संगीत-आस्वादगट :)

Submitted by चैतन्य दीक्षित on 29 July, 2014 - 08:35

नमस्कार मंडळी

शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे या धाग्यावरच्या चर्चेतून संगीतविषयक कार्यशाळा घेतली जावी अशी कल्पना पुढे आली.
कार्यशाळा घेण्याइतपत माझी पात्रता नाही, पण मी जे शास्त्रीय संगीत आवडीने ऐकतो, त्याचा आनंद लुटतो, तोच आनंद इतरांनाही मिळावा, त्यांनाही शास्त्रीय संगीताची गोडी लागावी, ज्यांना आधीच शास्त्रीय संगीताची गोडी वाटते त्यांना त्यातील तंत्राचा भाग अजून चांगल्या प्रकारे कळावा, अशा उद्देशाने एक शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेणारा गट तयार करावा असे माझ्या मनात आहे. ज्यांना थोडं किंवा फार येतंय अशांनी त्यांच्यापेक्षाही थोडं किंवा अजिबात येत नाही अशांना ते ज्ञान देणं अशी शास्त्रीय संगीतविषयक देवाण-घेवाण व्हावी असा या गटाचा उद्देश असेल. गटाचे सर्वसाधारण स्वरूप (जे माझ्या डोक्यात आहे) ते पुढीलप्रमाणे. यात कुणाला काही सुधारणा सुचवावीशी वाटली किंवा पूर्णपणे वेगळी कल्पना मांडावीशी वाटली तर स्वागतच आहे.

१) स्थळ- पुणे
सुरुवातीला पुण्यातल्या मायबोलीकर आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी यांच्यापैकी जे इच्छुक आहेत अशांचा एक गट तयार करायचा.
पुण्यात कुठे भेटायचे हे इच्छुक ज्या भागात राहतात त्यावरून ठरवावे लागेल.

२) वेळ- महिन्यातून एकदा/ दोनदा
सगळ्यांकडे किती वेळ उपलब्ध असेल याची खात्री नसल्याने महिन्यातून किमान एकदा भेटावे. सगळ्यांच्या वेळा जुळल्यास दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळाही भेटता येईल. किंवा जवळपासच्या भागात राहणारे मायबोलीकर स्वतंत्रपणेही भेटू शकतीलच.

३) उपक्रम- प्रत्येक भेटीच्यावेळी (आधी) एखादा राग/ ताल/वाद्य/ गायक- गायिका ठरवून त्या रागाची प्रस्तुती सगळ्यांनी मिळून ऐकणे. (कमाल ३० मिनिटे)
हे ऐकणे चालू असताना, शक्यतो कुठलेही स्पष्टीकरण टाळून, ऐकून झाल्यावर, रागाबद्दल/ तालाबद्दल ज्याला जी जी माहिती आहे ती त्याने द्यावी.
ज्याला त्यातला जो भाग उमगला तो भाग त्याने / तिने सगळ्यांना सांगावा.
गटात काही जण अगदीच नवखे असू शकतात ही शक्यता गृहित धरून शक्य तितक्या बेसिक पातळीवर स्पष्टीकरण द्यावे. बर्‍याचदा, आपण भिडस्त होऊन, माहिती असूनही काही बोलत नाही- यावरही मात करता येईल Happy

४) शक्य झाल्यास- काही तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून डेमो किंवा काही माहिती घेणेही जमेल असे वाटते आहे.
आपल्या मायबोलीवर शास्त्रीय संगीतातली अनेक जाणकार मंडळी आहेत उदा- दाद, अनिलभाई, अनिताताई, अगो, रैना, हिम्सकूल.सगळेच पुण्यात नाहीत खरे, पण ऑफलाईन त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळते का तेही पाहता येईल (हे अगदीच गृहित धरल्यासारखे लिहिले आहे खरे, पण अशी मदत मिळेल याची खात्री आहे).
जे पुण्यात आहेत त्यांना या गटात सामील होण्याची आग्रहाची विनंती _/\_

५) सुरुवातीला एक-दोन महिने या गटाचे भेटणे कितपत नियमित होते आहे ते पाहून पुण्यात नसलेल्या परंतु गटात येऊ इच्छिणार्‍या मित्र-मैत्रिणींना 'स्काईप' द्वारे गटात घेणे शक्य आहे.

