विषय क्रमांक २ - बाई मागच्या बाई : रुक्मिणीबाई

Submitted by अनया on 13 July, 2014 - 13:01

विषय-२ : बाई मागच्या बाई—रुक्मिणीबाई

‘कामावरून येताना दोन किलो ज्वारी नक्की आणा, विसरू नका. उद्या बाबा येणार आहेत ना. ते येतील तेव्हा पीठ तयार पाहिजे.’ हा डायलॉग मारणारी व्यक्ती म्हणजे आमच्या घराच्या कणा असलेल्या रुक्मिणीबाई!

काही वर्षांपूर्वी माझ्या सासुबाई आजारी झाल्या, हळूहळू अंथरुणाला खिळल्या. अंथरुणावरून उठणे-बसणे, जेवण, नेहमीचे देहधर्म ह्या सगळ्यासाठीच त्यांना मदतीची गरज भासू लागली. तेव्हा ह्या बाईंची आमच्या कुटुंबात एन्ट्री झाली. ते दिवस अस्वस्थतेचे होते. सासुबाईंच्या आजारपणाच दडपण सगळ्यांच्याच मनावर होत. घराची इतके दिवस असलेली घडी डोळ्यासमोर विस्कटताना दिसत होती.

आम्ही दोघही काम करणारे, मुलगा लहान, सासरे वृद्ध. दिवसाचे चोवीस तास कोणीतरी मदतनीस असणं ही तीव्र गरज होती. पण ह्या बायकांच्या अस्तित्त्वाच एक दडपण येत. त्यांच्यासमोर बोलायला, जेवायला संकोच वाटतो. त्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, व्यसने, घरातला सततचा वावर, स्वभाव अशा सगळ्या गोष्टींशी आपलं कसं जुळणार, अशी भीती वाटत होती.

अशा विस्कळीत मनःस्थितीत असताना, कोणाच्या तरी ओळखीने रुक्मिणीबाई घरी आल्या. पाच फुटाच्या आतबाहेरची उंची, सडपातळ बांधा, गळ्यात तुळशीमाळ, लक्षात येईल इतकी स्वच्छ राहणी. वावरण्याला शहरी वळण. राहायला घराजवळच्या वस्तीत होत्या. चालत येण्याच्या अंतरावर त्यांचं घर होत. व्यवहाराच्या इतर गोष्टी ठरल्यावर सकाळी साडेदहा ते साडेपाच असे त्यांचे कामाचे तास ठरले. दुसऱ्या दिवसापासून त्या कामावर रुजूही झाल्या. आज त्या आमच्या कुटुंबाचा अविभाज्य असा भाग आहेत.

त्या येऊ लागल्या, त्याला आता जवळजवळ दहा वर्षे झाली. त्या दरम्यान माझ्या सासुबाई दीर्घ आजारपणानंतर देवाघरी गेल्या. स्वतःच्या आईची करावी, तशी त्यांनी सासुबाईंची सेवा केली. लहान बाळाला हाताळावे, तितक्या नाजूकपणे मूठ-चिमूट झालेल्या आजींना नाजूकपणे अंघोळ घातली, त्यांची स्वच्छता केली, त्यांना भरवून जेवू घातलं, सगळ सगळ केलं. सर्व अर्थाने परीक्षा पाहणारे ते दिवस बाईंच्या मदतीशिवाय पार पडू शकले नसते. पोटापाण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी सगळेच काम करतात. पण रूढ अर्थाने अशिक्षित असलेल्या रुक्मिणीबाईंना त्या पलीकडे जाऊन, जीव ओतून काम करायचं शहाणपण जगण्याच्या शाळेत मिळालं आहे. कामाच्या मानाने पैसे कमी मिळतात, अस जवळपास सगळ्यांनाच वाटत असत. कदाचित रुक्मिणीबाईंनाही तसं वाटत असेलं. पण ह्या भावनेपोटी त्यांनी त्यांच्या नेमलेल्या कामाकडे दुर्लक्ष केलं नाही. ते काम नेकीने पार पाडलं.

आता त्यांना सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, माझ्या कामाच्या निमित्ताने येणारे लोकं, चांगले माहिती झाले आहेत. नेहमी येणाऱ्यांच्या जेवणाच्या आवडीनिवडी पाठ झाल्या आहेत. माझे बाबा इथे राहायला येणार असले, की त्यांना रोज भाकरी लागेल, ह्या बेताने त्या ज्वारी दळून आणण्यासाठी माझ्या मागे लागतात. कोणाला बिनसाखरेचा चहा लागतो ते त्यांना नीट लक्षात असत.

