अमरनाथ यात्रा - माझा अनुभव

Submitted by भागवत on 18 July, 2014 - 04:27

लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्याल अशी आशा आहे.

वर्षे २०११ पासून घरी चर्चा चालू होती की सगळे मिळून वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा करुया. पण मुहूर्त लागत नव्हता. मार्च २०१४ मध्ये अमरनाथ यात्रे बद्दल आणि टूर ऑपरेटर ची सर्व माहिती काढली आणि प्रवासाचे नक्की केले. टूर ऑपरेटर ने सांगितले की मेडीकल चेकअप करून अमरनाथ रजिस्ट्रेशन फाॅर्म भरून आणा. मी माझ्या फॅमिली ची सगळी माहिती भरून फाॅर्म दिले. पहलगाम मार्गे जाण्याचे नक्की झाले.
यात्रेला २ मार्ग आहेत. १. बालताल - १४ किलोमीटर, २.पहलगाम - ३२ किलोमीटर.
पहलगाम/बालताल मार्गे अमरनाथ जाणाया साठी ४ पर्याय उपलब्ध आहेत.
१.चालत, २.घोडा, ३.हेलिकॉप्टर, ४.पालखी.

हेलिकॉप्टर बुकींग १ माॅर्चला सुरु झाले आणि २ दिवसात बुकिंग फुल झाले. मग मित्रांनी सागितले की हेलिकॉप्टर बुकिंग पहलगामला पोहोचल्या नंतर सुद्धा करता येते. आम्ही २९ जूनला श्रीनगरला पोहाचलो. अमरनाथ बोर्डाने पहलगाम मार्ग बर्फ साचल्यामुळे २ जुलै पर्यंत बंद केला होता. विचारपूस केल्यानंतर कळले की हेलिकॉप्टर बुकिंग फुल आहे आणि ब्लँक मध्ये ४५०० चा पास ८५०० ला भेटतो. बालताल मार्गे पंचतरणी हेलीपँड गुहे पासून ६ किलोमीटर दूर आहे. परत त्या ६ किलोमीटरसाठी घोड्यावर/चालत जावे लागले असते. त्यामुळे मग वडिलांनी ठरवले की सगळ्यांनी घोडी करून प्रवास करायचा.

पहलगाम मार्ग खूप बर्फ साचल्या मुळे बंद होता. त्यामुळे टूर ऑपरेटर ने आम्हाला सोनमर्ग मार्गे बालताल बेस कॅम्प ला ३० जून ला पोहचवले. बेसकॅम्पला परत चेकिंग झाली. आमचे २ दिवसांनी दर्शन असल्यामुळे मला आणि वडिलांना पोलीस सोडत नव्हते. पण तिथे २-३ तास पोलिसांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला जाऊ दिले. एका बाजूला खळखळत वाहणारी नदी आणि दुसऱ्या बाजूला पर्वताची रांग. दोघांमध्ये टेन्ट चा सागर… लंगर ची खूप दूरवर रांग … आणि जागा सापडेल तिथे व्यावसायिक लोकानी नी आपला व्यवसाय थाटला होता. गेट नं. १ च्या आधी गाडीतळ होता. वातावरणात गारवा जास्त जाणवला. प्रथम टेन्ट आणि मग घोडे ठरविण्या साठी धावपळ केली. घोडा प्रत्येकी रु.२१५० ठरविला.

