विषय क्र.२:- "कॅप्टन ऑफ द शिप"

Submitted by कविन on 4 July, 2014 - 04:44

'कॅप्टन' ह्या व्यक्तिविशेषणाशी ओळख २००३-०४ च्या दरम्यान कधीतरी झाली. ते ही विश्वेशची त्यांच्या गृपमधे एन्ट्री झाली म्हणून.

गृप म्हणजे ट्रेकींगचा गृप. "चलाहो नवरे, मजा येते" ह्या वाक्याच्या जोरावर आधी विश्वेशची गृपमधे वर्णी लागली. तेव्हा आम्ही नुसते फोटोतच ट्रेकवारी करायचो. सानिका लहान होती. ती ५ वर्षाची झाल्यावर मग परत एकदा तेच वाक्य "चलाहो नवरे, जमेल" आलं. ह्यावेळी ते माझ्यासाठी होतं म्हणून त्या वाक्याचं बोट धरुन आमचही शेपूट त्या गृपमधे जोडलं गेलं आणि मग खऱ्या अर्थाने कॅप्टनची ओळख व्हायला सुरूवात झाली.

कॅप्टनचं वर्णन करायचं झालं तर.. तसं काही विशेष नाही. दिसायला चारचौघांसारखेच, उंची अगदी अमिताभ नाही आणि बुटबैगणही नाहीत. शरीरयष्टी बघीतली तर पाप्याचं पितर नाही आणि जुना अदनान सामीही नाही. वय पन्नाशीच्या आसपास.

तसंही दिसण्याच्या बाबतीत ही व्यक्ती एकदम अनप्रेडीक्टेबल. ह्या ट्रेकला मिलेट्री कट तर पुढच्या ट्रेकला केसांचा पोनिटेल. मिथून आवडता हिरो आहे म्हंटल्यावर तर संप लंच ना मग. रहातच नाही काही बोलायला. म्हणून आपण दिसणं सोडूनच बोलूयात.

माझी त्यांच्याशी पहिली ओळख झाली ती नाणेघाट ट्रेकच्यावेळी. तो माझा पहिलाच ट्रेक होता. आयुष्यात इतकं कधी चालण्याची वेळच आली नव्हती. पाय जरा जास्तच रेंगाळत विश्रांतीसाठी थांबत होते.

"मला वाटतं मला नाही जमत" ,मी एका क्षणी कॅप्टनना म्हणाले.

“द्या तुमची सॅक इकडे. चला आता. पावलं जवळ जवळ टाका, जमेल. मी सांगतो तशी मुद्रा करा. दीर्घ श्वास घ्या. पावलांवर लक्ष ठेवा. आणि जमणार मला असं मनात सतत म्हणत रहा”.

मला हाताची बोटं विशिष्ठ प्रकारे जुळवून त्यांनी मुद्रा करून दाखवली. जेव्हा मी एकटी चालेन असं त्यांना जाणवलं तेव्हा दुसऱ्या रेंगाळलेल्या जीवांना प्रोत्साहन द्यायला झपाझप पुढे निघूनही गेले.

खरंच! ह्या माणसाच्या रक्ताची एकदा तपासणी करायला हवी, अखंड वहाणारा उत्साह आणि एनर्जीचं कारण त्या रिपोर्टस मधून तरी कळलं तर कळेल.

माझी सॅक कॅप्टनने घेऊन सुद्धा मी आपली थांबत थांबतच चालले होते. आणि कॅप्टन कधीच पुढे पोहोचले होते. विश्वेशला जेव्हा सॅक कॅप्टनने पकडल्याचं कळलं तेव्हा तो म्हणाला, "त्यांना कुठे धरायला दिलीस सॅक? त्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे. ऍडमीट होते गेल्या आठवड्यात. आजही औषध घेऊन आलेत."

कमिटमेन्टच्या डिक्शनरी मिनींगला कोणीतरी जागायला हवच ना?

