उध्वस्त

वादळ

Submitted by संतोष वाटपाडे on 21 September, 2014 - 00:21

काल दुपारी सुटले होते वादळ थोडे
त्यात उडाले जीर्ण घराचे कुचके आढे
सगळ्या भिंती लपून बसल्या दारामागे
दरवाजे पण घेतच होते आढेवेढे...

वादळ भटकत होते जेव्हा घरात सार्‍या
खिडकीवरच्या जाळ्या दिसल्या थरथरणार्‍या
कोळ्यांनी विणलेले जाळे तुटले जेव्हा
माळ्यावरती लोंबत होत्या काही दोर्‍या...

उदास पडवी भकास सारा दिवाणखाना
वाटेमध्ये शांत वरांडा केविलवाणा
पायाखाली तुडवत माती जमिनीवरची
वादळ फ़िरले त्यांचे अश्रू कोसळताना..

एक ठिकाणी पंखा लटकून होता काळा
ज्यावर चिमण्या भरवित होत्या त्यांची शाळा
पात्यांवरचे गवत निसटले वादळ येता
साठवताना चिमण्या थकल्या अनेक वेळा...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उध्वस्त