आणलं होतं. पण दोघांची तब्बेत बिघडल्यानं त्यांना जवळच असलेल्या मॆडीकल कॉलेजाच्या हॉस्पिटलात पाठवलं होतं आणि तिथं ते मरण पावले होते. दोघं मात्र या तालुक्याच्या दवाखान्यात मृत्यूमुखी पडले होते. आम्ही त्यांचे केसपेपर्स पाहिले. प्राथमिक आरोग्यकेंद्राचा वैद्यकिय अधिकारी सांगत होता त्याच्याशी पूरक अशीच ही माहिती होती. त्या दुर्दैवी मुलांची मृत्यूनंतर शवचिकित्साही करण्यात आली होती. पोस्टमार्टम करणारा डॉक्टर काही जास्त प्रकाश टाकू शकला नाही. आम्ही त्या मेडीकल कॉलेजाकडे आपला मोहोरा वळवला. तिथल्या पोस्ट्मार्ट्म मधे कळलं की मुलांच्या मेंदूत, फुप्फुसात आणि जठरात रक्तस्त्राव झाल्याचं दिसून आलं होतं. मात्र मृताच्या पोटातील पाणी आणि अवयवांचा भाग रासायनिक तपासणी साठी वेगळा काढून ठेवला होता. पण पोलीसांनी तो अजून प्रयोगशाळेकडे नेला नव्हता. मुलांच्या रक्ताचे नमूने पुण्याला तपासणीसाठी पाठवले होते. तो रिपोर्ट यायला अवकाश होता. काहीही नक्की निष्कर्ष निघाला नाही म्हणून आम्ही निराशेनंच नांदेडचा रस्त्याला लागलो.
.
रस्त्यात आमचे पिडीऍट्रीशीअन डॉक्टर नागलगावकर मला म्हणाले: "सर, आपण मृत मुलांच्या घरी भेट दिली पाहीजे." आमच्या सगळ्या टीम मधून नाराजीचा सूर उमटला. आता परत त्या गावी जायचं? म्हणजे परत जवळ्पास पन्नासएक किलोमीटरचा फेरा होता. काय करावं? मी मोठ्या नाराजीनंच ड्रायव्हरला गाडी परत वळवायला सांगितलं.

त्या गावात परत पोहोचलो तेंव्हा अंधार पडला होता. त्या दुर्दैवी मुलांचं घर सांपडायला त्या लहानशा गावात जास्त उशीर लागला नाही. दोन मुलं त्या घरातली होती. मुलांची आई आम्हाला पहाताच बाहेर आली. तिच्याकडून मिळालेली माहिती धक्कादायक तर होतीच पण या सगळ्या प्रकरणाला वेगळच वळण देणारी होती. त्या बाईचा दीर (मुलांचा काका) शेजारीच रहात होता. पण या दोन कुटुंबांचं फारसं सख्य नव्हतं. प्रॉपर्टी वरून नेहेमी भांडणं व्हायची. मात्र त्या दुर्दैवी दिवशी त्या मुलाच्या काकाला एकदम प्रेमाचा उमाळा आला होता. त्यानं बाहेर खेळणा-या आपल्या पुतण्यांना घरात बोलावलं होतं. त्यांच्या बरोबर त्या मुलांचे दोन मित्र ही गेले. काकानं पुतण्यांना बिस्किटं खाऊ घातली. त्या मित्रांनाही दिली. मुलं काही बिस्किटं घेवून घरी आली ती उलट्या करीत आणि बिस्किटाला घाणेरडा वास येतोय अशी तक्रार करीत. त्या बाईनं पाहिलं तर बिस्किटांना वास येत होता, रॉकेलसारखा ! डॉक्टर नागलगावकरांनी विचारलं: "मुलाचे ते काका, काय व्यवसाय आहे त्यांचा? " मिळालेल्या उत्तरानं जणू काय आम्हाला जोरदार ठोसाच मारलाय असा मला भास झाला. उत्तर होतं: "खताचं आणि कीट्कनाशकाचं दुकान आहे त्याचं!" सगळं चित्र कसं स्पष्ट दिसायला लागलं. तथाकथित जपानी तापाच्या साथीत एकाही मुलाला ताप कां नव्ह्ता, गावात डुकरं नसतांनाही आणि जपानी ताप पसरवणारे डांस नसतांनाही "जपानी ताप" कसा झाला ते कळ्लं होतं. आमच्या सहकारी डॉक्टरच्या सूचने कडे दुर्लक्ष करून आम्ही तसेच नांदेडला गेलो असतो तर या प्रकरणातलं रहस्य बाहेर आलंच नसतं.

