सर्व्हे रिपोर्टः विभाग- आरोग्य

Submitted by संयोजक_संयुक्ता on 24 August, 2010 - 06:14

या विभागात १३ प्रश्न होते आणि त्यातील एक वगळता सर्व अनिवार्य होते. महिलांची स्वत:च्या शारीरिक/मानसिक आरोग्यविषयक जागरूकता या भोवती सर्व प्रश्न योजले होते.

हा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.

  • पाळी, सेक्स, गर्भधारणा याबद्दलची शास्त्रीय माहिती कुठून मिळाली ?

    या प्रश्नाला उत्तर देताना एकापेक्षा जास्त पर्याय निवडता येणे शक्य होते. एकूण पाच पर्याय असल्यामुळे एकूण ३१ प्रकारे पर्यायांची निवड करणे शक्य होते. पैकी २३ प्रकार निवडले गेले.

    मैत्रिणींनी निवडलेल्या सर्व पर्यायांकडे एकत्रित पाहता, सर्वात जास्त वेळा निवडल्या गेलेल्या पर्यायानुसार 'वडिलधार्‍या व्यक्तींकडून' हा पर्याय सर्वात जास्त वेळा निवडला गेला.

    Source of Information.JPG

    मैत्रिणींनी निवडलेल्या पर्यांयांकडे दुसर्‍या प्रकारे पाहता खालील चित्र दिसून येते:

    Source of Information.jpg

    • १ पर्याय निवडणार्‍या ३८%
    • ५ पैकी २ पर्याय निवडणार्‍या ४१%
    • ५ पैकी ३ पर्याय निवडणार्‍या १७%
    • ५ पैकी ४ पर्याय निवडले आहेत २.५%
    • पाचही पर्याय फक्त एकीनेच निवडले आहेत.
  • वरील मिळालेली माहिती कितपत शास्त्रीय होती/ समाधानकारक होती?

    Untitled.jpg

    अभारतीय वंशाच्या सर्व मैत्रिणींनी "more or less" हे उत्तर दिलेले आहे.

  • संततीनियमनासाठी यापैकी कुठला पर्याय वापरता?
    • गोळी: १०.६% मैत्रिणींने हा पर्याय निवडला. यात सध्या भारतात स्थित २, भारताबाहेर स्थित ११. यामध्ये ४५% अभारतीय वंशाच्या आहेत.
    • पुरूष गर्भनिरोधक: ३८.५% म्हणजेच बहुतांश मैत्रिणींनी हा पर्याय निवडला आहे. सध्या भारतात स्थित १८ आणि भारताबाहेर स्थित २९. यात एकही अभारतीय वंशाची स्त्री नाही याकडे विश्लेषक म्हणून आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.
    • कॉपर टी आणि तत्सम स्त्री गर्भनिरोधक: ७% भारत आणि भारताबाहेर स्थित असलेल्यांचे प्रमाण जवळजवळ सारखे.
    • वापरत नाही: १६.३%
    • नैसर्गिक नियमन: ७.३%
    • ७२ तास सारख्या गोळ्या: हा पर्याय निवडला गेला नाही.
    • अजून नाही: ११.५%

    दोन किंवा जास्त पर्याय निवडल्याचं प्रमाण लक्षणीय नाही.

  • तुम्ही कधी MTP (Medical Termination of Pregnancy)/वैद्यकीय गर्भपात करुन घेतलाय का? असल्यास किती वेळा?

    ह्या प्रश्नाचे ८१% मैत्रिणींनी उत्तर"नाही" असे दिलेले आहे.
    १७% मैत्रिणींनी "हो" असे नमूद केले आहे. होकारार्थी उत्तरं दिलेल्यांपैकी बहुतांश जणींनी एकदा, एकीने दोनदा आणि एकीने तीनदा वैद्यकीय गर्भपात केल्याचे नोंदवले आहे. यापैकी ६०% सध्या भारताबाहेर स्थित असून ४०% सध्या भारतात स्थित आहे. यात फक्त एका अभारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे. हा प्रश्न ज्या प्रकारे विचारला गेला होता, त्यावरुन सविस्तर उत्तरे हवी आहेत हे स्पष्ट होत नाही. तरीही कारणं नमूद केली गेली आहेत.

    - 'भ्रुणात गंभीर व्यंग असल्याचं निदान झाल्यामुळे' आणि 'बाळात जेनेटिक दोष होता,त्यामुळे माझ्या हेल्थ ला देखील धोका होता म्हणुन'.

