विषय क्रमांक २ - 'पिवळ्या' - एक वटवृक्ष

Submitted by आशिका on 7 July, 2014 - 09:03

गोड गोजिरे गाल गुलाबी
लडिवाळ हास्याची लकेर ही,
मखमली स्पर्शाची किमया न्यारी
बोलकी नजर खट्याळ भारी

वरील ओळी ज्याला तंतोतंत लागू होतात ते म्हणजे 'बाळ'. 'रडणे' या एकमेव धारदार शस्त्राच्या प्रभावावर सार्‍या घरावर अधिराज्य गाजवणारा 'शहेनशहा'.

आमच्या घरात मीच सर्वांत लहान असल्यामुळे लहान बाळाचे मला फार आकर्षण होते. कुटुंबात कुणाकडे बाळ असेल तर मी सतत त्याच्या अवतीभवती असे, पण असा बाळाचा सहवास काही वेळापुरताच मिळत असे. दिवसातील कित्येक तास अशा गोजिरवाण्या बाळाच्या सहवासात घालवण्याचे भाग्य माझ्या नशिबात आले ते वयाच्या १६-१७ व्या वर्षी, जेव्हा आमच्या अगदी शेजारच्या घरात 'पिवळ्या'चा जन्म झाला.

'पिवळ्या'- शेजारच्या गुप्ते आजींचा नातू. काही कारणाने त्याचे बारसे उशिरा झाले व प्रत्येक जण त्याला, स्वतःला आवडेल त्या नावाने पुकारू लागला. 'मनू', 'राजा', 'सोन्या' असे काहीही. गुप्ते आजी त्यास 'सोन्या' म्हणत असत. लहानपणी बर्‍याचदा त्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालत असत. पिवळ्या रंगातील विविध रंगछटा त्याच्या कपड्यांत असत. कदाचित त्याच्या आईला पिवळा रंग आवडत असावा. म्हणून मी त्याला 'पिवळ्या' म्हणू लागले.

पिवळ्याची आई नोकरी करायची, त्यामुळे त्याला आजी सांभाळत. कॉलेजमधुन आल्यावर मी बर्‍याचदा त्यांच्याकडे जात असे व पिवळ्याच्या संगतीत मजेत वेळ घालवत असे. गुप्ते आजींचं तर सारं आयुष्यच पिवळ्याभोवती गुंफलेलं. एखाद्याला वाटावं की हे बाळ नसतांना काय करत होत्या या आजी?

सकाळी नऊच्या सुमारास आई-बाबा घराबाहेर जात असतांना, आजीच्या कडेवरुन त्यांना टाटा करुन झाला की आजी आणि पिवळ्या यांच्या एकत्र दिवसाची सुरुवात होई. त्याला छानपैकी तेल लावून मालिश करणे, गरम पाण्याने आंघोळ घालणे, त्याला भरवणे, झोपवणे, त्याच्याशी खेळणे, बोलणे हे सारे मी त्या दोघांसह एंजॉय करायचे.

मात्र हे सारे गुप्ते आजी, दिनक्रमाचा भाग म्हणून उरकुन नाही टाकायच्या, तर या प्रत्येक कामाचा एक-एक सोहळा बघणार्‍याला अनुभवण्यास मिळे.यातील प्रत्येक गोष्ट करतांना आजी अथकपणे पिवळ्याशी गप्पा मारत असत, बोबड्या बोलांतुन , चेहर्‍यावरील हावभावासह त्याच्याशी संवाद साधत असत आणि तोही आजीचे हावभाव 'कॉपी-पेस्ट' करण्याचा त्या वयापासुन प्रयत्न करी, सोबत तोंडाने हुंकारणे चालू. खूप मजा येई बघायला. आजी काही त्याला फक्त लहान मुलांच्या गोष्टीच सांगत असे नाही, तर घरातील आपल्या उरलेल्या कामाचा पाढा वाचणे, श्लोक, स्तोत्रे, सामाजिक, राजकीय घडामोडी यातले काहीही त्या पिवळ्याशी बोबड्या भाषेत बोलत व पिवळ्या जणू काही सर्व समजंतय आणि पटतंय या आविर्भावात आजीला प्रतिसाद देई. दिवंगत झालेल्या गुप्ते आजोबांच्या आठवणीही नातवाला सांगायला त्या विसरत नसत. असे विविध शब्द कानी पडून मुलांचे शब्दभांडार वाढते असे त्यांचे मत होते.

