रोगन जोश ( नॉन काश्मिरी )

Submitted by संपदा on 23 November, 2014 - 17:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

मटणाचे तुकडे १ किलो.
६ उभे चिरलेले कांदे.
२ लहान बारीक चिरलेले टोमॅटो.
१ कप दही.
३ लहान तमालपत्र.
२ टेबलस्पून कोथिंबीर.
१५ तळलेले काजू.
मीठ - चवीनुसार.
१ टी स्पून साखर.
१/२ टी स्पून हळद.
५ हिरवे वेलदोडे.
१/२ टी स्पून शहाजिरे.
३ टेबलस्पून तूप.
१ टेबलस्पून तेल.

वाटायचा मसाला :-
२० लसूण पाकळ्या.
६ सुक्या मिरच्या ( गरम करून )
दालचिनीचे २ तुकडे.
५ मोठे वेलदोडे (बडी ईलायची )
६ काळे मिरे.
२ टी स्पून भाजलेली बडीशोप.
२ टी स्पून भाजलेले धने.
२ टी स्पून भाजलेले जिरे.
२ ईंच आल्याचे तुकडे.

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम मटणाचे छोटे तुकडे करून त्याला हळद आणि मीठ घातलेले दही लावून १ तास मॅरिनेट करावे.

वाटण्याचा मसाल्यामधील जिन्नस थोडे पाणी घालून वाटून घ्यावेत.

पातेल्यात तेल व तूप घालून त्यात हिरवे वेलदोडे, शहाजिरे, तमालपत्र घालून त्यावर उभा चिरलेला कांदा घालून कुरकुरीत परता. त्या कांद्यावर वाटलेला मसाला घालून परता.

नंतर त्यात टोमॅटो घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगले परता. त्यात मटण घालून तूप सुटेपर्यंत परता.
ह्याला सहसा जास्त वेळ लागतो.

थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवा / मंद आचेवर प्रेशर कूक करा.

साखर व मीठ घाला.

तळलेले काजू आणि कोथिंबीर घालून बटर नान / कुलच्याबरोबर सर्व्ह करा.

DSC_0031 (2)_a.jpg

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार / कुवतीनुसार / पोटानुसार ;).
अधिक टिपा: 

मी रोगनजोश हा प्रकार ह्या पद्धतीने पहिल्यांदाच बनवला . घरी सर्वांना अतिशय आवडल्याने इथे रेसिपी शेअर करण्याचे धाडस करते आहे.

नॉन काश्मिरी अशासाठी की मूळ रेसिपी काश्मिरी आहे, ज्यात टोमॅटो नसतो.दही आणि वेलदोड्यांचे प्रमाण जास्त असते. तसेच सुंठ आणि केशर असते , जे ह्या रेसिपीत नाही म्हणून ही नॉन काश्मिरी रेसिपी.

मुलं खाणार असल्याने मी लाल मिरच्या अजिबात घातल्या नव्हत्या. त्यामुळे मटण तिखट नसले तरी संपूर्ण मसाल्याची चव अतिशय सुरेख आली होती.

माहितीचा स्रोत: 
लाजवाब मालिका - मटण - लेखिका सुधा मायदेव.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटत्येय पाकृ.... Happy

इथल्या गोर्‍यांना बीफ आणि लँब रोगन-जोश भारी आवडतं...

फोटो थोडा मोठा टाक की....

घरी मटण कोणी खात नाही त्यामुळे चिकन वापरून करुन बघेन वेळ असेल तेव्हा...

लाजो, फोटो और मेरा कुछ तो पंगा है. जास्त जवळून घेतला की साईझ फार जास्त होतेय, ती कमी करताना फोटो छोटा होतो. सोल्यूशन शोधायला हवे :).

अदिती - Happy , सर्व्ह करताना मसाला जास्त घातला गेलाय आणि मटण पीसेस दिसतच नाहीयेत :फिदी:.

सुमेधाव्ही - पुस्तकात तरी जोशच आहे, म्हणून तसंच इथे लिहिलं आहे :).

संपदा, खूपच इंटरेस्टिंग काँबिनेशन वाटले मसाल्यांचे त्यामुळे नक्कीच करुन बघणार. पण बहुतेक चिकन घालून करेन.
फोटो पाहून तोंपासु Happy

अहाहा!! रोटी सुद्धा मस्त दिसतेय :). सुधा मायदेवांच्या रेसिपीज खरंच मस्त आहेत. थँक्स टू हर :).

काल रोगनजोश केलं. प्रेशर कुक केलं नाही. स्लो कुकरात शिजवलं. चवीला अप्रतिम लागतं आहे असा रिपोर्ट आहे.

थँक्यू संपदा!