    ठोस निष्कर्ष काढण्याइतपत आपल्याकडे माहिती नसली तरीही भारतीय वंशाच्या स्त्रियांमध्ये वैद्यकिय गर्भपाताचे प्रमाण लक्षणीय दिसून येते इकडे विश्लेषकचमू आपले लक्ष वेधू इच्छितो. या गर्भपातामुळे होणारे काही गंभीर शारीरिक/मानसिक परिणाम या सारखी माहिती आपल्याकडे नाही.

  • पहिला शारीरिक लैंगिक अनुभव वयाच्या कितव्या वर्षी घेतला? पहिला शारीरिक लैंगिक अनुभव तुमच्या संमतीने होता का?
    • २४ व्या वर्षानंतर ५१ %
    • २० - २४ वर्षांच्या दरम्यान ३८% (अभारतीय वंशाच्या स्त्रियांपैकी ५०% स्त्रियांचे प्रमाण)
    • १८ - २० वर्षांच्या दरम्यान २%
    • १५ - १८ वर्षांच्या दरम्यान ४%
    • अजून घेतला नाही - ४%

    संमतीबाबत सर्व होकारार्थी उत्तरं आलेली आहेत. प्रश्नावलीत राहून गेलेल्या त्रुटीमुळे 'अजून घेतला नाही' हा पर्याय उपलब्ध नव्हता.

  • मुभा दिल्यास बाह्यरुपात काय बदल करायला आवडतील ?
    • वजन -
      सर्वाधिक म्हणजे ४६% मैत्रिणींने निवडले. यात "वजन कमी करणे " याला बहुमत आहे, तरी वजन वाढवायला आवडेल अशाही काही मोजक्या प्रतिक्रिया आहेत.

      वजन (जरासं/ खुप/ काही किलो) कमी करायला आवडेल, 'बारिक व्हायला आवडेल', सुटलेलं पोट कमी करायला आवडेल, प्रामुख्याने मराठीत 'सडपातळ व्हायला आवडेल' हा शब्दप्रयोग केला गेला, तसेच "फिट राहण्यासाठी" वजन कमी करायला आवडेल असे (तुरळक) नमूद केले गेले.

    • सौंदर्य -
      ३९% मैत्रिणींने सौंदर्य/बाह्यरुपातील बदल करायला आवडतील असे नोंदवले आहे. 'गोरा' रंग/ 'फक्कं गोरा रंग, त्वचा/कांती (नितळ, मुरुमविरहीत, सुरकुत्याविरहीत), केस ( लांब/रेशमी/ कुरळे/ सरळ/ दाट/वेगळ्या रंगाचे/ कमी पांढरे (जास्त काळे)), डोळे (चष्मा नको), उंची (थोडी जास्त/ थोडी कमी), सुंदर दिसणे/जास्त आकर्षक दिसणे/नाकीडोळी नीटस असणे, नाक सुंदर असणे, शरीरावरची लव कमी असणे, सौंदर्यसंवर्धनासाठी वेळ मिळणे, पेहराव नीटनेटका असणे, मॅनिक्युअर्ड नखं इत्यादी नोंदवले आहे.
    • फिटनेस/सुदृढ आरोग्य-
      २२ % मैत्रिणींनी (स्ट्राँग/ आरोग्यपूर्ण/ सुदृढ), व्यायामाला अधिक महत्त्व देणे, जास्त स्टॅमिना/ जास्त उर्जा, निरोगी शरीर असे नोंदवले आहे.
    • काहींनी मानसिक आरोग्य, आनंद, संयम, निरोगी डोळे, निरोगी दात, मानेचे/पाठीचे/पायाचे विकार नसणे, प्रजनन संस्थेचे विकार नसणे, थायरॉईड/हायपरथायरॉईड नसणे, संधीवात नसणे, खाण्याच्या सवयी बदलणे इत्यादी नमूद केले आहे.
    • ८% मैत्रिणींनी कसलाच बदल नको असल्याचे नोंदवले आहे.खास करुन बाह्यरुपात कसलाही बदल करु इच्छित नाही, मी जशी आहे तशी मला आवडते.
  • टॉप ३ आरोग्यविषयक चिंता:

    योग्य वर्गीकरणासाठी, उत्तरांच्या विश्लेषणात कमीतकमी ५ या संख्येने नोंदवल्या गेलेल्या व्याधीच समाविष्ट केल्या आहेत.