दिवसांगणिक पिवळ्या मोठा होत होता. त्याचे सरकणे, रांगणे सुरु झाले, झोपण्याचा वेळ कमी-कमी होत गेला आणि आजींना दिवस कमी पडू लागला. त्यांचे स्वतःचे वाचन, पुजापाठ, पोथी या गोष्टी त्या जसं जमेल तसं पिवळ्याचं सगळं करुन, करु लागल्या. त्यादेखील पिवळ्याचं बालपण भरभरुन अनुभवत होत्या. पिवळ्याच्या मस्तीला आता घर कमी पडू लागले. कुठे हे खेच, ते ओढ, काहीतरी तोंडातच घाल या उपद्व्यापांनी पिच्छा पुरवला. आजींची दमछाक होवू लागली. डोळ्यांत तेल घालुन त्या पिवळ्यावर लक्ष ठेवीत असत.

'पिवळ्या'चे जेवण हा एक कार्यक्रम असे. सगळ्या घरभर त्याच्यामागे ताट घेवून फिरत, गोष्टी सांगत तो पार पडे."...आणि अशा प्रकारे ती दोघं सुखात राहू लागली" असं म्हणत गोष्ट संपली की 'पिवळ्या' अंगठा व तर्जनी एकमेकांना चिकटवून आजीला दाखवी. या त्याच्या खुणेला एक विशिष्ट अर्थ होता तो म्हणजे आजीने अजुन गोष्ट सांगावी हा आग्रह. ते पाहुन आजींची "एकदा काय झाले...." म्हणत दुसर्‍या गोष्टीला सुरुवात आणि पिवळ्याच्या डोळ्यांत विजयी भाव. तीच तर्‍हा झोपवताना म्हणायच्या अंगाई गीतांची. एकापाठोपाठ एक अशी चार-पाच गाणी ऐकल्याशिवाय हा पठ्ठ्या डोळे म्हणून मिटायचा नाही. झोपवणार्‍यालाच झोपवील असा होता !

साठीच्या आजी कुठुन एव्हढी ताकद व संयम बाळगुन होत्या, देव जाणे! बरे कसलाही, त्रागा नाही, चिडचिड नाही की सून घरी आल्यावर दिवसभर मी तुझ्या मुलाला सांभाळले आता सारे काही तू पहा हा भाव नाही. संध्याकाळी सुनेला पिवळ्याबरोबर काही वेळ मिळावा म्हणून संध्याकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारीही आजींनी आनंदाने स्वीकारली होती.

'पिवळ्या'चे निरागस बाल्य लोप पावत तो हळूहळू 'डँबिस' या वर्गात शिरत होता. मस्तीखोर आणि उचापती करायच्या स्वभावामुळे तो आजींच्या नाकात दम आणत असे.आजी पूर्वी चाळीत रहात असत. त्यामुळे फ्लॅट संस्कृतीत आपापल्या घराची दारे बंद करुन बसायचे असते हे त्यांच्या कधी पचनीच पडले नाही. त्यांच्या घराचे दार कायम सताड उघडे. त्यामुळे जिन्यावरुन येता-जाता आजी व नातवाचा संवाद कानी पडत असे. "अरे बाबा, जरा बस की रे स्वस्थ, ही एव्हढी पोथी पुरी करु दे" " आजी, कशाला पोथी वाचतेस, इतक्यांदा मला हाक मारतेस ना त्यमुळे होतंच ना तुझं नामस्मरण" स्वतःच्या 'ओंकार' या नावाची महती, महाशय आजीला अशी ऐकवत असत. हळू-हळू त्या घरातुन अक्षर ओळख ऐकू येवू लागली, आजी नातवाला शाळेत जाण्यायोग्य बनवत होत्या. पुढे 'पिवळ्या' शाळेत जाऊ लागला व आजींना स्वतःचा असा कही वेळ मिळू लागला, स्वतःचे छंद वगैरे जोपासायला.

