" मला माहीत नाही"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 15 September, 2014 - 10:49

श्वास नुसता घेत आहे पण मला माहीत नाही
जीवनातिल एक माझा क्षण मला माहीत नाही

पाच खोल्या फ्लॅट गाडी घेतले भावी पिढीला
पण तिला देऊ कसे अंगण मला माहीत नाही 

झाकल्या हासून हृदयातील जखमा पण लपावा 
चेह-यावरचा कशाने व्रण मला माहीत नाही 

कारणाविन एकही नाही घडत कसला बदल पण 
मी असा झालो कसा कारण मला माहीत नाही

लोक येण्या सांत्वनासाठी असावे दु:ख पदरी 
हे कुण्या कैलासचे धोरण मला माहीत नाही 

---डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारणाविन एकही नाही घडत कसला बदल पण
मी असा झालो कसा कारण मला माहीत नाही

लोक येण्या सांत्वनासाठी असावे दु:ख पदरी
हे कुण्या कैलासचे धोरण मला माहीत नाही <<<

आवडले.

वा! शेर आवडले. (पाचच असल्याने मी अनेक असा शब्दप्रयोग केला नाही Happy )

*** मात्र, तुमच्यावर यतीभंगाचा आरोप कोणी केला नाही, हे फार चांगले झाले. त्यामुळेच वाचताना मजा आली.

तरी, एक सुचवू का?

मतल्यामध्ये ''एक'' असा शब्द वापरला आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे हे लक्षात आल्यावर ''एक'' म्हणजे 'एकही'' असे कळते. मात्र ते पूर्णपणे जर मतल्यात उतरले असते तर आणखी मजा आली असती असे वाटते. ह्रस्व - दीर्घ जाऊ देत.

जीवनातिल एकही का क्षण मला माहीत नाही
किंवा
जीवनामधलाच माझ्या क्षण मला माहीत नाही

असे आपले सुचले.

धन्यवाद.

अगदी बरोबर आहे अजय जी.

जीवनातिल एक "माझा" क्षण मला माहीत नाही.

असे करावे का?

बाकी आपल्या पर्यायान्वर विचार करतो आहे.