त्या घरात रुळल्यावर माझं घरकाम बरच कमी झालं. पोळ्या करणे, नारळ खवणे, भाजी निवडणे, किराणा जागेवर लावणे, स्वैपाकाची तयारी करणे.... अशी असंख्य काम त्या झपाट्याने करतात. बाजारातून गोष्टी विकत आणलेल्या आवडत नसल्याने उन्हाळ्यात साबुदाण्याच्या पापड्या, कुरडयाही करतात. वर्षाचे गहू-डाळी उन्हाळ्यात घेऊन ठेवणे, तिखट-हळद करणे, ह्या सवयी मला त्यांच्यामुळे लागल्या. बाजारच्या वस्तूंमध्ये भेसळ असते, त्या आणू नका, अस टुमण माझ्या मागे लावून लावून त्यांनी आता ती पद्धत रूळवली आहे. कंटाळा न करता ही सगळी उस्तवार त्या करतात.

फार बडबडा स्वभाव नसला, तरी त्यांना गप्पा मारायला आवडतात. त्या गप्पांमधून हळूहळू त्यांची चित्तरकथा उलगडायला लागली. त्या सोलापूरजवळच्या एका खेड्यातल्या आहेत. वडिलांनी शाळेत घातलं होत. पण मास्तर मारकुटे होते. एकदा मास्तरांनी मारलं, म्हणून ह्या रडतरडत घरी आल्या. आजीने ‘काही नको शाळेत पाठवायला’ असं फतवा काढला. खेड्यात तेव्हा मुलींच्या शिक्षणाला तसही फार कोणी महत्त्व देत नसे. त्यामुळे शाळा दुसरीतच थांबली. बाराव्या वर्षी लग्न झालं. थोड्या मोठ्या झाल्यावर सासरी नांदायला आल्या. सासू-सासरे नव्हते, सुटसुटीत संसार होता. लहान वयात पाठोपाठ तीन मुलं झाली. नवऱ्याच्या पगारात घर चालेना, तेव्हा ह्या काम शोधायला लागल्या आणि आमच्या घरी आल्या.

त्यांची स्वतःची तीन मुल आहेत आणि माझा मुलगा म्हणजे त्यांचा चौथा मानसपुत्र आहे. बहुधा सगळ्यांमध्ये नाठाळही हाच असावा! पण त्यांना मात्र त्याच्यातल्या खोडी दिसतच माहीत. त्याच्यावर त्यांचा फार म्हणजे फार जीव आहे. ‘तो खरं म्हणजे पुण्यात काय, भारतातूनही पहिला येईल इतका हुषार आहे, पण अभ्यास करत नाही हो, म्हणून ’ अस त्यांचं (वस्तुस्थिती तशी नसूनही!) ठाम मत आहे. तो बारा-साडेबाराला शाळेतून यायचा, ती वेळ त्यांच्या धावपळीची असायची. सासुबाई, सासऱ्यांची ती जेवायची वेळ असायची. तरीही त्याला त्यांनी कधीही गार पोळ्या वाढल्या नाहीत. रोज गरम-गरम पोळ्याच वाढायच्या. वर ‘वाढीच वय आहे वहिनी त्याच. गरम जेवण असल की मुल नीट जेवतात’ अस मला बजावतात. मुलांच्या जेवणाला, दूधाला दृष्ट लागते, ह्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे चार लोकं आली, की काहीतरी कारण काढून त्या त्याला आतल्या खोलीत जेवायला वाढतात किंवा दूध प्यायला देतात. मी माझ्या मुलाची दृष्ट कधीही काढली नाही, पण त्यांनी बऱ्याच वेळा काढली.

