चारचाकी चालवणेः एक (भीषण) 'अनु'भव

Submitted by mi_anu on 23 September, 2014 - 13:56

वैधानिक इशारा : या अनुभवातील ठिकाणे, पात्रे, घटना व संवाद काल्पनीक नाहीत आणि या अनुभवाशी साधर्म्य दर्शवणारी एक चालक रस्त्यावर चारचाकी चालवताना दिसल्यास चालकाच्या मन:स्थितीनुसार चारचाकीचा ब्रेक/वायपर/इंडीकेटर/भोंगा कधीही चालू शकतो याची नोंद घ्यावी आणि त्याचा रस्त्यावरील स्थितीशी मेळ घालून मागील चालकाने स्वतःच्या जवाबदारीवर योग्य तोच निर्णय घ्यावा.

॥ वाहन प्रशिक्षक उवाच ॥
"काय म्याडम! अशा हळूहळू मागे बघत ष्टेरिंग फिरवत राहिल्या तर युटर्न घेईपरेंत पेट्रोल टँकी खाली होणार. आस्सा हात ष्टेरिंग वर अल्लाद, आस्सं ष्टेरिंग गच्च न पकडता नुस्ता वर हात वर सरळ ठेवून आस्सं गर्रा गर्रा फिराया पायजेल ष्टेरिंग !! घ्या परत अश्शी मागे आणि टाका परत युटर्न !मी एक सेकंद व्हॉटस्शॅप करून घेतो. "

(स्वगतः गर्रा गर्रा?? भिंगरी आहे का ती? का सुदर्शन चक्र? आणि स्टिरींग हाताने पकडायचं नाही? नुसता वर सपाट हात? अतीच करतो हा बारक्या ! घरी काय सपाट हात नुसता पोळीवर ठेवून पोळी तोडतो का? मी इथे हिंजेवाडी चौकात गाड्यांच्या अथांग महासागरात युटर्न घेणार आणि हा शहाणा व्हॉटसऍप बघणार म्हणे.)

॥ पती उवाच ||
"अरे जरा बघून सांग ना मी दुसरा टाकलाय का चौथा."
"तुला कळत नाही? प्रत्येक ठिकाणी मी असणार आहे का? "
"आता सांग, प्रत्येक ठिकाणचं नंतर बघू."
" केस विंचरताना स्वतःचा हात दुसऱ्याला शोधून द्यायला सांगशील का?"
" यु आर कंपेरिंग ऍप्प्ल्स टु ऑरेंजेस हां !! तुला महत्त्वाचं काय आहे? गाडी बंद न पडणं की बायको किती मूर्ख आहे हे सिद्ध करणं? "
"सिद्ध करायची गरज आहे का? "
"ठीक आहे. तू नवरा म्हणून मला गाडी चालवायला मानसिक आधार देत नाहीस. आता जे होईल त्याची जावाबदारी तुझी. "
"अगं ..., अगं, पुढे बघ.. वॉटर टँकर ला ठोकशील. बाजूला घे !!!!!! "
"मी का घेऊ? त्याला सांग रस्त्याच्या चुकीच्या बाजूने मध्ये नको घुसू म्हणून "
"ओ दादा, सकाळच्या ट्रॅफिकमध्ये गाडी राँग साईडने काय घालताय? नगरसेवकाचं ऑफिस आहे समोर. कंप्लेंटच करतो आता. घ्या ट्रक बाजूला. "
""हॅ हॅ हॅ.... कंप्लेट करता का साहेब..करून टाका.. नगरशेवक सरांच्याच कंपनीचा हा ट्यांकर . "

॥ सहप्रवासी उवाच ॥
"ओ मॅडम दिमाग खराब है क्या? ४० के स्पीड मे डायरेक्ट ब्रेक? मरवाओगे एक दिन. खाली रास्ते पे क्यों नही चलाते ? "
"जिंदगीभर खाली रास्ते पर चलाऊ ? कभी ना कभी तो ट्रॅफिक एक्स्पोजर लेना होगा ना? "
(आता यात नाक उडवून कपाळावर हात मारून जोरात पुढे निघून जाण्यासारखं काय बोलले?)

