सत्संगती आणि अनुभव

Submitted by पुरंदरे शशांक on 22 May, 2014 - 07:26

सत्संगती आणि अनुभव

मी स्वतः स्वामीजींचे (स्वामी स्वरुपानंद, पांवस) दर्शन घेऊ शकलो नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले त्यांच्याकडूनच स्वामीजींसंबंधीच्या आठवणी मला ऐकायला मिळाल्या.
सर्व साधारणतः कुठल्याही संतांकडे जेव्हा कोणी जातो तेव्हा त्याला या संतांनी केलेल्या चमत्काराचे फारच अप्रूप असते. त्या चमत्कारांबाबत ऐकण्या-बोलण्यातच त्याला सार्थकता वाटते.
मात्र काही असेही लोक असतात की जे स्वतः पारमार्थिक साधना करत असतात. स्वामीजींसारख्या संतांकडून त्या साधनेच्या संबंधी काही मार्गदर्शन मिळाले तर ते घेण्यासाठी ते जात असतात.

हे पहिल्या प्रकारातले जे लोक असतात ते - स्वामीजी कसे तेजःपुंज भासले, त्यांनी आपल्याला कधीही पाहिले नसताना नावानिशी कशी हाक मारली वगैरे सांगत असतात. या जोडीला इतर अनेक घडलेले, न घडलेले, ऐकीव किंवा जास्त फुगवून सांगितलेले अनुभवही असू शकतात.
कधी कधी यात खूप सात्विक व्यक्तिला खूप चांगला अनुभवही आलेला असतो - जो त्याच्या पुरता खराही असतो. पण ऐकणार्‍याच्या मनात फक्त - केवढी भाग्यवान व्यक्ति ही !!.. एवढाच भाव उत्पन्न होतो. ज्या भावाचा पुढे तसा काही उपयोग होऊ शकत नाही.

स्वतः स्वामीजी या "चमत्कार" प्रकाराबाबत अजिबात रस घेत नसत. त्यांच्या कोणा शिष्याकडून अशा चमत्काराचा प्रसार होऊ नये यासाठीही ते अतिशय दक्ष असत. स्वामीजींची सेवा करण्याचे भाग्य एका व्यक्तिला लाभले त्यांच्याकडून ऐकायला मिळालेली एक हकीकत - "स्वामीजींची दररोजच्या वापरातली बंडी धुवायचे काम एकदा मला मिळाले. धुण्यासाठी जेव्हा मी ती बंडी घेतली तेव्हा असे लक्षात आले की त्या बंडीला एक प्रकारचा सुगंध येतो आहे. ती बंडी धुवून वाळत टाकल्यावर सहाजिकच मी आसपासच्या २-४ लोकांना ही गोष्ट (सुगंध येण्याची) सांगितली. सायंकाळी स्वामीजींच्या दर्शनाला गेलो असताना स्वामीजींनी मला सर्वात शेवटी एकट्याला बोलावले व शांतपणे आणि प्रेमाने सांगितले की मी इथे एकाच ठिकाणी सारखा पडून असतो त्यामुळे मला बेड -सोर्स होऊ नयेत म्हणून वारंवार पावडर लावणे गरजेचे आहे. बंडीला सुगंध आला तो त्या पावडरचा होता. उगाचच अशा गोष्टींचा गवगवा बरोबर नाही. चमत्काराला आपण महत्व देऊ नये, साधनेला महत्व द्यावे."

मात्र संतांच्याकडे पारमार्थिक साधना करणारे जे कोणी जातात त्यांच्याकडून स्वामीजींच्या पारमार्थिक साधनेचा काहीबाही उपयोग होऊ शकतो. या प्रकारात मला भेटलेले स्वामीजींचे उत्तराधिकारी असलेले एक महापुरुष. - या महापुरुषाने स्वामी स्वरुपानंदांना प्रत्यक्ष पाहिलेले, इतकेच नव्हे तर पहिल्याच भेटीत स्वामीजींचा अनुग्रहही त्यांना प्राप्त झाला, आणि त्यांचा परमार्थातील अधिकार लक्षात घेता स्वतः स्वामी स्वरुपानंदांनीच हा "नाथ-संप्रदाय" पुढे चालवण्यासाठी सारे उत्तराधिकार त्यांना दिले. त्यांनी स्वामी स्वरुपानंदांचे वर्णन ज्ञानेश्वरीतील एका ओवीद्वारे केलेले आहे. मी स्वतः तर स्वामीजींचे दर्शन घेऊ शकलो नाही. पण या महापुरुषाने या ओवीतून जे स्वामीजींचे दर्शन मला घडवले त्याचा ठसा मात्र कधीही न पुसला जाणारा असा विलक्षण आहे.

