बच्चे कंपनी आणि घराच्या रंगणार्‍या भिंती

Submitted by नलिनी on 8 August, 2014 - 12:21

माझ्या पाहाण्यात बर्‍याच घरात मला हि समस्या दिसली की त्या घरातील लहान मुले बर्‍याचदा पेन, स्केचपेन, पेन्सिल वापरून भिंतींवर लिखाण करतात, अर्थात त्या रेघोट्याच जास्त असतात.
आपण कोणाच्या घरात भाडेकरू म्हणून राहात असू तर आपल्याला भिंती पुर्ववत करून द्याव्या लागतात. स्वतःचे घर असेन तर हौशेने दिलेल्या रंगावर आपल्याला ह्या रेघोट्या नको असतात. तर आपण ह्यासाठी काय करू शकतो ह्यासाठी हा धागा.

१) घरात मुल रांगायला लागले ही की शक्यता गृहीत धरायला हवी की आपले मुल उद्याला भिंतींवर लिहिणार, त्यासाठी आधीपासूनच उपाययोजना करायला हव्यात.

२) मुलांना आपण काही शिकवताना, चित्र काढून दाखवताना, अक्षरं शिकवताना, फुले, चित्र काढून दाखवताना वापरात येणारे कागद घरात एखाद्या ठराविक ठिकाणी ठेवावेत. आपणच मुलांसमोर काहिही लिहिताना ते कागद वापरावे. मुलांसोबत त्यावर लिहित असताना सकारात्मक सांगावे की आपण लिहायला हा कागद वापरतो. त्यांच्यावर न लादता पण वारंवार सांगून आपण त्यांना लिखाणासाठी ठराविक कागद वापरायची सवय लावू शकतो.

आपण जर मुलांना नकारात्मक सुचना करत असू तर आपल्या असे लक्षात येईल की मुलं नको म्हणून ही तेच काम करत असते. म्हणून सुचना करताना हळू आवाजात आणि सकारात्मकच असायला हव्या.

३)जी मुलं आता जरा मोठी झालीत आणि त्यांना भिंतीवर लिहीणे आवडते त्यांच्यासाठी भिंतीवर तीन-चार मोठे कागद लावयचे. त्या कागदावर बॉर्डर आखायची. एका कागदावर पेनाचे, दुसर्‍यावर पेन्सिलचे, ब्रशचे तर चौथ्यावर स्केच पेनचे ( जी साधनं वापरात असतील त्यानुसार) चित्र काढायचे आणि मुलांना हे सातत्याने सांगायचे की ठराविक साधनाने ठराविक पेपरवरच लिहायचे आणि तेही बॉर्डरच्या आत. हे करत असतानाच क्रः २ चा मुद्दा ही आचरणात आणायचा.

४) मुलं एकाएकी हा बदल स्विकारणार नाहीत त्यामुळे त्यांना जरा वेळ द्यायला हवा. तसेच सोबत मुलांना स्लिपटॉक द्यायचा. मुल झोपल्यानंतर ५ ते १० मिनिट ह्या कालवधीमधे मुलाला हे सांगायचे की तो / ती एक गुणी बाळ आहे. त्याला/ तिला लिहायला चित्र काढायला खूप आवडते. चित्र काढताना तो अमुक ठिकाणी ठेवलेल्या कागदांचा वापर करतो. कींवा भिंतीवर लावलेल्या कगदावरच लिहितो.

तुमची मतं आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुभव काही नाही.
मत असे की हे करू द्यावे सुरूवातीला. गंमत असते त्यात. नंतर हवे तर एकच खोली/ एकच भिंत रिस्ट्रीक्ट करून द्यावी.