घरी काही विशेष पदार्थ केला की त्याच्यासाठी घेऊन येणे, वर्षातून एकदातरी त्याला घरी जेवायला बोलावणे, त्याच्याबरोबर (काहीही कळल नाही, तरीही) इंग्रजी सिनेमे, व्हिडिओ गेम्स पाहणे हे नेहमीचच आहे. मी घरी नसले, तरी बाई घरी असल्याने मुलाला माझी उणीव फार भासली नाही. त्या वेळांना त्याच आईपण त्यांनी केलं. शाळेतून आल्यावर शाळेत काय-काय झालं, कोणी काय केलं, अश्या बाळगप्पा खूप रस घेऊन ऐकल्या. त्याला हातपाय धुवायला लावून जेवायला-खायला दिल. त्या हे सगळं करतात ह्या खात्रीवर मी निःशंकपणे माझी कामे करू शकले.

मी नेहमीच मराठी मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये, पांढरपेशा-सुशिक्षीत समाजात राहिले. बहुजनसमाजाशी माझा अगदीच परिचय नव्हता. परीक्षेत एखादा विषय ऑप्शनला टाकावा, तसा समाजाचा हा एक मोठा भाग माझ्या समजेच्या कक्षेत आलाच नव्हता. ह्याची जाणीव मला त्यांच्याशी ओळख झाल्यावर झाली.

त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती, पद्धती कळत गेल्या. नवरात्रीच्या आधी घरातले यच्चयावत कपडे- भांडी धुणे हा मला मिळालेला पहिला धडा होता. (कारण त्या कारणाने त्या दरवर्षी तीन-चार दिवस सुट्टी घेतात!) ‘नणंदेच्या मुलीचं केलं की काशीयात्रेच पुण्य मिळत’ ही आयडिया मला नवीनच होती. त्यामुळे भाच्यांना, त्या अगदी पाळण्यातल्या असल्या तरी, ‘अहो-जाहो’ म्हणणे, त्यांच्या पाया पडणे, तिच्या लग्नात तिचे व जावयाचे पाय धुणे अशा प्रथा त्या मनापासून पाळतात. त्यांच्या नवऱ्याला त्या ‘मालक’ अस संबोधतात. त्याची कानाला सवय झाली, तरी माझ्या मनाला काही अजून झाली नाही! मुलीला माहेरी आणायला जो जाईल, त्याने जाताना पुरणपोळ्या न्यायच्या असतात म्हणे आणि माहेरवाशीण सासरी जाताना तिला नवी साडी घेणे, हातभर बांगड्या भराव्याच लागतात.

‘मान देणे आणि रीत पाळणे’ ह्या कल्पनांना तर असंख्य पैलू आहेत. त्यात भावाने कसाही उभा-आडवा प्रवास करून विशिष्ट सणांना येणे आणि घरच्या सर्वांना आहेर करणे इथपासून लग्नातल्या रुसव्या-फुगव्यांपर्यंत सगळ येत. माझा भाऊ राखीला, भाऊबीजेला जमलं तर येतो, नवऱ्याचही नणंदेकडे जाण ह्याच धर्तीच असत. ह्या गोष्टीचं त्यांना फार म्हणजे फार नवल वाटत! ‘तुमचं शिकलेल्यांच सगळ वेगळच असत बघा वहिनी. आमच्यात नाही चालत’ अशी त्यांची ठराविक प्रतिक्रिया असते.

सवाष्णीची सगळी लेणी त्या आवडीने वापरतात. कुठेही लग्नकार्याला गेल्या की दोन-दोन डझन बांगड्या भरून येतात. आल्यावर त्या बांगड्या चमकवत, झमकवत आनंदाने मिरवतात. मंगळसुत्र, जोडवी, कानातले, नाकात चमकी हा साज नेहमीच असतो. प्रत्येक सणाला न चुकता मुलीसाठी, स्वतःसाठी काहीतरी कानातले, गळ्यातले आणतात. तिची आणि आपली हौस करतात. मन आणि कणा मोडून टाकेल अश्या परीस्थितीत करवादत, कुढत राहण्याऐवजी जमेल तिथे आणि जमतील तितके आनंदाचे कण वेचत राहतात.

शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना बागकामाची चांगली माहिती आहे आणि आवडही. पुन्हा त्यांच्या हाताला गुण आहे. त्यांच्या हातची झाडं चांगली तरारून येतात. गच्चीतल्या कुंड्यांमध्ये टाकलेल्या ओल्या कचऱ्यातून कोंब फुटतात. ते इंचभर असतानाही कुठला बटाटा आहे आणि कुठला टोमॅटो हे त्यांना ओळखायला येत. जन्मापासून शहरात वाढल्यामुळे मला त्यांच्या ह्या स्कीलच फार कौतुक वाटतं. त्यांच्या कृपेने आम्हाला ओवा, मिरच्या, पुदिना, लसूणपात, कांदापात अश्या गोष्टी आपल्या बागेतल्या ताज्या खायला मिळतात.

