रिमझीम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...

Submitted by अतुल ठाकुर on 21 June, 2014 - 11:45

bollywood-rain-romance.jpg

मुंबईला कुणी कितीही नावे ठेवोत पण मुसळधार पावसातली मुंबई देखणी दिसते यावर सर्वांचे एकमत व्हावे आणि त्यातही ही मुंबई जर सत्तरच्या दशकातली असेल तर क्या कहने. पुलंनी सर्व बलाढ्य शहरांमध्ये फक्त मुंबई ही स्त्रीलिंगी आहे हे नमुद केले आहे. या देखण्या मुंबईला आणखी देखणेपणाने सादर केले आहे बासु चटर्जींनी आपल्या “मंजील” चित्रपटात. “रिमझीम गीरे सावन” या गाण्यावर बरेच काही लिहिता येईल. लताने गायिलेले उजवे कि किशोरचे उजवे असा वादही घालता येईल. मात्र मला त्यात पडायचे नाही. या लेखात तरी फक्त लताच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अत्यंत आशयघन असलेल्या या चित्रपटाची कथाही मी सांगणार नाही कारण या गाण्याचा तसा कथेशी संबंध नाही. गाण्याचा सुरेख तुकडा बाजुला काढुन, कथा माहित नसताना देखिल त्याचा आस्वाद घेता येईल इतके हे गाणे अप्रतिम आहे. साधारणपणे याचं चित्रिकरण फोर्ट, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, मुंबई युनिव्हर्सिटीचा भाग, फाउंटन या भागात केलेले दिसते. चित्रपट १९७९ मधला आहे. सत्तरचे जादुई दशक. अमिताभचा उदयकाल. मात्र अजुनही तो वेगळ्या भूमिका करत असतानाचे ते सुदैवी दिवस. त्यात मौशमी चटर्जीसारखी निपूण आणि देखणी अभिनेत्री. हे सारे रसायन एकत्र येऊन सौंदर्याचा जो अविष्कार घडला तो म्हणजे “रिमझीम गीरे सावन”.

मी जेव्हा हे गाणे पाहिले तेव्हा आणि त्यानंतर नेहेमीच हे गाणं ऐकताना मला पावसाच्या गारेगार सरी अंगावर कोसळत असल्याची अनुभूती येते. लताने आवाजात चिंब ओलावा आणुन ही गाणे गायिले आहे अशातर्‍हेने वातावरणाची अनुभुती आवाजात देणारी दुसरी गाणी मला तरी चटकन आठवत नाहीत. पण ही अनुभुती येथेच संपत नाही. गाण्यात नुसता पाऊसच नाही तर एकमेकांच्या हातात हात घालुन प्रेमात अगोदरच चिंब भिजलेले प्रियकर आणि त्याची प्रेयसी देखिल आहेत. त्यांना पावसात भिजताना मनात लागलेल्या प्रणयाच्या आगीची अनुभुती येते आहे. कवी योगेश यांचे समर्पक शब्द या गाण्याला लाभले आहेत. “नेमेची येतो मग पावसाळा” तेव्हा हाच पावसाळा एवढा वेगळा का भासतो आहे हा प्रश्न प्रेयसीला पडला आहे. “पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल, अबके बरस क्युं सजन सुलग सुलग जाये मन…” पडद्यावर गाणे जरी कुणी गात नसले तरी गाण्यातील भावना प्रेयसीच्या आहेत असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. एकुणच हे गाणे मौशमीच्या अमिताभबद्दलच्या मुग्ध भावना मुकपणे व्यक्त करतं.

गाण्याचं चित्रिकरण हा एक अतिशय आकर्षक भाग. बासुदांनी मुंबईचा पावसाळा दाखवुन प्रेक्षकाला अगदी गारेगार करुन सोडलं आहे. मुळात हा कॄत्रिम पाऊस नाही. अस्सलपणाची किमयाच वेगळी. कधी भुरभुरत, तर कधी जोरात पडणारा पाऊस, मरीन ड्राईव्हच्या रस्त्यांवर उसळणार्‍या समुद्राच्या लाटा, मैदानावर जागोजाग साचलेले पाणी, अवतीभवती छत्र्या घेऊन चाललेले मुंबईकर, पाण्यातुन चाललेल्या गाड्या, अशी सुखद दृश्य बासुदांनी घेतली आहेत. पाउस थांबल्यावर ओली झालेली मुंबई, तिथले शांत झालेले जीवन. खरंतर अमिताभ आणि मौशमी इतकेच दुसरे आणखि एक प्रणयाराधन या गाण्यात चालले आहे ते पाऊस आणि मुंबईचे. त्याने प्रणयात तिला चिंब भिजवुन शांत केले आहे. पावसाळ्यात अंधारुन आल्यावर जाणवणारा गोड काळीमा आणि त्यात मुंबैच्या जुन्या भागातला परिसर या सार्‍यांनी आपली जादु या गाण्यात पसरली आहे. बासुदांच्या चित्रिकरणाइतकेच सुंदर संगीत आणि आकर्षक चालीचे श्रेय आरडीला द्यायलाच हवे. डोळे मिटुन हे गाणे ऐकल्यास आपल्यालाही कुठेतरी पावसाळ्यातल्या ओळखिच्या गोड खुणा पटतात आणि मन सुखावुन जाते.