सुरुवात-
खालीलपैकी कोणत्याही एका दिवशी सुरुवात करता येऊ शकेल.

६ सप्टेंबर (शनिवार)- गणपतीचा काळ आहे त्यामुळे किती जणांना जमेल हे सांगणे अवघड आहे, पण गणपतीच्या मंगलमय दिवसात सुरुवात होऊ शकेल Happy

१३ किंवा २० सप्टेंबर (शनिवार)- गणपती संपून पितृपक्ष चालू असेल त्यामुळे घरी सण आहे म्हणून जमणार नाही इ. कारणे नसतील आणि बर्‍याच लोकांना जमू शकेल.

इच्छुकांनी मला वि.पु. मधून सांगितले तरी चालेल.
किंवा संपर्कातून ई-मेल केला तरी चालेल.

पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की मला फार काही येतं असं नाही, पण शास्त्रीय संगीताचा आस्वाद अनेकांना घेता यावा हा एकमेव उद्देश मनात आहे. त्यामुळे जितके म्हणून मला येतंय/ माहिती आहे ते मी नक्कीच सांगू शकेन.
माझी खात्री आहे की मला योग्य वेळी योग्य ती मदत मायबोलीकर जाणकार आणि माझ्या परिचयातील कलाकार मंडळींकडून नक्की मिळेल.

-चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है! ... मस्तच रंगलेली दिसतिये मैफल...
मी मिस केलं सगळं... पुढच्या वेळी नक्की येणार...

संगीत सोडुन जी गोष्ट मला स्वतःला भावली ती म्हणजे जिव्हाळा. या गटाचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की अगदी सोन्यासारखी माणसे भेटली. सई ला आधी भेटलो होतोच. पण चैतन्य-स्वरा, पुरंदरे काका, अवल, दक्षिणा, मयुरेश, राघवेंद्र, पराग. सगळ्यांशी पहिली भेट. मी सगळ्यात लहान म्हणुन भिती वाटत होती की कसं बोलायचं वगैरे, पण ती भीती किती अनाठायी होती हे चैतन्यला भेटल्यावरच समजले. पुरंदरे काकांनी मला ओळखत नसतानाही संगीतविषयक ऑडिओ पाठवला. अवल तर सगळ्यांच तोंडभरुन कौतुक करत होती. आणखी एक गोष्ट भावली ती म्हणजे चैतन्य आणि पराग ची नम्रता. एव्हढं अफाट ज्ञान असतानाही कुठेही अहंकार नाही. राघवेंद्रासारख्या कीर्तनकार असा म्हटला, गायिलेले सुर पेटीवर काढता येतात इतकंच, बाकी संगीताच मला ज्ञान नाही. किती विनम्र भाव. माझ्यासारख्या नुकतंच सतार शिकायला सुरु करुन अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊन उड्या मारणार्‍याला हा चांगला धडा होता. सईने मस्त जेवण करुन दिलं (जे संपु नये म्हणुन मी पुरवुन पुरवुन खाल्लं, दक्षिणासाठी चित्रावळी ठेऊन :फिदी:) मयुरेश मला घरी सोडायला आला. "मी फार ढं" असं म्हणत दक्षिणा सगळ्यांच सांत्वन करत होती. काहीही आधीची ओळख नसताना संगीत या धाग्यामुळे सगळे जोडले गेलो. अगदी समृध्द करणारा अनुभव. मायबोलीचे अनंत उपकार.
समान आवडीची माणसे भेटल्यावर खुप वर्षं तुंबलेल्या संगीतविषयक भावना अगदी उफाळुन वर आल्या. पं जसराज यांच्या गायनाविषयी तर खुपच सुरेख चर्चा झाली! Happy
असा ग्रुप तयार करुन त्याचा पाठपुरावा केल्याबद्दल चैतन्यचे पुन्हा एकदा दणदणीत आभार!
आता पुन्हा केव्हा भेटायचं,. घाई झाली आहे Happy पुढील भेटीमध्ये चैतन्यच्या बासरीचं आकर्षण पण आहेच.