आम्ही राहतो त्या सहकारनगरला कामवाल्या बायकांचा पुरवठा जवळच्या जनता-वसाहतीतून होतो. आपापल्या घरची कामे आटपून ह्या बायका सकाळी सहा-साडेसहापासून आपापल्या मालकिणीच्या सेवेसाठी धावत असतात. माझ्या परिचितांच्या, मैत्रिणींच्या घरी काम करणाऱ्यांसाठी माझी ओळख आता ‘रुक्मिणीच्या वहिनी’ अशी आहे. नवरात्रात नाहीतर दिवाळीत मला आग्रह करकरून त्या घरी घेऊन जातात. तेव्हा तिथल्या जवळपासच्या अनेक घरांमधून मला हळदीकुंकवाला बोलावणी येतात. त्या सगळ्या घरी रुक्मिणीबाई मला मिरवतात. ‘वहिनी आपल्या घरी आल्या’ हा आनंद त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात असतो.

ह्या सगळ्या बायकांचं आपलं एक नेटवर्क आहे. त्या नेटवर्क द्वारा स्फोटक बातम्यांची देवाण-घेवाण होत असते. मला माझ्या मैत्रिणींच्या घरी खुट्ट वाजलं तरी घरबसल्या कळतं. कोण कुठे प्रवासाला जाणार आहे, कोणाकडे लग्न ठरलं आहे, सगळ्या बातम्या अगदी घरपोच येतात! ही सवय वेळीच आवरली नाही, तर त्याचा उपद्रव होणार, हे लक्षात आल्यावर त्यांना तशी समज द्यावी लागली.

कामाच्या बायका आणि सुट्ट्या घेणे, हे समीकरण कालातीत आहे! रुक्मिणीबाई तरी त्याला अपवाद कश्या असणार? पण इतक्या वर्षांच्या सवयीने आता मला त्यांच्या सुट्ट्या कधी-कधी असतील ह्याचा अंदाज करता येतो. माझी फार पंचाईत होऊ नये, म्हणून मोठ्या सणांना अर्धी-पाऊण(च) सुट्टी. नवरात्राच्या आधी कपडे धुवायला आणि कोजागिरीनन्तर तुळजापूरच्या यात्रेची सुट्टी. अक्षयतृतीयेला आणि पितृपक्षातल्या नवमीला सासू-सासऱ्याच्या श्राद्धाची सुट्टी. ह्या ठरलेल्या सुट्ट्या. ह्या व्यतिरिक्त असंख्य लग्न, मयत, आजारपणे. वर्षातून एकदा माहेरपणाची मोठी सुट्टी.

‘आमच्यात तोरणवेळेला आणि मरणवेळेला जावचं लागत. नाहीतर नाव ठेवतात. तुमचं शिकलेल्यांच सगळ वेगळच असत बघा वहिनी.’ ह्या वाक्याचा अजून एक वळसा मला वर्षात अनेक वेळा मिळतो. पण संतापून, रागवून काहीही उपयोग होत नाही, हे शहाणपण येण्यासाठी मला खूप वर्षे लागली. एका अश्या आणीबाणीच्या वेळेला मी त्यांच्या गरजेपेक्षा आपली गरज मोठी आहे, हे स्वतःशीच कबुल करून टाकलं.

तोपर्यंत मी त्यांच्या सुट्ट्यांवरून खूप चिडायचे, वैतागायचे. त्या घरी नसल्या की मला नाहीतर नवऱ्याला घरी थांबाव लागायचं. ठरलेल्या गोष्टी रद्द कराव्या लागायच्या, शिवाय घरकामात अडकून पडाव लागायचं, ते वेगळच.