अमिताभच्या उंच देहयष्टीसमोर मौशमी छोटी वाटते पण कदाचित त्यामुळेच हे जोडपे अतिशय सुरेख दिसले आहे. त्याच्या लांब टांगा टाकत चालण्याबरोबर तिला जवळपास धावावे लागते पण तिही प्रियकराच्या वेगाशी जुळवुन घेऊन त्याच्या बरोबरीने त्याच्या सहवासाचे सुख घेत पावसाची मजा लुटते आहे. मौशमीचे हसणे आकर्षक आणि त्या दाताच्या ठेवणीमुळे तर तीचे हसणे अतिशय गोड वाटते. हे हसु या गाण्यात अनेकदा दिसते. मरीनड्राईव्हच्या धक्क्यावर उभे राहुन अमिताभ क्षणभर तिला थांबायला सांगुन सिगरेट काढतो आणि ती भिजलेली पाहुन फेकुन देतो, त्यावेळी मौशमी लाजवाब. असे क्षण या गाण्यात अनेक आहेत. हे हळुवारपणे पाहात, गाणे ऐकत वेचण्यात मजा आहे. शेवटी एक रिकामी बेंच पाहुन ती दोघे त्यावर एकमेकांच्या बाहुंत विसावतात आणि एका सुरेल गाण्याची, दृश्याची सांगता होते ती प्रेक्षकांना चिंब करुनच Happy

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा अतुलजी क्या बात है. अप्रतिम लेख. माझं अतिशय आवडतं गाणं. अमिताभ- मौसमी दोघेही आवडतात, मौशमीचे दात, तिचे हासणे मलापण खूप आवडते आणि हा चित्रपट पण शाळेत असताना टीव्हीवर बघितला आहे. सर्व डोळ्यासमोर उभं राहिलं.

अगदी चिंब मुसळधार पावसात भिजल्याचा फील आला.

हे वाचल्यावर आत्ता यु ट्युब वर हे गाण पाहिलं आणि तुम्ही लिहिलेलं तंतोतंत पटलं
तुम्ही हे लिहिल नसतत तर मी पाहिलं नसतं हे गाण आत्ता.
कोण अधिक सुंदर आहे गाण की आपलं लेखन हा प्रश्न पडलाय.

माझे फेवरिट. मी इतक्या चांगल्या शब्दात लिहू शकले नसते. मौशुमी खरेच फार सुरेख व गोड दिसते. तिच्या मनातली ओढ सुरेख व्यक्त होते. आर्डींचा वाढदिवस आहे पुढील आठवड्यात. मुंबईत स्पेश ल कार्यक्रम आहे. किशोरचे पण छान आहे पण लताच्या गाण्याची उंची वेगळीच आहे. ह्या गाण्यानंतर अबके सावन में जी डरे र्रिम झिम तन पे पानी गिरे ऐकलेच पाहिजे. जैसे को तय्सा नावाच्या देमार चित्रपटात हे अप्रतिम रत्न आहे.

माझंही खूप आवडतं गाणं. नुसतं ऐकलं तरी पावसात चिंब झाल्यासारखं वाटतंच पण कायमच त्याचं चित्रीकरण जास्त परिणामकारक वाटतं

'पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल, अबके बरस क्युं सजन सुलग सुलग जाये मन', -- आणि कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी --पाउस थांबल्यावर ओली झालेली मुंबई, तिथले शांत झालेले जीवन. खरंतर अमिताभ आणि मौशमी इतकेच दुसरे आणखि एक प्रणयाराधन या गाण्यात चालले आहे ते पाऊस आणि मुंबईचे. -- हे समोर येतेच.

