संगीत-आस्वादगट :)

Submitted by चैतन्य दीक्षित on 29 July, 2014 - 08:35

नमस्कार मंडळी

शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे या धाग्यावरच्या चर्चेतून संगीतविषयक कार्यशाळा घेतली जावी अशी कल्पना पुढे आली.
कार्यशाळा घेण्याइतपत माझी पात्रता नाही, पण मी जे शास्त्रीय संगीत आवडीने ऐकतो, त्याचा आनंद लुटतो, तोच आनंद इतरांनाही मिळावा, त्यांनाही शास्त्रीय संगीताची गोडी लागावी, ज्यांना आधीच शास्त्रीय संगीताची गोडी वाटते त्यांना त्यातील तंत्राचा भाग अजून चांगल्या प्रकारे कळावा, अशा उद्देशाने एक शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेणारा गट तयार करावा असे माझ्या मनात आहे. ज्यांना थोडं किंवा फार येतंय अशांनी त्यांच्यापेक्षाही थोडं किंवा अजिबात येत नाही अशांना ते ज्ञान देणं अशी शास्त्रीय संगीतविषयक देवाण-घेवाण व्हावी असा या गटाचा उद्देश असेल. गटाचे सर्वसाधारण स्वरूप (जे माझ्या डोक्यात आहे) ते पुढीलप्रमाणे. यात कुणाला काही सुधारणा सुचवावीशी वाटली किंवा पूर्णपणे वेगळी कल्पना मांडावीशी वाटली तर स्वागतच आहे.

१) स्थळ- पुणे
सुरुवातीला पुण्यातल्या मायबोलीकर आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी यांच्यापैकी जे इच्छुक आहेत अशांचा एक गट तयार करायचा.
पुण्यात कुठे भेटायचे हे इच्छुक ज्या भागात राहतात त्यावरून ठरवावे लागेल.

२) वेळ- महिन्यातून एकदा/ दोनदा
सगळ्यांकडे किती वेळ उपलब्ध असेल याची खात्री नसल्याने महिन्यातून किमान एकदा भेटावे. सगळ्यांच्या वेळा जुळल्यास दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळाही भेटता येईल. किंवा जवळपासच्या भागात राहणारे मायबोलीकर स्वतंत्रपणेही भेटू शकतीलच.

३) उपक्रम- प्रत्येक भेटीच्यावेळी (आधी) एखादा राग/ ताल/वाद्य/ गायक- गायिका ठरवून त्या रागाची प्रस्तुती सगळ्यांनी मिळून ऐकणे. (कमाल ३० मिनिटे)
हे ऐकणे चालू असताना, शक्यतो कुठलेही स्पष्टीकरण टाळून, ऐकून झाल्यावर, रागाबद्दल/ तालाबद्दल ज्याला जी जी माहिती आहे ती त्याने द्यावी.
ज्याला त्यातला जो भाग उमगला तो भाग त्याने / तिने सगळ्यांना सांगावा.
गटात काही जण अगदीच नवखे असू शकतात ही शक्यता गृहित धरून शक्य तितक्या बेसिक पातळीवर स्पष्टीकरण द्यावे. बर्‍याचदा, आपण भिडस्त होऊन, माहिती असूनही काही बोलत नाही- यावरही मात करता येईल Happy

४) शक्य झाल्यास- काही तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून डेमो किंवा काही माहिती घेणेही जमेल असे वाटते आहे.
आपल्या मायबोलीवर शास्त्रीय संगीतातली अनेक जाणकार मंडळी आहेत उदा- दाद, अनिलभाई, अनिताताई, अगो, रैना, हिम्सकूल.सगळेच पुण्यात नाहीत खरे, पण ऑफलाईन त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळते का तेही पाहता येईल (हे अगदीच गृहित धरल्यासारखे लिहिले आहे खरे, पण अशी मदत मिळेल याची खात्री आहे).
जे पुण्यात आहेत त्यांना या गटात सामील होण्याची आग्रहाची विनंती _/\_

५) सुरुवातीला एक-दोन महिने या गटाचे भेटणे कितपत नियमित होते आहे ते पाहून पुण्यात नसलेल्या परंतु गटात येऊ इच्छिणार्‍या मित्र-मैत्रिणींना 'स्काईप' द्वारे गटात घेणे शक्य आहे.

सुरुवात-
खालीलपैकी कोणत्याही एका दिवशी सुरुवात करता येऊ शकेल.

६ सप्टेंबर (शनिवार)- गणपतीचा काळ आहे त्यामुळे किती जणांना जमेल हे सांगणे अवघड आहे, पण गणपतीच्या मंगलमय दिवसात सुरुवात होऊ शकेल Happy

१३ किंवा २० सप्टेंबर (शनिवार)- गणपती संपून पितृपक्ष चालू असेल त्यामुळे घरी सण आहे म्हणून जमणार नाही इ. कारणे नसतील आणि बर्‍याच लोकांना जमू शकेल.