१ जुलैला खरा प्रवास सुरु झाला. पहाटे ३.३० ला उठलो.. आन्हिक उरकून ४.३० ला घोड्यावर बसलो. ५.०० वाजता पहिला चेकपोस्ट लागला. अमरनाथ पासेस, ओळख पत्र चेक केल्यानंतर परत घोड्यावर बसलो. मग सुरु झाली खरी मजा. मला ३ किलोमीटर पर्यन्त स्वत:ला तोल सावरता येत नव्हता. पहिले ४ किलोमीटर पर्यन्त रेलिंग आहे. जसे जसे पर्वत चढत होतो आणि दरी जशी जशी खोल होत होती तसे तसे पोटात गोळा येत होता. मी शेवटी दरी कडे पाहणेच सोडून दिले. साधारण ८-१० फुटाचा मातीचा रस्ता आहे. चालणारे भाविक डोंगराच्या बाजूने येत -जात असतात. रस्त्यामध्ये पालखी वाले ये-जा करतात. रस्ताच्या कडेला (दरी साईडने) १ फूट सोडून घोडे चालतात. घोडी चा मालक/चालक पुढे एका हातात छडी आणि दुसरा हातात घोड्याला बांधलेली दोरी हातात घेऊन जात असतात. घोड्याची विष्ठा आणि आदल्या दिवसी पाऊस पडल्या मुळे चिखल साचला होता. घोड्या च्या मालकाने सांगितले की चढाई करताना पुढे वाकायचे आणि उतरताना मागे झुकायचे. आमची ४ घोडी होती. पुढे मी, मध्ये बायको, आई, आणि मागे वडिल अशी वरात चालली होती. माझ्या घोडीचे नाव बुलबुल होते. मला घोडी उधळण्याची थोडी शंका आली की मी बुलबुलच्या कानात "आराम से चलो बुलबुल" पुटपुटत होतो. पर्वत चढताना दरी कडे पाहवत नव्हते. दरी खोल खोल होत होती. माझ्या मनात विचार आला की जर काही झाले तर आपले नख सुद्धा दिसणार नाही कुणाला. जीव मुठीत घेऊन चालणे हा वाक्प्रचार मी १४ किलोमीटर अनुभवला. खोल दरी, छोटा रस्ता, श्रद्धा, भीती, उत्सुकता, निसर्ग, हिमनदी आणि मनावर आलेले दडपण यांचे एक अजब वातावरण तयार झाले. पर्वतावर दिसणारा बर्फ ग्लेशीयँर, त्यातून येणारा पाण्याचा प्रवाह! खूपच सुंदर दृष्य होते. पण माझे दुर्भाग्य मला तोल सावरण्या मध्ये फोटो घेता आले नाहीत.

५००-५०० मीटर वर असलेले आर्मी जवान… त्याची सतत भिरभिरणारी नजर… त्यांचा नजरेत असलेली कर्तव्य निष्ठा… जीवाची पर्वा न करता तहान, भूक विसरून सेवा आणि सुरक्षा … जवान प्रवाश्यांना पाणी देत होते… . मार्ग दाखवत होते… मदत करत होते… माझा कडकडीत सॅलूट त्यांचा कार्यासाठी. मार्गा मध्ये ३ किलोमीटर पर्यंत खुप लंगर होती. यात्रेकरूना ते बिस्कीट, चहा, छोटी नाष्ट्याची पाकीटे वाटत होती. वेगवेगळ्या राज्यातून आलेले लंगर मन लावून सेवा करत होती. आम्ही २ मृतदेह खाली स्ट्रेचरवर घेऊन जाताना बघितली. माझा मनात विचार आला जर घोडा स्लिप झाला तर आपण रेलीग ला पकडून जिवंत राहू. नंतर विचार आला आपल्या फॅमिली चे काय होईल. पण अमरनाथ कृपेमुळे तशी काही परिस्थिती आली नाही.

७ किलोमीटर झाल्यानंतर पहिला टी-ब्रेक घेतला. माझ्या आईचा घोडा डोंगराचा चढ चढत नव्हता. मग मी घोड्याच्या मालकाला सांगून नवीन घोडा मागितला. त्याने पैसे देणास सांगितले पण मी त्याला ठणकाऊन सांगितले की पैसे बालताल ला टेंट मध्येच मिळतील(आधी ठरल्या प्रमाणे). मी चारही घोडी मालकाना चहा घ्याला सागितले. पण बिल २४० झाले. नंतर लक्षात आले की घोडीवाल्यानी दोन पाव वर सुद्धा डल्ला मारला होता. आई साठी घोडा बदलून घेतला. आता रस्ता सपाट होता, बुलबुल घोडी आता आरामात चालत होती. संगम ठिकाणी आम्ही ५ मिनिटे थांबलो. वर वर चढताना रस्ता कठीण आणि अरुंद होत होता. पुढे रस्त्याचे २ फाटे फुटले. रस्ता पुढे घोडी साठी वेगळा आणि पालखी व चालणाऱ्या साठी वेगळा झाला. शेवटचं १ किलोमीटर पूर्ण बर्फाचा रस्ता होता. घोडी मालकानी आम्हाला खूप अगोदर उतरायला सागितले. तेथून आम्ही चालत गेलो. आम्हाला जवळ पास ६.३० तास लागले गुहेच्या पायथाशी पोहोचण्या साठी. गुहे समोर बर्फाचा हिमनग होता. हवेत गारवा जास्त वाढला. एका बाजूला खूपच मोठी दर्शनाची रांग लागली होती. आणि मध्ये टेन्ट व लंगरने परिसर व्यापला होता.