आता यापुढील स्वामीजींचे जे वर्णन आहे ते या महापुरुषाने अनुभवलेले असे आहे -
त्यांच्याच शब्दात स्वामीजी म्हणजे ही ज्ञानेश्वरीतील ओवी. - सद्भाव जीवगत | बाहेरी दिसती फांकत | जे स्फटिकगृहींचे डोलत | दीपु जैसे || अ. १३-४७६||
एखाद्या कंदीलाची काच अगदी घासून-पुसून स्वच्छ केलेली असावी. त्यामुळे कंदीलात जी ज्योत तेवत असते तिचा प्रकाश जशाचा तसा बाहेर प्रकट व्हावा तशी ही गोष्ट. स्वामी स्वरुपानंदांची प्रकृती शोधितसत्वगुणी. आणि त्यात ते सोऽहं हंसारुढ असलेले महात्मा. म्हणजेच त्यांची प्रकृती ही आतील बोधाला पूर्णतः करस्पॉंडिंग - त्यामुळे त्यांच्या अंतरंगात जी बोधाची ज्योत तेवत होती ती त्यांच्या शरीरातूनही सहज प्रगट व्हायची, त्यांचे दर्शन घेणार्‍याला अगदी सहज आणि स्पष्ट दिसायची, जाणवायची. ते ज्या बोधात सतत रहात होते तो बोध त्यांच्या सर्व अंगप्रत्यंगातून प्रकट होत असे - शांतीच्या रुपाने, समाधानाच्या रुपाने, प्रसन्नतेच्या रुपाने.

स्वामीजी तसे कमी बोलत असत. पण त्यांच्या नुसत्या दर्शनानेही भाविकजन समाधान पावत त्याचे कारण हेच.

जेव्हा कोणी एखादा खडीसाखरेची पुडी स्वामीजींना देत असे तेव्हा स्वामीजी आपल्या हातांच्या ओंजळीत त्या पुडीचा अतिशय प्रेमाने स्वीकार करायचे. त्या पुडीचा दोरा अलगद सोडवायचे. तो दोरा शेजारील एका दोराच्या रिळाला गुंडाळून ठेवायचे. मग त्यांच्या बाजूलाच असलेल्या डब्यात ती खडीसाखर अलगद (खडखड आवाज न करता) ओतून ठेवायचे. ज्या कागदातून ती खडीसाखर आणलेली असायची तो कागद नीट सरळ करुन कात्रीने त्याचा चौकोन कापून बाजूला नीट ठेवून द्यायचे.
या साध्या कृतीतूनही त्यांचा बोध, सद्भाव, प्रेम प्रकट व्हायचे.
त्यांचे समोरील व्यक्तिकडे साधे पहाणेही अतिशय प्रेमाचे असायचे. "पुढां स्नेह पाझरे| माघां चालती अक्षरें| शब्द पाठीं अवतरे| कृपा आधीं ||१३ - २६३|| ही माऊलींची ओवी मूर्तस्वरुपात स्वामीजींच्या ठिकाणी अनुभवायला मिळायची. स्वामीजींच्या पहाण्यातूनही स्नेह, प्रेम अनुभवायला येई. शब्द (बोलणे) त्यानंतर येत.
त्या महापुरुषाच्या म्हणण्यानुसार ज्ञानेश्वरीत ज्ञानी महात्म्याची अशी जी काय विविध लक्षणे (अमानित्वं, अदंभित्वं, अहिंसा, शांति, आर्जवं, इ. ) सांगितली आहेत ती सारीच्या सारी स्वामीजींच्या ठिकाणी मूर्तस्वरुपात दिसत असत - आणि ती ही सहजपणे ... कुठल्याही अभिनिवेशाशिवाय ....