॥ नातेवाईक उवाच ॥
" सोपं असतं. पुढच्या आरशात मागची काच बघत रहायची, बाजूचे आरसे पुढच्या आरश्यात दिसतात, त्यासाठी वाकून बघायची गरज नसते. आणि हे सर्व जोडधंदा म्हणून. पुढे नेहमी बघत रहायचं. आणि कंट्रोल्स मध्येच बघायचे, पुण्यात गाडी चालवणार असाल तर राँग साइडने जाणारे दुचाकीवाले, हातगाडीवाले, कुत्रे आणि म्हशी यांच्या वर एक डोळा ठेवायचा. इतकं झालं म्हणजे जमलंच. "
( हा सहस्रनेत्र इंद्र आहे का? इतक्या ठिकाणी बघायचं ?? )
" पण इतक्या ठिकाणी एकावेळी लक्ष कसं देता येणार? "
" हे मी नेहमी गाडी चालवणाऱ्यांचं सांगितलं हो!! तुमच्यासारखे काय, महिन्यातून एकदा रिकाम्या रस्त्यावर दोन किलोमीटर गाडी चालवणार आणि बाकी वर्षभर 'हल्ली नाही आणत गाडी. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात आपला वाटा नको का? ' वगैरे वल्गना करणार"
(कोण आहे रे तिकडे? या सत्याचे प्रयोग करणाऱ्याला लक्ष्मी रोडवर नवरात्राच्या आधीचा रविवार इनोव्हा चालवण्याची शिक्षा द्या रे ! )

॥ पती उवाच ॥
" लाव, आणि वाट लाव त्या गाडीची. दुसऱ्या गिअरवर मोकळ्या रस्त्यावर गाडी कोणी चालवली होती का? "
" आता दोन किलोमीटरवर वळण आहे तिथे परत पहिला करावा लागणार. मला सारखे सारखे गिअर बदलायला आवडत नाही. "
" ठिकाय. पहिल्यावरच चालव. रोज क्लचप्लेट बदल. मी काय बोलणार? माझी जागा फक्त ड्रायव्हर ची. "
" पाच हजार महिन्याला पगार देईन. माझ्याजवळ रोज गाडी चालवताना बसायचं आणि लग्ना आधी वागायचास तशा प्रेमाने चुका सुधारायच्या."
" दहा हजार देतो. स्वतः गाडी चालवायची, मी जवळ बसणार नाही, बसलो तर भरपूर शिव्या घालेन त्या ऐकायच्या, स्वतः पेट्रोल टाकायचं, स्वतः सर्व्हिसिंगला न्यायची. "
( ओक्के ऍलिगेटर ! युवर बॅक इज सॉफ्ट!! नाऊ शाल वी गो अहेड? हेल्पलेस हरी, होल्डिंग फीट ऑफ हॉर्स! (पतीव्रता हो मी! मनात तरी नवऱ्याला गाढव कसे म्हणेन? ))

॥ अनू उवाच ॥
" मी ना, अमेरिकेला जाणार आणि तिथे गाडी चालवणार. "
" बापरे, मी ओबामाला मेल लिहून ठेवू का? अमेरिकेला उलटं असतं सगळं. डाव्याबाजूला स्टिअरिंग असतं. नाहीतर घुसशील चुकीच्या बाजूला. "
" डॅम इट ! मी इंग्लंडला जाईन. तिथे गाडी चालवेन. बघच तू. येताना मुंबईहून स्वतः येईन बस चालवत. "

॥ सहकारी उवाच ॥
" अरे ते बजरंग मोटर कंपनीवाले शिकवतात गाडी चालवायला. त्यांच्याकडे सिम्युलेटर पण आहे. "
" झालं !! म्हणजे कॉंप्युटरवर बसून गाडी शिकणार? उद्या व्हिडिओ गेम खेळून विमान शिकशील. "
" अरे बाबा सगळा वेळ सिम्युलेटर वर नाही .. एक सिम्युलेटर, एक रस्ता, एक थिअरी असे.. आणि ऑटोमॅटिक गाडी घेणार. म्हणजे गिअर बदलायचा त्रासच नको."
" आम्ही नाही शिकलो हो सिम्युलेटर फिम्युलेटर वर !! सगळा पैसे कमावण्याचा वाह्यातपणा आहे.. तुझ्याकडे जास्त झालेत पैसे. "