इच्छुकांनी मला वि.पु. मधून सांगितले तरी चालेल.
किंवा संपर्कातून ई-मेल केला तरी चालेल.

पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की मला फार काही येतं असं नाही, पण शास्त्रीय संगीताचा आस्वाद अनेकांना घेता यावा हा एकमेव उद्देश मनात आहे. त्यामुळे जितके म्हणून मला येतंय/ माहिती आहे ते मी नक्कीच सांगू शकेन.
माझी खात्री आहे की मला योग्य वेळी योग्य ती मदत मायबोलीकर जाणकार आणि माझ्या परिचयातील कलाकार मंडळींकडून नक्की मिळेल.

-चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कल्पना, मला यायला आवडेल पण जमेलच असे नाही (रात्र थोडी सोंगे फार अशी अवस्था आहे) त्यामुळे हात वर करत नाहीये पण ह्या उपक्रमासाठी अनेकानेक शुभेच्छा Happy

जमणार्‍या एखाद्याच वेळेपुरते आलेले चालेल का?

जमेल ती मदत नक्की करणार. मला तर अस वाटतय की मलाच ह्यातुन बरच काही शिकायला मिळेल.

टायमींगच जमवा प्लिज. Happy

हर्पेन, जमेल तेव्हा आलास तरी चालेल की.
जाई, मुंबईत असलात तरी तुम्ही गटात येऊ शकता.
शाक्य झाले तर मुंबईत राहणा-या मायबोलीकरांचा एखादा गट तयार होऊ शकेल.

अरे वा, मी येणार नक्की. वेळ, दिवस तू ठरवशील तो . मनापासून धन्यवाद रे Happy
आणि माझ्या घरीपण चालेल, आठएक जणं माऊ शकतील हॉलमधे.

धागा आला पण Happy
चैतन्य, तुला ६ सप्टेंबर आणि १३/२० सप्टेंबर असं लिहायचंय बहुतेक. ६ ऑगस्ट म्हणजे पुढच्या आठवड्यात !
वेळ, दिवस सोयीचा असेल तर नक्की येईन.

अगो,
धन्यवाद, मी चुकून ऑगस्ट लिहिले होते. दुरुस्त केले आहे.
६, १३, २० सप्टेंबर यापैकी जो शनिवार सगळ्यांच्या सोयीचा असेल त्या शनिवारी भेटूया.

अवल,
कुठे भेटायचे हे सगळ्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून असेल.
पण सोयीचे ठरत असेल तर तुमच्या घरीही भेटू शकतो नक्कीच Happy

इच्छुकांना स्काईपच्या माध्यमातूनही सहभागी होता येईल खरे, पण स्काईपच्या सेटिंगमध्ये बर्‍यापैकी वेळ जातो असा अनुभव आहे. एकदा इच्छुकांची यादी तयार झाली की कसे करता येईल ते बघूया.

अजून कुणाच्या डोक्यात काही वेगळी कल्पना आहे का? असेल तर नक्की कळवा.

अरे वा! मस्त!

चैतन्य, तुला म्हटल्याप्रमाणे मी २-३ महिन्यात एकदा येण्याचा प्रयत्न नक्की करेन. स्काइप असले तर मस्तच.

स्काईप नसेलच जमत तर तुमच्या मैफिलीचे रेकॉर्डींग करून ते मायबोलीवर देता येऊ शकेल का?

आणि मैफिलीत जी चर्चा होइल ती वृत्तांतबद्ध करा. तो वृत्तांत आणि सोबत काय ऐकले (जमल्यास त्याचे दुवे) असे मायबोलीवरच प्रकाशीत केले तर सुंदर माहिती जमा होइल.

मी भारतात असतो तर नक्कीच या गटात सहभागी झालो असतो. या प्रत्येक भेटीचा थोडक्यात अहवाल इथेच लिहावा हि विनंती. तसेच जी रचना चर्चेला घेतली असेल ती नेटवर उपलब्ध असेल तर त्याचीही लिंक द्यावी.

चर्चेला एखादे शास्त्रीय गायन वादनच घ्यावे असे नाही तर एखादे ललित वा उपशास्त्रीय गायनदेखील असावे.
सध्या लोकसत्ता मधे, मृदुला दाढे हिंदी संगीतकारांबद्दल अप्रतिम लेख लिहीत आहेत. आधीच आवडीची असलेली
गाणी त्यांच्या लेखनामूळे जास्तच आवडायला लागली आहेत. तसे काहीसे करता आले, खास करून मराठी गाण्यांबद्दल, तर फारच छान ! शुभेच्छा आहेतच.