"इक बार जो मैने कमिटमेन्ट कर दी फीर मै अपने आपकी भी नही सुनता.." वॉन्टेड मधे हा संवाद त्यांच्याकडे बघून तर घातला नसेल?

असेलही कदाचित. नाहीतरी सिनेमा हा देखील ह्यांचा एक वीक पॉईन्टच आहे! ‘फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो चुकवला तर पाप लागतं’ असं मानणाऱ्यांपैकी ते एक. त्यातून मिथूनचे सिनेमे असतील तर? तर काय विचारता? त्याच्या सिनेमांचा गल्ला भरण्याचं पवित्र काम इतकी वर्ष ते इमाने इतबारे करत आलेत.

ट्रेक आणि सिनेमा कोणताही असो चुकवायचा नाही हे पथ्य ते आजपर्यंत पाळत आलेत. व्यसनही म्हणून शकतो आपण त्याला.

तसं बघितलं तर ह्या माणसाला व्यसनं तीनच..
पहिलं ट्रेक, दुसरं लोकसंग्रहं करणं आणि तिसरं सिनेमा.

"सह्याद्री ट्रेकर्स" च्या गेट-टूगेदरसाठी "सह्याद्री ट्रेकर्सचं कोलाज" ही थीम घेऊन साधारण २५ एक वर्षातले ट्रेक्स कव्हर केले होते. इतक्या वर्षांमधल्या फोटोत बऱ्याच चेहऱ्यांची बेरीज वजाबाकी झालेली दिसत होती. ह्या सगळ्यात एक चेहरा मात्र कॉमन होता तो होता कॅप्टनचा. हजेरीपटावर प्रत्येक वर्षी एकदाही गैरहजार हा शेरा न मिळवणारा हा एकमेव इसम.

कुठच्याही गडाचं नाव घ्या, ते म्हणणार अमुक इतक्या वेळेला केलाय, पण पुन्हा करायला माझी काहीच हरकत नाही. आणि मग पुन्हा एकदा नव्याने ते तो ट्रेक करणार. वाढत्या जबाबदाऱ्या, तब्येतीच्या तक्रारी, व्यस्त दिनक्रम हे शब्द त्यांच्या शब्दकोशातच नसावेत बहूदा. विशेषत: ट्रेक ठरवूया असं म्हंटलं की हे शब्द जादूने गायबच होत असावेत.

"व्यसन" ह्या शिवाय काय म्हणायचं ह्याला दुसरं?

तुम्ही कधी भेटलात त्यांना की ते पहिल्यांदा बोलता बोलता तुमचे डिटेल्स टिपून घेणार. म्हणजे तुमची जन्मतारीख, लग्न झालेलं असल्यास तुमच्या जोडीदाराची जन्मतारीख, लग्नाची तारीख, मुलांचे जन्मदिवस सगळं नीट नोंदवून ठेवणार. आणि मग ह्या सगळ्या तारखांना सकाळी सकाळी तुम्हाला एक ब्रॉडकास्टेड मेसेज येणार - "हॅपी बर्थडे टू.....”. ‘फ़्रॉम’ मधे त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं नाव!

तुम्ही एक ट्रेक सोबत केलेला असूदे किंवा अधिक. एकदा त्यांच्या डेटाबेसमधे तुमचा नाव नंबर आणि इतर डिटेल्स फ़ीड झाले की झाले. मग ते त्यावेळी कुठेही असोत - इस्पितळात असोत किंवा टूर वर असोत, तुम्हाला सकाळी सकाळी मेसेज येणार म्हणजे येणारच!

थोडक्यात काय तर माणसं जोडायचं आणि जोडलेली माणसं टिकवून ठेवायचं कसब ह्या माणसात इतकं ठासून भरलय ना, की राजकारणी लोकांनीपण त्यांच्याकडे शिकवणी लावावी.
लोकं एकदा एन्टर झाली की डिलीट होतच नाहीत ना इथे.