पहिल्यांदा भिंतीवर एखादी रेघ काढली की त्याचवेळी मुलाच्या हातात एक फडकं द्यावं. ती रेघ पुसता येते का ते बघायला सांगावे. ते बहुधा जमतच नाही. मग आपण एकत्र येऊन पुसायचा प्रयत्न करावा. मग ' अरेच्च्या , हे आता पुसलं जात नाहीये. पण किती खराब दिसतय ना? मला वाईट वाटतंय आपलं घर खराब झालं म्हणुन.' असे डायलॉग टाकावेत. नवरा / बायको घरी आल्यावर दुखद आवाजात हाच डायलॉग टाकावा Wink हे एखाद दोन वेळा होईल. मग मुलांनाही आपल्या घराच्या भिंती खराब करु नये याची जाणीव होते. Happy ( असा आमच्याकडचा अनुभव आहे Wink )
आम्ही अजिबात करु दिले नाही कारण जपानमधल्या भाड्याच्या घराचा वॉलपेपर बदलण्याचे पैसे देणे परवडण्यासारखे नव्हतेच, शिवाय ते चांगलेही दिसत नाही.
आम्ही चित्र काढण्यासाठी भरपुर कागद मात्र उपलब्ध करुन देत असु / अजुनही देतो

भाड्याचे घर किंवा वरती सावली म्हणते तसे असेल तर ठिके पण मुलाला आपल्या स्वतःच्या घरात मॅक्झिमम कम्फर्ट असायला हवा.
जे काय घरामधे करायचं ते आईबाबांना चांगलं दिसतं तेवढंच यात काय गंमतच नाही.

You can consider painting a section of a wall in Chalkboard Paint. At least in the US, it is widely available, easy to apply and easy to paint over.

There are writeable wall papers and you can use those in a small section that is easy for the kids to reach.

You can also get self adhesive white board paper in Office Supply stores that you can 'stick' to the walls and kids can draw on that paper with dry erase markers. It is easy to peel off too.

Most important - dont get annoyed with the child and punish them if they mess up occasionally.

My 10 year old has carved her name on our dining table - on the top -using an Ex-Acto knife.

The little one used to write on the insides and sides of kitchen drawers that you can only see when the drawer is pulled out !

आमच्याकडे बरेच उपाय केले गेले यातले. अगदी २-३ वर्षांचा असताना भरपूर कागद देणे, कागदावर रंगवायचं असतं सांगणे हे केलं. ३ वर्षानंतर अर्थात त्याला फक्त कागदावर रेघोट्या ओढायचा कंटाळा आला होता. मग एक गुंडाळी फळा आणून दिला. काही दिवस त्यावर गेले. मला एक मोठा व्हाइटबोर्ड ठेवायचा होता त्याच्यासाठी घरात, पण ते जमलं नाही. मग ४-४.३० वर्षाचा झाल्यावर जिथे तिथे एबीसीडी, अंक आणि त्याच्या गोष्टीतला एक मुलगा चितारणं सुरु झालं. त्यावेळी त्याला एक भिंत दिली होती. जे काय करायचंय ते इथे कर म्हणून.
तरीही आमच्या घरातल्या प्रत्येक भिंतीवर आणि फ्रिजवर पण चित्रकारी आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सची नावं होतीच. Happy

आता नव्या घरात आल्यावर त्याला सांगून ठेवलं होतं की इथे भिंती नकोस खराब करु. इथे बोर्ड पण आणून दिलाय. पण तरी दोन महिन्यांपूर्वी एकदा मला घरातला एका भिंतीवर पेन्सिलीने काहीतरी लिहिलेलं दिसलं. या घरात एक देवघर आहे आणि तिथे २-३ फोटो आणि मुर्त्या आहेत. तर त्या भिंतीवर लिहिलेलं होतं. मग अर्थात थोडं रागावनं, समजावणं करुन त्याला कप्डा आणि एरेझर दिलं. त्याने सफाईला सुरवात करताना आम्हाला सांगितलं - मैने तो सिर्फ भगवान का मंदिर असं लिहिलं होतं. मी लगेच काय लिहिलंय बघायला गेले तर का मंदिर ओळखू आलं पण भगवान दिसत नव्ह्तं. त्याला विचारलं भगवान कुठे लिहिलंय तर म्हणे भगवान लिहिता येत नव्हतं म्हणून रब का मंदिर लिहिलंय. Proud