याच दरम्यान माझे लग्न झाले आणि 'पिवळ्या'च्या घराशी संबंध फारच कमी येवू लागला. माहेरी गेल्यावरच भेट होत असे. पण आता पिवळ्याचे विश्व विस्तारले होते. तो शाळा, क्लास, अभ्यास, उनाडक्या यात व्यस्त राहू लागला. प्रत्येक वेळी तो भेटेच असेही नाही. आताशा तर त्याला 'पिवळ्या' अशी हाक मारणेही बंद झाले होते. त्याचे 'ओंकार' हे नावच आता ओठी येवू लागले. त्याची सारी खबरबात आजींकडूनच कळत असे. प्रत्येक भेटीत आजी नातवाबद्दल भरभरुन कौतुकाचे बोल बोलत असत. आई-वडीलांपेक्षाही या 'दुधावरच्या सायीला' नातवाचा कळवळा काकणभर जास्तच होता. शाळा, महाविद्यालय, नंतर अभियांत्रिकी महाविद्यालय असे टप्पे पार करत पिवळ्या पदवीधर अभियंता झाला. पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला. बहुतांशी आता परदेशातच गलेलट्ठ पगाराची नोकरी पत्करुन 'पिवळ्या' तिथेच स्थयिक होईल असे आम्हास वाटले. त्याच्या आई-वडिलांचीही या गोष्टीला 'ना' नव्हती. ती दोघेही आता सेवानिवृत्त झाली होती. परंतु पिवळ्या मायदेशी परतला. इथेच त्याला चांगली नोकरीही मिळाली.

एकंदर सगळे व्यवस्थित चाललंय असे मी ऐकून होते आणि एक दिवस 'ती' घटना कानांवर आली.

'पिवळ्या'च्या आजीला अर्धांगवायुचा झटका येवून त्यांची एक बाजू पूर्णतः लुळी झाली.....

एक-दिड महिना हॉस्पिटलमध्ये काढुन आजींची रवानगी, नाकाला द्रव पदार्थ घेण्यासाठी नळी लावलेल्या,बेड-रिडन अशा अवस्थेत घरी करण्यात आली. संपूर्ण परावलंबित्व !! ऐकुन मन सुन्न झाले. पिवळ्याच्या जन्मापासुनची आजींची सारी धावपळ, लगबग क्षणात चलतचित्राप्रमाणे डोळ्यांपुढे सरकू लागली. काय परिस्थिती ओढवली असेल गुप्ते कुटुंबावर, ऐंशीच्या घरातल्या अशा रुग्णाला सांभाळायचे, कधी बर्‍या होतील, होतील तरी की नाही, काहीच शाश्वती नाही. वाटलं त्यांना भेटुन यावं पण विचार केला की आधी या सार्‍या परिस्थितीतुन या कुटुंबाला सावरु दे, त्याआधीच कशाला 'बघ्यांची गर्दी' म्हणून २-३ महिने जावू दिले व एक दिवस आजींना भेटायला गेले.