कोणीही स्वरुपानंदांच्या दर्शनाला त्यांच्या खोलीत शिरले की त्यांना दिसावयाचे की स्वामीजींचे हात आधीच जोडले गेलेले आहेत. दर्शनाला येणारी व्यक्ति वयाने लहान असो वा मोठी - स्वामीजींचे हात आधीच जोडले गेलेले असायचे. जणू काही स्वामीजी येणार्‍या व्यक्तिच्या आंतमधे वास करीत असलेल्या अशा चैतन्यालाच नमन करीत असायचे. (या उपाधीमाजी गुप्त | चैतन्य असे सर्वगत | ते तत्वज्ञ संत | स्वीकारीती || - ज्ञानेश्वरी - देह ही आत्म्याची उपाधी - त्यामुळे संत हे कोणाच्याही देहात वसलेल्या आत्मराजाचे (चैतन्याचे) सहज दर्शन घेत असतात.)

असे स्वामीजींचे वर्णन त्या महापुरुषाकडून ऐकताना शरीरावर रोमांच उभे रहात असत, डोळे भरुन येत असत. याचे कारण सांगणारा जो महापुरुष होता त्याच्या ठिकाणीही हीच लक्षणे वास करुन होती, तो महापुरुषही सोऽहं हंसारुढ होता आणि त्या महापुरुषाच्या सान्निध्यातही असेच कोणालाही अकारण "समाधान" मिळत असे.

शुद्ध परमार्थात "अनुभव" म्हणता येईल तो एकच - "निर्विषय आनंद" - कुठलाही विषय समोर नसतानाही एक विशेष आनंद (समाधान, निर्विषय आनंद) मिळत असतो. याचा अनुभवच घ्यावा लागतो - तो शब्दात वर्णन करता येत नाही. गोडी, गोडी म्हणून कोणी कितीही वर्णन करुन जसे समोरच्याला सांगता येत नाही - पण तिथे एक गुळाचा/खडीसाखरेचा खडा जेव्हा तोंडात पडतो तेव्हा त्याला "गोडी" ही सहजच कळते तसेच हे तंत्र आहे. (सांगतां न ये तें सांगणें | गोडी कळाया गूळ देणें | ऐसें हें सद्गुरुविणें | होणार नाहीं || ६-१०-१० दासबोध|| - असे श्रीसमर्थही समाधानाच्याबाबतीत आवर्जून सांगतात)

सत्समागम किंवा संतसंगतीचे महात्म्य हेच आहे. संत हे भगवद्रूपच असतात - ते सतत समाधानात असतात - शांतस्वरुप असतात. जो कोणी अतिशय श्रद्धेने, प्रेमाने त्यांच्यापाशी जातो त्याला या शांतीचा, समाधानाचा काहीबाही का होईना स्पर्श होतोच होतो.

या समाधानाचा उगम खरं पाहिलं तर आपल्या अंतरातच आहे याची जाणीवही सद्गुरुच करुन देतात. मग अशा आत्मानुभवी सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली जो कोणी सातत्याने आणि निष्ठेने साधना करत राहील त्यालाच या "अखंड समाधानाचा" लाभ होतो.
सद्गुरुकृपा कळे त्यासी | जो शोधील आपणासी | पुढें कळे अनुभवासी | आपेंआप वस्तु ||६-१०-११ दासबोध||
(जो कोणी स्वतःच्या अंतरंगात ब्रह्माचा(किंवा स्वतःचा) शोध घेत जातो त्यालाच सद्गुरुकृपेची प्राप्ती होते म्हणजेच ब्रह्म (वस्तु) अनुभवाला येते)

आपल्या सर्वांनाच (माझ्यासकट) हे अनुभवाला येवो ही स्वामीजींचरणी मनोभावे, प्रेमपूर्वक प्रार्थना.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीसारखं सहज सुंदर लेखन !!

शुद्ध परमार्थात "अनुभव" म्हणता येईल तो एकच - "निर्विषय आनंद" - कुठलाही विषय समोर नसतानाही एक विशेष आनंद (समाधान, निर्विषय आनंद) मिळत असतो. याचा अनुभवच घ्यावा लागतो - तो शब्दात वर्णन करता येत नाही. >>> अगदी खरं आणि पटलं

शांतपणे परत एकदा सगळा लेख वाचणार.

प्रभावी लिखाण शशांक....

मी कित्येक वेळा पावसला गेलो आहे...अर्थात नेहमी चारपाच मित्रांसोबत. तेथील प्रसाद ग्रहण केला आणि व्याख्यातांच प्रवचनही ऐकले आहे. तुम्ही म्हणता तसे स्वामीजींच्याबाबतीत न घडलेले अनुभवही मुख्य मंडपात बसलेल्या श्रोतजनांकडून ऐकायला मिळतात पण तिकडे एका विशिष्ट पातळीपर्यंतच लक्ष देणे सोयीचे ठरते कारण आपल्याला हेही माहीत असते की खुद्द स्वामी स्वरुपानंदांनी आपल्या नावाभोवती चमत्काराला कधी स्थान दिले नाही. बंडीचे उदाहरण चपखल आहे आणि तितकेच योग्यही.

