मला स्वच्छ भारतात राहायला आवडेल. तुम्हाला?

Submitted by सावली on 25 April, 2011 - 00:09

यावेळच्या भारतवारी मध्ये अशा अनेक गोष्टी दिसल्या त्याबद्दल काही बोलावसं वाटलं, काही करावसं वाटलं.
जास्त दिवस राहिल्याने गोष्टी जुन्याच पण नव्या दृष्टीने बघितल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी बोलावसं वाटूनही भिडेपोटी बोलता आलंच नाही.

असेच काही प्रसंग
गेल्यागेल्या रंग पंचमी होती. त्याची आठवण मात्र मला फार खराब प्रकारे झाली. दोन तीन दिवस आधीपासून रस्त्यावर, आजूबाजूला सगळीकडेच छोट्या छोट्या प्लास्टिकच्या फुटलेल्या पिशव्या आणि त्याभोवती पाण्याचे ओघोळ दिसायला लागले. आधी कळेना कि सगळीकडे हा असा कचरा काय आहे? पण मग रंगपंचमी जवळ आल्याचे कळले. आता पिशव्या टाकायच्या आणि मग पावसाळ्यात पाणी तुंबले म्हणून रडायचे!!

रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळीकडे रंगच रंग. रंगीत आयुष्य जगण्यासाठी अशा खोट्या रंगाची जरुरी असतेच का हा प्रश्न पडलाच.

नंतर आलं क्रिकेट. पाकिस्तान विरुद्ध आणि फायनल मॅच दोन्ही साठी बऱ्याच सोसायट्यामध्ये मोठे स्क्रीन लावून एकत्र मॅच बघायचे प्रोग्राम झाले. वा वा! छान त्या निमित्ताने सगळे लोकं एकत्र येणार! मग जेवणखाणेही झाले एकत्रच.
दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी सकाळी जाऊन बघितल्यावर खायच्या प्लेट्स, कागदी/ प्लास्टिकचे कप, फटाक्याचे तुकडे आणि त्याचा कचरा अशी घाण ! तीही स्वत:ची मुलं जिथे संध्याकाळी खेळतात त्या ग्राउंडमध्येच.

स्टेशन वर गेलो होतो काही कामासाठी. तिथे तर डोळे बंद करूनच चालायचे. रुळ आणि प्ल्याटफॉर्म दोन्ही अत्यंत गलीच्छ. आणि लोक अजून कचरा टाकतातच आहेत. कोणालाच काही वाटत नाही.

शाळा शोधनाचाही कार्यक्रम केला यावेळी. काही शाळा बघून त्याच्या गेटमधूनच परत आले. इतका कचरा, घाण आणि दुर्गंधी.

ज्युपिटर हॉस्पिटल म्हणून एक नवीन हॉस्पिटल झालंय. तिथे गेल्यावर आश्चर्य वाटावं इतकं स्वच्छं, सुंदर. कुठे साधी धूळ नाही. हॉस्पिटलचा टिपिकल वास नाही. मात्र टॉयलेट मध्ये गेले तर लोकांनी सगळे टिश्यूपेपर इतस्तत: टाकून पाणी सांडवून घाण केलेलं. तिथले मॅनेजमेंट साफ करत असणारच. बाहेर बघून ते कळतच होतं. पण आलेल्या लोकांना इतकीही जाणीव नाही कि इतक्या स्वच्छं ठिकाणीही आपण घाण करतोय.

आपले एअरपोर्टही बऱ्यापैकी स्वच्छ आहे आता. लोकांनी तिथेही कचरा टाकू नये अशी अपेक्षा होती. तिथे विमानाची वाट बघत असताना, एक अगदी चांगल्या स्थितीतले दिसणारया कॉलेजला जाणाऱ्या वयातल्या मुलामुलींचा ग्रुप आला. बराच वेळ बसले होते. जाताना विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या संपवून रिकाम्या बाटल्या अक्षरश: सीटवर फेकून निघून गेले. कचऱ्याचा डबा अगदी समोरच होता. पण एकानेही त्रास घेतला नाही त्यापेक्षा फेकण्यात जास्त मजा आली त्यांना. नंतर तिथे बसणाऱ्या लोकांची पर्वा वगैरे नाहीच पण कचरा फेकल्याची लाजही नाही. मागे जाऊन सांगावसं वाटलं पण पुन्हा तेच. तसं करता आलं नाही.

सोसायटी मध्ये सॅंडपिट आहे. तिथे खेळायला गेलो तर थर्मोकोल ते प्लास्टिक हा सगळा कचरा मिक्स. दुसऱ्या दिवशी मीच एक पिशवी घेऊन गेले सगळा कचरा उचलून भरून डब्यात फेकला. आणि थोड्या वेळानेच एक शाळेतली मुलगी आणि तिची आई आल्या. मुलीला खायला एक कसलातरी खाऊ आणला होता. त्याची पिशवी फाडून वरचे टोक तीथेच टाकले तिने. खाऊ संपल्यावर रिकामी पिशवीही तिथेच सॅंडपिट मध्ये ! आताच मी मूक पणे इथला कचरा उचलला होता. या मुलीलाही बोलायला हवं होतं पण माझा धीर झालाच नाही. पण जाणवलं कि नं बोलता केलं तर ते वाया जाणार. कचरा टाकू नये याची जाणीवही करून द्यायला हवी.