पेन्स्लिलीने लिहिलं होतं म्हणून खोडल्यावर मिटलं पण. आता वेगवेगळ्या स्टिकर्स, स्टार्स, खडे, मोती, ग्लिटर्स यंनी घर सजवायचं असतं. मध्यंतरी आमच्या घरातल्या सगळ्या भिंती, फर्निचर, वस्तू चमचम करत सजल्या होत्या. सुट्टीत जावेकडे पाठवताना त्याला खूप समजवावं लागलं की ते घर अगदीच नविन आहे, तू काही सजवायला जावू नकोस. जर तुला खूप्च सजवायची इच्छा झाली तर बिबीला घरातला एखादा कोपरा माग आणि तेवढाच सजव. Proud

अजूनही त्याला लिहावं वाटतं कधीमधी तर अशा वेळी हॉल्/डायनींग न वापरता आपल्या बेडरुममध्ये लिही म्हणून सांगितलंय. त्याचं नावं फक्त लिहिलंय सध्या. आणि त्याच्या टेबलावर करत असतो कलाकुसर. Happy

इथेही मिळतो चॉकबोर्ड पेंट. घराचं रंगकाम करताना उपयोग करणार आहोत आम्ही. तोपर्यंत एका खोलीतल्या भिंती वापरायची पोराला मुभा आहे. (खरंतर हॉल /डायनींग आणि गेस्ट रुम आणि पुस्तकं सोडून बाकी कुठेही रंगवलं तर चालेल)

मुलीला मोठी डायरी दिली आहे. त्यात चित्रकला चालते.

पेप्रातील चित्रे कापुन दाराच्या पाठीमागे नित्यनेमाने चिकटवली जातात. त्याने तिला आकार रंग प्रमाण समजायला मदत होते. दर सोमवारी हा उद्योग चालतो.

नीधप, मेधा यांच्याशी सहमत.

मला स्वतःला आवडतं पोरांनी भिंतींवर गिरगट घाणा केलेला. (आमच्या घराच्या. आणि सध्यातरी आमच्या घरातल्याच पोरांनी केला आहे.) अशा भिंती पाहिल्यावर मलाही कधी कधी एकदम भारी वाटतं.

(आता नलिनी लक्षात ठेवून मला कधी घरी यायचं आमंत्रण द्यायची नाही.)

मी पण माझ्या दोन्ही मुलांना मनसोक्त भिंती रंगवू दिल्यात. मला अतिशय आवडायचं जेव्हा ते चित्र काढून अगदी उत्साहाने मला दाखवायचे. अगदी फिंगर पेंटिंग ते क्रेयोंस काय वाट्टेल ते वापरून झालंय. आता मोठे झालेत, तरी त्या कलाकृतींचे फोटो पाहून खूप मजा वाटते.

भिंती परत रंगवता येतात, मुलांचा तो आनंद पुन्हा मिळत नाही.

भिंती परत रंगवता येतात, मुलांचा तो आनंद पुन्हा मिळत नाही.
अगदी! फक्त ही रंगवारंगवी आपल्या घरीच. बाहेर गेल्यावर इतरांच्या घरातल्या भिंतींवर नाही एवढं शिकवत रहावं लागतं.

मलापण फार वाईट वाटत नाही, पण एक भिंत/ खोली ठरवून द्यावी याच्याशी सहमत. मला लहानपणी असं करायला फार आवडायचं.
परत, त्याने रेघोट्या ओढल्या तर प्रेमाने 'ओढ हो' असं म्हणणं चूक वाटतं कारण तो प्रोत्साहन समजून जिकडे तिकडे घरात आणि बाहेर करत सुटेल ज्याने ताप होईल. पण जो पर्यंत तो जास्त रेघा ओढत नाहीये तोपर्यंत ओरडावस अजिबातच वाटत नाही. म्हणून अजून तरी प्रत्येक वेळी केलं की, 'असं करू नको, भिंत खराब होते' इ. सांगतो.
पाण्याने धुतले जाणारे मार्कर आणलेत.
आताची पद्धत हाताबाहेर जात्येय असं वाटलं की हातात फडकं देईन, आताच्या वयात फडकं दिलं तर ती गम्मतच आहे असं वाटायची शक्यता आहे.