आणखी एक आठवण म्हणजे PG च्या दुसऱ्या वर्षात सकाळच्या क्लासला प्रोफेसरांना उशीर झालेला, जुलैमधला असाच मुंबईचा पाउस आणि टाटा इन्स्टीटयूटचा हिरवाकंच परिसर. फ्री क्लास मिळाला म्हणून वर्गातला कोलाहल शिगेस पोहचलेला असताना एकलव्याने ( वर्गमित्र) टेबलावर ठेका धरून हे गाणे सुरु केले आणि तिथून त्या दिवसाची लयच बदलली. आता हे गाणे ऐकले की अमिताभ- मौशमी- मुंबईबरोबर त्यादिवशीचा क्लास आणि एकलव्याचा घुमणारा आवाज असेच समीकरण

लेख मस्तच.. गाणं, अमिताभ, मौशमी, किशोर/लताचा आवाज, ७० च काळातील पावसात भिजलेली मुंबई अगदी नास्टालजिक करुन गेल. तशी मी ९० च्या आधीची मुंबई हिंदी सिनेमांच्या कृपेनेच बघितली आहे Happy
आता मंझील बघावाच लागेल ..

मस्तच... या गाण्यातल काव्यही नेमकेपणाने भावना पोचवतं..

मेहेफिल मे कैसे,, कह दे किसीसे..
दिल बंध रहा है.. एक अजनबीसे...

या माझ्या खास आवडीच्या ओळी......

अजून एका अप्रतिम गाण्यावर एक अप्रतिम लेख... वा अतुल... मझा आया.

मौशमीच्या त्या कोपर्‍यावरल्या दातामुळे मला ती भयंकर आवडते. माझे पुढे येऊ पहाणारे दात मागे ढकलण्यासाठी "ऐन" वयात कुंपण घालावं लागलं..
तेव्हा, चुकुन-माकुन तस्सा दात "पुढे" असण्याची शक्यता मावळून मी भल्तिच नाराज का काय म्हणतत ती झाल्याचं ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लख्खं आठवलं Happy

मला स्वतःला लताबाईनी हे किंचित खालच्या पट्टीत म्हटलेलं आवडलं असतं. मौशमीचा बोलण्याचा आवाज सुर्रेख खर्जाचा आहे. इतकं किनर्‍या आवाजात लताबाईना गायला लावण्याची क्रेझच होती त्या काळी. कित्येक सुरेख गाण्यांमधून "गळ्याची तडफड" जाणवते.

असो... किशोरदांचं ऐकलं की सुकून ही सुकुन होतोय. "सुलग सुलग" साठी पुन्हा पुन्हा ऐकावं असं. फक्तं त्या साडेसफा फुटी देखण्या माडाला बाजाच्या पेटीसमोर काय म्हणून बसवलाय देव(च) जाणे. त्यातही किलर दिसतय.

खूपशी लॉन्ड्री धुवून लख्खं उन्हात वाळत घातल्यावर आज पाऊस पडल्यानं वैतागलेली मी... लेखाच्या लेकानं कमाल केली Happy

फक्तं त्या साडेसफा फुटी देखण्या माडाला बाजाच्या पेटीसमोर काय म्हणून बसवलाय देव(च) जाणे. त्यातही किलर दिसतय.>> भारीच.

मला ऐकाय्ला किशोर व्हर्जन फार आवडतं. त्याच्या आवाजामधला एक शांतपणा या गाण्यामध्ये दिसतो. बघायला अर्थात लताचं व्हर्जन.

माझंपण खूप आवडतं गाणं. २६ जुलैच्या पावसामध्ये आम्ही तीन मैत्रीनी तुफान भिजून एरॉसला सलमानचा "मैने प्यार क्यु किया" बघायला गेलो होतो आणी नंतर चालत सीएसटीला आलो होतो... हे गाणं बघताना तो प्रसंग नक्की आठवतो.

अतुल ठाकूर,

गाण्याचे दोन्ही अवतार श्रवणीय आहेत. कवी योगेश साध्याशा शब्दांत रसनिष्पत्ती करतात हे प्रकर्षाने जाणवतं. अशोक. यांचा लेख कई बार यूँ ही देखा है खासकरून आठवला. त्यात योगेश यांचे काव्य गद्य स्वरूपाचे असल्याचं म्हंटलं आहे.

मात्र असं असलं तरी कवी योगेश यांचे शब्द खेळतं गाणंही तितक्याच ताकदीने चित्रित करून देऊ शकतात. त्यांची उभायांगी प्रतिभा 'रिमझिम गिरे सावन' च्या दोन अवतारांतून स्पष्ट दिसते. अमिताभच्या गाण्यात त्याच्या तोंडी 'हाय करे अब क्या जतन' ही ओळ असली तरी ती मौशुमीच्या मनात झंकारलेली दाखवली आहे. हे दिग्दर्शनही अप्रतिम. अमिताभचं गाणं पार्श्वभूमीसारखं वापरलं गेलंय. हा प्रयोग त्यावेळेपर्यंत रुळलेला असला तरी नोंद घेण्याजोगा आहे.

तुमच्या लेखाबद्दल धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

वा ! क्या बात है!