सुरुवातीला तुम्ही लिहिले आहे..."..संतांनी केलेल्या चमत्काराचे फारच अप्रूप असते...." ~ हा समाजमनाचा आरसाच होय. सुशिक्षित असो वा अशिक्षित....प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी अशा व्यक्तीने घडविलेल्या चमत्काराच्या वार्ता ऐकणे फार समाधानाचे वाटत असते....त्यावर विश्वास बसो वा नसो...त्याला कारण म्हणजे माणूस कुठल्या ना कुठल्या कारणाने मनाने फार हलका झालेला असतो. अशी व्यक्ती कोणताही निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही...त्याचे मन चंचल झालेले असते. अशावेळी त्याला घरातील व्यक्तीच्या मदतीपेक्षा बाहेरील साधूसंताच्या आशीर्वादाची फार आवश्यकता असते. सैरभैर अवस्थेत असताना त्याला कुणीतरी सांगते, "तू अमुकतमुक संतांने केलेला चमत्कार ऐक आज संध्याकाळच्या प्रवचनात मग तुला पटेल त्यांची पूजा करणे किती लाभेल तुला..." चमत्कार कितीही न पटणारा असला तरी....उदा. एक संत केवळ नजरेच्या तेजाने नारळ फोडत असे....हे पटत नाही तुम्हाआम्हाला...पण मनाने खचलेल्या इसमाला पटवून घ्यावे लागते कारण असे अप्रूप वर्तन कुणी केलेले असले की जगात असेही चमत्कार घडायला जागा आहे, असे वाटण्याची त्याच्या मनाची तयारी झालेली असते.

बहुसमाजी फसवणूक होण्याची ती एक पायरी असते...पण अशा स्थितीतीतही स्वामी स्वरुपानंदांनी आपल्या शिकवणीत चमत्काराला अजिबात स्थान न देता केवळ नित्यनेमाच्या वर्तनातून आपल्या शिकवणीचा धडा आपल्या भक्तजनांना देऊन त्यांच्या आदराचे ते स्थान बनून गेले.

इथल्या सदस्यांनी अगदी अगत्यपूर्वक पावसची एक दिवसाची सहल करावी आणि त्या परिसरामध्ये राहून मनःशांती कशी प्राप्त होती याचा अनुभव घ्यावा असे सुचवावेसे वाटते.

छान लेखन. मी अजून पावसला गेलो नाही ( माझी सख्खी मामेबहीण तिथे राहते तरीही. )
पण पूर्णगडला जाणारी एस.टी. नाणीजलाच रिकामी होताना बघितली आहे.. विदारक आहे हे.

किती नेटके आणि सुरेख लिहिता हो तुम्ही! फार छान वाटते तुमचे लेख वाचताना. आणि इतक्या चपखल ओव्या लिहिता लिहिता आठवणं हे तुमच्यावर संतवाणी प्रसन्न असल्याचं लक्षण आहे!

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ Happy

हे सगळं जे मी लिहिले आहे ती "त्या" महापुरुषाची कृपा. त्यांची ज्ञानेश्वरी, दासबोधावरील प्रवचने ऐकताना जाणवायचे की हा महापुरुष नुसता प्रवचनकार नाहीये तर या सदग्रंथात सांगितलेली सर्व साधु-लक्षणे याच्या ठायी ठायी आहेत. हे प्रवचन तर केवळ निमित्य आहे. या महापुरुषाच्या केवळ सान्निध्यातही माझ्यासारख्या भ्रांतालाही "निर्विषय" आनंद मिळून जायचा.
तया दर्शने-स्पर्शने पुण्ण्य जोडे | तया भाषणे नष्ट संदेह मोडे || असे त्यांचे प्रवचन असायचे.

समाधान ते सज्जनाचेनि योगे - या ओळीची सार्थ प्रचिती देणारा हा महापुरुष ...