>>फक्त ही रंगवारंगवी आपल्या घरीच. बाहेर गेल्यावर इतरांच्या घरातल्या भिंतींवर नाही एवढं शिकवत रहावं लागतं >>+१
मुलं लहान असताना असे डोळसपणे शिकवणारे पालक कमीच असतात.

माझ्या मुलीने एक-दोन वेळा घरी हे चितारकाम केल्यावर या चित्रातले टेबल आणले. त्यावर चॉकबोर्ड पेन्ट आहे आणि कागदाची गुंडाळी लावायची सोय आहे. कधी खडू तर कधी कागद अंथरून त्यावर हवे ते रंग. अशीच मुलीला सवय लावली. तिला पण स्वच्छता, टापटीप आवडते त्यामुळे सोपे गेले.

http://www.amazon.com/ALEX%C2%AE-Toys-Artist-Studio-711W/dp/B0006GUY0Y/r...

पण जेव्हा इतर मुले येतात आणि सरळ भिंतीचा ताबा घेतात आणि त्यांचे पालक गप्प बसतात तेव्हा फार राग येतो.
मला तर वाटते आपले घर आणि दुसर्‍यांचे घर हा फरक फार असू नये. एखादी वस्तू जपणे, नीट वापरणे मग ती आपली असो वा दुसर्‍याची हा बेसिक शिस्तीचा भाग आहे.

जरा अवांतर पण याच विषयाशी संबधित. इथे पोर्टलँडला एक चॅप नावाची संस्था आहे. तिथे मोठा हॉलभर कागद अंथरलेले असतात. त्यांच्या आर्ट क्लासला जाणे म्हणजे रंगपंचमीच असते. पालक एका बाजूला थांबून बघु शकतात पण मुलांना कुठेही लिहायला रंगवायला परवानगी असते. फर्निचर भिंती जमीन सगळीकडे रंगच रंग. Happy मुले देखील रंगीत.
अलिकडे त्यांनी बर्थ डे पार्टी पॅकेज बंद केलेय. पण माझ्या लेकीची ४ वर्षाची पार्टी आम्ही तिथे केली होती. ३०-४० मुले असली की अशा ठिकाणी मजा येते.

भिंती पुन्हा रंगवता येतात याला अनुमोदन.

कुणीतरी बालगंधर्वच्या कलादालनात मुलांच्या रेघोट्यांचं प्रदर्शन भरवून त्यावरून मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी जागृती करायचा प्रयत्न केला होता ते आठवलं. भिंतीवर त्यांची कलाकुसर करू द्या असा एकंदर काहीतरी संदेश होता .

घरात लहान मूल आहे तेव्हां या घरात अशाच भिंती असणार असा विचार करणारे आपले समजायचे, बाकिच्यांना काय वाटतं याबद्दल विचार करूच नये. हे दिवस काही पुन्हा येत नाहीत. नंतर हवं तर सर्वात महागडे पेंट्स किंवा वॉलपेपर लावून नाक मुरडणा-यांना घर पहायला बोलवता येईल. वर चाईल्ड सायकॉलॉजी वर गप्पा मारायला लावायच्या. हाकानका.

कितीही शिकवलं तरी भिंती भिंतींमधला फरक किंबहुना घरी चालतं तर बाहेर का नको हे काही मुलांना कळणं कठीण ,त्यामुळे मी भिंती रंगवू द्यायच्या विरोधात. भिंत सोडून रंगवारंगवीसाठी चिक्कार सामान अव्हेलेबल असतं. भिंत रंगवायचीच असेल तर अ‍ॅट्लिस्ट १० वर्षाचे झाल्यावर, त्यांना स्वतःलाच त्यांच्या रूमची रंगवू द्यावी.

आपण तर सो क्यूट म्हणून फोटो घेउन फेसबुक वर शेअर करणार. हे सर्व एकेकदा होणारे आहे मुले मोठी झाली की आहेच स्वच्छ घर. अर्थात एक खोलीत रेस्ट्रिक्ट करावे. जी मुलांची आहे ती.