गुप्ते काका-काकींशी आजींच्या तब्येतीबद्दल जुजबी बोलणे चालु होते. 'पिवळ्या' कुठे दिसलाच नाही. काकींनी नंतर मला आजींना भेटायला म्हणून आतल्या खोलीत नेले. दारातुन आत जात असतानाच पावले थबकली. समोर जे दिसत होते ते म्हणजे ' इतिहासाची पुनरावृती' होती.'पिवळ्या' आजींचा हात हातात घेवून त्यांच्याशी बोलत बसला होता आणि आजींचे स्नेहार्द्र नेत्र त्याला न्याहाळत होते. आजींची वाचा गेली होती पण त्या ज्ञानेंद्रियाची उणीव डोळे भरुन काढत असावेत असं वाटण्याइतपत त्यांचे डोळे बोलके दिसत होते. पिवळ्या आजीला संबंध दिवसातील घडामोडी सांगत होता, प्रेमाने. तो थांबला की आजी एक हात, जो कार्यरत होता तो उंचावून, अंगठा आणि तर्जनी एकमेकांना चिकटवून खूण करीत, तीच 'ओळखीची खूण', अजुन बोलण्याबद्दल, जी मलाही ठाऊक होती. पिवळ्या तो संकेत बरोबर हेरुन "हो सांगतो हं आजी" म्हणत आणखी काही-बाही बोलु लागे. मध्येच त्याने आजीला पेपरमधील ठळक बातम्या वाचुन दाखवल्या, आजींची नित्यपाठाची ज्ञानेश्वरी वाचून झाली. माझी पावले दारातच खिळली होती. या दोघांच्या सुखद सहवासात तिसर्‍या कुणाचाही व्यत्यय नको असे वाटत होते. नियतीने किती बेमालुमपणे ही भूमिकांची अदलाबदल केली होती, हे पाहून मन भरुन आलं.

काही वेळाने पिवळ्याचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्याने आत येण्याची खूण केली. आजींजवळ बसले. "बघ माझा सोन्या माझी किती सेवा करतोय" हे भाव त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होते. मीही त्यांना तसे बोलून दाखवले, "आजी, भाग्यवान आहात, इतका गुणी नातू मिळालाय तुम्हाला" आजींची कृतार्थ नजर बरंच काही सांगून गेली.

या प्रसंगाने मला 'पिवळ्या'चे व्यक्तिमत्व उलगडून दाखवले. त्याचे आई-वडील, आजुबाजुचे रहिवासी या सार्‍यांनी त्याच्यातील हळव्या मनाचे एक-एक पदर विलग करुन दाखवले.

आजींच्या आजाराची, परावलंबित्वाची कल्पना येताच पिवळ्याने सारी सुत्रे हातात घेतली होती. आजी जरी आता बोलू शकत नसली तरी तिला अवतीभवती घडणारे सारे समजतेय, तिलाही मन, भावना आहेत, हे समजुन त्याने पुढील कार्यवाही ठरवली. खरं तर आजींची सेवा करण्यासाठी दिवसा एक व रात्री एक अशा आया बाई ठेवण्याइतकी खचितच गुप्ते कुटुंबियांची परिस्थिती होती. मात्र त्यात 'मायेचा ओलावा' असणार नाही. हेच सारे जर आपण केले तर आजीला यातुन उभारी मिळेल, आपण परावलंबी अहोत, घरच्यांना नकोसे झालोय असे वाटणार नाही, हे त्याने आई-वडीलांना समजावले. लेकाचा सार्थ अभिमान वाटुन त्या पती-पत्नींनीही याला दुजोरा दिला आणि आजीसंबंधित कामे तिघांनीही वाटुन घेतली. आजीची औषधे, पथ्य-पाणी, व्यायाम या सार्‍या गोष्टींचा चार्ज पिवळ्याने स्वतः घेतला व दररोज नियमितपणे हे सारे करुन तो ऑफिसला जावू लागला.