कहाणीमे ट्विस्ट आला. हवे मध्ये प्राणवायू चे कमी प्रमाण, पायाखाली बर्फ आणि सकाळ पासून ६.३० तास प्रवास मध्ये काही न खाल्या मुळे बायकोला चक्कर आली. पाणी, बिस्किट आणि थोडा प्राणवायू घेतल्या नंतर प्रकृती सुधारली. मग रिस्क नको म्हणून आम्ही पालखी केली. परंतु ती चेकिंगला अडवन्यात आली आणि परत चालवे लागले. खूप गर्दी होती. लाईन मध्ये लागलो. पण आगीतून फुफाट्यात पडल्या सारखे झाले. लाईन मध्ये रेटारेटी, पायाखाली बर्फ, पुढून मागे ढकलणारे आणि मागून पुढे रेटणारे लोकामुळे जीव गुदमरला होता. हिमनदी वर चालत असल्यामुळे बरेचजण पाय घसरून पडले. मुलीना आणि बायकांना कमी प्राणवायू मुळे खुप त्रास सहन करावा लागला. चेगंरा-चेंगरी ची लक्षणें दिसत होती पण आर्मी जवानांनी परत लाईनला शिस्त् लावली. जवान वयोवृद्ध लोकांना गुहे पर्यंत घेऊन जात होते… मार्गदर्शन करत होते… मेडीकॅल चेकअपं ला पाठवत होते. २.५ तासात दर्शन झाले. अमरनाथ गुहा ही १२,७५६ फूट उंची वर आहे आणि दगडाची बनलेली आहे. अमरनाथ पिंडी ला १०-१२ फूटाची नेैसंर्गिक उंची, बर्फाची पिंड बघून देह भान हरपले. मंत्रमुग्ध झालो. मनाला खुप आनंद झाला. मनात विचार आला की आता आपले दर्शन झाले आहे जाताना जे होईल ते अमरनाथ पाहून घेईल. मला जाताना १४ किलोमीटर पर्यंत एक सुद्धा पक्षी दिसला नव्हता. पण मला गुहे मध्ये एक कबुतर दिसले(सहसा २ असतात). मला कळत नव्हते, कबुतर कशी राहत असतील. काय खात असतील आणि जिथे कमी प्राणवायू मुळे माणसांना त्रास होत होता. तिथे हे कबुतर एवढ्या थंड प्रदेशां मध्ये कसे काय जिवंत राहू शकतात. हा अमरनाथ चा चमत्कार की निसर्गा चा प्रताप आहे ते कळत नव्हते. लंगर मध्ये थोडा नाश्ता केला. बर्फाचा रस्ता असल्या मुळे आम्हाला खूप कसरत करावी लागत होती. जे भक्त साधी चप्पल घालून आले होते ते घसरून पडल होते. मी सुद्धा २-३ वेळेस पडता पडता वाचलो. पाऊस पडायला सुरुवात झाली. चालत चालत आम्ही घोड्या जवळ पोहचलो.