कोणी मुले जमिनीवर लिहीतात का? मला जमिनीवर खडूने पूर्ण रस्त्याचे जाळे( इन्सेप्शन च्या मेझ सारखे) काढून त्यात तासंतास कार फिरवत बसायची सवय होती. कार, एक रथ, एक दोन प्राणी एक दोन बाहुल्या असे नेहमी ह्या रोडवर कुठे कुठे फिरत बसत व त्यातून काही काही कथा निर्माण होत. थोडा मटेरिअल त्रास सोसून का होईना आपल्या घरात त्यांचे कल्पना विश्व मोहरू द्यावे.

टेक्निकली स्पीकिन्ग डाग जातील असा वॉल पेंट मिळतो किंवा पुसून टाकता येतील अश्या मटेरिअलच्या पेन्सिली / रंग मिळतात ते आणावे. हे पण बघा. युनिवर्सल प्रश्न आहे.

http://www.rd.com/slideshows/how-to-get-crayon-off-the-wall/#slideshow=s...

मेधा: तुमच्या मुलीचे नावलिहीलेले टेबल म्हणजे फॅमीली एअर लूम . चिमणी शिकायला बाहेर युनी. मध्ये गेली की रोज तिथे बसून कॉफी पिताना त्या नावावर हात फिरवला जाईल.

संपदा, मी तुझ्याशी सहमत.

किती क्यूट म्हणून लहान मुलांना नवीन कपडे घालून चिखलात खेळू देता का? कपडे तर कधीही धुता येतात.

मला अनुभव नाही. कारण माझ्या मुलाने असे कधीच केले नाही . काही काही ठराविक मुलंच अशी भिंतीवर रेघोट्या ओढण्याची काम करत असतील. मग त्यांच्या पुरती अशी एकादीच भिंत ठेवावी . त्याच एका भिंतीवर रेघोट्या काढण्यासाठी त्याला सांगावे. बाकीच्या भिंतीवर काढल्यास मार द्यावा.

पण खर तर अशा रेघोट्या ओढुच देऊ नयेत अस माझ स्वताच वैयक्तिक मत आहे .अशी सवय लागली तर ती वाईटच. मग हीच मुल ( ज्यांना घरात अशी रेघोट्या ओढण्याची मुभा मिळते) सार्वजनिक ठिकाणी ( शौचालयात किव्वा सार्वजनिक ट्रेन मध्ये /बस मध्ये) हातातल्या पेनने/ खडूने किव्वा अगदी नखाने सुद्धा समोरच्या सीट वर रेघोट्या ओढण्याची नाहीतर नखाने खरवडून काढण्याचे उपद्व्याप करतात जे चुकीचे आहे Happy

नी, गजाननशी अगदी सहमत.
भिंतींवर रेघा, वर्तुळं काढणं ही ६-७ वर्षापर्यंतच्या मुलांच्या मनगटं, कोपरातून, काखेतून हात पूर्ण फिरवता येण्याची अ‍ॅक्टिव्हिटी आहे. उभं राहून ती कंफर्टेबली करता येते, जमिनीवर कितीही मोठ्या कागदावर आडवं पसरून ते साधणार नाही. शिवाय माझ्या घरात मी (विधायक मार्गाने) काहीही करायला मोकळा असणं ही भावना आणि तसं वाटतंय त्या क्षणी मोकळं होणं हे दोन्ही मुलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आणि घरात मुलं असल्यावर ते घर त्यांचंही असतं, किंवा त्यांचंच जास्त असायला हवं.

आम्ही घरात सगळ्या उपलब्ध भिंतींना चार-साडेचार फुटांपर्यंत मोठाले आर्किटेक्चरचे पेपर्स सलग चिकटवलेले होते. त्यावर मुलगा, त्याचे मित्र, आम्ही, रेघोट्या बघून हात शिवशिवणारी मोठी माणसं, अशा सगळ्यांनी हात साफ केलेले आहेत. ते भरले की गुंडाळून पुन्हा दुसरे चिकटवले. पण ते पूर्ण भरायला मोठा कालावधी जातो. त्या गुंडाळ्या आता आमच्यासाठी लेकाची ठेव आहे. सांभाळून ठेवली आहे. अधूनमधून त्या गुंडाळ्या उघडून बघताना अत्यानंद होतो.