गावातल्या घरांमधे रहायची व्यवस्था करतानाही या लोकसंग्रहाचा अनुभव येतोच. गावकर्यांचे नाव पत्ते, नंबर पासून ते कोणाचा मुलगा काय शिकतोय पर्यंतचा साठा कायम अपडेट असलेला दिसतो त्यांचा.

तेव्हा ट्रेक्समधे मी नुसतीच एक गृप मेंबर होते. ट्रेक ऑर्गनायझर टिम पैकी नव्हते. त्यामुळे ट्रेक आहे म्हंटलं की आपलं नाव द्यायचं, वर्गणी द्यायची इतपतच माझा सहभाग मर्यादीत होता. गृप म्हंटला की एकमेकांना सपोर्ट करणं, गोष्टी शेअर करणं हे ओघानेच आलं. त्या गोष्टी करत असले तरी ट्रेकची आखणी ह्या प्रकारात मोडणाऱ्या कामांविषयी अनभिद्न्यच होते.

एके दिवशी बोलता बोलता "मुलांचा ट्रेक्स" नेण्याविषयी मी विचारलं. नेहमीच्या उत्साहाने कॅप्टनने होकार भरला. मधे एखादाच दिवस गेला असेल आणि कॅप्टनचा मला एक इमेल आला. त्या इमेलमधे होती ट्रेकची अख्खी ब्ल्यु प्रिंट! ट्रेक कुठे? कधी? मुक्काम कुठे करायचा? जेवणाचं काय? पासून ते अमूक ते तमूक इतके किमी, त्याला साधारण इतका वेळ लागेल, वाटेत टोल किती? टॉयलेटसची व्यवस्था कुठे होईल पर्यंत सगळा बैजवार कार्यक्रम कागदावर तयार एकदम. कॅप्टनने आखणी केली आहे म्हटल्यावर आपण फक्त आपल्या पावलांना त्यांनी आखलेल्या रुट वरुन डोळे झाकून चालवायचं, ट्रेक आपोआपच होतो. गोरखचे तीन रॉक पॅच असोत किंवा नुकताच केलेला वन ट्री हीलच्या ट्रेकचा वन ट्री पर्यंत पोहोचण्याचा अनुभव असो. असे अनुभव कॅप्टन स्पेशल. ते आपल्याला सुखरु प नेऊन आणणार ही भावना इतकी आत खोल रुजलेय की मनातली भीतीही त्यावर मात करते. कॅप्टन इज रजनीकांत ऑफ सह्याद्री ट्रेकर्स ग्रूप असा आमचा ठाम विश्वास आहे.

आमची मुलं खूप भाग्यवान आहेत. मोठी झाल्यावर जेव्हा बालपणीच्या आठवणी निघतील तेव्हा अशा हटके आणि उच्च आठवणी त्यांना जागोजागी दिसतील. आम्हीच वयाची पहिली ३० वर्ष फुकट घालवली.

कागदावरच्या आखणीबरोबरच प्रत्यक्ष ट्रेकमधेही कॅप्टनच्या "कॅप्टनशीपचे" अनुभव जवळून बघितले की मग कळत जातं ह्या माणसाला कॅप्टन हे नाव का पडलं ते.

आमचा पेठगडचा पहीला लहान मुलांचा ट्रेक होता. आम्ही पेठगावात उतरलो होतो. एका ७-८ वर्षाच्या मुलाने इथे टॉयलेट कुठे आहेत असं एका ८ वी का ९ वीच्या मुलाला विचारल्यावर त्याने मस्करी म्हणून त्या ७-८ वर्षाच्या मुलाला एका रिकाम्या आणि अर्धवट बांधलेल्या घरात जाऊन बस असा सल्ला दिला. ते घर ज्यांचं होतं त्यांना समजल्यावर ते गृप लिडर कोण आहे असं विचारत भांडायच्या पवित्र्यानेच आत आले. कॅप्टनने शांतपणे ऐकून घेऊन त्यांची माफी मागून त्यांची जागा स्वत: जाऊन साफ करुन दिली. दुसऱ्या कोणाला ते काम सांगावं वगैरे विचारही मनात शिवायच्या आधी त्यांच्याकडून ते काम पूर्णही झालं होतं.