तरुण वय, हातात पैसा खेळू लागलेला, अंगावर विशेष जबाबदारी नाही या काळात वेगवेगळी आकर्षणे खुणावत असतात, पण पिवळ्या मात्र संध्याकाळी तडक घर गाठी आणि जास्तीत जास्त वेळ आजीच्या सहवासात घालवण्याचा प्रयत्न करत असे. तिच्याशी बोलणे, पोथी वाचुन दाखवणे, घरातील महत्वाच्या बाबतींत, कुटुंबप्रमुख म्हणून तिचा विचार घेणे हे नित्यकर्म झाले होते त्याच्यासाठी. आजीची खोलीसुद्धा त्याने टी.व्ही., म्युझिक सिस्टिम याने सुसज्ज ठेवली होती, पलंग खिडकीजवळ हलवला, जेणे करुन आजीला बाहेरची दुनिया दिसावी. गुप्ते काकांनी तर हेही सांगितले की गेल्याच महिन्यात त्याला परदेशात नोकरीची मस्त ऑफर आली होती, पण धुडकावून दिली याने, आजीला सोडून जाणार नाही सांगुन.

आजच्या पिढीतल्या मुलांना वागायची रीत नाही, नात्यांची कदर नाही, फक्त स्वतःपुरते पहायचे असा कंठशोष करणार्‍यांना पिवळ्याचे हे वागणे म्हणजे अगदी सणसणीत चपराक होती.

एखाद्याला वाटावं की 'नव्याची नवलाई नऊ दिवस असते', असे किती दिवस करणार आहे हा मुलगा अशी कामे? पण आज आजींना आजारी पडून जवळजवळ चार वर्षे झालीत आणि पिवळ्याचे हे सेवाव्रत चालुच आहे अखंडपणे. आता केव्हाही त्याच्या जीवनात एखादी राजकन्या प्रवेश करेल आणि तिच्या पदार्पणातच पिवळ्याच्या जीवनातील अग्रक्रम बदलतील, तो स्वतः संसाराच्या गाड्यात गुंतुन जाईल, तेव्हा जमणार आहे का त्याला हे सारं? माहीत नाही, पण कुणी सांगावं, ती राजकन्याही अशीच असेल पिवळ्याच्या सार्‍या कृतींना 'मम' म्हणून तना-मनाने अंगिकारणारी ! पुढे जे व्हायचे ते होईलच पण त्यामुळे या चार वर्षांतील पिवळ्याची सेवावृत्ती कमी होत नाही.

दुसर्‍यांना समजुन घेण्याच्या त्याच्या स्वभावाला तोड नाही.आपले आई-बाबा संबंध दिवस आजीचे करुन थकतात. म्हणून एखद्या रविवारी त्यांच्यासाठी नाटकाची तिकिटे काढुन आणून त्यांना संबंध दिवस सुट्टी देवून पिवळ्या आजीची सर्व जबाबदारी घेतो. आपलीही एका दिवसाची हक्काची सुट्टी आहे, आराम करुया असा विचारही न करता...लहानपणापासुन आजीने त्याच्यासाठी जे जे आणि जसं मनापासुन केलं, ते सारं तसंच करण्याचा भाबडा प्रयत्न त्याच्या कृतीतुन दिसतो, जेणे करुन आजीचे अशा अवस्थेतील जे काही दिवस राहिलेत ते सुखा-समाधानाचे नाही तरी कमी क्लेशकारक व्हावेत यासाठी झटतो.

आणि आजी त्यांना काय वाटत असेल आपल्या लेक, सून व नातवाचे अपार प्रेम पाहुन? आज जेव्हा वृद्धाश्रमांतसुद्धा प्रवेशासाठी 'वेटिंग लिस्ट' आहे, धडधाकट असणार्‍या वृद्धांचीही बेमालुमपणे बोळवण केली जाते वृद्धाश्रमात, कारणे काहीही असोत. सर्व कर्तव्ये यथासांग पार पाडून, आयुष्याच्या उतरंडीवर जेव्हा मुला-नातवंडांमध्ये रमायचे तेव्हा असे जर बेघर होऊन, जीवलगांच्या आठवणीत जीवन कंठत मरणाची वाट पहात बसायची वेळ आली त्यातही जर जोडीदाराची साथ सुटुन गेली असेल तर येणारे भयाण एकाकीपण... हे असलं मरणप्राय यातना देणारं जीवन एकीकडे आणि विकलांग होऊन चार वर्षे एका जागी पडून राहिलेल्या मात्र कुटुंबियांच्या मायेच्या ओलाव्यामुळे व सेवेमुळे आपण या अवस्थेतही सर्वांना हवे आहोत ही सकारात्मकता मनी बाळगत जगणार्‍या गुप्ते आजी दुसरीकडे.... किती तफावत आहे या दोन उदाहरणांत !