माझा अनुभव म्हणजे घरात मनसोक्त रंगरंगोटी, रेघोट्या करता येत असतील तर मुलं बाहेर कुणाच्याही घरी ती करत नाहीत. आमच्या घरी आजूबाजूची मुलंही येऊन पोट भरून रेघोट्या मारायची कारण त्यांच्या घरी त्यांना परवानग्या नव्हत्या. ती भूक इथे येऊन भागवायची. अर्थात स्वतःचं घर म्हणुन शक्य झालं. पण कागद चिकटवणं भाडेतत्वावरच्या घरातही शक्य होईल. मी आत्ता रेंटल घरातच रहातेय, पण मुलाने भिंती रंगवलेल्या नाहीत. तसं त्याला सुरुवातीला सांगितलेलं होतं की इथे आपल्या घरासारखे कागद आपण लावणार नाही आहोत, आता तू कागदांवरच चित्रं काढ. आणि ते तसंच चालू आहे. इथेही घरात मुलांची जत्रा भरलेली असते.

बाकीच्या भिंतीवर काढल्यास मार द्यावा.<<<<<<
समजावून सांगणे वगैरे पायर्‍या गाळूनच टाकायच्या एकदम? सहीये!

आणि सरसकटीकरण नका करू एकदम! की घरात भिंतींवर लिहिणारी मुलं बाहेर सार्वजनिक मालमत्ता खराबच करतात वगैरे. माझा भाऊ लिहायचा लहानपणी आमच्या घरातल्या भिंतींवर. बाहेर मात्र कुठेच नाही, कुणाच्या घरच्या भिंतींवर पण नाही. आईबाबांनी नीट समजावून सांगितलं होतं आम्हां दोघांना. आपलं घर, दुसर्‍यांचं घर वगैरे. तेवढं आम्हांला पुरलं.

आणि ही समस्या नाही, हे बोलता न येण्याच्या वयापासूनचं व्यक्त होणं आहे.. बोलता यायला लागल्यावरही वाटतंय ते सांगण्यासाठी लागणारे शब्द माहिती नसणं, वाक्यरचना करता न येणं, थोडं मोठं झाल्यावर भिती वाटणं, स्वातंत्र्य नसणं अशा अनेक अडथळ्यांमुळे चित्रातून, रेघोट्यातून अगदी मोठी मुलंही बोलत असतात.. प्लीज हे लक्षात घ्या.

श्रद्धा, अगदी खरंय. नीट समजावल्यावर ऐकतात मुलं. हल्लीचीही.

अहो लहान मुले असतांनाच भिंती रंगवतील. मोठे झाली की ते रंगवतील काय? अन त्यांच्या आनंदापुढे भिंतीला रंग देण्याचा खर्च तो कितीक?
सृजनशील कला आहे ती लहान मुलांची.

भिंतीवर गिरगीट करणे हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो त्यांना मिळायलाच हवा!
घरातली एक खोली निदान एक भिंततरी त्यांना नक्कीच द्यावी. श्र ला अनुमोदन, आपलं-दुसर्‍याचे घर नीट समजावून सांगितले की प्रॉब्लेम होत नाही असा माझा अनुभव.

कोणी मुले जमिनीवर लिहीतात का? मला जमिनीवर खडूने पूर्ण रस्त्याचे जाळे( इन्सेप्शन च्या मेझ सारखे) काढून त्यात तासंतास कार फिरवत बसायची सवय होती. कार, एक रथ, एक दोन प्राणी एक दोन बाहुल्या असे नेहमी ह्या रोडवर कुठे कुठे फिरत बसत व त्यातून काही काही कथा निर्माण होत. <<<
किती छान!!

