वादळ

Submitted by संतोष वाटपाडे on 21 September, 2014 - 00:21

काल दुपारी सुटले होते वादळ थोडे
त्यात उडाले जीर्ण घराचे कुचके आढे
सगळ्या भिंती लपून बसल्या दारामागे
दरवाजे पण घेतच होते आढेवेढे...

वादळ भटकत होते जेव्हा घरात सार्‍या
खिडकीवरच्या जाळ्या दिसल्या थरथरणार्‍या
कोळ्यांनी विणलेले जाळे तुटले जेव्हा
माळ्यावरती लोंबत होत्या काही दोर्‍या...

उदास पडवी भकास सारा दिवाणखाना
वाटेमध्ये शांत वरांडा केविलवाणा
पायाखाली तुडवत माती जमिनीवरची
वादळ फ़िरले त्यांचे अश्रू कोसळताना..

एक ठिकाणी पंखा लटकून होता काळा
ज्यावर चिमण्या भरवित होत्या त्यांची शाळा
पात्यांवरचे गवत निसटले वादळ येता
साठवताना चिमण्या थकल्या अनेक वेळा...

मेजावरती कागद कोरे निश्चल पडले
जन्मापासून रोज मनातच होते कुढले
अस्फ़ुट कविता लेख निनावी कच्च्या गजला
भिजरे भित्रे कागद पाहून किंचित रडले..

वादळ जेव्हा आल्यासरशी परतून गेले
भेदरलेले घरटे मटकन खाली बसले
डोक्यावरचे छप्पर सारे जरीही तुटके
स्मित तरळले चेहर्‍यावरती त्याच्या कसले..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्कृष्ट भावनिक हिंदोळे!

सेकंडलास्ट बंध फारच आवडला.

खालील ओळी सुपर्बः

जन्मापासून रोज मनातच होते कुढले

दरवाजे पण घेतच होते आढेवेढे...

ज्यावर चिमण्या भरवित होत्या त्यांची शाळा

साठवताना चिमण्या थकल्या अनेक वेळा...

(ह्यापुढे तुमची प्रत्येक रचना मन लावून वाचायची इच्छा उत्पन्न झाली आहे). धन्यवाद!

-'बेफिकीर'!

धन्यवाद रुचीपुर्ण अभिप्रायाबद्दल..... तुमच्या गजलांमधे ज्याप्रमाणे नेहमीच काही आगळेवेगळे वाचायला मिळते तसेच काही वृत्तबद्ध कवितांतून करावे असा प्रयत्न करण्याचा मनसुबा आहे....... _/\_

>>>तसेच काही वृत्तबद्ध कवितांतून करावे असा प्रयत्न करण्याचा मनसुबा आहे<<<

वृत्तबद्धतेबाबत दक्षता पाळायची असल्यास र्‍हस्व दीर्घाकडे व वृत्ताकडे बघावे लागेल मात्र! Happy

(वरील कवितेत काही ठिकाणी र्‍हस्व दीर्घ बदलावी लागतील वृत्तासाठी)

वा ! छान कविता.

"कोळ्यांनी विणलेले जाळे तुटले जेव्हा
माळ्यावरती लोंबत होत्या काही दोर्‍या..."

"मेजावरती कागद .......किंचित रडले.."

या ओळी सर्वात विशेष वाटल्या.

वादळ जेव्हा आल्यासरशी परतून गेले
भेदरलेले घरटे मटकन खाली बसले
डोक्यावरचे छप्पर सारे जरीही तुटके
स्मित तरळले चेहर्‍यावरती त्याच्या कसले..
>>>
सुंदर