हे मात्र खरे की आजींना त्यांनी स्वतः मायेने जोपासलेल्या व पूर्ण वाढ झालेल्या वटवृक्षाच्या शीतल छायेत सुखेनैव नसले तरी तृप्तीने पहुडायचे भाग्य लाभले होतेच ! हो, वटवृक्षच म्हणेन मी 'पिवळ्या'ला, सुगंधी फुलांनी बहरलेला किंवा रसाळ फळांनी डवरलेला इतर कुठलाही नाही तर फक्त वटवृक्षच ! कारण हा असा एकच वृक्ष आहे जो जस-जसा वाढत जातो,तस-तसा जमिनीपासून दूर न जाता जमिनीकडेच झेपावत रहातो, पारंब्यांच्या माध्यमातुन, जिने जन्मापासुन मायेची पखरण करत वाढवलंय त्या मातीशी जोडलेली नाळ न तोडता !!

आजींना बोलता येऊ लागले तर त्या असेच काहीसे बोलतील,

तव मायेचा ओलावा लाभला
'अमृतकुंभ' या पिकल्या पाना गवसला
दिधलीस बाळा तू जगण्या उभारी
ओंकारा, सदासुखी रहा तू संसारी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. जितका पिवळ्याचा तितकाच आजीचाही. बालपणात निरपेक्षतेने लावलेल्या मायेला प्रतिसाद देण्याची बुद्धी देणारे संस्कार वाया गेले नाहीत ही किती समाधानाची गोष्ट असेल त्या आजींसाठी. वार्धक्याने दिलेल्या वेदनेला सुसह्य करणारे पिवळ्याचे वर्तन अभिमानास्पद आहे.

छानच, असे करणारे फार कमी दिसतात, त्यामुळे जे दिसतात त्यांचे वेगळेपण जास्त प्रकर्षाने जाणवते. खरेतर असे करणे हे वेगळेपणात गणले जायला नको, पण ... ... ... Sad

अमेय२८०८०७, भारती, अश्विनी, झेलम, कामिनी८,हर्पेन, महेश, अभिषेक, मृण्मयी आणि साती - प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

बर्‍याच जणांना हा लेख पिवळ्याबरोबरच आजीचाही वाटला. अगदी बरोबर आहे, आजीशिवाय पिवळ्याची कथा पूर्ण होऊच शकत नाही. मात्र आजीचे व्यक्तिमत्व, वर्तन हे बहुतांश आज्यांसारखेच आहे. आजी अशीच असते, प्रेमळ आणि फक्त प्रेमळच.आई ओरडते, मारते, पण कोणत्याही आजीला हे कधीच जमलेले नाही. गुप्ते आजीही याच 'टिपिकल आजी' या वर्गात मोडतात. परंतु, त्यांचा नातू 'पिवळ्या' याचे मोठेपणीचे वर्तन 'हटके' आहे. खरे तर ते तसे नसावे, आजी जशी टिपिकल असते तसेच नातवंडांनीही पिवळ्यासारखेच असावे. मात्र हे समाजात दिसुन येत नाही, किंवा क्वचितच दिसुन येते आणि मग असे वर्तन हे आदर्श मानले जाते.

याच कारणामुळे पिवळ्याचा आदर्श प्रकर्षाने जाणवण्यासाठीच लेखाचा फोकस 'पिवळ्यावरच' ठेवावासा वाटला आणि मग तेच शीर्षकही ठेवले.
धन्यवाद !