नुकत्याच केलेल्या वन ट्री हील ट्रेक मधला प्रसंग सगळा ट्रेक छान पार पडला आणि माथेरान शहरात आल्यावर बाजारपेठेतल्या रस्त्यावर आमच्यातला एक छोटू मस्ती करत चालताना पडला आणि त्याचं हाताचं हाड मोडलं (अर्थात हे निदान नंतर इस्पितळात नेल्यावर झालं) ती सगळी मंडळी नाशिकची होती. कॅप्टनने तातडीने टॅक्सी बूक करुन त्यांना घेऊन आधी नेरळ, मग मुंबईचं इस्पितळ आणि गरज पडली म्हणून त्यांच्या सोबत नाशिक गाठलं. त्या मुलाचं ऑपरेशन होऊन तो जेव्हा जनरल वॉर्ड मधे शिफ़्ट झाला तेव्हा तब्बल दोन दिवसांनतर ते घरी परतले.
पण आमच्या गृपच्या ह्या रजनीकांतमधेही काही कच्चे दुवे देवानेच लिहून पाठवलेत.

त्यातला पहिला म्हणजे ह्या माणसाला कोणालाही "नाही" म्हणता येत नाही. तुम्ही त्यांना सांगणार - "कॅप्टन ह्यावेळी गृपसंख्या मर्यादीत ठेवा". ते म्हणणार - "हो. पहिले ४० फक्त. ठीक?" तुम्ही खूष होऊन ‘हुश्श!’ करणार. मग त्यांचा दोन दिवसांनी पुन्हा फोन येणार "त्या अमक्या अमक्याचे अमुक इतके मित्र येणार आहेत, तमकीच्या बहिणीला यायचं आहे. संख्या ५० पर्यंत जाईल. मी नाही म्हणू नाही शकलो." तुम्ही कपाळाला हात लावणार. हे असं ट्रेकचा दिवस येईपर्यंत होणार आणि आकडा वाढत जाणार.

ट्रेकचा आनंद सगळ्यांना मिळावा ही त्यांची भावना आम्हाला मान्य असते, पण ‘कुठेतरी नाही म्हणणं हे योग्य व्यवस्थापनाकरता आवश्यकच असतं हे त्यांना पटून पण वळत नाही’ हे आमच्या चिडचिडण्याचं कारण असतं. आम्ही दरवेळी त्यांना म्हणतो, ‘तुम्ही जत्रा भरवणार असाल तर पुढच्यावेळी आम्ही येणार नाही.’ पण पुढची वेळ काही येत नाही. आम्ही दरवेळी माणसं जोडणाऱ्या ह्या माणसापुढे हरतो आणि ट्रेकला जातोच.

"आर्थिक नियोजनाची बोंब", हा ह्या माणसाचा दुसरा कच्चा दुवा. मुलांच्या पहिल्या ट्रेक्सच्या वेळी तर आमचं आर्थिक गणित पार कोलमडलं होतं. ‘ना नफ़ा’ हे आमच्या गृपचं तत्वं पण ‘ना तोटा’ हे ही तत्व हवंच हे कॅप्टनच्या गळी उतरवताना आमच्या फारच नाकी नऊ आले होते. अजूनही येतात! आता तोटा नको हे तत्व प्रत्यक्षात आणायचं तर आयत्यावेळी गळणाऱ्या मेंबर्समुळे बसणाऱ्या फटक्याबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी. जिथे अंदाजे किंमत धरलेय तिथे थोडं मार्जिन ठेवयला हवं. पण ते ह्या माणसाला ह्या जन्मात जमणे अशक्य.

रक्कम कमी पडली तर हा माणूस स्वत:च्या खिशाला चाट लावेल पण समोरच्याकडे तोंड उघडून मागणार नाही. आता कोअर गृप म्हणून तोटा त्यांच्यासोबत आम्हीही शेअर करतो पण ‘दरवेळी तोटाच होत असेल तर आर्थिक नियोजन चुकतय ते सुधारलं पाहिजे’ हे आमचं म्हणणं असतं. फार बोलून बोलून आत्ता कुठे ते थोडं फ़ार सुधारायला लागलंय.