॥ बाळ उवाच ॥
" आई आता आपल्याला घाई आहे ना? आता तू नको चालवू गाडी. आपण आपटलो तर? त्या चेन्नै एक्सप्रेस मध्ये कशा गाड्या उडाल्या होत्या? मग गाड्या उडतील, रक्त येईल, डॉक्टरकडे जायला लागेल."
(शुभ बोल गं नारी!! )
" नाही गं बाळा, आता तूच शिक छान गाडी पंधरा वर्षानी. तोपर्यंत रस्ते सुधारतील, माणसं सुधारतील, गाड्या सुधारतील, नवरे सुधारतील, तेव्हा तूच आईला फिरव गाडीतून. मी आपली आता रोज दोन किलोमीटर ऑफिसला जाईन तू शाळेत गेल्यावर. "

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ! " आता दोन किलोमीटरवर वळण आहे तिथे परत पहिला करावा लागणार. मला सारखे सारखे गिअर बदलायला आवडत नाही. " >>> अगदी माझा (तुटपुंजा ) अनुभव आठवला भारतात गाडी नुकतीच शिकले होते तेव्हाचा Lol तरी चढावर थांबावं लागणे, हाफक्लच वगैरे नाइटमेअर्स नाही लिहिलीस ! Happy
एक बारीक उंचवटा चढून पेट्रोल पंपाच्या आत गाडी घेण्याच्या प्रयत्नात मी आणि "ओ म्याडम, टाका फस्गियर आन घ्य फुडं चटदिशी, गाड्या खोळांबल्यात मागं!" इति पेट्रोल पंपावरचा माणूस !! Happy

मस्त लिहिले आहेस . अगदी आमचे संवाद आहे असे वाटले .
माझा नवरा पण असाच बोलत असतो . [तरी मी चांगली कार चालवते असे मैत्रिणींचे आणि मुलाचे मत आहे Happy ]
आता तर म्हणतो तू चालव मी घरी थांबतो !

,मस्त लिहिलंय.

सहा महिन्यांपूर्वी हेच सगळे ऐकत होते पण आता गाडी यायला लागली हो.

तर.... प्रयत्न सोडायचे नाहीत.

नवर्‍याकडुन गाडी चालवायला शिकायच टाळावे , गाडी आधी डिव्होर्स यायची शक्यता जास्त असे एका अमेरिकन कलीगचे मत Happy

ओक्के ऍलिगेटर ! युवर बॅक इज सॉफ्ट!!

हेल्पलेस हरी, होल्डिंग फीट ऑफ हॉर्स!

>>>>> Lol

मस्त लिहिलंय. सगळे उवाच एकदम सह्ही!!!

नवर्‍याकडून गाडी न शिकल्याने मी फारच शेलक्या अनुभवांना मिसले की काय..
ललिचा लेख आणि हा लेख वाचून क्लच-गिअर वगैरे लोकांना अवघड वाटते हे मला समजले होते.. Happy

मस्त . पति उवाच बर्याच गोष्टीन्चा अनुभव .

आता दोन किलोमीटरवर वळण आहे तिथे परत पहिला करावा लागणार. मला सारखे सारखे गिअर बदलायला आवडत नाही. " >>> भन्नाट !

नवर्‍याकडुन गाडी चालवायला शिकायच टाळावे , गाडी आधी डिव्होर्स यायची शक्यता जास्त असे एका अमेरिकन कलीगचे मत >>> अगदी पटल .

एक्दा रात्री , मोकळ्या मैदानात गाडी चालवयची प्रॅक्टिस चालु होती .
नवरा इतके वेळा खेकसला की मी १५ मिनिटाच्या वर चालवू शकले नाही .
आणि प्रत्येक वेळेला , "अग , गाडीला काही झालं तरी चालेल पण कोणा माणसाला ठोकलस तर काळजी " अस साळसूद्पणे .

आमच्याकडे उलट झालेलं!! मी बाजूला आणि नवरा नवशिका असं Happy अर्थात पुरुषांना ह्या गोष्टी आपोआप येतात बहुतेक Happy एवढं शिकवावं नाही लागत Happy

Pages