श्री क्षेत्र नारायणपूर

Submitted by ferfatka on 26 July, 2014 - 08:15

नेहमीच्याच ठिकाणी जाऊन कंटाळा आला होता. घरापासून अंदाजे ६५ किलोमीटरवर असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरला जायचे ठरले. राशीचा स्वामी गुरु म्हणून दहावीत असल्यापासून श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यास जायचा उपक्रम सुरू झाला. त्या नादाने मंदिरामागील पुरंदर किल्यावरही ट्रेकिंगच्या निमित्ताने अनेकवेळा वारी झाली होती. जमेल तेव्हा गुरुवारी जातच होतो. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली. शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले. पंढरपूरला पालखी पोहचून सुद्धा पाऊस आलेला नव्हता. पावसाची सर्वच लोक चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. गुरुवार असल्यामुळे श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. वाटेत लागणारी प्रेक्षणीय स्थळे यापूर्वी पाहिलेली होती. त्यामुळे तिकडे न जाता मंदिरात दत्त महाराजांचे दर्शन घेतले. पुरंदर तालुक्यातील सासवडला अनेक प्राचीन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. यातील काही स्थळे यापूर्वी पाहिली होती. पण त्याचे फोटो पूर्वी काढले नसल्याने त्या विषयी नंतर कधीतरी. सध्या नारायणपूर व नारायणेश्वर मंदिरा विषयी....

DSCN6107.jpgदिवे घाट :

नारायणपूरला जाणारे दोन तीन मार्ग आहेत. त्यापैकी हडपसरमार्गे सासवडवरून गाडीने जाण्यास निघालो. हडपसरमधील प्रचंड वाहतुककोंडी सुधारते आहे असे वाटले. घरातून निघून ऐव्हना पाऊणतास झाला होता. वाटेत कुठेच पाऊसाचे चिन्ह दिसेना. ढग मात्र, भरून आलेले होते. मायबाप सरकारच्या कृपेने हडपसर ते दिवेघाटापर्यंतचा रस्ता चांगलाच खाचखळग्यांनी तयार केलेला दिसला.

सासवडकडे जाताना वाटेत दिवे घाट लागतो. याच घाटाच्या पायथ्याशी एका कोपºयात पेशव्यांनी बांधलेला मस्तानी तलाव आहे. दोन वर्षांपूर्वी या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. बरेच ट्रक माती व गाळ काढण्यात आला होता. यंदा मात्र, तलावात थोडेच पाणी शिल्लक राहिलेले दिसून आले. पेशवाईत या तलावातून पुण्याला पाणी आणण्यात यायचे. पंढरपूरच्या वारीत याच मार्गाने तुकाराममहाराजांची पालखीही जाते. घाट सुरू होण्याआधी भेळेची काही दुकाने आहेत. त्या ठिकाणी आवर्जुन थांबून मटकी भेळ खा व घाट चढा मजा येते. पुण्याची वाढती ‘सुज’ या घाटातून अनुभवयाला मिळते. लांबवर दिसणाºया उंच उंच इमारती, त्यात दिसणारी छोटी शेतजमीन, मस्तानी तलाव, समोर दिसणारा कानिफनाथाचा डोंगर पाहून पुढे निघालो.

DSCN6061.jpgसासवड

सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सासवडला पूर्वी सहा वाड्या होत्या. कालांतराने त्या वाड्यांचे गावात रुपांतर झाले म्हणून ‘सासवड’ हे नाव पडले. प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते या सात वडांवरुन हे गाव ‘सातवड’ असे नावे पडले कालांतराने सातवडाचा उच्चार ‘सासवड’ बनला असावा अशी कहाणी सांगितली जाते. येथील अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व सासवडला आहे. सासवड हे मंदिरे आणि प्राचीन वाडयांचे गाव आहे.

ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान यांनी कºहा नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली होती. अश्या या सासवडला वटेश्वर, संगमेश्वर, सिध्देश्वर ही तीन पांडवकालीन शिवमंदिरे आहेत. मंदिरे खरच पाहण्यासारखी आहेत. संतश्रेष्ठ सोपानदेव, संत चांगदेव, श्रीदत्त महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, होळकर, पुरंदरे, पानसरे यांच्या कर्तृृत्वाने पावन झालेले हे सासवड हे गाव आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे हे जन्मगाव. याच ठिकाणी प्रा. अत्रे यांनी ‘कºहेचे पाणी’ हे पुस्तक लिहिले आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची या ठिकाणी समाधी देखील आहे. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कºहेकाठची शिवमंदिरे तर मल्हारगड, पुरंदर असे किल्ले आहेत. कानिफथनाथ, प्रति बालाजी मंदिर, काही अंतरावरील जेजुरी, अष्टविनायकातील मोरगाव अशी विविध पर्यटनस्थळे येथे असल्याने एक दिवसात यातील काही स्थळांना भेट देणे शक्य होते.