सुमेधाव्ही,
१५ सप्टेंबरपासून चालेल की. स्वागत आहे.
माधव, दिनेशदा-
तुमच्या सूचना उपयुक्त आहेत.
वृत्तांतबद्ध करणे, लिंक देणे आणि शास्त्रीयच नाही पण 'सेमी-क्लासिकल' गटात मोडणार्‍या गाण्यांचीही चर्चा होईल असे बघतो. विशेषतः मराठी गाण्यांबद्दल चर्चा होईल असे बघतो.

माधव,
मैफिलीचे रेकॉर्डिंग करण्यापेक्षा वृत्तांतबद्ध करणे जास्त सोयीचे ठरेलसे वाटते.

मी इन आहे.
माझ्यामते मुंबईकरांचा एक गट बनवावा. अनिताताई इ. च्या मार्गदर्शनाखाली महिन्यातुन एकदा भेतु शकतो.
आणि २-३ महिन्यातुन एकदा पुणे- मुंबई करांचे संयुक्त गटग करता येइल.
मुंबई तील इच्छुक-
१. देव काका
२. जाई
३. अनिताताई
४. मी

उत्तम उपक्रम. तुम्हाला शास्त्त्रीय माहिती हवी असल्यास सौ सुनीता खाडीलकर ह्यांना काँटॅक्ट करा त्यांचे आता वय झाले आहे. एस एन डीटी महाविद्यालयाच्या त्या संगीत विभागाच्या प्रमूख होत्या व अभिज्ञान मंडळ असा गट चालवत आहेत. त्या स्वतः माहिती देउ शकल्यानाहीत वयोमाना प्रमाणे तरीही एखाद्या व्यक्तीचा रेफरन्स देतील. डेक्कन जिम खान्यावर पांचाळेश्वर मंदिराशेजारी भागवत बिल्डिन्ग आहे तिथे त्या राहतात तिसर्‍या मजल्यावर. त्यांच्याकडे मंडळाच्या कार्यक्रमांची रेकॉर्डिन्ग्ज वगैरे आहेत. अतिशय उत्तम रिसोर्स.

मुग्धानन्द,

छानच. मलाही असेच सुचवायचे होते.
तर मग मुंबईच्या गटाचे संयोजन तुम्ही बघा.

दोन्ही गटातील चर्चा इ, ह्या धाग्यावर येऊ द्या.
मी धाग्याच्या नावातून 'पुणे' काढून टाकतो Happy

अमा,
धन्यवाद ह्या माहितीबद्दल.
त्यांच्याशी संपर्क साधतो.

पुणे इच्छुक गट-
१)चैतन्य
२)अगो
३) अवल
४) सुमेधाव्ही
५)हर्पेन

सुमेधाव्ही यांना १५ सप्टेंबर नंतर जमेल असे असल्याने आपण २० सप्टेंबरला भेटायचे का पुण्यात?

चैतन्य. त्या माझ्या सासू बाई लागतात. अतिशय चांगली माहिती त्या देउ शकतील. कारण मी लहान असताना पासून त्यांना इतरांना शिकवताना पाहिले ऐकले आहे. त्यांच्याकडे उत्तम संग्रह पण आहे. टेप्स सीडी व्हिडीओ सीडीवर आहे. अभिज्ञान मंडळातही अनेक उत्तम कलाकार येउन गेले आहेत. व त्यांचा जनसंग्रह फारच चांगला आहे. करेक्ट माणूस शोधून देतील. त्यांचे वय आता ८०च्या पुढे आहे तब्येत नरम असते.

अमा.. मी प्रत्यक्ष अजून भेटलो नाहीये त्यांना.. पण त्यांची एक सीडी आहे आमच्याकडे.. त्यांचा आणि माझ्या आजोबांचा चांगला स्नेह आहे.. अभिज्ञानच्या बहुतेक कार्यक्रमांना आजोबा जातात. आणि आमच्याकडच्या कार्यक्रमांना त्या उपस्थित असतात..

चैतन्य.. मी यायचा प्रयत्न करेन.. पण नक्की सांगणे शेवटपर्यंत अवघड आहे.

पुणेकर इच्छुक मंडळी,
कधी भेटू शकतो ते कळवाल का?
सुमेधाव्ही यांच्या म्हणण्यानुसार, त्या १५ सप्टेंबर नंतर जॉइन होतील.
आपण २० सप्टेंबरला भेटायचे? की आधी भेटू शकतो ते कळवा.

कोथरूड/ सिंहगड रस्ता परिसरात कुठे तरी भेटू शकतो.
जर सगळ्यांच्या सोयीचे नसेल तर दुसरीकडेही भेटणे शक्य आहे.
मी सिंहगड रस्त्यावर राहतो, पण पुण्यात कुठेही यायची तयारी आहे.

कधी भेटायचे हे ठरले की कुठे भेटायचे ते ठरवूया.

-

Pages