आणि परतीचा प्रवास सुरु झाला. वातावरण २ मिनिटात बदलले. काळोख पसरला. मनात भीती वाटत होती की घोडा चिखलात घसरून पडला तर आपली काही खैर नाही. चालणारे लोक घसरून पडत होती. पण तेथील स्थानिक माणसे आणि घोडी आरामात चालत होती. खरच घोड्या ला मानले पाहिजे. कितीही उतार असो वा चढ घोडा कधीच पडत नाही. घोड्या पुढे दरी असेल किंवा जागा नसेल तर घोडा तात्काळं ब्रेक मारतो. माणूस एक वेळ समजूतदारपणा सोडेल पण घोडा कधी लाईन नाही सोडणार. परतीचा प्रवास खुप्प छान झाला. वरून पाऊस..., तोच चिखलातला रस्ता… , तोच पर्वत… , तेच हिमनग… , तोच निसर्ग… , तोच घोडा… पण मनातील भीती कमी झाली होती. त्यामुळे प्रवास एन्जॉय केला. परत येतांना घोडयाच्या खुरात दगड अडकला होता. घोडेवाला दगड काढायचा प्रयन्त करत होता आणि घोडी उधळत होती. शेवटी २ मिनिटाच्या प्रयत्ना नंतर दगड निघाला आणि मी हुश्श केले. मग सभोवती निरीक्षण केले. घोडा एखाद्या आज्ञाधारक मुला सारखा लाईन मध्ये चालत होता. घोड्याची संथ लयीत चाललेली वाटचाल. घोडा पाण्याचा झरा दिसतास थांबत होता आणि पाणी स्वछ असेल तरच पाणी पीत होता. पूर्ण १४ किलोमीटर चा रस्ता आणि डोंगर ठिसूळ मातीचा होता.

प्रसन्नचित करणारा निसर्ग… भुरभूर पडणारा पाऊस…. वळणा - वळणाचा रस्ता… मध्येच हिमनदी …. मध्येच हिमनग… बर्फ विरघळून बनलेले छोटे धबधबे… पाण्याचे छोटे छोटे झरे… खळखळत वाहणारी नदी… पर्वता वर ढगाचे साम्राज्य…. मंगलमय वातावरण… शार्प वळणावर नजारा बघण्या लायक होता. झाडी जवळ पास नव्हतीच. बरेचं ठिकाणी इंडिया आर्मी CRPF बटालियन नंबर कोरून ठेवले आहे. पालखी एका ठराविक लयीत जात असल्या मुळे त्यावर बसलेल्या बऱ्याच जणांना झोप येत होती. पालखी वाहून नेणारे मात्र भिजत मार्ग काढात जात होते. मध्येच लोक बाबा बर्फानी चा पुकारा करत आणि मग दूरवर त्याचा जयजयकार पसरत जाई.

परतीच्या प्रवासाला ४ तास वेळ लागला. आम्ही सुखरूप बालताल बेसकॅपला पोहोचलो. हाथ, पाय, मांडी, मान आणि पूर्ण शरीर दुखत होते. सुखरूप परत आल्या मुळे देव पावल्या सारखे वाटले. जीवनातला अनमोल ठेवा आठवून आणि पेन किलर घेऊन झोपी गेलो. सकाळी फ्रेश होऊन पुढच्या मार्गला लागलो. खराब वातावरण मुळे २ जुलै ला दर्शन सकाळी ४-५ तास बंद होते. जर आम्ही २ जुलै ला दर्शन घेतले असते तर आम्हाला २ दिवस जास्त थांबावे लागले असते. परमेश्वर कृपे मुळेच १ दिवसात जाऊन - येऊन आणि संकटा विना आमचे दर्शन झाले होते.