    • वजन/ जाडी (५०%)
    • प्रजननसंस्थेचे आजार- (१६%) पाळीचे विकार, अनियमीत पाळी, वंध्यत्व, Severe Premenstrual Syndrome (PMS), Early Menopause, Menopause, Polycystic Ovarian Disease (PCOD), बाळंतपणानंतरचे विकार, Fibroids.
    • नैराश्य (१६%) आणि मानसिक व्याधी- चिडचिड, स्ट्रेस, काळजी करणे.(हे नोंदवलेल्या स्त्रियांपैकी एकही स्त्री परदेशी वंशाची नाही हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.)
    • पाठीचे, मानेचे, मणक्याचे विकार (८%)
    • अ‍ॅनिमिया (५%)
    • मधुमेह (४%)
    • हृदयाचे विकार- High Cholesterol, High Triglycerides Count, हृदयाचे विकार, उच्च किंवा कमी रक्तदाब- (१४%)
    • डोकेदुखी, अर्धशिशी- (४%),
    • पित्तप्रवृत्ती (६%)
    • थायरॉईड, हायपरथायरॉईड- (६.५%)
    • काहीच नाही (९%)
  • गर्भधारणा, गर्भारपण, प्रसुती, दत्तक पालकत्व यामधील काही वेचक आठवणी सांगा.

    या प्रश्नाला ४५ विस्तृत उत्तरं आली. एकंदरीत मैत्रिणींनी हा अनुभव एकमेवाद्वितीय असल्याचे निश्चित नोंदवले आहे. त्यातल्या कडु गोड आठवणी लिहील्या आहेत. ज्या मैत्रिणींचे गर्भारपणातील अनुभव चांगले नाहीत, त्यांच्यात नैराश्य ही नोंद आधीच्या उत्तराला केलेली आढळते.

    ३० जणींनी हा अनुभव एकंदरीत आनंददायी असल्याचे नोंदवले आहे, ७ जणींनी काही ना काही कारणांनी हा अनुभव तितकासा आनंददायी नसल्याचे नोंदवले आहे. एकूण १४ जणींना गर्भारपणात, त्याआधी किंवा जन्म दिल्यानंतर शारीरिक/मानसिक व्याधींचा सामना करावा लागला- यातील सर्व जणी भारतीय वंशाच्या आहेत. ५ जणींनी फक्त आपली मातृत्व/गर्भधारणेसंबंधी मतं नोंदवली आहेत. काहींने मूल न होऊ देण्यामागील कारणमीमांसा नोंदवली आहे. दत्तक पालकत्वाबाबत २ प्रत्यक्षानुभव आणि ३ मानस नोंदवले गेले आहेत. दुसरे बाळंतपण पहिल्याच्या तुलनेत चांगले गेल्याच्या प्रतिक्रियाही नोंदवल्या गेल्या आहेत.

    - गर्भारपणात नवर्‍याने घेतलेली काळजी आणि प्रसुतीच्या वेळेस त्याचे जवळ असणे हे खूप धीर देणारे होते.

    - गर्भधारणा लगेच झाली म्हणुन ते एक tension गेले. काहीच डोहाळ्याचा त्रास झाला नाही म्हणुन गमतीशीर विचार मनात आला की 'नक्की पोटात बाळ आहे ना?' .. गर्भारपण खुप आवडले. बाळ लाथ मारायचे ते खुप आवडले. लोक कौतुक करायचे, खास वागणुक मिळायची ते आवडले. मन खुप प्रेमळ बनले. दुसर्‍याच्या मुलांवरील माया अजुन वाढली. शेवटे शेवटी पाठदूखी मात्रा सहन होत नव्हती. म्हणुन दुसरे मुल न होऊ देण्याचा निर्णय गेतला. पण दत्तक घेण्याचा नक्की विचार आहे, कारण मुलीला स्वतःचे भावंड असावे असे आम्हाला वाटते.मुल मोठे होताना त्याला कमीतकमी रागावुन समजावे लागते म्हणुन संयम खुप वाढलाय. एकंदरीतच बदल आवडलाय.

