माह्यराची वढं

Submitted by संतोष वाटपाडे on 27 July, 2014 - 08:59

बाबा येतोय आज..... मला माहेरी घेऊन जायला माझा बाबा येतोय....पहाटेच निघणार होता बैलगाडी घेऊन...एवढ्यात यायला हवा होता ....ऊन्हं दारात येऊन लोळायला लागलीत...नदिपल्याडच्या हिरव्या माथ्यावर काहीतरी दिसतंय... माझ्या बाबाची गाडी असेल नक्कीच....हो हो बैलगाड़ीच आहे....

बैलगाडीच्या चाकाचा
दूर धुराळा दिसतो
पितळाच्या घुंगराचा
नाद कानात घुमतो
म्होरं बसून जोरात...
बाबा असावा हाकीत
बैल लाडका आईचा
धापा चालला टाकीत...

घुंगरांचा आवाज जवळजवळ येत चाललाय.....आडवाटेवर उडणारी धुळ जणू मला माहेरी घेऊन जाण्यास स्वतः गाडीसोबत धावत येतेय.....रस्ता तुडवत तुडवत बैलगाड़ी जसजशी पुढे सरकतेय तसतशी माझी ओढ वाढत चाललीय

दारामधी वासराचा
जीव याकुळ याकुळ
पायाखाली घुटमळं
वल्ल्या मातीचा ढेकुळ....
सासू बोलना कधीची
धनी रुसले खोलीत
जाळ ढणाणा पेटला
माझ्या गबाळ्या चुलीतं...

बरडावरच्या खडकात चाकोरीचा आवाज करत करत बैलगाडी आडव्या वाटणीत शिरली..."रामराम्म्म"...बाबाची ओळखीची आरोळी लांबूनच ऐकायला आली....पायांना वेग आला.....चेहर्‍यावर वेगळाच आनंद अन मनात कुठेतरी रुखरुख

बैल हंबरला दारी
गाडी आली परसात
फ़ेटा हातात घेऊन
बाबा घुसला घरात...
माझ्या पायात बांधले
जसे चाळ नाचायाला
नका थांबवू कोणीबी
आज माह्यरा जायाला...

आठ दिवसांचे कपडे...चिवडा लाडू ..सगळं काही बाचक्यात बांधून ठेवलंय....या खोलीतून त्या खोलीत केव्हाच्या चकरा मारतेय...अंगणात अनेक वेळा जाऊन आलेय....काय होतंय कळेना

पाय बाह्यर ढळंना
काय बोलावं कळंना
जीव अडकला माझा
येळ जायाची टळंना...
शेजारची यडी काकू
डोळे काहुनं पुशीती
तिची लेक खिडकीत
गोड गालात हासती...

कपड्याचं गाठोडं घेऊन बाबा गाडीत जाऊन बसला....मळ्यातले सगळे लोक अंगणात येऊन उभे राहिलेत.... पाणावलेले डोळ्यांनी मला निरोप द्यायला लगबगीने काठी टेकत टेकत म्हातार्‍याही येऊन दगडावर बसल्यात....

येते जाऊन माह्यरा
पुन्हा आपल्या मळ्यात
समजावू आता किती
सासू पडली गळ्यात...
घोंगडीची वळकटी
व्हती बसाया गाडीत
हात हालविते जड
तोंड झाकले साडीत...

बांधावरून वेगाने पळणार्‍या बैलगाडीमागे मळ्यातली सगळी झाडे घरे पळताना दिसतायेत....घरच्या कुत्रीचं पिलू दुडूदुडू पळत मागे येतंय....मला हाक मारतंय..

जा रे माघारी लेकरा
नको धावू येड्यावानी
तुबी आला माझ्यामागं
घर राखायचं कोणी....

सुसाट वेगानं बैलगाडी शेतातून बरडात बरडातून रानाकडे निघाली.....हिरव्यागार झाडातं लपलेलं माझं घर नजरेआड होत चाललं.... सारंकाही येताना बांधून आणलं गाठोड्यात पण काहीतरी विसरले मी...काहीतरी राहून गेलं तिथेच...

बाई इसरले मन
माझ्या अंधार्‍या खोलीत
धनी बसला एकटा
दिस बोटानं मोजीत
दिस बोटानं मोजीत..............

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणार्या सासूरवाशिनीचे मनोगत नेमके व्यक्त झालेय. प्रचंड आवडली कविता आणि त्यामागचा अर्थही!