अजून एक कच्चा दुवा म्हणजे कुणाला कामं करायची नसतील तर त्यांच्या वाटची कामही कॅप्टन करतील. त्यांना काम करताना बघून आपण होऊन कामाचा वाटा कुणी उचलला तर (कॅप्टनचं) नशीब, नाहीतर ते विनातक्रार ओझी उचलतच रहातील. हा स्वभावदोष त्रास देत रहातो पण हा त्रास टाळण्यासाठी त्यांच्या वतीने प्रसंगी आम्ही वाईटपणा घेऊन इतरांना कामं सांगायला सुरूवात करतो.

“आम्हीच का कॅप्टन दरवेळी? इतर नुसते फ़ेसबूकवर फोटो टाकण्याकरता येणार आणि आपण का फ़क्त ओझी वहायची?” असं आम्ही त्यांना कधीतरी चिडून विचारणार, त्यावर “तुम्ही माझी हक्काची आहात. कामं जबाबदारीने करता” असं म्हणून आपलं तोंडभरुन कौतूक ते करणार. ह्या कौतूक करण्यात बेरकी राजकारणी स्वभाव नसतो हे माहीत असल्याने मग आमचा आवेशही ढेपाळणार!

पण झेपतील अशी कामं सगळ्यांना वाटून द्यावीत हे त्यांना जमत नाही. समोरच्याने आपणहून काम करावं ते ही त्यांना सांगावं न लागता अशा काहीतरी कवीकल्पना ते बाळगून असतात.

त्यांच्या गुणांपुढे त्यांच्या अवगुणांचं पारडं अजूनतरी हलकंच आहे. कॅप्टनशिवाय ट्रेक आणि ट्रेक शिवाय कॅप्टन ह्या दोन्ही संकल्पना आमच्यासाठी अशक्य कोटीतल्या गोष्टी सदरात मोडणाऱ्या आहेत.

कॅप्टन सोबत राहून आता थोडं प्लॅनिंग जमायला लागलय पण जे नेतृत्व गूण त्यांच्यात आहेत ते आमच्यात नाहीत हे ही जाणून आहोत. लहान मुलांसोबत त्यांच्या वयाचे जोक्स, कॉलेजच्या मुलांसोबत त्यांच्या समांतर होऊन वागणं, मोठ्यांसोबत मोठ्यांसारखं वागणं हे फक्त त्यांनाच जमू जाणे. हा माणूस रेकी मास्टर आहे, सर्टिफ़ाईड वास्तूशास्त्र तज्ञ आहे, ज्योतिषाचा अभ्यास आवड म्हणून केलाय, योगा शिकलाय, फ़र्स्ट एड शिकलाय. ह्या माणसाच्या स्वभावाचा ‘अतरंगी ते अभ्यासू गंभीर व्यक्तिमत्व’ इतका मोठा ग्राफ आहे, पण हेच त्यांचं वेगळेपण आहे.
कॅप्टनचं हे आम्हाला दिसलेलं रुप त्यांच्या पत्नीला, मुलाला, आई वडीलांना, भावाला असच दिसलं असेल असं नाही. त्यांना अजून काही वेगळे कॅप्टन सापडले असतीलही. हे रूप आम्हाला दिसलंय आणि या कॅप्टनवर आम्ही नेहमीच डोळेझाकून विश्वास ठेवलाय. ते त्या विश्वासाला तडा देणार नाहीत ह्या खात्रीने! कोणीच कोणावर आजच्या काळात डोळे झाकून विश्वास ठेवू नये म्हणतात पण ह्याबाबतीत आमचाही नाईलाज होत असेल, कॅप्टनना इतरांना "नाही" म्हणणं जमत नाही आणि आम्हाला कॅप्टनला नाही म्हणता येत नाही.