    - नशिबाने कधी फार काही शारिरिक त्रास झाला नाही.पण प्रसुतीच्या आधी क्ष महिने व नंतर क्ष महिने मी भारतात आई वडिलांकडे होते व नवरा (दुसर्‍या देशात).त्याकाळात सासरी,नवर्‍यात आणि माझ्यात बरेच समज-गैरसमज झाले. नवर्‍याने कधीच माझी बाजू समजून घेतली नाही.त्याचा मला होणारा त्रास कोणीच लक्षात घेतला नाही.त्यामुळे नात्यात आलेली कटुता मी विसरु शकत नाही.प्रसुती समयी नवर्‍याची अतिशय उणीव भासली.ह्याच गोष्टींमुळे मला प्रसुतीनंतर काही काळ डिप्रेशन आले होते पण ते सुद्धा कोणी लक्षात घेतले नाही.मागे वळून बघताना तो काळ मी काळजीत जास्त घालवला असे जाणवते.त्यामुळे पुन्हा गर्भधारणा नको असे वाटते.

    - गर्भारपण मजेत गेलं. सिझर नंतर आठवडाभर संध्याकाळी हलकासा ताप येत होता. सा.बां नी हे काही बरं नाही. तुम्ही डॉक्टरला दाखवा म्हंटल्यावर डॉक्टरकडे गेलो. हॉस्पिटलच्या दुसर्‍या पायरीवरच खुप रक्तस्त्रावाला सुरुवात झाली. नंतर कळलं की खरंतर २४ तासांत अशा रक्तानं शरिरात विषबाधा होते. नशिबानं जीव वाचला. तेव्हा मी खुप धीरानं घेतलं होतं सगळं. आता मात्र शहारा येतो.

    - I have a heavy blood loss just after delivery and My gynac stitched my muscele along with my skin after delivery. I had a normal delivery but due to this muscele was swolen and I had lotsa pain and discomfort for 6 months after delivery....
    .....It was my bad luck that I was treated by a bad gynac throughout my pregnancy due to which it was a stressful time.

    - पहिलं मुल झाल्यावर, भरपुर डिप्रेस आले. हे दुखतय, ते दुखतय, बाळ रडतय. पण क्ष वर्षांनी हे सगळं विसरुन परत अजुन एक मुलाचा निर्णय घेतला, काही तरी कमी वाटत होती आयुष्यात. मोठ्यालाही कोणी तरी लहान पाहिजेच होतं, नेहमीच हट्ट चालतो. दुसर्‍यांदा चान्स घेतल्यावर, मिसकॅरेज झालं, भयंकर मनस्ताप झाला. आता मोठा क्ष वर्षांचा होतोय, परत त्यातुन जायला थोडी भिती वाततेय.

    - सुंदर अनुभव. वर्णन करण्यापेक्षा अनुभवणे सुंदर आहे.

    - pregnency च्या शेवटच्या महिन्यांमध्ये सासरच्यांनी मानसिक त्रास दिला.. कारण काय तर दिवाळ सणाला या म्हणून नुसता फोन केला तुझ्या घरच्यांनी... तेव्हा २ दिवस दार लावून खोलीत बसून होते..

    - I enjoyed the second pregnancy more, I was a bit worried the first time, but ofcourse it went well, my mother was with me. My son was good as baby, he was happy baby and liked to sleep. Happy Second time I was more relaxed, worked until the day before my son was born. This time there were just two of us but friends helped a lot. Overall I enjoyed both

    - I never really wanted to get pregnant and have children. However, I am currently pregnant and will be having a daughter in XX. I prefer the idea of adoption.

    - I strongly believe that the world is an overcrowded place and not everyone needs to make new babies on this planet. The joys of parenthood are slightly overrated. It makes little sense to me to have a child because ""it is such a wonderful feeling"". I know of several other things that give you a ""wonderful feeling"" but are not wise to do Wink It may be a wonderful feeling certainly, but couples should think more on the ""long term"" lines -- if they are capable of raising kids to grow up to be wise, responsible world citizens; if they will be able to give them an enriching ""growing up experience"" -- before making babies.
    I have a strong inclination towards not having kids of my own, but I am aware that these things are hard to say with confidence ahead of time. If I find myself financially, mentally, emotionally, physically capable of raising a child who can grow up to be a better individual than me and my partner, I will have one or adopt one. I have immense admiration for people who have adopted kids despite being capable of having their own.