(टीप: या प्रकरणी पोलीसांनी नंतर गुन्हा दाखल केला असल्याची माझी माहिती आहे. पुण्याला पाठवलेल्या रक्त नमुन्यातही जपानी ताप असल्याचं आढलून आलं नाही. मात्र काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. आम्हाला सांगितली ती माहिती त्या मातेनं कुणालाच कां सांगितली नाही? मृतात एकालाही ताप आलेला नसतांना आणि गावात तशी परिस्थिती नसतांनाही ही जपानी तापाची साथ आहे अशी आवई नक्की कुणी उठवली होती? तापदायकच होतं सगळं! ताप नसलेला जपानी ताप)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काकाला पकडले व शिक्षा झाली हि ओळ शोधत होते शेवटी.
असो. मुलांना कोणीही दिलेले खायचे नाही हे शिकवत का नाही पालक जेव्हा अशी स्थिती (भांडण वगैरे काकाशी) असते तेव्हा हा प्रश्ण पडला. Sad

बापरे....
भयानक आहे हे. >>मुलांना कोणीही दिलेले खायचे नाही हे शिकवत का नाही पालक जेव्हा अशी स्थिती (भांडण वगैरे काकाशी) असते तेव्हा<< अगदी १००% सहमत
बादवे, बर्याच दिवसांनी लेख आला डॉ. काका तुमचा !!

माणसं आहेत की शैतान, शिक्षा होवो न होवो, हे पातक डोक्यावर घेऊन कसलीही गिल्ट न बाळगता जगतात कशी ही माणसे

बापरे... माणसं आहेत की शैतान ???

पिडीऍट्रीशीअन डॉ. नागलागावकर यांच्या समयसूचकतेचे आणि प्रसंगावधानतेचे राहून राहून कौतुक वाटते - ग्रेट ..

को-ऑपरेटीव्ह सोसायटींना २०० रुपयात १२ वर्षांसाठी अपघात विमा ही पॉलिसी आली होती. अपघाताच्या व्याख्येत साप चाऊन मृत्यु, वीजेचा शॉक हे सुध्दा होते. सर्वच गावात सर्व प्रकारच्या को- ऑपरेटीव्ह सोसायटीचे सभासद हा विमा घेते झाले. यानंतर गावातले सर्वच संशयास्पद मृत्यु साप चाऊन व्हायला लागले. कारण या मृत्युला विमा होता पाच लाख रुपये. सरतेशेवटी विमा कंपनीने ही पॉलिसी मागे घेतली.

>>पिडीऍट्रीशीअन डॉ. नागलागावकर यांच्या समयसूचकतेचे आणि प्रसंगावधानतेचे राहून राहून कौतुक वाटते - ग्रेट .>> +१

मुलांना कोणीही दिलेले खायचे नाही हे शिकवत का नाही पालक जेव्हा अशी स्थिती (भांडण वगैरे काकाशी) असते तेव्हा
>>
अरे भांडण असले तरी विष देउन मारणे ही फार मोठी गोष्ट आहे. कोकणात अनेक ठिकाणी कोर्ट कज्जे असले तरी एक्मेकांकडे जाउन लोक रहात असत आण एकत्र जेवत पण असत. फारच भयंकर!

डॉक्टरसाहेब,

फार भयानक आहे हे.

>> आम्हाला सांगितली ती माहिती त्या मातेनं कुणालाच कां सांगितली नाही?

हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात घोंघावतोय. मला त्या मातेची वेगळीच शंका येतेय. Sad

आ.न.,
-गा.पै.