लेखनस्पर्धा २०१४ - विषय २ - बापट

Submitted by धनि on 1 July, 2014 - 17:21

बापटला आम्ही बापट का म्हणतो त्याच्या मागे एक मोठा किस्सा आहे. त्याचे नाव अमर सुरेश कुलकर्णी असे असताना १० वीच्या सुट्टीत त्याचे बापट म्हणून नामकरण झाले ते अजून कायम आहे. तसा बापट आमच्याहून १ वर्ष मोठा त्यामुळे आमची १० वीची सुट्टी म्हणजे त्याचे १२ वीच्या आधीची सुट्टी. पण १२ वाणिज्य शाखेत असलेल्या बापटला त्याचे काहीच वाटत नसे. सदाशिव पेठेतील प्रशालेत ११ वीलाच त्याने काय धमाल केली होती की आख्खी शाळा बघत राहिली होती. हा किस्सा पण बापटनीच त्याच्या खास शैलीत तोंडात तंबाखुचा बार टाकून आम्हाला ऐकवला होता.

झाले असे की - बापट च्या शाळेत बापट म्हणून एक मास्तर होते. अतिशय मारकुटे म्हणून त्यांची ख्याती. आणि सगळ्या गोष्टींमध्ये वाकडे वागायची आमच्या अमरची सवय. मग जे होणार ते निश्चित होते. दररोज उशिरा आला की छडी मार. ग्राउंडला चक्कर मार. अमर मग चिडला. तसा चिडला तरी काय करणार होता. हातापायाच्या कड्या पण त्याच्या तोंडात मात्र १० हत्तींचे बळ होते. त्याला कुठून तरी कळले बापट मास्तरला एक मुलगी आहे. मग काय अमरने सुरुवात केली पुड्या सोडायला आणि मग सगळ्या प्रशालेत झाले अमर बापटचा जावई होणार. अखेर हे बापटच्या पण कानावर गेले. अमरला भरपूर मार बसला. पण चूप बसतो तो अमर कुठला त्याने मस्त प्लान बनवला. शाळेत स्नेहसंमेलन सुरु होते. ११ वीचा शेवटचा दिवस. अमरने कुठून तरी बापट वर राग असलेली मुले गोळा केली. आणि एका बेसावध क्षणी बापटला गोणीत कोंबला. बाथरूम मध्ये नेवून लाथा घातल्या आणि सगळे पळून गेले. कोणी केले कोणालाच काही समजले नाही फक्त बापट आता कोणालाही शिक्षा करायला घाबरायला लागला.

हा किस्सा ऐकून अमरला आम्ही बापटच म्हणायला लागलो. असा हा अत्राप बापट की आपल्या हातापायात काही शक्ती नाही हे त्याला बरोबर माहिती होते त्यामुळे तो आपले तोंड मात्र पट्ट्यासरखे चालवायचा. त्याला सगळ्या खबर बाता माहिती असायच्या. त्याचे परमपुज्ज्य - हा सुद्धा बापटचाच त्याच्या वडिलांसाठीचा खास शब्द - एक प्रथितयश व्यक्ती होते. पण सांगताना मात्र बापट आपले मंडई मध्ये घाऊक तंबाखूचे दुकान आहे असे सांगायचा. बहुतेक त्याला आपले उनाड वर्तन आणि तंबाखू खाणे हे वडिलांच्या प्रतिष्ठेच्या आड येईल असे वाटत असावे. संध्याकाळी कट्ट्यावर सगळे आले तरी बापटचा पत्ता नसायचा. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत असायचे. मग याला सोडून निघू असे कोणी तरी म्हणत असतानाच आपली जुनी स्पिरीट घेऊन बापट हजार व्हायचा. एक तंबाखूचा बार भरायचा. आणि सुरुवात करायचा - "अरे काय सांगत होतो तुम्हाला त्या टेकडीवरच्या महाविद्यालयात एकाला घेऊन गेलो होतो. तो काम करायला आत गेला आणि मी बाहेर गाडी घेऊन उभा होतो. वर्ग सुटले आणि काय एक एक पाखरे बाहेर पडायला लागली. आमचे डोळेच पवित्र झाले." कंपूतील मुली ईSSS बापट म्हणायला लागायच्या तरी हा सुरूच - "तो मित्र परत बाहेर येउन गाडीवर बसला तरी आमचे लक्ष आहे कुठे. आम्ही आपले पाखरांवर डोळेच ठेवून बसलो. शेवटी सगळे संपल्यावर मग निघालो. अरे काय त्या दिल्लीवाल्या एक एक. बाजूच्या टपरीवर चहा मारायला गेलो. एक पाखरू आले आणि मलाच माचीस आहे का विचारायला लागले." "मग तू काय म्हणालास?" - एक कन्या "बापट, पण तू तर सिगारेट ओढत नाही ना?" - दुसरी. " हो ना - मग सांगतो काय - मी तिला म्हणालो माचीस नाही पण गाय छाप आहे. मारती का बार. तिला पहिल्यांदा काही कळले नाही मग खिशातून पुडीच काढली. तर नो नो करत निघून गेली. पण साली काय आयटम होती." शेवटी कन्या निघून जायची धमकी द्यायच्या मग आमची वरात तिलकला खायला निघायची.