  • वार्षिक हेल्थ चेकअप, पॅपस्मियर, मॅमोग्रॅम करुन घेता का?:

    Health1.JPG

    • वार्षिक वैद्यकीय तपासणी, पॅपस्मियर आणि मॅमोग्रॅमसकट करणार्‍या ३३ जणींमध्ये मूळ भारतीय वंशाच्या परंतू सध्या भारताबाहेर स्थित: २३, सध्या भारतात स्थित: ३, अभारतीय वंशाच्या: ७.
      ३१-३५ वयोगटातल्या १४ जणींनी पर्याय क्र. १ निवडला आहे. तसेच हा पर्याय बहुतांश (६३%) अभारतीय वंशाच्या मैत्रिणींनी निवडला आहे
    • 'हो, पण नियमित नाही' हा पर्याय निवडणार्‍या एकंदर ३० जणींपैकी २३ सध्या भारताबाहेर स्थित, ४ सध्या भारतात स्थित आणि ३ अभारतीय वंशाच्या. यात २६-३० या वयोगटातल्या १०, ३१-३५ वयोगटातल्या ९ आणि इतर वयोगटातल्या ११ जणींचा समावेश आहे.
    • 'फक्त वार्षिक तपासणी' (पॅपस्मियर आणि मॅमोग्रॅमशिवाय) करणार्‍या एकूण १४ जणींपैकी ११ जणी सध्या भारतात स्थित, आणि ३ सध्या भारताबाहेर स्थित. हा पर्याय एकाही अभारतीय वंशाच्या मैत्रिणीने निवडलेला नाही.
    • 'नियमीतपणे नाही, गरज पडली तरच' हा पर्याय सगळ्यात जास्त जणींनी म्हणजे ४५ जणींनी निवडला होता, त्यात सध्या भारताबाहेर स्थित २८ आणि भारताबाहेर राहणार्‍या १६ तसेच अभारतीय वंशातील १ आहेत. यात २६-३० वयोगटातल्या १४ आणि ३१-३५ या वयोगटातल्या १२ जणींचा समावेश आहे.
  • व्यायामाला दिवसातला किती वेळ देता?:

    health2.JPG

    • व्यायामाला देण्यात येणारा वेळ अजिबात न देऊ शकणार्‍यांची एकूण संख्या २९, त्यात फक्त एक प्रतिक्रिया सोडल्यास (१० -३० मिनिटे) बाकी सगळ्या जणींनी सौंदर्यप्रसाधनासाठी लागणारा वेळ ०-१० मिनिटे असा नोंदवला आहे. यात नोकरीस्थितीचा प्रभाव दिसून येतो (२२). म्हणजेच हा पर्याय नोंदवलेल्या बहुतांश महिला कसल्या न कसल्या नोकरीत कार्यरत आहेत आणि त्या व्यायामासाठी वेळ देऊ शकत नाहीत तसेच सौंदर्यप्रसाधनासाठीही देऊ शकत नाहीत.
      देशात /देशाबाहेर स्थायिक असणे यापैकी कुठल्याही घटकाचा विशेष प्रभाव आढळून आला नाही.
      यात २ अभारतीय वंशाच्या महिलांचा समावेश आहे आणि २६-३० या वयोगटात मोडणार्‍या एकूण स्त्रियांची संख्या ७.
    • व्यायामासाठी देण्यात येणारा वेळ ०-१ तास हा पर्याय जास्तीत जास्त म्हणजे एकूण ८० जणींनी निवडला. त्यापैकी ५९ जणींनी सौंदर्यप्रसाधनासाठी लागणारा वेळ हा ० ते १० मिनिटे असे नोंदवले आहे, तर २१ जणींनी १०-३० मिनिटे असे नोंदवलेले आढळले आहे. म्हणजे या ०-१ तास वेळ देऊ शकणार्‍या मैत्रिणींपैकी २६% मैत्रिणी व्यायामाबरोबरच सौंदर्यप्रसाधनेसाठीही निश्चित जास्त वेळ देऊ शकतात. यामध्ये वयाचा अथवा नोकरीस्थितीचा प्रभाव आढळून आला नाही.

      हा पर्याय नोंदवलेल्यां पैकी सध्या भारतात स्थित ३२%, तर बहुसंख्य ६८% सध्या भारताबाहेर स्थित आणि अभारतीय वंशाच्या बहुसंख्य (८ जणी) असे एकंदरित चित्र दिसते.