दरवेळी ट्रेक संपला की 'ना तोटा', कामाची वाटणी, ग्रुपसंख्या या सगळ्यावरून आम्ही नेहमीप्रमाणे कॅप्टनना सुनावतो, आणि काही दिवसांनी कॅप्टनचा पुढच्या ट्रेकसाठी मेसेज आल्यावर हातातली कामं बाजूला सारून, घरची व्यवस्था लावून हौसेने त्यांच्याबरोबर पुढच्या ट्रेकमध्ये सामील होतो.

डोंगरदर्‍यांतल्या भटकंतीसाठी निघाणारी पावले आमची स्वतःची असली, तरी ट्रेकची ही नैय्या पार करण्याचा सगळा भरवसा नेहमीप्रमाणे या आमच्या 'कॅप्टन ऑफ द शिप'वरच असतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण आहेत हे कॅप्टन - एकदा तरी ओळख करुन घेतलीच पाहिजे असं मनापासून वाटतंय अग्दी .... Happy

सुर्रेखच लिहिलंय ....

छान चित्रण... ही व्यक्ती परीचयातली असल्यासारखी वाटली.. हे खरेच कि या लेखनामूळे ते सांगता येत नाही.

खुप छान लिहिलयस ग. मोजक्या शब्दात मस्त उभं केलयस.
एक कडक सॅल्युट कॅप्टन ना ___/
अशा लोकांचा उत्साह आणि तडफ कितीतरी जणांना प्रोत्साहन देते. असे साथी, मार्गदर्शक मिळणे खरोखर भाग्याचे!

कवे,बरं झालं कॅप्टनवर लिहिलस ते. छान लिहिलय्स! Happy

माझा तर पहिलाच अनुभव होता ट्रेकींगचा त्यांच्याबरोबर. ___/\__ अफाट आहे हा माणुस! प्रचंड उत्साहाचा धबधबा असलेल्या या पन्नाशीतल्या माणसाच्या हरहुन्नरी नेतृत्वाला सलाम!
कोथळीगडच्या माझ्या पहिल्या ट्रेकला ट्रेक ठरल्यापासुन त्याचे रेग्युलर अपडेट्स देणे आणि संपल्यावर सुद्धा सगळ्या सहभागींचे डीटेल्स, खर्च हे अगदी आवर्जुन ईमेल केलं. त्यांनी मला इतके सांभाळून घेतले की पायाचे अंगठे ठेचकाळल्याने, आणि पायावर बाईक पडल्याने हैराण होउन 'आता मी कुठल्याच ट्रेकला जाणार नाही' असं त्यावेळी म्हणणारी मी, संध्याकाळी ट्रेकवरुन परत येइस्तोवर 'पुढच्या सगळ्या ट्रेकच्या वेळेस कळवत जा' असे म्हणु लागले होते. Happy
कवे, माझीही सॅक त्यांनी आणि महेंद्रने (महेंद्र हा अजुन एक वेगळच 'रसायन' आहे) घेतली होती. माझ्या पायाचे अंगठे ठेचकाळले असतांना कॅप्टनने स्वतःचा हातरुमाल फाडुन अंगठ्यांना बांधुन 'कुशन' तयार केलं.आणि हो शेवटपर्यंत माझ्यासारख्या 'स्लो वॉकर्स'च्या सोबत राहुन कॅप्टन, विश्वेश, जोशीकाका(?) ही मंडळी मोटीव्हेट करत होती. Happy
ज्या त्या वयातल्या मुलांशी तसेच होउन चेष्टा मस्करी करणं असो, कॉलेजच्या वयाच्या मुलांनाही शिस्त लावणं असो की पहिलटकर ट्रेकर्सना प्रोत्साहन देणं असो...कॅप्टन कुठेही मागं नाही. कुठेही 'कॅप्टन्'पणाचा किंवा 'मी हे सगळं करतोय' म्हणुन अभिमान नाही.