थोडा मटेरिअल त्रास सोसून का होईना आपल्या घरात त्यांचे कल्पना विश्व मोहरू द्यावे. <<< +१०००

मग हीच मुल ( ज्यांना घरात अशी रेघोट्या ओढण्याची मुभा मिळते) सार्वजनिक ठिकाणी ( शौचालयात किव्वा सार्वजनिक ट्रेन मध्ये /बस मध्ये) हातातल्या पेनने/ खडूने किव्वा अगदी नखाने सुद्धा समोरच्या सीट वर रेघोट्या ओढण्याची नाहीतर नखाने खरवडून काढण्याचे उपद्व्याप करतात <<<
असे काहीही नसते.
अनेक मित्रमैत्रिणींच्या घरी मुलांना भिंतीवर कलाकारी करण्याची मुभा बघितलीये. ह्यातली बरीचशी मुलं आता मोठी झालेली आहेत. सार्वजनिक जीवनातले त्यांचे वागणे हे कुणीही शिकावे असे आहे. मोठ्यांना ज्या गोष्टी पटकन समजत नाहीत (प्रवासात खाल्लेल्या वस्तूंचे अवशेष गाडीच्या खिडकीतून बाहेर भिरकावून न देणे, सार्वजनिक ठिकाणी बसायच्या जागी चपला घालून पाय न देणे वगैरे) त्या त्यांना उत्तम समजतायत.

बाकी ग्राफिटी ही पण एक कला आहे. त्याचा इतिहास अश्या रेघोट्यांमधूनच आलेला आहे.

आणि ही समस्या नाही, << +१०००

माझ्या लेकीला पूर्ण मुभा होती आणि तिने त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. सर्व घराच्या सर्व भिंती, दारं, टिव्ही वगैरे सगळं आलं त्यात. कोणी आलेली लोकं विचारायची तर आम्ही ही आमच्या मुलीची आर्ट गॅलरी आहे असं अभिमानानं सांगत असू. पुन्हा ते दिवस येत नाहीत. आमचं घर भाड्याचं होतं त्यामुळे उलट अजिबातच काळजी वाटली नाही. घर सोडताना छानपैकी रंगवून मालकच्या हातात देऊ असं ठरवलं होतं आणि तेच केलं. एकदम नव्याप्रमाणे घर करून दिलं.

स्वतःच्या घराच्या भिंतीवर चितारायची म्हणून दुसर्‍याकडेही जाऊन करतील ही भिती खरी नाही. मुलांना आपलं घर, दुसर्‍याचं घर कळतं. फारतर आधी समजावून सांगून घेऊन जावे. आणि इतर कोणाकडे गेल्यावर मुलाच्या हातात खडू, क्रेयॉन, पेनपेन्सिल येणार नाही याची काळजी घ्यावी.

वयाच्या चौथ्यावर्षानंतर आपोआपच सगळं कमी झालं. लेक साडेचार वर्षांची असताना आमच्या स्वतःच्या घरात आलो त्यावेळी एक मोठा फळा आणून लावला. आणि आता भिंती खराब करू नकोस सांगितलं तर कधीच नंतर तिनं हे प्रकार केले नाहीत.

मध्यंतरी इतक्या वर्षांनंतर एका छानशा पांढर्‍या पिलोकव्हरवर ऑरेंज रंगाचं फूल दिसलं. ती नुकतीच काढलेली कला आहे हे लक्षात आलं. पण ते फूल इतकं गोड वाटतंय त्या पिलोकव्हरवर!

सध्या जेलपेननं स्वतःच्या हातापायावर डूडल करणे, डिझाईन्स काढणे वगैरे सुरू आहे. आपणही यातून गेलो आहोतच की! Happy

Nalini agadi mi kal parwa pasun asa kahi bb aahe ka mayboliwar hech search karat hote.....
Mazi mulgi 3 years aahe.,,, ti agdi pencil wagere hati aale ki lagech bhintikade dhav gete aani kahitari kadhtech bhintiwar,Aamhi last weekmadhech flat badala aahe...purvichya flat la paint karun dyava laglach ,,,,pan ithe aata agdi navin construction aahe.....mi sadhyatari pencil/cryons fakt me jawal asel tevach dete tila baki wela lapun thewawe lagte......