आशिका, खुप सुंदर लिहिलयस... :). उत्क्रुष्ट लेखन शैली...

या पिवळ्या मधे मी माझ्या सुखदला (मुलगा माझा) पाहाते आहे.... सध्या तो ४ वर्षाचाच आहे.
माझी आई त्याला सांभाळायला रोज सकाळी माझ्या घरी येते(आम्हाला सोईचे पडावे म्हणुन) आणि
रात्री ८ वा. घरी जाते. आमच्या पेक्षा तीचा जॉब खुप डीफीकल्ट आहे.. भाऊ आणि वहिनी काही वर्षा साठी पुण्याला गेले आहेत, त्याना एक छोटी मुलगी आहे, त्यांनी सुद्धा माझी अडचण लक्षात घेऊन मन मोठे करुन आईला बाबांना मझ्यासाठी नागपूर ला ठेवले.. आज माझी लेकरं आजी- आजोबांच्या पंखाखाली मायेनी वाढत आहेत.. पण कुठेतरी मला खुप अपराध्या सारख वाटते, भावाची लेक मात्र या प्रेमापासुन वंचित आहे....

मझ्या कुटुंबावर आई, बाबांचे,- भाऊ, वहिनीचे डोंगरा एवढे उपकार आहेत, आम्ही दोघं पदोपदी या गोष्टीची मुलांना जाणीव करुन देत असतो.. पिवळ्या सारखेच मझी लेकरं आजीच्या त्यागाची जाण ठेवतील अशी मी
आशा ठेवते.

खुप अवांतर लिहिल्या बद्दल क्षमस्व... पण हा लेख वाचुन मला रहावलच नाही...

सुरेख.. पाणी आले डोळ्यात वाचताना..
एक सुचना.. हे वाक्य एकदा परत बघणार का..काहीतरी गडबड झालिये..
<<आई-वडलांपेक्षाही या 'दुधावरच्या सायीला' नातवाचा कळवळा काकणभर जास्तच होता>>
स्पर्धेसाठी आहे म्हणुन सांगितले...त्यामुळे गैरसमज नसावा..

चैत्रगंधा, शैलजा, सायली पाटुरकर, अज्जु९६९५, कविन, मंजु,सृष्टी, मी नताशा, सतिश, मृनिश- मनापासुन धन्यवाद.
@सायली- सुखदचे संगोपन खूपच छान होत असणार आजीच्या नजरेखाली, यात शंकाच नाही. छान प्रतिसाद लिहिलायत.

@मृनिश- गैरसमज अजिबातच नाही, उलट बरे वाटले सांगितलेत म्हणून, धन्यवाद.
दुधापेक्षा दुधावरची साय ही जस्त मऊ, लुसलुशीत आणि हळूवार असते, म्हणून आजीला ही उपमा दिली आहे.

दुधावरची साय ही उपमा नातवाला वापरतात ना ?>>> हो, खरंच. उपमा वापरताना गडबड झाली खरी, पण स्पर्धेच्या नियमांनुसार आता वाक्यरचनेत बदल करता येणार नाहीत.

तरीही मृनिश, आबासाहेब - धन्यवाद आपले.

अतीशय सुन्दर आणी कृतार्थ व्यक्तीचित्रण. पिवळ्या उर्फ ओम्कारचे कौतुक करावे तेवेढे थोडेच. छान लिहीलस आशिका. पिवळ्याच्या आजीन्ची तब्येत बरी होवो आणी त्याला समजून घेणारी जीवन साथी मिळो या शुभेच्छा.

आजी-नातू-आजी असे फार उत्कट नाते उलगडलंय या लेखातून ....

खूपच सुंदर .....

अतिशय सुन्दर आणी कृतार्थ व्यक्तीचित्रण. पिवळ्या उर्फ ओम्कारचे कौतुक करावे तेवेढे थोडेच. >>> +१०