प्रची १. बरारी टाँप
100_2831.jpg

प्रची २. बरारी टाँप
100_2832.jpg

प्रची ३. बरारी टाँप
100_2833.jpg

प्रची ४. बरारी टाँप
100_2834.jpg

प्रची ५. बरारी टाँप
100_2836.jpg

प्रची ६. बरारी टाँप
100_2837.jpg

प्रची ७. बरारी टाँप
100_2838.jpg

प्रची ८. बरारी टाँप
100_2840.jpg

प्रची ९. बरारी टाँप
100_2813.jpg

प्रची १०. बरारी टाँप
100_2814.jpg

प्रची ११. बरारी टाँप
100_2822.jpg

प्रची १२. बरारी टाँप
100_2825.jpg

प्रची १३. बरारी टाँप
100_2839.jpg

प्रची १४. बरारी टाँप
100_2844.jpg

प्रची १५. बालताल बेसकॅम्प
100_2858.jpg

प्रची १६. बालताल बेसकॅम्प
100_2870.jpg

प्रची १७. बालताल बेसकॅम्प
100_2871.jpg

प्रची १८. बालताल बेसकॅम्प
100_2872.jpg

प्रची १९. बालताल बेसकॅम्प - टेंटस
100_2874.jpg

प्रची २०. बालताल बेसकॅम्प - गाडीतळ
100_2875.jpg

प्रची २१. बालताल बेसकॅम्प - नदी
100_2880.jpg

प्रची २२. बालताल बेसकॅम्प - टेंटस
100_2863.jpg

प्रची २३. बालताल बेसकॅम्प - नदी
100_2810.jpg

प्रची २४. बालताल बेसकॅम्प
100_2849.jpg

प्रची २५. बालताल बेसकॅम्प - लंगर
100_2860.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमरनाथ यात्रे दरम्यान आर्मीची सुरक्षा व्यवस्था
१. जम्मू काश्मीर मध्ये एन्ट्री केल्यानंतर ठराविक अंतरावर आर्मी जवान दिसले. रस्त्याच्या मोक्याच्या ठिकाणी, शहरा मध्ये आर्मी तैन्नात होती. २. जम्मू - श्रीनगर रोडवर, अमरनाथ यात्रेकरू साठी लंगर जवळपास १५० किलोमीटर आधी पासून सुरु होतात. जिथे जिथे लंगर तिथे तिथे आर्मी जवान पूर्ण सुरक्षेसाठी उपस्थीत होते. या रोडवर आमच्या गाडीचा पास, यात्रेकरू चे पासेस ३-४ वेळेस चेक झाले.
३. आमची गाडी श्रीनगर हून बालताल जात असताना मानिग्राम येथे पूर्ण चेक करण्यात आली आणि गाडी पार्क करायला सागितले. तिथे खूप लंगर आहेत. आम्ही तिथे जेवुन घेतले. बरोबर ३ वाजता गाडीचा जत्था सोडण्यात आला. पुढे - मागे २-२ आर्मी ट्रकं आणि मध्ये २५-३० अमरनाथ यात्रेकरू च्या गाड्या. परत बालताल पोहोचण्या अगोदर पूर्ण गाडी तपास यन्त्रा द्वारे चेक केली. यात्रेकरू पासेस, संपूर्ण सामान चेक करण्यात आले.
४. बालताल बेसकॅम्पला १ अधिकारी, ४ आर्मी जवान, एका कडे तपासणी यन्त्र आणि दुसऱ्या कडे प्रशिक्षण दिलेला श्वान. जवान प्रत्येक टेन्ट ची तपासणी करत होते. ५. बालताल ला काही यात्रेकरू आणि घोडेमालक यांच्यात बक्षिशी वरून बोलणी चालू होती त्या वेळेस २ आर्मी जवान जवळून स्थीतीचे निरीक्षण करत होते. बोलणी झाल्यानंतर तिथून ते निघून गेले.
६. परत येताना संगम पासी २ मार्ग आहेत. एक शोर्टकट जो कि कमी अंतर, कटीण आणि शार्प वळणाचा, दुसरा लॉंगकट जो की जास्त अंतर आणि सरळ मार्ग होता. घोडी वाले उशीर झाल्यामुळे आणि पाऊस पडल्या मुळे शोर्टकट रस्त्या ने जात होती पण जवानाने त्यांना ताकीत देऊन घोडी चालकाना लॉंगकट घायला लावला.
७. परतीच्या बालताल - श्रीनगर मार्गावर आमची गाडी ४ वाजता सुरक्षेच्या कारणामुळे अडवण्यात आली. रात्री ९.०० वाजता एस्कॉर्ट करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.

फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेख. खुप कठीण आहे ही यात्रा, वाचतांना मला पण काळजी वाटली. पण छान, सुखरुप झाली वाचून हायसं वाटलं.

हर्पेन तुमचे फोटोही मस्त आहेत.