तिलकचा पावपाटीस बापटचा प्रिय. नुसता तोंडात दम. एकदा कोणी तरी पैज लावली बापट नुसता फोक्या झोडतो पण तो काही तिखट खात नाही. भाऊ उठला तिलाकच्या मालकाला म्हणाला पोरं आज फार मजा करायला लागली आहेत जरा आपली स्पेशल तिखट चटणी आहे का ? मालकाने पण त्याला नुसत्या हिरव्या मिरच्यांचा खर्डा दिला बापटाने काय न बोलत तो तसाच नुसता तोंडात टाकला आणि खाउन टाकला. ज्याने पैज लावली होती तो नाही नाही म्हणत माफी मागून निघून गेला. थोडी पांगापांग झाल्यावर बापट उड्या मारायला लागला. आम्ही विचारले काय झाले? तर ओरडला "अरे भ…. हिरवी मिरची नुसती खाल्ली आहे काय कल्पना आहे का. जा तिकडे दोन वाट्या दही आणि साखर आण. माझ्या तोंडात आग लागली आहे. तुला सांगतो आता तोंडात लागली आहे पण उद्या मागून निघणार आहे रे. पैजेखातर काही पण. आपला शब्द खाली पडू द्यायचा नाही!" मध्येच अक्ष्या जर काळजीत दिसला. आम्ही विचारले काय झाले रे. त्याने सांगितले ११ वी शास्त्रच्या मुलांना १२ वी वाणिज्यचे विद्यार्थी त्रास देतात म्हणून. बापट काही बोलला नाही. दुसर्या दिवशी अक्ष्या येउन सांगतो - "दुपारी बापट आला होता. त्याने त्या १२वीच्या मुलांना जो दम दिला की कोणाची काही बोलायची हिम्मत नाही. सेनेच्या कोणत्या तरी मोठ्या नेत्याचे नाव पण सांगितले."

साहेबांवर मात्र त्याची खूप श्रद्धा होती. असाच एके दिवशी संध्याकाळी भेटला. "अरे शिवतीर्थावर गेलो होतो दसरा मेळाव्यासाठी. साहेबांच्या पायावर डोके ठेवले आणि आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटले." कुठल्याही आंदोलनात सक्रिय सहभाग - मात्र त्याचे महत्वाचे काम म्हणजे पडद्यामागचे. आपल्या तोंडानी कार्यकर्ते तयार करायचे आणि त्यांना पुढे पाठवायचे. अशीच श्रद्धा गणपतीवर! आपल्या मंडळाचा गणपती. आपण रांगेत कुठे उभे राहणार आणि किती तासांनी विसर्जन होणार हे जवळ जवळ एक महिना आम्हाला दररोज ऐकवायचा. त्या १० दिवसात तंबाखू वगैरे एकदम बंद. आम्हाला सांगायचा इतर मंडळांमध्ये मांडवाच्या मागेच कार्यकर्ते गुटखा खात बसलेले असतात. पण त्यांचे कार्यकर्ते १० दिवस सगळे बंद करतात. गुटख्याच्या जाहिरातीसुद्धा घेत नाहीत ते. त्याला या गोष्टींचा खूप अभिमान होता. म्हणायचा "अरे विसर्जन मिरवणुकीत बाकी लोक दारू पिउन नाचतात म्हणून तर २४ - २४ तास उभे असतात. शुद्धीत नसतातच ना. पण आमचे कार्यकर्ते मात्र कशालाही स्पर्श न करता मिरवणूक पार पडतात. बाप्पा पाठीशी असताना कशाला हव्या बाकीच्या गोष्टी."

आम्ही १२ वीच्या आभ्यासानंतर पांगलो पण बापटच्या भेटी होताच राहिल्या. तो पुढे एम बी ए, पी जी डी बी एम वगैरे करायला गेला. मधूनच भन्नाट कल्पना घेऊन यायचा. म्हणे आता आंतरराष्ट्रीय व्यापार शिकणार. त्याला कुठून तरी बातमी लागली होती की अमेरिकेत तंबाखूचा खप वाढला आहे. हा आता त्याच्या तंबाखूच्या दुकानात वेगवेगळ्या चवीची तंबाखू तयार करून ती निर्यात करणार होता. भांडवल मिळाले नाही बहुतेक. मग मोबाइल कंपनी मध्ये नोकरी करून झाली. तिथे मग वेगवेगळे सीम कार्ड घेऊन ३ -४ कन्यांशी नुसतेच खूप फोनवर बोलून झाले.अर्थात याच्या फक्त तोंडात बळ असल्याने फोनच्या पुढे काही गेले नाही. पण प्रत्येक वेळेस भेटला की काही तरी भन्नाट ऐकवायचा. आता तर भेटीगाठी होतच नाहीत. तो तिकडे मी इकडे. पण पुण्याला पुढच्या भेटीमध्ये बापटचा नवीन किस्सा तयार असेन याची खात्री मात्र आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users