संत वचनांचे नेमके सार या महापुरुषाकडून ऐकायला मिळायचे. संतांना नेमके काय सांगायचे आहे, आपल्याकडून (सर्वसाधारण समाजाकडून) संतांची काय अपेक्षा आहे हे सारेच्या सारे हा महापुरुष इतक्या सहज आणि सोहोपे करुन सांगायचा की मला वैयक्तिक असे वाटते की जर यदाकदाचित भगवंत सगुण रुपात प्रकट झालाच आणि काय इच्छा आहे असे म्हणाला तर माझे एकच उत्तर असेल - या महापुरुषाचे जन्मोजन्मी सान्निध्य - बाकी काहीही नाही ...

..... त्यामुळे या व अशा लेखातील जे काय चांगले, समाधान देणारे, प्रभावी, इ. सारेच्या सारे "त्या" महापुरुषाचे.. एथ माझे जी उरले पाईकपण ...

माझे वेडे-वाकुडे बोल आपण सर्व मंडळी प्रेमाने वाचता व नावाजता याला कारण आपणा सर्वांचा मोठेपणा, सज्जनता ... - असेच प्रेम असूदेत ही नम्र व प्रेमाची विनंती.
इति||

माझे आजोळ पावसच्या जवळ आहे, त्यामुळे अनेकदा तिथे जाणे झाले आहे.
त्या क्षेत्राचा एकुण परिसर विलक्षण शांत आहे. कधी तिथे गेलो तर तिथुन परत यावेसेच वाटत नाही.

प्रसादात मिळणार्‍या खिचडीची चवदेखिल वेगळीच असते. कदाचित तेथील सात्विक वातावरणाचा परिणाम असावा.

शशांकबुवा, अतिशय सुंदर लेख आहे. चातकाला पहिला घनवर्षाव प्राप्त झाल्यावर जे समाधान मिळतं तसं समाधान हा लेख वाचून मिळतं. असेच अनेक लेख आम्हा चातकांना वाचायला मिळोत.
आ.न.,
-गा.पै.

सुंदर लेख!

शशांकजी पावसला न जाताही तुमची लेखणी तिथल्या स्थानाविषयी आणि स्वामी स्वरुपानंदाविषयी इतकं सुरेख लिहू शकते तर तिथे गेल्यावर तुमची भावावस्था काय असेल? तुमच्या लेखणीतून काय उमटेल?

वाचायला नक्की आवडेल!

छान लिहिलंय , आजकालच्या १० संतांमध्ये ८ ढोंगी संतांमुळे जे २ खरेखुरे संत असतात त्यांना कुणी विचारत देखिल नाही आणि याची त्या खर्‍या संताना काळ्जी सुद्धा नसते कारण त्याना प्रसिद्धिचे वलय नकोच असते, लोकांनी आपल्या नावाचा जप करावा, आपल्या नावाचे लॉकेट वापरावे, आपला फोटोला हार घालावा अशी खर्‍या संताची अपेक्षा नसतेच. ह्या संतांची राहणी साधी आणी विचारसरणी उच्च असते, त्यांना सर्वजण सारखे असतात , श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव हे संत करीत नाही , ही लोकं प्रसार माध्यमाच्या वलयात केव्हाही गुंतत नाही कारण हे संत पुर्णतः विरक्त असतात.

शुद्ध परमार्थात "अनुभव" म्हणता येईल तो एकच - "निर्विषय आनंद" - कुठलाही विषय समोर नसतानाही एक विशेष आनंद (समाधान, निर्विषय आनंद) मिळत असतो. याचा अनुभवच घ्यावा लागतो - तो शब्दात वर्णन करता येत नाही. गोडी, गोडी म्हणून कोणी कितीही वर्णन करुन जसे समोरच्याला सांगता येत नाही - पण तिथे एक गुळाचा/खडीसाखरेचा खडा जेव्हा तोंडात पडतो तेव्हा त्याला "गोडी" ही सहजच कळते तसेच हे तंत्र आहे. (सांगतां न ये तें सांगणें | गोडी कळाया गूळ देणें | ऐसें हें सद्गुरुविणें | होणार नाहीं || ६-१०-१० दासबोध|| - असे श्रीसमर्थही समाधानाच्याबाबतीत आवर्जून सांगतात)

अनुभूतीवरील आपले विवेचन आवडले.

वरील दासबोधातील ओळी पाहून कबीराच्या पुढील ओळींची प्रकर्षाने आठवण झाली.

अकथ कहानी प्रेम की कछु कही न जाए
गूंगे केरी शर्करा खाए और मुस्काए

धन्यवाद, शशांकजी.