हा गट मस्त फॉर्मात येत आहे. ह्या गटासाठी माबो वर येणे होत आहे.

संगीतविषयक काही माहिती मिळणार म्हणलं की खूप मस्त वाटतं. आणि ती मिळाली कि कळतं कि संगीतातलं मला काही ढेकळ माहित नाही.

The more you know, you start knowing how much you don't know हेच अगदी खर !

<<संगीतविषयक काही माहिती मिळणार म्हणलं की खूप मस्त वाटतं. आणि ती मिळाली कि कळतं कि संगीतातलं मला काही ढेकळ माहित नाही.>>
+++१११११
षड्जंपंचम... मनातलं.

मला आनंद याचाही होतो की माबोच्या पॉझिटीव्ह एनर्जीच्या सतत संपर्कात राहिलं जातंय यानिमित्ताने Happy

मंडळी, तुमच्या भरघोस प्रतिसादामुळे हुरूप वाढला आहे.
सई म्हणते तसं माबोच्या पॉझिटीव्ह एनर्जीच्या सतत संपर्कात राहिलं जातंय यानिमित्ताने.
मायबोलीचे खरंच अनंत उपकार आहेत.

ज्यांनी पुढच्या बैठकीला यायची इच्छा आहे त्यांना वि. पु. करतो आहे (काहींना केली आहे)
नियोजनाच्या दृष्टीने बरे जावे म्हणून मला माझ्या फोनवर मेसेज करा आणि सदस्यनाम सांगा.
माझा फोन नंबर-880-500-8848

-चैतन्य

अवल, सई, संगीत वृत्तांत मस्तच.खूपच छान उपक्रम. Happy
मला गाणी ऐकायला आवडतात.फ़क्त कानसेन. बाकी मी "ढ" आहे . पण वरची सगळी धमाल वाचून, निदान ऐकायला तरी यायला पाहिजे असं वाटतय. Happy

तूमच्या पुढच्या भेटीत, त्या रागावर आधारीत एक नेटवर उपलब्ध असलेले गाणे जरूर घ्या. आणि त्यात तो राग कितपत आहे, कुठे कुठे स्वातंत्र्य घेतले आहे. कुठल्या ओळीत / शब्दात कुठले स्वर वापरले आहेत.. हे लिहा किंवा त्याची ऑडीओ क्लीप करून यू ट्यूबवर टाका.. म्हणजे ते गाणे ऐकत सगळ्यांनाच या चर्चेचा आनंद मिळवता येईल.

उदा. श्रावणात घननिळा बरसला मधला प्रत्येक अंतरा वेगळ्या सुरावर सुरु होतो, असे म्हणतात पण मला ते समजत नाही. गोरी गोरी पान मधे प्रत्येक सूर सुटा आहे असे सांगतात, तो कसा ?. जांभूळ पिकल्या झाडाखाली, मधे कॉर्ड सिस्टीम वापरलीय, म्हणजे काय ?

सगळ्यांचेच वृत्तांत सुंदर आहेत आणि मी बरेच काही गमावतोय याची जाणीव करून देणारे आहेत.

संगीतविषयक काही माहिती मिळणार म्हणलं की खूप मस्त वाटतं. आणि ती मिळाली कि कळतं कि संगीतातलं मला काही ढेकळ माहित नाही. >>> याला प्रचंड अनुमोदन.

आजच चैतन्यचा 'हे श्यामसुंदरा' वरचा लेख वाचला. गाणे प्रचंड आवडते आहे. लेख वाचताना थोडेसे काही डोक्यात शिरले बाकी बरेच डोक्यावरून गेले. जे डोक्यात शिरले तेच खूप सुंदर आहे. जे डोक्यात शिरत नाही ते अशा भेटीतून शिरायला मदत होइल असे माझे मत.