हा सिनेमा राहुन गेला होता. पहावाच लागेल.

बाकी अमिताभने रोमँटीक सीन कोणाबरोबरही करावा

अभिमान मधे जया असो
नटवरलाल मधे रेखा असो

किंवा

नमकहरामधली स्मिता असो
'
यादी मोठीच आहे

प्रत्येक सीन यादगार असतो.

सुरेख गाणं आणि मुंबईच्या पावसाचं नितांतसुंदर वर्णन.
असंख्य पावसाळे प्रियकरासोबत याच मरीनड्राईव -नरिमन पॉईंट्वर घालवल्याने अधिकच हृदयाजवळचे गाणे आहे.
यावेळी पावसाळा लांबल्याने तर हे गाणं अधिकच हूरहूर लावतंय.
मला मात्रं एनिटाईम किशोर वर्जनच आवडतं.
असं वाटतं की त्याने पूर्णं गाणं उत्स्फूर्ततेने आणि अगदी एफर्टलेस म्हटलंय.

एकदम नॉस्टॉल्जिक केलं बुवा या गाण्याने!

सुंदर लिहीले आहे. आवडला लेख. दोन्ही व्हर्जन्स प्रचंड आवडती आहेत.

हा चित्रपट दोन वेगवेगळ्या काळात चित्रीत झाला असावा. कारण यात अमिताभ दोन वेगळ्या रूपांत दिसतो. अगदी सहज जाणवेल असे उदाहरण म्हणजे हीच दोन्ही गाणी: लताचे पावसातील गाणे आहे त्यात "जुना", आपली बॉडी लॅन्ग्वेज, स्क्रीन प्रेझेन्स तोपर्यंत न जाणवलेला अमिताभ आहे (आनंद वगैरेच्या काळचा), तर अमिताभच्या व्हर्जन मधे नंतरचा- फेमस झाल्यावरचा, त्याची प्रचंड लोकप्रिय हेअरस्टाईल असलेला अमिताभ आहे. चित्रपट पाहतानाही असे दोन्ही वेगवेगळे अमिताभ असलेले सीन्स मिक्स होऊन येतात.

क्या बात है! मनापासून आवडला!
लता आणि पुरुष गायक अशा दोन व्हर्जनमधल्या अनेक गाण्यात लताचे व्हर्जन त्याच्या रफी/किशोर अगदी मुकेश व्हर्जनपुढे फिके पडते असे माझे प्रामाणिक मत आहे (उदा.एहसान तेरा होगा मुझपर, मेरे नैना सावन भादो, चंदन सा बदन). पण या गाण्यात तसे होत नाही दोन्ही व्हर्जन तोडीस तोड आहेत. आणि याचे कारण अर्थातच आरडी!
दोन्ही गाण्यांना दिलेली ट्रिटमेंट - ऑर्केस्ट्र्शनमधले आणि ठेक्यातील बदल, इंटरल्यूडला लताच गुणगुणते- इतकी मस्त वेगळी आहे की या दोन्ही स्वतंत्र कलाकृती बनतात.
फारेंडचे निरिक्षणही इंटरेस्टींग आहे!

मौशमीच्या त्या कोपर्‍यावरल्या दातामुळे मला ती भयंकर आवडते. >>>>> मी टु ......

बाकी या गाण्यात अमिताभ आणि मौसमी आहेत..... हे मला आताच कळले....... गाणे बर्याचदा ऐकलेले आहे पण बघितलेले नव्हते Happy

पाऊस म्हटले की मला हेच गाणं आठवतं..घरी असलो आणि धो धो पाऊस पडत असेल तर हे गाण मी यूट्युबर पाहतो... खूप छान लेख!

मस्त गाणं आणि लेख....

डोळे मिटावे आणि गाणं रेप्ले कराअव इतक ऐकलय Happy

ऐकायला किशोर आणि बघायला लताच

वाह, माझे पण हे अतिशय आवडते गीत, अजुनही अनेकवेळा पहातो युट्युबवर.
पावसातले अस्सल चित्रीकरण पण फार छान आहे.
नेहेमी असे वाटते की त्या काळात मी मुंबईत का नव्हतो असा कोणाबरोबर ? Happy

नुसतं गाणं, त्याचे शब्द म्हणून ऐकायला किशोरचंच जास्त आवडतं. पण पडद्यावर आधीच बघितलेलं असल्याने पावसाचा जो 'फील' लताच्या गाण्याला आहे तो किशोरच्या गाण्याला जाणवत नाही.

छान लिहिले आहे!
जुन्या मायबोलीवर बहुधा योगने या गाण्यावर लिहिले होते, ते ही असेच अफाट सुंदर होते!!!:-)

Pages