वा! मस्तच!
पर्फेक्ट उभं केलंस त्यांचं ट्रेक-कॅप्टन हे व्यक्तिमत्त्व.

कोणीच कोणावर आजच्या काळात डोळे झाकून विश्वास ठेवू नये म्हणतात >>> अगदी! पण केवळ या माणसामुळे मी आदित्यला ४-५ वर्षांपूर्वी अगदी डोळे झाकून प्रथमच ट्रेकला पाठवला.
आणि आता ओळखीतल्या, नात्यातल्या पोरांना, पालकांना या ग्रूपबद्दल सांगते, तेव्हा हेच म्हणते, की मस्त ग्रूप आहे, अगदी डोळे झाकून बिनधास्त पाठवा पोरांना Happy

गेल्या वर्षी कॅप्टन वविला आले होते. तेव्हा लीडरच्या भूमिकेत नव्हते, तर त्यांना तसं बघायलाच फार मजा वाटत होती.

अरे, किती उत्सुकता वाढवता?
जरा कॅप्टनचे नाव लिहा.
Wink
बाकी मस्तंच जमलंय व्यक्तिचित्रं.

मला पहिल्या परिच्छेदात मात्रं अडखळायला झालं.
'चला हो नवरे' म्हणजे काय? कोण बायका आपक्या नवर्याला ट्रेकला यायचा लाडिक आग्रह करातयत की काय असं वाटून पहिल्या परिच्छेदाचा जाम संदर्भ लागला नाही.(कदाचित मी नवर्याला नेहमी 'चला हो नवरोबा' असा आग्रह करत असल्याने असेल Happy )
मग आठवलं लेखिकेचं आडनाव नवरे आहे.

धन्यवाद शशांक, दिनेश, आशिका, चनस, अवल, नंदिनी, आर्या, लली, साती, Happy

....मग आठवलं लेखिकेचं आडनाव नवरे आहे.>> Lol हे माझ्या लिहीताना लक्षात नाही ग आलं अजिबातच

@शशांक, या की मग पुढच्या ट्रेकला Happy

आमची मुलं खूप भाग्यवान आहेत. मोठी झाल्यावर जेव्हा बालपणीच्या आठवणी निघतील तेव्हा अशा हटके आणि उच्च आठवणी त्यांना जागोजागी दिसतील. आम्हीच वयाची पहिली ३० वर्ष फुकट घालवली.>>>>> कवे आकडा ४० चा ग माझाहि..
लै भारी
आणि आज कॅप्टनच्या भरोश्यावर माझी ४ जण बिंधास्त जातात , आणि वर मलाच एकवते माझी मुलगी तुम्ही येउ नका, कॅप्टन ला सांगा फक्त तुम्ही येनार नाहि ते बाकिचे ते बघतील.
कवे सही लिहिलयस...

अरे हा आणखीन एक,खास, हे आनंदी, उत्साही,माणुसवेडं झाड सरकारी बागेत कसे काय रुजतं ते आजतागायत कळलेले नाही.

धन्यवाद शोभनाताई, घारु, स्वाती Happy

घारु फोटो नको. व्यक्तीचित्रणात व्यक्ती शब्दतून उभी राहीली पहीजेना.

मस्त लिहीले आहेस कवे
कैप्टेन्सची ओळख आवडली एकदम

हे कैप्टेन म्हणजे सोनटक्के का

मग बरोबर
मी त्यांना पाहिलय
एकदम मितभाषी आहेत
आणि नाव वगैरे लक्षात ठेवण्याबद्दल अगदी अगदी
मी स्वताच अनुभव घेतला आहे

मीतभाषी as compared to me म्हणायचय का तुला जाई? Wink

तू वविला भेटलीस, तिथे ते शांतच होते

मस्तं... मस्तं झालाय हा लेख... Happy
प्रत्येक वाक्य वाचल्यावर ''... अरे.. खरचं की..!! " असं वाटतय.
शेवटी कॅप्टनना शब्दात बांधलसच तू!!!

आवडलाय Happy

Pages