मुंबईत / ठाण्यात कोणी उत्सुक आहेत का अशा कार्यक्रमांकरता ?

माधव, नक्की जमवा मुंबईतही असा गट.
दिनेशदा, नक्की तसा प्रयत्न करू.
अजून पुरती घडी बसली नाही, पण अनेकांची मदत मिळते आहे आणि मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही म्ह्णताय तसे काही रेकॉर्डिंग किंवा वृत्तांत देता येईल असे वाटते.
बी, स्काईपचं जमवायचं बघतो नक्की, तुम्हाला कळवतो तसे.

काल पुण्यातील संगीत आस्वाद गटाची दुसरी बैठक झाली-
पराग वनारसे यांच्याकडे सगळे एकत्र जमलो होतो. परागकडे अनेक जुन्या रेकॉर्ड्सचा संग्रह आहे. त्या संग्रहातील काही ध्वनिफिती/ ध्वनिचित्रफिती आम्ही ऐकल्या/ पाहिल्या. काल षड्जपंचम (नीलेश) हा गुणी सतार-विद्यार्थी (सतारवादक म्हणणे त्याला पटायचे नाही Happy ) आमच्या चमूत सामील झाला.
तसेच मी ज्यांच्याकडे बासरीचे प्राथमिक धडे गिरवले ते चेन्नईचे श्री. संजय शशिधरनही काल उपस्थित होते.
सुरुवातीला पं. राम नारायण यांची सारंगीवरची रागमाला पाहिली व ऐकली.
सारंगी हे वाद्य वाजवायला अतिशय कठिण. बोटांची नखे जिथून सुरु होतात त्या त्वचा आणि नखांच्या सीमारेषेने सारंगीच्या तारा दाबत गज घासून सारंगी वाजवली जाते. दुसरे म्हणजे, सतारीसारख्या पट्ट्या (तार कुठे दाबली की कोणता स्वर उमटेल हे दर्शविणार्‍या पट्ट्या) सारंगीवर नसतात त्यामुळे अंदाजानेच तारा दाबाव्या लागतात. त्यातून रागमाला वाजवताना एका रागातून दुसर्‍या रागात (खंड वाटू न देता) जावे लागते. या सर्वच मुद्द्यांमुळे, पं. राम नारायण यांचे सारंगीवादन फार भावले. त्यात येणारे राग ओळखणे हाही एक 'फन अ‍ॅण्ड लर्न' भाग होता.
त्यानंतर, बाई सुंदराबाई यांचा जोगिया (पिया गये परदेस) ऐकला. बाई सुदराबाई या ठुमरी गाणार्‍या पहिल्या मराठी कलाकार! अक्षरशः काळजात घुसणारी आवाजाची फेक. फार 'गिम्मिक्स' नसलेली साधी परंतु रागशुद्ध गायकी, ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये. "गाताना गायकाचं संपूर्ण शरीर व्हायब्रेट झालं पाहिजे. मी गात असताना माझ्या शरीराचा कण न कण व्हायब्रेट होत असतो." हे कुमारांचं वाक्य पूर्वीची गायक मंडळी जगत असली पाहिजेत हे जाणवत होतं सुंदराबाईंचं गायन ऐकताना.
त्यानंतर भीमसेन जोशींचा पुरिया धनाश्री ऐकला व पाहिला. स्वरांचे लगाव,१८-१८ सेकंदापर्यंत टिकणार्‍या दमसासयुक्त ताना आणि इतके सगळे असूनही रागाचा भाव अत्युत्कटरीत्या प्रकट होत होता.
त्यानंतर सुरश्री केसरबाई केरकरांचा मालकंस ऐकला. तानांचा काहीसा ठराविक पॅटर्न असला तरीही कसदार गायनाचा अनुभव सार्‍यांनी घेतला.