हळूहळू माझी ही चीडचीड कमी झाली. एकतर कामवाल्या बायकांना आपण आठवड्याची एक दिवस सुट्टी देत नाही. आपण त्यांना पगार देत असलो, तरी त्या पलीकडे त्यांना त्यांचं व्यक्तीगत आयुष्य असतच. त्या आयुष्याचे ताणेबाणे वेगळे असतात. विस्तारीत कुटुंब, पै-पाहुणे, समाज, समाजातल्या चालीरीती ह्याच प्रचंड दडपण असत. ते झुगारून देण्याइतकी आर्थिक आणि सामाजिक ताकद नसते. ‘आपण लग्नाला किंवा मयताला गेलो नाही, तर आपल्याकडे कोणी येणार नाही,’ ही भीती असते. आजारपण तर कोणालाच चुकलं नाही. हे लक्षात आल्यावर मी ‘निदान आधी सांगून सुट्टी घ्या,’ हा नियम लागू केला. आमचे हात तसेही दगडाखाली अडकलेले होते. ठेवले तरी दुखायचे आणि ओढले तरी दुखायचे.

रुक्मिणीबाई स्वतः अशिक्षित आहेत, पण त्यांची तीनही मुल चांगली शिकली आहेत. त्यांच्या समाजात मुलगी अठरा-एकोणीस वर्षांची झाली, की लग्नाचा बार उडतोच. तिथे नातेवाईकांचा विरोध पत्करून त्यांनी मुलीला बी.ई. केलं हे फार कौतुकास्पद वाटतं. त्यांना लिहा-वाचायला शिकवायचे माझे आणि मुलाचे सगळे प्रयत्न त्यांनी उडवून लावले आहेत. आता पहिली मराठीची पुस्तक आणून त्यांना निदान वाचायला शिकवायचं, असा ठराव आम्ही माय-लेकांनी केला आहे. त्यांना वाचता येत नसल्यामुळे आम्ही सगळेच इतकी पुस्तक का वाचतो? हा प्रश्न त्यांना नेहमी पडतो.

अशिक्षित असलो, तरी आपण शहरी आहोत, आपल्याला समज चांगली आहे, सवयी चांगल्या आहेत, ह्याचा त्यांना फार अभिमान आहे. ‘माळकरी आहे मी. वाटलं तर तुमच्याकडे मागून खाईन. चोरी आणि शिंदळकी कधी करणार नाही’ असे साधे-सोपे पण महत्त्वाचे संस्कार त्यांच्यावर आहेत. आमच्या घरी कुठल्याही कपाटांना कधी कुलुपं नसतात. ती लावावी, अस कोणाच्या मनात आलं नाही. माझे सासू-सासरे आणि मुलगा असे अनमोल असे कुटुंबीय मी त्यांच्या जीवावर सोडून जात होते. त्यांची त्या नीट काळजी घेत होत्या, मग निर्जीव वस्तूंची काय किंमत?

त्या आता माझी बहीण, मैत्रीण सगळचं आहेत. दोन बहिणींच किंवा मैत्रिणींच शंभर टक्के पटतच अस नाही. पण एकमेकांचे गुण-अवगुण, स्वभावाचे कंगोरे इतके माहिती झालेले असतात, की त्याकडे दुर्लक्ष करता येत. आमचही असचं झालय. कधीतरी खटके उडालेच तरी ते बाजूला टाकून पुढे जाण्याची कला आम्ही शिकलो आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे वाक्य आता घासून गुळगुळीत झाल्याच्याही पलीकडे गेलं आहे. एक प्रेमळ स्त्री त्या पुरुषाला त्याने खूप यश मिळवल्याचे, कष्टाने असाध्य ते साध्य केल्याचे समाधान मिळवून देते. पण एका यशस्वी बाईच्या मागेही अजून एक बाईच असावी लागते. ती आई, सासू, बहीण, मैत्रिणी, कामाच्या बायका अश्या अनेक स्वरुपात असते. ही मजबूत सपोर्ट सिस्टीमच तिला बळ देते. तिला आपल्या करीयरमध्ये झोकून द्यायला मोकळीक देते.

मी स्वतःला यशस्वी स्त्रियांच्या गटात गणणे फारच चुकीचे होईल. पण रुक्मिणीबाई घर, घरातली माणसं नीटपणे सांभाळतात, ह्या खात्रीमुळे मी काही चतकोर, नितकोर काम करते. स्वतःच्या कुटुंबासाठी, मित्र-मैत्रिणींसाठी, आवडी निवडी, छंदांसाठी वेळ देऊ शकते, शक्ती राखून ठेऊ शकते. बाईपणा म्हणजे सदैव तारेवरची कसरत. ती सांभाळत त्यांनी माझी कसरत सोपी केली.

