खबरदार! होश्शियार! "गूगल क्रोम ओएस्" येत आहे हो!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गूगल इन्कॉ.ने अखेर पत्ता टाकला : इ.स. २०१० मध्ये गूगल क्रोम ही नवीन वेब-आधारित संगणकप्रणाली बाजारात उतरणार आहे (*इंग्लिश दुवा).
गेल्या वर्षी गूगल क्रोम ब्राउझराच्या उतारीनंतर गूगल त्यांच्या पोतडीतून काहीतरी सणसणीत उत्पादन बाहेर काढणार अशी चर्चा होतीच. मायक्रोसॉफ्ट इन्कॉ.ने - गूगलेच्या नं. १ प्रतिस्पर्धी कंपनीने - "विंडोज् ७" ही व्यक्तिगत संगणकांकरता लक्षिलेली विंडोज् व्हिस्टेनंतरची संगणकप्रणाली २००९ सालात तिसर्‍या तिमाहीत बाजारात उतरवण्याचे जाहीर केले होते. गूगलदेखील त्याच सुमारास नवीन उत्पादनाद्वारे संगणकप्रणालीच्या (आजपावेतो मायक्रोसॉफ्टवाल्यांची मिरास असलेल्या) क्षेत्रात पाऊल टाकेल अशा वदंता संगणकक्षेत्रातल्या गोटांतून पसरत होत्या; त्या अखेरीस खर्‍या ठरल्या.
गूगल क्रोम ओएस् नोटबुक/डेस्कटॉप वगैरे व्यक्तिगत संगणकांकरता - खासकरून नेटबुकांकरता - बनवलेली मुक्तस्रोत ओएस् असणार आहे. विंडोज्, अ‍ॅपल मॅकिंटॉश, लिनक्स वगैरे आजपर्यंतच्या इन्स्टॉल कराव्या लागणार्‍या अवजड ओएशींपेक्षा गूगल क्रोम ओएस् वेगळी असणार आहे. ब्राउझर-आधारित अ‍ॅप्लिकेशनांमधून वेब/ऑफिस/मल्टिमीडिया सेवा पुरवण्याची आगळीवेगळी फंडा यात वापरली जाईल - जेणेकरून वापरकर्त्याला कुठल्याही मशिनावरून (स्वतःचा डेस्कटॉप/नोटबुक, ऑफिसातलं मशीन इथपासून ते आयफोन किंवा तत्सम स्मार्टफोनांवरूनही) ही वेब-आधारित अ‍ॅप्लिकेशनं एकजिनसीपणे वापरता येतील (खेरीज अशी अ‍ॅप्लिकेशनं प्रत्येक मशिनावर बसवून घ्यायची गरजही नाही Happy ).
संगणकवापराच्या या अगदी हटके मॉडेलावर आधारलेली, इंटेल व आर्म या दोन्ही चिपसेटांवर चालू शकणारी गूगल क्रोम ओएस् अधिकृत वृत्तानुसार २०१० सालात प्रथम नोटबुकांसोबत मिळू लागेल. त्यांची सध्या वेगवेगळ्या ओईएम् भागीदारांबरोबर या अनुषंगाने बोलणी चालू आहेत. दरम्यान या वर्षाच्या उत्तरार्धात गूगल त्यांच्या या नव्या संगणकप्रणालीचा स्रोतही खुला करणार आहे. मुक्तस्रोत-समाजाकडून सॉफ्टेवेअरविकासाद्वारे मिळणार्‍या जबरदस्त पाठबळावर आणि 'वेब-आधारित ओएस्' या फंड्याच्या अपेक्षित लोकप्रियतेच्या जोरावर संगणकप्रणाली क्षेत्रातला मायक्रोसॉफ्टवाल्यांच्या ९०% बाजारहिश्शापैकी बराचसा हिस्सा गूगल क्रोम ओएस् खाईल अशी बर्‍याच मायक्रोसॉफ्ट-विरोधकांची (आणि खुद्द गूगल इन्कॉ.ची) आशा आहे. Proud

प्रकार: 

चांगली माहीती... Happy
धन्यवाद.

छान माहीती, आभार Happy

हम्म मायक्रोसॉफ्टची मोनोपॉली कुणी मोडू शकेल तर ते गुगलंच.. आजपर्यंतचा त्यांचा प्रवास पाहता हे शक्य होईल असं वाटतंय खरं
धन्यवाद फ.. रच्याकने बर्‍याच दिवसांनी दिसलास.

घरगुती वापराकरता म्हणून योग्य असेल, पण ऑफिस वापराकरता कठीण वाटते. वेळ जाईल तसे गूगल क्रोम OS चे गुण/दोष दिसतील, मग ठरवणे सोपे जाईल. आता काही प्रतिक्रिया देणे उचित नाही.

या नवीन संगणकप्रणालीत सर्वांना ज्याची अत्यंत सवय झाली आहे असे word procesor, power point, excel, इ. अनेक applications असतील का? असल्यास माझे MS windows मधील सर्व काही सहजासहजी तिथे हलवता येईल का?