संगमेश्वर

सासवड एसटीस्थानकापासून अंदाजे १ ते दीड कि.मी अंतरावर हे पांडवकालीन स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. कºहा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे.

DSCN6078.jpg

सध्या नदीला पाणी नसल्याने फक्त दगडधोंडेच पात्रात पहुडलेले दिसतात. नुकतीच आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सासवड हे सांस्कृतिक केंद्र बनले होते. रस्त्यावरूनच संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पुढे नारायणपूरला जायला निघालो. या मंदिराविषयी परत कधीतरी. वाटेत सासवडमधून जाताना पुरंदरेंचा मोठा वाडा आपले लक्ष वेधून घेतो.

श्री क्षेत्र नारायणपूर
दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

नारायणपूरला पोहचल्यावर गाडीतळावर गाडी लावून दर्शन घेण्यासाठी गेलो. ऐव्हाना दुपारचे दीड वाजले होते. प्रवचन सुरू होते. प्रवचनानंतर आरती सुरू झाली. काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते. श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत. संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.

नारायणेश्वर मंदिर

DSCN6096.jpg

पुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असा एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.

मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो.

नारायणपूरचे मूळ नाव पूर. यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे.

हे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे. मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो, सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.

या दरवाजासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात. मात्र, या तलावाची योग्य निगा राखली गेली नसल्याचे दिसून येते. शंकर भगवानचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र दत्त संस्थातर्फे देण्यात येणारा मोफत प्रसाद खाण्यास गेलो.

पोटभर प्रसाद

श्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. मी व माझे मित्र पूर्वी पुरंदरावरून दुपारी ३ पर्यंत खाली उतरून आल्यावर दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पोटभर प्रसाद खात असे. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.

एक दिवस वेळ काढून नक्कीच नारायणपूर व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल असा हा सर्व परिसर आहे.

पुरंदर किल्ला

नारायणपूरला मंदिरामागे पुरंदर किल्ला आहे. या पुरंदरावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध पुरंदरचा तह, मुरारबाजींचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराज, सवाई माधवराव यांचे हे जन्मस्थान. पुरेसा वेळ असल्यास नक्कीच या किल्लयावर जाऊ या. पुरंदर गडावरून सर्वच परिसर मोठा सुरेख दिसतो. येथे जाण्यासाठी मुख्य मंदिराकडे येतानाच रस्ता आहे. या विषयी पुन्हा कधीतरी.
कसे जाल :

नारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक तर कापूरओव्हळ मार्गे बालाजी दर्शन घेऊन नारायणपूरला येता येते. दुसरे हडपसर मार्गे दिवेघाटातून नारायणपूरला येता येते. तसेच बापदेव घाटातूनही येता येते.

  • स्वारगेट > कापूरओव्हळ (२५ किमी पुणे - सातारा रस्त्यावर) > नारायणपूर मंदिर (१५ किमी)
  • सासवड > नारायणपूर अंतर १२ किमी आहे.
  • स्वारगेट > नारायणपूर अशी एसटी सेवा उपलब्ध आहे.
  • स्वारगेट > हडपसर मार्गे सासवड ३० किमी अंतर > नारायणपूर मंदिर (१० किमी)

अजून काय पहाल :

प्रति बालाजी मंदिर (कोपूरओव्हळ)
पुरंदर, व्रजगड किल्ला
कानिफनाथ मंदिर
पुरंदर- वज्रगड किल्ला
संगमेश्वर मंदिर
नारायणेश्वर मंदिर
वटेश्वर मंदिर
बालाजी विश्वनाथ यांची समाधी
मल्हारगड
जेजुरी
भुलेश्वर मंदिर
अधिक फोटोसाठी कृपया खालील लिंकवर टिचकी मारा....

http://ferfatka.blogspot.com/2014/07/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेरफटका, उपयुक्त माहिती. पण प्रकाशचित्र खुप कमी आहेत अजुन असतील तर जरूर डकवा.

नारायणपुरला पुष्कळ वेळा गेलो आहे श्री दत्तगुरूंची एकमुखी मुर्ती हे या मंदिराचे खास वैशिष्ट आणि नारायणेश्वर मंदिर प्राचीन वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे महाप्रसादाचे पुण्य काही आम्हाला लाभले नाही पण पुढील भेटीत त्याचा ही अवश्य लाभ घेऊ.