माझा मुलगा त्यांना ‘मी कधी परदेशात गेलो ना, तर आईच्या आधी तुम्हालाच नेईन’ अस त्यांना म्हणत असतो. त्यांचं मातृत्व इतकं व्यापक, इतकं प्रेमळ, इतकं खरं आहे, की बाकी कोणाचे नाही तरी, त्यांचे पांग फेडल्याशिवाय माझा मुलगा राहणार नाही, अस मला अगदी खात्रीने वाटतं. ह्या मायेचं ऋण कधीच फिटणार नाही. ते ऋण माझ्यावर आहे, ह्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभार!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय. आवडलं.

एका यशस्वी बाईच्या मागेही अजून एक बाईच असावी लागते. ती आई, सासू, बहीण, मैत्रिणी, कामाच्या बायका अश्या अनेक स्वरुपात असते. ही मजबूत सपोर्ट सिस्टीमच तिला बळ देते. तिला आपल्या करीयरमध्ये झोकून द्यायला मोकळीक देते.>>>> Happy खूप आवड्लं.

मी त्यांच्या गरजेपेक्षा आपली गरज मोठी आहे, हे स्वतःशीच कबुल करून टाकलं.
एकतर कामवाल्या बायकांना आपण आठवड्याची एक दिवस सुट्टी देत नाही. आपण त्यांना पगार देत असलो, तरी त्या पलीकडे त्यांना त्यांचं व्यक्तीगत आयुष्य असतच. >>>> हे आवडलंच!

खूप सुंदर लिहिलंय. अशी मदतनीस मिळणं खरंच भाग्याचं लक्षण आहे. रुक्मिणीबाईना ___/\___ आणि तुम्ही त्यांची ओळख करून दिलीत तुम्हाला पण सलाम.

मस्त लिहीले आहेस, आणी हो भाग्यवान आहेस. तुम्ही दोघीनी एकमेकीना समजून घेतल्याने धकाधकीचे जीवन देखील सुसह्य झाले. खूप मदत झाली तुला त्यान्ची. असेच राहु द्या.:स्मित:

सेम पिंच, लेख बराचसा रिलेट करता आला, सपोर्ट सिस्टिमबद्दल तर नक्कीच.

साध्या-सोप्या भाषेत प्रभावीपणे उतरलेलं व्यक्तिचित्रण !

वा, खुप छान लिहिलंय! आवडल्या तुझ्या रुक्मिणीबाई.
एका यशस्वी बाईच्या मागेही अजून एक बाईच असावी लागते>>> यशस्वी असो वा नसो, तू म्हणतेस ते मात्र अगदी अगदी खरंय!!

माझ्या घरच्या मावशीही माझ्या फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहेत. आयुष्याचं जे तत्वज्ञान आजवर त्यांच्याकडून शिकले तितकं खरं कोणत्याही पुस्तकाकडून किंवा चिंतकाकडून नाही. अक्षरशत्र असलेली ही स्त्री जे वागते, बोलते ते बघून अवाक व्हायला होतं. मीही त्याबाबतीत तुझ्याइतकीच भाग्यवान आहे.

प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. माझा लेख कोणी वाचला, तरी मला भरभरून आनंद होतो. तो आवडला अस म्हटल तर मग पराकोटीचा आनंद होतो!!

नताशा, गौरी देशपांडे ह्या माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका आहेत. त्यांची सगळी पुस्तक मी मधूनमधून वाचत असतेच. त्यामुळे ‘बी-बाय’ चा प्रभाव फार पडू नये, ह्याचीच काळजी घ्यावी लागली!!

परत एकदा धन्यवाद....

छान लेख !
वाचताना प्रत्येक शब्दागणिक आमच्या बाईंबद्दलच लिहिलंय कि काय असे वाटत होते .
खरेच बहुतेक अशावेळेस वाटते कि आधीचे काही ऋणानुबंध असावेत .

खरच अशी मदतनीस मिळणं भाग्याचं.
मस्त उतरल्या आहेत रुक्मिणीबाई तुझ्या शब्दातून.

मस्त लेख........

माझे सासू-सासरे आणि मुलगा असे अनमोल असे कुटुंबीय मी त्यांच्या जीवावर सोडून जात होते. त्यांची त्या नीट काळजी घेत होत्या, मग निर्जीव वस्तूंची काय किंमत?>> हे मस्त..

Pages