१९८५ सालापासून युनिक्स बाजारात आणण्यासाठी ए टी अँड टी बरीच वर्षे झगडले, अमाप पैसा खर्च केला, नि सुरुवातीला ए टी अँड टी अश्या प्रश्नांना उत्तरे देऊ न शकल्यामुळे, Unix is not for dummies असे बाणेदार उत्तर देत असत. (कारण त्यांच्या मते IBM वापरणारे dummies). पण माझ्यासारख्या बर्‍याच जणांनी त्यांना लक्षात आणून दिले, की us dummies have all the money. मग जरा त्यांची भाषा सौम्य झाली.

शेवटी सगळी काँप्यूटर डिविजन NCR ला विकून मोकळे झाले, नि युनिक्स दुसर्‍या कुणाला तरी विकून मोकळे झाले.

मला वाटते हे गूगल क्रोम सुद्धा फुकट असले तरी 'Not for dummies' असे लेबल लावून बाजारात आणावे.

Happy Light 1

संकल्प, छान माहिती. धन्यवाद ! Happy

मित्रहो, गूगल क्रोम ओएस् मधे मराठी भाषा असनार का?

माझ्या माहितीत, उबुन्टु लिनक्स मराठी मधे install करता येते. तसेच यात word procesor, power point, excel, इ. अनेक applications ही आहेत. (सर्व निशुल्क :-))

वापरुन पहा, निशुल्क आहे.
http://www.ubuntu.com/

उपयुक्त माहीती. धन्यवाद.

संकल्प,आभार रे तुझे.. चांगली माहिती दिलीस.. मायक्रोसॉफ्ट्च्या वर्चस्वाला धक्का देणारे असे चांगले प्रॉडक्ट असेल हे तर त्यात आपल्यासारख्या ग्राहकांचाच फायदा आहे..

अरे वा! छानच. ब्राऊझर आधारीत अ‍ॅप्लिकेशन्स म्हणजे फ्लॅश ड्राईव्ह टाकला की निघालं प्रेझेंटेशनला.
फ, छानच लिहितो आहेस. डिटेल्समध्ये लिहिशील का?

वर चांगली माहीती दिली आहे.
क्रोम ह्या प्रणाली बद्दल अजुन अनेक जण साशंक आहेत.
इंटरनेट्वर बरेच लेख आहेत ह्या संदर्भात पण मी वाचलेल्या एक-दोन लेखा मधे एक कारण गुगल ची पुर्वीचे प्रॉडक्ट्स असे दिले आहे. उदा.
क्रोम ब्राउजर :
(खुप गाजावाजा झाला पण प्रत्यक्षात आ.ई.-८, सफारी किंवा फायरफॉक्स पेक्षा खुप काही वेगळे असे नाही.)
मोबाईल प्रणाली:
(ह्याला पण म्हणावे तसा प्रतिसाद / यश नाही मिळाले.)

तसेच मायक्रोसॉफ्ट वर आधारीत बरेचशे सॉफ्टवेसर्स आणि डिव्हाईसेस आहेत. ते सगळे क्रोम वर चालतील का? किंवा क्रोम बाजारात येई पर्यंत त्यांची क्रोमवर चालणारी व्हर्जन्स तयार असतील का ह्या बद्दल अनेक जण साशंक आहेत.

जरी सगळ्या प्रश्नाची उत्तरे अजुन माहीती नसली तरी लोकांना मायक्रोसॉफ्ट्ला काहीतरी पर्याय हवा आहे. क्रोम रुपाने सर्वांना दुसर्‍या पर्यायाबाबत आशा आहे.

खबरदार होश्शियार.. हे मात्र पटेश! वेब आधारित प्रणाली म्हणजे प्रायव्हसीचे तीन तेरा! चकटफु काहीही नाही. तसाही गुगलचा आणि युजर प्रायव्हसीचा काही संबंध नाहीच आहे म्हणा. वेब ईकॉनॉमीमधे पैसा चलन नसून माहिती हे चलन आहे...
[तळ टीपः मी मायक्रोसॉफ्ट चा कर्मचारी नाही.]

सध्या सगळी कडेच वेब आधारीत प्रणालीचा जोर आहे. मायक्रोसॉफ्ट देखिल 'अझुर' ओएस घेउन येते आहे. इतर सगळेच क्लाउड कॉप्युटींग आधारित प्रोडक्टस घेउन येत आहेत. सॉफ्टवेअर विकत घेण्या पेक्षा वापराल तेवढे पैसे आकारले जातिल. सास(Software as a Service) ,हास(Hardware as a Service),आस (Infra as a Service) अशी प्रणाली लवकरच जोर धरू लागेल. अर्थात प्रायव्हसी साठी एसएसएल आहेच, बस थोडे अजुन पैसे मोजावे लागतिल. Happy

इंटरनेट मात्र श्वास होईल. ईंटरनेट बंद... मग करा ठणठण गोपाळ...?? नाही.... HTML 5... offline browsing.... आहे ना Happy बघु २०१० काय नविन घेउन येत ते...