घरात असं करतात का? घर आरशासारखं स्वच्छं हवं मग बाहेर घाण का चालते? घरात फळांची सालं , रिकाम्या पिशव्या आपण खाल्ल्याठिकाणी टाकत नाही ना? मग बाहेर का टाकतात? कळत नाही म्हणून? चुकून? कचरा दिसत नाही म्हणून? काही कायदा , दंड नाही म्हणून? जाणीव नाही, दुसऱ्याचा विचार नाही म्हणून?

बहुतेक शेवटचं खरं असावं. पण एक व्यक्ती म्हणूण मला जाणीव असली तरी काय करता येईल? मी स्वत: कचरा नं फेकून , किंवा अगदी स्वत: साफ करूनही लोकांना जाणवणारच नसेल तर अजून काहीतरी करायला हवं. वर उल्लेखलेल्या प्रसंगी मला काही बोलताच आले नाही ही माझी चूक आहेही. पण एक व्यक्ती म्हणून प्रत्यक्ष न सांगता अजून काही मार्गांनी किंवा एक ग्रुप , संघटना म्हणून सांगणे सोपे जाईल का?

मला सुचलेली कल्पना अशी कि
एखादी वेबसाईट बनवून त्यावरून लोकांमध्ये जागरुकता वाढवायची. आजकाल बरेचजण इंटरनेट वापरतात. तर कधी ना कधी त्यांच्या कडून हे वाचलं जाईल. सारखं वाचलं गेलं तर कुठेतरी जाणीवही होईल. वेबसाईट हा एक प्लाटफॉर्म असेल तर त्या नावाखाली अनेक छोटे छोटे ग्रुप बनवून आपापल्या सोसायट्यामध्ये, आपल्या मुलांच्या शाळांमध्ये या बद्दल बोलता येईल. आणि एकटेपणी बोलण्याची भीड पडणार नाही. शाळा कॉलेज मधील मुलांना याची जाणिव करुन दिली तर मुळातुनच स्वच्छतेची आवड असणारी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असं मला मनापासुन वाटतं.

तुम्हाला काय वाटतं? अजून काय करता येईल? तुमच्या पैकी किती जणांना यात काही भाग घ्यायला आवडेल? तुमच्या पैकी किती जणांना स्वच्छ भारतात राहायला आवडेल?

विनंती: परदेशात आपलेच लोक कसे वागतात पण भारतात कसे वागत नाहीत वगैरे वाद जरा बाजूला ठेवून, आपल्याला काय करता येईल यावर चर्चा करायला आवडेल.

२६-एप्रिल- अपडेट
मी काय ठरवले आहे

  • - पुन्हा परत जाईन तेव्हा सोसायटी मध्ये ग्रुप तयार करून आधी सोसायटी मध्येच सफाई करणे आणि त्या बद्दल जाणीव निर्माण करणे.
  • - सो. मध्ये जे शिक्षक असतील त्यांच्याशी या बाबत बोलणे. त्यांना जाणीव करून देणे. * हे आधीच सुरु केले आहे.
  • - फेसबुकवर एक ग्रुप तयार केला आहे. http://www.facebook.com/idonotlitter या ग्रुप मधून थोडा अवेअरनेस कदाचित करता येईल.
  • - या ग्रुप मार्फत सेलेब्रिटीना ही फेसबुक अकाउंट असल्यास संपर्क साधता येईल
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वच्छता ठेवण्यासाठी सरकारलाही कचरापेट्यांची संख्या वाढवायला हवी आणि वेळोवेळी या कचरापेट्यांच्या सफाईकडे जातीने लक्ष दिले पाहीजे.

शक्य झाल्यास बस आणि रेल्वेमधेही कचराकुंड्या ठेवण्यात याव्यात.

प्रथम +१
तुमच्या यादीत रीक्षा, टॅक्सी इ पण हवे.
दर भारतवारीत जाणवते ती गोष्ट म्हणजे चटकन नजरेच्या ट्प्प्यात येतील अश्या कचराकुंड्या कुठे दिसत नाहीत. आहेत ते मोठे मोठे डंपस्टर जिथे पोचणे शक्य नाही इतकी घाण त्याच्या बाजूला असते. सतत प्लास्टीकची पिशवी सोबत ठेवावी लागते आपण केलेला कचरा जमा करायला. प्रत्येक दुकानाच्या दारात, प्रत्येक बस स्टॉप, आणि रस्त्यावर स्वच्छ हो स्वच्छ कचराकुंडी हवी जी कचर्‍याने भरून वहात नाही, तिच्या जवळ वास येत नाहीत. हे थोडे अवघड आहे करायला कारण भटकी कुत्री सगळा कचरा पसरवतात हे मी आमच्या कॉलनीत पाहीलय. सोसायटीने शेवटी कचराकुंड्या काढून टाकल्या. रोगापेक्षा इलाज जालीम. आता त्याने सगळी कॉलनीच उकंडा वाटते.
मला वाटते इथे कँपिंगसाठी जश्या कचराकुंड्या असतात ज्या अस्वलांना उघडता येत नाहीत तश्या कुंड्या हव्यात आपल्याकडे म्हणजे कुत्री कचरा बाहेर काढणार नाहीत.

