साधना ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 August, 2014 - 13:32

तुला भेटू तरी कसे
मज काहीच कळेना
जन्म चालला उगाच
मज थांबणे घडेना |

ही वाट जन्मांतरीची
कि आताच चालण्याची
कोडे सुटेना काहीच
भूल नकळे कश्याची |

तुवा मानुनी सर्वस्व
जीव ओतला सगुणी
केले सायास कितीक
काही येईना घडुनी |

सत्य सांगतात इथे
हात उभारुनी कुणी
खरे मानावे ते कसे
न ये डोळा जे दिसुनी |

दाह अंतरात असा
मज जाळे दिनरात
वाट सोडूनी धावतो
कुठकुठल्या वनात |

जरी रंगतो जगाच्या
कधी सुख सोहळ्यात
भोग भोगतांना उर
तळमळे अंतरात |

ग्रंथ वाचले अपार
माथी बांधीयला भार
ज्योत पेटलीच नाही
तेल ओतले अपार |

जाता संताना शरण
आड आला अभिमान
सूर्य भजता म्हणता
भिते चटक्यांना मन |

वेडी आस पूर्णत्वाची
कशी कुणाला कळावी
घडे टवाळीच घरी
दारी फजितीच व्हावी |

त्याग घडता घडेना
भोग परंतु जमेना
अशी अंतरी बाहेरी
घडे माझी सारी दैना |

कधी सोडूनी पाहीले
परि सुटलेच नाही
विष रक्तात भिनले
ओठ शमलेच नाही |

गेलो शरण कुणाला
झाले तेही अहंकारी
दान दिले मंत्रासाठी
कर्म चक्क व्यवहारी |

यत्न सारेच खुंटले
मार्ग सारेच अंधारी
आलो वळूनी अंतरी
पुन्हा तुझ्याच मी दारी |

होई कृपेची दामिनी
टाक खंडित करुनी
तुटो अस्तित्व हे जड
जन्ममरण टोचणी |

नच जगण्याची क्षिती
नच मरणाची भिती
काही कळावे फक्त
मोल जीवनाचे हाती |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्तता छानच उतरलीये कवितेत ..

सगळी कडवी जोडून आली आहेत - ती एण्टर कळ दाबून जरा सुटी सुटी करणार का ? - वाचायला खूप सोयीचं होईल मग ..

सत्य असत्याशी मन केले ग्वाही - ही तुकोबांची उक्ति आठवली.

तसेच "कृपाळुपणे अल्प धारिष्ट पाहे" - ही समर्थांची उक्तिही..

धन्स

thanks kavita

जाता संताना शरण
आड आला अभिमान
सूर्य भजता म्हणता
भिते चटक्यांना मन |

वेडी आस पूर्णत्वाची
कशी कुणाला कळावी
घडे टवाळीच घरी
दारी फजितीच व्हावी |
>>>
सुंदर .
साधना करतानाचे प्रोब्लेम्स आणि अस्वस्थ मन ह्याचं छान वर्णन केलंय

सुंदर रचना! Gr8 poem. Reads like 'an Agnostic’s Lament...'

Are you seeking god, … or a good lover? Better latter!

त्याग घडता घडेना
भोग परंतु जमेना

दोन्हीवर एकाच उपाय. 'Viagra' ट्राय करा.
घाब्रू नका! प्रत्येक सजीव जन्मजात नास्तिकच असतो!
अगदी व्हायरस पासून सस्तन व्हेलमाशा पर्यंत!
भटुकड्य़ा-पादरी-मुल्लांनी फशी पाडलेल्या आयबापांनी
अंधश्रद्धेचं जोखड नकळत्या वय़ातच गळ्यात-लंगोटीत अडकवलेलं असतं.
आपण मनाचं कवाड सताड उघडून 'स्वभावे, स्वस्थानी, 'स्वगृही' परत' आला आहात,
हे थोड्यांनाच साधतं. अभिनन्दन!
=
Now enjoy your 'GEMS LIFE' without having to carry any burden of blind-faith!
GEMS Life = God-free Eco-friendly Moral-ethical & Self-reliant Life, interesting, fun & exciting
Wink

वाटसरड्या तू जन्माला आलायेस म्हणजे नक्की काय झालंय? डोक्यावर पडला आहेस वाटतं . तुझ्या आयुष्यात अशी एखादी घटना घडलेली दिसतेय ज्यामुळे तू देवावर इतका रागावला आहेस . जा बाबा जरा मानसोपचार तज्ञाला ला दाखवून ये .
Admin ने वाटसरडा ह्या id ला धार्मिक ग्रुप मध्ये प्रवेश देवू नये .

आदरणीय वाटसरडाजी
तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो, तुम्हीही तेवढेच जरा करायचा प्रयत्न करा नि तुमची नास्तिकपणाची रिक्षा अशी जिथे तिथे फिरवू नका बुवा!!

सुंदर.

ही निराशा कुणालाच चुकली नाही. तेल ही गेले तूप ही गेले असा हा भाव असूनही परत त्याच्याच चरणाशी लीन व्हावेसे वाटते. दुसरे काही करावेसे मनातसुध्दा येऊ शकत नाही. शरणागतीची सुरवात नेहमी याच भावातून होत असते व उत्तरोत्तर वाढतच जाते. असो.

खूप छान वाटले.