आपल्या आर्मीला सलाम.

छान लिहीले आहे. आवडले वर्णन व फोटो.

हर्पेन तु टाकलेले फोटोही मस्त. विशेषतः तो गुहा दिसणारा.

हेलिकॉप्टर बुकिंग दोन दिवसांत फुल व नंतर ब्लॅक मधे मिळते म्हणजे एजंटबाजी भरपूर असावी.

काल अमरनाथ यात्रेवर मुस्लिमांनी हल्ला केला. अरेरे

कुठल्याही मुख्य वृत्तपत्राने हे वृत्त दिलं नाही.

अधिक माहिती : http://vskbharat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A...

-गा.पै

---------------------

गाम्या सनातन सारखे मुर्ख पेपर वाचने सोडुन द्या.......कैच्याकै बातमी तेल मिठ आणि मसाला लावुन देत आहे अश्या बातम्या अफवा आहेत ...

भागवत... छान माहिती.

आम्ही गेल्या वर्षी सोनमर्ग मार्गे कारगीलला गेलो तेव्हा झोझीला वरुन खाली बालतालचा बेस कँप असा दिसत होता..

उदयन..,

>> गाम्या सनातन सारखे मुर्ख पेपर वाचने सोडुन द्या.......
>> कैच्याकै बातमी तेल मिठ आणि मसाला लावुन देत आहे अश्या बातम्या अफवा आहेत

पंजाबातले हिंदूही माझ्यासारखे अफवांवर विश्वास ठेवणारे आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? ही बातमी बघा : http://www.punjabkesari.in/news/article-266102

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद अंजू आणि फारेंड.

बहुतांश स्थानिक घोडेवाले आणि दुकानदार हे मुसलमान असले तरी येणारे यात्रेकरू हेच त्यांचे ग्राहक आणि चरितार्थाचे साधन असते व त्यामुळे यात्रा नीटपणे होत रहावी अशीच त्यांची भावना असते. पण अमरनाथची यात्रा ही 'अतिरेकी' मुसलमानांच्या हिटलिस्टवर अनेक वर्षांपासून आहे.

केवळ आणि केवळ भारत सरकारच्या सैन्यदलामुळे ही यात्रा आपल्याला निर्विघ्नपणे पार पाडता येते.

मुख्य वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून येण्याबद्दलचा मुद्दा असेल तर स्थानिक (पक्षी महाराष्ट्रातील) मराठी / इंग्रजी तील वृत्तपत्रे जम्मू-काश्मीर भागात घडणाऱ्या घडामोडीना अजिबात प्राधान्य देत नाहीत हे अनेक काळापासून चालत आलेले सत्य आहे.

माझ्या एका अमराठी मित्राच्या सख्ख्या भावाने १९९६ मध्ये काश्मीर मधेच लोलाब व्हेलीत अमरनाथ यात्रेवर हल्ला करायच्या तयारीनिशी आलेल्या सीमेपलीकडील अतिरेक्यांबरोबर लढताना असीम शौर्य गाजवून आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याला अशोकचक्र हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. मला अर्थातच ही बातमी आपल्याकडच्या वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती, जी अजिबात पूर्ण झाली नाही.

धन्यवाद अन्जू, सन्जना, फारएण्ड, इंद्रधनुष्य.
इंद्रधनुष्य, तुम्ही टाकलेला फोटो मस्त आहे.

स्थानिक लोक त्यांचा मुख्य व्यवसाय सोडून २ महिना करिता काश्मीरच्या विविध भागातून येतात. तिथे बऱ्याच प्रमाणात बेरोजगारी असल्यामुळे त्यांचा साठी अमरनाथ यात्रा चरितार्थाचे साधन आहे. जितके जास्त दिवस यात्रा चालू असेल तितका जास्त फायदा त्यांना मिळतो.

छान लेख...

यात्रा कठीणच दिसते.....

माझी आजी १९८० ल गेली होती. त्या आधी १९७५ ला ही जाउन आली होती. तिच्या वेळी ही यात्रा अजुनच खडतर असावी..... आता तिचे कष्ट उमगले

धन्य असो....

Pages