      म्हणजेच व्यायामासाठी ०-१ तास काढू शकणार्‍यांमध्ये सध्या भारतात स्थित मैत्रिणी व्यायामासाठी तुलनेने कमी वेळ काढू शकतात असे (मर्यादित) अनुमान (इथल्या) मर्यादित माहितीच्या आधारे काढता येईल.

    • व्यायामासाठी देण्यात येणारा वेळ १-२ तास हा पर्याय एकूण ११ जणींनी निवडला. त्यात ८ जणींनी सौंदर्यप्रसाधनासाठी लागणारा वेळ ०-१० मिनिटे सांगितला, तर ३ जणींनी १०-३० मिनिटे.

      हा पर्याय निवडणार्यांमध्ये वयोगट ३६-४० वगळता सगळ्या वयोगटामधून जवळपास सारखीच
      उत्तरे आली आहेत.

    • व्यायामासाठी देण्यात येणारा वेळ दोन तासांपेक्षा जास्त- हा पर्याय कोणीही निवडलेला नाही.
  • सौंदर्यप्रसाधनेला दिवसातून किती वेळ देता:

    दिलेले पर्यायः ०-१० मिनिटे २. १०-३० मिनिटे ३. ३०-६० मिनिटे ४. > ६०-मिनिटे

    आलेल्या सर्व उत्तरांमध्ये फक्त पर्याय १ (७९%) किंवा २ (२१%) हेच निवडले गेले आहेत. यावरुन आपल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कोणीही सौंदर्यप्रसाधनेला दिवसाकाठी ३० मिनिटांच्या वर देत नसल्याचे दिसून येते.

    ज्या मैत्रिणींनी ० ते १० मिनीटे हा पर्याय निवडला आहे, यात भारतात राहत असलेल्या २९% तर भारताबाहेर वास्तव्य करत असलेल्या ७१% आहेत. तसेच यात बहुतांश अभारतीय वंशाच्या मैत्रिणींचा समावेश आहे (९). ह्या ७९ % मैत्रिणींमध्ये व्यायामासाठी अजिबात वेळ देत नसलेल्याची संख्या आहे २८.

    सौंदर्यप्रसाधनेला लागणार वेळ १० ते ३० मिनिटे अशी नोंद करणार्‍या एकूण मैत्रिणींमध्ये भारतात आणि भारताबाहेर स्थित मैत्रिणींचा समावेश जवळजवळ सारख्याच प्रमाणात आहे, यात ३ अभारतीय वंशाच्या आहेत. हा पर्याय निवडणार्‍यांमध्ये व्यायामासाठी अजिबात वेळ देत नसलेल्याची संख्या अगदी नगण्य (२) आहे.

    यावरुन, ज्या सौंदर्यप्रसाधनेला आणि व्यायामाला देण्यात येणारा वेळ यात तुलनात्मक अशी ठोस गृहितकं मांडता येतील, अशी माहिती जमा झालेली नाही.

    • सरासरी महिन्याकाठी सौंदर्यवर्धकांसाठी किती खर्च येतो?

    Expenditure.JPG


stline2.gifनिष्कर्ष

स्त्रीशरीराविषयाच्या मूलभूत शास्त्रीय माहितीविषयक आलेल्या प्रतिक्रिया, माहितीच्या योग्य स्रोताबाबत दिलासादायक आहेत असे म्हणायला वाव आहे. बहूतांश मैत्रिणींना शास्त्रीय माहिती सुयोग्य स्रोताकडून मिळाली. अभारतीय वंशाच्या सर्वच मैत्रिणींना ही माहिती पुरेशी समाधानकारक आणि शास्त्रीय वाटली. भारतीय वंशाच्या स्त्रियांना मिळणार्‍या योग्य माहितीबाबत सुधारणेला वाव आहे असे म्हणायला हरकत नाही. आणि तरीही वैद्यकीय गर्भपाताच्या प्रश्नाला आलेली उत्तरं आणि अशा माहितीचा योग्य उपयोग यातील कार्यकारणभाव पडताळून पाहायला हवा.

संततीनियमनासाठी वापरण्यात येणारे पर्याय यावर वंशाचा प्रभाव आणि सध्या भारतात/ भारताबाहेर असणे याचा प्रभाव दिसून येतो. अभारतीय महिलांनी प्रामुख्याने 'गोळी' हा पर्याय नोंदवला आहे, तसेच पुरुष गर्भनिरोधक या पर्यायाची निवड केलेली नाही.