मध्यंतरात- हिंदुस्थानी आणि कर्नाटकी स्वर-पद्धतीबद्दल चर्चा झाली. आणि श्री. संजय यांनी बासरीवर कर्नाटकी राग नट भैरवी सादर केला. कर्नाटकी शैली आणि हिंदुस्थानी शैली यातील फरक यावर चर्चा झाली. मुख्यत्वे गमकयुक्त गायन-वादन हे कर्नाटकी संगीताचे वैशिष्ट्य. हिंदुस्थानी संगीतात गमकाचा अभाव नसला तरीही अति-गमक-युक्त गायन नसते. गमकाचा रागाच्या भावोत्पत्तीसाठी योग्य तेवढाच वापर केला जातो.
नंतर त्यांना कर्नाटकी मोहनम् (हिंदुस्थानी भूप) वाजवायची विनंती केली असता, त्यांनी,"हा राग हिंदुस्थानी पद्धतीतच चांगला वाटतो" असे प्रांजळपणे सांगितले.
उत्तरार्थात उ. आमीर खाँ साहेबांवरची डोक्युमेंटरी बघितली. षड्जपंचमच्या लेखाची आठवण काढत काढत, खाँसाहेबांच्या गायकीच्या वैशिष्ट्याबद्दल तसेच त्याकाळच्या लोकांच्या सहजपणाबद्दल बोलत बोलत डॉक्युमेंटरी पाहिली. खाँसाहेबांचा मारवा संपूर्ण ऐकला. खॉसाहेब हे स्वतःसाठी गाणारे होते हे पदोपदी त्यांच्या गायनात जाणवत होते. सरते शेवटी हळू आवाजात कुमारांच्या भूपाचा आणि चहाचा आस्वाद घेतला:)
तो भूप चालू असतानाच, नाइलाजानेच परागच्या घरातून आम्ही निघालो.
परागकडे अजूनही बरंच काही ऐकवण्यासारखं होतं. परंतु वेळेच्या मर्यादेमुळे कार्यक्रम आटोपता घेतला.
कौतुक शिरोडकर यांचा एक भन्नाट प्रश्न- शिंपी चुकला मापात आणि फॅशन आली लोकात असं म्हणतात.
मग जर गवई गाताना चुकला तर नवा राग निर्माण होतो का?
काय असावं बरं उत्तर?
(वरीलप्रमाणे वृत्तांत लिहून कितपत उपयोग होईल, न जाणे. प्रत्यक्ष ऐकायला मिळणे हे जास्त महत्वाचे आहे असे वाटते. पुढल्या वेळी, शक्य झाल्यास जे काही ऐकले त्याची लिंक द्यायचा प्रयत्न करेन. पंडितजींचा पुरिया धनाश्री यूट्यूबवर आहे. नक्की ऐका. बहुतेक आमीर खाँसाहेबांवरची डॉक्युमेंटरीही आहे)

दिनेशदा, तुमची बेचैनी समजू शकतो.
तुम्ही भारतात आलात की एकदा भेटायचंय नक्की.
बी, स्काइप किंवा hang out चा प्रॉब्लेम असा आहे की सेटिंगमध्येच वेळ जातो. कालही दाद, kulu hangout वर होते, पण नेटच्या स्पीडमुळे काहीच बोलणं होऊ शकलं नाही.
म्हणून तर त्रोटक का होईना वृत्तांत द्यायचा प्रयत्न करतोय.
मी_आर्या, छान, ऐकत रहा.

मस्तच.. पण आम्ही मिस करतोय,
>>स्काइप किंवा hang out चा प्रॉब्लेम असा आहे की सेटिंगमध्येच वेळ जातो<<
खरेय ते, पण पूढल्या बैठकीची मला पण कल्पना द्या काही जुगाड जमतेय का बघतो. या विषयी दादशी पण बोलतो..

चैतन्य.मलाही यायला आवडेल.पुण्यातील संगीत आस्वाद गटाची पुढची बैठक केव्हा आहे? क्रुपया कळवावे.

Pages