स्व्च्छ भारत मोहिमेच्या अतंर्गत Adopt an Area or Adopt a highway सारख्या योजना आहेत का? संस्था, संघटना, कंपन्या, शाळा, नागरिक गट, हाउसिंग सोसायट्या इ. एखादा ठराविक परिसर दत्तक घेउन स्वच्छ व सुशोभित ठेउ शकतात.

प्रथम + १ . मी प्रवासात एक पाॅलीथीन घेते व डब्यातल्या सात जणांना त्यात कचरा टाकायला सांगते , वादविवाद टालते, हे अनुभवांती आलेलं शहाणपण ! प्लॅटफाॅर्मवर कचराकुंड्या फुड स्टाॅलच्या बाजूला ठेवलेल्या असतात तरी लोकं गाडीखाली कचरा टाकताना आढलतात. हेच द्रुष्य रिसेपशनमध्ये बाजूला, खुर्च्यांखाली प्लेटस, पाण्या/सूप कप इ. ....अगदी सुशिक्षीत लोकांमध्येही .

मंजू ताई: समजायला गेल्यास सुशिक्षित लोकच जास्त आर्ग्युमेंट करतात.

पण जास्त वाईट तेव्हा वाटते, जेव्हा शाळकरी मुले परिसरात कचरा करताना दिसतात.
इथेही एक गोष्ट करता येईल - आपल्या ओळखीच्या/ नात्यातल्या मुलांना सांगुन स्वच्छतेला व्हायरल करणे.

प्रथम - नक्की! आम्ही तीन-चार मैत्रिणी एका जिल्हा परिषदेच्या शालेत जातो दर शनिवारी दोन तास,, तिथे हा उपक्रम राबवतो.

मी आणि माझ्या नवर्याचा मीत्र सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याच्या मतावर ठाम आहोत तर माझा नवरा आणि त्याच मित्राच्या बायकोच म्हणणं आहे की मनपा सफाई कर्मचार्यांना त्याच कामाचे पगार मिळतात ( आणि आमच्या मुलांनी मस्तपैकी घरात पार्टीचा कचरा पसरवुन ऊत्तर दिलयं)

धार्मिक विचारांच्या बाबतीत युरोपमधील एखादा मोठा पंडितही हिंदुस्थानातील एखाद्या शेतकऱ्यापुढे पोरकट ठरेल; याच्या उलट युरोपमधील झाडूवाल्यासही सार्वजनिक कर्तव्याची व हक्काची जी जाणीव असते, ती आमच्याकडील मोठमोठ्या पुढारयांस व मुत्सद्यांसाही नसते.
आज ध्येयाची देवाणघेवाण करण्याची वेळ आली आहे. मानव जातीस आपल्या मुलांना तेच तेच धडे शिकवावयास अवसर नाही. मानवजातीची अशी अपेक्ष्या आहे की, पृथ्वीच्या एका भागात जो धडा तिने शिकविला तो जगातील इतर लोकांनी घ्यावा व आपलासा करावा. पौर्वात्य विचार पाश्चिमात्य जगाला लवकरच जिंकून घेणार यात शंका नाही; आणि पौवात्यांच्या विकासाला पाश्चिमात्य ध्येये व पद्धती येथे येऊन हातभार लावतील, ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे. एकमेकांनी एकमेकांस पूर्ण व्हावयास मदत करायची आहे. एकमेकांचे विशिष्टत्व नाहीसे करावयाचे नाही. पूर्व पश्चिमेस हात देईल व पश्चिम पूर्वेच्या मदतीस येईल. ईश्वराच्या या विश्वामंदिरात पूर्व व पश्चिम एकमेकांचे हात धरून प्रेमाने फुगडी घालतील.

भगिनी निवेदिता

जन्म - २४ ऑक्टोबर १८६७ (आयर्लंड)
हिंदुस्थानात आगमन - २८ जानेवारी १८९८
मृत्यू - १३ ऑक्टोबर १९११
(मला आलेली मेल)

पहिला पॅरा ,२०१४ सालीही लागू होतोय हे दुर्दैव!

नमस्कार सावली,

सर्व साधारण लोकांची मनोधारणा ( माईंड सेट ), बदलणे आवश्यक आहे.

आणि ह्या सर्वांची सुरुवात होणे आवश्यक.....काहे लोकांना असे स्वच्छता बाळगतांना पाहुन बाकिचे हळुहळु अनुसरण करु लागतीलच......वेळ लागेल , पण होणे शक्य आहे.

नमस्कार,

Pages