भारतीय स्त्रियांच्या एकंदरित शारिरिक/मानसिक व्याधींचे प्रमाण (आपल्याला आलेल्या प्रतिक्रियांपुरते) निश्चित लक्षणीय आहे याकडे विश्लेषकचमू आपले लक्ष वेधू इच्छितो. - भारतीय वंशाच्या स्त्रियांमध्ये निकोप (शारिरीक आणि मानसिक आरोग्य), एक जीवनमूल्य म्हणून physical fitness यांचा निश्चित अभाव दिसून येतो.

या सर्व्हेला आलेल्या प्रतिक्रियांपुरते वैद्यकीय गर्भपाताचे प्रमाण पाहता, हेच प्रमाण प्रातिनिधिक असल्यास, कुटुंबनियोजनाला एक पर्याय म्हणून तर या सुलभ शस्त्रक्रियांकडे पाहिले जात असावे काय? किंवा स्त्रीभ्रूणहत्या हा भारतीय समाजातील घटकाचा प्रभाव असू शकतो काय? हे अतिशय अवघड प्रश्न आम्ही वाचकांच्या सुपूर्त करु इच्छितो.

'मातृत्व हे स्त्रीच्या जीवनाचे सार्थक' या पारंपारिक समजाबद्दल बर्‍यापैकी भिन्न प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत. 'जीवनाचे सार्थक' ते 'एक अविस्मरणीय अनुभव' इथपर्यंतचा वैचारिक (भाषिक म्हणुया हवं तर) प्रवास आजच्या स्त्रीचा झाला आहे असे आपणांस वाटते काय?

वार्षिक सर्वसमावेशक आरोग्यचाचणी या प्रश्नाला आलेल्य उत्तरांवर भारतीय वंशाच्या स्त्रियांबाबत सध्या राहण्याच्या ठिकाणाचा प्रभाव जाणवतो. तसेच वंशाचाही प्रभाव निश्चित दिसून येतो. यात सर्व्हायकल कॅन्सर/ब्रेस्ट कॅन्सर या बाबत जागरूकता, भारतातील उपकरणे, या चाचण्यांना येणारा खर्च अशा इतर अनेक घटकांचा एकत्रित प्रभाव असू शकेल.

व्यायामासाठी देण्यात येणारा वेळ आणि सध्या भारतात स्थित मैत्रिणी याकडेही पुन्हा एकदा पहा. 'संयुक्ता' साठी हे विषय जास्त महत्त्वाचे ठरावेत काय?

मुभा मिळाल्यास बाह्य रुपात करु इच्छिणारे बदल हे स्त्रियांबाबतच्या पारंपारिक समजांना पुष्टीदायक ठरतात का? समाजाने स्त्रीरुपास एक वस्तुरुप म्हणून पाहायचे नसल्यास स्त्रियांनी स्वतःच्या स्वःप्रतिमेत आपल्या बाह्यसौंदर्याला किती महत्त्व द्यायचे हे वाचकमैत्रिणींनो आपले आपण ठरवायचे आहे.

वाचला धागा. ह्या माहितीचा उपयोग संयुक्तात व संयुक्ताबाहेरही कशा प्रकारे करता येईल याचा विचार करते आहे.

पहिला शारीरिक लैंगिक अनुभव वयाच्या कितव्या वर्षी घेतला?
>>> हा भाग थोडासा " काऊंटर - इन्ट्युटीव्ह वाटला !
(संदर्भ : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3402588.cms )

(पण प्राथमिक माहीती http://www.maayboli.com/node/14793 पाहता सॅम्पल बायस्ड असेल असे वाटत नाही ....).

बाकी सर्व्हे मस्त आहे !
ग्राफ्स च्या पुढे जावुन बरेच अ‍ॅनलिसीस करता येईल असे वाटते !
विशेष करुन कोरीलेशन अ‍ॅनलीसीस ने बरेच चांगले इन्साईट्स मिळतील असे वाटते !

बाकी सर्व्हे टीमचे अभिनंदन !!

अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. संततीनियमन मध्ये वयाचा सम्बन्ध दिसला का? तसेच संततीनियमन बरेच वेळा नर्स/डॉक्टर यांच्या सल्ल्याने होते. त्या सम्बन्धी प्रश्न हवा होता. पुन्हा अशा प्रकारचे आरोग्यविषयक सर्वेक्षण झाले तर विश्लेषण चमू मध्ये भाग घ्यायला आवडेल.