आमच्या घरातल्या हॉलची सर्वात मोठी भिंत पूर्ण रिकामी करुन आम्ही दोन्ही मुलींना त्यावर मनसोक्त रंगवारंगवी करायला वाव दिला होता. आधी हे मुद्दाम नाही झालं. पण एकदा मोठ्ठा फराटा दिसला तेव्हा पुसून जाईना म्हणून राहू दिला. रंगवायचीच आहे भिंत म्हणून. मग ती भरत गेली. दोघी मुली चक्क शाळा शाळाही खेळायच्या त्यावरच. मधल्या काळात एकदा रंग काढून झाला तेव्हाही ती भिंत रंगवली नाही. त्यावर मुलींनी रेघोट्या, लिहायला शिकल्यावर केलेली एकमेकींना,घरातल्यांना उद्देशून केलेली ग्राफिटी, चित्रं असं सगळं होतं. घरी आलेले पाहुने सुरुवातीला नाकं मुरडायचे, मग कुतूहलाने जवळ जाऊन निरखायचे. हळू हळू सॉलिड फेमस झाली होती बिल्डिंगमधे आमच्या घरातली भिंत. मजा आली त्या काळात.

माझ्या मुलाच्या वाढीच्या काळात आम्ही (सुदैवाने) टेरेस प्लॅटमधे रहायचो. टेरेसच्या फरश्या खरखरीत फिनिशच्या होत्या. मग मी मुलाला खडूंचा बॉक्स आणून दिला. (शाळाशिक्षक वापरतात तसले खडू) त्यांनी तो गच्चीतल्या फरशीवर मनसोक्त गिरगटायचा. आम्ही पण कधीतरी त्यात हात मारून घ्यायचो. माझ्या शेजारणीला मी त्याला हे करू देते याचं फार्फार नवल वाटायचं. तिचाही मुलगा आमच्या गच्चीत येऊन गिरबटवायचा. दोघं टीचर-टीचर खेळायचे. एकदा दोघांनी मिळून ८-१० खडू नुसते फरशीवर घासून घासून संपवले. मी काही बोलले नाही. असं ३-४वेळा झालं. पुढल्या वेळेला खडूचा नवीन बॉक्स मी ठरवून ८-१० दिवस उशीरा आणला. मग ते थांबलं.

स्वतःचं घर घेतलं, तोवर मुलगा थोडा मोठा झाला होता. टेरेस अर्थातच नव्हती. पण मुलाला त्याच्या खोलीच्या ३ दरवाज्यांवर, वॉर्डरोबच्या २ दारांवर, स्टडी कॅबिनेटच्या ४ दारांवर पेंटिंगची पूर्ण मुभा होती. त्यानं त्यांवर खूप छान छान चित्रं रंगवली. त्यासाठी त्याला अ‍ॅक्रिलिक रंगही मी आणून दिले होते. मला चांगलं लक्षात राहिलंय, ते बीजिंग ऑलिंपिकच्या ज्योतीचं त्यानं रंगवलेलं मोठं २-३ फुटी चित्र.
ते घर सोडताना त्याच्यापेक्षा मलाच जास्त वाईट वाटलं होतं.

मुलाचा व्यक्त होण्याचा मार्ग असतो तो. ( हा उद्योग ते बहुदा एकटे असतानाच किंवा त्यांच्याशी कुणी बोलत नसतानाच केला जातो ) त्यांच्यासाठी ते केवळ चित्र नसते. त्यातल्या सर्व वस्तू त्यांच्यासाठी खर्‍याखुर्‍या असतात. कागदाचेही बंधन त्यांना मान्य नसते पहिल्यांदा ( अनुबाईची नदी कागदाबाहेर वहायची आणि पक्षी बाहेर उडून जायचे ).... त्यामूळे व्यक्त होऊ द्यावे. त्याबद्दल विचारावे. त्यात रस घ्यावा.

भिंतींना परत रंग कधीही लावता येतो.

ही उर्मी आपल्यातही टिकतेच. ( मायबोली काय किंवा फेसबुक काय, आपल्यासाठी भिंतीच आहेत कि ) बंधने पाळायला नंतर शिकतोच आपण.

Pages